ऑक्टोबर एण्ड

Submitted by मंजूडी on 21 July, 2008 - 00:33

परवाच्या रविवारी दुपारी छान पुस्तक वाचायला मिळाले अनंत सामंत ह्यांचे ऑक्टोबर एण्ड. पहिल्याच पानावर जहांगिर आर्ट गॅलरी, भणंग चित्रकार, सामोवार वगैरे वर्णन वाचून हे पुस्तक भयंकर बोअर करणार असं वाटलं होतं.... पण पुढच्या पानांवर विशाल, नीना, ऍश्विन डीसूझा, स्कारलेट, कमलजीत, स्वामीनाथन, मंदाकिनी भेटत गेले आणि पुस्तकात मी हरवून गेले.
कॅटरींग कॉलेजमधले हे सगळे जुने दोस्त. चार पाच वर्षानंतर गेट टू गेदरची टूम निघते. विशाल एक leading sculpturist , त्याला आवडणार्‍या स्कारलेट आणि नीना, ऍश्विनला ठाऊक असलेलं निनाचं गुपीत, अतोनात खर्च करणारा कमलजीत, मंदाकिनी, स्वामीनाथन, विशालची आई सगळेच आपल्याला आवडून जातात. कादंबरी वेगवेगळ्या वळणाने फुलत जाते आणि एका अनपेक्षित शेवटावर आणून सोडते तेव्हा आपण थक्क होतो. ह्या शेवटाची कथेत येणार्‍या वेगवेगळ्या प्रसंगातून हिंट मिळत जाते पण हे आपल्याला कथा संपल्यावरच लक्षात येतं.
व्यवसायाने दर्यावर्दी असलेल्या अनंत सामंत ह्यांच्या भाषेतला बिनधास्तपणा जाणवतो. त्यांचं लिखाण थोडसं बोल्ड वाटू शकेल पण त्यातला सच्चेपणा आपल्याला भावतो. 'एम. टी. आयवा मारू' हि त्यांची पहिली कादंबरी आणि 'अविरत', 'त्रिमाकासी मादाम' ह्या कादंबर्‍या मी वाचलेल्या आहेत. 'माईन फ्रॉईंड' हा कथासंग्रह देखिल खुप छान आहे. त्यांच्या सगळ्याच लिखाणातून खलाशी जीवनाची झलक आपल्याला अनुभवायला मिळते. 'ऑक्टोबर एण्ड' ही वेगळ्याच विषयावरची कादंबरी पण खिळवून ठेवणारी आणि अतिशय वाचनीय आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनंत सामंत ह्यांच्या भाषेतला बिनधास्तपणा जाणवतो >>>> ह्यांच्या कथा, दिर्घकथा यायच्या ना सकाळ वगैरे दिवाळी अंकात ? 'ऑक्टोबर एण्ड' वाचले पाहिजे.

मी त्यांचं एमटी आयवा मारु पण वाचलं होतं आणि हेही वाचलंय. त्यांच्या भाषेच्या बिनधास्तपणाबद्दल एकदम सहमत. थोडी बोल्ड असतात त्यांची पुस्तकं.

ऑक्टोबर एंड मस्तच आहे. खिळवून ठेवणारी. सा. सकाळ्च्या दिवाळी अंकात एक बेलिन्दा नावाची कथा होती त्यांची. तीही जबरदस्त होती.

एम. टी. आयवामारू मी वाचलंय... त्यांच्या भाषेबद्दल सहमत पण आधीच सुहास शिरवळकर वाचायला लागलो होतो त्यामुळे सामंतांची भाषा फार बोल्ड वाटली नाही Happy
-------
अनंत सामंत वाचकांना खिळवून ठेवतात मात्र.. त्यांचं धक्का तंत्र एकदम मस्त असतं.
आयवामारू नंतर अजून एक कादंबरी वाचली होती पण नाव आठवत नाहीये. सामंतांच्या पुस्तकांची यादी कोणी देऊ शकेल का?

संदीप 'एक ड्रीम मायला..' आठवताय का? ते ही अनंत सामंतांचंच आहे.

मन्जुडी, पूर्ण सहमत आहे . अनंत सामंत यांची के फाइव सोडले तर बाकि सर्व पुस्तके लाजवाब आहेत. ऑक्टोबर एण्ड आणि ओश्तोरीज या तर चिरतरुण कलाकृती आहेत. त्यांची लेखणी कधीकधी एवढी हळुवार लिहिते तर कधीकधी अचानक अशी फेसान्डत अंगावर येते...जिन्दगी वसूल करणारा अनुभव असतो त्यान्चे साहित्य वाचणे म्हणजे...

वाचलय वाचलय वाचलय. अनंत सामंतांचं जवळ जवळ प्रत्येक पुस्तक वाचलय. (शेवटची सहा सोडून)

एम् टी आयवा मारु
त्रिमाकासी मादाम
ऑक्टोबर एन्ड
लांडगा (जॅक लंडन यांच्या व्हाईट फॅन्ग या पुस्तकाचा भावानुवाद)
के फाईव्ह
ओश्तोरीज
माईन फ्रॉईन्ड
बेलिन्दा
अविरत
किबुत्झमधला डॅनी इथे आला होता
मितवा
बायपासचे दिवस
एक ड्रीम.... मायला !
लिलियनची बखर
दृष्टी
एका शहराचं शूटींग
अश्वत्थ