आपल्याला आयुष्यभर आनंद देणार्या या भारतीय चित्रपटसृष्टीला, तिला आकार देणार्या सार्या तंत्रज्ञांना आणि तिच्या द्रष्ट्या जनकाला सलाम करण्यासाठी, भारतीय चित्रपटसृष्टीचं शतकमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरं करण्यासाठी मायबोली.कॉमवर आपण आयोजित करत आहोत गाथाचित्रशती लेखनस्पर्धा!!!
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेसाठीचे विषय आहेत -
१. माझी आवड / आठवण - या विषयांतर्गत तुम्हांला तुमच्या आवडत्या / आठवणीतल्या / एखाद्या खास आठवणीशी निगडित असलेल्या चित्रपटाबद्दल / चित्रपटांबद्दल, चित्रपटातल्या प्रसंगाबद्दल, आवडत्या / उल्लेखनीय वाटत असलेल्या कलावंताबद्दल, दिग्दर्शक, गायक - गायिका, संगीतकार, गीतकार, संकलक, ध्वनिमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, कलादिग्दर्शक, रंगभूषाकार, वेशभूषाकार, संगीतसंयोजक, वादक, निर्माता अशा तंत्रज्ञांबद्दल, आणि त्यांच्या कामाबद्दल, चित्रपटसमीक्षकाबद्दल, चित्रपटविषयक पुस्तकाबद्दल किंवा कार्यक्रमाबद्दल, आवडत्या चित्रपटगृहाबद्दल किंवा चित्रपट या माध्यमाबद्दल, किंवा एखाद्या चित्रपटानं तुमच्यावर काय परिणाम केला, याबद्दल लिहिता येईल.
हा विषय केवळ भारतात तयार झालेल्या, भारतीय भाषांमधल्या चित्रपटांपुरता व भारतीय कलाकार - तंत्रज्ञांपुरताच मर्यादित आहे.
२. गेल्या शंभर वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत झालेले बदल - गेल्या शंभर वर्षांत भारतातल्या चित्रपटनिर्मितीचं तंत्र, भारतीय चित्रपटांतल्या प्रतिमा, त्यांतली सामाजिकता यांत अनेक बदल होत गेले. उदाहरणार्थ, संगीताचं, संगीतसंयोजनाचं, ध्वनिमुद्रणाचं तंत्र बदललं. कॅमेरे आधुनिक झाले, पूर्वी चित्रपट बघायला टूरिंग टॉकिजं होती, आता घरबसल्या चित्रपट पाहिले जाऊ लागले. चित्रपटातल्या खलनायकाचं, आईचं रूप बदललं. चित्रपटात समाजाचं वास्तव दिसतं का, किंवा समाजावर चित्रपटांचा परिणाम होतो का, ही उत्तरं शोधणं कठीण झालं कारण समाज आणि चित्रपट यांचा संबंध शोधणं गुंतागुंतीचं झालं. तुम्हांला महत्त्वाच्या वाटणार्या, चित्रपटांशी संबंधित असलेल्या, गेल्या शंभर वर्षांतल्या, किंवा त्यातल्या एखाद्या विशिष्ट कालखंडात झालेल्या अशा बदलाबद्दल, किंवा बदलांबद्दल, तुम्ही या विषयांतर्गत लिहिणं अपेक्षित आहे.
३. माझ्या अपेक्षेतला मराठी चित्रपट
वर दिलेल्या प्रत्येक विषयाला अनुसरून स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांपैकी प्रत्येकी तीन स्पर्धक विजेते म्हणून निवडले जातील.
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंट प्रा. लि., मुंबई, यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.
पहिलं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे तीन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी
दुसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दोन पुस्तकं आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटांच्या दोन सीडी / डीव्हीडी
तिसरं बक्षीस - मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे एक पुस्तक आणि एव्हरेस्ट एण्टरटेनमेंटतर्फे मराठी चित्रपटाची एक सीडी / डीव्हीडी
स्पर्धेचं स्वरूप -
१. या स्पर्धेसाठी 'गाथाचित्रशती लेखनस्पर्धा' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०१२, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.
तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.
२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, सत्यजित रे यांच्या ’पथेर पांचाली’ या चित्रपटाबद्दल लिहिणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - विषय क्र. १ - ’पथेर पांचाली’ - असं असावं. 'अशोककुमार ते शाहरुख खान' हा लेखनाचा विषय असेल, तर धाग्याचं शीर्षक ' विषय क्र. २ - 'अशोककुमार ते शाहरुख खान' असं असावं.
३. स्पर्धेचा निकाल मायबोली गणेशोत्सवातील स्पर्धांच्या निकालाबरोबर जाहीर केला जाईल.
नियम व अटी -
१. गाथाचित्रशती लेखनस्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.
२. प्रत्येक स्पर्धक तीनही विषयांसाठी लेख पाठवू शकतो.
३. प्रत्येक स्पर्धकाला लेखनस्पर्धेच्या पहिल्या दोन विषयांसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवता येतील. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
स्पर्धेतल्या तिसर्या विषयासाठी मात्र प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल.
४. लेखनस्पर्धेसाठीचे विषय केवळ भारतीय भाषांमधील व भारतात तयार झालेल्या चित्रपटांपुरते मर्यादित आहेत. परदेशी व परभाषीय चित्रपटांविषयी, कलाकारांविषयी अथवा तंत्रज्ञांविषयी केल्या गेलेल्या लेखनाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
५. लेखनासाठी शब्दमर्यादेचं बंधन नाही.
६. लेखन स्वतंत्र असावं, व ते पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
७. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्र वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.
लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे दुवे कृपया देऊ नयेत.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
९. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.
या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर व गणेश मतकरी हे चित्रसृष्टीतील मान्यवर.
गाथाचित्रशती लेखनस्पर्धेच्या परीक्षकांविषयीच्या व प्रायोजकांविषयीच्या अधिक माहितीसाठी कृपया हा धागा पाहा.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला सर्व मायबोलीकर भरघोस प्रतिसाद देतील, अशी खात्री आहे.
सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था.. आजभी है और कल भी रहेगा...
प्रत्येक भारतीयाच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग बनलेल्या भारतीय सिनेमानं यंदा शंभरी गाठली आहे; तेव्हा त्याच्याबद्दलची भावना व्यक्त करायला त्यातल्याच या गाण्याइतकं चपखल दुसरं काय असणार?
.. कधीतरी लहानपणी सिनेमाच्या अद्भुत जगाशी आपली ओळख होते. नायक, नायिका, खलनायक, खलनायिका अशा ठळक गोष्टींपासून सुरुवात होऊन मग हळूहळू बर्याच गोष्टी कळू लागतात. 'सिनेमात दाखवतात ते खोटं असतं, खरं नाही..' ही ज्ञानप्राप्ती होते आणि 'शोलेमध्ये अमिताभ मरतो, मग हेराफेरीमध्ये परत कसा येतो?' असे प्रश्न पडेनासे होतात. पुढे शाळेतल्या मित्रमैत्रिणींना काल पाहिलेल्या सिनेमाची कथा संवाद, पार्श्वसंगीतासकट सांगता येऊ लागते. सिनेमातली गाणी आवडू लागतात, गुणगुणता येऊ लागतात, गाण्यांच्या भेंड्या खेळणं जमायला लागतं. सिनेमा हळूहळू आपल्या मनात त्याची हक्काची जागा तयार करू लागतो. मग कॉलेजऑफिस बुडवून फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं ही मूलभूत गरज बनते. बघताबघता चित्रपट आपलं आयुष्यच व्यापून टाकतो.
रात्री जागून 'गुंडा' चारशे बत्तिसाव्यांदा बघून सकाळी पिफ, मामि किंवा इफ्फीत चित्रपट बघण्यासाठी रांगेत उभं राहणं, गॉगल उडवणारा सुपरस्टार पडद्यावर आला की पडद्यावर पैसे उधळणं, आपल्या आवडत्या नटनट्यांची मंदिरं बांधणं, पोटाच्या आजारानं त्रस्त असलेल्या नायकाला बरं वाटावं म्हणून यज्ञ करणं, वीरपन्ननं हिरोचं अपहरण केल्यावर बस पेटवत सुटणं, राज कपूर, दारा सिंग, शम्मी कपूर, राजेश खन्ना गेल्यावर आपल्या घरातलं जिवाभावाचं कुणी जावं असं रडणं, लता-आशा-रफी-किशोर यांचे आवाज तासातासाला कानी पडले तरी त्या आवाजाशी नातं जोडलेली कुठलीशी आठवण येणं या गोष्टींचं मग अप्रूप वाटेनासं होतं.
धुंडिराज गोविंद फाळके यांची ही सारी पुण्याई. ३ मे, १९१३ रोजी त्यांनी अथक परिश्रमांनी तयार केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात झळकला. फाळक्यांच्या हलत्या चित्रांना सुरुवातीला काही घाबरले खरे, अनेकांना ती भुताटकीही वाटली, पण बघताबघता फाळक्यांच्या कधीही खोटं न बोलणार्या राजाच्या गोष्टीनं सार्यांना वश केलं. भारतीय चित्रपटसृष्टीची ही सुरुवात. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी झालेली.
फाळक्यांची फॅक्टरी ते रामगोपाल वर्माची फॅक्टरी असा हा केवढा विलक्षण प्रवास. टूरिंग टॉकीज, एकपडदा चित्रपटगृहं ते आलिशान मल्टिप्लेक्स. छोटा चेतन ते रा.वन. रुस्तम सोहराब, आन, मुघल-इ-आझमसारखे भव्य, दिमाखदार चित्रपट. तमीळ चित्रपटसृष्टीने पाहिलेला एमजीआर ते रजनीकांतपर्यंतचा काळ. बंगाली सिनेसृष्टी आणि सत्यजित राय. मातीशी नातं टिकवून ठेवणारे मलयाळम चित्रपट. 'लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखांपासून तुमच्याआमच्यासारख्या माणसांचं दर्शन घडवणारे चित्रपट. द्वयर्थी चावट विनोद, पुराणकथा, रहस्य, थरार, भुतं-आत्मे, पुनर्जन्म, बाँबस्फोट, अतिरेकी हल्ले, राजकारण, माणसांतली नाती आणि नात्यांतली गुंतागुंत, मानवी मनोव्यापार असे असंख्य विषय हाताळणारे चित्रपट.
-------
संयोजकः इन्ना, महागुरू, मवा, मृण्मयी, चिनूक्स
हा विषयच काहीसा गोंधळात
हा विषयच काहीसा गोंधळात टाकणारा आहे.टायटलवरून तरी गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाचा स्वतःच्या नजरेतून घ्यावयाचा धांडोळा आहे असे वाटते. गेल्या शम्भर वर्षात झालेले बदल टिपायचे म्हणजे गेल्या १०० वर्षापासून तुम्ही सतत सिनेमे पहायला पाहिजेत. ते शक्यच नाही. किंवा गेल्या १०० वर्षात निर्मान झालेले प्रातिनिधिक सिनेमे तरी पाह्यला पाहिजेत. मायबोलीकरांचे अॅवरेज वय ३० असावे.म्हनजे किमान २५ वर्षापासूनचे सिनेमे त्यानी पाहिलेले असावेत. (जे लेख आलेत त्यात ज्यांच्या आठवणी,वर्णने आहेत तेही १९८०-८५ पासूनच सुरू होतात.). त्यात जुने चित्रपट पहायला आताशा फारसे फोरम नसावेत्/नाहीत. म्हणजे असे की पूर्वी मॅटिनी शो असत त्यात जुने(च) चित्रपट असत. मागच्या पिढ्यांतले चित्र्प्ट पहायची ती एक सोय असे. हल्ली जुने चित्रपट पहायलाच मिळत नाहीत. तशा व्हीसीडी डीव्हीडी अल्प किमतीत जुन्या चित्रपटांच्या उपलब्ध आहेत. पन त्या घेऊन आवर्जून पाहणारे फारसे कोणी दिसत नाही. त्यामुळे वाहते बदल कोण आणि कसे टिपणार? टीव्ही वर कुठे लागलाच तर तो पाहणे एक शिक्षाच असते. एक तर जाहिराती दुसरे टीव्हीवरचा पिक्चर पाहणे हा 'साईड बिझिनेस' असतो. जेवणे, पाव्हणे, आंघोळी,मोबाईल्स्,'अहो ऐकलत का? ' या वाक्यानंतर येणारे रसभंग करणारे 'आदेश", यामुळे पिक्चर पाहणे ही पॅशन, व्रत, साधना राहिलेले नाही (हा १०० वर्षातला बदल म्हणावा काय?). अन्यथा माझ्या लहानपणापासून झालेले बदल म्हनणे उत्तम. असो. नाहीतर ते मग इतर कोठे तरी वाचून इथे त्यातले मुद्दे कट पेस्ट करून लिहिणे क्रमप्राप्त. त्यामुळे बहुतेक सर्व लेखात स्वतःचे गतकालातले अनुभव कथनच दिसून येतेय. इतिहास म्हणून मागोवा दिसत नाही.
त्यामुळे टायटलवरून नक्की काय अपेक्षित आहे ते समजत नाही व बहुसंख्य लेखने भरकटत आहेत.
हे लेख लिहिणे म्हणजे गायीचा
हे लेख लिहिणे म्हणजे गायीचा निबंध लिहिण्यासारखे आहे..
चिनूक्स.. बघतो मला जमतं का
चिनूक्स..
बघतो मला जमतं का ते.
एखाद्या गाण्याबद्दल अथवा
एखाद्या गाण्याबद्दल अथवा सीनबद्दल आठवण अशी नाही, पण 'आपला दृष्टीकोन' असं काही लिहू शकतो का?
पौर्णिमा, हरकत नाही. लेख जरूर
पौर्णिमा,
हरकत नाही. लेख जरूर लिहा.
एकदा लिहीलेल्या लेखात
एकदा लिहीलेल्या लेखात अॅडिशन्स/ चेंजेस करू शकतो का ? प्रतिसादांनुरूप नव्हे पण जास्तीची माहिती विचार घालायला? विषयाची व्याप्ती मोठी असल्याने काही विसरणे राहून जाणे अपरिहार्य होते आहे. फोटो टाकायचे आहेत.
ashwinimami, Have te badal
ashwinimami,
Have te badal tumhi 31 augustparyant jaroor karoo shakata.
धन्यवाद.
धन्यवाद.
परीक्षणाबद्दल थोडी माहिती. १.
परीक्षणाबद्दल थोडी माहिती.
१. परीक्षकांना फक्त लेख पाठवले जातील. लेखांवरचे प्रतिसाद आणि त्यांची संख्या याचा परीक्षणाशी संबंध नाही. ती चर्चा फक्त मायबोलीपुरती मर्यादीत आहे.
२. तसेच लेखकांची नावेदेखील परीक्षकांना पाठवण्यात येणार नाही. प्रवेशिकांना क्रमांक देऊन त्या पाठवल्या जातील.
लेखाच्या खाली आपले नाव
लेखाच्या खाली आपले नाव लिहायचे आहे का? की वर आयडी येतो तेवढं बास आहे?
२. तसेच लेखकांची नावेदेखील
२. तसेच लेखकांची नावेदेखील परीक्षकांना पाठवण्यात येणार नाही. प्रवेशिकांना क्रमांक देऊन त्या पाठवल्या जातील.>>>>>
हे वाचून काय वाटते अश्वे?
@ चिनूक्स भीत भीत एकच एण्ट्री
@ चिनूक्स
भीत भीत एकच एण्ट्री दिलेली आहे. मा. परीक्षक यांचेपर्यंत लेखन पोहोचणार आहे याचाच आनंद वाटतोय. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मायबोलीचे आभार.
किरण +१ माझ्याबाबतीत सांगायचं
किरण +१
माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर अजून एक गोष्ट झाली आहे ती म्हणजे चित्रपटांशी संबंध जवळ जवळ शून्य झाला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी या गाथेसारख्याच तरंगून वर आल्या आहेत आणि पुन्हा मी काही क्लासिक्सचा आनंद घेते आहे.
फोटों मुळे प्रॉब्लेम नको
फोटों मुळे प्रॉब्लेम नको म्हणून फोटो काढूनच टाकले.
संयोजक, एकदा लिहीलेल्या लेखात
संयोजक,
एकदा लिहीलेल्या लेखात अॅडिशन्स/ चेंजेस करू शकतो का ? >>> + अपूर्ण असलेला लेख सेव्ह कसा कुठे करायचा?
वेळ मिळाला तर लिहायला आवडेल.
वेळ मिळाला तर लिहायला आवडेल.
अपूर्ण असलेला लेख सेव्ह कसा
अपूर्ण असलेला लेख सेव्ह कसा कुठे करायचा?
मुदत खरंच संपली म्हणायची. या
मुदत खरंच संपली म्हणायची. या स्पर्धेला लाभलेला प्रचंड प्रतिसाद आणि सर्वांचा उत्साह पाहता संयोजन यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल ( कदाचित म्हणूनच मुदत वाढवली गेली नसावी
). या स्पर्धेत पहिल्यांदाच लेख दिलाय. एरव्ही असं जमलंच नसतं. सर्वांनी अतिशय छान लिहीलंय.
सिंहासन या सिनेमावर लेख आला. त्याच वेळी जैत रे जैत वर देखील लेख लिहीला जावा असम वाटत होतं. विशल्याने ते काम केलं. प्रद्युम्नसंतूंचे लेख या निमित्ताने वाचायला मिळाले. दिनेशदा, अशोकजी आणि प्रद्युम्नजी यांचे प्रतिसाद वाचनीय होते. लेखकांना प्रोत्साहन देण्यात अनेक माबोकर आघाडीवर होते. हुरूप वाढवणा-यां प्रतिसादांमधे क्रमांक द्यायचा झाल्यास मनिमाऊ आणि वर्षुतै यांना तो विभागून द्यावा लागेल.
स्पर्धेचा निकाल लागेल तेव्हां लागेल. या क्रमांकापेक्षा ही गेला महिनाभर माबोवर जे बॉलिवूडी उत्सवी वातावरण अनुभवायला मिळालं त्यामुळे सगळे टेण्शन्स आपोआप मॅनेज झाले. नंदिनीच्या लेखाने धमाल उडवून दिली. वेगळ्या शैलीतला हा लेख अनेकांना आवडून गेला. आगाऊने कमीत कमी शब्दात मराठी सिनेमाबद्दलच्या चोख अपेक्षा लिहील्या.
विषय क्र. दोन ची व्याप्ती प्रचंड असल्याने कोण हे शिवधनुष्य उचलेले याची उत्सुकता होती. पण अश्विनीमामींनी कस पाहणा-या विषयाला हात घातला आणि ते आव्हान पेललंही. वर्षुतै देखील लिहीती झाली.... पण खलनायक मंडळींना घेऊन आली :फिदी:. तो ही लेख असाच अभ्यास करायला लावणारा आणि सुंदर झालाय.
मराठीतल्या सामना, पिंजरा या सिनेमांवर देखील लेख अपेक्षित होते. तर ग्रेटेस्ट शोमन राजकपूर , बी आर चोप्रा, यश चोप्रा, संजय लीला भन्साळी, विधू विनोद चोप्रा , राजकुमार हिरानी या मंडळींव्ररचे लेखही अपेक्षित होते. लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडीयटस या भन्नाट स्क्रिप्ट असलेल्या सिनेमांची हजेरी लागू शकली नाही ही खंत आहे. पण त्याच वेळी अचानक सरस्वतीचंद्र सारख्या सिनेमाच्या स्मृती इथे जागवल्या गेल्या. तेरे घर के सामने येऊन गेला आणि मधुबालाची कहाणी ही समोर आली.
कुणीच कसं लिहीलं नाही अद्याप असं म्हणत असतानाच गब्बर वरचा लेख पहायला मिळाला. धमाल आली. शोले ह्जेरी लावून गेला. तसा तो लावणार यात शंकाच नव्हती. दिलीपसाब सर्वांच्या तडाख्यातून माझ्यासाठी शाबूत राहीले याबद्दल सर्वांचे आभार
!!
वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या शैलीतले लेख एकाच ग्रुप मधे वाचताना मजा येत होती. एखाद्या दिवाळी विशेषांक काढणा-या मासिकाने सिनेमा या विषयाला अर्पण केलेला अंक असावा असंच वाटलं. एकंदरच गेले (एक)तीस दिवस धमाल, मस्ती आणि माहिती यांची मेजवानीच होती.
एक वाचक म्हणून संयोजकांना धन्यवाद !
भारतीय चित्रपटसृष्टीच्या
भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मॅजेस्टिक प्रकाशन आणि एव्हरेस्ट एण्टरटेन्मेंट यांनी पुरस्कृत केलेल्या गाथाचित्रशती लेखनस्पर्धेला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
या स्पर्धेसाठी लेखन करण्याची मुदत आता संपली असून यापुढे आलेले लेख स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
या स्पर्धेचा निकाल गणेशोत्सवातील स्पर्धांच्या निकालाबरोबर किंवा त्यानंतर आठवडाभरात जाहीर करण्यात येईल.
सर्व स्पर्धकांचे आणि लेखांवर भरघोस प्रतिसाद देणार्या सर्व मायबोलीकरांचे पुन्हा एकदा आभार मानतो.
धन्यवाद. स्मित
कधी निकाल लागतील
कधी निकाल लागतील स्पर्धान्चे?? खूपच उत्सुक आहे......
ह्या स्पर्धांचे निकाल जाहीर
ह्या स्पर्धांचे निकाल जाहीर झालेत का?
मी लेख लिहीला होता, पण त्याचे
मी लेख लिहीला होता, पण त्याचे काटे बोथट करता न आल्याने
अन हिन्दीवर लिहीलेल चालतय की नाही या वैचारिक गोन्धळामुळे इकडे दिलाच नाही.
ह्या स्पर्धांचे निकाल जाहीर
ह्या स्पर्धांचे निकाल जाहीर झालेत का? नसतील तर कधी होणार आहेत?
निंबुडा+१, विशाल कुलकर्णी +१.
निंबुडा+१,
विशाल कुलकर्णी +१. निकाल कधी लागणार आहेत त्याबाबत आपण काही सांगु शकाल का कृपया?
आज १ नोव्हेंबरला या स्पर्धेचे
आज १ नोव्हेंबरला या स्पर्धेचे निकाल घोषीत होतील. काही अपरिहार्य कारणांमुळे थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.
Pages