मी शक्यतो इथे धार्मिक बाबींवर मत देणे टाळतोच, पण याचा अर्थ असा नाही कि मला धर्म नाही किंवा, मला
मत नाही. बरेच दिवस मनात जे होतं, ते इथे लिहितोय. ( आणि इथले प्रत्येक वाक्य हे माझे वैयक्तीक मत आहे.)
गीतेतील किंवा महाभारतातील नेमके श्लोक मला माहीत नाहीत, पण द्रौपदीच्या, " तेव्हा कुठे गेला होता,
राधासूता, तूझा धर्म ?" आणि सुभद्रेच्या, " धर्मयुद्ध नव्हे हे, " अशा उदगारात जो धर्म अपेक्षित आहे, तो
माझ्या कल्पनेतला धर्म. आणि मग त्या अर्थाने, एखादे राष्ट्र, निधर्मी असूच शकत नाही !
धर्म म्हणजे, जर काही चांगल्या वागणुकीच्या कल्पना, असे जर काही असेल, तर मला अशा कल्पनांची, एक
यादी करावीशी वाटते, जी सर्वसाधारणपणे सर्वांना मान्य होईल, निदान मला तरी मान्य आहे.
वागणुक या शब्दातच एक गंमत आहे, वागणुक हि नेहमी दुसर्या व्यक्तीच्या संदर्भातच असते, नाही का ?
म्हणजे मी माझ्या स्वतःशी कसा वागतो, याच्याशी कुणालाच काही घेणे देणे नाही, नसावे.
मग जे वागणुकीचे जे नियम करायचे ते दुसर्याच्याच संदर्भात. आता हे असे दुसर्याशी जमवून का घ्यावे लागते ? कारण त्याला आता, म्हणजे आताच्या जीवनपद्धतीत पर्यायच नाही.
टॉम हँक्स च्या कास्ट अवे, सारखे रहायचे असेल, तर गोष्ट वेगळी. पण तसे राहणेही शक्य नाही, कारण
तेवढी बेटंच अस्तित्वात नसतील. पण माणूस नावाचे बेट, अशी कल्पना केली, तर माझे विचार, जे मी
व्यक्त करत नाही, कुणाला सांगत नाही, आणि कुणाला वागणुकीत दिसत नाहित, त्यावर धर्माची काय
कुणाचीच बंधने असणार नाहीत. त्या अर्थाने लाईफ इज ब्यूटीफूल हा चित्रपट बघा ना, म्हणजे मला कैदेत
टाकून, कुणी माझा आनंद नाही, माझ्यापासून हिरावून घेऊ शकत.
केकी मूस यांचे उदाहरण घ्या. त्यांनी अनेक वर्षे एका घरात स्वतःला कोंदून घेतले होते, तरीपण ते जगापासून
अलिप्त होते असे म्हणता येईल का ? त्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांना बाहेरील लोकांची मदत
लागतच असे.
आज आपल्या अगदी ज्या सामान्य गरजा आहेत, त्या आपण पैश्याने विकत घेऊ शकतो, पण त्या आपण
स्वतः नाही ना निर्माण करू शकत ! म्हणजे मला जर अन्न गरजेचे वाटत असेल तर शेतकरी, वाहतूकदार,
विक्रेता सगळेच हवेत. त्यामूळे माझे या सर्वांशिवाय, जगणे अशक्यच !
आजही जगात असे काही मानवसमूह आहेत, अगदी भारतीय बेटांवर देखील आहेत, ज्यांच्याशी आपला काहीच
संपर्क नाही, किंवा त्या समूहांना तो नको आहे. पण ज्या अर्थी ते समूह आहेत, त्या अर्थी त्यांचेही काही, परस्पर
वर्तुणकीचे नियम असतीलच. ते असल्याशिवाय तो समूह, असा एकमताने कसा राहू शकेल ?
मानव या पृथ्वीवर लाखो वर्षे नांदतोय, आणि आपण ज्याला धर्म म्हणतो, याचा इतिहास काही हजारो वर्षांच्या
मागे जात नाही, म्हणजे धर्मावाचून माणूस जगू शकत नाही, याला काही अर्थ नाही. पण त्याकाळातही
काही नियम असतीलच ना ? म्हणजे शिकार कुणी करायची, ती कशी वाटून घ्यायची.. मग हे नियम कुठल्या
आधारावर ठरले असतील. माझ्या कल्पनेप्रमाणे, हे आधार खालीलप्रमाणे असावेत. किंवा निदान असे म्ह्णतो, कि मला या कल्पना जोपासाव्यात, असे मनापासून वाटते.
जी यादी देतोय, तो क्रम नाही.
१) समता
समता हि आपल्या अगदी रक्तात किंवा विचारात, पक्की रुजलेली आहे. सामुहिक मालमत्ता वाटून घेताना
समानता असावी असे, सर्वांच्याच मनात असते. आता हि समानता म्हणजे निव्वळ भागाकार नाही, हे सुद्धा
आपण मान्य करतोच.
समजा आदीमानवाने एखादी शिकार करुन आणली, आणि त्याच्या कुटंबात ६ जण असले, तर त्या शिकारीचे
सहा भाग करणे म्हणजे समानता नव्हे, तर ज्याला त्याला त्याने केलेल्या श्रमा एवढा किंवा गरजे एवढा वाटा.
म्हणजे ज्याने ती शिकार करुन आणलीय त्याला मोठा वाटा, म्हातार्या व्यक्तीला श्रम सोसत नाहित, म्हणून
थोडा कमी वाटा.. बघा पटतय का ?
आणि या समानतेला जेव्हा फाटा दिला गेला, त्यातून युद्ध, दंगली झाल्या. किंवा काही श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या
अनैसर्गिक कल्पना पुढे आल्या. गतजन्मीच्या पापपुण्याचे हिशेब मांडले गेले, किंवा पुढे सोसाव्या लागणार्या
काल्पनिक, नरकवासाची कल्पना पुढे आणली गेली.
पण तरीही ही समता आपल्या मनातून गेली नाही. न पटणारे भेद, आपल्या मनाला त्रासच देतात. दोन भावंडात
भेदभाव केल्यास, ते भावंडच निषेध करते. एकाची आक्षेपार्ह पोस्ट अॅडमिन ने काढून टाकली, तर दुसर्याची
(आपल्याला आक्षेपार्ह वाटणारी ) पोस्ट का नाही काढली, अशी तक्रार आपण करतो. मग शेवटी अॅडमिनना,
आक्षेपार्ह म्हणजे नेमके काय, याची व्याख्या करावी लागते.
पण नैसर्गिक न्यायानुसार समता असावी, निदान मी तरी भेदभाव करू नये, अशी माझी धारणा.
२ ) प्रेम
बघा हा शब्द वाचतानाच मनात एक मोरपिस फिरले ना ? प्रेम ही अगदी आदीम भावना आहे. आणि या
प्रेमातून मग समानतेला, आपण किंचीत मुरड देतो.
अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून हे प्रेम दिसते. समजा एखादा ग्रुप हायकिंगला निघालाय, बर्याच वेळाने
काही खायला मिळाले, तर ज्याच्या हाती ते खाद्य मिळते, ते तो एकटा किंवा सर्वात आधी खातो का ?
अजिबात नाही.
समजा गर्दीच्या ठिकाणी, बसायला एकच जागा मिळाली, तर आपण ती हमखास सोबत्याला देऊ करतो. किंवा
आपल्यापेक्षा एखादी गरजू व्यक्ती दिसली तर तिला देऊ करतो.
आपण हे करतोच, पण दुसर्याने हे करावे अशी अपेक्षाही ठेवतो. म्हणजेच समूह म्हणून आपली हि एक
सामायिक भावना ठरते. सहानुभूती, हि एक चांगली वागणूक ठरते,
एखादा जर असे वागत नसेल, तर त्याला नियमात बांधले जाते. म्हणून मग दानधर्म, जकात, इफ्तारच्या
वेळेस इतरांना दिलेले आमंत्रण, प्रसाद, भंडारा, फिस्ट या प्रथा ठरतात.
आज आपल्याकडे जे आहे, ते ज्यांच्याकडे नाही, त्यांना वाटून दिले तर आपल्या पदरात पुण्य पडेल, असे
अमिष ठेवले जाते.
हि भावना, आपल्या मनात असतेच, आणि इतरांच्या मनातही असावी, अशी अपेक्षाही असते. परंतु याची
जाण ज्याला नसेल, त्याला ती करुन द्यावी लागते.
प्रत्येकाला प्रेम करण्यासाठी आणि प्रेम करुन घेण्यासाठी, कुणीतरी असायलाच पाहिजे, हि माझ्या लेकीने मला
दिलेली शिकवणूक आहे.
३) कृतज्ञता
जर आपण प्रेमाच्या बाबतीत, घेणेकर्याच्या भुमिकेत असलो, तर आपल्या मनात अगदी नैसर्गिक रित्या
कृतज्ञतेची भावना निर्माण होते. आजकालच्या जमान्यात, आपण प्रत्येक सेवेचे मोल करतो.
पण तरीही काही प्रसंग असे येतात, कि त्या मोजलेल्या मोलापेक्षा, मिळणारे समाधान जास्त असते.
( अर्थशास्त्राचा नियमच आहे हा ) आठवून बघाना, एखाद्या डॉक्टरने दिलेला धीर, वकिलाने दिलेले
आश्वासन, भाजीवालीने दिलेली जास्त भाजी आपल्या मनात हि भावना निर्माण करते कि नाही ?
आणि जर आपण मोल मोजले नसेल, तर हि भावना जास्तच प्रबळ होते. आठवा एखाद्या दूरच्या रेल्वे प्रवासात
एखाद्या पंजाबी / गुजराथी कुटूंबाने देऊ केलेले जेवण, गरजेच्या वेळी एखाद्या मित्राने केलेली आर्थिक मदत,
कितीतरी उदाहरणे सापडतील.
नेमकी काय भावना निर्माण करते तूमच्या मनात ? आपण याची परतफेड केली पाहिजे, हिच ना. मग तूम्ही
त्या कुटूंबासाठी आइसक्रीम खरेदी करता किंवा मित्राच्या वाढदिवसाला एखादी छानशी भेटवस्तू देता.
पण आयूष्य तूम्हाला अशी एकास एक परतफेडीची संधी देत नाही, मग तूम्ही ती भावना मनात जपता.
आणि ज्यावेळी इतर प्रसंगात / इतर व्यक्तीच्या संदर्भात, मदतीचा हात पुढे करता.. हि भावना म्हणजे कृतज्ञता सर्वांनीच जपावी, असे एक समूह म्हणून तूम्हाला वाटते.
मग कांजिण्या / गौर सारख्या आजारपणात, औषध देणारी एखादी स्त्री, शितलादेवी म्हणून जपली जाते आणि
तिला दिलेल्या धान्याच्या मोलाची आठवण म्हणून, तिला आजही दहीभात दिला जातो. शत्रूच्या हल्ल्यात
समूहाचे रक्षण करणारी स्त्री, दुर्गामाता म्हणून पुजली जाते.
पण शेवटी या प्रतिमा म्हणजे त्या स्त्रिया नव्हेत, हे मात्र आपण विसरतो, आणि आज खरोखरच आपल्यावर
उपचार करणार्या व्यक्तीला, किंवा आपले रक्षण करणार्या व्यक्तीला विसरतो. आणि केवळ प्रतिमांना
कवटाळून राहतो.
कधीकाळी आपले ज्ञान मर्यादीत होते त्यावेळी पाऊस पाडणारा वरुण आणि उष्णता देणारा सूर्य, आपला देव होता. आपण या प्रत्येकाला स्वतंत्र देवत्व दिले, तर हे सगळे एकाच शक्तीने केले, असे एकेश्वरवादी म्हणतात.
पण भावना कृतज्ञतेचीच ना ? मला सर्वांबद्दलच ही भावना जपायला आवडते.
४) न्याय
नैसर्गिक न्याय हा आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो. आपण अन्याय केला तर आपलेच मन आपल्याला
खात राहते.
पण न्याय म्हणजे तरी काय. तर चूकीबद्दल शिक्षा आणि ज्याच्यावर अन्याय झालाय, त्याला भरपाई.
अगदी सोपी व्याख्या आहे, पण याबाबतीत मात्र एकमत होत नाही, सहसा आपले. म्हणजे न्याय व्हावा,
यावर होते पण अन्याय (अपराध) कुणी केला, आणि अन्यायाचे मोल काय, यावर होत नाही.
यावर आपण बराच विचार करतो, आणि शक्यतो नि:पक्षपाती असे नियम ठरवतो. शिवाय अन्याय करतेवेळी
खरोखरीच त्या व्यक्तीच्या मनात कपट होते का ? याबाबतीत खल करतो.
इथे सहज आठवली ती उदाहरणे देतो.
चंद्रमोहन, यांचा पुकार या नावाचा एक चित्रपट होता. त्यात न्यायप्रिय राजाच्या,
राणीच्या हाते, आजणतेपणी एका माणसाची हत्या होते, त्यावर त्या माणसाची पत्नी, राणीलाही जीवे
मारण्याची मागणी करते. न्यायप्रिय राजा संकटात सापडतो, पण तो त्यातून मार्ग असा काढतो, कि त्या स्त्रीला असे सांगतो, कि जर राणीने तूझ्या नवर्याची हत्या केली असेल, तर तू सुद्धा तिच्या नवर्याची हत्या
कर.
मीनाकुमारी आणि राजेश खन्नाच्या दुष्मन मधे, आपल्या नवर्याला अपघाताने मारणार्या ट्रक ड्रायव्हरला
शिक्षा केल्याने, माझा नवरा काही परत येणार नाही, असे मीनाकुमारी, न्यायाधिशाला सांगते, त्यावर
त्या माणसाचीम कौटुंबिक जबाबदारी, अपराध्याने घ्यावी, असा न्याय केला जातो.
खरं तर न्यायाची हि उदाहरणे आपल्याला पटली तरी आपण मान्य करत नाही, खून का बदला खून,
चोरट्याचे हात कलम, हीच आपली सामुहिक भावना असते. त्यामूळे न्याय हा भावनेने न देता, काटेकोरपणे,
तटस्थपणे, आणि न्यायबुद्धीनेच द्यायला पाहिजे, हे आपल्याला स्वीकारणे जड जाते. (म्हणूनच
अपराध्याचे वकीलपत्र घेणार्या वकीलाचा, आपण राग करतो.) पण एक मात्र नक्की, न्याय व्हावा, याबद्दल
मात्र आपले एकमत असते.
पण प्रत्यक्षात मात्र न्याय होताना दिसत नाही, म्हणजे प्रत्येक अपराध्याला शिक्षा होताना दिसत नाही. मग
आपण एक कल्पना लढवतो, कि एके दिवशी, म्हणजेच मृत्यूनंतर किंवा कयामतच्या दिवशी, अंतिम
न्याय होणार आहे.
न्याय व्हावा आणि तो होणार यावर माझा ठाम विश्वास आहे.
५ ) क्षमा
माणसाच्या हातून चुका होणारच, हे एकदा मान्य केले तर न्याय व्हावा, याचा आपण आग्रह धरतो. पण
एका क्षणी क्षमा करणे, हा एक दिलासा किंवा सुटकेचा मार्ग ठरतो. बौद्ध धर्मासारखे काही धर्म, या पायावर उभे राहिले.
मयसभेतल्या फजितीला द्रौपदी हसली, म्हणून तिची विटंबना, मग जरासंधाचा वध, मग अभिमन्यूचा वध, मग द्रौपदीच्या मूलांचा झोपेत वध.. हे सूडचक्र थांबवणे कुणालाच शक्य झाले नाही.
सामुदायिक रित्या क्षमा करणे, अजून आपल्याला स्वीकारणे अवघड जातेय. व्यक्तीगत पातळीवर आपण
ते करु शकतो.
डोर चित्रपटातल्या कथेनुसार, सौदी सारखा एखादा देश असा कायदाही करतो.
पण क्षमा जरी केली, तरी अपराध्याच्या मनातून ती भावना जात नाही आणि खोटे कशाला बोला, क्षमाकर्त्याच्या मनातूनही, श्रेष्ठत्वाची भावना जात नाही. या भावनेवर जर विजय मिळवता आला तर !
पण अनेकदा क्षमा, आपला एक हक्क म्हणून आपण बजावतो. मग त्यासाठी काशीयात्रा, कन्फेशन किंवा चादर चढवणे असे वरकरणी पोकळ वाटणारे मार्ग शोधतो.
पण तरीही अपराधाची भावना तीव्र असेल, तर क्षमा मिळावी, हा आपल्याला अधिकारही वाटतो !
मला तो अधिकार वाटत नसला, तरी क्षमा केल्यास मी सुखी होईन, असा विश्वास वाटतो. या बाबतीत मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
६) स्वातंत्र्य
हा शब्द देखील आपल्या मनात एक सुंदर भावना निर्माण करतो नाही का ? पण मी अगदी पहिल्यांदा लिहिल्याप्रमाणे, आपले आपण स्वतंत्र असतोच. स्वातंत्र्य हि नेहमीच देवाणघेवाणीची बाब असते.
आपण एखाद्याला स्वातंत्र्य देतो ते आपल्या संदर्भात, म्हणजे समजा मी एखाद्या मित्राला सांगतो, कि मला
हवा त्यावेली फोन कर, याचा अर्थ मी माझ्या स्वातंत्र्याला थोडी मुरड घालतो, किंवा त्याच्या फोन ज्यावेळी
येईल, त्यावेळी तो उचलण्याची जबाबदारी, म्हणजे किंचीत पारतंत्र्य स्वीकारतो.
आणि हि अशी पदोपदी स्वत:च्या स्वातंत्र्याला मुरड घालण्याची वेळ समूहात राहताना येतेच. घरात तूम्हाला
मोठ्याने गाणी ऐकायची असतील, आणि इतरांना झोपायचे असेल, तर तूम्ही हेडफोन लावता, हो ना ?
म्हणजे स्वतःचा आनंद जोपासताना, इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतोच. हा दुसर्याचा, दुसर्याच्या श्रद्धेचा, भावनांचा, सोयी गैरसोयीचा विचार करणे, आनंद देता नाही आला तर निदान त्रास न देणे,
हेच माझ्यासाठी स्वातंत्र्य आहे.
या तत्वांवर आधारीत माझा धर्म हा असा, साधासुधा आहे. अनुयायी मिळवून समूहाची ताकद माझ्याजवळ असावी असे मला वाटत नाही, कारण इतर समूहाची मला भिती वाटत नाही.
चांगला लेख आहे दिनेशदा.
चांगला लेख आहे दिनेशदा. पूर्णपणे पटला असे म्हणता येणार नाही, पण आवडला.
सर्व मते वैयक्तिक असल्याने असहमत असण्याचे स्वातंत्र्य घेतो आहे.
लेख आवडला विषय खूप समन्जसपणे
लेख आवडला
विषय खूप समन्जसपणे अन प्रामाणिकपणे हाताळलात !!
धन्यवाद दिनेशदा या लेखासठी
लेख चांगला आहे. मतांशी सहमत
लेख चांगला आहे. मतांशी सहमत असणं हे नेहमी शक्य होणार नाहीच. पण तुमची म्हणून जी मतं आहेत ती मांडण्याची शैली, त्यामागचा विचार, चिंतन याचा मी फॅन आहे. ( हे याआधीही सांगितलेलं आहेच). पुन्हा पुन्हा वाचला जाईल असा लेख आहे हा.
एक वाचन झालं. बाकी सगळी मते
एक वाचन झालं.
बाकी सगळी मते तुमची वैयक्तिक आहेत, असे तुम्ही म्हटले आहे. त्याबद्दल चर्चा व्हावी की होऊ नये हे वेगळे धर्मसंकट आहे..
फक्त, एका वाक्याबद्दल थोडा प्रॉब्लेम मला वाटतो.
>>आणि मग त्या अर्थाने, एखादे राष्ट्र, निधर्मी असूच शकत नाही !<<
निधर्मी अन धर्मनिरपेक्ष यात तुमचा थोडा गोंधळ होतोय का?
निधर्मी म्हणजे धर्मच नसलेला, अन धर्मनिरपेक्ष म्हणजे माझा धर्म पाळण्याची मला पूर्ण मुभा असलेला, त्याच वेळी इतरांच्या धर्मावर आक्रमण करायची मला परवानगी नसलेला, असा अर्थ अभिप्रेत आहे. थोडक्यात प्रत्येकानेच आपापला धर्म आपापल्या घरात ठेवावा. दारात फक्त कायदा पाळावा अशी भारताच्या धर्मनिरपेक्षतेत अपेक्षा आहे.
पण तथाकथित 'हिंदुत्व'वाद्यांनी ज्या अनेक शब्दांचे विकृतीकरण केले आहे, जसे 'समाजवादी', 'विचारवंत', तसेच धर्मनिरपेक्षचं निधर्मी करून टाकलेलं आहे.
तुम्हाला तोच शब्द अभिप्रेत आहे, की धर्मनिरपेक्ष म्हणायचं आहे?
पण तथाकथित
पण तथाकथित 'हिंदुत्व'वाद्यांनी ज्या अनेक शब्दांचे विकृतीकरण केले आहे >>> काही तरी गोंधळ होतोय तुमचा (बहुतेक). . सेक्युलर म्हणजे सर्वधर्मसमभाव असा अर्थ घेतला तर आपला देश सर्वधर्मसमभावी.पण तरी देखील एखाद्या दुसर्या धर्माला झुकते माप काही विचारवंत देतात तेंव्हा त्याचा उल्लेख युडोसेक्युलर म्हणून केला जातो. हिंदूत्ववादी हे निधर्मी शब्द उच्चारत नाहीत तर तर त्यांचा राग स्युडो-सेक्युलरवर जास्त आहे.
आपण नमुद केल्या सारखे निधर्मी आणि सर्वधर्मसमभाव हे दोन वेगळे शब्द आहेत व ज्यांना अनेक लोक एकच म्हणून समजतात. त्या दुसर्या बाफवरही हा गोंधळ होताच.
तुम्हाला तोच शब्द अभिप्रेत आहे, की धर्मनिरपेक्ष म्हणायचं आहे? >>
दिनेश मत मांडतील पण ते ह्या वरील त्यांनी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ तुम्ही धर्म म्हणजे रिलिजन घेत आहात. तो नाही. तेंव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, ह्यात धर्म म्हणजे कर्तव्य अभिप्रेत आहे. धर्म म्हणजे रिलिजन न घेता कर्तव्य म्हणून घ्या मग त्यांनी जे लिहिले आहे ते वेगळ्या रूपात दिसेल.
संस्कृत धर्माला रिलीजन हा आंग्ल शब्द मला चुकीचा वाटतो पण तोच रुढ आहे.
दिनेशदा आवडले. आणि पटलेही.
दिनेशदा आवडले. आणि पटलेही.
वाचतेय. संकल्पना
वाचतेय.
संकल्पना आवडली.
मुद्दे सगळेच पटले पण त्या त्या शिर्षकाखाली केलेलं विवेचन पटलंच असे नाही.
माझ्या धर्मात याच यादीत प्रामाणिकता-सचोटी, आणि कर्तव्यनिष्ठा हे दोन मुद्दे वाढतील तर क्षमा हा मुद्दा वगळला जाईल.
फार छान! दिनेशदा +१. माझे
फार छान!
दिनेशदा +१.
माझे वैयक्तिक मत असे आहे की तुम्ही जो साधासुधा विचार केला आहे धर्माचा, तोच विचार सर्व धर्मसंस्थापिकानी केला असावा. मात्र त्यांच्या आजूबाजूचे अनुयायी म्हणू, अनाठायी म्हणू, तथाकथीत धर्मभास्कर म्हणू या लोकानी गोची केली आहे. म्हणूनच सर्वच धर्मांमध्ये कर्म्-कांड, बुवाबाजी वाढली आहे.
ज्याला हवा तो धर्म ज्याने त्याने पाळावा फक्त त्याबद्धल जनमानसांत न बोलण्याची, दुसर्याला ते पटवून न देण्याची, जर सक्ती करता आली तर माझा त्याला पाठींबा राहील.
ज्याना धर्मप्रसार करायचाच आहे, भाषणे ठोकायचीच असतील त्यानी सर्वप्रथम आधी प्रत्येकी १० वर्ष, सगळे धर्म पाळून दाखविले पाहिजेत.
दिनेशदा, १०००००० ++++++
दिनेशदा,
१०००००० ++++++ अनुमोदन !!!!
केदार,
छान, डोळ्यात अंजन घातलत !!
दिनेशदा, छान चिंतन! खरंतर
दिनेशदा, छान चिंतन!
खरंतर बहुतांश धर्माच्या तळाशी ही तत्त्वंच असणार. पण पुढे प्रत्येकाने आपल्या स्वार्थानुसार त्यावर पुटं चढवली आणि धर्म गुंतागुंतीचे झाले, एकमेकांपासून वेगळे दिसायला लागले.
>>>>> दिनेश मत मांडतील पण ते ह्या वरील त्यांनी लिहिलेल्या वाक्याचा अर्थ तुम्ही धर्म म्हणजे रिलिजन घेत आहात. तो नाही. तेंव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, ह्यात धर्म म्हणजे कर्तव्य अभिप्रेत आहे. धर्म म्हणजे रिलिजन न घेता कर्तव्य म्हणून घ्या मग त्यांनी जे लिहिले आहे ते वेगळ्या रूपात दिसेल.
संस्कृत धर्माला रिलीजन हा आंग्ल शब्द मला चुकीचा वाटतो पण तोच रुढ आहे.
>>>>> अगदी अगदी.
केदारजी, धर्म म्हणजे कर्तव्य,
केदारजी,
धर्म म्हणजे कर्तव्य, धारयति इति धर्मः किंवा समाज सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले (अॅडॉप्ट केलेले - अंगिकारलेले?) नियम, फ्रीडम व रिस्पॉन्सिबिलिटी एकत्र असणे, नैसर्गिक न्यायाची तत्वे इ. बद्दलची मते त्यांची अन माझी बर्यापैकी जुळणारी आहेत.
फक्त त्या 'निधर्मी' या शब्दाबद्दल थोडे वाटले ते लिहिले. (सुडो सेक्युलर हा शब्द वापरून वापरून चांगल्या लोकांनाही वाईट ठरवणे मी पाहिलेले आहे. व त्यावरून चर्चा सुरू केल्यास फाटे फुटून दिनेशदांच्या धाग्याचा टिपिकल धार्मिक बाफ होऊ नये असे मला वाटते. म्हणून याबद्दल पुढे बोलणार नाही.)
रिलिजन म्हणजे 'फक्त' उपासनापद्धती, त्यानुसार फक्त हिंदू हा 'धर्म' व इतर सगळे फक्त पंथ हा जो प्रकार नव्याने ऐकू येतो आहे, तो बाष्कळ वाटतो.
अनेक भाषांतील अनेक मूळ शब्द इतर भाषांत त्यांच्या सर्व अर्थछटा/संदर्भांसहित येऊच शकत नाहीत. पण म्हणून 'सिमिलर' शब्द वापरले जातात, अन त्या रूढ अर्थाने धर्म = रिलिजन हे योग्यच आहे. कारण तिथेही समाजाचे चलनवलन व्यवस्थीत व्हावे म्हणून घालून दिलेले नियमच आहेत. मोझेसने आणलेल्या १० आज्ञा काय आहेत? एका भटक्या समूहाला मार्गदर्शक ठरतील असे कायदेच तर आहेत ते! त्यात काय देवाला १२ बोकड कापा अन ५० वेळा डोके जमीनीला टेकून नमस्कार करा असे लिहिले आहे काय? मग या अर्थाने तो धर्म नाहिये का??
असो. आपण मला उत्तर दिलेत म्हणजे आपणास चर्चेत रस असावा असे वाटते म्हणून टंकले आहे. चूभूदेघे.
निधर्मी, या शब्दाचा माझ्यामते
निधर्मी, या शब्दाचा माझ्यामते अर्थ, निघून गेला आहे धर्म ज्यापासून तो ( जसे निष्पर्ण, निष्कांचन.. ) !
साती, सचोटी आणि प्रामाणिकपणा हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, सगळे आयूष्य मी त्यापायी लढलो आहे, लढणारही आहे. क्षमा या तत्वाची ओळख अजून पूर्ण झाली नाही मला, तसे मी लिहिलेच आहे.
जर हि किंवा अशीच तत्वे यांचे संकलन म्हणजे धर्म असेल, तर सर्व धर्म एकच आहेत. फक्त नावे वेगवेगळी आहेत.
आणि एका व्यक्तीने, एका समूहाला, एका प्रसंगी सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे, म्हणजे धर्म नाहीच.
चर्चा व्हावीच, पण तिथे दुसर्याचे मत कसे चुकीचे आहे हे सांगण्यापेक्षा, माझे मत काय आहे, हे सांगितले तर जास्त चांगले. स्वातंत्र्याचा तो अर्थ, मी घेतो.
इब्लिस, १२ बोकड कापा हे जसे लिहिलेले नाही, तसे अमूक एका दिवशी अमूक व्रत करा हेही लिहिलेले नाही.
नंतर लावलेल्या ठिगळांनाच धर्म समजत राहिले आहेत, सगळे.
पैश्यावरुन एका वृद्धाला काही बोलल्यावर, वृद्ध माणसाशी अदबीने बोलावे, आवाज चढवू नये, पैगंबरांच्या या
सल्ल्याला, बुरखा घाल, असा अर्थ नंतर लावला गेला. आणि तो धर्म झाला.
जर हिंदु या नावाचा धर्म, भारतदेशाचा धर्म होता, तर मग धर्मांतर होऊच कसे शकते ? सक्तीने, विहिरीत पाव
टाकून धर्म बाटतो ? त्यावेळी का नाही कुणी ठणकावून सांगितले कि आमचा धर्म, असा पाव वगैरे खाण्याने
बाटत / बदलत नाही ? तर सर्व, फार वेगळे घडले असते.
त्यावेळी दाखवलेल्या संकुचित वृत्तीची फळे चाखतो आहे, आपला देश आज.
सुलु, धर्म खरेच अगदी खाजगी बाब आहे, अंघोळीच्या साबणासारखी. समुहात वावरताना स्वच्छ रहावे, अंगाला दुर्गंधी येऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी. त्यासाठी कुठला साबण वापरावा, वापरावाच का.. हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य.
सुलु, धर्म खरेच अगदी खाजगी
सुलु, धर्म खरेच अगदी खाजगी बाब आहे, अंघोळीच्या साबणासारखी. समुहात वावरताना स्वच्छ रहावे, अंगाला दुर्गंधी येऊ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी. त्यासाठी कुठला साबण वापरावा, वापरावाच का.. हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य.>>>>> + १००००००
ह्या एका वाक्यातच सगळे आले. दिनेशदा तुमचे विचार एकदम क्लीअर असतात... थेट.... म्हणुनच एकदम प्रामाणिक वाटतात.
केदार ने लिहिल्या प्रमाणे तुम्हाला धर्म म्हणजे "कर्तव्य" अपेक्षित आहे. कर्तव्य हे प्रत्येक व्यक्तीने स्वतःला घालुन घेतलेले आचरणाचे बंधन हे ही होवु शकते. एक व्यक्ती जन्मते तेंव्हा ती आपल्या जन्मा बरोबरच अनेक नात्यांना अनेक कर्तव्यांना जन्म देते.
दुर्दैवाने धर्म हा खुप ढोबळ पातळीवर धरला जातो
माझाच धर्म श्रेष्ठ आहे म्हणून
माझाच धर्म श्रेष्ठ आहे म्हणून अन्य धर्म आणि त्यातील विचार कनिष्ठ आहेत अशी सोयिस्कर समजूत करून उपदेश करण्यार्यांची आज समाजात मांदियाळी झाली असून त्याच्या आधारे रयतेला बुद्धू बनवून स्वतःची पोळी भाजून घेणारे किती आहेत हे प्रतिदिनी दिसत असतानाच.......दिनेशदा यांचा हा अत्यंत विवेकाने लिहिलेला तसेच संयत मांडणी असलेला हा लेख खरे तर दिशा दिग्दर्शनाचे काम करील इतक्या महतेचा आहे.
".....अनुयायी मिळवून समूहाची ताकद माझ्याजवळ असावी असे मला वाटत नाही..." लेखातील हे अंतिम वाक्य तर पताका ठरावे अशा दर्जाचे आहे.
खरे पाहिले तर कोणताही धर्म हिंसेची भलावण करीत नाही....पण धर्म संस्थापकांना मात्र धर्मप्रसारासाठी स्वतःजवळ अनुयायी असणे नितांत गरजेचे मानल्याचा दाखला आहेच. पुढे या अनुयायांनी [जरी सुरुवातीच्या काळात निष्ठावानांची संख्या लक्षणीय असूही शकेल] मात्र आंधळेपणे आद्य गुरुंच्या वचनाचा हवाला देऊन हिंसेला जवळ केल्याचे दाखले आहेत [अपवाद आहेतच अर्थात, पण त्याचा इथे विचार नको]. शिवाय धर्म प्रसारणाकडे पाहून अनुयायांच्या पद्धतीकडे दुर्लक्षही करण्यात येत होतेच.
धर्माच्या बाहेर जावून एकूणच मनुष्यजातीच्या हिताला अनुकूल ते चांगले, प्रतिकूल ते वाईट, अशी नीति-अनीतीची स्पष्ट मानवी व्याख्या करणे इतिहासाच्या कोणत्याही वळणावर आवश्यक होते...आजही आहे. पण लोकांना 'चेतवायचे आहे, पेटवायचे आहे...' तर मग धर्मासारखी दुसरी परिणामकारक अफू कोणती नसते हे समाजातील संधीसाधू घटकाने ओळखले होते, आणि मग माणसामाणसात ज्या चिरफळ्या पडत गेल्या त्या अशाच कारणास्तव की ज्याच्या मानवाला नित्याच्या व्यवहारात कसलाही उपयोग होऊ शकत नाही.
आज मी अमुक एक धर्म कट्टरपणे पाळतो म्हणून मला माझा गॅस सिलेन्डरवाला दुसरी टाकी देणार नाही....किंवा सहा सिलेन्डरची अट माझ्यापुरती तो काढूनही टाकणार नाही. व्यवहारी जग हे कठोरपणे विशिष्ट नियमाच्या रस्त्यावरूनच चालत असते, किंबहुना ते तसे चालणे हीदेखील काळाची गरजच आहे. धर्म आणि त्यासंबंधीचे आचार हे भरल्यापोटी निघालेली एक वाफ असते.
दिनेशदा लेखाच्या सुरुवातीला जसे म्हणतात, "नैसर्गिक न्यायानुसार समता असावी, निदान भेदभाव तरी करू नये,...." याच विचारानुसार जर मग विश्वदेवतेची पूजा करायचीच असेल तर प्रथम स्वत:चे निरिक्षण स्वतःच करावे आणि पाहावे की मी खर्या अर्थाने नित्य जीवनव्यवहारात समतेचे पालन करीत आहे की नाही. आणि जर तसे नसेल तर मग धर्माच्या नावाखाली त्या देवाची/देवतेची आपण स्वत:च कुचेष्टा करीत आहे, असाच निष्कर्ष काढावा लागेल.
एका चांगल्या लेखाबद्दल दिनेशदा यांचे अभिनंदन.
दिनेश दा,मला हा लेख खूप
दिनेश दा,मला हा लेख खूप आवडलाय!!
मला अभिप्रेत असलेला धर्माचा
मला अभिप्रेत असलेला धर्माचा अर्थ हाच आहे.. जर हाच धर्म सगळ्यानि अनुकरला तर जग किति सरळ अनि आयुष्य छान होउन जाईल.
दिनेशदा, निधर्मी शब्दाचा अर्थ
दिनेशदा, निधर्मी शब्दाचा अर्थ असा घेतला तर धर्म नसलेल्याला अधर्मी म्हणावे लागेल. अधर्मि शब्दाला वेगळीच निगेटिव शेड आहे.
खरं तर प्रत्येकाने सद्सद विवेक बुद्धी ठेवली तर सगळ्यांचा धर्म एक ठरेल.
मी स्वतः सध्या कोणताही रिलीजन म्हणण्यासारखा धर्म मानत नाही.
माझा कागदोपत्री एक धर्म आहे अर्थात.
माझा धर्म हे जे मी म्हणाले आधीच्या प्रतिसादात तो रिलीजन या अर्थाने नव्हेच.
मी दुसरा कुठलाही धर्म पाळत असेल तर चालवून घेईन जोपर्यंत मला त्रास होत नाही किंवा दुसर्याच्या धर्मपालनाने धर्म प्रसाराच्या पद्धतीने माझे नुकसान होत नाही. पण जर एखादा उगाचच जगात माझा धर्मच श्रेष्ठ, माझ्या श्रद्धाच दिव्य असे म्हणून इतरांचा अपमान करत असेल , त्रास देत असेल तर मला व्यक्तिशः काही त्रास नसला तरी शक्य त्या मार्गाने निषेध नोंदवेनच.
नाहीतर होईल काय दिनेशदा म्हणतायत तसा धर्म पाळणार्यांवर उद्या दुसर्या कुठल्याही धर्माचे फॅनॅटिक्स आक्रमण करतील
अशोक, व्यावहारिक जगात धर्माच्या मुद्द्यावर बर्याच बाबि अवल्म्बुन असतात, निदान आम्ही राहतो तश्या लहान शहरात.
इथे कामवाली बाई, डॉक्टर, भाडेकरू, जमिनीचा ग्राहक, गाडीचा ग्राहक हे सगळे धर्मावर अवलंबून असते.
राजकारणाचे तर विचारूच नका.
आत्तापर्यंत आम्हाला आलेल्या जमिनीच्या २-३ ऑफर केवळ आम्ही अमूक एका धर्माचे आहोत म्हणून आल्या होत्या.
@ साती.... "माझा कागदोपत्री
@ साती....
"माझा कागदोपत्री एक धर्म आहे अर्थात....." ~ ही बाब मलाही जशीच्या तशी लागू होते, डॉक्टर. मी सरकारी अधिकारी असल्याने नोकरीच्या सुरुवातीला लागणार्या सार्या कागदपत्रांमध्ये, तसेच शासकीय 'सर्व्हिस बुक' मध्ये धर्म आणि जात हे अटळ घटक असतातच आणि तिथे तुम्ही जरी 'मानव' असा धर्म लिहिला तरी समोरील बाबू त्यापुढील रकान्यात लिहिण्यासाठी 'जात ?" असे विचारतोच. या काही जळवा अशा आहेत की ज्या तुटता तुटत नाहीतच....या ना त्या कारणाने. मी व्यक्तीशः कितीही 'रॅशनल' असलो अशा धर्म-जाती बाबतीत तरीही माझ्या मुलाला....ज्यावेळी तो पुण्यात नोकरीसाठी आला....त्यावेळी तेथील फ्लॅटधारकाने त्याची जात अगोदर विचारून घेतली....[आडनावावरून 'हिंदू' हे त्याने गृहित धरलेच होते].....मगच पुढील बोलणी ! मुलानेदेखील व्यावहारिक शहाणपण दाखविले, कारण त्याने फ्लॅटओनरशी बोलाचाली करण्यासाठी मला निमंत्रित केले नाही, साहजिकच त्याला नक्की माहीत होते की मी तिथे त्या जात प्रश्नावरून काहीतरी वेडेवाकडे शब्द तोंडातून काढणार.
तुम्ही तर लहान शहरात राहता असे म्हणता....पण मला वाटते धर्मजात मुद्द्यावरून निर्माण होणारी ऑबस्टॅकल्स ही सरासरी सर्वत्रच आढळतात. मुद्दा असतो तो तीव्रतेचा.
लेख आवडला.
लेख आवडला.
@दिनेशदा धर्म म्हणजे, जर काही
@दिनेशदा
धर्म म्हणजे, जर काही चांगल्या वागणुकीच्या कल्पना, असे जर काही असेल, तर मला अशा कल्पनांची, एक यादी करावीशी वाटते, जी सर्वसाधारणपणे सर्वांना मान्य होईल, निदान मला तरी मान्य आहे.<<
बहुतेक सर्वच धर्मांमध्ये आपण लिहिलेल्या बहुतेक गोष्टीना मान्यता आहे असे मला वाटते. कारण 'सदाचार' या सदरात या बाबी येतात. त्यामुळे आपण मांडलेल्या धर्मविचारांशि मतभेदाचि शक्यता नाही.
पण 'धर्म' हि बाब व्यक्तिगत सदाचाराशीच फक्त निगडीत नसून अधिक व्यापक आहे असे मला वाटते.
म्हणून तर महावीर, बुद्ध, पैगंबर, जिझस , शंकराचार्य, चार्वाक, बसवेश्वर, नानक असे अनेक धर्मविचार मांडणारे निर्माण झाले नाहीत काय? अगदी अलिकडल्या काळात देखील डॉ. आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी आदि अनेकांनी आपापल्या परीने धर्माविषयी व्यापक चिकित्सा केलेली आहे. धर्मचिकित्सेची व्याप्ति किति मोठी आहे याची अगदी एक झलक म्हणून एका तत्ववेत्त्याने धर्माबद्दल व्यक्त केलेल्या खालील चार बाबी देत आहे.
(१)निसर्गनियम = सनातन धर्म = जे नियम निसर्गानेच सर्वांना निष्पक्षपणे समानतेने लागू केलेले आहेत आणि जे सर्व मनुष्यमात्रांना मानावेच लागतात असे त्रिकालाबाधित नियम असलेला धर्म. जसा निसर्गधर्म, देहधर्म इ. ज्याला कोणताही धर्मसंरक्षक संघ लागत नाही.
(२)तत्वज्ञानावर आधारित धर्म: यात देव, आत्मा, पुनर्जन्म, नरक इ.चे विवेचन येते. हे तत्वज्ञान मनुष्यनिर्मित असते आणि अनेकदा परस्परविरोधीही असते. ते विज्ञानाने पडताळून पाहाणे विविध कारणांमुळे शक्य नसते. हा धर्म काल्पनिक, गृहीत व सत्त्याभासाच्या स्वरूपाचा असल्याने त्याला सत्य मानून त्याच्या आधारे जगणे कठीण. त्यामुळे त्यातील जे बुद्धी आणि विज्ञानाच्या निकषावर टिकते तेवढेच स्वीकारावे.
(३) रिलिजन या अर्थाचा धर्म- यात मृत्युनंतरच्या सुखासाठी आत्ता पाळावयाचे नियम, आणि कर्मकांडे येतात. यात अपेक्षित सूख परलोकातील असले तरी नियम इहलोकातच पाळावे लागतात. परलोकाचे अस्तित्वच नसल्याने यासंबम्धातिल सर्वकांही निरर्थक आहे असे या तत्वज्ञाचे मत आहे.
(४)मनुष्यधर्म- समाजाचे धारण करतो तो धर्म. इहलोकातील हितासाठी इहलोकातच पाळायचे नियम यात येतात. माणसांमधील परस्परसंबंध, त्यांचे हक्क, कर्तव्ये, स्वतंत्र्य, अधिकार इत्यादी यात येतात. समाजकारण, अर्थकारण, राजकरण, कायदे इत्यादी सर्व माणसांनी माणसांसाठी करायच्या सर्व गोष्टी या धर्मात येतात. असा धर्म त्या त्या मानवसमूहाच्या धर्मग्रंथांमध्ये दिलेला असतो. त्यात साम्गितल्याप्रमाने वागणे म्हणजे तो तो मनुष्यधर्म {धर्म (रिलिजन या अर्थी)}पाळणे होय.
प्रश्न असा कि आजच्या समाजधारणे साठी जुन्या काळातील ग्रंथात सांगितल्याप्रमाणे वागायचे का? याचे उत्तर असे कि धर्मग्रंथांच्या आधारे समाजसंस्था उभी करण्याचे दिवस गेले. आता प्रत्यक्श ऐहिक आणि वैज्ञानिक आधारावरच समाजसंस्था उभी करायला हवी. असा धर्मच खरा मनुष्यधर्म होय.
चांगला लेख... आवडला.
चांगला लेख... आवडला.
धर्म हा एक अशी सिसॉ आहे ज्यात
धर्म हा एक अशी सिसॉ आहे ज्यात एका बाजुनी राहावेच लागते,.....कोणती ना कोणती बाजु ही आपल्यासाठी खाली होते..आणि तिच्याच विरुध्द्ची बाजु दुसर्यांना वर दिसते....... मधे नाही उभे राहु शकत...
>> मी दुसरा कुठलाही धर्म पाळत
>>
मी दुसरा कुठलाही धर्म पाळत असेल तर चालवून घेईन जोपर्यंत मला त्रास होत नाही किंवा दुसर्याच्या धर्मपालनाने धर्म प्रसाराच्या पद्धतीने माझे नुकसान होत नाही. .पण जर एखादा उगाचच जगात माझा धर्मच श्रेष्ठ, माझ्या श्रद्धाच दिव्य असे म्हणून इतरांचा अपमान करत असेल, (इतरांना) त्रास देत असेल तर मला व्यक्तिशः काही त्रास नसला तरी शक्य त्या मार्गाने निषेध नोंदवेनच.
<<
एक्झॅक्टली. बोल्ड केलेल्या भागाबद्दल विशेष अनुमोदन.
छान लेख आहे ! आवडला !!
छान लेख आहे ! आवडला !!
दिनेशदा,तुमचे विवेचन बरेचसे
दिनेशदा,तुमचे विवेचन बरेचसे Justice Liberty Equality या निधर्मी समाजवादी तत्वांनी प्रेरित झालेले..
पण 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह' असं म्हणताना प्रत्येकाचा एक पिंड ,स्वभावविशेषही अभिप्रेत असतो, म्हणजेच धर्म हा एकाच वेळी अत्यंत स्थूल नियमांचा चांगल्या म्हणून मान्यता पावलेल्या तत्वांचा वाटला तरी अत्यंत सूक्ष्मही असतो.
गुंतागुंतीच्या परिस्थितीत प्रत्येकाने कसे वागावे, त्याचे मूल्यमापन इतरांनी कसे करावे , व्यक्ती अन समष्टीचा स्वार्थ परमार्थ कोणत्या पातळीपर्यंत सह्य ठरतो हा विचार 'माझा धर्म ' या एकाच संकल्पनेत येतो ..
धर्म म्हणजे, जर काही चांगल्या
धर्म म्हणजे, जर काही चांगल्या वागणुकीच्या कल्पना, असे जर काही असेल, तर मला अशा कल्पनांची, एक
यादी करावीशी वाटते, जी सर्वसाधारणपणे सर्वांना मान्य होईल, निदान मला तरी मान्य आहे.>>
सर्वांना मनातून हे असंच हवं असतं. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे वागणूक ही नेहमी दुस-याच्या संदर्भात असते त्याचप्रमाणे आज धर्म या संज्ञेची अवस्था आहे. चांगल्या कल्पनांची यादी मान्य करणे म्हणजे (मनातून तरी) धर्मांतर करणेच होईल. कारण आजचा धर्म ही कल्पना तुम्हाला तसं वागू देत नाहीत. त्यांच्या वागणुकीने तुमची प्रतिक्रिया हा आजचा धर्म आहे. चांगल्या कल्पनांची अपेक्षा वैयक्तिकरित्या ठेवण्याने या परिस्थितीमधे बदल घडून येईल का ?
म्हणून वागणूक बदलायला हवी. इतर धर्मातल्या वाईट प्रथांचे दाखले देण्याऐवजी त्यांना प्रतिक्रिया देणे थांबले पाहीजे. म्हणजे प्रतिक्रियेला प्रतिक्रिया या दुष्टचक्रातून सुटका होईल. सुरुवातीला जे लोक हेच सांगत होते त्यांना धर्मनिरपेक्ष म्हणून हिणवण्यापेक्षा त्यांच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. वैयक्तिक रित्या चांगली मते असल्याने बाहेरची परिस्थिती कशी बदलवता येईल हा देखील विचार व्हायला हवा.
मग आजचा धर्म ( रिलिजन ) भिती
मग आजचा धर्म ( रिलिजन ) भिती या अर्थाने आलाय का, म्हणजे जर मी या गटात सामिल झालो तर मला इतर गटापासून संरक्षण मिळेल, गटाचे म्हणून काही फायदे मिळतील ?
तूम्ही कुणी अनुभव घेतलाच असेल, आजकाल गुजराथी लोक, स्वामीनारायण नावाचा वेगळाच धर्म मानू लागले आहेत, जलाराम असा पण एक वेगळा प्रवाह आहे. हि शकले पुढे, ऊग्र रुप धारण करतील, असे ऊगाचच वाटत राहते.
उदयन, आज सीसॉ टाळत, मध्यावर ठाम उभे राहणे फार गरजेचे आहे.
आणि मी इथे अगदी दोन घटनांवर मुद्दाम माझे मत देतोय, हे मी त्या त्या बीबीवरही दिले होते.
हुसेन ने जे केले ते अत्यंत खोडसाळपणे केले. पंढरपुर सारख्या ठिकाणी वाढलेल्या व्यक्तीला, इतरांच्या भावना
कळत नसाव्यात हे शक्यच नाही. त्याने गर्वाने ( मी श्रेष्ठ चित्रकार, काहीही करु शकतो ) जाणीवपूर्वक तसे
रेखाटन केले, आणि त्यासाठी तो निंदनीयच आहे.
कसाबने केले ते कुठल्याही कसोटीवर शिक्षेस पात्र आहे. पण त्याचा कट भारतात यशस्वी झाला, या घटनेमागे
आपली गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, न्यायव्यवस्था ( कारण खरे गुन्हेगार शोधता आलेले नाहीत ) कमी पडली, असे मला वाटते. त्या दृष्टीने आपण काय करतो, हे महत्वाचे.
वरच्या दोन्ही घटनांत, त्या त्या व्यक्तींचा धर्म मला तितकासा महत्वाचा वाटत नाही.
मी मुद्दाम या दोन घटनांचा उल्लेख केलाय, कारण माझ्या विचाराने सुद्धा, त्यांचे अपराध क्षम्य नाहीतच.
आणि जरी मी कागदोपत्री त्यांच्या धर्माचा असतो, तरी माझे मत हेच राहिले असते.
शेवटी या लेखाला पण मला वैयक्तीक मत असे शीर्षक द्यावेसे वाटले, कारण आज असे विचार करणारे, थोडे
राहिलेत, असे वाटत राहते. कधी कधी मग वाटते, आपल्याला हे विचार पटताहेत ना, मग आपण त्यावर
वाटचाल करु.
यात न पटण्यासारखं काहीच
यात न पटण्यासारखं काहीच नाही.
बहुतेक धर्म Golden Rule वर बेतलेले आहेत. पण नंतर अनुयायांनी वाट लावली.
>>वरच्या दोन्ही घटनांत, त्या
>>वरच्या दोन्ही घटनांत, त्या त्या व्यक्तींचा धर्म मला तितकासा महत्वाचा वाटत नाही. <<
असे कसे म्हणता येईल?
हुसेन याने कलाविष्काराचे स्वातंत्र्य या नावाखाली जाणून बुजून फक्त हिंदू देवतांवर प्रक्षोभक चित्रे काढून आपली दुसर्या धर्माविषयीची तुच्छ्ता प्रकट केली. त्याने स्वतःच्या धर्मासंदर्भात मात्र असले
कलाविष्काराचे स्वातंत्र्य दाखवलेले नाही.
कसाब हा कांही भाडोत्रि दहशतवादी नाही. आपले मरण निश्चितपणे समोर दिसत असतांना एखादा तरूण इथे येऊन निरपराधांना हसतहसत गोळ्या घालतो तेव्हा त्याला आपण धर्मासाठी हे सर्व करतो आहोत आणि त्यात कोठलेही पाप करीत नाही हे पूर्णपणे बिंबवले असले पाहिजे. त्याशिवाय तो असले क्रौर्य करू शकणार नाही. आता तो वाचला हे त्याचे नशीब. त्याच्याबरोबर आलेले मरेपर्यंत लढले याचाच अर्थ त्यांना आपण कांहीतरी अल्लाला मंजूर असलेले दिव्य धर्मकार्य करतो आहोत असेच वाटत असले पाहिजे. मूंबई आणि ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात भाग घेतलेले हे सर्व तरूण हे असे भारलेले
असले पाहिजेत. असे तरूण हजारोंच्या संख्येने निर्माण करन्याची क्षमता त्या धर्मात आहे यात शंकाच नाही. तालिबानने प्राचीन बुद्ध मूर्ती तोफा डागून फोडली. एवढा मोठया आग्नेय आशियातील बुद्ध लोकांमधून तालिबानविरुद्ध बुद्ध्-जिहादी निर्माण झाले का?
दिनेश दा, लेख आवडला. खूप
दिनेश दा, लेख आवडला. खूप प्रामाणीकपणाने लिहिला आहे म्हणून जास्तच आवडला.