"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

२)अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

हे मुद्दे पटण्यासारखे आहेत. विशेषतः आजकाल जेंव्हा काही मुला-मुली कडून परस्परपूरक असण्याविषयी अतिचिकित्सा केली जाते त्यासंदर्भात विचार करण्यायोग्य. पण याबाबतच्या टोकाच्या दुराग्रहाला 'लग्न ही आयुष्यात एकदाच करायची गोष्ट आहे, नंतर ते काहीही होवो निभावलंच पाहिजे' हा समाजानी बिम्बवलेला विचार, घटस्फोट आणि तो घेतलेली मंडळी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याही बाबी कारणीभूत आहेत.

शिक्षण अहंकार निर्माण करतं हे मात्र पटलं नाही. ते चार लोकांना पुरात गटांगळ्या खाताना पाहून 'पाणी माणसाला बुडवून मारतं' म्हंटल्यासारखं आहे. हे लिहिताना आपण पाणी हे जीवन आहे हे विसरून जातो. फुले/कर्वे यांना अपेक्षित शिक्षण आज मिळत नाही असंही म्हणण्यात अर्थ नाही. गावोगावी महिलांना अल्प-बचतिचं, शेतकऱ्यांना लागवडी साठीच्या शास्त्रीय उपायांचं, आदिवासी वाड्यानमधून मांत्रिकाकडे न जाता साध्या उपचारांनी अर्भकमृत्यू टाळण्याच शिक्षण देण्याची धडपड करणारी लोकं आहेत. शिवाय आजची आव्हानं, उपजीविकेची क्षेत्रं, जवळ आलेलं जग यांना केवळ त्यावेळी अभिप्रेत असलेलं शिक्षण कदाचित पुरंही पडणार नाही आणि जसंच्या तसं सयुक्तिकही ठरणार नाही.

बाकी लेखनशैली छान आहे. कोंकणी संवाद वाचतानाही मजा आली. तुमच्या प्रतिसादांची भाषा, वेगळे विचार स्वीकारण्याची तयारी आणि सौजन्यही आवडलं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

बाकी लेखनशैली छान आहे. कोंकणी संवाद वाचतानाही मजा आली. तुमच्या प्रतिसादांची भाषा, वेगळे विचार स्वीकारण्याची तयारी आणि सौजन्यही आवडलं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. - शतप्रतिशत अनुमोदन!

तसेच, समस्त प्रतिसादकांनो, 'Lets not become bullies in the name of being righteous' हे वाक्य आपल्याला लागू करून घेऊन मग प्रतिसाद द्यावा 'असे कळकळीचे आवाहन' / 'अशी नम्र विनंती' करतो. Happy

तसेच वरील इंग्रजी वाक्याचे छानसे मराठी भाषांतर कोणी केले तर बरे!

इब्लिस, वर दिलेले अनुवाद आहेत. भाषांतर नाही. भाषांतरात शब्दास प्रतिशब्द अपेक्षित आहे, तर अनुवादात मनी अचूक भाव उमटण्याची अपेक्षा असते/असावी. चूभूदेघे.
आ.न.,
-गा.पै.

तसेच, समस्त प्रतिसादकांनो, 'Lets not become bullies in the name of being righteous' हे वाक्य आपल्याला लागू करून घेऊन मग प्रतिसाद द्यावा 'असे कळकळीचे आवाहन' / 'अशी नम्र विनंती' करतो>>>>>
+१

लेख हा सदर लेखिकेने तिला आलेल्या/माहितीतल्या अनुभवांवर आधारीत लिहिला आहे. बरीचशी स्टेटमेंट्स ही Conclusions च्या स्वरुपात लिहिली आहेत आणि त्यामुळे ती बर्‍याच जणाना न पटणेही साहजिक आहे. मलाही लेख बराच एकांगी वाटला. एखादा मुद्दा/विचार लेखाच्या स्वरुपात मांडणे. त्यात सर्वांगीण विचार करुन लिहिणे ही एक कला आहे. ती एका फटक्यात (इथे कदाचित काही लोकाना जमतही असेल) सगळ्याना जमणे शक्य नाही. आपले वाचन, विचार आपले अनुभव जसे व्यापक होत जातात तसे आपल्या लिखाणातही प्रगल्भता/मुद्देसुद मांडणी हळुहळु जमायला लागते. सदर लेखिकेला ते कदाचित नीट जमले नाही. पुढे जमेलही कदाचित.

हे सर्व लेखिकेला नीटही सांगता आले असते पण ते न करता.. Get well soon, डबक्यातने बाहेर या म्हणणे, sex and the city, desperate housewives पहा म्हणणे, सौ. का काढुन टाकले म्हणणे..(वाक्याच्या शेवटी स्मायली किंवा दिवा टाकला म्हणजे आपल्या कुजकट कॉमेंटला सुगंध यायला लागला असे होत नाही) हे जरा अतिच होतेय असे नाही वाटत? हे सगळे ड्यु आय डी नी केले असते तर एकवेळ समजले असते. पण समजुतदार आयडीज नी सुद्धा असे झोडपुन काढणे खटकले. दुसर्‍यांच्या मतांचा आदर करणे हे युनिवर्सल तत्व आहे का त्यातही अपवाद असतात?

मनस्मि१८ , सौ संदर्भात ती कमेंट कुजकट वाटण्याच कारण समजु शकेल? नावा आधी सौ. लावणे हे एका मानसिकतेचे / समाजिक चौकटीचे व पितृसत्ताक विचारसरणी आपलीशी केलेल्या स्त्रीचे द्योतक आहे. नवरा असणे हे सौभाग्य आहे, आणि तेच सर्वात मोठे भुषणही ही पार्श्वभुमी त्या सौ. लावण्यामागे आहे.

वंदनानी लिहिलेल्या लेखावर ज्या प्रकारे प्रतिसाद आले ते वाचता त्यांच्या विचारसरणीत त्यामुळे इतक्या लवकर बदल झाला का ? हा प्रष्ण होता. समजला नसल्यास असे का लिहिले विचारावे ... नाहीतर 'हे कुजकट लिहिलय' आणि 'डबक्यातुन बाहेर' ह्या कमेंटच्या मधे फारसा फरक करता येणार नाही. नाही का ?

Get well soon, डबक्यातने बाहेर या म्हणणे, sex and the city, desperate housewives पहा म्हणणे, सौ. का काढुन टाकले म्हणणे..(वाक्याच्या शेवटी स्मायली किंवा दिवा टाकला म्हणजे आपल्या कुजकट कॉमेंटला सुगंध यायला लागला असे होत नाही) हे जरा अतिच होतेय असे नाही वाटत? >>> मनस्मी अशा प्रकारच्या कॉमेंटस त्या त्या व्यक्तीची मानिसिकता प्रकट करते , त्यामुळे अशा प्रतिसांदाकडे दुर्लक्ष करणेच योग्य .

>>नावा आधी सौ. लावणे हे एका मानसिकतेचे / समाजिक चौकटीचे व पितृसत्ताक विचारसरणी आपलीशी केलेल्या स्त्रीचे द्योतक आहे. नवरा असणे हे सौभाग्य आहे, आणि तेच सर्वात मोठे भुषणही ही पार्श्वभुमी त्या सौ. लावण्यामागे आहे. >><<

वंदनाताई, तुम्ही नावापुढे "सौ" लावण्याचे कारण अगदी 'हेच' होते का हो?

काय आहे ना तुमच्या लेखापेक्षा तुम्ही स्वाक्षरी काय लावता, कशाला लावता व कशाला काढली, अशी स्वाक्षरी लिहिण्यात तुमची मानसिकता काय आहे ह्याच्यावर गाडी वळली आहे आता व लेखापेक्षा(मूळ विषय) अशी वैयक्तिक कारणमिमांसा करणे गरजेच झालेय हे समजून घ्या. ( असे प्रश्ण पडण्यार्‍यांची मानसिकता काय हे कोण तपासून पहाणार हा नंतरचा प्रश्ण आहे).

मला वाटले स्वाक्षरी हा व्यक्तिगत आवडी-निवडीचा प्रश्ण आहे, ती कशी असावी/नसावी हा कोणाच्या चर्चेचा भाग असू शकत नाही व बीबीचा विषयही नाही जोवर तो माणूस स्वतः चर्चित नाही. पण मायबोलीवर म्हणा काहिही होते.. तेव्हा शक्य आहे. Happy

sex and the city पहा हे मी कुजकटपणे लिहिलेले नाही. माझ्या समजुतीनुसार लेखिकेने लग्न , प्रेम आणि नवरा आणि नातेसंबंध या विषयावर लेखमाला सुरू केलेली आहे. त्यांची विचारसरणी ही वर पेशव्याने वर्णन केल्याप्रमाणे असावी असा लेखावरून अंदाज येतोय. लेखमालिका लिहित असूनसुद्धा आणि इतके प्रतिसाद येऊनसुद्धा त्या त्यांच्या वर्तुळाबाहेर बघण्यासही तयार नाहीत असे वाटतेय. रोजचे वर्तमानपत्र जरी त्यांनी वाचले तरी याहुन अनेक इतर बाजू त्यांना दिसतील. पण त्या त्यांची चौकट सोडून बाहेर यायला तयार नाहीत. आणि सगळ्यांची आयुष्य ही अशीच चौकटीत बसलीच पाहिजेत असा अट्टाहास सोडायला तयार नाहीत.
sex and the city ही एका पुर्ण वेगळ्या समाजातील सामान्य स्त्रियांची गोष्ट आहे. त्यात आदर्श , विचार प्रवर्तक असे काही नाही. कदाचित ती फालतू असेल , उथळ असेल अगदी मुर्खपणाचा कळस असेल. पण तरीही प्रेम आणि लग्न , नातेसंबंध या भोवतीच ही गोष्ट फिरते. लेखिका ज्या नात्यासाठी , प्रेमासाठी आग्रह धरून आहे तेच नाते , प्रेम याच्या शोधात यातली नायिका आहे. यातला संस्कृतिक फरक बाजुला ठेवून, त्या नायिकांना जज न करता नातेसंबंधातील गुंतागुंत लेखिकेला समजून घेता येईल का हा प्रश्न आहे. अत्तापर्यंतचा लेखिकेचा सर्व अनुभव हा समाजाच्या नियमांच्या बेड्यात पुर्णपणे जखडलेल्या स्त्रियांचा आहे. अशाप्रकारे सामाजिक बंधने तीव्र नसलेल्या समाजातील स्त्रिया , पुरुषांचे वागणे, मानसिकता ही भिन्न असू शकते.
पण अशी सामाजिक बंधने नसली तरी माणसाची सद्सद्विवेक बुद्धी ही सगळी कडे सारखीच असते. कोणतेही सामाजिक बंधन नसून आणि अतिशय व्यवहारी स्वभाव असून सुद्धा मिरांडा तिच्या स्मृतिभ्रंश झालेल्या सासूची सेवा ज्या प्रेमाने, आपलेपणाने, काळजीने करते ते पहाताना लेखिकेला नक्कीच नविन काहीतरी गवसेल असे वाटते.
एक थोडासा वेगळा अनुभव लेखिकेला घेता यावा म्हणुन ती मालिका पहा असे मी सजेस्ट केले होते.

थोडक्यात काय तर 'सद्सद्विवेक बुद्धी' हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे असे मला वाटते. शिक्षण , सामाजिक नियम , प्रथा , लोक असे सगळे बाजुला ठेवून जर केवळ आपली 'सद्सद्विवेक बुद्धी' माणासाने वापरली तर खूप बरे होईल.

पेशवा,

आता तुम्ही कितीही सारवासारव केली तरी ती कॉमेंट लिहिण्यामागे तुमचा लेखिकेची हेटाळणी करण्याशिवाय इतर काही उदात्त हेतु होता हे मला पटत नाही. आता याला तुम्ही डबक्यात राहणे म्हणा, गेट वेल सुन म्हणा अथवा आणखी काही म्हणा. असो.

वंदनाताई, तुम्ही नावापुढे "सौ" लावण्याचे कारण अगदी 'हेच' होते का हो? >>> हे केवळ वंदना करता खरे नसुन महराश्ट्रातील शिष्ट् समाजातील सर्व स्त्रिया करता हे खरे आहे. सौ. नावा मागे लावण्याची काही वेगळी कारण मिमासा असेल तर मलाही ऐकायला आवडेल.

वंदना ने ते लावावे का नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. तुम्ही नावा पुढे सौ का लावता असे मी म्हटलेले नाही. किंवा त्यावरून त्याच्या बद्दल कुठलेही गैर्विधान केलेले नाही. तो वगळल्यावर मात्र तो बदल माबो-वरील त्यांच्या लेखावरील प्रतिकूल प्रतिक्रेयांमुळे झाला का इतका साधा प्रष्ण विचारला होता. ह्यात कुठलेही औचित्य भंग केले असे मला वाटत नाही. स्त्रीला 'विवाहात समान दर्जा' मिळत नाही हा त्यांच्या प्रस्तृत लेखनाचा भाग आहे. नवर्‍यास श्री आणि पत्निस सौ. हे मनात कायम जपायचे व समान दर्जा बाबत बोलायचे ह्यातला विरोधाभास दिसत नसेल तर तो दिसावा हा सुद्धा एक बारिक उद्देश.

स्वाक्षरिच नाही सगळा लेखच वैयक्तिक आहे ... म्हणायला गेले तर तोच एक मोठि स्वाक्षरी आहे असे माझे मत आहे.

मनस्मी१८,
माझ्य हेतूंविषयी शंका घ्येणाचे प्रयोजन काय? लिहिलेले वाक्य व स्पष्टिकरण योग्य नसेल तर ते योग्य का नाही हे लिहा.. नाहीतर एखाद्या गोष्टिबद्दलचे वाटणे हे बर्याच वेळा योग्य झोप झालि नाही पासुन जिवनातील अमुक वयीन डीप्रेशन पर्यंत कुठल्याही कारणाने होऊ शकते... Happy

>>>वंदना ने ते लावावे का नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. तुम्ही नावा पुढे सौ का लावता असे मी म्हटलेले नाही. किंवा त्यावरून त्याच्या बद्दल कुठलेही गैर्विधान केलेले नाही. तो वगळल्यावर मात्र तो बदल माबो-वरील त्यांच्या लेखावरील प्रतिकूल प्रतिक्रेयांमुळे झाला का इतका साधा प्रष्ण विचारला हो>>><<

एकदा म्हणायचे , 'वंदना ह्यांनी 'सौ' लावावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मग सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे म्हणता म्हणता त्या निर्णयाबद्दल आता असे का केले वा तसे का केले, त्यांनी आधी सौ लावले व आता का काढले असे प्रश्ण तरी विचारायची गरज कशाला पडायला पाहिजे?

मूळात, ह्या विषयावर(स्वाक्षरी) इथे चर्चा होण्याची गरजच काय? एवढी जजमेंट कशाला दुसर्‍याच्या व्यक्तिगत निर्णयाची ज्याने कुणाला फरक पडत नाही/नसतो?

हां, आता कोणी स्वाक्षरी अ‍ॅनालिसिस जर शिकत असेल तर स्वतःचा अंदाज बरोबर आहे का पडताळून पहायला स्वाक्षरी अ‍ॅनालिसिसचा दुसरा बीबी काढुया किंवा असा बीबी जिथे
'नावापुढे कु. वा सौ वा श्रीमती लिहिणार्‍या स्त्रीयांची मानसिकता व समाजावरील परीणाम' किंवा
'नावापुढे काहीच न लिहिणार्‍या स्त्रीया व त्यांची मानसिकता आणि समाजावरील परीणाम' मायबोलीमूळे बदलते का?
अश्या चर्चा करुया. Happy

आपण ह्या एका लेखाचं किंवा त्यातून आपल्याला अभिप्रेत होणारं लेखिकेचं मत ह्यावर अती विश्लेषण करतोय का? वंदनाला आपले विचार सुस्पष्टंपणे मांडता आले नसतिल, लेख एकांगी झाला असेल, प्रतिसाद देताना थोड्या अधिकच भावनाविवश होऊन त्यांनी जरा "जोरात" मतं मांडली असतिल, मग पुढचे प्रतिसाद लिहिताना त्यांचं "किंचित" मतपरिवर्तन म्हणून कदाचित त्यांनी स्वाक्षरी बदलली असेल... किंवा तो टायपो असेल... किंवा...

कुणालाही दुखवण्याचा माझा उद्देश नाही... पण हा एकच लेख (किंवा वंदनाचे लेख) जरा जास्तच धरून बसलोय आपण असं मलाच वाटून गेलं. चूकही असेल माझं.
वंदना आणि आपण सगळेच ह्यातून काही ना काही शिकलो असू अशी आशा करूया का? मी तरी करतेय.

असो... नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

बाकी जे काय चालू आहे ते चालू द्या. पण पेशव्याच्या 'सौ' वाल्या कमेंटवरुन इथे जे वाद चालू आहेत ती कमेंट ह्या लेखनावर नसून 'घटस्फोट' वर आहे हे लक्षात घ्या. दोन्ही लेखांची लेखिका, एकच असल्याने विचार सेमच असणार तेव्हा, लेखाच्या 'नावात काय आहे' म्हणा !!!

>>>हे सर्व लेखिकेला नीटही सांगता आले असते पण ते न करता.. Get well soon, डबक्यातने बाहेर या म्हणणे, sex and the city, desperate housewives पहा म्हणणे, सौ. का काढुन टाकले म्हणणे..(वाक्याच्या शेवटी स्मायली किंवा दिवा टाकला म्हणजे आपल्या कुजकट कॉमेंटला सुगंध यायला लागला असे होत नाही) हे जरा अतिच होतेय असे नाही वाटत? हे सगळे ड्यु आय डी नी केले असते तर एकवेळ समजले असते. पण समजुतदार आयडीज नी सुद्धा असे झोडपुन काढणे खटकले. <<<

मनस्मि, तसेही यात नवीन काय? म्हणा नवीन इतकेच की तुम्ही यांचे नामकरण 'समजुतदार आय डीज' असे करत आहात, बाकी यांनी हेच दिवे सातत्याने लावलेले सर्वत्र दिसत असतात. अस्तित्व टिकवणे म्हणजे दुसर्‍याला तोंडाला येईल तसे बोलणे, यापलीकडे यांची झेप नाही व कुवतही नाही. दुसरा तसे बोलला किंवा नीटपणे विरोध करू लागला की हे एकदम सारवासारवीसाठी तात्विक वगैरे पातळीला जाणार.

मनस्मि, तसेही यात नवीन काय? म्हणा नवीन इतकेच की तुम्ही यांचे नामकरण 'समजुतदार आय डीज' असे करत आहात, बाकी यांनी हेच दिवे सातत्याने लावलेले सर्वत्र दिसत असतात. अस्तित्व टिकवणे म्हणजे दुसर्‍याला तोंडाला येईल तसे बोलणे, यापलीकडे यांची झेप नाही व कुवतही नाही. दुसरा तसे बोलला किंवा नीटपणे विरोध करू लागला की हे एकदम सारवासारवीसाठी तात्विक वगैरे पातळीला जाणार >>

बेफिकीर, संपूर्ण अनुमोदन. "मी, मीच बरोबर, माझेच चांगले विचार, बाकीचे तालीबानी-सनातनी" असे विचार असणार्‍यांना असले लेख समजणारच नाहीत.

सायो, तुमचे बरोबर आहे. माय मिस्टेक. दोन्ही बाफचे विषय, लेखिका, प्रतिक्रिया आणि प्रतिक्रिया देणारे जवळपास सारखे असल्याने गोंधळ झाला.

पेशवा, प्रथम "त्या" बाफचा संदर्भ "या" बाफवर आणल्याबद्दल क्षमस्व!
तुमची स्पष्टीकरणे सयुक्तीक वाटली तरी तुमची ती "कॉमेंट" एवढा विचार करुन लिहिली गेली होती असे मला अजुनही वाटत नाही. तुम्ही आता वैयक्तीक पातळीवर (माझी झोप, वय इ.इ) उतरायला लागला आहात तेव्हा उगाच वाद वाढवण्यापेक्षा इथेच थांबतो.

सगळ्याना...
हे माझे इथले शेवटचे पोस्ट. (मी शक्यतो वाद टाळतो कारण कुठल्याही वादाचा मला त्रास होतो पण अगदीच राहावले नाही म्हणुन इथे लिहिलेय)
या बाफवर किंवा आधीही काही वेळा माझे इतरांच्या लिहिण्याच्या टोन वरुन वाद झालेले आहेत. इथे प्रतिक्रिया लिहिणारे काही हे मायबोलीवर "एस्टॅब्लिश्ड" आयडीज आहेत. दाद, पेशवा आणि इतरही ज्यानी या आणि त्या धाग्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांचे बरेच साहित्य मायबीलीवर प्रसिद्ध झालेले आहे मी वाचलेले आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे.

गीतेत लिहिले आहे की "थोर लोकांच्या आचरणावरुन इतर सामान्य लोक तसे वर्तन ठेवीत असतात." जर या एस्टॅब्लिश्ड/सीनीयर आयडीज नी असे ऑफेन्सिव लिहायला सुरुवात केली तर इतर उपद्रवासाठी जे इथे येतात त्याना काय दोष द्यायचा? मला तरी वाटते अशाने नवे साहित्य लिहिणारे लोक नाउमेद होउ शकतात. याचा अर्थ कोणाच्या चुका दाखवुच नयेत असा मुळीच नाही. जरुर दाखवल्या गेल्या पाहिजेत पण त्यातला condescending टिंगल टवाळीचा टोन टाळता येणार नाही का? माझी सगळ्या सीनीयर आयडीज ना विनंती आहे की त्यानी यावर जरुन विचार करावा.

याउलट दाद यांची प्रतिक्रिया..आतापर्यंत जिथे जिथे त्यानी लिहिले आहे (मग त्यातील विचार त्याना पटलेले नसले तरी) त्यांची अतिशय संयमित प्रतिक्रिया असते. कुठल्याही तर्‍हेने दुसर्‍याला न दुखविता आपला मुद्दा कसा मांडावा याचा एक आदर्श त्या नेहमी ठेवतात. त्यांच्या प्रतिक्रियाही/त्यांच्या लेखांप्रमाणेच उत्तम साहित्याचा नमुना म्हणता येतील अशा असतात. असो.

आता माझे विचार, काँमेंट्स कोणाला condescending/offensive वाटले असतील तर मी त्यांची आधीच क्षमा मागतो.

धन्यवाद.

महात्मा फुले, धोंडो कर्वे चुकले की काय ते अजुनही सिध्द व्हायचं आहे. त्याची उत्तरे काळच देईल.

ही विचारसरणी तालीबानापेक्षा जास्त लांब नाही.
माझे एक दोन आगाऊ प्रतिसाद असतील तर ते या वाक्यानंतरच.

कुणा एका व्यक्तीचा आदर्श सगळ्या माबोकरांनी ठेवला आणि सगळे तसेच लिहू लागले तर ती आयडीबोली होईल , जसे की दादसारखे सगळ्यांनी लिहिले तर दादबोली. (सॉरी दाद, यात तुला त्रास द्यायचा हेतू नाही गं!)
बेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या प्रकारे लिहिणारच. त्याने तर मायबोलीवरचा जीवंतपणा वाढतो. हो फक्त अतिवैयक्तिक शेरे आणि असांसदीय शब्द नकोतच.

खरंतर स्पष्टीकरण द्यायची गरज नाही पण मनस्मि हे बर्‍याचदा कळकळीने लिहितात त्यामुळे हे त्यांच्यासाठी...

सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि धोंडो केशव कर्वे हे लोक स्त्रीशिक्षणासाठी झटले. यांच्या जीवावर आज आम्हाला शिक्षण घेता येतंय. त्यांच्या जीवावर आम्ही कुठेतरी पोचू शकतोय. आमच्यासाठी या लोकांनी अंगावर चिखल फेकला जाणे, वाळीत टाकले जाणे आणि प्रचंड सामाजिक अवहेलना सहन केलीये. शिक्षणाने अहंकार येतो सारखे वाक्य हे या सगळ्यांच्या कष्टाला चूक ठरवणारे होते. ज्यांच्यामुळे आम्ही सगळ्या उड्या मारू शकतो त्यांना असे निगेट करणे... बॉस इट इज पर्सनल!!!
तस्मात गेट वेल सून ला पर्याय नाही.

हे वगळता माझे पहिले पोस्ट पाह्यलेत तर केवळ मुद्दे खोडलेले आहेत.

पण पहिल्या पोस्टला वंदनाबाईंनी ज्याप्रकारे उत्तर दिलंय ते बघता त्यांना अश्या प्रकारची उत्तरे येणं हे साहजिक आहे.

मी बर्‍यापैकी पाणी ओतलं इथे येऊन.
आपल्यातल्या प्रत्येकाला माहीत आहे- प्रत्येक अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन ही असणारच असणार. तेच चाललय इथे.
पण अगदी खरं सांगू? वंदनाच्या लेखाच्या निमित्ताने इथे कितीतरी "चांगली" चर्चा झालीये असं वाटत नाही? कितीही वादावादी म्हटलं तरी त्यातून शिकणारी माणसं शिकतातच हा माझा विश्वास आहे... वादणारे शिकतात, वाचणारे शिकतात. जे शिकत नाहीत, त्यांचाच तोटा. इतक्या सुंदर संधीला मुकतात बिचारे.
थोडफार वैयक्तिक/सार्वजनिक देणं-घेणं होणारच आहे... इतके एकत्रं आहोत तर इतकी "सलगी" अपेक्षितच आहे.
शेवटी ह्यापैकी कशाचाच आकस राहिला नाही मनात की झालं.

सातीचं बरोबरच आहे. उगीच माझ्यासारखं प्रतिसाद वगैरे देण्याच्या भानगडीत कुणीही मुळ्ळीच पडू नका.... आपापल्या परीनं सजवताय हे जग... कधी गळ्यात पडून अन कधी गळे फाडून... मी ही करतेच जमेल तेव्हा, जमलं तर...
त्यानच तर समृद्धं आहे मायबोली. Happy
तेव्हा लगे रहो...

पुढचे अख्खे पोस्ट हे मा वै म आहे ह्याची कृपया नोन्द घ्यावी -

जर विचार करून, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ह्यांची कल्पना ठेऊन गृहिणीपद स्विकारलं नसेल तर -
१. मनात दुय्यमता वै. विचार येऊ शकतात.
२. आजुबाजुच्या कमवत्या अथवा स्वतंत्रबुद्धी स्त्रियांशी तुलना होऊन (म्हणजे स्वतः करून) न्यूनगंड येऊ शकतो
३. केवळ दिसणं महत्त्वाचं.. असणं नाही असा बेस असलेल्या नात्यात दिसण्याचा बेस गेला की असण्यात असुरक्षितता येऊ शकते.

त्यामुळे -
१अ. तरूण वयात "आमच्या ह्यांना अस्सच" , "आमच्या इथे" असं म्हणत जे अनावश्यक कष्ट (?) केलेले असतात त्याची घरच्यांना सवय होते.. (म्हणजे गेस्ट अ‍ॅपिअर्न्स आणि टॉकशोचे रोजचे जज ह्यातला फरक)
२अ. मुद्दा नं १ मुळे जे स्थान निर्माण झालयं .. म्हणजे माझ्याशिवाय घरचं पानच हलत नाही, ते मध्यम वयात फारच फोल वाटायला लागतं (हार्मोन्स, एम्टी नेस्ट वै.)
३अ. ते स्थान उतारवयात कोणी तरी बहुदा काढूनच घेतं .. म्हणजे सून किंवा जाऊ किंवा केवळ इमॅजिनरी सवत (:फिदी::)

२अ आणि ३अ मधून मग लेखातल्या प्रतिक्रिया येतात. ज्याची कारण विजोडपणा नसून १ ते ३ आणि १अ आहेत.

असह्य विजोडपणा (पक्षी कॉम्पॅबिलिटी इश्यु) असेल तर जोडप्याने लग्नाची २५ वर्षे केवळ "सहन" करत राहू नये.

ही प्रतिक्रिया आणि घुसमट सुपरवुमन बनू इच्छीणार्‍या बायांची पण होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

ह्याच्या विरूद्ध कुठचाही निर्णय स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ह्यांची कल्पना ठेऊन घेतला तर आपल्याच सोयीच पडतं.. त्यात तुमच्या सहचराला सामील केलतं आणि तुमच्या अपेक्षा आणि मर्यादा व त्याच्या अपेक्षा ह्यांचा मेळ घातलातं तर बरीच घुसमट कमी होऊ शकते.

ह्या सगळ्याची कल्पना विवाहपूर्व गप्पांमध्ये करून द्यावी.. तेंव्हा शालू.. त्याची गाडी.. नोकरी.. घर... ई. ऐहिक गोष्टींमध्ये "कॉम्पॅटीबिलिटी" शोधली की मग आहे च पुढे.. "कित्ती सहन.." हे गाणं.

"सहन करत"/"भोगत" वै ही आपणच आपल्याला गोंजारण्यासाठी लावलेली सोयीची "क्रियापद" आहेत. मुलांसाठी, नवर्‍यासाठी काही घरकाम करताना "आपण खूप काही करत आहोत" असा भाव असेल तर मग करूच नये.. त्याच रस्त्याने.. मी नोकरी केली म्हणजे मी "धन्यकार्य" केलं असं वाटत असेल तर खुश्शाल सोडून द्यावी.

आपण जे जीवनमान/ रहाणीमान स्वतः स्विकारलयं.. त्याच्याबद्दल कोणी आपल्याला "पदक" का बरं द्यावं?

आणि शिक्षण कुठच्याही प्रकारच असो.. माणसाच्या जाणिवा विस्तारते. त्याला आत्मभान येतं.. जर शिक्षण अहंकार निर्माण करत असेल तर आपल्या लेकीसाठी अर्धशिक्षीत नवरा का बरं करत नाही? उच्चशिक्षीत अहंकारी नवरा का बरं बघायचा? त्यामुळे कैच्याकै विधानाने आपण शिक्षणप्रसारासाठी आयुष्य वेचलेल्यांना मूर्खात काढतो नाही का?

(थोडसं संस्करण करून मूळ प्रतिक्रिया तीच ठेवली आहे)

"सहन करत"/"भोगत" वै ही आपणच आपल्याला गोंजारण्यासाठी लावलेली सोयीची "क्रियापद" आहेत. मुलांसाठी, नवर्‍यासाठी काही घरकाम करताना "आपण खूप काही करत आहोत" असा भाव असेल तर मग करूच नये.. त्याच रस्त्याने.. मी नोकरी केली म्हणजे मी "धन्यकार्य" केलं असं वाटत असेल तर खुश्शाल सोडून द्यावी.

आपण जे जीवनमान/ रहाणीमान स्वतः स्विकारलयं.. त्याच्याबद्दल कोणी आपल्याला "पदक" का बरं द्यावं?

आणि शिक्षण कुठच्याही प्रकारच असो.. माणसाच्या जाणिवा विस्तारते. त्याला आत्मभान येतं.. जर शिक्षण अहंकार निर्माण करत असेल तर आपल्या लेकीसाठी अर्धशिक्षीत नवरा का बरं करत नाही? उच्चशिक्षीत अहंकारी नवरा का बरं बघायचा? त्यामुळे कैच्याकै विधानाने आपण शिक्षणप्रसारासाठी आयुष्य वेचलेल्यांना मूर्खात काढतो नाही का?<<<
+१००००००००००००००००००००००००००

जाजु मस्त पोस्ट.
खरंतर मला या विजोड चीच गंमत वाटतेय. आता जर नवरा बायको दोघंही व्यवहारचतुर असतील तर प्रश्नच नाही पण दोघं व्यहारचतुर आहेत आणि दोघं मुखदुर्बळ आहेत तर त्यांना अनुरूप म्हणायचं का? अहो संसारात किती प्रोब्लेम होणार अशानी. उलट १ व्यवहारचतुर आणि एक बोलका/वाक्चतुर असं असलं की मग ते अनुरूप होतील ना एकमेकांना? आता इथे कुठलेही गुण्/दुर्गुण टाकुन बघा. जिथे १ कमी पडेल तिथे दुसर्‍यानं सावरायचं. एकचजण सग्गळंच्या सग्गळं सांभाळतोय/ करतोय असं अतिशय दुर्मिळ आहे.
अनुरूप म्हणजे सारखेच नाही तर एकमेकाला पूरक असं मला वाटतं. मग ते संसार चालणारच. त्यांना विजोड म्हणुन मग ते संसार कसे टिकतात असा विचार करून कसं चालेल?

मुलांसाठी, नवर्‍यासाठी काही घरकाम करताना "आपण खूप काही करत आहोत" असा भाव असेल तर मग करूच नये.. त्याच रस्त्याने.. मी नोकरी केली म्हणजे मी "धन्यकार्य" केलं असं वाटत असेल तर खुश्शाल सोडून द्यावी.

आपण जे जीवनमान/ रहाणीमान स्वतः स्विकारलयं.. त्याच्याबद्दल कोणी आपल्याला "पदक" का बरं द्यावं?

>>> +१
स्वतःची किंमत दुसर्‍याच्या नजरेतून केली की असं होतं.

"शिक्षण अहंकार निर्माण करते आणि फुले/कर्वे यांचं कार्य अजून सिद्ध व्हायचंय" या वंदनाताईंच्या विधानानंतर माझी तरी त्यांच्याशी बोलायची इच्छाच संपली.

Pages

Back to top