“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449
“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521
“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727
“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805
“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884
“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939
“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194
“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408
“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732
आणि शेवटी एकदाच्या आमच्या दोन्ही गाड्या श्री कृष्ण जन्म भूमीच्या दिशेने निघाल्या. मोहीम कुठे आहे याचा काही पत्ताच नव्हता, फक्त आज काहीही झाल तरी दिल्ली गाठायची होती.
मोहिमेमधील लोकांना फोन केला असता, मोहीम मथुरा सोडून निघाली असल्याचे कळले, तेव्हा आता थेट आपली भेट दिल्लीतच होईल असे सांगत फोन ठेवला. आग्रा ते मथुरा हे फक्त ५७ किमी अंतर आहे. पण आता पोटात चांगलेच कावळे ओरडू लागल्यामुळे आम्ही आम्ही आमचा मोर्चा उपहारगृहाकडे वळवला. थंडी देखील भरपूर असल्यामुळे भूक चांगलीच लागली होती. मग मस्त पैकी शाकाहारी जेवणावर ताव मारला. मथुरेला जायचे असल्याने दुसरा पर्यायच नव्हता. हे सगळे होता होता मथुरेला पोहचायला चक्क दुपारचे ३ वाजले.
मथुरेचे सध्याचे रूप बघून लहानपणी “कृष्णा” या कार्यक्रमात जी छबी मनात होती, ती मात्र स्पष्टपणे पुसली गेली. अर्थात हे गृहीत धरलेच होते.
चहा पिता पिता , सहजचमथुरेविषयी थोडेसे :
मथुरा आग्र्यापासून ५७ किमी तर दिल्ली पासून १५० किमी वर आहे. मथुरेपासून वृंदावन ११ किमी वर आणि गोवर्धन २२ किमी वर आहे. मथुरा ऐतिहासिक तसेच धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशी हि नगरी भगवान कृष्णाचे जन्मस्थळ आहे. भारताचा हा भाग हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्या मध्ये येतो.
वाल्मिकी यांच्या रामायणामध्ये मथुरेचे वर्णन मधुपुर अथवा मधु दानवाचे नगर असे केले गेले आहे. मथुरेलाच “लवणासुराची राजधानी” असे देखील संबोधले गेले आहे. यामध्ये हि नगरी मधु दैत्याने वसवल्याचे सांगितले आहे. लवणासुर हा मधु दैत्याचा मुलगा होय. लवणासुर याचा इक्ष्वाकु कुळाचा राजपुत्र शत्रुघ्न याने वध केला आणि येथे राज्य स्थापित केले. यावरून मथुरा उर्फ मधुपुर रामायण काळात वसल्याचे दिसून येते.
मथुरेच्या चारही दिशांना चार शिव मंदिरे आहेत. पूर्वेला पिपलेश्वर, दक्षिणेला रंगेश्वर, उत्तरेला गोकर्णेश्वर आणि पश्चिमेला भूतेश्वर. शहराच्या चारही बाजूंना शिव मंदिरे असल्याने शंकराला मथुरेचा कोतवाल म्हणतात. महाभारत आणि भगवद् पुराणानुसार मथुरा हि शूरसेन साम्राज्याची राजधानी होती, जिचा कंस (कृष्णाचा मामा) हा राजा होता.
येथे चैत्र शु. ६ तसेच कार्तिक शु. १० ( कंसाच्या वधानंतरचा दिवस ) ला यात्रा भरते. जवळच असलेल्या कंकाली टेकडीवर कंकालीदेवीचे मंदिर आहे. या टेकडीवर देखील अनेक पुरातन वस्तू सापडल्या आहेत. हि देवी म्हणजे, जी देवकीची मुलगी समजून कंसाने हिला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण हि त्याच्या हातातून सुटून आकाशात गेली.
या ठिकाणी ई.स.पू. ५०० च्या काळातील अवशेष मिळाले आहेत, त्यावरून या नगराची प्राचीनता लक्षात येते. वराह पुराण तसेच नारदीय पुराणामध्ये मथुरेच्या भोवताली १२ वने असल्याचा उल्लेख आहे.
१. मधुवन
२. तालवन
३ कुमुदवन
४ काम्यवन
५ बहुलावन
६ भद्रवन
७ खदिरवन
८ महावन (गोकुळ)
९ लौहजंघवन
१०बिल्व
११. भांडीरवन
१२. वृंदावन
याच बरोबर २४ उपवने असल्याचा उल्लेख आहे. आज हे सर्व छोट्या छोट्या गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये रुपांतरीत झाले आहेत.
कारागृह जन्म भूमीचा इतिहास:
जेथे श्री कृष्णाचा जन्म झाला तेथे कारागृह होते. त्या ठिकाणी सगळ्यात पहिले मंदिर ई.स. पू. ५७ च्या सुमारास बांधले गेले होते. महाक्षत्रप सौदासच्या काळात मिळालेल्या एका शिलालेखावरून याची प्रचीती येते. शिलालेखावरून असे कळते कि “वसु” नामक व्यक्तीने ते मंदिर बांधले होते. यानंतर दुसरे मंदिर खूप काळानंतर विक्रमादित्य राजाच्या काळामध्ये बनवले गेले. हे मंदिर ई.स. १०१७-१८ मध्ये महमूद गझनीने फोडले. नंतर महाराजा विजयपाल देव यांच्या शासनकाळात ११५० मध्ये येथे मंदिर बांधले गेले. हे मंदिर पहिल्या मंदिरापेक्षा विशाल होते, जे १६ व्या शतकाच्या आरंभी सिकंदर लोदीने नष्ट केले. ओरछा चा राजा वीरसिंह जू देव बुन्देलाने पूर्वीच्या अवशेष असलेल्या ठिकाणी नवीन मदिर बांधले. १६६९ साली औरंगजेबाने परत हे मंदिर फोडले आणि या जागेवर मशीद उभारली गेली. या मशिदीच्या मागील बाजूलाच सध्याचे केशवदेवाचे मंदिर उभे आहे. प्राचीन केशव मंदिर असलेल्या ठिकाणाला “केशवकटरा” म्हटले जाते.
मथुरा आणि वृंदावन एका दिवसात सहज बघून होते. विश्राम घाटाशेजारी कमी खर्चिक असलेल्या धर्मशाळा राहण्यासाठी उपलबद्ध आहेत. अधिकतर मंदिरे सकाळी १२ वाजेपर्यंत तर संध्याकाळी ४-७ च्या सुमारास उघडी असतात.
मथुरा परिक्रमा :
प्रत्येक एकादशी आणि अक्षय नवमीला मथुरेची परिक्रमा केली जाते. वैशाख शुक्ल पौर्णिमेला रात्री एक परिक्रमा केली जाते, तिला “वनविहाराची परिक्रमा” असे म्हणतात.
मंदिरासमोरच एक मोठा तलाव आहे आणि त्याच्या भोवतीच कारागृह आहे. याच ठिकाणी कंसाने वासुदेव आणि देवकीला कैदेत ठेवले होते असे गावकरी सांगतात. तलाव एकदम बकाल अवस्थेत आहे.
मथुरेमधील पेढे खूप प्रसिद्ध असल्याचे ऐकले होते, पण आम्हा सातारकरांना “सातारचे कंदी पेढे” सोडले तर बाकीचे सगळे सारखेच. त्यामुळे पेढे वगैरे घेण्याच्या भानगडीत मी पडलो नाही.
मंदिराच्या इथेच ताक विकायला होत. मात्र सिंहगड, राजगडावर मिळणाऱ्या ताकाची चव त्याला नव्हती.
दर्शन मात्र व्यवस्थित झालं, जास्त गर्दी देखील नव्हती. खरतरं मथुरेमधील अजून ठिकाणे बघायची पण इच्छा होती पण वेळेच्या अभावामुळे त्या इच्छा इच्छाच राहिल्या.
एकतर आपला भारत एवढा मोठा आहे आणि प्रत्येक शहरात बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या एवढ्या गोष्टी आहेत कि सगळा भारत बघण्यासाठी कमीत कमी ३-४ जन्म घ्यावे लागतील.
मंदिर सोडून निघत असतानाच मैत्रीचा फोन आला, सह्यांकन ग्रुप ५ च गेट टुगेदर होतं. बघू, २६-२७ पर्यंत परत आलो आणि बाईक चालवण्याच्या अवस्थेत असलो तर नक्की येईन म्हणत फोन ठेवला.
तो फोन ठेवतो न ठेवतो तोच आईचा फोन,
कुठे आहेस?
अग मथुरेत, काल रात्री तर सांगितलं होत ना तुला.
अरे, भाभींच्या कडे जाऊन ये ना ,,,,,,
अग आई, तुला काल पण सांगितलं होत ना कि वेळ मिळाला तर नक्की जाईन.
हे बघ, आत्ता ४ वाजतायत , दिल्ली अजून १५० किमी आहे, आत्ता जरी निघालो तरी पोहचायला रात्र होणार आहे, मी रात्रीचं गाडी चालवायच टाळतोय
मी शक्य तितक्या थोडक्यात, आई मला तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी जाण्यात काहीच रस नाहीये हे पटवून द्यायचा प्रयत्न केला.
हा, रात्री २-२ वाजेपर्यत एकटा कळसूबाई वरून येशील आणि आता रात्र होते काय ?
हे बघ, आई, तू कोणतीही गोष्ट कुठेही जोडू नकोस. तेव्हा नाईलाज होता. एकतर बाबांनी सांगितलंय रात्री गाडी चालवायची नाही. अशी बरंच काही कारण देत मी आईला, मला तुझ्या त्या मैत्रिणीच्या घरी जाण्यात काहीच रस नाहीये हे पटवून देण्यात यशस्वी झालो.
आईच मात्र शेवटपर्यंत अरे गेला असतास तर बरं वाटल असतं रे तिला, असं बरचं काही बाही सांगण चालू होतंच.
आता मी लहान असताना त्या भाभी आमच्या शेजारी रहात आणि आईची आणि त्यांची गाढ मैत्री वगैरे होती आणि आहे हे जरी खरं असलं तरी मी त्यांच्या घरी जाऊन काय बोलणार हा मला पडलेला यक्ष प्रश्न. बर त्यात बाकीचे मित्र बरोबर.
परत एकदा सगळा सरंजाम अंगावर चढवला आणि साधारण ४ च्या सुमारास मथुरा सोडत असतानाच साऱ्या, ५ मि. थांब ना,,,,, स्वागत म्हणाला. मला पुढचं स्वानुभवावरून समजल.
मग स्वागत जातच आहे तर मी देखील जाऊन येतो म्हणतं स्नेहल देखील गेला. यांचा सगळा कार्यक्रम उरकून मथुरा सोडायला ०४३० वाजले.
म्हणजे अजून साधारण ४ तास लागतील दिल्लीत पोहचायला. आता इतके दिवसांच्या अनुभवाने गाडी कितीही दामटली तरी चहा नाश्ता , शी-शु असले सगळे प्रकार वाटेतच येत असल्याने ४० किमी/तास हाच गाडीचा वेग राहतो हे आता मला देखील माहित झाल होतं.
दिल्लीला जाणारा रस्ता मात्र मस्तच असल्याने मी ७०-८० च्या वेगानेच गाडी दामटवत होतो, शक्य तितक्या लवकर दिल्ली मध्ये पोहचणे याच त्यामागचा एकमेव उद्देश होता. स्नेहल-रुपेश पण साधारण त्याचं वेगात होते. साधारण ०५३० ची वेळ असेल सूर्य मावळला होता आणि बऱ्यापैकी काळोख झाला होता, रस्त्यावर आता बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ होती पण रस्ता चांगला असल्याने सर्व वाहने जवळपास ५०-६० च्या वेगानेच होती, मी देखील वेग थोडासा कमी केला होता.
समोरचा बाईकवाला थोडा हळू असल्याने मी त्याच्या उजव्या बाजूला गाडी घेतली व त्याला Overtake करावे या हेतूने बाईक थोडी उजव्या बाजूला घेतली.
आणि अचानक मला माझ्या रस्त्याच्या मधेच उभा असलेला तो इसम दिसला.
पुढंच सुज्ञास सांगण न लगे,,, दोन्ही ब्रेक एकदम क्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आणि आमच्या गाडीने धरणीमातेला साष्टांग दंडवत घातला होता. गाडीचे Side guard मजबूत असल्याने आमचे पाय वगैरे खाली सापडले नाहीत एवढंच ते नशीब.
खाली पडलो असतानाच गाडी अजून थोडी पुढ ढकलली गेली, मागं वळून बघायला पण वेळ नव्हता, परत गाडी उचलत असताना अजून एक हलकासा धक्का जाणवला.
स्वाग्या, स्वाग्या, तू ठीक आहेस ना?
मला सगळ्यात जास्त काळजी त्याची होती, कारण मी पूर्णपणे Arm guard, knee guard, gloves वगैरे गोष्टींमुळे सुरक्षित होतो.
मला फक्त गादीवर अंग टाकून देताना शरीराला जेवढा धक्का जाणवतो, तेवढाच जाणवला होता. त्या जाड्या भरड्या जर्किनने त्याचं काम योग्य बजावलं होतं.
तू गाडी काढ बाजूला पहिल्यांदा, मी ठीक आहे .... स्वागत
गाडी सुरु केली, मागच्या बाजूने बरिच आरडओरड ऐकायला येत होती. अरे स्वाग्या, गिअर अडकलाय. फक्त पहिलाच पडतोय.
अरे आहे त्या गिअर मध्ये घे बाजूला.
मग मी देखील गाडी बाजूला घेतली, तेवढ्यात मागच्या बाजूने Swift Dezire भरधाव पुढे गेली, पण लोकांनी लगेचचं तिला अडवलं, तिच्या ड्रायव्हरला एक फटका पडत असताना मी बघितला, साधारण १०० मी गेल्यावर गाडी एका टपरीजवळ थांबवली.
स्वाग्या, ठीक आहेस ना?
अरे आहे रे, साऱ्या कितीवेळा तुला म्हणतोय थांबव, थांबव अरे आपण १०० किमी पेक्षा जास्त आलोय, आणि ब्ला ब्ला ब्ला ब्ला
सगळ लेक्चर गपगुमाने ऐकल, दुसरा पर्याय नव्हता. चूक माझीच होती.
झाल अस होतं, आमची बाईक पडल्यावर आमच्या बाईकला मागून येऊन Swift Dezire थडकली होती आणि Swift Dezire ला Innnova. Innnova ने Swift Dezire ला इतक्या जोरात मागून धक्का मारलं कि Swift Dezire ची डिक्की पूर्ण वरती आली होती.
अस आहे होय, त्यामुळेच मला गाडी पडल्यावर २ हलके धक्के जाणवले.
स्वागतच्या स्पष्टीकरणाने आज आपण काय पराक्रम केला आहे याची मला पूर्णपणे जाणीव झाली.
पहिल्यांदा स्नेहलला फोन लावला आणि आम्ही दिल्लीच्या बाहेरच्या बाजूला आहोत आणि गाडीचा Indicator चालू ठेवला आहे सांगितलं. सगळी गाडी मागून पुढून तपासली, Side guard थोड वाकलं होतं आणि गिअर आडवा आत घुसल्यामुळे अडकला होता. Tail Indicator फुटला होता. डाव्या बाजूचा आरसा गायब होता. चला, फार काही मोठा चुना नाही लागणार असं एकंदरीत लक्षात आल्यावर जीवात जीव आला. स्वागतच लेक्चर चालूच होतं. मी मनातल्या मनात, तू आता फक्त पड रे परत बाईकवरून मग सांगतो तुला अस म्हणत लेक्चर ऐकत होतो.
तोपर्यंत स्नेहल-रुपेश आले, मग परत एकदा त्यांना सगळ रामायण सांगितलं. जर्किन पण बरच फाटलं होत.
मग शेजारी असलेल्या एका दुकानातून एक पाईप आणला आणि थोड्या खटाटोपानंतर गिअर बाहेर आला.
मस्त पैकी चहा मारला. मोहिमेतल्या कार्यकर्त्यांना फोन केला, मोहीम मुक्कामी पोहचली होती. गुरुद्वाराचं नाव वगैरे व्यवस्थित विचारून घेतलं. आणि परत एकदा बाईकवर स्वार झालो, आता गाडी मी चालवण्याचा प्रश्नच नव्हता.
दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्हाला ग्रेटर कैलास नावाचे १,२ आणि ३ असे भाग आहेत आणि त्यातील २ भागामध्ये गुरुद्वारा आहेत हा शोध लागला. त्यामुळे प्रत्येकजण आम्हाला वेगवेगळा पत्ता सांगत होता. शेवटी एकदाचा गुरुजींनाच फोन करून व्यवस्थित पत्ता घेतला आणि मुक्कामी सुखरूप पोहचलो.
दिल्लीत आल्यावर कळलं कि काही उत्साही कार्यकर्ते आज गोकुळला पण भेट देऊन आले होते. गोकुळ देखील इतर पर्यटन स्थळांसारखचं आहे, हे ऐकून वाईट वाटलं. तेथील प्रत्येक घरी, लल्ला (कृष्ण) याच घरामध्ये कसा रांगत असे, येथीलच लोणी कसे चोरून खात असे वगैरे भाकड गोष्टी सांगून पर्यटकांकडून पैसे उकळण्याचे उद्योग चालू आहेत. हे सर्व ऐकल्यावर मला स्वानंदची आठवण आली. कारण म्हणजे स्वानंदच कामानिमित्त अधे मध्ये बारामती त्या भागात जाणं होत असे. ह्याचं म्हणनं बारामतीमध्ये कोणीही शरद पवारांच्या वयाच्या आसपास असणारा माणूस भेटला कि तो हमखास तो आणि शरद शाळेत एकाच बाकड्यावर कसे बसायचे ते सांगणार. आणि स्वानंदच्या भाषेत साला, त्यांनी म्हटलं असत ना कि क्रिकेट खेळले, गोट्या खेळले, विटी-दांडू खेळले तरी ऐकलं असत बे ,,,,पण सगळे जण आपणच कसे त्याच्याबरोबर बाकड्यावर बसायचो ते सांगणार. एकदा गेलं पाहिजे साऱ्या, ते बाकडं बघायला.
आज साधारण २५० किमी प्रवास झाला होता. झोपायला आज देखील मस्त गाद्या होत्या.आल्यावर सगळ्यांना आग्र्याहून आणलेला पेठा वाटला.
आणि पहिल्यांदा माड्याला फोन केला आणि
माड्या, आपण घेतलेल्या Arm guard, knee guard, gloves चा उपयोग झाला रे, अस सांगितलं.
हरामखोर, हेल्मेटचा नाही झाला का?...
नाही रे, पण तू काळजी करू नकोस, अजून ३००० किमी बाकी आहेत. आणि मग परत एकदा सगळ रामायण त्यला सांगितलं.
मग बाकी नेहमीच, कॉलेज काय म्हणतंय, जास्त कुणाला सांगू नकोस, Proxy मारतोयस ना ? वगैरे वगैरे.
मग नेहमीप्रमाणे जेवण उरकलं आणि झोपी गेलो.
आजचा प्रवास : २५३.७ किमी
उद्याचा प्रवास :
अक्षरधाम – शिसगंज गुरुद्वारा – झिंझोली
१३ जानेवारी २०१२
आज दिल्ली मधून मोहीम जाणार असल्याने, निखिलने काल रात्री झोपतानाच मला बाबा, उद्या तरी मोहिमेबरोबर राहा, कुठे जाऊ नका. असे विनवले होते. त्यामुळे आम्ही देखील जास्त कुठे बाहेर जाण्याच्या फंदात पडणार नव्हतो.
सकाळची लगबग - दिल्ली गुरुद्वारा
आज सकाळी उठून चक्क अंघोळ वगैरे केली ते हि गरम पाण्याने. असं सुख फार क्वचितच हो.
आज दिल्ली असल्याने सर्वानी पारंपारिक पोशाख घातले होते. दिल्लीमध्ये महिलांना सुरवातीला ध्वज पथक आणि रक्षक म्हणून राहू द्या असा प्रस्ताव आल्याने आज महिला वर्ग खुशीत होता. नववारी वगैरे घालून, गुरुजींच्या भाषेत “झाशीची राणी पथक” आज आघाडीवर होते.
होय, पुन्हा मराठेच पानिपतावर
सकाळी मस्त पैकी चहा बिस्कीट, फोडणीचा भात असा अल्पोपहार (?) झाल्यानंतर मोहीम ९ वाजता अक्षरधाम च्या दिशेने मार्गस्थ झाली. इतके दिवस गायब असणारे आमच्या सारखे अजून काही कलाकार आज मोहिमेमध्ये हजर होते. हे सर्व बघून मला शाळेचे तपासणीचे दिवस आठवले.
आज मोहीम दिल्लीत असल्यामुळे, पोलीस बंदोबस्त देखील होता. नेहमीसारखेच सर्व दिल्लीकर देखील मोहिमेकडे कुतूहलाने बघत होते.
१० वाजण्याच्या सुमारास अक्षरधाम मध्ये पोहचलो. आत मध्ये कॅमेरा, मोबाईल वगैरे न्यायची परवानगी नसल्याने परत एकदा सर्व साहित्य काढून गाडीमध्ये व्यवस्थित ठेवले आणि आत मध्ये गेलो.
अक्षरधामच्या रस्त्यावर :स्वामीनारायण अक्षरधाम विषयी थोडेसे :
हे मंदिर सोमवारी बंद असते. सकाळी ०९३० ते संध्याकाळी ०६३० या कालावधीत प्रवेश दिला जातो. मंदिर बघण्यास साधारण १ तास पुरेसा होतो.
श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर ७००० कारागिरांनी ३००० स्वयंसेवकांच्या सहायाने बांधले. दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांपैकी ७० % पर्यटक या मंदिराला भेट देतात. हे मंदिर ६ नोव्हेंबर २००५ मध्ये अधिकृतरित्या भाविकांसाठी खुले झाले. हे मंदिर वास्तू शास्त्र आणि पंचारत शास्त्रानुसार बांधले आहे.
मुख्य मंदिर १४१ फुट उंच, ३१६ फुट रुंद आणि ३७० फुट लांब आहे. मंदिरामधील कलाकुसर डोळ्याचे पारणे फेडते, यात काही वादच नाही. हे मंदिर राजस्थानी गुलाबी Sandstone आणि इटालियन मार्बल वापरून बांधण्यात आले आहे. यामध्ये कुठेही लोखंड अथवा कॉक्रिट चा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरामध्ये २३४ कलाकुसर केलेले स्तंभ, ९ घुमट, २००००(???) मूर्ती आणि पुतळे आहेत. जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून या मंदिराची “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ” मध्ये नोंद झाली आहे.
मंदिर बघून निघण्यास ११३० वाजले. तिथून मोहिमेने शिसगंज गुरुद्वाराच्या दिशेने प्रस्थान केले. लाल किल्ल्यासमोरून जाताना हृदयात कालवाकालव झालीच पण पर्याय नव्हता, कुतुबमिनार, इंडिया गेट अस बराच काही बघायचं होतं पण वेळ नव्हता. आयुष्यात वेळेला किती महत्व असतं हे आता मला मनोमन पटले होते.
अचानक विदुलाची ( बालमैत्रीण ) आठवण झाली. ती देखील दिल्ली मधेच कुठेतरी आहे हे माहिती होतं. ३-४ वेळा फोन करायचा प्रयत्न केला पण फोन बंद. जाऊ दे, दुपारी करू म्हणत पुढे निघालो.
दिल्लीमध्ये चक्क दुचाकीसाठी देखील टोल आहे. तेथील टोल नाक्यावर घडलेली एक गमतीशीर घटना. मोहिमेत सगळ्यात पुढे रुग्णवाहिका असायची आणि तिच्या मागे मागे ध्वज पथकाच्या गाड्या असायच्या. बहुतेक लेन चा काहीतरी घोटाळा झाला असावा, म्हणून विशालने रुग्णवाहिका नेहमीच्या सवयीप्रमाणे मागे घेतली. आता नेहमी ध्वज पथकाच्या गाड्यांबरोबर मुले असायची, त्यामुळे बाईक पटापट बाजूला सरकायच्या. आज महिला वर्ग आहे हे याच्या लक्षातच नाही आलं. त्याने नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका मागे घेतली आणि तिचा हलकासा धक्का मागच्या बाईकला लागला. काकू आणि दिदी एखादं पोत गाडीवरून पडत त्या प्रकारे थेट रस्त्यावर. इकडे मला हसू का रडू अस झालं. पण लागलीच हसू आवरून पुढे धावलो. जास्त काही झाल नव्हतं. विशालला थोडं समजावलं आणि परत मागे आलो.
वाटेत “सुदर्शन NEWS” ने थांबवले. गुरुजी आणि पुढे असलेल्या लोकांची ते मुलाखतं वगैरे घेत होते. बाकी आमचं सगळ्यांचं लक्ष त्या रिपोर्टर कडे. भारी होती राव. कसे कुणास ठाऊक, आज स्वयंघोषित कार्यकर्ता पुढे होता, त्यामुळे त्याला पण थोडे प्रश्न विचारण्यात आले. त्याला मुलाखत देताना बघून मला व स्वागतला एकाचवेळी “Wednesday”” मधला विद्युत बाबा आठवला. हा इकडे मुलाखत देतोय आणि आम्ही इकडे हसून हसून बेजार.
जवळच एका हातगाड्यावर कुत्र्याची ५-६ नुकतीच जन्मलेली पिल्ले होती. पहिल्यांदा त्यांची आई कुठ जवळपास नाही ना याची खात्री केली आणि मगच फोटो काढले. ( अनुभव माणसाला शहाणा करतो, दुसर काय?)
पिल्लावळ :शीशगंज साहिब गुरुद्वारा आगमन :
सगळं उरकत दुपारी १ वाजता शीशगंज साहिब गुरुद्वारा मध्ये पोहचलो. माथा टेकून आल्यानंतर जेवण आटोपले. इथे देखील कुठलेतरी वृत्तवाहिनीवाले आले होते. पण आम्ही त्यामध्ये काही इंटरेस्टेड नव्हतो. कारण आत येत असतानाच तेथील चौकामधे तुपामध्ये बनवल्या जात असलेल्या जिलेब्या आम्हाला दिसल्या होत्या. मी, स्वागत आणि जय दादा गुपचूप बाहेर पडलो आणि येथेच्छ जिलेब्या हादडल्या. मी आणि स्वागतने स्लिपिंग बॅगज् घेतल्या आणि परत आलो. तोपर्यंत बाकीच्या लोकांची देखील जेवणं उरकली होती.
गुरुद्वाराच्या बाहेरचं एक मजेशीर दृश्य दिसलं. एक भिकारी बसला होता आणि त्याच्या शेजारीच त्याचा इमानी कुत्रा झोपला होता.कुत्र्याला थंडी लागू नये म्हणून त्याच्या पाठीवर जाकीटासारखं काहीतरी घातलं होतं. Life is all about your priorities – हे वाक्य तंतोतंत पटलं.
Life is all about your prioritiesदिल्लीच्या रस्त्यांवर :
परत एकदा विदुलाला फोन करून पहिला, पण अजूनही तो भ्रमणध्वनी माझा भ्रमनिरासच करत होता. आम्ही १० वी नंतर कधीच भेटलो नव्हतो. कधी मी भारतात ती बाहेर, तर कधी ती भारतात मी बाहेर असा आमचा लपंडाव चालूच होता.
मोहिमेतील काही अविस्मरणीय क्षण:
साधारण दुपारी अडीच वाजता गुरुद्वारा सोडला आणि झिंझोलीच्या दिशेने निघालो. हे कुठे आहे आणि किती लांब आहे याचा आम्हाला काही पत्ता नव्हता. गुरूजींनी पण मोहिमेला सोडू नको, तो भाग थोडासा आडवाटेवर आहे असं सांगितलं असल्यामुळे आम्ही मोहिमेबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता.
पण गाव जास्त काही लांब नव्हतं पण आडवाटेवर होतं. संध्याकाळी ५ च्या सुमारास तिथे पोहचलो. गावात मोरांची संख्या प्रचंड आहे. चक्क मोर हातात दाणे घेऊन जवळ गेल तर खायला येतात. त्यामुळे मी पण गाडी थांबवून थोडे फोटो काढावेत म्हणून बाजूला थांबलो.
झिंझोली
माझे फोटो काढून झाल्यावर निघण्याच्या तयारीत असताना फेसबुक दिसला. तो अशाच एका मोराबरोबर खेळण्यात व्यस्त होता. हा इथ एकटा काय करतोय? आणि याचा जोडीदार कुठाय ? असा प्रश्न मला पडला असतानाच, दादा जाऊ नको रे, तो मला सोडून गेलाय. इति फेसबुक
अरे, अस कसं तू त्याला जाऊ दिलंस ? आणि आता तू येणार कुणाबरोबर ?
तुझ्याबरोबर
झाल, म्हणजे हा आमच्याबरोबर ट्रिपल सीट येणार होता तर.
वा, किती विश्वास माझ्यावर, आता आमच्याकडे देखील पर्याय नव्हता.
फेसबुकला मध्ये घेतला आणि येथेच्छ शिव्या घालत पुढे निघालो.
मुक्कामाचं ठिकाण फार काही लांब नव्हतं.
५-१० मि. मध्ये आम्ही पोहचलो.
प्रशिक्षण केंद्र होत कुठलतरी.
तिथल्या मुलांना विचारलं तर त्यांना ३००० रु मासिक भत्ता मिळतो अस कळालं.
त्या बदल्यात त्यांना काही ठिकाणी कामाला जाव लागतं.
रहायचा खाण्याचा खर्च ती संस्थाच करते.
सामान वगैरे जागेवर ठेऊन चहा पिऊन ताजेतवाने झालो. आज चक्क १७३० वाजताच मुक्कामी पोहचलो असल्याने आता काय करायचं हा प्रश्न होताच पण स्वागत कुठे दिसेना म्हणून इकडे तिकडे बघितलं तर साहेबांनी मैदानावर जाऊन फुटबॉल खेळणं देखील सुरु केल होतं.
मग मी आणि अजून काहीजण त्यांना जाऊन मिळालो. आज सकाळ पासून डावा हात जरा ठणकायला लागला होता, कदाचित काल बाईक वरून पडताना सगळा भर त्याच्यावर गेला असावा. त्यामुळे मी आपला गोलकी च्या भूमिकेत शिरलो.
साला, आमच्या गोल पोस्ट कडे बॉल येण्याची काही चिन्हे दिसेनात. काय कराव म्हणून सहज परत विदुलाला फोन लावला आणि अपेक्षेप्रमाणे लागला. आता लागणारच हो.
अग आज दिल्ली मध्ये होतो. सकाळपासून प्रयत्न करतोय तुझा नंबर बंद येत होता वगैरे वगैरे
तिने देखील अगदी टिपिकल मुलींच्या भाषेत, अय्या खरंच , अरे फोन बंद ठेवला होता क्लास मध्ये होते. ( आयला, आम्ही काय क्लास कधी अटेंड केले नाहीत कि काय ? )
१ दिवस अगोदर तरी सांगायसच, नाहीतर उद्या ये कि ,, वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला
जाऊ दे, आता वाईला आलीस आणि मी असलो तर भेटू म्हणत फोन ठेवला.
कार्टी कधी नव्हे ते खेळायला मिळाल्यामुळे अगदी डोळ्यात बोट गेल तरी दिसू नये इतका अंधार होईपर्यत खेळत राहिली. १ गोल देखील मारला. मी पण अरे अंधारामुळे बॉल दिसला नाही अस काहीतरी कारण सांगून माझा डिफेंड करायचा प्रयत्न केला.
पण एकंदरीत आज खेळल्यामुळे सगळ्यांनाच खूप मजा आली होती.
जेवण देखील मस्त होते. फोडणीचा भात, पापड आणि लोणचं असा फक्कड बेत होता.
तिथे वाढणारी मुले देखील फार प्रेमाने वाढत होती. बहुतेक पहिल्यांदाच वाढत असावीत कारण लोणचं पण “ भाई, थोडा लो , थोडा तो लो” करत आग्रहाने वाढत होती.
जेवण वगैरे उरकल्यावर सभा सुरु झाली.
उद्या मुख्य दिवस असल्याने भुले, भटके सगळेजण आज सभेमध्ये होते. गुरूजींनी उद्याच्या कार्यक्रमाची आणि प्रवासाची रूपरेषा सांगितली.
उद्या देखील सर्वजण पारंपारिक वेशभूषेत असणार होते.
सूचना वगैरे झाल्यावर कुणाला काही अनुभव वगैरे सांगायचे असतील अथवा सूचना करायच्या असतील तर सांगा म्हणून सांगण्यात आले.
मी लहानपणासून श्रोत्याची भूमिका अतिशय उत्तम प्रकारे करण्यात यशस्वी असल्याने मी त्याचं भूमिकेत रहायचे पसंत केले.
लोक आपापले अनुभव सांगत होते. आम्ही देखील ते अनुभव एकूण स्वतःची करमणूक करून घेत होतो.
तेवढ्यात एकजण तावातावाने उभा राहिला.
गुरुजी, तुम्हाला खर सांगतो, आजपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कधीच बाहेर गेलो नव्हतो. फक्त युरोप मधील ३ देश बघितले.
त्याच्या या वाक्यानंतर पूर्ण सभागृह हशा आणि शिट्ट्या ( या आमच्या) नी भरून गेलं. त्यानंतर तो पुढ काय बोलला ते मला माहित नाही. पण त्यानंतर प्रत्येकाच्या थोंडी एकच वाक्य होत, गुरुजी, तुम्हाला खर सांगतो, आजपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कधीच बाहेर गेलो नव्हतो. फक्त युरोप मधील ३ देश बघितले. वा रे मेरे बब्बर शेर !!!!!
आणि त्याचं “युरोप” या नावाने बारस करण्यात आम्ही यशस्वी झालो.
उद्या पानिपतच्या मुख्य युद्ध भूमीला भेट देणार होतो.
रात्री झोपताना आज पर्यंत पानिपत बद्दल वाचलेलं, ऐकलेलं डोळ्यासमोर उभे राहत होतं. इब्राहिमखान ( हा माझा हिरो ) , सदाशिव भाऊ, शिंदे-होळकर यांचेच चेहरे (वाचून ,ऐकूण मनात ज्या प्रतिमा तयार झाल्या आहेत त्या, नाहीतर म्हणाला हा काय हरितात्या आहे का ?) वारंवार डोळ्यासमोर येत होते.
आजचा प्रवास : ५३.७ किमी
उद्याचा प्रवास : सोनीपत – पानिपत – कुरुक्षेत्र
बरीच उशिरापर्यंत झोप लागली नाही आणि सकाळी झोप उघडली ती गुरूजींनी कानात टाकलेल्या पाण्याने.
गुरुजी, आज थेट कानात पाणी, पहिल्यांदा उठवलं नाही तुम्ही.
बाजीराव, दुसरा राउंड सुरु झालाय.
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण छान झाला आहे हा पण भाग.
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण छान झाला आहे हा पण भाग.>>>>>> +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त. अपघाताचे वाचून काळजी
मस्त. अपघाताचे वाचून काळजी वाटली. स्पीड संभाळून असावे. पपीज आणि कुक्कु चे फोटो छान आहेत.
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण
खुप दिवसांनी टाकला हा भाग? पण नेहमीप्रमाणेच छान झाला आहे हाही भाग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे हा भाग.... अपघात
मस्त आहे हा भाग.... अपघात वगैरे म्हणजे सगळ साग्रसंगित झालेलं दिसतय.... काही कमी रहायला नको....
आईशप्पथ, काय भन्नाट लिहितो
आईशप्पथ, काय भन्नाट लिहितो यार तू.... कुठलंही वर्णन वाचताना मज्जाच येते - एक्दम खुसखुशीत, मस्त लिहितोस तू...
एवढा मोठा अपघात होऊनही उगाच त्याचे रडगाणेही गायले नाहीस हे फारच विशेष...
बाकी ती साळुंकी, कुत्र्याची पिल्ले यांचे फोटोही फार आवडले...
मोटारसायकलवरच्या झाशीच्या राणीला बघून आतमधे कुठेतरी भरुन आले बघ...
पानिपतच्या शूर वीरांची नावं जरी डोळ्यासमोर आली तरी चर्रर होतं काळजात...
छान वृत्तांत. फक्त तेव्ह्ढे
छान वृत्तांत.
फक्त तेव्ह्ढे शिसगंज चे "शीशगंज" करुन टाका. तिथे गुरु तेघबहादुर यांचे डोके कलम केले गेले होते म्हणुन त्याला शीशगंज हे नाव पडले.
आणखी एक म्हणजे शीख धर्मात भिकारी नसतात.
खुप वाट पहायला लावली पण शेवटी
खुप वाट पहायला लावली पण शेवटी आलाच एकदाचा!!
खुप दिवसांनी आला हा भाग !
खुप दिवसांनी आला हा भाग ! सर्व लेखमालिकाच खुप आवडली आणि अर्थात उपक्रमदेखील.
इब्राहिमखान ( हा माझा हिरो )
इब्राहिमखान ( हा माझा हिरो ) वा क्या बात है.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शशांकजी +१
हे सर्व भाग मी पुन्हा वाचुन काढणार आहे एकाच बैठ्कीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उद्याचा प्रवास : सोनीपत –
उद्याचा प्रवास : सोनीपत – पानिपत – कुरुक्षेत्र >> वाट पाहतोय..
मस्त सुरु आहे
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद ,,,,,,,,खरंच हा भाग टाकायला खुपच उशीर झाला ,, त्याबद्दल माफी असावी,,,,,,पुढील भाग लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करतो ,,,,,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जेम्स >>> माहिती बद्दल धन्यवाद ,, योग्य तो बदल केला आहे,,,,,
आणखी एक म्हणजे शीख धर्मात भिकारी नसतात.>>>>>>>>पूर्णपणे अनुमोदन ,,, पण मला कितीतरी गुरुद्वारांच्या बाहेर अनेक भिकारी ,,लंगर असल्यामुळे बघावयास मिळाल,,,,,फोटोमधील देखील तसाच प्रकार आहे,अर्थात तो शीख नसणारच
मामी >>> अपघात वगैरे म्हणजे सगळ साग्रसंगित झालेलं दिसतय..>>>मग काय ,,,हा तर पहिलाच आहे
सगळे भाग एका दिवसात वाचून
सगळे भाग एका दिवसात वाचून काढले..... खुप छान लिहल आणि वर्णन केले आहे... पुढ्चे भाग लवकर येवूदेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज सगळे भाग वाचुन काढले. फार
आज सगळे भाग वाचुन काढले. फार छान लिहीता...पुढचा भाग लवकर येऊद्या आता!