सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले

Submitted by बेफ़िकीर on 22 October, 2012 - 06:36

सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले
साधा माळा आवरला तर कसला होतो मूर्ख कळाले

उडलो पडलो झेलत गेलो दान जाहलो गिळला गेलो
राणीचा मी बाग भासलो भायखळ्यावर लुटला गेलो
मरीन लाइन फ्लोरा फौंटन विमानतळ अन् चर्नी रस्ता
ठिकठिकाणी ठरला गेलो जरुरीवरती म्हैंगा सस्ता

तेव्हा तो व्यापार जरा मी शिकलो असतो तर आयुष्या
विनाशिडीचाही मी चढलो असतो वर सरसर आयुष्या
अश्या फेकल्या असत्या कवड्या कोटींमध्ये खेळत असतो
उडवत असतो दुर्दैवाला संधींना मी झेलत असतो

पण सांगू का......??????

पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती
अब्जाअब्जाच्या भावांची लाखो नाती तुटली असती

चिंता नसती परवाच्या त्या जिवंत उरण्याच्या खर्चाची
चिंता असती 'कुणास सांगावे मी जिवंत आहे' याची

बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट बेफीजी

नॉस्टाल्जिया ........क्या बात !!मजा आली

या ओळी विषेश आवडल्या..........................
<<<उडवत असतो दुर्दैवाला संधींना मी झेलत असतो
<<<<पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती

चार मतले २ रूबाया दिसताहेत मला ह्या कवितेत(बरोबर आहे ना .. मी रुबाई असे जे म्हणतोय ते ??)

मस्त .........

बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते>> मस्त आवडले !

पण सांगू का......??????

पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती
अब्जाअब्जाच्या भावांची लाखो नाती तुटली असती

आह !....

जबरदस्त!

<<पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती
अब्जाअब्जाच्या भावांची लाखो नाती तुटली असती >>

बेफिकीर,जिंकलेत!
अतिशय भावमधुर कविता, आत्मप्रत्यय देणारी.माळ्याचा उल्लेख थेट भूतकाळात नेणारा.

<<बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते >>

सुनीत सदृश रचना वाटली. प्रत्येक ओळ आशयबहुल.अभिनंदन.

लिहिलेल्या कवितेवर आलेल्या प्रतिसादांना धन्यवाद द्यायला वेळ लागला प्रमोद राव.

तुम्ही मनापासून लावलेली चाल मला आवडली व त्या गीतरुपाचा शेवटही भावनिक झाला याचे समाधानही मिळाले.

तुमच्या या इनिशिएटिव्हमुळे पुढे खासकरून काही कविता व्हायला लागतील असे म्हणावेसे वाटत आहे.

सर्व प्रतिसाददात्यांचे व विशेषतः दक्षिणा (तसेच निवडक दहात घेणारा अजून एक सदस्य) आणि श्री प्रमोद देव यांचे मनापासून आभार!

-'बेफिकीर'!

बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते

ह्या निरागस ओळी फार आवडल्या.