बीन बॅग

Submitted by बेफ़िकीर on 13 November, 2012 - 16:30

निरागस हेलकावे देत जा तू
मनाला खेळवाया येत जा तू
समाधाना जिथे जातोस तेथे
कडेवरुनी मलाही नेत जा तू
==================

तिला हे समजुनी घेण्यात कोठे वाटते गोडी
कुणाचे थांबते रडणे कुणी निष्ठूर आल्याने
करावी लागली असणार गाडीऐवजी होडी
तिच्या रस्त्यात माझ्या आसवांचा पूर आल्याने
===============================

हळवा कोना तलम दुपट्ट्याचा प्रतिमांमध्ये सापडतो
उपमांच्या हिसक्याने बसतो फास, गळा नाजुक अवघडतो
श्वासांच्या वाढीव लयीने विस्फोटक आशय धडधडतो
नकोच कविता करायला मी, ताण तुझ्या वक्षांवर पडतो
======================================

दिशाहीनसा चालत आहे या रस्त्यावर
आजूबाजूने मजबूरी वाहत आहे
कुठून आलो होतो हे मारत फाट्यावर
कोठे जाता येते हे मी पाहत आहे
=========================

बीन बॅग व्हावेसे वाटत आहे हल्ली
बसेल त्याच्या आकाराचा बनुनी साचा
खुणा पावलांच्या मी मिटवत आहे हल्ली
बसेल त्याच्या पाठीवरुनी पुसुनी टाचा
==========================

हो तुझ्या मागे तसा मी लागलो होतो जरा
विसरुनी गेलीस तेव्हा जागलो होतो जरा
आज वेड्यासारखी तू आठवत बसलीस ते
सोड... वेड्यासारखा मी वागलो होतो जरा
============================

प्रश्न पोटाने असा केला... विसरलो छंद मी
अन्यथा अव्वल कसाची गुंफतो मी शायरी
मानतो इतकाच आता 'बेफिकिर' आनंद मी
उंच प्रतिभेच्या जिन्याची जाहलो मी पायरी
============================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स दक्षिणा, ही एक कविता नाही, स्वतंत्र मुक्तके आहेत व त्यामुळे मध्ये रेषा ओढून एका मुक्तकाचा दुसर्‍याशी संबंध नाही हे दर्शवलेले आहे. Happy

संपुर्ण काव्यच कोट करण्यासारखे आहे.

तरीही

करावी लागली असणार गाडीऐवजी होडी
तिच्या रस्त्यात माझ्या आसवांचा पूर आल्याने>>>> आहाहा

श्वासांच्या वाढीव लयीने विस्फोटक आशय धडधडतो
नकोच कविता करायला मी, ताण तुझ्या वक्षांवर पडतो>> > मस्तच (छातीवरही चालले असते)

मजबूरीही (अगतिकता) छान!
शेवटची दोन्हीतर अफलातूनच आहेत.
...... पुलेशु!

शाम, धन्यवाद! मजबूरी, अगतिकता, विवशता व लाचारी हे सारे ध्यानात घेतले. शेवटच्या क्षणी मजबूरी हा शब्द अधिक परिणामकारक भासला व योजला.

धन्यवाद!

फारच छान ! 'समाधान', 'मजबूरी', 'बीन बॅग', 'साचा', 'पायरी' आदि शब्दांचा वापर फारच कल्पक वाटला !

समाधाना जिथे जातोस तेथे
कडेवरुनी मलाही नेत जा तू >>>>>>>वाहवा
करावी लागली असणार गाडीऐवजी होडी
तिच्या रस्त्यात माझ्या आसवांचा पूर आल्याने>>>>>>>>>>>>क्या बात भाई

श्वासांच्या वाढीव लयीने विस्फोटक आशय धडधडतो
नकोच कविता करायला मी, ताण तुझ्या वक्षांवर पडतो>>>>>>>> कसं सुचतं इतकं विलक्षण ?

मानतो इतकाच आता 'बेफिकिर' आनंद मी
उंच प्रतिभेच्या जिन्याची जाहलो मी पायरी>>>>>>>>> कळस

बेहद सुंदर . ......
============================

वाह...

चवथे व पाचवे कडवे आवडले. मनात असेच विस्कळित विचार येतात . तोच प्रकार कदाचित शब्दबद्ध केला असावा
असे वाटते. कविता आवडली.

समाधान ...लाजवाब!

करावी लागली असणार गाडीऐवजी होडी
तिच्या रस्त्यात माझ्या आसवांचा पूर आल्याने...क्या बात!

शेवटची दोन अव्वल !!!

हो तुझ्या मागे तसा मी लागलो होतो जरा
विसरुनी गेलीस तेव्हा जागलो होतो जरा
आज वेड्यासारखी तू आठवत बसलीस ते
सोड... वेड्यासारखा मी वागलो होतो जरा>>>>> फार आवडले,,,!!!

सर्वच मुक्तकं मला भावलीं.
<< आजूबाजूने मजबूरी वाहत आहे >> अशा ओळी प्रतिमांच्या गर्दीत आशय हरवणार नाही याची दक्षता घेत असाव्यात !