शत जन्म शोधिताना.. अर्थ आणि रसग्रहण

Submitted by श्रीयू on 19 October, 2012 - 16:23

शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील मान्यवरांनी कृपया या कवितेचा अर्थ,संदर्भ,रसग्रहण इथे लिहावे. शिवाय या कवितेवरील माहिती, इतर संदर्भ, मान्यवर कवी/लेखकांनी केलेले रसग्रहण इथे टाकल्यास स्वागतच..

शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या ||
तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी |
सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी ||
हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी |
क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी ||

कवी: स्वातंत्र्यवीर सावरकर
नाटक: सन्यस्तखड्ग

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, मी-भास्कर,
तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. मी फक्त 'काव्या'चा अर्थ लावायचा प्रयत्न केलाय. नाटकाच्या अनुषंगाने आणि ते सावरकरांचे नाटक असल्याने केवळ 'प्रियकर-प्रेयसी' हा पैलू नक्कीच नसेल.
सुमेधा-व्ही- तुमच्याकडे असलेले नाटक तुम्हाला लवकर मिळो आणि ह्या गीताच्या पार्श्वभूमीबद्दल सगळ्यांनाच अजून माहिती मिळो Happy

आर्ति ह्या शब्दार्थाबद्दल अजून शोध घेतला पाहिजे. संस्कृतात तो 'दु:ख' ह्या अर्थानेच येतो.
पण मराठीत 'प्रबळ इच्छा' असा त्याचा अर्थ झालेला दिसतो. हे अर्थांतर कसे झाले असावे? रोचक विषय आहे खरा!

चैतन्य, माझ्याकडे मोल्सवर्थची डिक्शनरी आहे. १८५७ मध्ये ही प्रथम छापली गेली. इंग्रज अधिका-यांना मराठी कळावी म्हणू. त्यात आर्ति चा अर्थ आंतरिक इच्छा असाही दिलाय. तेव्हा एकोणिसाव्या शतकात या अर्थानेही तो शब्द वापरला जात होता.
सुमेधा, लवकर शोध गं Happy मलाही उत्सुकता लागलीय. प्लिज त्यात या काव्याचे साल दिले असेल तर तेही सांगशील ? किंवा मग नाटकाचे. धन्यवाद.

भारती बिर्जे डि... | 20 October, 2012 - 23:42
>>
आकाशस्थ ग्रहतार्‍यांचे सावरकरीय आकर्षण त्यांच्या अजून एका कवितेत प्रकटलेय
ऐश्वर्ये भारी या अशा ऐश्वर्ये भारी
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी
या कवितेतही असेच विराट रूपक असल्याचे स्मरते. कविता आत्ता मिळत नाहीय..<<

'जगन्नाथाचा रथोत्सव' या त्यांच्या अंदमानात केलेल्या कवितेच्या सुरुवातीच्या या ओळि आहेत. ठळक केलेली ओळ पालुपदासारखे आहे.
संदर्भ - मूर्ति दुजी ती (सावरकरांच्या निवडक कविता)- लेखक डॉ ना म जोशी यांच्या या पुस्तकात ही कविता आहे. आणि या कवितेबद्दल लेखकाने साहित्यिक भाषेत खूप खूप गौरवाने लिहिले आहे.
आपल्याला हवे असते ती कविता समजाऊन सांगणारे रसग्रहण. ते मात्र त्यात नाही. हा धागा ज्या काव्याविषयी आहे त्यात हे अवांतर होईल म्हणुन संपूर्ण कविता टाकत नाही.
'सावरकरांच्या कविता' मला वाटते कि बुकगंगा .कॉम वर फ्रि डाउन्लोड साठि उपलब्ध आहेत. शोधून त्याची लिंक टाकेन.

.

सगळेच प्रतिसाद माहितीपूर्ण.. खूप आभार.

सर्किट तुमच्या रसग्रहणाच्या प्रतीक्षेत..

अवल,चैतन्य तुम्ही लिहिलेले अर्थ खूप छान आहेत... धन्यवाद !

खूप अर्थघन चर्चा कारण चर्चा विषयच जोरदार.
आभार श्रीयू, मी भास्कर, काही मुद्द्यांच्या ग्राह्यते साठी.
चैतन्य, अवल, छान रसग्रहण.
महामानवाच्या मनाचा वेध घेणे म्हणजे महासागराचा तळ शोधणे. चित्तथरारक.
मी भास्कर, ती कविता शोधून काढेन आता.

सर्किट ह्यांनी दिलेल्या लिंकवरील पीडीएफ सलग वाचतोय कालपासून. आज पानक्र. ५८ वाचले आणि गाण्याची पार्श्वभूमी स्पष्ट झाली.
---
शाक्य राज्याचा सेनापती 'वल्लभ' हा शेजारील कोसल राज्याने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून समरांगणात उतरतो. त्याच्या नुकतेच आधी वल्लभाच्या घरी तो आणि त्याची पत्नी यांच्यातला वाक्प्रणय नाटकात दाखविला आहे. त्यांचा संवाद चालू असतानाच एक दासी येऊन 'महाराजांनी त्वरेने बोलावले आहे' असे सांगते आणि वल्लभ तातडीने जायला निघतो. तेव्हा त्याची पत्नी सुलोचना त्याला म्हणते की मी तुम्हाला हासत निरोप देणार नाही, नाही तर तुम्ही घरी लवकर यायचा विचारच करणार नाही. पण तुम्ही तुमचे काम संपवून लगेचच घरी परत आलात तर मात्र हसतमुखाने सामोरी येईन.
परंतु वल्लभ राजसभेत जातो तेव्हा त्याला असे समजते की शेजारच्या कोसल राजाने आपल्या राज्यावर हल्ला केलाय आणि जवळपास अर्धे राज्य त्याच्या सैन्याने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्वरेने समरांगणात उतरणे भाग आहे असे जाणून तो सुलोचनेला ही बातमी देण्यासाठी एक दूत घरी पाठवतो. रणात शौर्य गाजवीत असलेल्या वल्लभास शत्रुसैन्य पकडते आणि ही बातमी सुलोचनेला तिच्या एका सखीकडून समजते. तेव्हा सुलोचना तिला म्हणते की मी ह्यांना जाताना हसतमुखाने निरोपही दिला नाही. कदाचित ती आमची शेवटची भेटही ठरू शकेल आणि मी अशी रुसव्याने त्यांच्याशी वागले. आणि तेव्हा तिच्या तोंडी हे 'शतजन्म' शोधिताना हे पद आहे.
त्यामुळे वरवर पाहता हे नायक्/नायिका यांच्यातल्या विरहाचेच गीत आहे, परंतू संपूर्ण नाटकाचा विचार करता ते केवळ त्या पातळीवर राहात नाही.
बुद्धाच्या प्रभावाने अनेक राजांनी आणि राजपुत्रांनी संन्यास धारण केला. संन्यासात कृषीसंन्यास (शेती न करणे), कामिनीसंन्यास (स्त्रीसंग न करणे) आणि कृपाणसंन्यास (शस्त्र हाती न घेणे) ही तीन आत्यंतिक कसोशीने पाळली जातात. त्यातील पहिले दोन संन्यास एकवेळ परव|डले परंतु शस्त्रसंन्यास हा राष्ट्राच्या दृष्टीने किती अहितकारक आहे हे या नाटकात पदोपदी अनेक उदाहरणांनी आणि संवादांनी पटवून दिले आहे.
ह्या गीताआधी सुलोचनेला तिची सखी म्हणते की शूरासारखा संन्यस्त आणि इंद्रियजयी कोणीच नसेल. तेव्हा सुलोचनेच्या तोंडचे संवाद केवळ अप्रतिम आहेत.
सर्किट, तुमच्या रसग्रहणाच्या प्रतीक्षेत आहे.

श्रीयू | 23 October, 2012 - 00:05
'बुध्याची धरिले करी हे वाण सतीचे' म्हणणारा हा महानायक आहे.<<
ते असे आहे
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे
'बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे'

केवळ केवळ अप्रतिम चर्चा... सावरकरांच्या शब्दाशब्दांवर जीव ओवाळून टाकावा असं वाटतच वाटतं... पण तुमच्यासारखे त्या साठी जिवाचा आटापिटा करणारे बघितले की वाटतं...
... आर्ति व्यर्थं नाहीच.
तुम्हा सगळ्यांना माझे लाख सलाम.

ऑनलाईन पीडीएफ साठी धन्यवाद सर्कीट व भास्कर. रसग्रहण केवळ अप्रतिम. सर्वांचे आभार.
अवांतर्..हे पुस्तक सोडून बाकी सर्व सापडली Happy

तुमच्यासारखे त्या साठी जिवाचा आटापिटा करणारे बघितले की वाटतं...
... आर्ति व्यर्थं नाहीच.
तुम्हा सगळ्यांना माझे लाख सलाम.>>> +१

तुमच्यासारखे त्या साठी जिवाचा आटापिटा करणारे बघितले की वाटतं...
... आर्ति व्यर्थं नाहीच.
तुम्हा सगळ्यांना माझे लाख सलाम.>>> दादला मनापासून अनुमोदन Happy

मी-भास्कर: चूक निदर्शनास आणल्याबद्दल आभार ! ही कविता मला अशीच पाठ झालीये. चुकीची आहे हे कधी कळलेच नाही. Sad
तरी आभार.
अवलः आर्ति शब्दाच्या व्युत्पती बद्दल आणखीन माहिती कळू शकेल का?

आर्ति = (S) Pain or affliction. 2. Earnest desire असे दोन अर्थ दिलेत मोल्सवर्थने Happy

संस्कृतात तरी 'आर्ति' ह्या शब्दाचा अर्थ 'दु:ख' असाच होतो.
उदा-
न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवम्
कामये दु:खतप्तानां प्राणिनाम् आर्तिनाशनम् ||
(मला राज्य नको, स्वर्ग नको आणि मोक्षही नको. मला केवळ दु:खी लोकांचे दु:ख नाहीसे करायची इच्छा आहे)

मोनेअर विल्यम्स च्या डिक्शनरीमध्येही 'आर्ति' शब्दाचा तोच अर्थ दिलेला दिसून येतो.
त्यावरून, (माझा) असा अंदाज आहे की संस्कृतातला 'आर्ति' (दु:ख) हा मराठीत 'आंतरिक इच्छा झाला असावा. हा अंदाज चुकीचाही असू शकेल, पण शब्दार्थात असे बदल होत राहतात.
एका संस्कृत-संबंधी सेमिनारमध्ये 'गर्त' ह्या शब्दाचा अर्थ वेदांमध्ये '(मचाणासारखी) उंच जागा' असा होता परंतु व्यावहारिक संस्कृतात (आणि मराठितही) तोच अर्थ 'खड्डा' असा झाला ह्याबद्दल एका मुलीने शोधनिबंध वाचला होता. (त्यावेळच्या परीक्षकांनी, 'बरं, हा अर्थ-बदल झाला खरा, पण तो कसा झाला असावा? ह्याचा शोध घेतलात का'? असा प्रश्न त्या मुलीस विचारला होता...खोड म्हणून नव्हे तर अभ्यास कोणत्या दृष्टिकोणातून व्हायला हवा हे कळावे म्हणून.)
'आर्ति' या शब्दाबद्दलही असाच शोध घेतला पाहिजे.

मोल्स्वर्थची ही डिक्शनरी १९७५ साली पुनर्पकाशित झाली तेव्हा लक्ष्मणशात्री जोशींनी याला फॉर्वर्ड लिहिले होते अन न. चिं. केळकरांनी प्रस्तावना लिहिली होती. सर्किट, जरूर वाचा Happy
चैतन्य पटतेय तुझे. तू म्हणतोयस तसाच अपभ्रंश झाला असावा.
जुनी पुस्तके चाळताना आर्त, आर्ति, आर्तता हे शब्द आले की लक्ष ठेऊन वाचले पाहिजे. नवी काही मिळाले तर इथे लिहूच Happy

चैतन्य, त्या काळात इंग्रजांच्या सेन्सॉरशिपमूळे थेट स्वातंत्र्याच्या प्रचार करणारी नाटके लिहिणे वा सादर करणे शक्यच नव्हते. म्हणून सावरकरांची नाटके आणि पदे, त्या नजरेने बघायला पाहिजेत.

परवशता पाश दैवे... हे अगदी थेट पद म्हणावे लागेल !

@श्रीयु
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका काव्याच्या अर्थ आणि रसग्रहण यासाठी फार उत्तम धागा काढलात याबद्दल हार्दिक धन्यवाद. असे कांही वाचायला मिळावे अशी फार इच्छा होती. अजून या काव्याचे संपूर्ण रसग्रहण कोणीना कोणी येथे देईल अशी अपेक्षा आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी एका मित्राच्या आग्रहावरून श्री विनय हर्डिकर यांचे 'ज्वाला, समिधा आणि फुले' हे सावरकरांच्या काव्यावर आधारित व्याख्यान ऐकले. दीड तास कसा गेला ते कळलेच नाही.
सावरकरांच्या काव्यातल्या संस्कृत्-प्रचूरतेमुळे काव्याचा अर्थ कळणे जरा जडच जायचे मग त्यातील अर्थ्-गर्भता कळणे तर दूरच. पण या भाषणानंतर वाटायला लागले की या अडचणींमधून मार्ग काढून आणि असे रसग्रहण करणारे असतांना जर ते समजाऊन घेतले नाही तर आपण निव्वळ 'करंटे'च!
तेव्हांपासून याच्या शोधात मी होतो. त्याच दरम्यान मी माबोवर वाचू लागलो. विजय कुलकर्णी यांचा सावरकरांवरील लेख त्यावेळी गाजत होता. तो लेख, आणी नंतर अक्षय जोग, दामोदरसुत अशांचे लेख वाचून माझी ही इच्छा आणखीच वाढली. ती अशा धाग्यांमुळे पुरी होण्याची आशा वाटते.

Pages