उतरु कुठे मी

Submitted by मुंगेरीलाल on 14 December, 2012 - 11:58

तुम्ही कधी विमानातून छत्री घेऊन उतरला आहात का? म्हणजे मला नेहेमी असं वाटतं की ही छत्रसाल मंडळी नेमकी मोकळ्या पटांगणातच कशी उतरतात? वाऱ्याचा वेग, स्वतःची उंची आणि त्याप्रमाणे नेमके दोर ताणून/सैल सोडून नदी, कडे-कपारी, झाडे वगळून नेमकं हवं तिथे उतरता येणं हे खरोखर कसब आहे. हा जरी अनुभव मला नसला तरी त्याच्या जवळ जाणारा प्रसंग म्हणजे एखाद्या अशा गावात उतरायची वेळ येणे, जिथे तुमचे किमान ३-४ नातेवाईक किंवा जवळचे मित्र रहात आहेत. साधारण हेच कौशल्य अशा ठिकाणी पणाला लावावं लागतं. त्यातही एखादा नातेवाईक असा असतो की त्याच्याकडे जर तुम्ही उतरला नाहीत (भले मग ते कितीही गैरसोयीचं असो) तर तुम्हाला कधीही माफी नसते. ही ठिकाणं बर्म्युडा-त्रिकोणा सारखी असतात जिथे तुमची छत्री अर्धी प्रेमानं आणि अर्धी धाकानं ओढली जाणार हे नक्की.

अशीच माझी एक लांबची मावशी आहे. तिला आपण ब.त्रि.मावशी म्हणू (बर्म्युडा-त्रिकोण वाली. हे टोपणनाव माझ्या सुरक्षिततेसाठी. हो, ती साक्षर असून नेटकरू देखील आहे, आली या पानावर सर्फत-सर्फत तर माझी काही खैर नाही). तर सुरवातीला हिचंच घर पुण्यात होतं, त्यामुळे पुण्यात किंवा मुंबईला कामं असणारी मंडळी तिच्याकडेच ठेपा देऊन असायची. तिला माणसांची आवड आणि त्यांचं करण्याची हौसही दांडगी, त्यात हाताखाली थोडी माणसं असल्यामुळे सरबराई करणं शक्यही व्हायचं. घरी गाडी होती पण ड्रायव्हर नव्हता. त्यामुळे काका अपरात्री येणाऱ्या किंवा जाणाऱ्याला (विशेषतः महिला) स्टेशन/stand वर आणून आणि सोडून वैतागायचे पण तशी त्यांनाही माणसांची आवड होती, शिवाय गप्पा मारण्यातून गावोगावीची खबर मिळायची. मुलांना तर पाहुणे आवडायचेच – कारण येता जाता पाहुणा लाड-कौतुक करी. तर असं हे मावशीचं घर म्हणजे आमच्या नातेवाईकांचं ‘जंक्शन’ चं ठिकाण होतं.

लोक येताना काहीबाही खाऊ/फळं घेऊन यायचे आणि जाताना आवर्जून बाकरवडी आणि आंबा बर्फीची दोन पुडकी न्यायचेच. (तिच्या मते हे दोन्ही पदार्थ फक्त चितळेचेंच आणि तेही शनिपार जवळच्या दुकानातलेच ‘खरे’ असतात, बाकीचे नाही). असं थोडी-थोडकी नाही तर तब्बल तीस-पस्तीस वर्षं चाललं. बत्री-मावशी नातेवाईकांसाठी जणू पुण्याची महापौरच झाली. कुणाचं वैयक्तिक काम असो की काही समारंभ, मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं.

मग काळ बदलला. वयानुसार मावशीला पूर्वीसारखं व्हायचं नाही, हाताखालची माणसं कमी झाली. मग हळूहळू टर्मिनेटर सिनेमा मध्ये ते वितळलेल्या धातूचे गोळे एकत्र येतात तसे इतरही काही नातेवाईकांची घरं पुण्यात झाली. पण तरीही पुण्यातलं ‘घर’ म्हणजे ह्याच मावशीचं असा अलिखित नियम होता. पोरं-सोरं तर लहानपणापासून इतकी सरावली होती, की एकदा एका ५ वर्षाच्या पिंट्यानं अल्बममध्ये नवीन रंग दिलेला मावशीचा बंगला पाहून ‘पुण्याला रंग दिलाय?’ असा प्रश्न विचारला होता. तर शिवाजीनगर किंवा स्वारगेटला उतरल्यावर ‘बंगल्या’ वर हजेरी देणं हे पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम हद्दीत प्रवेश केलेल्या प्रत्येक नातेवाईकाचं आद्य कर्तव्य असे. नव्हे ते तसंच होणार हे मावशीनं इतकं गृहीत धरलेलं होतं की कधी-कधी पाहुण्याची पंचाईत व्हायला लागली.

कारण कसं कोण जाणे आता आग्रही प्रेमाचं रुपांतर धाकात व्हायला लागलं. पुण्यात अवतरलेला कुणी नव्यानं स्थायिक झालेल्या नातेवाईकांकडे परस्पर उतरला की हिला भयानक संताप यायला लागला. नव्या पिढीची पोरं काही कामानिमित्त यायची तेंव्हा त्यांच्या वयात फार अंतर नसलेल्या धाकट्या काका/मामा/मावशी कडे, मोठ्या भावाकडे किंवा मित्राकडे उतरायला लागली. त्यांना मागच्या पिढीसारखी तशी फारशी भीती नसायची, पण घरून निघताना नेमकं काहीतरी मावशीकडे द्यायला बरोबर दिलेलं असायचं ते सुपूर्द करायला तिच्याकडे गेलं की तिची उलटतपासणी सुरु व्हायची. पुण्यात कधी आलास, कुठे उतरलास वगैरे प्रश्नांना ते पोरगं कधी गाफील तर कधी बेफिकीर उत्तरं द्यायचं. मग त्याच्यावर जवळून गोळीबार झालाच म्हणून समजा. मग ते वैतागून, बावचळून कसंबसं तिथून जे काढता पाय घ्यायचं की पुन्हा तिथे पाय ठेवायला जाम टाळायचं. मग उरलेलं नाराजीचं मॅग्झीन त्याच्या आई-बापावर फोनवरून रिकामं व्हायचं.

बरं, मावशीला पत्ता लागू न देता परस्पर कटावं तर ज्या satellite नातेवाईकाकडे आपण उतरलो असतो तो आपल्या माघारी दुसऱ्या satellite नातेवाईकाला ‘सहज’ म्हणून सांगणार आणि तो दुसरा मावशीला इमाने-इतबारे हमखास काडी करणार, कारण नाही म्हटलं तर त्याला अमका-अमका आता माझ्याकडे उतरला हे ‘आता साडीसाठी लक्ष्मीरोडला जायची गरज नाही’ छाप जाहिरात करून सांगितलेलं अजिबात पोटात रहात नाही. आणि असं परस्पर गेल्याचं मावशीला समजलं तर सक्तमजुरीच्या जागी ३०२ कलमच लागलं म्हणून समजायचं. मग निदान सहा महिने नातेवाईक वर्तुळात ‘एक काळ असा होता की पुण्यात माझ्याशिवाय पान हलायचं नाही आणि आता मेले साधं तोंडही दाखवत नाहीत, इतकी का मी ह्यांना नकोशी झाले...’ असा जहाल धुरळा उडालाच म्हणून समजा.

मग अति झाल्यावर मागच्या पिढीतल्या इतर पोक्त मावश्या वगैरे गप-गुमान पूर्वीसारख्याच तिच्याकडेच उतरायला लागल्या. म्हणजे मध्यम मार्ग असा की सामान तर तिच्याकडे टाकायचं आणि मग इतरांकडे भटकंती करायची. आणि तिथे जाऊन मग ‘आम्ही तुमच्याकडेच उतरणार होतो पण ती ओरडते ना, काय करणार’ असं सगळीकडे सांगत फिरायचं. पण मावशीला ह्या ट्रिक्स हळूहळू कळायला लागल्या. ती मग पाहुण्याला एकट्याला हिंडूच द्यायची नाही. याच्याकडे जाऊ म्हंटलं की ‘आपण जाऊया की मिळून, थांब संध्याकाळ पर्यंत माझी कामं होईतो’ अशी पाचर मारून ठेवणार आणि वर ‘माझंही गावात असून जाणं होत नाही... या निमित्तानं माझी पण भेट होईल’ असं मलम पण वरून चोळणार. मग पाहुणा निरुत्तर होऊन जागच्या जागी बसतो आणि ती संध्याकाळ आज उगवणार की उद्या या चिंतेत मग्न होऊन जातो. इतर ठिकाणी द्यायला आणलेली मिठाई खराब व्हायला लागते. मग बिचारा पोरा-सोराला पकडून ती ‘आग्र्याहून सुटका’ थाटात जिथे जायचं तिथे आधीच पाठवायला सुरुवात करतो.

वेळ जावा म्हणून बत्री-मावशीने मशीन आणून स्वेटर बनवून विकायला सुरवात केली होती. त्यानिमित्त तिला बाहेरही जावं लागे. कधी-कधी मग दुसरा नातेवाईक बत्री-मावशीला काम असेल, ती घरी नसेल तेंव्हा पाहुण्याची सुटका करायला येतो. पण हे महा धोकादायक प्रकरण असतं. यासाठी काकांना आणि मावशीच्या पोरांना विश्वासात घ्यावं लागतं. ते मात्र गुप्त काम वेळेत पार पडलं की आपला शब्द तंतोतंत पाळतात. मात्र परतल्यावर साडी-बिडी / शर्ट वगैरे फटाफट बदलून जणू काही झालंच नाही असा आणि दिवसभर बसून कंटाळलेलो आहोत असा भाव बेमालूमपणे चेहेऱ्यावर धारण करता यायला हवा. शिवाय जिथे गेलो तिथली कुठलीही भेट दिलेली वस्तू, मिठाई वगैरे परिस्थितीजन्य पुरावे सापडता कामा नयेत याची काळजी घ्यावी लागते.

पण एखाद्या वेळी मावशीला जाणीव व्हायची की आपले नियम जरा जास्तच कडक होतायत. मग विशेषतः पाहुण्याची २ दिवस चांगली वागणूक वगैरे पाहून ती त्याला/तिला एखादा दिवस ‘जामिना’वर सोडणार. पाहुण्याला हायसं वाटतं. मग डेस्टिनेशन च्या घरी फोनाफोनी. लंचला काय करायचं वगैरे ठरावा-ठरावी होई. हा असा त्याचा उत्सव होत असलेला पाहून मावशीचं पित्त खवळलं नाही तरच नवल. पण एकदा दिलेला जामीन ती सहसा रद्द करत नसे. पण दुसऱ्या दिवशी पाहुणा उठला की त्याच्यासाठी हेवी ब्रेकफास्ट तयार असे, ज्याचा पुरेपूर आस्वाद घेतल्याशिवाय त्याला गेटपास मिळत नसे. मग असा हा मुद्दाम तुडुंब ठासलेला पाहुणा दुसरीकडे गेला की किमान ३ वाजेपर्यंत तो घोट-घोट पाण्याशिवाय काहीही पिऊ शकायचा नाही, खाण्याची तर बातच सोडा. असा गिळण-प्रुफ करून घराबाहेर सोडला असल्यामुळे मिळालेल्या औट-घटकेच्या स्वातंत्र्याचा त्याला मनसोक्त उपभोग घेता येत नसे. अशा परिस्थितीत दुसऱ्या घरी केलेला स्वयंपाक एकतर वाया जाणार, नाही तर तो टिफिनमध्ये भरून इकडे येणार हे निश्चित. असा स्वयंपाक मग त्या पाहुण्याला संध्याकाळी मावशीच्याच घरी बसून संपवावा लागे.

मी अनेकदा अशा पाहुण्यांना टिफिन सकट मावशीच्या घरी पोहोचतं केलेलं आहे. पण फाटकापर्यंतच. बिचाऱ्यांची फार इच्छा असते की मी आत यावं आणि सगळ्या उलट-तपासण्या होईपर्यंत सोबत करावी. पण मी सध्या लोकल satellite नातेवाईक असतो आणि बरेच दिवस मावशीकडे फिरकलेला नसतो त्यामुळे मला माझा जीव धोक्यात घालण्याची अजिबात इच्छा नसते. भूतदयेवर जीवनेच्छा मात करते ती अशी. जड अंत:करणाने पाहुणा वाघा-बॉर्डर वरूनच हात हलवतो आणि मीही आता महिनाभर तरी तो टिफिन विसर नाहीतर स्वतः घेऊन ये हे बायकोला कसं सांगायचं या विचारात गाडीला किक मारतो. पण कितीही काळजी घेतली तरी परदेशात नियम तोडलेल्या वाहनांचे उंच खांबावरून छायाचित्र काढतात तसं मावशीनं मला गॅलरीतून बाहेरच्या बाहेर परत जाताना टिपलेलं असतं हे मी हमखास विसरून जातो.

त्यात मला असे बाहेरून पुण्यात आलेले पाहुणे दिसले की त्यांची गम्मत करायची अनावर लहर येते. भेटताक्षणी नुसतं ‘बरं ते जाऊ दे, मावशीला भेटलास का रे?’ इतकं विचारताच तो जाम दचकतो आणि त्याचा चेहेरा कावरा-बावरा होतो. मग मला त्याची दया येऊन मी त्या परिस्थितीवर एखादी कोटी करून त्याला हसवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर बायको असली की (किंवा मी तिला नंतर ही गम्मत तिखट-मीठ लावून सांगितली की) ती हमखास भडकते. तुला मी दहा वेळा सांगितलंय बरंका की तू असले उद्योग करत जाऊ नकोस. चेष्टा कर्णोपपर्णी होत मावशीपर्यंत जर पोहोचली ना, तर तुझी काही खैर नाही. आणि एकदा झालही तसंच. पाहुण्याच्या तोंडून त्याच्या स्वतःच्या घरी आणि तिथून मग तिखट-मीठ लावत ते मावशीपर्यंत पोहोचलंच. त्यानंतर एकदा एका समारंभात एकदा मावशीनं मला डायरेक्ट गाठून कानाला पिस्तुल लावलं आणि गरजली ‘काय म्हणतोस रे माझ्या मागे मला? समोर तर अगदी भोळ्या-भाबड्याचा आव आणतोस’ आणि माझा गडबडून गार पडलेला चेहेरा पाहून स्वतःच हसायला लागली. बहुतेक याखेपेला मावशीनं मला माफ केलेलं होतं होतं. आता थोडक्यात शा हीस्तेखान होऊन बोटावर निभावल्यावर मी खरंतर शहाणं व्हायला हवं. पण काय होतं कोण जाणे, काही दिवसांनी मामेभावाचा ‘येतोय मी शनिवारी पुण्यात, आहेस न तू?’ असा फोन आल्यावर आकाशात मला नव्या पाहुण्याची छत्री तरंगताना दिसते आणि पुढे सगळं कसं घडणार याची फिल्मच माझ्या मनात रीवाइंड होते. आता फक्त प्ले च्या बटणावर मावशीचा हात कधी पडला की पुढचं सगळे प्रसंग आणि डॉयलॉग ठरल्याप्रमाणेच होणार हे निश्चित असतं.

- धनंजय दिवाण

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललित मस्तच !

पण दुसऱ्या दिवशी पाहुणा उठला की त्याच्यासाठी हेवी ब्रेकफास्ट तयार असे, ज्याचा पुरेपूर आस्वाद घेतल्याशिवाय त्याला गेटपास मिळत नसे. मग असा हा मुद्दाम तुडुंब ठासलेला पाहुणा दुसरीकडे गेला की किमान ३ वाजेपर्यंत तो घोट-घोट पाण्याशिवाय काहीही पिऊ शकायचा नाही, खाण्याची तर बातच सोडा. असा गिळण-प्रुफ करून घराबाहेर सोडला असल्यामुळे >>>> हे खासच. Lol

Lol

तिच्या मते हे दोन्ही पदार्थ फक्त चितळेचेंच आणि तेही शनिपार जवळच्या दुकानातलेच ‘खरे’ असतात, बाकीचे नाही >> हे मात्र खर आहे Proud

हाहा मस्त लिहिलंय.. आमची पुण्यातली एक मावशी याच्या अगदी उलट आहे Wink सतत, सदैव "तुम्ही येत नाही , मावशीला विसरला" म्हणून तक्रार करत असते पण "आम्ही अमुक दिवशी येऊ का?" असा फोन केल्यास हजार कारणं सांगते. कधी तिचा गुडघा दुखत असतो, कधी बाई नसते, कधी आधीच कुणीतरी येणार असतं तर कधी तिच बाहेर जाणार असते. Proud काय करावे कळत नाही. म्हणून सगळे नुसते जोक करुन समाधान करुन घेतात.
कधीकधी अचानक ती आम्हा भाचेमंडळींच्या फेसबुक वॉलवर येऊन बोल्ड लेटर्समध्ये "CHI.SAU. ..., PH KA KARAT NAHIS?" असं दरडाऊन जाते.
खरंतर ती अनेक विनोदी लेखांना मटेरिअल पुरवण्याइतकी बहुरंगी अन बहुढंगी आहे. पण ती सुद्धा नेटकरु असल्यामुळे जास्त लिहित नाही. नाहीतर पकडायची मला.
मावशी, तू हे वाचत असल्यास "मी ती तुझी भाची नाहीच बरं, मी दुसरीच नताशा आहे" Proud

धन्यवाद मंडळी.

@नताशा
मलाही हा लेख वाचून झाल्यावर पत्नीने बजावले की दहा वेळा विचार कर आणि मगच हे प्रकाशित कर. तब्बल ३ दिवस लेख कणिक झाकावी तसा लिहून झाकून ठेवला, काही संदर्भ बदलण्याचा निष्फळ विचार केला (उदा. पुण्याऐवजी सोलापूर वगैरे), पण शेवटी शीर तळहातावर (की कीबोर्डवर) घेऊन माबोवर टाकलाच. सध्या भूमिगत आहे. Happy

का.क.न. हो, का.क.न. Wink
अजिब्बात काळजी करू नका. बत्री मावशींच्या प्रेमळपणाचेच तुम्ही वर्णन केले आहात. ते ही कुजकटपणे नाही तर खुसखुशीत.

मुंगेरीलाल,

द्विवार अभिनंदन! पहिलं लेखाबद्दल. मस्तच झालाय लेख. खास मुंगेरी शैली जाणवते! Happy

आता दुसरं अभिनंदन अशासाठी की तुमच्या जिवात जीव आला म्हणून! उपचार करणारा डॉक्टर पाहता जीव जाण्याची शक्यता अधिक होती! Wink

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : डॉक्टर इब्लिस, आपण हलके घ्या बरं का! माझ्या जिवावर उठू नका!! Proud

मस्त Happy

ईतक्या (!) हौशीने पाहुण्यांची सरबराई करणारेही कुठे भेटतात आजकाल. त्याचे श्रेय तर बत्रि मावशींना द्यावेच लागेल, नाही का? मुंगेरीलाल यांनी यावेळीही जोरदार षट्कार मारला आहे!

रच्याकने, 'मावशी' शब्दावरुन आठवले की फार पूर्वी मुले अनोळखी बायकांशी बोलताना त्यांना काय संबोधन वापरतात याचे निरिक्षण करुन मला गंमत वाटायची. आम्ही बाय डिफॉल्ट सगळ्या बायकांना 'काकू' म्हणत असू, तर माझा नाशिककर मित्र 'मावशी' म्हणत असे. काहीजण 'मामी' तर काही जण 'ताई' म्हणत. बाकी, कामवाल्या बाईंना मात्र 'मावशी' हे संबोधन सर्वमान्य असावे असे वाटते. असो.

मस्त आहे. आमची अशी एक मावशी (खरंतर मावस आज्जी पण आम्ही नातवंड पतवंडपण तिला मावशीच म्हणायचे) धारवाडमधे होती. धारवाडमधे कुणाकडे लग्न असो मुंज असो अथवा श्राद्ध असो. उतरायला हिच्याच घरी जायचं.. बरं प्रेमळपणाचा धाक किती असावा? मावशी बॉय्ज स्कूलची हेडमास्तरीण आणि तिचे मिस्टर धारवाड जेलचे जेलर!!!! आहे कुणाची काय बिशाद??

Pages

Back to top