जेव्हा मुलगी जवळ येते....!!
गेले सात-आठ दिवस पावसाने मुंबईला झोडपले होते. आजचा दिवसही त्याला काही अपवाद नव्हता. सकाळी उठलो आणि बाहेर नजर टाकली तर तेच ढगाळलेले वातावरण आणि कोसळणारा पाऊस. परत चादरीत शिरावे असे कितीही वाटत असले तरी तसा पर्याय नसल्याने पेंगुळलेल्या अवस्थेतच तयारीला लागलो. सोबतीला पावसाची संततधार चालूच होती. वेळेवर तयारी करायची जराही घाई नव्हती. कारण असे ना तसे, ट्रेन लेट होणार हे माहीतच होते. नसती झाली ट्रेन लेट आणि मलाच उशीर झाला असता तरी ऑफिसमध्ये ट्रेन लेटचे कारण आज चालण्यासारखे होते. तरीही ट्रेन्सची नेमकी काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी म्हणून सकाळच्या ताज्या बातम्या लावल्या. असे भल्या पहाटे टी.वी मी फक्त दोनच वेळा लावतो जेव्हा ऑस्ट्रेलिया-भारत क्रिकेटचा सामना कांगारूंच्याच भूमीवर असेल तेव्हा किंवा पावसाची खबरबात काढायची असता.. बातम्यांचे सतराशे साठ चॅनेल अठराशे आठ सेकंदात पलटून झाले पण अपेक्षित बातमी काही दिसत नव्हती. म्हणून मग आईनेच बातमी पुरवली की रात्रभर असाच कोसळतोय पाऊस.. जाऊच नकोस आज ऑफिसला.. हे आई लोकांचे काळीज असेच असते.. मी त्या कडे दुर्लक्ष आणि बायकोला टाटा गूडबाय करून बाहेर पडलो.
लिफ्टचे बटण दाबले, आणि ती पंधराव्या मजल्यावरून खाली यायला सुरूवात झाली. आमच्या दहाव्या मजल्यावर पोहोचेपर्यंत आठदहा सेकंद लागणार तोपर्यंत माझे सवयीप्रमाणे नेहमीसारखे शर्टाची इन नीटनेटकी करणे, केसांवरून एक हात फिरवणे, त्यातूनही वेळ उरलाच तर खिशातून मोबाईल काढून त्यात काहीतरी उगाचच चेक करणे हे प्रकार सुरू होते. लिफ्ट बाराव्या मजल्यावर थांबून आली. कोणालातरी तिने आत घेतले असावे. नवीनच बिल्डिंग आमची. कुठल्या माळ्यावर कोण राहते आणि कुठे कोण कोणत्या वेळी चढेल याचा काही अंदाजा नसायचा. मगासपासून मला निघायची घाई नव्हती पण एकदा घराबाहेर पडलोय तर मग मात्र आता ऑफिसला अजून उशीर नको असे वाटत होते. त्यामुळे लिफ्ट आल्या आल्याच आत शिरुया म्हणून एक नजर इंडिकेटरवर ठेऊन अगदी तिच्या समोरच उभा होतो. लिफ्ट दहाव्या मजल्यावर आली, ऑटोमेटीक दरवाजा उघडला आणि बंद झाला. मी मात्र बाहेरच राहिलो. पटकन आत शिरायचे सुचलेच नाही. जेव्हा सुचले तोपर्यंत लिफ्ट नवव्या माळ्याच्या अर्थात खालच्या दिशेने निघाली होती. स्वताच्या बावळटपणाला दोष देत पुन्हा बटण दाबले आणि विचार करू लागलो ती नक्की होती कोण...!
सकाळच्या वेळी बिल्डिंगमधून बाहेर पडत होती याचा अर्थ बाहेरची नसावी..!
आज पहिल्यांदाच पाहिले होते, म्हणजे नवीनच रहिवासी असावी..!
बाराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली म्हणजे तिथलीच असावी..!
हे सारे ठीक होते, पण सकाळी सकाळी एवढे नट्टापट्टा करून बाहेर पडायची गरजच काय होती म्हणतो मी..!!!
लिफ्टचा दरवाजा उघडला आणि समोर अनपेक्षितपणे तिला पाहिले, ते ही आत इतर कोणी नसताना. असे वाटले की चुकून दुसर्याच्याच घराची बेल वाजवली अन बायकोच्या जागी भलत्याच बाईने दरवाजा उघडला. ते ही बाई भलतीच देखणी आणि घरात एकटीच. आत कसे शिरायचे म्हणून राहिलो बाहेरच उभा. लिफ्ट खाली जाऊन पुन्हा वर येईपर्यंत जेवढा वेळ लागत होता तेवढेच स्वतावरचे चरफडणे वाढत होते. मी खाली पोहोचलो तेव्हा ती मुलगी नक्कीच दूरवर निघून गेली असावी. तसेही तेच माझ्या हिताचे होते. परत तिच्याशी नजरानजर होणे म्हणजे ओशाळल्यागत झाले असते. तरीही, आधी चोहीकडे नजर फिरवून ती जवळपास नाही ना याची खात्री केली आणि मगच बिल्डिंगच्या गेटबाहेर पडलो. काही का असेना पण आज एक गोष्ट मात्र मी समजलो होतो, की अचानक एखादी सुंदर मुलगी समोर आली की पुरुषाचा मेंदू काही काळापुरता काम करायचा बंद करतो..!!!
बिल्डींगच्या बाहेर पाऊल टाकले तसेच वीजेचा झटका बसल्यासारखे परत फिरलो... नाही नाही.. परत ती नाही दिसली.. तर पाऊस.. जो अक्षरश: धबधब्यासारखा कोसळत होता. आत जाऊन बॅगेतून छत्री काढली. या मुसळधार पावसात कितपत साथ देईल ही शंकाच होतीच पण आता जे काही होते ते तीच होती. तिच्या सोबतीनेच लढायचे होते. एका हातात छत्री धरून कपडे, बूटं अन ऑफिसची बॅग सांभाळायची कसरत करत झपझप पावले कापू लागलो. जेवढे लवकर स्टेशनला पोहोचेन तेवढेच पावसात भिजणे कमी होईल हा त्यामागचा विचार. नाक्यावरून स्टेशनला जायला एक शॉर्टकट लागतो पण आज त्याने जाऊन फायदा नव्हता कारण त्या मार्गात लागणार्या एका गल्लीत पाणी भरलेले असायची शक्यता जास्त, आणि तिथे गेल्यावर ते समजले तर पुन्हा फिरून मागे त्याच नाक्यापर्यंत येण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे अश्यावेळी मी आधीच सावधगिरी म्हणून लांबचा रस्ता पकडतो. आज ही तसेच केले असते, जर ती दिसली नसती...!
लांबसडक कंबरेपर्यंत येणारे केस आजकाल दुर्मिळच. त्यामुळे कधी दिसले तर लक्ष वेधले जातेच.. आणि एकदा का लक्ष वेधले गेले.. की मग एखादी स्त्री पाठमोरी पाहिली असता ती पुढून कशी दिसत असेल याची उत्सुकता न लागलेला पुरुष विरळाच. मी देखील याला अपवाद कसा असेल. पण हे सहज शक्य नव्हते. आमच्यात जवळपास पन्नास पावलांचे अंतर होते. धो धो कोसळणार्या पावसाला तुडवत हे अंतर लवकरात लवकर गाठणे एक दिव्य होते. त्यातही तिचा आणि आपला रस्ता कुठवर सामाईक आहे याचीही कल्पना नव्हती. पावसामुळे माझा चालायचा वेग आधीच मंदावला होता. त्यातच तिच्या पायांकडे पाहिले तर त्यात नेहमी सारख्या मुलींच्या हाय हिल्स नसून फ्लोटर्स होत्या ज्या सपसप पाणी कापत चालल्या होत्या. त्यांच्या चार बोटे वर असलेल्या चांदीच्या पैजणांवर नजर ठेऊनच मी देखील माझा चालायचा वेग किंचित वाढवला तो या उद्देशानेच की हिला कोणत्याही परीस्थितीत गाठून हिचा चेहरा बघायचाच..!!
एका अनोळखी बोळात शिरून ती मला एकटेच मागे सोडून गेली जेव्हा आमच्यातील अंतर पन्नास पावलांवरून पंधरावर आले होते. त्या बोळाच्या तोंडावरून चार पावले चालताना मान काटकोनात वळवून तिला शेवटचे पाठमोरे पाहून घेतले आणि छत्री सांभाळत स्टेशनच्या दिशेने कूच केले.. पण हाय रे दैवा.. व्हायची ती गफलत झाली होतीच.. समोरच्या गल्लीत पाण्यावर तरंगणार्या कागदाच्या होड्या कोणीतरी माझ्याच खोड्या काढण्यासाठी सोडल्या होत्या असे वाटले. आता पुन्हा फिरून परत त्याच नाक्यावर.. ते ही भर पावसात.. परतताना एक मांजर रस्ता आडवा कापून गेली. अजून काही दिवसभरात घडायचे बाकी आहे याचेच ते शुभसंकेत होते.. कदाचित ती मगासची युवती देखील मार्जारजातीची असावी, जी माझा मार्ग कापून तर नाही पण चुकवून मात्र जरून गेली होती. दहा मिनिटांच्या अंतराळातच मी अजून एक धडा शिकलो होतो आणि तो म्हणजे, जेव्हा एखादी मुलगी जवळ येते तेव्हा पुरुषाची दूरदृष्टी काम करायची बंद होते..!!!
किती उशीर झाला, किती भिजलोय याचा हिशोब करणे मी आता सोडून दिले होते. जमेल तितक्या लवकर स्टेशनला पोहोचायचे आणि जी पहिली बेलापूर ट्रेन येईल तिची खिडकी पकडून नेहमीसारखी ताणून द्यायची याच विचारांत मी डॉकयार्ड स्टेशनला पोहोचलो. फर्स्टक्लासचा डबा म्हणजे जोडूनच महिलांचा डबा.. आता या ललनांना आणखी संधी द्यायची नाही असे ठरवून मी प्लॅटफॉर्मवरही त्यांच्याकडे पाठ करूनच उभा राहिलो. सुदैवाने एक अंधेरी गेली आणि पाठोपाठ बेलापूर आली. पावसाने ट्रेन किंचित लेट होत्या, चढणार्यांची गर्दी होती पण ट्रेन मात्र मुंबई छत्रपती टर्मिनसहून रिकामीच आली असल्याने मी उडी मारून माझी आवडीची आणि सोयीची जागा पटकावली. विजयीविराच्या आवेशात आजूबाजूला इतरांना मिळेल त्या जागेवर बसताना पाहिले आणि समोरच्या सीटवर नजर गेली तसा एक सौम्यसा झटका बसला..!
आता हा झटका वरवर जरी गोड वाटला तरी झोप उडवून टाकणारा असतो हा माझा आजवरचा अनुभव. माझ्या समोरच्याच सीटवर, अगदी समोरच एक षोडशवर्ष उलटून फार वर्षे झाली नसावीत या वयाची एक मुलगी. अर्थात सुंदरच. काही सुंदर मुली महिलांच्या डब्यातून प्रवास न करता पुरुषांच्या, भले आता तुम्ही त्याला जनरल डब्बा म्हणा, पण आमच्या डब्यातून का प्रवास करतात हे मला आजवर न उलगडलेले कोडे. कदाचित तिचा जोडीदार जवळच कुठेतरी असावा किंवा पुढच्या स्टेशनवर चढणार असावा असे मनात येऊन गेले. पण तिच्या आसपासच्या भरलेल्या जागा पाहता त्याचीही शक्यता कमीच होती. तसेही ती मुलगी एकटी होती की दुकटी होती याने काही फरक पडत नव्हता. माझ्या झोपेचे जे काही खोबरे व्हायचे आहे ते होणारच हे निश्चित होते..!
सकाळचा डॉकयार्ड ते बेलापूर हा ट्रेनचा तासाभराचा प्रवास म्हणजे तासाभराची झोप. बरे, ही झोपही फार महत्वाची असते कारण आदल्या रात्री झोपायचा आणि दुसर्या दिवशी सकाळी उठायचा टाईम ठरवताना त्या हिशोबात ही तासाभराची झोपही मोजली गेलेली असते. सकाळी ट्रेन खालीच मिळत असल्याने खिडकीची मोक्याची जागाही रोज हमखास मिळतेच. ऑफिसची बॅग वरच्या रॅकवर टाकून खिडकीला रेलताक्षणीच पुढचे स्टेशन यायच्या आधीच माझी गाडी स्वप्ननगरीत पोहोचलेली असते. घरून निघताना मी चहा देखील एखादा घोटच पिऊन येतो, जेणेकरून झोपेचा अंमल तसाच राहावा. कधी बाजूच्या एखाद्या प्रवाशाची गाणी त्याच्या मोबाईल मधून बाहेर येत असतील तर त्यालाही लगेच कानात हेडफोन घालून ऐकायची विनंती करतो. अश्या या माझ्या प्राणप्रिय निद्रादेवीची आराधना करण्यापासून मला रोखायला आता ही मेनकादेवी माझ्या समोर येऊन बसली होती..!!
आजच्या यंगिस्तानला साजेसाच असा जीन्स-टॉप पेहराव. कानात गाणी ऐकण्यासाठी लावलेली हेडफोनची वायर गळ्यातून जात मांडीवरच्या पर्समध्ये लुप्त झालेली. त्या पर्सवरच उघडे करून ठेवलेले ईंग्लिश नॉवेल. थोड्या थोड्या वेळाने पाण्याची एक छोटीशी बॉटल काढून घोट घोट संपवणे. दर पाच-सात मिनिटांनी पर्समधून मोबाईल बाहेर काढून गाणे बदलणे. मध्येच गालावर रुळणार्या केसांच्या बटा कानामागे अश्या काही खोचणे की दुसर्याच मिनिटाला त्या खात्रीने पुन्हा घसरत खाली येणार. हे सारे करताना नजर मात्र पुस्तकातच खिळलेली. फार तर फार प्रत्येक स्टेशन आल्यावर खिडकीच्या बाहेर नजर टाकून कुठले स्टेशन आले हे बघणे पण ट्रेनमधील प्रवासी अस्तित्वातच नाही या आविर्भावात बसणे. आणि तरीही ट्रेनमधील अर्ध्या अधिक नजरा तिच्याच दिशेने खिळलेल्या असणे... ज्यात तिच्या अगदी समोरच बसलो असल्याने.. नाईलाजानेच.. माझीही एक..!!
पुर्ण प्रवास माझा पापण्या मिटून झोपी जायचा प्रयत्न चालूच होता. पण समोर एक सुंदर मुलगी बसली आहे हा विचार डोक्यातून जो पर्यंत जात नाही तोपर्यंत झोप येणे कठीणच होते. थोड्याथोड्या वेळाने डोळे किलकिले करून ती अजून तिथेच आहे याची खात्री करून घ्यायचो. अनायासे तिला बघणेही व्हायचे. त्यातही कधी तरी ती सुद्धा आपल्याकडे बघेल आणि नजरानजर होईल हा आशावाद असायचा. पण समोरासमोर बसूनही हा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे मी देखील हट्टाला पेटलो होतो. एकदा का किमान तेवढे तरी झाले की मग झोपून जाऊ असा विचार करून माझे वारंवार तिच्याकडे बघणे चालूच होते. कुर्ल्याला मात्र गोगांट करत प्रवाश्यांचा एक लोंढा चढला आणि तिने इथे तिथे नजर फिरवतानाचा एक कटाक्ष माझ्यावरही टाकला. अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. झोप तर उडालीच, पण मी देखील माझे पेंगुळलेले डोळे ताणून चेहरा फ्रेश कसा दिसेल हे बघू लागलो. झोप काय आता आपल्याला येत नाही हे मी समजून चुकलो त्यामुळे तो प्रयत्नही सोडला. उलट माझी झोप पुर्ण झाली या आविर्भावातच एक आळस दिला आणि कधी खिडकीच्या बाहेर तर कधी तिच्याकडे बघू लागलो. पुढे कधीतरी बेलापूरच्या दोन स्टेशन आधी ती माझ्याकडे न बघताच उतरली आणि तिच्या नादात मी माझी झोप गमावून बसलो या विचाराने पुन्हा माझी झोप उडाली..!!
आता दोन स्टेशनसाठी काय झोप घेणार, उगाच गाढ झोपलो तर परत उलटे मुंबईच्या दिशेने जायचो म्हणून मग गर्दीतून रस्ता काढत दारावर जाऊन उभा राहिलो. थंड हवा तोंडावर फेकली गेली तसे डोळे उघडले अन डोकेही. एक वैश्विक नियम आज मला पुन्हा नव्याने समजला आणि तो म्हणजे जेव्हा एखादी सुंदर मुलगी समोर येते तेव्हा ती पुरुषाची झोप उडवून टाकते..!!!
ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत जगातील समस्त स्त्रीवर्गावर चिडलेले माझे ध्यान रिसेप्शन काऊंटरवरच्या बिनिता चॅटर्जीला पाहताचक्षणी नरम पडले. मस्टरमध्ये नाव शोधायचे नाटक करून तिच्या सहवासातले दोन क्षण वाढवले आणि माझ्या प्रेमाने म्हटलेल्या गूडमॉर्निंगला तिचे तेवढ्याच लाडिकपणे परत आलेले अभिवादन (त्यामागील औपचारिकतेकडे दुर्लक्ष करत) स्विकारून मी माझ्या डेस्ककडे निघालो. तिथे दोन मुली माझी अगोदरच वाट बघत होत्या. अर्थात कामासाठी. दोन्ही माझ्या टीम मेंबर होत्या. गेले वर्षभर आम्ही एकत्रच काम करत होतो. आम्हा तिघांची बसण्याची जागा देखील इतरांपेक्षा वेगळी आणि एकत्र होती. टीममधील इतर सारे मला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चिडवून मी किती लकी आहे हे सांगतानाच ते माझ्यावर जळतात हे ही नकळतपणे सिद्ध करून जायचे. पण मला मात्र त्या दोघी कितीही सुंदर असल्या तरी त्यांच्याबद्दल फारसे आकर्षण वाटत नाही हे त्यांना कसे पटवून द्यावे हे समजायचे नाही. कारण मुळात ते का नाही हे मलाच आजवर समजले नव्हते..!
थोड्याच वेळात कामात गुंतून गेलो. पण सकाळचे सारे प्रसंग अजूनही डोक्यात घोळत होते. अर्थात, धडे तेवढे विसरून गेलो होतो. लंच टाईम झाला. यावेळी दुसर्या टीममधील आणखी दोन मुली जेवायला बरोबर येतात. यांच्याबद्दल मात्र मला कमालीचे आकर्षण आहे पण या फक्त जेवणापुरत्याच काय ते सोबत असतात. त्यातल्या एकीने आणलेल्या पचपचीत चवीच्या पनीर पालकची तारीफ करून झाली. केलेली स्तुती मनापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी ते पनीर नामक रबराचे तुकडे चावावेही लागले. वर आमच्या बायकोला नाही हा असले काही जमत हे ही बोलून झाले. भले चार दिवसांपूर्वीच आमच्या हिने केलेल्या मटर-पनीर वर तिनेही ताव मारून का झाला असेना तरीही माझे हे वाक्य खरे मानून त्यावर तिचे लाडीक हसणे. बस या हसण्यासाठीच हे सारे. या सार्यातही एक धडा लपला होता. पण हे रोजचेच असल्याने आणि मी यातच खुश असल्याने मला तो धडा शिकण्यात जराही रस नव्हता.
लंचब्रेक वरून परत आलो तशी एक न्यूज समजली. दुपारनंतर एक मीटींग होती. आमच्या कंपनीकडे आलेले जास्तीचे काम आम्ही काही छोट्यामोठ्या कन्सल्टंसींना सोपवतो. त्याचा त्यांना पुरेसा मोबदलाही देतो. अपेक्षा असते की त्यांनी ते काम वेळेत, तसेच आम्हाला जो दर्जा अपेक्षित आहे त्यानुसार करणे. पण अशीच एक छोटी कंपनी दिलेले काम पुर्ण करायला उशीरही करत होती आणि त्यांच्या चुकाही बर्याच निघत होत्या, ज्या मग ऐनवेळी इथे आम्हालाच दुरुस्त कराव्या लागायच्या. ही मीटींग त्या संदर्भातच होती. मी आणि माझा बॉस, त्यांना झापायचे ठरवूनच मीटींगला निघालो. अर्थात, झापायचे काम माझा बॉस करणार असला तरी त्यांच्या सर्व चुकांचे बहिखाते मांडायचे काम माझे होते.. पण......! पुन्हा एकदा .......!!
खरे तर तिला पाहताक्षणीच मला सावध व्हायला हवे होते. तसे मी झालो ही होतो. मनाला बजावलेही होते, की तिने कितीही लाडिकपणा दाखवला तरी भुलायचे नाही, कर्तव्यात कसूर करायची नाही. आतापर्यंत त्यांनी सबमिट केलेल्या सर्व ड्रॉईंग शीटस आणि कॅलक्युलेशन रीपोर्ट माझ्याजवळ होते, त्यातील चुकाही मार्क करून झाल्या होत्या पण ऐनवेळी मी माझ्याही नकळत माझ्या बॉसपासून त्या झाकल्या. दोनचार चुका ज्यांचा परीणाम फारसा गंभीर नव्हता अश्याच सादर केल्या.. हो, मी फसलो, कारण मी तिच्या ज्या अदांचा सामना करायची मनाची तयारी करून गेलो होतो त्या तिने दाखवल्याच नाहीत.. तर, एक वेगळेच रूप दाखवले जे फार निरागस होते. तिच्याबरोबर तिचाही बॉस आलेला. मी तिच्या कामातील चुका काढल्यानंतर तो तिची काही गय करणार नव्हता हे मला तिच्या भेदरलेल्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते.. चंद्रासारखा चेहरा आणि त्याला लागलेले भितीचे ग्रहण.. मग काय, या परिस्थितीत जगातल्या कोणत्याही पुरुषाने जे केले असते... मी तेच केले..!
आपल्यात याला माणुसकी म्हणतात.. तर, जेव्हा समोरचा माणूस ही एक स्त्री असते तेव्हा स्त्री-दाक्षिण्य म्हणतात.. पण ती समोरची स्त्री जेव्हा एक सुंदर तरुणी असते तेव्हा मात्र या मदतीला का वेगळ्या नजरेने बघितले जाते हे मला आजवर न उलगडलेले कोडे. माझ्या बॉसची तशीच नजर झेलत मी माझ्या डेस्कवर परत आलो आणि दुसर्याच मिनिटाला माझ्या टेबलवर फाईलींचा एक गठ्ठा येऊन आदळला. सकाळपासून केवळ धडेच मिळत होते, पण त्यातून काहीच धडा न घेतल्याने आता ही शिक्षा मिळाली होती..!!
त्या फाईलींमध्ये तोंड खुपसून पडल्यापडल्याच साडेपाच वाजले पण आज एवढ्यात सुटका नव्हती. बायकोला तू हो पुढे म्हणून फोन लावला आणि पुन्हा स्वताला त्या फाईलींच्या ढिगार्यात गाडून घेतले ते साडेआठलाच बाहेर पडलो. ट्रेनला गर्दी कमी मिळते हाच काय तो जास्त उशीरापर्यंत थांबण्याचा फायदा. पण त्याचबरोबर महिला सहप्रवाश्यांचे प्रमाण कमालीचे घटते हे नुकसानही बोलू शकतो. स्टेशनला पोहोचेपर्यंत नऊ वाजले. फर्स्टक्लासचा डब्बा अपेक्षेप्रमाणे बर्यापैकी खाली. कोपर्यातली जागा बघून बूट काढले आणि समोरच्या सीटवर पाय पसरून बसणार इतक्यात नजर बाजूच्या सीटवर गेली... तिथे दोन-तीन पांढरपेशा बायका बसल्या होत्या. आता बायकांची जमात बहुतांशी पांढरपेशा प्रकारातच मध्येच मोडते किंवा त्या कश्याही असल्या तरी आपल्याला मात्र त्यांच्यासमोर आपली वर्तणूक नीटनेटकीच ठेवावी लागते. पाय पुन्हा बुटात घुसवले आणि त्यांच्या तिथून उठायची वाट बघू लागलो. पण त्यांनाही मला डॉकयार्डपर्यंतच सोबत करायची होती..!
रिकाम्या लिफ्टमध्ये शिरलो आणि थोड्यावेळासाठी का होईना स्त्री विरहीत जगात आलो या कल्पनेने एक आचकट विचकट अंगविक्षेप करत आळस देऊन दिवसभराचा थकवा झटकायला गेलो तेवढ्यातच लिफ्ट दुसर्या मजल्यावर थांबली..... त्या दोघींना जागा देत, मी लिफ्टच्या एका कोपर्यात सरकत दहावा मजला येईपर्यंत गपगुमान हाताची घडी घालून उभा राहिलो..!
दिवसभराचे चांगलेवाईट अनुभव जमा करत मी अखेर माझ्या घरट्यात परतलो होतो. आज सकाळची ट्रेनमधील अधुरी झोप आणि उद्या परत पुन्हा तसेच होण्याची भिती म्हणून मी पटकन जेवण उरकून लगोलग बेडरूममध्ये झोपायला गेलो. पण झोप काही येत नव्हती. छताकडे डोळे लाऊन, दिवसभरात पाहिलेले चेहरे आठवत तसाच जागा होतो. पाऊण एक तासाभराने माझी बायको आपले काम उरकून आत आली आणि दिवा मालवून माझ्या जवळ लवंडली. दुसर्याच क्षणी मी डोळे मिटले ते अलार्म वाजल्यावरच उघडायला... हा आजच्या दिवसाचा माझा अखेरचा धडा होता... जेव्हा आपली हक्काची बायको जवळ येते तेव्हा............!!!
...तुमचा अभिषेक
विनोदी लेखनात टाकले असले तरी
विनोदी लेखनात टाकले असले तरी , , , यापैकी कुठल्या प्रतिक्रियेची अपेक्षा नाही....
वाचून चेहर्यावर पसरले तरी पुरेसे आहे..
मस्त !
मस्त !
अभिषेक ,मस्त!मस्त!!मस्त!!!
अभिषेक ,मस्त!मस्त!!मस्त!!! आणी तू टाकलेल्या वरच्या सर्व स्मायलीज..
ऑब्जर्वेशन छानै तुझं!!!
(No subject)
अभि भारीचेस तु. छान आणि खरं
अभि भारीचेस तु.
छान आणि खरं लिहिलयस.
खुप सुरेख, छान लिहिलय.
खुप सुरेख, छान लिहिलय.
आवडले !
आवडले !
"जेव्हा मुलगी जवळ येते.."
"जेव्हा मुलगी जवळ येते.." अरे व्वा तू तर पी. एच. डी करु शकशील या विषयावर...लगे रहो !:-)
छान निरिक्षण आणि छान लेखन, पण
छान निरिक्षण आणि छान लेखन, पण शिर्षक 'जेव्हा ती जवळ येते' अस असायला हव होत
लेख चांगला वाटला ,लिहीत राहा
लेख चांगला वाटला ,लिहीत राहा
मस्त...एकदम.......
मस्त...एकदम.......:)
असे वाटले की चुकून
असे वाटले की चुकून दुसर्याच्याच घराची बेल वाजवली अन बायकोच्या जागी भलत्याच बाईने दरवाजा उघडला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>
अजून वाचून व्हायचय पूर्ण पण अभि, वरच्या वाक्यात काय लॉजिक आहे कळलं नाही
आता दुसर्याच्याच घराची बेल वाजवली तर भलतीच बाई दार उघडणार ना...... आपली बायको कशी उघडेल त्या दुसर्या घरचा दरवाजा ............ इसको बोलते हय "लिखते लिखते झोल हो जाये"
अभि मस्त रे......... त्या
अभि मस्त रे......... त्या लिफ्टचा सीन तर मला ब्लेंडर्स प्राईड ची लेटेस्ट जाहिरात आठवली "मेन आर मेन"..
गुड ऑब्झर्व्हेशन्स.
मस्त
मस्त
अरे भुंग्या ते वाक्य तोडून
अरे भुंग्या ते वाक्य तोडून तोडून नको वाचूस रे... दुसर्याच्या घराची बेल आपलेच घर समजून वाजवली असा अर्थ घे.. मग बायकोच अपेक्षित असणार ना..
बाकी ऑब्जर्वेशन वगैरे काही नाहीये रे... भोगलेय सारे.. .. इतरांचे निरीक्षण करून असले किस्से लिहायला बसलो तर ग्रंथ बनेल एवढे किस्से आजूबाजूला घडत असतात..
...........................
सर्व प्रतिसाद देणार्यांचे भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद ..
हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर..
हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. हरामखोर.. ........ हसुन-हसुन पोटात गोळा येतो रे.....
(No subject)
मस्तचै....चांगभलं..!! एखादी
मस्तचै....चांगभलं..!!
एखादी सुंदर मुलगी समोर
आली की पुरुषाचा मेंदू
काही काळापुरता काम करायचा बंद
करतो..!!!>>>बहुतेक पुरूषवर्ग सहमत होईल यावर...
जेव्हा एखादी मुलगी जवळ येते
तेव्हा पुरुषाची दूरदृष्टी काम
करायची बंद होते..!!!>>तिच्यावर दृष्टी असल्यावर दुरदृष्टीचा विषयच नाही..
उद्याच्या प्रवासासाठी मनोभावे शुभेच्छा!!
लई भारी
लई भारी
ख् र च छान लिहिता तुम्हि.
ख् र च छान लिहिता तुम्हि.
खुपच छान लिहिता तुम्हि. मज्जा
खुपच छान लिहिता तुम्हि. मज्जा आली वाचतना.
अरे हे ही वर आले.. पश्या
अरे हे ही वर आले.. पश्या धन्यवाद रे याबद्दल.. हे मी लिहिलेले हे ही विसरून गेलेलो.. आणि इतर प्रतिसादांचेही आभार
सहीए लिखते रहो
सहीए
लिखते रहो