वळण

Submitted by भारती.. on 9 October, 2012 - 12:29

वळण

वळण वयस्कर..जपून वळते
ठुसक्या चाफ्यावरती रेलत
वळण समंजस : दूरदूरचे
अचानकाचे ओझे पेलत

लवचिक वळणे-अवचित गाठी
अडखळत्या पावलात पारध
समाधिस्थ आत्मे रस्त्यांचे
वळणावरती रसिक नी सावध

वळणांमधुनी फक्त वाढते
बिंदूंमधले धोपट अंतर
सुकलेले विरहाचे आठव
वळणावरती पुनश्च कातर

वळणे : चिरसौंदर्ये रतीची
वळणे : स्थिरविभ्रमच गतीचे
पार्थिवातले सहज महोत्सव
दिशा बदलणार्‍या नियतीचे

वळण एकले अदृष्टातले
धुकाळ क्षितिजे छेदत जाते
चिरंतनाच्या प्रवासामध्ये
निरंतराचे जोडून नाते ..

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवढी आशयगर्भ! एक वळण किती सारे अर्थ घेऊन सामोरे येतेय... शेवटच्या चार ओळी तर खूप आवडल्या... जितक्या जास्त वेळा वाचेन, तितक्या खोल नेतायंत. छानच!

कविता खुपच सुंदर. आवडली. Happy

अचानकाचे ओझे पेलत
----- एवजी ------
अकल्पिताचे ओझे पेलत ...... असे छान वाटेल.

वळणांमधुनी फक्त वाढते
बिंदूंमधले धोपट अंतर>>>>>>>

फारच सुन्दर भारतीजी ! अभिनन्दन !!

दिशा बदलणार्‍या नियतीचे
>>
मस्तच
ही नियती कधी प्रसन्न होइल माझ्यावरती याचीच वाट बघतोय, तोपर्यन्त ती वाट लावतच राहणार. Happy

खूप मस्त

_________________

एक प्रश्न पडलाय .........ठुसक्या चाफ्यावरती रेलत>>>अर्थ समजला पण ठुसका म्हणण्याचे नेमेके प्रयोजन समजत नाही
आपण प्रत्यक्ष पाहिलेल्या एखाद्या ठुसक्या चाफ्यास कवितेत वापरले अहे की शब्द आवडला म्हणून हे विशेषण मनातल्या एका चाफ्यास लावले आहे वगैरे ?

तेवढा एकच शब्द कवितेत एकरूप होत नाहीये असे जाणवले (वैयक्तिक मत आहे हे माझे)

असे करता आले असते का ...........(अन कसे वाटले असते तेही कळवणे!)

वळण वयस्कर..जपून वळते
थकल्या चाफ्यावरती रेलत.............

________________
अजून एक :

वळणे : चिरसौंदर्य रतीचे
वळणे : स्थिरविभ्रमच गतीचे
असे केल्यास??
_________________
अजून एकच ,लास्ट ...अगदी लास्ट !! रियली.........

वळण एकले अदृष्टातिल>>> लयी करिता .बाकी काइ नै!
________________
असो
माझे म्हणणे न रुचल्यास जास्त विचार करू नये ही विनन्ती Happy

धन्यवाद भारतीताई

सर्वांचे खूप आभार !
माझ्या अठरा-एकोणिसाव्या वर्षी 'वळण ' या दिलेल्या विषयावर एका स्पर्धेत केलेली ही कविता.. (ते कवितांच्या स्पर्धेत भाग घ्यायचं वय होतं :)) ) 'वळण या शब्दाने जागृत होणार्‍या काही संकल्पना, काही क्षणचित्रं या कवितेमध्ये एकवटली आहेत.

..चिखल्या यांच्या 'वाट' या चित्रावरून ही आठवली म्हणून इथे टाकली.

वैभव,
-' ठुसक्या ' अर्थात ठेंगण्याठुसक्या चाफ्याच्या झाडाचा एखाद्या काठी सारखा आधार घेत वळणारं 'वयस्कर' वळण ही एक दृष्य प्रतिमा होती. चाफा थकलेला नव्हता तर त्यावर रेललेलं वळण त्याक्षणी थकलेलं होतं.
- वळणे- चिरसौंदर्य रतीचे हे तुमचे म्हणणे आश्चर्यकारकरित्या बरोबर आहे! पण मी मूळ लिहिलेलाच शब्द (अनेकवचनी) कायम ठेवलाय.
- 'एकले अदृष्टातले 'यात एक लय आहे तसेच ते व्याकरण दृष्ट्या 'अदृष्टातिल' पेक्षा जास्त बरोबर आहे असे मला वाटते..
तसेच सुधाकर ,
' अकल्पित' हाही शब्द छानेय, पण कवितेच्या ऊर्जेतून आलेला 'अचानक' ही मला आवडतोच.

सर्व मनःपूर्वक केलेल्या सूचनांबद्दल मनापासून आभार..

विक्रांत, एका साध्याशा मुक्त:च्छंद कवितेला पहिला मिळून हिला दुसरा मिळाला! तेव्हा वाईट वाटले होते. पण त्या प्रथम क्रमांक विजेतीने मला माझ्या कॉलेजच्या पत्त्यावर पत्र पाठवून उमदेपणाने माझी गुणवत्ता कबूल केली.. तेव्हाची पत्रमैत्री आजही टिकून आहे, खरे तर आजच बोलले होते तिच्याशी.. हे खरं पारितोषिक !

..चिखल्या यांच्या '"वाट" या चित्रावरून ही आठवली म्हणून इथे टाकली.
>>>
धन्स
माझ्या चित्रावरुन काहितरी चांगले आठवले, आणि वाचायला मिळाले....
हे खरं पारितोषिक ! Happy
त्यावेळच्या अजुन काही कविता असतील तर वाचायला आवडतील...

माझ्या अठरा-एकोणिसाव्या वर्षी 'वळण ' या दिलेल्या विषयावर एका स्पर्धेत केलेली ही कविता.. >>>> माय गुडनेस !!....., तुमची प्रगल्भता, शब्द योजना अशी मुळातलीच आहे तर......

कविता अप्रतिम..... धुकाळ क्षितिजे हा शब्द खासच...

परत वाचली आणि परतही आवडलीच. खरंच खास आहे. Happy

वाचताना मस्त लय पकडता येते.

वैवकुंनी सांगितलेले बदलही छान वाटले. पण जेव्हा कलाकृती हातावेगळी केली जाते तेव्हा विशिष्ट भावावस्थेत असताना शब्दयोजना केलेली असते आणि मग ती बदलायला नको वाटते. स्पेशली खूप पूर्वी केलेली कविता असेल तर आहे तशीच राहू द्यावे असे वाटते.

गूढ, अर्थगर्भ...
अमेलियाशी सहमत.

माझ्या अठरा-एकोणिसाव्या वर्षी 'वळण ' या दिलेल्या विषयावर एका स्पर्धेत केलेली ही कविता..
वयाबरोबर प्रगल्भता, अनुभव वाढतो असं मानलं तर ही कविता अठरा-एकोणीसची वाटत नाही.. (its a compliment! :))

विक्रांत,चिखल्या,निंबुडा,शामराव ..धन्स या प्रेमळ प्रतिक्रियांसाठी
बेफिकीर ,धन्यवाद,मोलाचे आहेत हे सर्व प्रतिसाद.

शशांकजी, तुम्ही सरळपणाने म्हटलंय की त्या वयात मी प्रगल्भ होते,
आनंदयात्रींनी थोsssडा शालजोडीतला अभिप्राय दिलाय, वयाबरोबर त्या प्रमाणात माझी प्रगल्भता वाढली नसल्याची त्यांना शंका येत असावी.. :))
दोन्ही बरोबरच.लहान असताना लहान नव्हते, मोठी होऊन मोठेपण आलं नाही.
काय करावं या आयुष्याला !

वयाबरोबर त्या प्रमाणात माझी प्रगल्भता वाढली नसल्याची त्यांना शंका येत असावी..
अहो, असं काही म्हणायचं नव्ह्तं हो!! शालजोडीतला तर अजिबातच नव्हता... Happy
असो...

हाही गझलकार-कवींमधला प्रेमसंवाद (पुढे चालू...) असेल तर मग हरकत नाही.. Wink

चार वेळा वाचली ,खूपच आवडली.... आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर विचार करतेय मी तुमची कविता वाचून....

.

>> हाही गझलकार-कवींमधला प्रेमसंवाद (पुढे चालू...) असेल तर मग हरकत नाही.. >>>

आनंदयात्री ,त्यातलाच प्रकार आहे Happy
वेदन, धन्स.. खूप दिवसांनी आलीस..

Back to top