दार उघडून बाहेर पडल्यापडल्याच पवार मावशीं तोंडभरून छद्मी हास्य उधळताना दिसल्यामुळे श्रीनिवास पेंढारकरांना कसेतरीच झाले.
मावशी - दहा हजार पगार अन बाप व्हायला तयार..
झाले! सकाळचा डोस एक मिळालाच नेहमीप्रमाणे..
पेंढारकरांनी लक्षच दिले नाही. आजचा दिवसच तसा होता. ही बाई काहीही बोलली तरीही उड्या माराव्यात असा आनंद भरला होता मनात!
मावशी - जिथे तिथे मूल लहान अन भारत मेरा महान
पेंढारकरांनी कुलूप लावले अन ते मावशींकडे वळले.
पंचेचाळीस वर्षांची ही बाई काळी कुट्ट, बेढब होती अन आठवी शिकलेली होती. शेजारीच राहायची. आठवी शिकलेली असली तरी तोंड असे चालायचे जसे हिटलरचे वक्तृत्वच! काय एकेक म्हणी, काय एकेक यमके जुळवलेल्या ओळी! आणि हे सगळे चांगल्यासाठी नाही कुणाच्याही! हे सगळे नावे ठेवण्यासाठी वापरायचे! वाड्यातील एक माणूस नव्हता जो जन्माला आलेला होता आणि अजून मेलेला नव्हता आणि त्याने पवार मावशींचा शाब्दिक तडाखा खाल्लेला नव्हता.
उगाचच भांडायची ही बाई! कुणाशीही भांडायची! तिला कुणी कोणत्याही फंक्शनला बोलवायचे नाही. जिथे जाईल तिथे उकरून उकरून मुद्दे काढायची अन भांडू लागायची.
समोरच्या घाटेंच्या मुलीचे लग्न होते दोन वर्षांपुर्वी! हिला आमंत्रण देण्याचे धाडस केले घाटेंनी! बरेच वर्षांचा शिरस्ता मोडला वाड्यातला! आल्या पवार मावशी कार्यालयात! सीमांतपूजनाला एकदम वरपक्षातच जाऊन धडकल्या. आता त्या वरपक्षाला ही बाई कोण आहे अन काय आहे याची सुतराम कल्पना नाही. त्यांनी आपले चांगल्या मनाने एक दोन प्रश्न विचारले. मुलाचा बाप जरा म्हातारासा होता. त्यांना उशीरा झालेला मुलगा होता तो. या बाईने कारण नसताना घाटेंच्या व्याह्यालाच उद्देशून म्हण वापरली..
मुलगा चढला बोहल्यावर अन हे नटले पोचल्यावर
इतका अपशकुनी शब्दसंचय ऐकल्यावर तातडीने रुसवे फुगवे जाहीर करण्यात आले वरपक्षाकडून आणि घाटेंनी स्वतःच्या गाडीने पहिल्यांदा पवार मावशींना पुन्हा वाड्यात आणून सोडले. येताना घाटेंना आपल्या चालत्या गाडीचा आवाजच येत नव्हता. कारण पवार मावशी बोलत होत्या.
स्वतःच देतात आमंत्रण.. व्याह्यावर नाही नियंत्रण..
एक मात्र होते या बाईचे! लहानपणी तिला 'तू शिकत नाहीस' या विषयावरून प्रचंड रागावण्यात आलेले असल्यामुळे तिने ऐकलेले सर्व शब्द मनात नीट आखून ठेवले होते. उभे, आडवे असे! संगणकावर जसे 'वर्ड्स एंडिग विथ' असे विचारले की त्या त्या अक्षराने संपणारे त्या त्या भाषेतील शब्द एकाखाली एक दिसतात तसे या बाईला 'वर्ड्स स्टार्टिंग विथ, वर्ड्स एंडिंग विथ, वर्ड्स हॅविंग नो डी' वगैरे प्रकारे सगळेच्या सगळे आठवलेले शब्द रेघेत दिसायचे आणि ते तिच्यासमोर हात जोडून उभेही असायचे.
श्रीनिवास पेंढारकरांच्या दाराला लागून दार होते तिचे! नवर्याने मागे ठेवलेल्या पैशांवर गुजराण सहज करू शकत होती ती! किराणा माल वाला, पोस्टमन, दूधवाला, मोलकरीण, वाड्यातील माणसे.. जो समोर दिसेल त्याला पहिला बोलून उलटा करायचा आणि अप्रिय व्हायचे हा पवार मावशींचा आवडता छंद होता.
ही बाई वाड्याच्या कॉमन गॅलरीतच उभी असायची सदा! येणारे जाणारे वचकून असायचे. पण हिच्यावर हात उगारण्याचे धाडस मात्र कुणी केलेले नव्हते आजवर! बरेच वर्षांपुर्वी म्हणे एका म्हातार्याने केलेले होते आणि या बाईने त्याला लाटण्याने बडवले होते. उगाचच! स्वतःच काहीतरी बोलली त्याला आणि तो चिडून आल्यावर बडवले लाटण्याने! वाड्यातील भाडेकरूंच्या नातेवाईकांना अन मित्रांनाही माहीत झाले होते की दास्ताने वाड्यात पवार मावशी नावाचे एक भीषण रसायन राहते.
आजही पेंढारकरांना बघून ती जमेल तितके छद्मी हासली. श्रीनिवास पेंढारकर! एक बत्तीस वर्षांचा विवाहीत गृहस्थ! त्याची बायको रमा गेले एक महिना माहेरी होती. तिला नववा लागला होता आणि माहेर होते औरंगाबादचे! काल रात्री समोरच्या कदमांकडे फोन आला होता की बहुधा दोन दिवसांनी ऑपरेशन करणार आहेत डॉक्टर! श्रीनिवास पेंढारकरांच्या इवल्याश्या गरीब स्वभावाच्या मनात शालीमार गार्डनपेक्षा जास्त कारंजी उडाली ते ऐकून! आज ते रजेचा अर्ज करून अन कुणालातरी चार्ज देऊन रात्रीच्या गाडीने औरंगाबादला निघणार होते. फक्त काही तास! त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक गोड जीव अॅड होणार होता. घर भरून जाणार होते. गरीब स्वभावाच्या, अल्पसंतुष्ट असलेल्या आणि किर्लोस्कर कंपनीतील स्टोअरमधे साधीसुधी नोकरी करणार्या पेंढारकरांना रमाही तशाच स्वभावाची मिळाली होती. ती तर त्यांच्याहूनही गरीब होती. पेंढारकरांचे मूळ गाव कर्हाड! आता तेथे फक्त त्यांची म्हातारी आई आणि त्यांच्यापेक्षा मोठी अशी एक विधवा बहीण राहात होती. रमाच्या माहेरी तिचे आई वडील आणि तिची एक लहान पण लग्नच जमू शकत नसलेली बहीण होती!
खरे तर पेंढारकर आणि रमा या दोघांचेही लग्न जमतच नव्हते बरेच दिवस! शेवटी कुठूनतरी एकमेकांची स्थळे समजली अन पसंती झाली. दोन वर्षांपुर्वी! दोन वर्षात पवार मावशी ही काय चीज आहे याचा रमाने धसका घेतलेला होता. आणि नंतर ही बातमी समजल्यावर मात्र तिची आई इथे येऊन राहिली होती.
महिन्याभरापुर्वीच पेंढारकर दोघींना औरंगाबादला सोडून आले होते. आणि तेव्हापासून एकटेच राहताना पवार मावशींची भीती बाळगूनच राहात होते. कारण ती बंद दारालाही शिव्या देत बसणारी बाई होती. आणि ज्याला शिव्या देत आहे तो सोडून बाकी सगळे हसत असायचे. पवार मावशींचे किस्से वाड्याला कितीही पुरायचे गप्पा मारून हासताना! आणि सारखे किस्सेच व्हायचे! आज याला धुतला, काल ते आजोबा शिव्या खाऊन भरभर निघून गेले वगैरे वगैरे! नेमकी 'वेडी' अशी ख्याती नसली तरीही पवार मावशी ही एक सर्किट बाई आहे इतके सगळ्यांनी ठरवून टाकले होते. एक मात्र होते या बाईचे! कुणी मेले की मात्र गप्प बसून राहायची. रडायची नाही की हसायची नाही की बोलायची नाही.
मावशी - बघतोस काय? मीनाकुमारीय का मी?
श्री - अहो मी कुठे बघतोय? तुम्हीच बोलताय ना काहीतरी?
मावशी - सोसेल का एवढ्याश्या तिळभर पगारात आणखीन एक जीव? घरामधे?
श्री - बघतो
मावशी - बघतो काय बघतो? आता काय बघायचय? आधीच कळायला पाहिजे
श्री - खरय
मावशी - आणि रात्री अफू चाटवून गप्प निजवायचं त्या मुलाला, मला आवाज आला रात्रीचा रडण्याबिडण्याचा तर माझ्याकडून रात्रभर भिंतीवर वरवंटा ठोकत बसेन
श्री - अफू?
मावशी - अफूच चाटवतात. विकायला नाही सांगत आहे पाकिस्तान बॉर्डरवर! अन त्या चेटकीणीला सांग बाळंतिणीची कौतुके सहन होत नाहीत मला. चार दिवसात धुणे धुताना दिसली नाही तर महाभारत होईल.
श्री - अहो ती महिनाभर येणारच नाहीये पण..
मावशी - बाळंतिणीचा महिना अन नवर्याची दैना..
श्री - काय???
मावशी - नैसर्गीक आहे का? की... आपलं ते... हे???
श्री - अहो मावशी?? काय बोलताय?? माझी बायको म्हंटल्यावर माझाच मुलगा असणार ना..??
मावशी - अहो विद्वान डिलीव्हरी नैसर्गीक आहे का आपलं ते.. काय तो शब्दय..
श्री - सिझेरियन..
मावशी - हां .. तेच ते..
श्री - सिझेरियन
मावशी - अरे हो ना? एकेक शब्द दोनदा बोलल्याशिवाय कळा येत नाहीत का तिला??
श्री - ही किल्ली..पाच दिवसां..
मावशी - किल्ली बिल्ली घेऊन जायची बरोबर.. तुमचे पणजोबा नवाब नव्हते आम्हाला नोकरीवर ठेवायला
श्री - ठीक आहे.. पाच दिवसां..
मावशी - अन एकावर थांबायचं.. इथे माझ्या घराशेजारी पाळणाघर नकोय मला..
श्री - अहो एक तर होऊदेत??
मावशी - आमच्यावेळेस बाळंतिणी तिसर्या दिवशी स्वैपाकघरात दिसायच्या...
श्री - का?
मावशी - का काय का? सासू पेकाटात लाथ घालून आणायची.. ही थेरं नव्हती महिनाभर बसायची तेव्हा..
श्री - अहो.. ती अवघडलीय मावशी..
मावशी - अवघडलाय तिचा बाप.. अशी कशी अवघडली??
श्री - अहो.. ते काय कळतं का कुणाला??
मावशी - तिसर्या महिन्यापासून केर फरश्या करायला लागतात.. महाराणीसारखे डिंकाचे लाडू भरते तुझी बायको.. मग अवघडणारच की..
श्री - निघतो..
मावशी - माझ्याकडून निघतो अन माझ्याकडेच बघतो..
श्रीनिवास पेंढारकर स्वतःच्या घराचे दार उघडून बाहेर आल्याच्या आपल्या चुकीचे दैनंदिन प्रायश्चित्त घेऊन जिना उतरू लागले.
वरून मावशी ओरडत होत्या! वाड्यातले एक दोन पुरुष अन दोन बायका येऊन चौकशी करू लागल्या. 'मी आज औरंगाबादला जात आहे अन उद्या ऑपरेशन आहे' ही उत्सुकता ताणणारी बातमी पेंढारकरांनी सगळ्यांना दिल्यावर सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. वरून मावशी ओरडत होत्या..
मावशी - या भटुरड्यांना केळीच्या द्रोणात शिरा करून घाल हो आलास की.. मला दे पडवळ कच्चं घशात कोंबायला.. नालायक.. एक मुलगा होणार तर काय हा आनंद वाड्याला??? जसे काही फ्लॅटच होणारेत इथे फुकटात... आजवर काय बाळंतपणे झाली नाहीत ???
एखाद्या न्हाव्याच्या दुकानात जसा अव्याहत रेडिओ वगैरे चालू असतो तशा पवार मावशी वाड्यात चालू असायच्या. त्या चालू असण्याची अती सवय होती सगळ्यांना!
मागे असेच समोरचे एक दिड वर्षाचे समीर नावाचे बालक दारात उभे राहून वर मावशींच्या अव्याहत चाललेल्या आवाजाच्या दिशेने टक लावून घाबरून अन बावचळून बघत असताना मावशींचे लक्ष गेले. समीरच्या आईचे नाव होते प्रमिला!
मावशी - ए प्रमिलडे.. हा आत्तापासूनच बायकांकडे बघायला लागलाय, बापावरच जाणार म्हणा मुले.. उचल त्याला.. बुद्धी कितीय या वयात.. काय दिवस आलेत.. यांना गेले दिवस आणि वाईट आले दिवस..
म्हण पूर्ण व्हायच्या आधीच समीर उचलून आत नेण्यात आलेला होता.
अतर्क्य बाई होती ती! चितळे आजोबांशी तिचे झालेले भांडण हे दास्ताने वाड्यातील ऐतिहासिक भांडण होते. चितळे हा सत्तर वर्षांचा अविवाहीत सद्गृहस्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता. वाड्यात त्याचे सगळ्यांशी चांगले संबंध होते. कायम खाकी हाफ पँट, डोक्याला टोपी आणि पांढरा सदरा याच वेषात हा माणूस दिसायचा! व्यवसाय काहीच नाही. रोज उठून मोतीबागेत जायचे आणि संघाचे काम करायचे इतकाच परिपाठ! एक दिवस चितळे वाड्याच्या दारातून आत आले तेव्हा मावशी खरे तर मोलकरणीची वाट पाहात होत्या. मोलकरीण न आल्याने त्या आधीच भडकलेल्या होत्या आणि त्यात हा म्हातारा दिसला त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांना वाटले दाराकडे वळणारी सावली बाहेरून दिसतीय म्हणजे आपली बाईच आलेली असणार! आता ती आल्या आल्या तिला फैलावर घ्यायचे असा त्यांचा प्लॅन होता. तर चितळे आजोबा आले. हात ओवाळत वरूनच त्या नेहमीच्या टीपेच्या आवाजात बोलल्या.
मावशी - आले... आले रे आले.. बघा.. या वयात चांगल्या घरातल्या बायकांसमोर अर्धी चड्डी घालून फिरतात... आले पुन्हा देशप्रेमी..
चितळे - ओ ताई..
मावशी - ताई तुझा काका.. मी ताई आहे का??
चितळे - हे पहा मावशी, मी बर्याच दिवसांपासून तुमचे..
मावशी - मावशी तुझा आजा..
मावशी तुझा आजा यावर एक टारगट मुलगा फिदीफिदी हसला. चितळे भडकले.
चितळे - काय गं? आं? वय काय तुझं? माझं वय काय? काय चोवीस तास वरुन ओरडत बसतेस??
हे ऐकून तर मावशी तावातावाने खालीच आल्या.
मावशी - अरे या रे या.. अरे तुरे करतोय मला... या वयात नजर बघा पिकल्या देठाची.. बाईमाणसाने कसे राहायचे वाड्यात?? बाहेर देशप्रेम... इथे बायकांचे कुशलक्षेम! अब्रूकी हो गेली माझी.. कुणाला काही नाहीच आहे.. याला हाकला वाड्यातून.... ए नंदे.. तुझ्या शेजारी राहतो ना हा..??... साप सोड आज रात्री उंबर्याच्या सापटीतून.. येईल बोंबलत..
चितळे - ए.. तुला पोलिसात देईन.. आमचे कार्यकर्ते येतील इथे तुझे थोबाड बंद करायला..
मावशी - एकेकाला तेलात सोडीन अन झार्याने तळीन.. डाळीच्या पिठात बुचकळून.. मोतीबागेत हीच थेरं करतोस का??
चितळे - तोंड सांभाळ.. मी माझं आयुष्य देशसेवेला वाहिलेले आहे
मावशी - हो क्का??? अन मग पँटचा अर्धा भाग कुणाला वाहिलायस???
आता मात्र वाडा हसायला लागला.
चितळेंनी काढता पाय घ्यायचा प्रयत्न केल्यावर मावशींनी त्यांना हिसकाहिसकी केली. त्यात त्याच पडल्या. उठल्या त्या सरळ चौकीत! अर्ध्या तासाने एक महिला पोलीस आली.
मावशी - हा.. हाच तो.. देशसेवेच्या नावाखाली महिलांना छेडतो अन नादाला लावतो.. कपडे बघा याचे..
म.पो. - काय हो काका?
चितळे - काय हो काका काय? वाड्यात कुणालाही विचारा! माझ्यासारखे शुद्ध चारित्र्य कुणाचे नसेल इथे..
मावशी - शुद्ध चारित्र्य? एकावेळी चार लंगोट धुवून बाहेर वाळत टाकतो हा लग्न झालेले नसून.. याचे कसले चारित्र्य??
ती महिला पोलीस स्वतःच बिचकल्यामुळे निघून गेली. त्या दिवसापासून चितळ्यांचे लंगोट आतच वाळत घातले जायला लागले.
श्रीनिवास पेंढारकर बसमधे बसून कंपनीत आले. हातात एक बॅग अन खिशात रात्रीच्या औरंगाबादच्या बसचे तिकीट! जरा जास्त पैसे बरोबर घेतले होते आज. कार्ड पंच करून स्टोअरकडे जाताना कोण अभिमान वाटत होता बिचार्याला!
स्टोअरमधे नेहमीचेच लोक होते, पण आज सगळे उत्सुकतेने पेंढारकरांकडे पाहात होते.. पेंढारकर लाजले..
देशमाने - काय?? पेढे की बर्फी??
स्वाती - की दोन्ही??
कोपरकर - कळली वाटते न्युज?
श्री - नाही.. उद्या करतील ऑपरेशन..
स्वाती - तुम्ही आज जाणार ना??
श्री - होय..
देशमाने - म्हणजे.. ते पिक्चरमधे दाखवतात तसं.. बाहेर घिरट्या घालणार का??
चिटणीस - फोन करा बर का आम्हाला??
स्वाती - साहेबांनी रजा दिलीय ना??
कोपरकर - कोण विचारतय रजा देणार ना म्हणून.. ही गोष्टच अशीय..
श्रीनिवास स्तुतीने आणि चौकशी सुखावून लाजत असतानाच देशमानेंनी वाजत असलेला फोन घेतला. ऑपरेटरने सांगीतले.. 'कॉल फॉर मि. पेंढारकर'..
देशमाने - अहो.. औरंगाबादचा फोन आहे.. घ्या..
श्रीनिवासच्या चेहर्यावरील बदलती एक्स्प्रेशन्स बघून सगळेच उड्या मारायच्या विचारात होतेच! काही क्षणातच हसर्या अन समाधानी चेहर्याने फोन ठेवून श्रीनिवासने आनंदाने कोपरकरकडे पाहिले..
स्वाती - काय.... ????
श्रीनिवास पेंढारकरांनी मुलीसारखे लाजत मान खाली घाली सांगीतले..
श्री - मुलगा झाला.. लगेच निघायला हवे.. आजच ऑपरेशन करावे लागले...
नुसता धिंगाणा झाला. आवाज ऐकून सप्रेसाहेबही बाहेर आले.
सप्रे - अरे काय झालं??
स्वाती - सर... मुलगा झाला पेंढारकरांना...
अत्यंत हेकट आणि चिडक्या स्वभावाचे म्हणून परिचीत असलेल्या सप्रेसाहेबांनीही येऊन श्रीच्या पाठीत थाप मारली अन म्हणाले..
सप्रे - काय?? बाप झालात आता तुम्ही... एक बाप.. है की नै?? पार्टी पाहिजे.
स्वाती - आधी पेढे..
देशमाने - अहो पेंढारकर, जुळे झालेले दिसतेय.. पुन्हा फोन आला..
श्रीनिवास - हॅलो????
डॉक्टर - मि. पेंढारकर, सुदैवाने बाळ वाचले.. मात्र.. आई.. आय अॅम व्हेरी सॉरी..
पवार मावशी एदम भारी, पण हि
पवार मावशी एदम भारी,
पण हि शेवटची लाईन कैच्या कै असते बुवा तुमची.
बेफिकीर यावेळी प्रस्तावना
बेफिकीर यावेळी प्रस्तावना नाही? तुमच्या प्रस्तावनेवरुन एकंदरीत कादंबरीचा अंदाज येतो असो. वाचुन प्रतिक्रिया देते.
वाह..... नवीन कादंबरी ....
वाह..... नवीन कादंबरी .... आताच सुरुवात करते...
धन्यवाद बेफिकीरजी....
छान लिहिलय
छान लिहिलय
छान सुरुवात...पण शेवटची लाईन
छान सुरुवात...पण शेवटची लाईन मनाला चटका लावुन गेली.
छानच आहे... अरे हे काय ...
छानच आहे...
अरे हे काय ... ईतकी गोड बातमी आणि शेवट ईतका तिखट...
आणखीन एक नविन विषय हातात घेतलात तुमचे अभिनंदन
जरी प्रस्तावणा दिली नसली तरी शेवटच्या ओळीने थोडाफार अंदाज आलाय ..
व्व्वा.. विचारातच पडले होते
व्व्वा.. विचारातच पडले होते आता माबो वर कोणती कादंबरी वाचायला मिळेल.. मस्त सुरुवात.. पण शेवटच्या ओळीने परत बेचैन केलय ..
अहो महाराज, आपल्यकदे
अहो महाराज,
आपल्यकदे कादम्बर्यान्चा खजिना आहे का हो? बाकि मानले बुवा. फारच छन.
अरे हे काय........... मी हि
अरे हे काय...........
मी हि हाच विचार करत होते कि आता रोज काय वाचायचे.
तितक्यात ही कादबरी आली सुद्धा.
पु.ले.शु.
असेच लिहित रहा.
पण शेवट खरच चटका लावणारा होता. तरीहि प्रस्तावना वाचल्यावर थोडा अन्दाज आला असता.
तुमचा वेग अफाट आहे राव.
पवार मावशीचं पात्र एकदम
पवार मावशीचं पात्र एकदम सुपरहीट होणार बघा
शेवटची ओळ नेहमीसारखीच टेंशन आणि उत्कंठा वाढवणारी...येऊदे पुढचा भाग!!
बेफिकीर यावेळी प्रस्तावना
बेफिकीर यावेळी प्रस्तावना नाही?>> अगदी अगदी...
अरे पण प्रस्तावना केलेय की मी बेफिकीरांच्या मागच्या कादंबरीच्या १३व्या भागात... अर्थात त्याला बेफिकीर यांच्या प्रस्तावनेची तुलना नाहीच... मी अगदीच बाळबोध लिहीलेय...
मस्तच बेफिकीर नेहमीप्रमाणेच.... पवार मावशी म्हणजे काजलच्या आजीचं लेटेस्ट व्हर्जन दिसतंय... छान चाललेय कादंबरी... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
पवार मावशीं बाळाला
पवार मावशीं बाळाला साम्भाळणार कि काय? मग तर तो कवि होइल.
एक नंबर!! झकास सुरुवात...पण
एक नंबर!! झकास सुरुवात...पण शेवट..:(
arey kay challay kaay
arey kay challay kaay befikir... kiti kitit kiti fasssssstttttt lihitos.... hatsssssss offfffffffffffffff
पुलेशु...... डॉ.कैलास
पुलेशु......
डॉ.कैलास
पवार मावशीं बाळाला साम्भाळणार
पवार मावशीं बाळाला साम्भाळणार कि काय? >> मलाही तेच वाटतय.
(No subject)
काय आश्चर्य आहे? पवार
काय आश्चर्य आहे? पवार आजींसारखी एक आजी आमच्या घराजवळ रहायची. मी खूप लहान होते तेव्हा पण ती अशीच आरडाओरडा करत असे. टारगट मुल तिला कोकीळा आजी म्हणायची.
बेफिकिर, खरच भन्नाट लिहिता तुम्ही. पुलेशु......
काजल ची आज्जीच आठवली..चांगली
काजल ची आज्जीच आठवली..चांगली सुरुवात आहे..
काय राव ही शेवटची लाईन जरा
काय राव ही शेवटची लाईन जरा खटु झाली..
बाकी लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम
चांगली सुरवात.....
चांगली सुरवात.....
befikir, mastach, tumhi navin
befikir,
mastach, tumhi navin kadambari suru kelit ani amha sarwa vachak mandali na ek sukhad dhakka dilat, ani ho kharach last line dhakka dilat(befikir style)
pawar mavashi che character aavadale, ani kharach balala la pawar mavashi sambhalnar ka? mag kahi baladchya bapache khare nahi.
ajun yeu det.
शेवटची ओळ नसती, तर
शेवटची ओळ नसती, तर बेफिकीरांची कादंबरी बनुच शकली नसती. सगळं सरळ असतं तर ही गोष्ट सांगायचं कारणच रहाणार नाही! पण तरीही वाचुन वाईट वाटतं, हेही खरंच...
तुम्ही लिहा बेफीकीर राव..
मग तर तो कवि होइल. >>>
मग तर तो कवि होइल. >>>
कादंबरी वाचतांना खरंच काजलची
कादंबरी वाचतांना खरंच काजलची आजीच आठवली....
बिच्चारे चितळे आजोबा प्रचंड कीव आली त्यांची...
इतका हसण्याचा मुड होता... पण तुमच्या शेवटच्या ओळीने सगळा आनंद घालवला...
पण असो...ठळक अक्षरातली तुमची ती शेवटची ओळ म्हणजे तुमची सिग्नेचर लाईनच असते म्हणा...ही कादंबरी 'तुम्ही' लिहित आहात याची आठवण करुन देणारी...
दिपू सारखीच ही कादंबरी एन्जॉयेबल होणार असं दिसतंय....
सगल वाच्ल आता रिप्लाय
सगल वाच्ल आता रिप्लाय कर्त्या. लै बारी.
खतरनाक कथा
खतरनाक कथा