भरले टोमॅटो

Submitted by मंजूडी on 1 February, 2011 - 01:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६-७ मध्यम आकाराचे टोमॅटो (लहान असतील तर १०-१२ टोमॅटो) चांगले लालबुंद, कडक बघून घ्यावेत.
दिड ते दोन वाट्या मटार
१ मोठा कांदा (ऐच्छिक)
दोन टेबलस्पून पांढरे तीळ
दोन टेबलस्पून शेंगदाणे
चार टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं
चार टेबलस्पून बेसन
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
दोन टी-स्पून कच्छी दाबेली मसाला
मीठ, साखर, लाल तिखट, हळद चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. मटार वाफवून घ्या.
२. टोमॅटो मोठे असतील तर दोन तुकडे करून घ्या. लहान असतील तर फक्त देठाकडचा भाग कापून घ्या.
३. टोमॅटोमधला गर काढून बाजूल ठेवा. टोमेटो चांगले पोकळ झाले पाहिजेत.
४. सुकं खोबरं, दाणे, तीळ खरपूस भाजून घ्या. मिक्सरमधून बारीक पूड करून घ्या.
५. बेसन कोरडंच खमंग लालसर भाजून घ्या.
६. कांदा बारीक चिरून घेऊन टोमॅटोच्या गरात मिसळा. त्यात सुकं खोबरं-दाणे-तीळाचं कूट आणि बेसन मिसळून चांगलं कालवून घ्या.
७. वाफवलेले मटार त्यात घाला. दाबेली मसाला आणि चवीप्रमाणे मीठ, साखर, हळद आणि लाल तिखट घाला.
८. चिरलेल्या कोथिंबीरीपैकी पाऊण वाटी कोथिंबीर त्या सारणात मिसळा.
९. सारण चांगलं व्यवस्थित कालवून घेऊन टोमॅटोत दाबून भरा.
१०. भरलेले टोमॅटो मायक्रोवेव सेफ बोलमधे व्यवस्थित लावा. उरलेलं सारण टोमॅटोभोवती घालून टाका.
११. या भाजीला रस हवा असल्यास एक कपभर पाणी बोलमध्ये सगळीकडून घाला.
१२. आता हा बोल न झाकता मायक्रोवेवमधे हाय पॉवरवर आधी तीन मिनिटे ठेवा. मग बोल बाहेर काढून टोमॅटो किंचित हलवून पुन्हा हाय पॉवरवर दोन मिनिटासाठी ठेवा.
१३. भाजी बाहेर काढून उरलेली कोथिंबीर पेरून खायला घ्या.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे तीन ते चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ही भाजी बिनफोडणीची आहे. तीळ-दाणे-सुक्याखोबर्‍यातून पुरेसं तेल मिळतं.
२. वर दिलेल्या सारणाऐवजी उकडलेले बटाटे, वाफवलेले पिवळ्या मक्याचे दाणे, बारीक चिरलेली भोपळी मिरची, ओलं खोबरं इत्यादी घटक वापरून आपापल्या आवडीप्रमाणे सारण करता येईल.
३. वरून किसलेलं चीज घातलं तर या भाजीला अधिक बहार येते. Happy
४. ही भाजी गॅसवर करायची असल्यास थोड्या तेलात फोडणी करून त्यात भरलेले टोमॅटो घालून वर झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ आणायची.
५. टोमॅटो पटकन शिजतात. जास्त वेळ मायक्रोवेव केले किंवा गॅसवर ठेवले तर भाजीचा गिचका होईल.
६. दाबेली मसाल्याऐवजी गरम मसाला, धने-जिर्‍याची पावडर वापरता येईल. पण दाबेली मसाल्याचा स्वाद एकदम निराळाच आणि छान लागतो.

stuffed tomato.jpg

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॅडी, कसला झक्कास फोटो आलाय... एकदम टेम्प्टिंग!!
सारण पाण्याने विसळून ग्रेव्ही केलीस ना? Proud मी पण तेच केलं होतं. Wink

हा फोटो भाजी तयार झाल्यानंतर काढलाय की आधी ? >>>>>
सिंडे, भाजी तयार झाल्यावर फोटो काढलाय. टोमॅटो शिजलेले वाटत नाहियेत ना? पण खाताना सहज साल निघालं त्याचं..

मस्त पाककॄती आणि फोटो Happy
आता इतर ठिकाणी वापरला जाणारा प्रश्न मी इथे ( घाबरत घाबरत) विचारते. ज्यांना टोमॅटो आवडत नाही त्यांना दुसरं काय वापरुन ही रेसिपी करता येईल ? भोपळी-मिरची वगैरे चालेल का ? Proud

सगळेच फोटु बघुन ही भाजी लगेच करुन खावीशी वाटायला लागल्ये. मस्त फोटु.

मम्जिरी लवकरच करुन बघण्यात येईल .

अगो, पडवळ, दोडका, कारलं, दुधी, बटाटा, भोपळी मिरची, ढेमसं
Proud

विनोद बाजूला, बटाटे उकडून पोखरून या सारणाने भरता येतील. सारण कांद्याशिवाय करून कोरडं ठेवून आंबटपणासाठी आमचूर पावडर वापरून पडवळाचे तुकडे भरता येतात. नुसत्या फोडणीवर परतायचे. ती भाजी पण मस्त लागते. पण मी कधी मावेत केली नाहीये.

आजच दुपारी केले होते. मस्त चव......!!!! रात्रीसाठी कसाबसा एकच टोमॅटोचा पीस उरलाय!! खूप छान रेसिपी आहे ही... प्रॅडीसारखं थोडं दहीही घातलं त्यात. धन्स मंजूडी!

अरे, काल एका मैत्रिणीने बाँब टाकला. टोमॅटो लहान मुलांना (एकंदरीतच) चांगले नाही असे तिला कोणीतरी व्यक्तिने सांगितले म्हणे. का? असे विचारले तर तिला आठवेना पण ती म्हणाली तिच्या आज्या पण आग्रही असायच्या , टोमॅटो न खाण्याबाबत. दुसरी म्हणाले, बिया काढुन खावेत...
मला जास्त माहिती नाही, पण इथे टोमॅटोच आहे म्हणुन लिहिले. कोणाला जास्त माहिती असेल तर लिहा. (पण ह्या माहितीमुळे मी ही भाजी करणार नाही असा गैरसमज करुनये Happy )

सुनिधी, ते आयुर्वेदाप्रमाणे आहे. बर्‍याच आयुर्वेदिक पथ्यात टोमॅटो खाण्यावर बंधने येतात. पण आपण ही भाजी रोज रोज थोडीच करणार! तेव्हा....चालतंय!! Wink

किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्‍यांनी बिया असलेल्या कुठल्याच भाज्या, उदा. काकडी, टोमॅटो, वांगी इत्यादी चालत नाहीत असं ऐकलं होतं. त्याउलट कुठलंही ऑपरेशन झाल्यावर टाके लवकर भरून येण्यासाठी रोजच्या आहारात टोमॅटोचा भरपूर वापर करायला सांगतात. ही भाजी रोज नाही केली तरी टोमॅटो रोजच्या जेवणात कोशिंबीर, रस्साभाजी, सार, आमटी इत्यादिंमधे आपण वापरतोच की.. लहान बाळांना तर टोमॅटोचं ज्यूस, सूप देतोच. त्यामुळे टोमॅटोबद्दलचे गैरसमज जाणकारांनी लवकरात लवकर दूर करावेत.

टोमॅटो अ‍ॅसिडिक असतात त्यामुळे बाकी रंगीत भाज्यांचे फायदे यापासुन होत नाहीत. म्हणजे जे आपण सारखे भरपूर ताज्या भाज्या खाव्यात असे म्हणतो तर त्यात ताज्या भाज्यांमधे टोमॅटोला धरु नये.
थोड्या प्रमाणात ठीक आहे. जे डाएटवर आहेत त्यांनी सुपमधे शक्यतो रोज दुधीचे किंवा व्हेजिटेबल सुप घ्यावे. टोमॅटोचे नको .
बरीचशी फळे , भाज्या(टोंमॅटो सोडुन), कडधान्ये अल्कली फॉर्मिंग असतात. म्हणुन त्यांचा वापर रोजच्या आहारात जास्त हवा. याचा अर्थ टोंमॅटो वाईट असा नाही पण भाज्या खाण्याचा फायदा टोंमॅटोला नाही.
विषयांतराबद्द्ल क्षमस्व मंजुडी. पण तुझे वरील पोस्ट वाचले आणि म्हणून माझी माहीती दिली. बाकी माहिती जाणकार देतीलच.

आस,
<टोमॅटो अ‍ॅसिडिक असतात त्यामुळे बाकी रंगीत भाज्यांचे फायदे यापासुन होत नाहीत. >

हे वाक्य कळले नाही. रंगीत भाज्यांमध्ये फायटोकेमिकल्स असतात, आणि या रसायनांमुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो. टोमॅटो आम्लधर्मी असण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. टोमॅटोमध्ये लायकोपीन, व्हिटॅमिन सी आणि ए यांचं प्रमाण चांगलं असल्यानं नियमित खाण्यास काहीच हरकत नसते.
मात्र जर अ‍ॅलर्जी असेल, किंवा अल्कलॉइड्सचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टोमॅटो खाऊ नयेत. एरवी कच्चे टोमॅटो खाल्ल्याने अपाय होत नाही.

<< मात्र जर अ‍ॅलर्जी असेल, किंवा अल्कलॉइड्सचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टोमॅटो खाऊ नयेत. एरवी कच्चे टोमॅटो खाल्ल्याने अपाय होत नाही >>
चिनूक्स, अनुमोदन.
अर्थात अति सर्वत्र वर्जयेत् हे तर आहेच!

कालच केले हे भरले टोमॅटो. दाबेली मसाल्यासोबत थोडा गोडा मसाला, लसूण ठेचून घातला. मटार नव्हते. ऐनवेळेला झटपट होणारी आणि आमटीशिवाय टोमॅटो न खाणार्‍या जातीच्या लोकांना आवडली, खास प्रयास न करता संपली हेच या पाककृतीचे यश! धन्यवाद मंजूडी.

Pages