'हवाहवाई'ची अफलातून 'शशी गोडबोले' (English Vinglish - Movie Review)

Submitted by रसप on 7 October, 2012 - 01:57

प्रत्येकाचं जीवन जर एक संवादिनी (harmonium) समजली, तर आई हा तिचा षड्ज (सा) असावा. ह्या षड्जाविना मैफल परिपूर्ण वाटत नाही. असं एक अनन्यसाधारण स्थान असतं, आईचं. पण हे आईपण खूप कठीण असतं. एक स्त्री, जेव्हा फक्त एक स्त्री असते, तेव्हा तिचं जग बरंच व्यापक असतं. पराकोटीची वेदना सोसून जेव्हा तीच स्त्री एका मुलाला जन्म देते, तेव्हा तो तिचा स्वत:चाही पुनर्जन्मच असतो. कारण, सोसलेल्या यातना मरणयातनेहून कमी नसतात आणि तिथून पुढे सगळे आयामही बदलणार असतात, बदलतात. एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.)

तर अशीच एक मध्यमवयीन, उच्च मध्यमवर्गीय 'आई' - शशी गोडबोले (श्रीदेवी). मोठी मुलगी व लहान मुलगा कॉन्व्हेन्ट शाळेत. नवरा कुठल्याश्या खाजगी कंपनी मोठ्या हुद्द्यावर. एकंदरीत सुखवस्तू कुटुंब. शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. साध्या सरळ शशीने इतर अनेक आयांप्रमाणे स्वत:चं विश्व स्वत:च्या मुलांत, नवऱ्यात व घरात बंदिस्त केलं असतं. तिचं हे 'गृहिणी'पण, तिचा साधेपणा आणि सर्वात मोठं म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या घरातील (सासू - सुलभा देशपांडे - वगळता) इतरांसमोर तिचं (न येणारं) "Enगlish Vingliश" ! चिमुरडी मुलगीसुद्धा आईचा पाणउतारा करत असते आणि सोशिक शशी जसं नवऱ्याने वारंवार झिडकारणं सहन करत असते तसंच मुलीचं फटकारणंही.
शशीसाठी माहेर म्हणजे फक्त तिची एक अमेरिकास्थित बहिण असते. ह्या बहिणीच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरतं आणि अमेरिकेला जायचं ठरतं. नवऱ्याची नोकरी, मुलांच्या शाळा.. उरली शशी! तिला एकटीलाच अमेरिकेला लग्नाच्या तयारीसाठी सर्वांच्या आधी जावं लागतं. एकटीने जाण्याची भीती वाटत असतानाही, शशीचं काहीही चालत नाही आणि मर्जीविरुद्ध ती अमेरिकेला जाते. (श्रीदेवीचा अभिनय अ-फ-ला-तू-न.) अमेरिकेला गेल्यावर कमजोर इंग्रजीमुळे तिला एका लहानश्या कॅफेत आलेला अनुभव तिला (आणि आपल्यालाही) हेलावून टाकतो आणि ती ठरवते की "बस्स.. आता हे इंग्लिश विन्ग्लीश शिकायचंच." कुणाला काही कळू न देता, ती एका 'इंग्लिश स्पीकिंग क्लास'मध्ये प्रवेश घेते आणि सुरू होतो एक गमतीशीर, भावनात्मक अध्याय.

220px-English_Vinglish_poster.jpg

पुढे काय होतं, हे सांगायची आवश्यकता नाहीच. कारण ही काही कुठली 'सस्पेन्स' कहाणी नाही. अपेक्षित वळणांनी ही कहाणी एका अपेक्षित शेवटावर संपते. पण हा प्रवास अनुभवण्यासारखा आहे. संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाटत राहाते.
हिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम. पुनरागमन जर असं होणार असेल, तर प्रत्येक अभिनेत्रीने वारंवार पुनरागमनच करत राहावं.. असा एक 'इल्लॉजिकल' विचार माझ्या मनात येऊन गेला!
सिनेमातील प्रत्येक लहान-मोठं पात्र आपली एक छाप सोडतं. 'लौरेंट' ह्या फ्रेंच माणसाच्या भूमिकेतील 'मेहदी नेब्बौ' खूप सहज वावरतो आणि मनाला स्पर्श करतो.
अतिशय भावनाप्रधान कथा असतानाही कुठेही अतिभावनिक नाट्य (मेलोड्रामा का काय ते..) न रंगवता अत्यंत संयतपणे आणि तरीही मनाला स्पर्श करत केलेल्या मांडणीसाठी नवोदित दिग्दर्शिका गौरी शिंदेला सलाम !
'नवराई माझी लाडाची..' हे गीत ठेका धरायला लावतं. अमित त्रिवेदीची बाकी गाणीही ठीक आहेत.
पण अखेरीस... मनात घर करते श्रीदेवीच.
थ्री चिअर्स टू श्रीदेवी..! टेक अ बाउ !
She is back with a BANG..!

रेटिंग - * * * *
http://www.ranjeetparadkar.com/2012/10/english-vinglish-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. पावलोपावली स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, आवडी-निवडीना ती बाजूला ठेवते. त्याग + तडजोड = आयुष्य असं एक सरळसोट समीकरण ती मांडते, मानते आणि पाळते. असं असतानाही वेळोवेळी आपण तिची कळत नकळत अवहेलना, हेटाळणी, अपमान, मस्करी करत असतो. (नीट विचार करा, आपण करत असतोच.) >>>>>>>>>>>>>>> अगदी अगदी!!!!!!!!!!!

शशीला कशाचीच कमतरता नाही. प्रेम, पैसा, सुख सारं काही आहे. पण, 'मान' नाही. >>>>>>>>>>>>>> अगदी अगदी!!!!!!!!!!!

छान रिव्ह्यू.. 'साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे-नित्याच्या अवलोकने जन परि होती किती आंधळे' हेच खरं. आईबद्दलचं निरीक्षण १००% बरोबर.

छानच लिहिलय....

साधे सरळ सिनेमा हल्ली बनायला लागलेत... काही गिमिक्स नाहीत... एकदम सिंपल...आणि थेट.

नक्की बघणार!!!!!

मस्त परिक्षण. गौरी शिंदे ही आर.बाल्कीची बायको आहे असं पेपरमधे वाचलं>>>> हो, काल आलेले ना ते तिघेही केबीसी मधे , श्री दे वी , गौरी आणी तिचा नवरा . श्री दे वी आणि गौरी हॉट सीटवर होत्या , ६,४०,००० जिंकून गेल्या.

संपूर्ण प्रवासात एकेक क्षण श्रीदेवीच्या बाजूची 'सीट' आपलीच वाटत राहाते.
हिंदी सिनेसृष्टीतील सगळ्यात मोठ्या शीतयुद्धाचा विचार केल्यास, दुसऱ्या फेरीतील पहिली चाल माधुरी हरली आहे.. अगदी चारीमुंड्या चीत. (संदर्भ - आजा नच ले) श्रीदेवीने तिच्या आजपर्यंतच्या कारकीर्दीतील तिचा सर्वोत्कृष्ट अभिनय 'शशी गोडबोले' म्हणून केला आहे. तिचं चाचरणं, घाबरणं, खूष होणं, 'मायकेल जॅक्सन' स्टेप करणं, रडणं, हसणं, बोलणं, चालणं... सगळं-सगळं एकेक शब्द, एकेक पावलासह लक्षात ठेवावं इतकं अप्रतिम.>>>

प्रचंड सहमत ! नेटके परीक्षण, आवडले रे भाऊ Happy

एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर. >>>>>>>>>>>> _/\_
खूप सुन्दर.... Happy

गौरी कुठे तरी मी बाल्कीपेक्षा चांगली डायरेक्टर आहे असे विधान केले आहे. ते औधत्यपूर्ण वाटले होते पण चित्रपट पाहिल्यावर मात्र पटले.

एका 'आई'चं जग, एका 'स्त्री'च्या जगापेक्षा संकुचित असतं. तिच्यासाठी मूल, नवरा आणि घर प्राथमिक असतात आणि बाकी सगळं, अगदी स्वत:ही, त्यानंतर.>>>>
फक्त ३ आठवड्यांसाठी घरापासून लांब जातानाची तिची घालमेल,मूल, नवरा यांची काळजी एकदम मस्त रंगवलय तीने.
आपण क्लास मध्ये असताना मुलगा पडतो याचे guilt feeling, एकदम अप्रतिम......