फक्त आणि फक्त श्रीदेवी — इंग्लिsh विंग्लिsh

Submitted by जिप्सी on 6 October, 2012 - 15:09

सदमा, चांदनी, लम्हे, चालबाज या आणि अशा कित्येक चित्रपटातुन अभिनयाचा ठसा उमटवणारी एकेकाळची नंबर वन नायिका श्रीदेवी. बोनी कपूरशी लग्न झाल्यावर अंदाजे एक तप चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिल्यानंतर तीने "इंग्लिsh विंग्लिsh" या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. या चित्रपटाचे प्रोमोज पहिल्यांदा पाहिल्यानंतरच खास चित्रपटातगृहात जाऊन बघण्याचा निर्णय केला होता. अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो नाही पण रीलीजच्या दुसर्‍याच दिवशी पाहुन आलो हा चित्रपट आणि तो पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच. Happy

हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या पुण्यात राहणार्‍या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. नवरा (आदिल हुसैन), मुलगा सागर, मुलगी सपना आणि सासुसोबत तिचा संसार अगदी व्यवस्थित चाललेला असतो. नवरा चांगल्या पदावर कामाला, मुले चांगल्या शाळेत शिकायला, लग्न, उत्सव प्रसंगी मोतीचूराचे लाडु बनवण्याचा तिचा व्यवसाय असं सारं काही व्यवस्थित असुनही एक गोष्ट शशीला खटकंत असते ते म्हणजे तिला इंग्रजी बोलता न येणं. यावरून तिला स्वतःच्याच घरी बर्‍याच वेळा अपमानित व्हाव लागत असे. छोट्या छोट्या प्रसंगातुन इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारा तिचा कोंडमारा तिचा यात दाखवला गेलाय. अगदी मुलीच्या शाळेतला प्रसंग असो किंवा "आप मेरी पढाई लोगी? आपको अंग्रेजी पडना आता है?" या मुलीच्या बोलण्यातुन मिळणारे शालजोडीतले यातुन फक्त इंग्रजी न बोलता येण्यामुळे होणारी घुसमट दाखवली. नवरा आणि मुलीच्या इंग्रजी बोलण्यामुळे आणि ते न समजल्याने ती त्यांच्या बाहेरच्या जगात कुठेही फिट नसते. तिचं एकच मागणं असतं कि प्रेम तर कुटुंबातुन मिळतंय पण पाहिजे ती फक्त थोडी आपुलकी.

अशावेळी अचानक तिच्या आयुष्याला कलाटणी देण्याचा एक प्रसंग घडतो आणि सुरूवात होते ती तिच्या एका नव्या प्रवासाची. तिला तिच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी न्युयॉर्कला जावे लागते. सुरुवातीला तिला काही कारणास्तव एकटीलाचा सर्वांच्या आधी अमेरीकेत जावे लागते. तिचा हा पहिलाच विमानप्रवास. यावेळी व्हिसा काढण्याच्या प्रसंगापासुन इमिग्रेशन पर्यंत केवळ इंग्रजी न बोलता येत असल्याने शशीची होणारी तारांबळ, विमानप्रवासात तिला भेटणारा, अगदी न्युयॉर्कपर्यंत तिची मदत करणारा आणि "इन गोरे लोगोंसे डरना छोड दो और इन्हे तुमसे डरने दो" आणि विमान प्रवासाचा पहिला अनुभव "पहला experience है तो उसे अच्छी तरह से एन्जॉय करो, क्यो कि ये फिरसे नही आयेगा" असा मोलाचा सल्लाही देणारा "तो" हे सगळे प्रसंग मनाची पकड घेतात.

पुढे शशी जेंव्हा अमेरीकेत येते तेंव्हा तिच्यासोबत अशा काही घटना घडतात कि ती कुणाच्याही नकळत चार आठवड्यात इंग्रजी शिकवण्याच्या क्लासेसला जाते. इथे तिच्यासारखेच स्पेन, फ्रान्स, पाकिस्तान, चीन अशा इतर देशातुन इंग्रजी शिकण्यासाठी आलेले मित्र भेटतात. यातील क्लासमधल्या गमती बघताना हा चित्रपट पूर्वीची जुनी टिव्ही मालिका "जबान संभालके" च्या दिशेने जातोय कि काय असं काही क्षण वाटत. इथुनच मग पुढे सुरू होतो तो शशीचा अस्खलित इंग्रजी बोलण्याचा प्रवास.

संपूर्ण चित्रपट कुठेही इंग्रजी भाषेला अति महत्व देणारी एखादी डॉक्युमेंटरी न वाटता सहज आपल्या आजुबाजुला घडत असलेली एखादी गोष्ट वाटते आणि याचे श्रेय जाते ते कथा/पटकथा/संवाद आणि दिग्दर्शन करणार्‍या गौरी शिंदेला. हा संपूर्ण चित्रपट शशी म्हणजेच श्रीदेवी भोवती फिरतो. तरीही सुलभा देशपांडे, आदिल हुसैन, मेहदी नेबु, या कलाकारांनी आपआपल्या भुमिकेत छाप पाडली आहे. दोन्ही छोट्या मुलांचे कामही झक्कास आहे. श्रीदेवीच्या अभिनयाबाबत तर मी पामर काय बोलणार Happy मुलीच्या बोलण्याने उदास होणारी प्रसंगी चिडणारी आई, रेस्टॉरन्टच्या त्या प्रसंगाने भेदरलेली भारतीय स्त्री, मुलाच्या हट्टापायी केलेला मायकल जॅक्सनचा थोडासा डान्स, नवर्‍याने कौतुक करावे यासाठी आसुसलेली बायको, सासुची काळजी घेणारी सुन, न्युयॉर्कमधे साकारलेली विद्यार्थीनी, इंग्रजी क्लासमधला युवक तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी बोलतो तेंव्हाचा तो प्रसंग इत्यादी सारं काही श्रीदेवीने आपल्या सहज सुंदर अभिनयातुन साकार केलंय.

या चित्रपटाचे संगीतही श्रवणीय आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेली आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सहजच ओठावर रेंगाळतात. विशेषतः
"नवराई माझी लाडाची लाडाची गं, आवड हिला चंद्राची चंद्राची गं"
बदला नजारा, गुस्ताख दिल आणि Manhattan हि गाणीही मस्त आहेत,

"बर्फी" चित्रपटानंतर पाहिलेला अजुन एक सुंदर चित्रपट. कुठलाही आयटम साँग नसलेला, सध्याच्या इतर चित्रपटांपेक्षा थोडा हटके विषय, बिगबजेट, मल्टीस्टारकास्ट आणि कुठलाही मेलोड्रामा नसणारा हा चित्रपट खरंच वेगळा आणि मस्त आहे.

कलाकार : श्रीदेवी, अदील हुसैन, सुलभा देशपांडे, मेहदी नेबू, प्रिया आनंद
दिग्दर्शन/कथा/पटकथा/संवाद : गौरी शिंदे
निर्माता : सुनील लुल्ला, राकेश झुनझुनवाला, आर बाल्की
संगीत : अमीत त्रिवेदी
गीत : स्वानंद किरकीरे

तटि: चित्रपट रीव्ह्यु लिहिण्याचा जास्त अनुभव नाही (देऊळ सोडला तर) पण फक्त आणि फक्त श्रीदेवीसाठीच हा प्रयत्न. Happy

वरील सर्व प्रचि आंतरजालाहुन साभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू Lol

मला श्रीदेवी चा अभिनय अती नाटकीय/ कृत्रिम (हिस्ट्रियॉनिक) वाटत आलाय नेहमीच ..>>>>>>वर्षू +१०..............फक्त तिला कॉमेडीचं टायमिंग आणि सेन्सही बर्‍यापैकी होता...हेमावैम
...पण जिप्सीभौ ................बर्फी पाहिला ,आवडला. आता हा ही पहाणार. आणि आयटम सॉन्ग्स नाहीत, टोळीनृत्यं नाहीत .....वावा!

.

. Proud

श्रीदेवीने फक्त हिंदी सिनेमात केलेल्या कामावरुन तिची पात्रता ठरवताच येणार नाही, अनेक तामीळ आणि तेलूगू सिनेमात तिने अत्यंत उच्च काम केले आहे. नमुना म्हणून 'क्षण क्षणम' आणि '१६ वयथिनिले' हे दोन सिनेमे अवश्य पहावेत. रजनी-कमलहसन-श्रीदेवी या काँबिनेशनचे काही सिनेमे केवळ अफाट आहेत.

हि कथा आहे शशी गोडबोले (श्रीदेवी) या मुंबईत राहणार्‍या मध्यवर्गीय सुखवस्तु घरातील एका स्त्रीची. >>>>>

जिप्स्या, शशी गोडबोलेची फॅमिली पुण्यात राहणारी दाखवली आहे. पोष्ट करेक्ट कर.

आम्ही सुध्धा काल रात्रीच चित्रपट पाहिला.

मला श्रीदेवी चा अभिनय अती नाटकीय/ कृत्रिम (हिस्ट्रियॉनिक) वाटत आलाय नेहमीच. >>>

हे असेच मत वर्षूप्रमाणे बर्‍याच लोकांचे असुनही श्रीदेवीच्या बेसिक सुंदर अभिनय क्षमतेमुळे व तीच्या फर्फेक्ट भारतीय स्त्रीच्या लुक्समुळे तीच्या सर्व गुण दोषांसकट, माझ्यासारख्या (१९८० ते ८५ सालामध्ये कॉलेजात असणार्‍या) बर्‍याच जणांनी तीला डोक्यावर घेतले होते. तसेच माधुरीचे तेव्हा आगमन झाले नव्हते. असो. हा चित्रपट एक सुंदर अनुभव देऊन जातो.

जिप्स्या मस्तच लिहिलयस.

फक्त आणि फक्त श्रीदेवी - ह्या एकाच कारणासाठी मी हा सिनेमा बघणार नव्हते Proud मामे तुम डरो मत हम तुम्हारे साथ है Wink

जिप्स्या बघितला गेलाच तर श्रेय फक्त तुझ्या रिव्ह्युला जाईल रे Proud

लेख अन प्रतिसाद दोन्ही छान आहेत.
पण ते लेखाच्या शेवटचं जीभ बाहेर काढलेलं प्रचि काढून टाकणार का? बोगस फोटू आहे तो

(सिनेमा निरक्षर) इब्लिस.

मस्त आहे सिनेमा. तिच्या साड्या एकेक अप्रतिम आहेत. सव्यसाचीने डिझाइन केलेल्या आहेत. नवर्‍याचा व मुलीचा कुचकट पणा अगदी टोचतो. नवरा गोडबोले वाटत नाही पण छान काम केले आहे. चिक फ्लिक आहे.
काम फार सुरेख केले आहे तिने. १५ वर्शे कुठे होतीस ग बाई असे विचारावे वाटले. मराठी लग्न व माहोल मस्त उभा केला आहे. तिचा होऊ पाहणारा मित्र पण गोड आहे. क्लास मधील प्रसंग मजेशीर आहेत.

गुड व्हॅनिला एंटरटेन मेंट. कुठे ही जीवनातील काजळी, काळ्याबाजूचा स्पर्श नाही. न्यूयॉर्क पण फार नीट तेव्ढेच दाखविले आहे. गाणी मस्त. नवरा साडी आणतो ते जाम आवडले. छोटा सागर तर अगदी खास. अगदी घरी घेऊन जाण्यासारखा वाट्तो.

अमा +१
पण त्या साड्या तर अगदी कॉमन पण श्रीदेवीच्या अंगावर असल्याने सुरेख वाटतात. कलमकारी, ब्लॉक प्रिंट्स, काठ पदराची मराठमोळी साडी अशा साड्या आहेत.

श्रीदेवी आणि सुलभा देशपांडे सोडून कुणी ओळखीचं नव्हतं त्यामुळे एक प्रकारचा फ्रेशनेस आला. उगाचच ग्लॅमर न दिल्यामुळे प्रसंग वास्तवाच्या जवळपास जात होते. सर्वच व्यक्तिरेखा परफेक्ट.. ना कम ना ज्यादा. कुठेही मेलोड्रामा नाही. त्या क्लासमेटचं किंवा शशी आणि सतिशचं प्रेम व्यक्त करणं पण कळेल न कळेल असं, जस्ट इंडिकेट करणारं.

ते सगळे लाडू पडले तेव्हा मला जाम वाईट वाटलं. मी चक्क अरेच्चा करुन दोन्ही हात डोक्यावर (स्वतःच्या) मारले Proud

कुठेही व्हल्गरिटी, चीप संवाद, हाणामारी, भावनांचं भडक प्रदर्शन नाही. श्रीदेवीच्या चेहर्‍यावरचे सूक्ष्म बदल खूप बोलतात.

अमेरिका आहे म्हणून जगावेगळं काही दाखवायचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. एकदम नॉर्मल.

एकंदरीत छान सिनेमा Happy

अगदी अगदी. अमा आणि अश्विनीला अनुमोदन.
त्या फ्रेंच मित्राचं प्रकरण पण उगाच कायच्या काय ताणलं नाहीये. अगदी मोजून मापून आहे.
न्यूयॉर्क किती दाखवू नी किती नको असा अट्टाहासही नाही जाणवला.संदर्भाने येईल तेव्हढेच.
पण मराठी मात्र सुलभा देशपांडे सोडल्यास कुणी वाटत नाही. श्री सुद्धा.
पण गाणी फार मस्त आहेत. नवराई आणि इंग्लिश विंग्लिश दोन्ही.

दोन्ही अश्विनींना अजून एका अश्विनीचे अनुमोदन Wink

मला खूप आवडला चित्रपट. श्रीदेवीचं दिसणं आणि अभिनय मला नेहेमीच आवडत आलाय पण बोलायला तोंड उघडलं की ...! तिचा आवाज फार कृत्रिम वाटतो. आजही चित्रपट चालू झाल्याझाल्या तिचा आवाज प्रचंड खटकायला लागला होता आणि त्यामुळे चित्रपट नीट एंजॉय करता येणार नाही असं वाटलं होतं. पण जसजसा चित्रपट पुढे सरकत गेला तसतशी मी त्या सीन्समध्ये कशी गुंगत गेले कळलं नाही.
श्रीदेवीने प्रेमळ, सोशिक, self respect साठी आसुसलेली गृहिणी अतिशय सुंदर उभी केलीय. बाकीची पात्रं पण आपापल्या जागी परफेक्ट. श्रीदेवी 'गोडबोले' वाटत नाही हे खरं पण 'नवराई' गाणं आणि अमेरिकेतलं सुटसुटीत विधी ठेवून होणारं मराठी लग्न ( 3 Idiots मधलं सहस्रबुद्ध्यांकडचं लग्न फारच खटकलं होतं. काहीही दुसरं लॉजिक लावायचा प्रयत्न केला तरी. ) ह्यासाठी ही बाब नजरेआड करायची तयारी आहे Happy एकंदरीत lovable आणि एकदा तरी जरुर बघावा असा चित्रपट.

कथेचा जीव तसा छोटा आहे आणि अपेक्षित आहे त्यामुळे इथे चित्रपटातले प्रसंग कृपया कुणी लिहू नका Happy

कविन.. टिंबला माझा ही प्रति. Proud

अरे हो ओवर अ‍ॅक्टिंग सोबत आवाज ही राहीलाच कि क्रिटिसाईझ करायचा.. Wink
( स्वगत..चलो बाबा.. मेरी यहाँसे छुट्टी.. इथे मोठमोठे पंखे आहेत श्रीदेवी चे..)
पण जिप्स्याच्या रिव्यु मुळे नक्की नक्की बघणार हा सिनेमा.. Happy

कुठल्याच बाबतीत सिनेमा पटत नाही. पण सध्या असलेल्या बाकी ऑप्शन्स पेक्षा बरा आहे... कोणती गोडबोले आडनावाची ३५ वर्षाची बाई जिची मुले कॉन्वेंत मध्ये आहेत, नवरा हातखर्चाला म्हणून सहज $४००-५०० देतो ती तिन्ही त्रिकाळ साड्या घालून फिरते हल्ली... १५-२० वर्षापूर्वी घडला आहे असे मानले तर हा सिनेमा पटतो आणि आवडतो.

जिप्सी रिव्ह्यू सुरेख लिहिला आहेस. कालच पाहणार होते हा सिनेमा
पण परिक्षा जवळ आल्याने लाजेकाजेस्तव नाही पाहिला Proud

छान लिहिलंयस रे जिप्सी Happy

श्रीदेवीच्या अभिनयासाठी आगावाला अनुमोदन. हिंदीत तिच्याकडून बहुतेकवेळा नाटकी, कृत्रिम अभिनयच करून घेतला गेला. पण त्यातही तिनं तिचं नाणं नेहमीच खणखणतं ठेवलं.

पूर्वी हिंदीत तिला रेखा डबिंग करायची. नंतर तिचे संवाद तिनं स्वतःच डब करायला सुरूवात केली.

या सिनेमाच्या जाहिरातींत तिचा आवाज निराळाच वाटतो. ते ऐकून वाटलं होतं, की आताही कुणीतरी डबिंगच केलेलं असावं. पण तसं नाहीये असं हे वाचून लक्षात येतंय.

गौरी शिंदे ही आर.बाल्कीची बायको आहे असं म.टा.त वाचलं. सोबत तिचा एक फोटोही होता. (आर.बाल्की वयानं बराच मोठा असावा असं मी इतके दिवस समजत होते.)

नवर्‍याच्या रोलमध्ये एखादा चांगला चेहरा घ्यायला पहिजे होता पण मला जो आहे तो परफेक्ट वाटला.... एक टिपीकल नवरा म्हणून शोभलाय तो!.......एक न एक कॅरेक्टर लक्षात राहते> आदील हुसेन हा खरच एक चांगला अभिनेता आहे. मला पण तो एकदम फिट वाटला.
डायरेक्टरने चांगली पात्रयोजना केलेली. अमेरीकेतील मराठी मुलीच्या लग्नातील डिटेल्स पण छानच आहेत. श्रीदेवीचा मुलागा आणि भाची (प्रिया आनंद - हिला अ‍ॅड मध्ये पाहील्या सारख वाटल) तर एकदमच क्युट.
फक्त आणि फक्त श्रीदेवी - ह्या एकाच कारणासाठी मी हा सिनेमा बघणार नव्हते मामे तुम डरो मत हम तुम्हारे साथ है > अगदी अगदी. मी पण अज्जीबात अपेक्षा न ठेवता गेलेले. खुपच आवडला.

गौरी शिंदे ही आर.बाल्कीची बायको आहे असं म.टा.त वाचलं. सोबत तिचा एक फोटोही होता. (आर.बाल्की वयानं बराच मोठा असावा असं मी इतके दिवस समजत होते.)
>>>> हो लले, कालच्या के.बी.सी. मध्ये श्रीदेवी व गौरी शिंदे हॉट सीट्सवर होत्या. तेव्हा गौरीबरोबर आर.बाल्की पण आला होता. तेव्हाच समजेले - गौरी शिंदे ही आर.बाल्कीची बायको आहे.

श्री देवी ने एक जमाना गाजवला आहे... तिचा अभिनय क्रुत्रिम होता.... माहित नाही पण सदमा, लम्हे, गुमराह आणि चालबाझ मधली श्री विसरणे शक्य नाही....

मागे महेश भट्ट ने तिला "अभिनयाचं सकारात्मक यंत्र" अशी उपाधी दिली होती.

जिप्सी मस्त रीव्ह्य.... पहिन नक्की

कालच पाहिला, आवडला!

अमा, <<नवरा गोडबोले वाटत नाही पण छान काम केले आहे.>> अनुमोदन!
कुठेही न केलेला अतिरेक ही सगळयात जमेची बाजू!

खूपच सुंदर चित्रपट आहे. आवडला!
पण कथा आणखीन थोडी फुलवता आली असती असं वाटून गेलं. तिला इंग्लिश येत नसल्यामुळे जसे वाईट वाटण्याचे प्रसंग दाखवले आहेत तसे काही मजेशीर प्रसंगही दाखवायला हवे होते.(तसे प्रसंग आहेत पण कमी आहेत.)
पण एकंदर श्रीदेवीचा वावर खूप आल्हाददायक वाटला! तिचे expressions भन्नाट आहेत..!
न्युयॉर्क मध्ये लक्ष्मी रोड, एम्.जे. रोड अशी सोपी नावे का नाहीत म्ह्णून वैतागलेली श्रीदेवी जाम आवडली! Happy

Pages