पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पावलांनी चालत जावं जिथे नेईल वाट
मनात उफाळून यावी अल्लड खट्याळ लाट
चतूर, टाचणी, फुलपाखरांच्या मागे-मागे धावावं
पाण्यात 'डुबुक्' दगड टाकून तरंगांना पसरावं
सावलीसोबत पाठशिवणीचा खेळ अवचित रंगावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पाठीवरचं दप्तर जाऊन हलकी सॅक यावी
कॉलेजची मोकळी हवा श्वासांतून वाहावी
कॅन्टिनच्या निवलेल्या चहाचा घोट घेताना
अनोळखी नजरेला चोरून नजर देताना
'पहला नशा' प्रेमाचा हवाहवासा वाटावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पहिल्या नोकरीने नव्याने व्हावी जबाबदारीची जाणीव
कपड्यांच्या कपाटात 'फॉर्मल्स'ची भरून निघावी उणीव
घड्याळ्याच्या काट्याला घट्ट पकडायला शिकणं
खिश्यांमध्ये 'पेरूचा पापा'ला जपणं
पहिल्या पगाराचा आनंद चेहऱ्यावर ओसंडावा
एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
बरेच क्षण कळत नकळत हातातून निसटले
रित्या-भरल्या ओंजळीतून बरेच थेंब ओघळले
निसटलं-ओघळलं, हरकत नाही,
पण हिशोब तरी लागावा
उगाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
पापण्यांत लपलेला स्वप्नांचा थवा आभाळात उडावा..
असाच एक उनाड दिवस एकदा तरी यावा....
....रसप....
१५ डिसेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/12/blog-post_15.html
खूप आवडली सहजसुंदर आहे
खूप आवडली सहजसुंदर आहे अगदी
पेरूचा पापा >> हा शब्द मी ऐकल्या-बोलल्यासारखा वाटतोय पण नेमका अर्थ -संकल्पना-वापरायचा कसा हे आठवत नाहीये रे जितू ......सांगशील का !
पे = पेन रू = रुमाल चा =
पे = पेन
रू = रुमाल
चा = चावी
पा = पाकिट
पा = पास
छान आहे कविता. अशोक सराफचा
छान आहे कविता. अशोक सराफचा "एक उनाड दिवस" सिनेमा आठवला.
आवडली
आवडली