बावन्नपानी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 October, 2012 - 23:24

"एऽ, त्यांच्यात ना बदामसातला सत्तीलावणी म्हणतात."
"हो! आणि गुलामचोरला गुल्लीदंडा, साताठला हातओढणी आणि बेरीज झब्बूला जपानी झब्बू म्हणतात."
"मग काय झालं? नावं वेगळी असली तरी खेळ तोच ना? चला! आपणही जाऊ त्यांच्यात खेळायला."
"एऽ, पण मला ते तीनपत्ती का काय ते येत नाही खेळायला."
"एऽ, तो मोठ्यांचा खेळ असतो. आपण हिम्याकाका नाहीतर परागकाकाला सांगू हळूचकिनी आपल्याला शिकवायला, काय?"

असे संवाद ऐकू आले म्हणजे जवळपास कोठेतरी पत्त्यांचा डाव रंगात आला आहे असे समजावे!

अगदी लहानपणापासून भिकार-सावकार, पाच-तीन-दोन, एकेरी झब्बू, गड्डा झब्बू, लॅडिज, मेंढीकोट, तीनशेचार, कॅनिस्ट्रा असे पत्त्यांचे वेगवेगळे खेळ तुम्ही नक्कीच खेळला असाल! बावन्न पत्त्यांच्या बावन्न तर्‍हा! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना गुंगवून ठेवणार्‍या, गप्पांचा व आठवणींचा अड्डा जमविणार्‍या! नव्या ओळखी घडविणार्‍या व जुन्या खुणा जपणार्‍या!

या बावन्न पत्त्यांचे खेळही प्रांतांगणिक बदलतात. जितका वेगळा, नावीन्यपूर्ण खेळ तितकी डोक्याला चालना! एकेका डावासरशी रंगत जाणारे नाट्य, हमरीतुमरी, हुज्जत, सरशी - हार .... दरवर्षी सुट्टीत, प्रवासात या खेळांमध्ये पडणारी भर...

Pune-52.png

१२/१२/१२ रोजी इंडियन मॅजिक आय प्रा. लि. आणि अरभाट निर्मिती प्रस्तुत 'पुणे ५२' हा चित्रपट प्रदर्शित होतोय.
एका गुप्तहेराची ही कथा.
पत्त्यांच्या खेळातले सारे डावपेच, सारी मजा या कथेतही आहे..

'पुणे ५२'च्या निमित्तानं तुमच्या परिचयाचे, आठवणीचे पत्त्यांचे खेळ इथे लिहूयात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माप्रा, मस्त विषय दिलायत. धन्यवाद. Happy

एकदम भारी भारी खेळ, आठवणी वाचायला मिळताहेत. :नॉस्टॅल्जिक झालेली बाहुली:

मस्त...

पत्ते खेळणं फक्त घरात झाल्याने, अन भावंडांमधे प्रचंड प्रमाणात भांडाभांडी होउन सगळ्यांच्या सोयीचे नियम बनत असल्याने पत्त्यांचे ऑथेंटीक नियम माहित नाहियेत.. पत्ते जवळपास गेल्या ७-८ वर्षात न खेळल्याने प्रत्येक प्रकार कसा खेळायचा हेही जास्त आठवत नाहिये.. आणि आता चुकुन एखादा डाव खेळला गेलाच तरी तो खेळायच्या आधी नियमांची उजळणी करुन मग खेळावा लागतो..

पण आमच्या हातात पत्ते वयाच्या साधारण ३-४थ्या वर्षीच आलेले.. काकांच्या मित्रमंडळींचे १ दिवस वापरुन झालेले (आमच्या दॄष्टीने नवेकोरे) कॅट्स मिळणं पर्वणी असायची.. नाहीतर कोपरे तुटलेले, कुठे कुठे घड्या पडलेले अन ३-४ वेगवेगळ्या डिझाइन असलेल्या कॅटमधुन बनवलेला एक ५२ पानांचा कॅट, अन त्या ५२ पानांतुनही एखादं हरवलं तर वहीच्या पुठ्ठ्यापासुन बनवलेलं ते पान असा एक कॅट आम्ही बरेच वर्ष वापरत होतो.. उन्हाळ्याचे २ महिने, अन दिवाळीचे २१ दिवस गावाला गेल्यावर आम्ही सर्व भावंडं एखादा खेळ चालु केला की तोच खेळत बसायचे..

लहानपणी सुरुवात झाली ती भिकार-सावकार पासुन.. नंतर त्यातली चित्राची पानं वेगळी काढुन त्यांच्या किमती ठरवुन खरोखरची सावकारगिरी करायला लागलो.. मग हळु हळु बदाम सात, झब्बु, पाच तीन दोन, सात आठ, रमी, मेंढीकोट, चॅलेंज अश्या कक्षा विस्तारत गेल्या.. हात ओढल्याचे, कोटांचे, रमीच्या पॉईट्स चे रेकॉर्ड ठेवणं वगैरे प्रकार कॉमन होते.. शक्यतो उन्हाळ्याची सुट्टी संपताना तेव्हाचे कोट दिवाळीत कॅरी फॉरवर्ड होउ नयेत याची काळजी घ्यावी लागायची.. दिवसरात्र आम्हाला पत्ते खेळुन बघताना कधी कधी घरचे चिडुन तो कॅट सरळ चुलीतही टाकायचे. बर्‍याचदा पत्ते खेळुन अंगणात झोपल्यावर बदाम, किल्वर, इस्पिक, चौकटचे आकार आकाशातल्या चांदण्यात दिसायचे.. झोपेत कधी कोणी पत्त्यांबद्दल बरळायचं.. गावाकडची भावंडं पुण्याला आल्यावर मात्र कधी कधी पहाटेपर्यंत पत्ते खेळत बसायचो (गावाकडे इतका वेळ जागुन पत्ते खेळता येणं शक्यच नव्हतं).. मोठे सुद्धा कधी कधी आमच्या खेळात सामील व्हायचे..

:नॉस्टॅल्जिक झालेली बाहुली:>>>>> +१००००००००००००००००

ठाण्यातल्याच कुणातरी नातेवाईकांकडुन शिकलेला कॅनेस्टा हा माझ्या सर्वात आठवणीत राहीलेला खेळ. धमाल यायची मार्क गोळा करताना. मंजुडे लिही बरे कॅनेस्टा बद्दल. Happy

माझा लेटेस्ट आवडता पत्यांचा खेळ-
पोकर

नोकिया फोनमधे याचा गेम होता, आधी काहीच झेपला नाही, पण खेळता खेळता नियम समजत गेले, आता बर्‍यापैकी जमतो. नियम टायपायला खूप आहेत, इच्छुकांनी विका (विकिपीडियावर पहा.)
पोकरच्या तुलनेत तीनपत्ती जास्त लक डिपेंडंट अन फिल्मी आहे.

आता ब्लॅकजॅक शिकायचा आहे.

इतर आवडणारे खेळ-
चॅलेंज, नॉटॅठोम, ३०४, भिकार सावकार, ५-३-२, ७-८, पेनल्टी...

@अगो
ती लॉटरी कन्सेप्ट आम्ही ३ जणात ३०४ खेळताना वापरायचो. शिवाय हुकुम बोलायच्या आधी लॉटरी घेतली तर कटाप करता येणार नाही, लास्ट हँड १० चढणे, उतरणे वगैरे नियमही होते...

अहाहा! काय त्या आठवणी चाळवल्या गेल्या...!!

नाटे-आटे-काटे-बटाटे-होम ... हा लहानपणीचा अत्यंत आवडीचा खेळ.
लॅडीस, ३०४चे अड्डे तर अजूनही बसवतो आम्ही.

जजमेण्टमधे सर्वात मजा म्हणजे हातात २-३ एक्के असतानाही शून्य हात बोलायचे Lol एक्के जाळायला जी मजा येते ती काय वर्णावी! शिवाय त्यातला नो-ट्रंप डावही धमाल घडवतो.

तसंच, आमच्या घरी झांबर्‍या हा डाव पण फेमस होता. नियम साधारण रमीसारखेच,
- कमीतकमी २ कॅट हवेतच, सिक्वेन्स खाली मांडायचे,
- इस्पिक राणीचा ठमठमाट (ती टाकायची नाही, सिक्वेन्समधेच वापरायची, तिला ५० मार्क, डावाच्या शेवटी हातात राहिली तर ५० मार्क वजा)
- सगळ्या दुर्र्या जोकर,
- १३-१३ पानं वाटल्यावर एक पान ओपन करून गठ्ठ्याच्या नॉन-प्लेयिंग साईडला ठेवून द्यायचं. ते ज्या रंगाचं असेल, त्या रंगाची तिर्री ही 'झांबर्‍या'. म्हणजे काय, तर तिचाही जोकरसारखा उपयोग करायचा सिक्वेन्समधे, पण ज्या पानाऐवजी रिप्लेसमेण्ट म्हणून ती वापरलीय, ते पान ओढून आलं, तर झांबर्‍या उचलून हातात घ्यायचा आणि त्याजागी ते पान लावायचं. झांबर्‍याला १०० मार्क.
- या डावाच्या तुलनेत रमी अगदीच एकसुरी वाटते.

शिवाय, एक 'बिजिक' म्हणूनही डाव खेळायची घरची मोठी मंडळी. ४ जणांच्यात ६ कॅट लागतात त्याला.

केपी Happy
पण कॅनिस्ट्रा मी पुण्यातच शिकलेय बरं का! Wink

कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त कितीही सम भिडूंमध्ये खेळता येतो हा खेळ. ह्यात दोन गट असतात, जे एकमेकांविरुद्ध खेळतात. आठ भिडू असतील पत्त्यांचे चार कॅट घेऊन खेळावे लागते. त्या कॅटमधले जोकर आणि कोरी पानंही घ्यायची कारण त्यालाही मार्क असतात. लाल तिर्रीला १०० मार्क असतात, काळ्या तिर्रीला शून्य! दुर्री हा जोकर असतो, त्याला ५० मार्क असतात. एक्का - २० मार्क, राजा ते दश्शी - १० मार्क, नश्शी ते चव्वी - ५ मार्क. चार कॅट पिसून प्रत्येकी १३ पानं वाटायची आणि उरलेली पानं गठ्ठा करून खाली ठेवायची. पत्ते वाटणार्‍याच्या उजवीकडून एकेकाची क्रमाने उतारी. लाल तिर्रीने डाव सुरू करता येतो. प्रत्येक गटातील एका भिडूकडे पानं मांडायची. लाल तिर्रीशिवाय बाकी पानं असतील तर उतारी करताना तीन पानांचा प्युअर सिक्वेन्स हवा. मग नंतर जोकर म्हणून कॅटमधल्या दुर्र्या/ जोकर/ कोरी पानं लावता येतात. कॅनिस्ट्रा पूर्ण करण्यासाठी उतारी केलेल्या पानांची बारा पानं व्हायला हवीत, म्हणजे राजे जमवले असतील तर बारा राजे हवेत, नाहीतर दहा राजे + दोन जोकर लावून कॅनिस्ट्रा पूर्ण करता येतो. बारा राजे झाले तर त्याला ५०० मार्क मिळतात, जोकर लावावे लागले तर ३०० मार्क मिळतात. कॅनिस्ट्रा पूर्ण झाल्याशिवाय डाव बंद करता येत नाही. जो गट डाव बंद करतो त्याच्या बाकी भिडूंच्या हातातल्या पानांचं पॉझिटिव्ह मार्किंग होतं तर विरुद्ध गटाचं निगेटिव्ह मार्किंग होतं. बँड ठरवून खेळले जाते उदा. पाच हजारी बँड, दहा हजारी बँड. ज्या गटाचे मार्क सर्वात आधी बँड पार करतील तो गट जिंकला.
हुश्य! Happy

बहुतेक समजेल असं लिहिलंय. खेळ प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजणं तसं कठीण आहे.

ललीने लिहिलाय तो खेळ कॅनिस्ट्रासारखाच वाटतोय. त्यांनी झांबरटपणे नाव बदललं असावं Proud

नॉस्टेल्जिक. Happy

पत्ते खेळताना घडलेला एक किस्सा.
मेंढीकोटचा डाव फार रंगात आलेला.
शेतात ४ म्हशी राखायला गेलेलो आम्ही ५ जण आणि बाकीचे म्हशी घेवुन आलेले सोबती कोंडाळ करुन बसलेलो.
आधी तर सगळी गुरं नजरेच्या टप्प्यात होती. नंतर कोणाचच लक्ष नव्हतं. Proud
त्यात घाट आणि कोकण जोडणार्‍या ठिकाणच गाव त्यामुळे शेती डोंगर उतारावरची.
उन्हाळ्याचे दिवस. सुर्य उशीरा मावळायचा. आणि कोणाकडेच नसलेल घड्याळ. त्यामूळे वेळ कळत नव्हता.
दुध घेवुन जाणारा टेम्पो गावात येवुन जायच्या आधीच म्हशीची धार काढुन दुध वेळेत डेअरीत पोच झालं पाहिजे हाच नियम. त्यामुळे म्हशीना पाण्यावर घालुन ५ च्या आत घरात हा आमचा नियम.

पण कहर झाला....
डाव लयी रंगात आलेला. आम्ही ना वेळेकडे लक्ष ना गुरांकडे.
खेळतच राहिलेलो. ५ च्या आत घरातचा नियम विसरलोच त्या नादात.
मग हळु हळु माइच्या (माझी चुलत मावशी) हाका यायल्या लागल्या. पाठोपाठ कोल्लापुरी शिव्या. Proud
ते ऐकुन आम्ही जागे होउन बघतोय तर गुरं गायब. अरा रा... मग जी काय हालत झालेली...
बरीच शेतं तुडवत तुडवत गेलेलो. शेवटच एक शेत होत तिथुन पुढे डायरेक्ट डोंगर उतरुन गेल की गाव यायच बोरीवडे. त्या शेतात एक म्हैस सापडली बाकीच्या म्हशी इतर दिशेला.
रस्त्यानेही आणि घरी गेल्यावरही गावरान कोल्लापुरी शब्दांचा मार निमुटपणे ऐकुन समोर आलेलं गुपचुप गिळुन वाकळत शिरलेलो.
पत्ते चुलीत गेलेले. Proud

मंजूडी, कॅनेस्ट्राची आमची व्हर्शनः

१. दुर्रीला २० मार्क तर प्युअर जोकरला (जोकरचे चित्र असलेल्या पानाला) ५० मार्क असतात.
२. पहिली उतारी करताना लागणारे मार्क संघाच्या आत्तापर्यंत जमलेल्या गुणांनुसार असतात. आणि त्या प्रमाणात वाट्ली जाणारी पाने पण वाढतातः
०-१४९०: ५०मार्कांची उतारी (प्रत्येकी वाटले जाणारे पत्ते १३)
१५०० - २९९०: ९०मार्कांची उतारी (प्रत्येकी वाटले जाणारे पत्ते १५)
३००० - ४९९०: १२०मार्कांची उतारी (प्रत्येकी वाटले जाणारे पत्ते १७)
५००० पासून पुढे: १५० मार्कांची उतारी (प्रत्येकी वाटले जाणारे पत्ते १९)

समजा तिसर्‍या डावानंतर अ-गट २००० आणि ब-गट ३५०० असे गुण असतील तर चौथ्या डावात प्रत्येक भिडूला १७ पाने वाटावीत. अ-गटाची पहिली उतारी कमीतकमी ९० मार्कांची आणि ब-गटाची पहिली उतारी १२० मार्कांची अशी झाली पाहिजे. तेवढे मार्क जमत नसतिल तर तो भिडू सगळी पाने हातात ठेवतो आणि उतारी पुढे सरकते.

३. कॅनेस्ट्रा १२ पानांऐवजी ७ पानांचाच धरतो.
४. प्रत्येक गटाला डावातली पहिली उतारी करताना एक तरी प्युअर ट्रायो लागतो (प्युअर ट्रायो = जोकर / दुर्री न घेता लावलेली ३ पाने - जसे ३ एक्के, ३ सत्त्या) प्युअर ट्रायो नसला तरीही उतारी पुढे सरकते.
५. प्रत्येक भिडूला उतारी करायची किमान एक संधी मिळाल्याशिवाय डाव बंद नाही करता येत. म्हणजे समजा एखाद्या भिडूची सगळी पाने लागणारी असतील पण अजून दोघे जण पहिल्यांदा खेळायचे बाकी असतील तर तो भिडू सगळी पाने लाउण डाव बंद करू शकत नाही.
६. जो गट डाव बंद करेल त्याचा त्या डावात एक तरी कॅनेस्ट्रा झाला असला पाहिजे.

पहिली उतारी करताना लागणारे मार्क संघाच्या आत्तापर्यंत जमलेल्या गुणांनुसार असतात>> हो बरोबर! हे लिहायचा मी कंटाळा केला Wink

आणि त्या प्रमाणात वाट्ली जाणारी पाने पण वाढतातः>> हे नसतं आमच्यात.

तेवढे मार्क जमत नसतिल तर तो भिडू सगळी पाने हातात ठेवतो आणि उतारी पुढे सरकते.>> हेही बरोबर.

कॅनेस्ट्रा १२ पानांऐवजी ७ पानांचाच धरतो.>> पण मग समजा चार किंवा जास्त कॅट असतील तर दोन्ही गटांना कॅनिस्ट्रा लागण्याची समान शक्यता असते ना? ते टाळण्यासाठी म्हणून आम्ही जितके कॅट त्या प्रमाणार कॅनिस्ट्राची पानं वाढवतो. म्हणजे पाच कॅट असतील १३+२ पानांचा कॅनिस्ट्रा असं.

प्युअर जोकरला (जोकरचे चित्र असलेल्या पानाला) ५० मार्क असतात>> हे बरोबर.

प्युअर ट्रायो नसला तरीही उतारी पुढे सरकते.>> हो बरोबर.

हिम्या,
थोपु ला कुलुप आहे रे हापिसात. अन घरी आल्यावर परत स्क्रीनसमोर नको...
आजच्या टाईम्स डील मधे पोकर सेट आलाय, १०,२०,५०,१००,५०० अन १००० च्या प्रत्येकी ५० चिप्स, २ कॅट्स, शफलर, डीलरबटन अन डाईस असं एका ब्रीफकेसमधे आहे... घेईन कदाचित...

बापरे हा कॅनिस्ट्रा लै गुंतागुंतीचा आणि डोकेबाज वाटतोय. मी खेळले होते कॅनिस्टर नावाचा खेळ त्यात मार्क साधारण असेच होते पण तसा बिन्डोक खेळ होता (म्हणूनच खेळता आला. Proud ). ह्ये प्रक्रन लै आवगड दिसतंय.

मामी, एकदा एका कौटुंबिक गटगनंतर हा खेळ मी, माझा नवरा, साबा, साबु, मामेसाबा आणि मामेसाबु असे सहा जण रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत खेळत होतो. मी त्यांच्यात लिंबूटिंबू, असे बाकीचे उस्ताद होते Wink

अवांतर - जसे not at home चे नॉटे ठोम झाले तसे can I start चे कॅनेस्ट्रा झाले.
>>>> अतिअवांतर : तसंच I spy वरून ऐसपैस आणि त्यावरून डब्बा ऐसपैस झालंय. Happy

काय सांगताय मामी! मला वाटलं डबा तुडवला की जागचा उडून दुसरीकडे पडतो त्याला डबा ऐसपैस होणे म्हणतात! Happy
आ.न.,
-गा.पै.

नमस्कार, मी मायबोली वर नवीन आहे. मराठीत "पत्त्यांचे खेळ" असे गुगल वर शोधल्यावर ही चर्चा सापडली. आम्हाला माहित असलेल्या एका पत्त्यांच्या खेळाचे सम्पूर्ण नियम आम्ही यु ट्यूब वर टाकले आहेत (मराठीतून) - व्हिडीओ ची लिंक https://www.youtube.com/watch?v=gKOqhO2-1q8

वरती बऱ्याच जणांनी काही जुन्या खेळांची नावे सांगितली आहेत. त्यातल्या एखाद्या खेळाच्या नियमांचा व्हिडीओ बनावा असे वाटत असल्यास कृपया सजेस्ट करा. आम्ही असा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद!

Pages