शल्य!

Submitted by आर.ए.के. on 15 October, 2012 - 06:20

त्या दिवशी घरात एका महत्वाच्या विषयावर चर्चा चालू होती. माझं अ‍ॅडमिशन! १२ वी चा निकाल नुकताच लागला होता...सी.ई.टी. चा पण निकाल हातात आला होता...पण दोंन्ही परीक्षेत काही खास म्हणावं असं यश मिळालं नव्हतं! तशी १२ वीची कोणतीच परिक्षा मी गांभीर्याने घेतली नव्हती.... उडाणटप्पूपणा पण केला नव्हता किंवा माझं अभ्यासाकड दुर्ल़क्ष वगैरे झालं होतं असही नव्हतं...पण चांगल्या कॉलेजला अ‍ॅड्मिशन मिळवण्यासाठी जोर लावून मी अभ्यास केला नव्हता....माहीत नाही का मला तशी गरजच कधी वाटायची नाही. निकाल लागेपर्यंत मी हे ही ठरवलं नव्हतं की मला १२ वी नंतर काय करायचं आहे? बाकीची मुलं ९ वी पासूनच ह्या गोष्टींचा विचार करायला चालू करतात आणि त्या दृष्टीने अभ्यासही करायला लागतात. पण मी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. आणि आज जेंव्हा निकाल हातात आला होता तेंव्हा मला कळत नव्हतं की मी काय करु? मेडीकल ला जाऊ की ईंजिनिअरींगला जाऊ? की सरळ लॉ कॉलेजला अ‍ॅडमिशन घेऊ? का D.Ed करु? का सरळ B.Sc करु?
छे...! अवघड आहे बुवा! आईनी माझा कल जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण मला तिला काहीच सांगता आलं नाही...! शेवटी घरातले सगळे त्यादिवशी एकत्र जमले, माझ्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी! आई ,बाबा, भैय्या आणि सगळ्यांच्या मध्ये मी!
बाबांनी मला सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगायला सुरुवात केली." हे बघ बाळा, तुझ्यापुढे हे ३-४ पर्याय आहेत. पहिला म्हणजे लॉ कॉलेज ला अ‍ॅड्मिशन घेणे. इथे राहून तू ते पूर्ण करु शकशील. पण लॉ चा अभ्यास खूप अवघड असतो. मोठमोठाली पुस्तके असतात आणि ते किचकटही असतं. तू चिकाटीने करणार असशील तर जरुर जा.
दुसरा पर्याय म्हणजे D.Ed करणे. मुलींच्या द्रुष्टीने शिक्षिकेचा जॉब तसा चांगला आहे. आणि शिक्षणाचा कालावधी पण कमी आहे. पुढे तू अजून शिकू पण शकशील.
तिसरा पर्याय म्हणजे B.Sc करणे! इथे राहून ३ वर्षांत डीग्री मिळेल. साईड बाय साईड कम्प्युटरचे कोर्सेस पण करु शकशील.
बाबांच्या या लिस्ट्मध्ये ना मेडीकल चा पर्याय होता ना इंजिनीअरिंगचा..! एकंदर माझे मार्क्स पाहता बाबांना असं वाटायला लागलं होतं की मेडीकल,इंजिनीअरिंग हे असल काही मला झेपणार नाही!
मी मनात जरा खट्टू झाले. तरी पण चाचरत बोललेच, " बाबा मला D.Ed नाही करायचं.....साडी नेसून २ वर्ष नाही शिकायच मला(मुळात साडी नेसणं हेच मोठं संकट वाटायचं मला...साडी कंपल्सरी नसती तर कदाचित मी D.Ed च केल असतं!)....आणि १२ वी सायंन्स करुन D.Ed का करायचं? मला लॉ पण नाही करायच्...अवघड असतं म्हणून नाही तर मुळातच मला ते आवडेल असं वाटत नाही! शाळेत इतिहासातल्या सनावळ्या कधी लक्षात राहिल्या नाहीत तर कायद्याची कलमं कशी लक्षात राहतील? मला तसे ७६% आहेत्..मग साधी B.Sc का करायची?
"मग तू इंजिनीअरिंगला अ‍ॅडमिशन घे!" इतक्या वेळ गप्प बसून माझं बोलणं ऐकणारा भैय्या मध्येच म्हणाला.
मग आईने पण एक पर्याय सुचवला, ती म्हणाली "त्यापेक्षा आपण एखाद्या प्रायव्हेट कॉलेजला मेडीकल साठी प्रयत्न करुया" हा पर्याय कदाचित बाबांना आवडला नाही.
"अगं प्रायव्हेट मेडीकल कॉलेजला फी किती असते हे माहिती आहे का? मी कालचं एका कॉलेजला चोकशी केली , तिथे ३ लाख डोनेशन, परत वर्षाची फी वेगळी आणि राहण्या- खाण्याचा खर्च वेगळाच! सरकारी कोट्यातून मिळालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण हे एवढं महागडं शिक्षण आपल्याला परवडणारं नाही "
हे ऐकून आईचा चेहरा पडला. तरी तिची बाजू लढवायचा तिने प्रयत्न केला. ती म्हणाली "डोनेशनच्या पैशांची व्यवस्था करणं जड जाईल आपल्याला पण एकदा ती रक्कम उभी केली की तुमचा आणि माझा पगार मिळून आपण वर्षाची फी भरु शकतो" आई बिचारी तळमळीने बोलत होती. आत तिला पण हे जाणवत होत की एवढे पैसे गोळा करणं शक्य नव्हतं. पण तिची मनापासून ईच्छा होती की मी मेडीकलला जाऊन डॉक्टर व्हावं!
पण मग आधीपासून आईने मला ही गोष्ट का नाही सांगितली?
माझ्या मैत्रिणींचे आई-बाबा सतत त्यांच्या मागे लागलेले मी पाहिले होते. परीक्षेत इतके टक्के पडायलाच हवे असा धाक त्यांना घरुन असायचा! मला आई-बाबांनी अशी अट कधीच घातली नव्हती. इतके टक्के पडले तर हे मिळेल किंवा ते आणून देऊ असं आमीष पण कधी मला दाखवलं नव्हतं! पण ह्याचा अर्थ कदाचित मी माझ्या सोईनुसार घेतला होता. मुलगी म्हणून त्यांच्या माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात हा विचारच कधी माझ्या मनात डोकावला नव्हता. आणि आज जेंव्हा माझी मलाच नाही माहिती की मी पुढे काय करणार आहे तेव्हा मला कळतयं की आईला मी डॉक्टर व्हायला हवी होते....! १० वी पर्यंत तशी मी अभ्यासात चांगली होते....अगदी १ल्या पाचात वगैरे असायचे नेहमी! पण ११ वी पासून एक प्रकारचा बिनधस्तपणा आला स्वभावात..! माझ्याही नकळत मी थोडी बेपर्वा झाले होते...आणि त्यामुळेच कदाचित आई-बाबांनी दिलेली सूट मी चुकीच्या द्रुष्टीने पाहिली. मला वाटायचं आई-बाबा काही बोलत नाहीत म्हणजे त्यांना काही फरक नाही पडत ...मला किती मार्क्स पडले....कमी पडले, जास्त पडले हे त्यांना जाणून घ्यायचच नाहिये....! कदाचित तसं असेल, किंवा त्यांचा माझ्यावर विश्वास असेल की मी व्यवस्थित अभ्यास करुन चांगले मार्क्स मिळ्वेन म्हणून! कारण काही का असेना...पण अभ्यास कर, इतके मार्क्स पाड म्हणून आई-बाबा माझ्या मागे कधीच लागले नाहीत....!
मनात ह्या गोष्टींचा विचार चालू असतानाच आई अगदी काकुळ्तीला येवून म्हणाली, "हे बघ बाळा, आज केवळ डोनेशन भरायचे पैसे नाहीत म्हणून आम्ही तुला मेडिकलला नाही पाठवू शकत्....खरचं तेवढी परिस्थिती नाहीये आपली...पण या गोष्टीचा राग मनात बाळगू नकोस्...खरं तर ही आमची हारच म्हणायला हवी की एवढे आम्ही दोघे कमवते असून तुला मेडिकलला नाही पाठवू शकत....पण ही वस्तुस्थिती आहे. हे शल्य माझ्या पण मनात राहिल की तुझ्या शिक्षणासाठी आम्ही पैसा उभा नाही करु शकलो!" बाबा हताशपणे आईकडे पाहत होते. कदाचित त्यांना पण असेच काहितरी वाटत होते....
हा माझ्यासाठी आणखीन एक धक्का होता...मला अपराधी पणाची भावना यायला लागली होती. खरं तर चूक माझीचं होती. मी जर प्रयत्नपूर्वकचांगले मार्क्स पाडले असते तर मला मेडिकलला डोनेशन न भरता अ‍ॅड्मिशन मिळाल असतं आणि आईला असा विनाकारण मनस्ताप झाला नसता...! किती बेपर्वाईने वागले मी! बर कमी मार्क्स पडले म्हणून मला रागवायचे सोडून आई स्वतःलाच दोषी मानत आहे.
आणि त्यादिवशी पहिल्यांदा मला एका गोष्टीची जाणीव झाली!
की आई-बाबांच्या आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतात...आणि त्या असणं काही गैर नाही....त्यांनी त्या सांगितल्या नाहीत तरी... . त्या जाणून घेऊन त्या पुर्ण करणं ही आपली जबाबदारी असते....त्या अपे़क्षांच ओझं होवू नये म्हणून जशी ते काळजी घेतात तशीच त्या समर्थपणे पेलण्याची काळजी आपण घ्यायला हवी...!
त्या क्षणापासून मी ठरवलं की आता कुठेही अ‍ॅडमिशन घेतलं तरी मी त्यात excel मिळवणार्...आता कमी पडलेले मार्क्स तर मी सुधारु नाही शकत पण इथून पुढे जे काही करेन त्यात बेपर्वाई नाही करणार...!
मग मीच ठरवल आणि बाबांना म्हणाले ," बाबा मी इंजिनीअरिंगला अ‍ॅडमिशन घेणार!"
तुलनेने इंजिनीअरिंगला फी तशी कमी होती आणि आमच्या शहरात इंजिनीअरिंग कॉलेज पण होतं...त्यामुळे हॉस्ट्लेचा खर्च पण वाचणार होता...!
भैय्याला ऐकून आनंद झाला. बाबांचा चेहरा थोडा चिंताक्रांत झाला...कारण इंजिनीअरिंग तसं खूपचं अवघड असतं ,,,आणि मी गणितात अगदी पूर्वीपासून यथातथाच होते...!
आई अगदी कसंनुसं हासली आणि इंजिनीअरिंग वर शिक्कामोर्तब करुन आमची सभा बरखास्त झाली!
आईचा तो हताश चेहरा आज आठवला तरी कसंतरीच वाटतं....माझ्या चुकांवर पांघरुण घालणारी ती माऊली आयुष्यभर झटत आलीये....आमच्या भवितव्यासाठी...! अगदी जिद्दीने, न दमता ती धडपडत राहिली....पण या गोष्टीची जाणीव न ठेवता मी नकळतपणे तिला दिलेला मनस्ताप आठवला की अस्वस्थ व्हायला होतं!
त्या प्रसंगावरून मी बर्‍याच गोष्टी शिकले. मी इंजिनीअरिंगला जाण्याचा निर्णय घेतला आणि तिसर्‍याच वर्षाला कँपस इंटरव्यूत एका कंपनीत सिलेक्ट होवून तो योग्य पण ठरवला! आता डिग्री हातात येण्याआधिच माझ्याकडे जॉब होता...!
आई काय खुश झाली त्यादिवशी....मला कवेत घेवून बराच वेळ रडत राहिली...! माहित नाही, मला मेडिकलला पाठवू न शकण्याचं शल्य तिच्या मनाला अजून खूपतं का ते...? पण त्याची तीव्रता कमी करण्याचा मी जीव तोडून प्रयत्न केला! मला तिला फक्त एवढचं दाखवून द्यायच होतं की मी तिला कधीचं हारु देणार नाही..! माझ्यामुळे अभिमानाने मान वर होण्याचे फार मोजके प्रसंग दिले मी तिला...पण माझ्यामुळे शरमेने मान खाली जाईल असे प्रसंग कधीच येणार नाहीत याची काळजी जरूर घेतली..अजूनही घेते...!
आज आई-बाबा खुश आहेत...आणि त्यांना खुश पाहून मी पण! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझही असच झालेलं. १० पर्यंत पहिल्या ३ मध्ये आणि १२ वी ला कमी मार्क्स.
सगळ चित्र डोळ्यासमोर उभं राहील.

मी ही इंजिनिअरिंगचाच पर्याय निवडला.

Engineering Rocks.................!

आर के, किती मनातलं अन तरीही साध्या सोप्या शब्दांत आलय सगळं... आई-वडिलांची आपल्याबद्दल अपेक्षा आहेत... अन ते चूक नाही... त्या सफळ ठरवण्यासाठी केलेले डोळस प्रयत्नं आयुष्याला सुंदर वळण देऊ शकतात... हे तुझं मनोगत किती सुंदर, लोभस आहे म्हणून् सांगू.
तू तुझ्या हातात घेतेलेलं तुझ्या आयुष्याच्या रथाचे दोर... एक सुंदर क्षण आहे... आई-वडिलांचं प्रेम, त्यांचे आशिर्वाद, तुझे उदंड प्रयत्नं ह्या सगळ्या सगळ्यानं अगदी उज्वल असूदे तुझं भवितव्यं.