आकाशाशी नाते जोडते ..
झाड वाट पहातय ..
सर्व पक्षी उडून जाण्याची .
एकही पक्षी नसल्याच्या
एकांताची ..
केव्हातरी उडून जातात काही पक्षी..
नवे येत रहातात काही .
नवेही जुने होतात ,घरटी बांधतात ..
नि ते ही जातात उडून
पण, झाड काही मोकळे होत नाही ..
येत रहातात नवे,जुने पक्षी पुन्हा पुन्हा ..
चुकून येते अशी वेळ कधीतरी ;
खूप पक्षी उडून जातात ..
मग उरलेले काही ..
नि शेवटचा पक्षीही फडफडवत पंख ..
आकाशगामी होतो.
झाड घेते मग खोल श्वास ..
नि सुस्काराही सोडते .
नि पकडू पहाते हवा असलेला एकांत ..
पुन्हा तेच होते ..
क्षणाच्या चिमटीतून निसटून जातो ..
एकांताचा पारा .
झाडावर हजर असतो तेव्हा एक पारवा ..
नि उतरू पहाणारा
एक नवा थवा ..
झाडाने गाणीही ऐकली असतात पक्षांची आवडीने ..
घाणीलाही घेतले असते अंगावर ..
रात्री झोपतात पक्षी
पण, हा असतो फसवा एकांत
बाहेरच्या मौनात नांदत असणार्या..
नकोशा वाटणार्या गदारोळासारखा ..
झाडाला हवे असतात पक्षी
हवे तेव्हा ..
नि नको असतात ,,नको तेव्हा ..
निष्पर्ण एकांतात
झाडाने डोळे किलकिले केले
बघितले आकाशाकडे ..
केला सवाल ,
पसरवून फांद्यांचे हात .
कसा मिळेल एकांत ?
पक्षांशिवाय ?
"मला डोळे भरून पहा '
आकाश बोललं मौनात ..]
झाडाच्या कानात ..
झाडासाठी रहस्य खुललं
झाड स्वत:मध्ये झुललं ..
आता झाडाला
पक्षी हवेसे वा नकोसेही वाटत नाहीत .
तरीही झाडाला तो एकांत आता गवसला आहे ..
झाड आता स्वत:तून बाजूला होते ..
स्वत:च झाडपणाचे बोट सोडते .....
आकाशाशी नाते जोडते ..
वाह! आशयगर्भ कविता
वाह!
आशयगर्भ कविता
खूप लांब झालीय...
खूप लांब झालीय...
अतिशय उत्तम !
अतिशय उत्तम !
सुप्रियाजी,जोशी साहेब ,
सुप्रियाजी,जोशी साहेब , वैभवजी धन्यवाद ..