शरद पवारांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने
मला भावलेले शरद पवार : प्रभाकर [बापू] करंदीकर
आमचे आणि पवार कुटुंबांचे संबंध नेहमीच निकटचे राहिले आहेत. माझे वडिल - कै. द.स. करंदीकर वकील - स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रिमांड होम, होमगार्ड, माळेगाव सहकारी साखर कारखाना, नाट्यसाधना, लायन्स क्लब, ऑस्ट्रेलियन मिशन, यांसारख्या अनेक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. माझी आई - कै. पद्माताई करंदीकर- या सर्व कामात सहभागी होत असे. माझ्या वडिलांनी स्वतः कधी कोणती निवडणूक लढवली नाही परंतु सुमारे तीन दशके ते तालुका काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष होते. महिला प्रचार आघाडीचे काम माझी आई सांभाळत असे. त्यामुळे निवडणुका आल्या की आमचे घर-दार प्रचाराच्या कामात दंग असे. त्या निमित्ताने, साहेबांचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे होत असे.
माझ्या आठवणी प्रमाणे, मी साहेबांना प्रथम जवळून पाहिले तो काळ १९६०च्या सुमाराचा असावा.निवडणुकीच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांच्या प्रभातफेर्या निघत. त्याचे मार्गदर्शन युवक काँग्रेसचे नेते या नात्याने साहेबांचे असे. पुढे १९६७ मध्ये साहेबांना अगदी तरुण वयात काँग्रेस पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. त्यावेळी तालुक्यातल्या काही ज्येष्ठ इच्छुकांची थोडी नाराजी झाली होती. कै. यशवंतराव चव्हाणांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले होते, " बंडोपंत, हा युवक फार हुशार आहे आणि कर्तबगार आहे. तो निवडून आला पाहिजे. तालुक्यातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची समजूत काढणे आणि सगळ्यांचा सहभाग मिळवणे ही तुमची जबाबदारी राहील!." सुदैवाने साहेब चांगल्या मतांनी निवडून आले.
निवडणुकांची धामधूम संपली तरी सामजिक आणि शैक्षणिक कार्यामुळेही पवार कुटूंबियांशी आमचा नेहमी संपर्क रहात असे. पुढे साहेबांच्या राजकीय कर्तृत्वाची कमान सतत चढती राहिली. ते आमदार झाले, मंत्री झाले आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले परंतु त्यामुळे कौटुंबिक संबंधात कोणताच फरक पडला नाही. दरवर्षी दिवाळीत घरी येऊन शुभेच्छा देण्याचा साहेबांचा शिरस्ता होता. माझ्या आईच्या निधनापर्यंत, म्हणजे २००३ पर्यंत त्यात कधी खंड पडला नाही.
मी बी.ए.ची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो, तेंव्हा साहेबांनी मला एम.बी.ए.चा कोर्स घेण्याचा सल्ला दिला होता आणि सांगीतले की. 'मुंबईच्या जमनालाल बजाज संस्थेत तुला अॅडमिशन मिळवून देतो.' पण त्यावेळी एम.बी.ए. विषयी फारशी कुणाला माहिती नव्हती आणि मला तर आय.ए.एस.कडे जायचे होते. त्यामुळे मी त्या कोर्सला अॅडमिशन घेतली नाही. पुढे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेला बसलो. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी साहेब दिल्लीत होते. तिथे वर्तमनपत्रात त्यांनी रिझल्ट पाहिला.प्रशासकीय सेवा [आय.ए.एस.] आणि प्ररराष्ट्र सेवा [आय.एफ.एस.] या सेवांच्या संयुक्त यादीत माझे नाव पहाताक्षणी साहेबांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले की, "बापूचे हार्दीक अभिनंदन. तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला म्हणावे, आय.ए.एस. चीच निवड कर.फॉरिन सर्व्हीसच्या मोहात पडू नकोस." साहेबांचा सल्ला मला मनोमन पटला.
यथावकाश आय.ए.एस. मध्ये 'काडर' ची निश्चिती झाली आणि सुदैवाने मला महाराष्ट्र काडर मिळाले. त्यामुळे नंतर मी प्रशासकीय सेवेत असताना अनेक प्रसंगी साहेबांशी माझे सतत संबंध येत राहिले आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे मला जवळून निरीक्षण करता आले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांची मते ते जाणून घेतात आणि शेवटी आपला निर्णय शांतपणे आणि ठामपणे घेतात. त्यानंतर मग त्या धोरणाची किंवा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही हयगय झालेली ते खपवून घेत नाहीत. वेळप्रसंगी कटु किंवा अप्रिय निर्णय घेतानाही ते कधी कचरत नाहीत. त्यामुळे एक खंबीर आणि विचारी नेता तसेच कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती देशभरात झाली आहे. त्यांच्या हाताखाली काम करताना अधिकार्यांना कसलेच 'टेन्शन' येत नाही, उलट त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. आमचे निकटचे कौटुंबिक संबंध असले तरी त्याचा संबंध सरकारी कामकाजात त्यांनी कधीच येऊ दिला नाही. इतर अधिकार्यांप्रमाणेच त्यांनी मला सन्मानाने आणि ऋजुतेने वागविले.
महिला धोरण, उद्योग-धोरण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, रोजगार हमी योजनेद्वारा फळ-बागायत, उर्जा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करणे, यांसारख्या विषयात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी स्वरूपाचे ठरले. यात त्यांचे 'द्रष्टेपण' दिसून येते. १९९१ चे नवे उदारमतवादी आर्थिक धोरण केंद्राने स्वीकारण्यापूर्वी सुमारे दीड-दोन वर्षे साहेबांनी औद्योगिक संघटनांच्या वार्षिक सभातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने बोलताना ज्या ठामपणे उदारीकरणाची आवश्यकता मांडली, ती ऐकून खुद्द उद्योगपतीही चकीत झाले होते. साहेबांच्या 'त्या' भाषणाची प्रत वाचल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी, 'तुम्ही नेहमी काळाच्या पुढे दोन पावले असता आणि आपली मते रोख-ठोकपणे मांडता' अशा शब्दात साहेबांचे अभिनंदन केले होते.
राजकीय पक्ष कोणतेही असले आणि त्या क्षेत्रात कितीही मतभेद असले तरी साहेब वैयक्तिक संबंध कसोशीने जपतात हे त्यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य मी जवळून अनुभवले आहे. त्याचप्रमाणे कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिंशी त्यांची अगदी जवळचे संबंध राहिले आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्व विषयांचा ते बारकाईने अभ्यास करतात आणि रसिकतेने, जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेण्याची उच्च अभिरुची त्यांनी जोपासली आहे. राजकारण आणि प्रशासन, प्रवास, यात इतके व्यग्र राहूनही साहेबांचे वाचन थक्क व्हावे इतके विस्तृत आणि सखोल असते. त्यांच्या वाचनासाठी त्यांना कोणताच विषय वर्ज्य नसला तरी त्यांची आवड-निवड अगदी चोखंदळ असते.
राजकारणात, संभाषणात, वक्तव्यात 'डिसेन्सी'ची एक विशिष्ट पातळी कधीही न सोडण्याचा त्यांचा गुण इतर राजकीय नेत्यांनी घेतला तर मला वाटते की आपल्या राजकीय क्षेत्रात एक सुसंस्कृतपणा नक्कीच येईल. आज त्याची नितांत गरज आहे.
अगदी पूर्णपणे सहमत. शरद
अगदी पूर्णपणे सहमत. शरद पवारांसारख्या एका द्रष्ट्या नेत्याला जिथे तिथे फालतू कारणांसाठी(पाठीत खंजीर वगैरे) विरोध करून महाराष्ट्र आपल्याच पायांवर धोंडा पाडून घेत आहे असे माझे स्पष्ट मत आहे. त्यांच्यासारखा चतुरस्र बुद्धीचा,अनेक विषयात गती आणि प्रत्यक्ष कार्य असलेला अफाट वैयक्तिक कुवतीचा आणि कार्यशक्तीचा नेता आज दुसरा नाही. क्रीडाक्षेत्रात वावरताना शंकरराव साळवींबरोबर त्यांनी कबड्डी,खो खो, कुस्ती या देशी क्रीडाप्रकारांना मिळवून दिलेले महत्त्व, नंतर खूप पुढे जाऊन क्रिकेटमध्ये केलेली दालमियांची उचलबांगडी आणि नवनव्या संकल्पना राबवून गल्लीतल्या मुलांनाही मिळवून दिलेले अर्थ आणि प्रकाशवलय हे सर्व अद्भुत आहे. महाराष्ट्रात फलोद्यान योजना राबवून तोपर्यंत अप्राप्य असलेली डाळिबादि फळे त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात बाजारात आली. महाराष्ट्रातली अहमदाबादी बोरे सर्वत्र दिसू लागली ती त्यांच्यामुळेच. इतकेच नव्हे तर शेतात शेवगा लावू नये ह्या अंधश्रद्धेला न जुमानता त्यांनी शेवग्याची लागवड केली होती. वाइन निर्मितीला प्रोत्साहन देऊन शेतकर्याच्या हातात चार अधिकचे पैसे येतील असे बघणे,साखर मुबलक असताना निर्यातबंदीसाठीचे व्यापारी लॉबीचे प्रयत्न बलदंड कॉमर्स मिनिस्ट्रीशी एक हाती टक्कर घेत हाणून पाडणे, कांद्याच्या भावात स्थिरता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकर्यालाही रास्त भाव मिळावा यासाठी अनेक अंगांनी प्रयत्न करणे... खरोखर या सर्वाचा ऐतिहासिक वेध घेतला गेला पाहिजे. तो पुढील काळासाठी मार्गदर्शक ठरू शकेल. काळाच्या कितीतरी आधी त्यांनी संगणक आणि तद्jaन्य उद्योग तथा जैव उद्योगाचे महत्त्व ओळखून त्याकडे ग्रामीण भागातील लोकांना प्रवृत्त केले. डॅवोस येथील आंतरराष्ट्रीय व्यापार बैठकी मधल्या त्यांच्या भाषणाची खूप प्रशंसा झाली होती.
लवासा हा प्रकल्प मूळच्या आराखड्यानुसार आणि ठरलेल्या वेळात पूर्ण झाला असता तर भारतातला तो एक आदर्श प्रकल्प ठरला असता. पण आम्ही नतद्रष्ट लोक त्यात खोडा घालण्यात धन्यता मानीत आहोत. आम्हांला कर्जत,बदलापूर शहापूर सारखा निसर्गरम्य परिसर अनधिकृत झोपडपट्ट्यांनी आणि अवैध औद्योगीकरणाने बुजबुजलेला चालतो, किंबहुना आवडतो पण व्यवस्थित सर्वांगीण नियोजन करून उभारलेले एक सुंदर टुमदार स्वसंचालित(सेल्फ्-सस्टेनिंग) शहर चालत नाही. हे आमचे दुर्दैव नव्हे तर काय?
असो. या विषयावर लिहावे तितके थोडे आहे. आम्हांला भ्रष्टाचार हा एकच मुद्दा, तोही कथित, ऐकायला वाचायला रवंथ करायला आवडतो त्याला कोण काय करणार?
१२/१२ अजून दूर आहे. असो. लेख
१२/१२ अजून दूर आहे. असो. लेख आवडला.
बापू ये बात कुछ हजम नही हुयी
बापू ये बात कुछ हजम नही हुयी . शरदरावांचे राजकारण म्हनजे अनन्त काणेकरांच्या शब्दात सांगायचे तर 'मोठे शून्य 'च आहे. उतावीळपणा ,विश्वासघात, विधिनिषेध शून्यता, छुपा जातीयवाद यांचे दुसरे नाव शरद्पवार आहे.त्यामुळे ते एकदाही मुख्यमन्त्रीपदाची टर्म पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यांच्या बद्दल राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्याना देखील विश्वास वाटत नाही. साहेबांच्या मनात काय आहे कुणास ठाऊक हे त्यांच्या कारयकर्त्यांच्या तोंडी नेहमी असलेले वाक्य विश्व्वासाचे निदर्शक आहे काय? साहेब जे बोलतात त्याच्या नेमके उलटे करतात अशी त्यांची प्रसिद्धी नाही काय.?
तुमचा वैयक्तिक जिव्हाळा समजू शकतो पण जातीनिहाय वर्गीकरण आणि समीकरणे राजकारणात त्यांनीच आणले आणि एलेक्टिव्ह मेरिटच्या नावाखाली गुंडांना प्रतिष्ठा त्यांनीच मिळवून दिली. यशवन्तरावानी बसवलेली राजकीय संस्कृती मातीमोल केली . अंतुल्यांचा उल्लेख जनाब अंतुले आणि बाळासाहेबांचा उल्लेख श्रीमन्त असा करणे हा योगायोग नाही ती धूर्त विषारी चाल आहे.
कोल्ह्यासारखी गोड लबाड भाषा ही जर डिसेन्सी असेल तर राजू शेट्टींच्या 'जातीचा' उद्धार करणारी ही डिसेन्सी त्यानाच लखलाभ असो....
बाबासाहेब पुरंदरयांच
बाबासाहेब पुरंदरयांच शिवचरित्र हे पुस्तक वाचताना नेहमी वाटायच कि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आयुष्य वेचणारया शिवाजी महाराजांना विरोध करणारे काही मराठा सरदार, बाजी घोरपडे वैगेरे पाताळयंत्री माणसे महाराष्ट्राच्या नशिबाद कशी होवुन गेली असतील्...पण शरद पवारांच स्वार्थी लबाड राजकारण बघुन विश्वास बसतो की हा अशी माणस दुर्दैवाने महाराष्ट्राच्या नशिबात पाचवीलाच पुजलेली असतात
प्रतिक्रिया नोंदवणार्या
प्रतिक्रिया नोंदवणार्या सर्वांना धन्यवाद.
शरद पवारांच्या राजकारणाविषयी मी कोणतेच भाष्य किंवा विश्लेषण केले नव्हते. तो माझा उद्देश्य नव्हता. तथापि प्रतिक्रियांमधून तो विषय उपस्थित झाला आहे [ते अनपेक्षितही नव्हते, म्हणा] तर त्याबद्दल थोडे.
We love to hate Sharad Pawar असे मानणार्या व्यक्तिंची - विशेषतः पत्रकार - संख्या खूप मोठी आहे. पाठीत खंजीर खुपसणे किंवा हवा येईल तशी पाठ फिरवणे वगैरे वाक्प्रचार मला वाटते त्यातूनच आले असावेत परंतु ज्याला संधीसाधू म्हणता येईल अशा राजकारणाबद्दल फक्त पवारांनाच का दोष दिला जातो ते मला समजत नाही. 'आयाराम- गयाराम' संस्कृती देशाच्या सर्वच राज्यात केंव्हापासूनच विराजमान आणि सुप्रतिष्ठीत झाली आहे, त्याचा दोष कोण्या एका व्यक्तिला देणे अयोग्य ठरेल. Pawar is a product of his times.
वसंतदादा पाटलांच्या 'पाठीत खंजीर खुपसून' शरद पवारांनी जे पु.लो.द. सरकार स्थापन केले असे म्हटले जाते, त्यात शंकरराव चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे मंत्री होते. [खुद्द वसंत दादाही 'सिंडिकेट काँग्रेस'चे होते,] शंकरराव आणि विखे-पाटलांनी वेगळा पक्ष काढला होता. केंद्रातल्या 'जनता पक्षा'च्या सरकारात यशवंतराव चव्हाण सामील झाले होते. पुढे ते सरकार कोसळले आणि १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी राजकीय 'कम बॅक' केला तेंव्हा पु.लो.द. मधून शंकरराव चव्हाण आणि सुशीलकुमारांनी अलगद काढता पाय घेऊन 'स्वगृही' प्रवेश केला. वसंत दादा आणि यशवंतरावही यथावकाश 'स्वगृही' परतले. शंकरराव चव्हाण, विखे-पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांची गणना इंदिरा काँग्रेसच्या 'निष्ठावंत' गटात कशी आणि का केली जाते ?
१९९४च्या निवडणुकीत विलासराव देशमुख पडले. त्यांनतर त्यांनी 'बंड' करून विधानपरिषदेत अपक्ष उमेदवार म्हणून प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी पुन्हा एकदा ते इंदिरा काँग्रेसकडे आले. त्यांनाही 'निष्ठावंत' म्हटले जाते, हे कसे काय?
जाती-पातीच्या राजकारणाबद्दल बोलायचे तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते सुरू आहे आणि दिवसेंदिवस फोफावतेच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत २८८ पैकी २०० आमदार 'पाटील' आडनावाचे होते असे मी वाचले आहे. त्यावेळी शरद पवार शालेय विद्यार्थी असावेत! महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे प्राबल्य हे काही शरद पवारांच्या इच्छेने आणि प्रयत्नाने आलेले नाही. ती एक ground reality होती आणि आजही आहे. त्यासाठी एकट्या पवारांना का दोष द्यायचा? पवारांचा वैयक्तिक मित्र-परिवार पाहिला तर त्यात झाडून सगळ्या जाती-पातींचीआणि धर्मांची माणसे दिसतील. [यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीतही तेच होते]. पवार जर कट्टर जातीयवादी असतील तर इतक्या non-Martha माणसांशी त्यांचे मैत्र कसे जुळले? मुद्दा एव्हढाच आहे की निवडणुकांच्या संदर्भात elective merit चा विचार अपरिहार्य असतो आणि त्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात त्या इतरांप्रमाणेच पवारही करतात. शेवटी प्रत्येकाला आपापली vote bank सांभाळायची असते ना?
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
पवारांचा विचार
पवारांचा विचार राजकारण्याच्याच परिप्रेक्ष्यात केला पाहिजे कारण तीच महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. (बापू आपली त्यांची ओळख स्नेही म्हणून असल्याने मूल्यमापनाची आपली फूटपट्टी वेगळी असणे साहजिक आहे...) म्हणजे असे स्व. बाळासाहेब ठाकरेंचेच घ्या. ते राजकारणी असले तरी त्यांची ओळख तिथेच थांबत नाही.ते एक आंतरराष्टीय व्यंगचित्रकार होते, एक पत्रकारही होते. मराठी प्रेमी होते. अतिशय प्रसन्न माणूस होते. त्यानन्तर त्यांची राजकीय ओळख यावी. तशाच पद्धतीने त्यांचे मूल्यमापन चालू आहे. किम्बहुना त्यांच्या राजकारणावर तुलनेने कमी चर्चा चालू आहे माध्यमात. कुमार सप्तर्षी म्हणाले तसे बाळासाहेब एक मोठा 'गोड' माणूस होते... हे फक्त उदाहरणादाखल. ठाकरे पवार अशी तुलना नाही.
राजकारणात इतके वर्षे काढलेल्या पवारांच्या हातून प्रशासक म्हणून काही कामे होणे अपेक्षितच होते. मोठी सत्ता धारण करणार्यांच्या चुका देखील समाजाचे मोठेच नुकसान करतात. शेवटी पवार या व्यक्तीचे मूल्यमापन केले तर काय हाती येते? (व्यक्तिगत रागालोभाच्या गोष्टी सोडा). आणि राजकारण वजा केले तर पवारांचा रिलेव्हन्स काय?
पण राजकारणाच्या माध्यमातून पवारांनी जे पेरले ते भयानक आहे. त्याची किंमत महाराष्ट्र मोजतोय, मोजीत राहील....
आणि बाकीच्या तसे पुढार्यांनी केले म्हणून पवारांचे राजकारण समर्थनीय ठरते हा युक्तिवाद काही पटत नाही. राजकारण यशवन्तरावांचेही परिपूर्ण नव्हते आत्मविश्वासाचा अभाव हे त्याचे वैशिष्ट्य असावे. पण यशवन्तरावांनी चुकीच्या लोकांना पंखाखाली घेऊन दुर्गुणांना प्रतिष्ठा मिळू दिली नाही. अपवाद एकच.... तो सांगायलाच हवा का?
पादुकानंदजी, ' राजकारणात अनेक
पादुकानंदजी,
' राजकारणात अनेक वर्षे काढली की काही कामे होतातच' हे काही पटले नाही बुवा! तुलनाच करायची तर शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आदिंचे उदाहरण घेता येईल. अनेक दशके या मंडळींनी मंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद उपभोगले परंतु राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी आणि शाश्वत स्वरूपाचे परीणाम घडविणारी कोणती धोरणे या राजकारण्यांनी आखली आणि राबवली? शरद पवारांच्याबाबतीत मी काही बाबींचा उल्लेख केलाच आहे, म्हणून द्विरुक्ति करत नाही.
आपल्या प्रतिक्रियेत हीरा यांनीही याला दुजोरा देत, आय. टी. आणि बी. टी. क्षेत्रांचा उल्लेख केला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने वेध घेऊन, आपल्या राज्यात या तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग उभे रहावेत आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करणार्या शैक्षणिक संस्था निघाव्यात याचा सातत्याने पाठपुरावा करणारा दुसरा राजकारणी माझ्या तरी पहाण्यात आलेला नाही. बारामतीत त्यांनी उभारलेल्या आयटी. आणि बीटी संस्थांची गुणवत्ता उत्तम असावी म्हणून त्या-त्या क्षेत्रातल्या जाणकार मंडळींना त्यांनी सल्लागार नेमले आणि त्या संस्थांच्या कारभारात अन्य कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही याची सुरुवातीपासूनच काळजी घेतली. ग्रामीण भागात उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण देणार्या अशा दर्जेदार संस्था क्वचितच सापडतील. या संस्थांमधून असंख्य ग्रामीण युवक पदव्या घेऊन बाहेर पडले आहेत आणि आज महत्वाच्या जागांवर कार्यरत आहेत. माझ्यापेक्षाही, कदाचित त्यांचे मूल्यमापन अधिक 'रिलेव्हंट' ठरावे.
पवार देशातल्या आणि देशाबाहेरच्या आय.टी. आणि बी.टी. तज्ञांशी सतत संपर्क ठेवून असतात आणि नवीन कुठे काय चालले आहे, याची माहिती घेत असतात. कृषि-तंत्रज्ञान हा तर त्यांच्या खास आवडीचा आणि व्यासंगाचा विषय. त्याही बाबतीतले त्यांचे ज्ञान 'अप-टू-डेट' असते. यामुळेच, कृषि किंवा संरक्षण विभागात त्यांच्या समवेत काम केलेले अधिकारी त्यांचेविषयी नेहमी आदराने बोलताना आढळतात आणि 'काबिल', 'डिसेंट' 'स्टुडियस' अशी विशेषणे वापरतात. आपल्या 'मिडिया' ला असल्या गोष्टींशी कधीच काही देणे-घेणे नसते, त्यामुळे पवारांच्या संपर्कात येउ न शकलेल्या सर्वसामान्य माणसांना त्याची माहिती होत नाही.
राजकारण सोडले तर पवारांचा 'रिलेव्हन्स' काय असे तुम्ही विचारले आहे. मी तर म्हणेन की एक राजकारणी या पेक्षाही, सकारात्मक आणि खंबीर निर्णय घेणारा; आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असणारा; जागतिक स्तरावरचे अर्थकारण आणि त्याचे भारतावर होणारे संभाव्य परीणाम यांचे भान असणारा एक द्रष्टा [visionary] प्रशासक अशी त्यांची नोंद इतिहासाला नक्कीच घ्यावी लागेल.
तुम्ही शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगायचे तर निवडणुकांच्या रणधुमाळीत, शरद पवारांना 'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचे पोते' अशी शेलकी विशेषणे बाळासाहेबांनी बहाल केली होती. 'मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेरच्या स्टूलावर शिपाई म्हणून बसण्याचीसुद्धा या माणसाची लायकी नाही' असे उद्गारही त्यांनी काढले होते. अशा प्रकारच्या त्यांच्या वक्तव्यांना पवारांनी कधी प्रत्युत्तर तर दिले नाहीच पण कडवटपणाही बाळगला नाही. त्याबद्दल कोणी विषय काढलाच तर ते म्हणत, " ती त्यांची खास ठाकरे-शैली आहे. बाळासाहेबांच्या सभांना गर्दी होते ती असले काही तरी सनसनाटी, झणझणीत ऐकायला मिळावे आणि दोन घटका करमणूक व्हावी म्हणूनच. त्यांच्या 'तसल्या' वक्तव्यांचा परीणाम मतदानाच्या पेटीत दिसत नाही." बाळासाहेबच नव्हे तर इतर कोणीही हीन दर्जाची किंवा वैयक्तिक स्वरूपाची टीका केली तरी पवार त्या पातळीवर कधीच उतरले नाहीत. खैरनारांनी 'आपल्याकडे पवारांच्या भ्रष्टाचाराचे एक ट्रकभरून पुरावे आहेत' असे सांगत पवारांच्या विरोधात एक आघाडीच उघडली होती आणि मिडियानेही त्याला वारेमाप प्रसिद्धी दिली होती परंतु पवारांनी मात्र प्रेस कॉन्फरन्स वगैरे न घेता, 'सगळ्या आरोपांबाबत विधानसभेत मी काय तो खुलासा करीन' अशी भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे विधानसभेत एक प्रदीर्घ निवेदन करून त्यांनी विरोधकांना निरुत्तर केले होते. अशी परिपक्वता कितीसे राजकारणी दाखवतात? 'खैरनारांविरुद्ध अब्रू-नुकसानीचा खटला दाखल करावा' असा सल्ला अनेकांनी पवारांना दिला होता परंतु, '" या प्रकारे दखल घ्यावी इतकी खैरनारांची पात्रता नाही आणि मला करण्यासारखी इतर बरीच महत्वाची कामे आहेत" असे सांगून पवारांनी तो मुद्दा निकाली काढला होता.
राजू शेट्टींच्या बाबतीत पवार नेमके काय बोलले ते मला माहीत नाही. आपला 'मिडिया' फारसा विश्वसनीय नसल्याने आणि या घटनेबद्दलचे 'रिपोर्टींग' अगदीच उथळ स्वरूपाचे असल्याने मी त्याबाबत काहीच मतप्रदर्शन करणार नाही. पण, बाय द वे, शेट्टींची जात कोणती आणि त्यांच्या 'समाजा'च्या तथाकथित मालकीचे साखर कारखाने कोणते ? ते कुठे आहेत? 'त्या' कारखान्यांनी किती भाव जाहीर केला आहे आणि तिथे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही, हे खरे का? याबद्दल 'मिडिया'त कुठेच काही आले नाही [आणि येणारही नाही]. तुम्ही त्याचा उल्लेख केला आहे तेंव्हा कदाचित तुम्हाला नक्की काय ते माहीत असेल म्हणून विचारायचे एवढेच. अन्यथा मला त्यात काही फारसा रस वाटत नाही.
पवारांच्या राजकारणाची शैली अनेकांना नापसंत आहे, हे मला माहीत आहे. बर्याचशा प्रतिक्रिया त्याच प्रकारच्या आहेत. तेही ठीक आहे. परंतु मा.बो.वर मला त्यांच्या राजकारणाचे विश्लेषण करायचे नव्हते आणि नाहीही. राजकारणी पवारांचा 'बचाव' किंवा 'समर्थन' करणे तर दूरच. माझी तशी पात्रताही नाही. प्रामुख्याने एक व्यक्ति आणि एक प्रशासक या पैलूंबाबत मला काही सांगायचे होते, एवढेच. त्यावर आलेल्या प्रतिक्रियांमधून उपस्थित झालेल्या काही मुद्द्यांविषयी जाता जाता फक्त थोडी अधिक माहिती मी दिली आहे. शेवटी, प्रत्येकाने आपापले मूल्यमापन करावे. तसे मा.बो.कर करतीलच.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.
शरद पवार यांचे
शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या कृषि, अर्थ,समाज आणि राजकारणातील योगदान एव्हढे विविध स्वरूपाचे आणि दूरगामी आहे की खरे तर त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन व्ह्यायला हवे. ते ज्या सरंजामी मराठा समाजातून आले आहेत आणि संख्याबाहुल्यामुळे त्यांना (आणि इतरांनाही) त्याच गोतावळ्यात रहावे लागणार आहे, त्यात असा पुरोगामी,तंत्रज्ञानाविषयी आस्थाच नव्हे तर स्वारस्य बाळगणारा, जागतिक अर्थव्यवहाराची बारकाईने माहिती असणारा नेता असणे खरोखर दुर्मीळ आहे. आपली पुरोगामी मते आपल्या अनुयायांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांना किती कष्ट करावे लागत असतील याची कल्पनाच येऊ शकत नाही. मुलींना वारसाहक्क असावा हे तत्व कडव्या अनुयायांना पटवणे ही कठिण गोष्ट होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतराबाबतही तेच म्हणता येईल. महिला सक्षमीकरणाची त्यांची पूर्वीपासूनच ठाम भूमिका होती आणि तो केवळ बोलघेवडेपणा नव्हता हे त्यांनी वेळोवेळी कृतीने सिद्ध केलेले आहे.
त्यांचे लवासाचे स्वप्न हा आजच्या वाढत्या शहरीकरणाला आणि बकालीकरणाला अजूनही एक सुंदर पर्याय ठरू शकेल. केरळ आणि गोव्याप्रमाणे बहुतांशी टूरिझमवर आधारित अशी एक टुमदार स्वयंपूर्ण नगरी अस्तित्वात येऊ शकेल. (गुजरातेत तशी ती तयार होतेच आहे.) फक्त आपण सर्वांनी आपला कर्मदरिद्रीपणा सोडायला हवा.
बाळासाहेबांच्या चार दिवस
बाळासाहेबांच्या चार दिवस पश्चात पवार साहेबांवर असा लेख...
छान राजकीय खेळी...
शरद पवार निवडणूकीपुर्ता
शरद पवार निवडणूकीपुर्ता राष्ट्रवादीचे नेते आहेत पण त्यांची खरी ओळख हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते अशीच आहे. इंग्रजी माध्यमं त्याना मराठा नेता म्हणतात पण ते तेवढे खरे नाही. ते महाराष्ट्राचे खरे जानता राजा आहेत. अन मी कित्येक वेळा मराठी वृत्तपत्रात(सकाळच्या व्यतिरिक्त) त्यांचा संदर्भ जानता राजा म्हणून वाचला आहे. एखाद्या नेत्याची संपूरण कारकिर्द इतकी संयमी असणे याचं नवल वाटतं. खरं तर पवार हे संयमाचा अविष्कार आहेत. ते कधी कुणावर पलटवार करताना वा नको तिथे उत्तर देताना मी आजवर पाहिले नाही. त्याच्या विरोधकाला नुसती मुंगी चावली तरी त्यांच्यावर अरोप होतो व हत्तीनी लाथाडला तरी हे पवारानीच घडवून आणले असा ओरडा होतो तरी हे सगळं ते मोठ्या धीराने पचवून घेतात. इतका संयम आजून कोणातच नाही. आता आता तर मराठी माणसाला सवयच झाली की कुठे कुणाला(पवार विरोधकाना) खरचटलं तरीते खापर पवारांवर फूटतो. मग कधीतरे पवार उठून म्हणतात "गुन्हा सिद्ध करा" झालं परत विरोधकांच्या माकड उड्या सुरु होतात. आज काल तर पवार साहेबानी तस म्हणनही सोडलं आहे. तरी त्यांच्यावर सतत चिखलफेक सुरु असते.
खरं तर उभ्या महाराष्ट्राने पवारांचे आभार मानावे की या मातीला इतका खंबीर व धोरणी नेता मिळाला.
खरं तर उभ्या महाराष्ट्राने
खरं तर उभ्या महाराष्ट्राने पवारांचे आभार मानावे की या मातीला इतका खंबीर व धोरणी नेता मिळाला.
अगदि खरय....:फिदी:
********************************************************************
राष्ट्रवादीचा ढासळता बुरूज जेवढ्या लवकर जमीनदोस्त होईल तेवढे महाराष्ट्राला लवकर चांगले दिवस येतील. शरदरावांच्या घाणेरड्या, संधिसाधू, जातीपातीवर बेतलेल्या, गुंडगिरीवर आधारलेल्या, विश्वासघाताची बैठक असणार्या राजकारणाचा असाच शेवट व्हायला हवा. अमाप पैसा (गैरमार्गाने) गोळा करून, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि गुंडगिरी करून राजकारण करता येत नाही हा धडा शरदरावांना कळेल तो सुदिन म्हणावा लागेल. दोन-तीन वेळा मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय राजकारणात दोन-तीन पदे याखेरीज शरदरावांच्या झंझावती राजकारणाचे फलित काय? आज किती लोकं त्यांच्याविषयी दोन चांगले शब्द बोलतात? खाजगीत राष्ट्रवादीमधलीच काही लोकं त्यांच्या हपापलेल्या आणि अवसानघातकी वृत्तीला नावे ठेवतात. शेवटी ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले, आटापिटा केला, आकाशपाताळ एक केले, पैशांची कोठारे उभी केली, लोकांना फसवले, त्यांचा विश्वासघात केला, भ्रष्टाचाराची कुरणे फस्त केली ते पंतप्रधानपद पदरी पडले नाहीच आणि पडण्याची शक्यता अजिबात नाही. अजितराव त्याची पुरेपूर काळजी घेत आहेत. हेचि फळ काय मम तपाला...असे म्हणण्याखेरीज आता त्यांच्या हातात काय आहे?
<शरदरावांच्या घाणेरड्या,
<शरदरावांच्या घाणेरड्या, शरदरावांच्या घाणेरड्या, संधिसाधू, जातीपातीवर बेतलेल्या, गुंडगिरीवर आधारलेल्या, विश्वासघाताची बैठक , जातीपातीवर बेतलेल्या, गुंडगिरीवर आधारलेल्या, विश्वासघाताची बैठक >
मी मुंबईकर तुम्हाला काही बेसिक प्रश्न विचारतो त्याची उत्तर तुम्हीच शोधा
<घाणेरड्या> कोण शुद्ध सात्विक चांगल राजकारण करतो?
< संधिसाधू, > तुम्हाला खरच राजकारण कळतका? राजकारणाचा सगळ्यात महत्वाचा पायाच संधिसाधुपणा असतो.
<जातीपातीवर बेतलेल्य> शिवसेनेन जातीपातीच राजकारण केलच नाही का? भाजप काय करत? काँग्रेस कोणाची हांजी हांजी करत? बाकीचे फुटकळ लहानसहान पक्षांबद्दल बोलायलाच नको.
<गुंडगिरी> महाराष्ट्रात गुंड्गिरी दंडेलशाही कोणत्या पक्षानी सगळ्यात आधी सुरु केली? याच उत्तर राष्ट्रवादी नक्कीच नाही खर उत्तर तुम्हाला पण माहीत आहे.
<विश्वासघात> In politics no one is friend forever no one is enemy forever. त्यामुळ विश्वासघात सगळेच राजकारणी करतात. गळ्यात गळे सगळेच घालुन फिरतात.
शरद पवार राजकारण करतात समाजकारण नाही.
@_सुशांत_ महाराष्ट्रात
@_सुशांत_
महाराष्ट्रात गुंड्गिरी दंडेलशाही कोणत्या पक्षानी सगळ्यात आधी सुरु केली? याच उत्तर राष्ट्रवादी नक्कीच नाही खर उत्तर तुम्हाला पण माहीत आहे.
<<
<<
राष्ट्रवादीने नक्कीच सुरुवात नाही केली. पण राष्ट्रवादी पक्ष स्थापन केल्यावर पवारांनी इतर पक्षातील गुंड्गिरी, दंडेलशाही करणार्या मग तो आमदार असो खासदार असो किंव्हा सामन्य कार्यकर्ता असो या सगळ्यांना आपल्या पक्षात घेतले. म्हणून राज ठाकरे "राष्ट्रवादी" पक्षाचा उल्लेख करताना "पक्ष" न करता "टोळी" असा करतात.
बाकी वरिल आपल्या प्रतिक्रीयेतील बाकीच्या विधानावरुन, तुम्ही माझ्या त्या प्रतिक्रीयेशी सहमत आहात असे दिसते.
मी आपल्या वरील प्रतिसादाशी
मी आपल्या वरील प्रतिसादाशी सहमत आहे पण हेच मत मोदींच्या धाग्यावर नाही आल. पवारांच्या धाग्यावर लगेच आल हे खटकल.
मी पवार समर्थक बिलकुल नाही. पण ज्यावेळेस त्यांना आपण पवार्/ठाकरे ईत्यादी लोकांना शिव्या घालतो/ कौतुक करतो त्यावेळेस आपण ९९.९% ऐकिव माहीतीवरच बोलतो. जे रा. काँ. चे लोक खाजगीत बोलतात की शरद पवार अवसान घातकी आहेत , बेभरवशाचे आहे , हापापलेले आहेत ते सगळे पवारांसोबत किती वेळ असतात. ते फक्त आपल्यापुरत बोलत असतात, प्रत्येकाला ईतकी घाई झालेली आहे मोठ व्हायची की कोणालाच उद्या काय हे पहायची सवय नाहीये. पवारांना पक्ष चालवायचाय ते पण काँग्रेस्/शिवसेना/भाजप यांच्या विरोधात राहुन. ठाकरेंनी शिवसेना काढुन ४० वर्ष झालीत. पवारांनी रा. काँ. काढुन १०-१२ वर्ष झालीत. दोन्ही पक्षांची सद्य परीस्थिती काय आहे? राजकारणात तन / मन/ धन / बळ सगळ्याच गोष्टींचा वापर करावा लागतो. त्या त्यांनी वापरल्या. यात काय चुक आहे. ही राजकारणाची गरज आहे. त्यामुळ शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत. उत्क्रुष्ट प्रशासकीय नेता आहे. सद्य परीस्थितीत राष्ट्रीय पातळीवर त्यांच्यासारखे राजकारणी धोरणी नेते फार कमी आहेत अगदी बोटावर मोजण्याईतकेच. त्यात भाजप/शिवसेना यांच्यापैकी किती आहेत?
राज्य मिळवायला आणी ते समर्थपणे करायला हे सगळे गुण असावेच लागतात.
राज ठाकरे रा वा चा उल्लेख
राज ठाकरे रा वा चा उल्लेख टोळी असे करत नाहीत.. ते म्हणतात - रा वा म्हणजे स्व बळाने निवडून येणार्या पुढार्यांची मोळी !
कुमार सप्तर्षी म्हणाले तसे
कुमार सप्तर्षी म्हणाले तसे बाळासाहेब एक मोठा 'गोड' माणूस होते >>>>>> कुमार केतकरहि परवा असेच काहितरी म्हणाले. निखिल वागळेहि असेच काहितरी म्हणाले. ते पाहुन मला खात्री पटली कि गेल्या ५०० वर्षातील संतमंडळीत बाळासाहेबांचे नाव नक्किच घेता येइल. तसेच पवार साहेबांचेहि वरील लेख वाचुन वाटते. तेदेखील गेल्या ५०० वर्षातील संतमंडळीत, समाजसेवकात बसु शकतात.
असो. लेखक महाशयांचा टाइम चुकला. नेमके ते फेसबुकवरचे प्रकरण निघाले. नाहितर आता माबोचे बिळात लपलेले उंदिर बाहेर येउन या धाग्याने १०० री नक्किच गाठली असती.
भारतीय माझ स्वतःच मत आहे की
भारतीय माझ स्वतःच मत आहे की शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे दोघेपण राजकारणी आहेत ते बिलकुल समाजसेवक नाहीत. ते जी काय समाजसेव करतात त्यात मुळाशी राजकारण असतेच असते.राजकारण आणि समाजसेवा/समाजकारण दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समाजसेवा/समाजकारण करणार्यांनी राजकारणार्यावर वचक ठेवला पाहीजे. सद्य परीस्थितीत अण्णा हजारे/पोपट पवार आणि ईतर थोड्याफार प्रमाणात ते करतात. शेवटी अण्णा हजारे पण माणुस आहे देव नाही त्यांच्याकडुन पण चुका होणारच.
धन्य आहे तुमची करंदीकर.
धन्य आहे तुमची करंदीकर. तुमच्या सारख्या माणसानी IAS व्हावे ह्यावरुन च भारताची अधोगती का होत आहे ह्याचे कारण कळते.
आपल्या लोकशाहीची आणि
आपल्या लोकशाहीची आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गंमत अनुभवायला मिळते आहे. या टर्म्स किती रिलेटीव्ह आहेत (ज्याला मी सुद्धा अपवाद नाही) हे काही काळाने असे सर्व धागे तटस्थपणे पाहताना समजून येईल. असीम त्रिबेदीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना त्याच्या हीन अभिरूचीची आणि ज्या प्रतिकांचा सन्मान करावा अशी अपेक्षा आहे त्याचा विसर पडतो. हे एक उदाहरण. अशी वेगवेगळी उदाहरणे प्रत्येकास लागू होतात. आपल्या समाजात हा दुभंग होत चाललेला आहे जो चिंताजनक आहे. या घटनांमधून आपण प्रत्येकाने काही न काही शिकून प्रगल्भ होण्यासारखं बरंच आहे. काही वर्षांपूर्बी हाजॉ मस्तानने पक्ष काढला होता असं ऐकून आहे. त्या काळी अशा लोकांना मान्यता मिळत नव्हती. आताच्या काळात असं होईलच याची खात्री देता येईल का ?
पवारांना आदर्श मानणारा मोठा समुदाय आहे आणि तरीही पवारांवर टीका करता येऊ शकते हे मला खूप महत्वाचं वाटतं. अशा टीकेकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. मला एकदा संघाचा एक (प्रत्यक्ष काम करणारा) कार्यकर्ता म्हणाला होता. संघ वाढतो आहे. टीका करणा-यांकडे वेळ आहे याचा संघाला खूप हेवा वाटतो. मला ही टिप्पनी अतिशय मार्मिक वाटली होती. पवारांचंही तसंच आहे. त्यांची धोरणं मला पसंत आहेत असं नाही. मात्र त्यांच्याबद्दल पातळी सोडून टीका करताना आपल्याला अशी टीका चालू शकते का याचा विचार व्हायला हवा.
सध्या राजकारणात त्यांच्यावाचून सर्वांच अडतंच. राणे त्यांच्याकडे आले तेव्हां त्यांची समजूत काढून त्यांना काँग्रेसमधे जाण्याचा सल्ला देताना पवारांनी एका दगडात कितीतरी पक्षी मारले. तेव्हां हायकमांडकडे फुशारक्या मारणारे आता पवारांच्या दूरदृष्टीला दाद देताना दिसतात. कोकण पॅटर्न सुरुवातीला यशस्वी होण्यासाठी पवारांनी सर्वतोपरी मदत केली. पण राणे कोकणात किंग होऊ नये म्हणून पुढच्या वेळी शिवसेनेला मदत केली. काँग्रेस याला विश्वासघात म्हणत असली तरी तिचं कोकणात अस्तित्व नव्हतंच. खुद्द काँग्रेसचा इतिहास वेगळा आहे काय?
कधी कधी मात्र राजकारणाच्या पलिकडे पवार व्यक्ति म्हणून अनेकांना अनुभवायला मिळतात. जयदेव ठाकरे यांनी राष्ट्रवादीमधे येण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हां मैत्रीला जागत त्यांनी जयदेवची काढलेली समजूत ही महाराष्ट्राच्या लक्षात आहे. त्याचं श्रेय घेणे देखील त्यांनी टाळले आणि बातमीही होऊ दिली नाही. प्रत्येकाकडून काही शिकता येते म्हणतात ते हेच. याची परतफेड बाळासाहेबांनी अण्णांच्या एकही मारा या उक्तीच्या वेळी पवारांना ठाम पाठिंबा देऊन केली. हा महाराष्ट्रावरचा हल्ला आहे हे सांगून पवारांचा अपमान होणार नाही हे त्यांनी पाहीलं. अशा माणसांवर टीका करण्यासाठी आपण विशिष्ट उंची गाठलेलीच असली पाहीजे या मताचा मी अजिबात नाही. मात्र एक विशिष्ट पातळी राखलेली असावी या मताचा नक्कीच आहे.
एका हातात लवासा, शाहिद बलवा, मगरपट्टा सिटी, मोठमोठे उद्योजक्स, दुस-या हातात विनायक मेटें आदिंच्या जातवार संघटना, तिस-या हातात छगन भुजबळांचा ओबीसी महासंघ, तर चौथ्या हातात कालपरवापर्यंत असलेले रामदास आठवले तर पाचव्या हाताने बाळासाहेबांशी गुप्त खलबतं या कसरतीबद्दल नेहमीच आश्चर्य वाटलेले आहे. कुणालाही जास्तीचं काहीही न देता जास्तीत जास्त काढून कसे घ्यायचे आणि ते ही वर्षानुवर्षे हे त्यांना उमजलेले आहे.
वाटाघाटींच्या राजकारणाचा अनभिषिक्त सम्राट असं एका ओळीत त्यांचं सध्याचं वर्णन मला करावेसे वाटेल ! मात्र या पदाला पोहोचण्यापूर्वीचा त्यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहेच. प्रतापराव पवारांनी या संदर्भात सकाळमधे वेळोवेळी लिहीलेले लेख आणि त्यांच्यावरील पुस्तके यामुळे पुन्हा काही लिहीण्याची आवश्यकता वाटत नाही.
ता.क : लहान असताना पवारांच्याच गावचा असल्याने ते पंतप्रधान होणार अशा बातम्या आल्या कि ऊर भरून यायचा. पण आता तो इतिहास समजून घेताना साहेबांनी नेहमी का माघार घेतली हे समजत नाही. कारणे नक्कीच असतील. पण एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी पात्रता त्यांची नक्कीच होती. अर्थात दिल्लीचा इतिहास पाहिला तर त्या खुर्चीचे निकष काही सन्माननीय अपवाद पाहता वेगळे राहीले आहेत हे मनमोहन सिंह, देवेगौडा, मोरारजी देसाई आदींकडे पाहून वाटू लागते.
अगदी अगदी. बेरजेचे राजकारण
अगदी अगदी.
बेरजेचे राजकारण म्हणजे काय ते शरद पवारांकडून शिकावे. कट्टर जातीय अनुयायी, ओबीसी संघटना, महिला संघटना,नामवंत तारे-तारका,क्रीडापटू,कवी,साहित्यिक,पत्रकार(हे मात्र भूतकाळात), सर्व धर्मातले आणि पक्षातले राजकारणी (अगदी कश्मीरपासून अस्समपर्यंत),समाजधुरिण या सर्वांशी एकाच वेळी सौहार्दाचे संबंध राखून असणे त्यांना जमलेले आहे. आता सेक्युरिटीचे झंझट मागे असते. पण एरवी कुणाही माई-मावशींच्या थेट चुलीपाशी जाऊन पाट मांडून बसण्या इतपत जिव्हाळा कित्येक घरांतून त्यांनी जोपासला आहे. इतका अफाट लोकसंग्रह असलेला नेता देशातही विरळाच असेल. शिवाय प्रत्येकाचे काही ठळक गुण अथवा वैशिष्ट्य त्यांच्या अचूक लक्ष्यात असते.
पंतप्रधानपदाची किंवा कुठल्याही पदाची आकांक्षा बाळगणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे यात काहीच गैर नाही. लो एइम इझ क्राइम, फेल्युअर इझ नॉट. इन फॅक्ट इतका लायक माणूस आणि तोही महाराष्ट्रातला, जर पंतप्रधान बनला असता तर त्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसती.
आपले दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, बाळासाहेबांचा उत्कर्षकाळ आणि शरद पवारांचा उदयकाळ हे दोन्ही प्रदीर्घ अशा पण एकाच कालखंडात आले. त्यामुळे दोघांपैकी एकालाही सर्वंकष सत्ता फारकाळ मिळू शकली नाही.
अगदी उमेदीच्या काळात माझ्या
अगदी उमेदीच्या काळात माझ्या घरात ( मी त्यावेळी अस्तित्वात आलेलो नव्हतो) येऊन ते जेवण करून गेलेत. अशा छोट्या घटनांमुळे तिथली सर्वच मते अलगद त्यांच्या पारड्यात पडायची. अर्थात या प्रत्येक गोष्टीच्या मागे मताचा विचार होता असं म्हणता येत नाही.
गोपीनाथ मुंडेंचा त्यांनी कात्रज का केला या न सुटलेल्या कोड्याची उकल"पूर्ती" दमाने झाली
कुणीतरी सागर बर्वे नामक
कुणीतरी सागर बर्वे नामक इसमाने पवारांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता, त्याला काही लोकांनी चोप दिल्यावर त्याने माफी मागितली व ती पोस्टही डिलीट केली
आताच टीव्ही वर पाहिले.
आताच टीव्ही वर पाहिले. मोदींना त्यांनी पत्र लिहिले की जिवनावश्यक वस्तू कोणत्या ह्यात संभ्रम निर्माण झाला आहे. ती सुचना लक्षात घेऊन सरकारने सर्व प्रकारच्या मालाला वाहतूक परवानगी दिली.
{{{ आपले दुर्दैव म्हणा किंवा
{{{ आपले दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, बाळासाहेबांचा उत्कर्षकाळ आणि शरद पवारांचा उदयकाळ हे दोन्ही प्रदीर्घ अशा पण एकाच कालखंडात आले. त्यामुळे दोघांपैकी एकालाही सर्वंकष सत्ता फारकाळ मिळू शकली नाही.
Submitted by हीरा on 22 November, 2012 - 13:34 }}}
कैच्याकै, बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांच्या पंतप्रधान बनण्याच्या मार्गातील अडथळा कधीच नव्हते. त्यांनी नेहमीच शरद पवारांच्या पंतप्रधान बनण्याला उघड पाठिंबा दर्शविला होता. "माझा सल्ला मानला तर शरद पवार नक्की पंतप्रधान बनतील" असेही त्यांनी मुलाखतीत अनेकदा सांगितले होते. प्रतिभाताई पाटील यांना भाजपची इच्छा डावलून त्यांनी राष्ट्रपतीपदाकरिता पाठिंबा दिला होता. त्याच प्रमाणे जर शरद पवार पंतप्रधान बनण्याकरिता शिवसेनेचे पाठबळ उपयोगी पडत असते तर एक मराठी माणूस म्हणून त्यांनी नक्कीच सकारात्मक पाऊल उचलले असते तेही भाजपची पर्वा न करता.
देश संकट मे है.
देश संकट मे है.
छान लिहिलंय. पवारसाहेब काय
छान लिहिलंय. पवारसाहेब काय चीज आहे हे समजण्याकरता त्यांचे निकटवर्तिय असणं (हे खरंतर भाग्याचं लक्षण) जरुरी नाहि, तर त्यांच्या कार्याचं मुल्यमापन करण्या इतका अभ्यास (आणि कुवत असणं) आवश्यक आहे, एव्हढंच म्हणेन...
काळीमाऊ, धन्यवाद हा धागा वर काढल्याबद्दल...
बिपिनचंद्र, बाळासाहेब ठाकरे
बिपिनचंद्र, बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांच्या पंतप्रधान बनण्याच्या मार्गातील अडथळा बनले होते असे मी लिहिलेले नाही आणि ध्वनितही केलेले नाही. तुम्हांला तसे वाटले असेल तर नाइलाज.
दोन उत्तुंग माणसे एकाच कालखंडात एकाच स्थळी पटलावर आली तर कुणाचा एकाचा असा पूर्ण प्रभाव राहात नाही किंवा एकाचीच कायम सरशी झालीय असे होत नाही. त्याऐवजी वेगवेगळ्या काळी अथवा स्थळी ते बहरले असते तर पूर्ण पटल त्यांना मोकळे मिळाले असते, हा अर्थ.
शरद कमळ बघ
शरद कमळ बघ
म्हणून चित्कार फोडणारे भक्त कुठे गेले ?
तुम्हांला तसे वाटले असेल तर
तुम्हांला तसे वाटले असेल तर नाइलाज.>> सरळ आकलन कमी असे लिहावे. नाईलाज वगैरे काय ना?
लेख, लेखकाच्या लेखावरील प्रतिक्रिया, हीरा आणि तशाच प्रकारच्या इतर आयडींच्या प्रतिक्रिया अभ्यासू, वाचनीय आहेत.
लेख, लेखकाच्या लेखावरील
लेख, लेखकाच्या लेखावरील प्रतिक्रिया, हीरा आणि तशाच प्रकारच्या इतर आयडींच्या प्रतिक्रिया अभ्यासू, वाचनीय आहेत. >> ++++१११११
Pages