रणांगण

Submitted by हर्षल_चव्हाण on 23 October, 2012 - 08:07

--------------तारवटलेल्या डोळ्यांनी कृष्णा उठला. उठल्या-उठल्या; स्लीप मोडमध्ये असलेल्या लॅपटॉपला त्याने जागवले. काल रात्री ज्या मुलीच्या प्रोफाईल पेजवर होता, तिचा चेहेरा पाहून दिवसाची सुरुवात झाली. खरंतर, सुरूवात म्हणजे काही विशेष काम असं नव्हतंच. मुरली मनोहर काही करो अथवा न करो, सार्‍या जगाची चिंता तो मनोमन करून सर्व चिंतांचे हरण करतोच, अशी नागरीकांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेमुळे कृष्णाची मात्र पंचाईत झाली होती. नको त्या वयात; नको तो पराक्रम करून बसल्यामुळे योग्य त्या वयात; योग्य ते करतांना लोकापवादाची सारखी भिती बाळगत त्याला आता जगावं लागत होतं. सुरुवातीला अगदी छान-छान वाटलं खरं, पण नंतर नंतर त्याच-त्याच गोष्टींचा त्याला कंटाळा यायला लागला होता. कितीतरी वेळ मऊ मखमली गादीवर पडून रहावं, गोड-गोड स्वप्न पहावी आणि मनाला वाटेल तेव्हा राजवाड्याबाहेर पडून घोड्यावर बसून दूर रपेटीला जावं असं सारखं त्याच्या मनात यायचं.

"पण राज्यकारभार कोण पाहणार? जनतेची गार्‍हाणी कोण ऐकणार? त्यांचं आयुष्य सुखा-समाधानाचं व्हावं, राज्याची घडी नीट नांदावी; या सगळ्याची जबाबदारी कोण सांभाळणार? आपण आहोत म्हणून तर हे सगळे लोक निश्चिंत राहू शकतात. छे-छे, आपल्याला हे करायलाच हवं."

--------------असा विचार करता-करता, कृष्णाचं लक्ष दुसर्‍या टॅबवर गेलं. त्यावर क्लिक करून त्यानं पाहिलं ते... त्याने दीर्घ उसासा टाकला. गेल्या महिन्याभरापासून त्या बातमीनं त्याच्या कायम प्रसन्न असणार्‍या मनावर मळभ दाटवलं होतं. कशातही त्याचं मन लागत नव्हतं. खरंतर, आपल्या स्वप्नांचा आपल्यादेखत... देखत नाही; पण आपल्या कळत चुराडा होतोय आणि आपण काहीच करू शकत नाहिये याची जाणीव त्याला खात होती. राधाची गेल्याच महिन्यात एंगेजमेंट झाली होती. आणि ही बातमी त्याला; तिच्या प्रोफाईलवर तिने अपडेट केलेल्या फोटोंमार्फत झाली होती! कृष्णाला तिची एंगेजमेंट झाल्याचं इतकं दु:ख झालं नव्हतं, जितकं त्याला; तिने आपल्याला कळवलंसुद्धा नाही याचं वाईट वाटलं होतं.

"जिला आपण आपल्या आयुष्यातली सर्वात जवळची मैत्रीण मानत होतो, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करत होतो, त्या राधेनेच आपल्याला टाळावे? होऊ दे, मला काय? मी का स्वतःला त्रास करवून घेऊ? मी आपला सुखात आहेच! तिचं नशीब ती जाणे..."

--------------तिन्ही लोकांतून सॅटेलाईटसारखे फिरणारे नारदमुनी; कृष्ण अजुनही आपल्या महालातच बसलाय हे पाहून तिकडे वळले. महालाच्या बाहेर नारदमुनी आल्याचं कृष्णाला; "नारायण-नारायण"चा जप ऐकू येताच कळाले. परंतू आपल्या जागेवरून उठायच्या आत नारदमुनीच कृष्णाच्या बेडजवळ चेअर घेऊन बसले. जवळ येऊन बसताच, नारदमुनींनी कृष्णाला विचारले,

"कृष्णा, तब्येत बरी दिसत नाही? रात्रभर सारखा ऑनलाईन राहून तब्येत खराब नाही होणार, तर काय होईल? काय झालंय काय?"

"नारदा, तुला सार्‍या जगाच्या खबरी ठाऊक असतात. मग तुला न माहीती असे काय कारण असेल?"

"हम्म... पण मला जगाच्या चार गोष्टी ठाऊक असतात रे, त्यातली कुठली-कुठल्या वेळी बोलली गेली पाहिजे याचा नियम पाळावा लागतो. तेव्हा तुच आपलं उदास असण्याचं कारण सांगितलेलं बरं..."

"नारदा, जीव लागत नाही आजकाल राज्यकारभारात. सारखी तिची आठवण येते."

"कुणाची? यशोदामातेची?"

"राधेची रे... गेल्या महिन्यात तिची एंगेजमेंट झाली, पण साधा मेसेज नाही की मेल नाही! एवढी कशी निष्ठूर झाली रे ती? आणि मला न कळवण्याइतपत का परका आहे का मी? बरं, घाईघाईत झाली असेल, पण निदान दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी? ते ही नाही! खूप वाईट वाटलं रे. जेवणाची इच्छाच उडाली. एकमेकांना कधीही अंतर न देणारे, एकमेकांशिवाय जगण्याची कल्पनाही करू न शकणारे आम्ही, आणि... आणि या सगळ्याचा विचार करून करून डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली तरी आज-आतापर्यंत तिने मला सांगायचीसुद्धा तसदी घेतली नाही..."

--------------नारदांनी कृष्णाचे सारे इमोशनल म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्याही चेहेर्‍यावर गंभीर भाव होते. पहिल्यांदा हाच विषय आहे, असं समजून, नारदांनी सावधपणे बोलायला सुरूवात केली.

"कृष्णा, योग्य वेळी योग्य तेच करायला हवं!!!"

"म्हणजे?"

"राधेसोबत घालवलेला एकेक क्षण आठवून बघ. तुझ्यासाठी घरच्यांपासून चोरून आणलेला गाजराचा हलवा, तुझ्यासाठी आणलेली; तुला आवडलेली मोत्याचा सर असलेली बासरी, यमुनेच्या तीरावर भान हरपून तुझ्यासोबत कित्येक तास सारी कामं टाकून देऊन केवळ तुला सोबत करावी म्हणून बसलेली ती... तू मथुरेला निघाला तेव्हा समोर शांतपणे उभी राहिलेली पण गेल्यानंतर कुणाच्या नकळत घरात बसून अश्रू ढाळणारी... आणि तू? मथुरेला आल्यानंतर कंसवधापासून जो पुढे निघालास, तो मागे एकदाही वळून पाहिलं नाहीस..."

"पण नारदा, आम्ही दोघे कायम संपर्कात रहावं, म्हणून मी तिला पाठवलेला ३ जी मोबाईल तिनेच नाकारला."

"असं! म्हणजे तू लॅपटॉपवर चोवीस तास ऑनलाईन राहून जगातल्या सगळ्या सुंदर ललनांवर लाईन मारणार! आणि तिच्याशी मोबाईलवर बोलायला तुला वेळ मिळाला असता? ते ही दिवसभर राज्यकारभार आटोपून संध्याकाळी शयनगृहात पाऊल पडते न पडते तोच लॅपटॉपला चिकटायची सवय झालेल्या तुला? कृष्णा, तिचं तुझ्यावर जे प्रेम होतं, ते व्यक्त करायला तिला संधीच दिली नाहीस तू! कारण त्यावेळी तुला मुळी कळलंच नाही. किंवा मग तुला मुळी प्रेम नकोच होतं तिचं. साधी-सरळ राधा कुठे आणि हाय-फाय 'क्लास' मुली कुठे! असा समज घेऊन तु मथुरेत दाखल झालास, तेव्हाच मला याची कल्पना आली होती. स्वप्नांच्या मागे धावणारे, आणि स्वप्न पाहण्याच्या वेळी जागणारे; कसेकाय आपल्या स्वप्नांना खरे करतील? ऑनलाईन राहून प्रेम मिळत नसतं हे तुला राधेची एंगेजमेंट झाल्यावर कळलं असं वाटतंय... की अजुनही डोळे उघडले नाहीत म्हणायचे?"

"अरे, पण मलाही हे सर्व समजायला वेळ हवा होता रे... मी का जाणून-बुजून हे केले? आपल्या हातून होणार्‍या पराक्रमाची आकाशवाणी सोळा वर्षांपुर्वीच झाली आहे, हे मनात असलेल्या कुठल्याही तरूणाला शक्तीची-साम्राज्याची भुरळ पडणारंच ना! लोकांना कंसाच्या जाचातून सोडवणे हे ही चांगलंच काम ना? मग ते मी केल्यानंतर माझ्या माथ्यावर आलेला हा राजपदाचा मुकूट त्यागून मी कुठे जाणार होतो? आणि राधेबद्दल म्हणशील तर, तिचं माझ्यावर मैत्रीणीहून जास्त प्रेम आहे हे कळत असुनही, केवळ माझा गैरसमज नसावा; तर त्याबाबतीत दोघांच्या सहमतीनं ते व्हावं एवढीच माझी इच्छा होती. पण 'कालाय तस्मै नमः' म्हणून मी पुढे निघालो. जगातल्या सर्व सुंदर मुलींवर माझा हक्क आहे असं; मलाच काय, माझ्या वयाच्या कुठल्याही तरूणाला वाटतं! मग मी अपवाद कसा? "

--------------नारदांना; कृष्णाला नक्की काय सतावत होतं, ते हळुहळू ध्यानात आलं. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्याग करावी लागलेली गोष्ट, माणसाला; हवं ते मिळाल्यानंतर पुन्हा येऊन छळावी तसं राधेबद्दलचे विचार त्याला छळत असतील असं त्यांना वाटलं. परंतू, एकदा राधेची एंगेजमेंट झाल्यावर, ती कृष्णाच्या आयुष्यात परत येणं, ९९% अशक्य होतं. मग तरीही कृष्ण तिच्यासाठी तळमळतोय की अजून काही??? पुन्हा नारदांनी समजावणीच्या सुरात बोलायला सुरूवात केली.

"मान्य, कृष्णा मान्य! वयाचा दोष इतपर्यंत ठीक. पण मग आता तुला सर्व गोष्टी कळतात ना? मग एखाद्या कुमारवयातल्या पोरासारखं सारं काम सोडून देऊन, जबाबदार्‍यांना फाटा देऊन इथे महालात बसूनही कसं चालेल? आणि प्रेमाचं म्हणशील तर, तुझं राधेवरंच खरं प्रेम होतं असं असलं तरी आता ती कुणा दुसर्‍याची झालीये, तिने तुला कळवलं नाही या सत्याचा स्वीकार तुला का करता येत नाहीये? शेवटी हे सर्व झाल्यानंतर; you should move on! धर्मयुद्धातल्या रणांगणावर अर्जूनाला गीतोपदेश करणारा तू, स्वतःच प्रेमसंगरातला अर्जून होऊन का बसलायेस?"

"नारदा, या सगळ्या गोष्टींचा धागा इथेच संपत नाही; म्हणून कदाचीत मी गोंधळलोय..."

"म्हणजे?".

"आयुष्य ज्या ठिकाणी थांबल्यासारखं वाटतं, त्याचठिकाणी नशीब त्याची चाकं बदलवायला का घेतं याचाही विचार करून माझी ही अवस्था झालीये.".

"कशाबद्दल बोलतोयेस तू?".

"मीरेबद्दल...".

"आता ही मीरा कोण बाबा?".

"गेल्या महीनाभरात ऑनलाईन राहण्याची कमाई... म्हणजे रात्र-रात्र जागून मैत्रीचं रुपांतर भेटीत होण्याइतपत गोष्टी आल्यायेत. पण राधेचा विचार काही डोक्यातून जात नाही. ती जवळ नाही, आणि दुसर्‍या कुणाला आयुष्यात स्थान द्यावसं वाटत नाही. अर्थात, त्यातून लवकरच बाहेर पडायचं असेल तर...".

"पुरे, आलं लक्षात. म्हणजे, गोष्टी नितीमत्ता, तुझं स्टेटस, तुझ्या आयुष्याचं सार्वजनिक असणं आणि वैयक्तिक आयुष्याची होणारी घुसमट इथे येऊन थांबल्यात...".

"इतकंच नाही नारदा, मला तर या सर्व गोष्टींचाच कंटाळा आलाय. आपण कुणीतरी असामान्य आहोत हा युवावस्थेचा भ्रम होता असं मला आजकाल वाटायला लागलंय, आणि त्या अहंगंडाच्या सामर्थ्यामुळे आजपर्यंत जे पराक्रम झाले; त्याचा सारा महीमा माझ्यासाठी कधीच ओसरला आहे. मुळात मी एक सामान्य पुरूष असून मला माझं असं वैयक्तीक आयुष्य आहे आणि मला ते पुरेपूर उपभोगता यायला हवं असा एक विचारप्रवाह आता आतमध्ये उसळायला लागलाय. राजसभेत बसलो असतांना, रोजच्या त्याच त्याच केविलवाण्या कहाण्या, तेच तेच अन्याय करणारे मुर्दाड लोक आणि ते सहन करणारी बुळगी जनता यांचा विलाप ऐकून ओकायला होतं. आपलं आयुष्य असं कुणाच्या तरी कुबड्यांवर हाकणारी ही लोक आणि त्यांना सुखासमाधानानं जगण्यासाठी त्यांच्या कुबड्या मी होणं, आणि माझ्या खांद्यांवर अशा अगणित पंगूंचं ओझं मी का वहावं? असं वाटून तिथून पळूनही जावसं वाटतं. एका पक्षावर न्याय झाला की जयजयकार करणारी त्यांची लोक आणि प्रतिपक्षावर अन्याय झाला म्हणून माझ्या नावाने खडे फोडणारी दुसर्‍या पक्षाची लोक यांच्यामध्ये खरं कोण, खोटं कोण असा विचार करून, मी काही चूक तर केली नाही ना असं वाटायला लागून डोक्याच्या जागी एखादं भुईचक्र आहे आणि ते माझ्या सुदर्शन चक्राहून अधिक वेगानं फिरतंय असं वाटतं. हेच काय, अजूनही बरेच धागे हातात येतात ज्यांचे गुंते सोडवता सुटत नाही. आतमधल्या आतमध्ये ही खळबळ, आणि बाहेर; कुणी आपला हितशत्रू आहे जो आपल्या विरोधात गुप्त कारवाया करून आपल्याला तोंडघशी पाडण्याच्या तयारीत आहे असले संशय डोक्यात घालणारे मंत्रीगण, दुसर्‍या देशाचा राजा आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीत आहे असले गुप्तहेरांचे निरोप, आणि वर माझी देवाप्रमाणे भक्ती करणारी साधी भोळी लोक ज्यांच्या असंख्य आणि मलाही न उकलता येणार्‍या समस्या या सर्वांना टाकून देऊन मी कुठे जाऊ? नारदा, मी मी आहे, की नाही? मला माझं असं काही अस्तित्व आहे की नाही? ज्यांना मी माझे समजतो ते खरंच मला त्यांचं समजतात की नाही? आणि जे दाखवतात की मी त्यांचाच आहे, त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा? मुळात कुणी माझ्यावर विश्वास ठेवावा का? मी आज इथे आहे त्याच्या लायक आहे का? होतो का? असेल का? एक ना दोन, लाखो करोडो फूट खोल अशा गर्तेत मी रोज पडतो आणि रक्तबंबाळ होऊन महालात परत येतो. तेव्हा यासगळ्यांपासून मुक्ती मिळावी म्हणून मग हे ऑनलाईन राहणं, प्रेम शोधणं आणि राधेच्या विचारांपासून स्वतःला होणार्‍या त्रासापासून परावृत्त करणं..."

--------------हे मात्र नारदांना अनपेक्षीत होतं. कृष्णाच्या डोक्यात एकाचवेळी अनेक ज्वालामुखींचे स्फोट होत होते, परंतू त्या सर्वांचा उगम मात्र कुठेच दिसत नव्हता. राधा/मीरा ही तर त्याची वैयक्तीक बाब होती, परंतू राज्यकारभारातदेखील आजुबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट त्याला छळतेय हे मात्र त्यांना माहीत नव्हतं. राजा म्हणून या गोष्टींना सामोरं जावं लागेल याबद्दल कृष्णाने तक्रार करणे याचे त्यांना नवल वाटले. परंतू लगेचच त्यांना, पृथ्वीतलावर कृष्ण माणूस म्हणूनच जन्माला आलाय या सत्याची जाणीव झाली. आणि मर्त्य लोकांना पडणारे अनुत्तरीत प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठीचा त्यांचा आटापिटा स्वतः कृष्णही करतोय हे पाहून त्यांनाही मग परीस्थितीचा बोध झाला. आता त्यांना पृथ्वीतलावरच्या मर्त्य माणसाला समजवायचे होते. जे त्यांनाही जमेल असे वाटत नव्हते.

"कृष्णा, या सगळ्या प्रश्नांवर एका क्षणांत उत्तर मिळेल असं वाटतं तुला? मुळात, तुला प्रश्न काय पडतायेत, आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, आहे की नाही, असल्यास त्यांचा प्राधान्यक्रम आणि नसल्यास ते पडण्याचं कारण तरी काय? या सर्वांवर तू स्वतः विचार केलाच असशील ना?"

"म्हणजे काय, नारदा? अर्थातच! उलट विचार करून करून तर माझ्या डोक्याची मंडई झालीय हे काय तुला पुन्हा वेगळं सांगू का पुन्हा???"

"नाही, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय; की विचार करू नकोस!!!"

"सोपंय ना खूप असं बोलणं, नारदा??? पण मी अजुन स्वतःलाच ओळखू शकलोय असं मला तरी वाटत नाही, आणि जिथे मला स्वतःलाच पडणार्‍या प्रश्नांना न्याय्य उत्तरं देता येत नाही, तिथे दुनियेला मी न्याय काय देणार?"

"कृष्णा, हे प्रश्न मुळात तुझ्याकडे न्याय मागणारे नाहीत!"

"म्हणजे?"

"मुळात, हे प्रश्नच अस्तित्वात नाहीत. हे सारे आहेत ते तुझ्या मनाचे खेळ... तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुला वाटतं की वादळी असावा. इतका की त्या वादळापुढे दुनियेचा निभावही लागू नये, पण त्याच वादळाशी तू मात्र चार हात अगदी सहज करावे! एखादं वादळ असंही असावं की तुझ्या सर्व सामर्थ्याचा त्याच्याशी झगडतांना कस लागावा. पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सगळं कसं अगदी सुरळीत चाललंय. कुठेच कुणाची आडकाठी नाही, की कुणाची अरेरावी नाही. कुणी तुझ्याशी दोन हात करत नाही, की कुणी तुला चार बोल सुनावत नाही. कुठेच असं काही दृष्टीस येत नाही की जे तुला खटकावं. कुठेच असं कानी पडत नाही की ज्याने तुझ्या मेंदूला झिणझिण्या याव्या. या सार्‍या गोष्टींमध्ये कुठली गोष्ट एकमेव आहे, कृष्णा?"

"कुठली म्हणजे? एकही अशी गोष्ट जी माझ्या सामर्थ्याला आव्हान देईल अशी..."

"नाही, या सगळ्यात एकमेव गोष्ट आहे तू! सारं काही तुझ्याबाबतीतंच घडत नाहीये असं तुला वाटतं... म्हणजे, जगात अशा एक ना अनेक घटना कुठे ना कुठे घडतच असतात, ज्यांचा कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यावर काही ना काही परीणाम होतंच असतो. तुझ्या राज्यातही हे घडतंच आहे. पण या सगळ्यात तू स्वतःला पहात नाहीस. या सगळ्यांपासून कुठेतरी एकटा, भरकटलेला तू राहतोयेस म्हणून तुला हे सारे प्रश्न डोक्यात येतात."

"नारदा, संदर्भ समजला नाही. मला पडणारा प्रत्येक प्रश्न मी या सर्वांशी निगडीत आहे म्हणुनच पडतोय ना? मी इथला राजा आहे, मला इथल्या प्रजेचं पालनपोषण करायचंय, राज्य सुखाने चालवायचंय आणि राधा काय किंवा मीरा काय, यांच्याशी सुद्धा तितकंच समरसून रहायचंय."

"इथेच तर सारी गंमत आहे कृष्णा... जे जे गीतेत अर्जूनाला सांगितलंस, ते ते सर्व तुला लागू पडत नाही असा तुझा गैरसमज असेल, किंवा तू आता या क्षणाला कोण आहेस, काय आहेस हे विसरून जगू पाहतोय... कृष्णा, अरे आपण सगळे कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या गर्तेत सापडलेले अर्जूनच की! ज्यांना उपदेशाची गीता सांगणारा कुणीतरी कृष्ण भेटावा लागतो. पण, रणांगण तेवढं बदलंत राहतं..."

--------------इतकं बोलल्यानंतर नारद स्वतःच विचारांत गुंतल्यासारखे दिसू लागले. कृष्ण मात्र अजूनही गोंधळलेलाच होता.

"म्हणजे, मी कृष्ण असुनही, मला पडलेल्या प्रश्नांना उत्तर देणारा कृष्ण कुणी वेगळाच आहे असं?"

"असेलही... नसेलही!!!"

"नारदा, अरे असा अर्ध्यावर येऊन सोडू नकोस रे... आधीच मी या रोजरोजच्या गुर्‍हाळाला कंटाळालोय आणि..."

"कशाबद्दल बोलतोयेस कृष्णा?"

"म्हणजे, हेच आता इतक्या वेळ आपण जे बोलत होतो. राधा, मीरा, हा राज्यकारभार, मी इथला राजा आणि माझे प्रश्न... इतकं सगळं..."

"हम्म्म... मग? त्याचं काय?"

"अर्थात, या सगळ्यावर तुला काही उपाय सांगायचा नाही का?"

"उपाय एकच, लक्ष्यापासून ढळायचं नाही!"

"आणि?"

"नारायण, नारायण..." म्हणता म्हणता नारदमुनी अंतर्धान पावले.

--------------कृष्णाने डोके खाजवले. पण अर्थबोध होणे न होणे, यावर वेळ घालवत बसायला त्याला वेळ नव्हता. दिनचर्येला सुरूवात करण्याच्या उद्देश्याने, कृष्णाने लॅपटॉप बंद करून पुढच्या अपॉईंटमेंट्स बद्दल सेक्रेटरीला विचारण्यासाठी कॉल केला. आजच्या रणांगणावरसुद्धा, कृष्ण कालचेच प्रश्न घेऊन लढायला जाणार होता. वरती नारदांनासुद्धा डेली अपडेट्ससहीत, मर्त्यलोकांतल्या प्रत्येक माणसाला कुठल्या रणांगणावर नेऊन झुंजवायला हवं याची यादी करायला लावली गेली.
---------------------------------------------------------------------------------------------------
हर्षल (२३/१०/२०१२-दुपारी ४.१०)
---------------------------------------------------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मर्त्यलोकांतल्या प्रत्येक माणसाला कुठल्या रणांगणावर नेऊन झुंजवायला हवं" हि कल्पनाभन्न्नाट आहे राव!!!
कथा आवडेश!!!
मस्त!!!

सुरेख मांडणी........................