खखाव्रत - ग्रूप "याबायका"
ग्रूपमधे सहभागी मायबोलीकरणी:
मंजूडी
कविन
अश्विनी के
-----------
या बायका ना....
’ख’ म्हटलं की खरेदी आणि खादाडी बरोब्बर ओळखतात.
लगबगीने तारीखवेळ ठरवतात. ठिकाण तर ठरलेलंच असतं.
सुपरडुपर हिट्ट
बजेटमध्येही फिट्ट
क्रॉफर्ड मार्केट ते दाणा बाजार
आहेच सगळ्यांचं पेट्ट!
फोनवरून, ईमेलवरून संदेश सर्वदूर पसरतात. ठरलेला दिवस उजाडतो, वेळ समीप येते आणि मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर उत्साहाची आणि चैतन्याची त्सुनामी येते.
मायबोलीवरच्या मैतरणी जमती स्टेशनी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी ||धृ.||
काय सांगू काय सांगू आमचं क्रॉफर्ड मार्केट मोलाचं
कसं सांगू कसं सांगू जणू कल्पवृक्षाच्या तोलाचं
क्रोमात क्रॉमात काजू बदाम मिळतील
मंगळदासात चांगली कापडंचोपडं मिळतील
जामा मशिदी शेजारी आहे कटलरी मार्केट
ब्युटी पार्लरचे सामान मिळे बाजूच्या गल्लीत
घरसजावटीसाठी मिळतील अभ्रे, चादरी, पडदे
फिशटँक - पाळीव पक्षी ह्यांनी गृहशोभा वाढे
क्रॉमामधली ही फेरी आनंदाचीचं पर्वणी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी||१||
वाटेवरतीच लागे मुंबा देवीचे मंदिर
भक्ती भाव माझा मला तिथे नेण्यास अधीर
त्याच रस्त्याने सरळ जाता लागे भुलेश्वर
कलाकुसरीच्या वस्तु मिळण्याचे ते माहेर
माधवबाग तांबाकाटा आहे इथले प्रसिद्ध
भांडी कुंडी विक्रीसाठी आहे नेहमीच बद्ध
येता जवळ उन्हाळा घ्यावा मसाला कराया
दाणा बाजार मस्जीदचा मग हवाच गाठाया
पैसे वाचती म्हणून गेल्या हरखून मैतरणी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी||२||
व्रत म्हटलं की कहाणी ही हवीच. भक्तीभावाने कहाणी ऐकून त्याचं पालन केल्यानेच व्रत सुफळ संपूर्ण होतं असं म्हणतात. म्हणून तर ही कहाणी तुमच्यासाठी.
ऐका खखा देवा तुमची कहाणी.
मुंबई नामक शहरामधे रहायचा एक गणपत वाणी.
वाण्याला होत्या चार सुना. ३ आवडत्या एक नावडती.
आवडत्यांना मिळे तूप लोणी नावडतीचं मीठही अळणी.
आवडत्यांना दरमहा दिल्ली दरबारची बिर्याणी,
नावडतीला मात्र झुणका भाकर अन पाणी.
पुढं भाद्र्पद मास आला,
गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली.
आवडत्यांसाठी नल्लीज मधून उत्तमोत्तम वस्त्रे आली, पेठे-लागूंकडची आभुषणे आली.
नावडतीची मात्र मोजकेच पैसे देऊन बोळवण करण्यात आली.
दुर्मुखलेली नावडती पैसे घेऊन व्हिटीस्टेशन वर आली.
तिथे तिला मोठ्या बॅगा पाठीवर अडकवलेल्या 'याबायका' त्यांच्या मैत्रिणींसमवेत दिसल्या.
त्यांची उत्साहाने चालू असलेली बडबड तिच्या कानांवर पडली.
त्यांच्यातले चैतन्य पाहून भारावून जात तिने त्यांना विचारलं "मुलींनो, कुठे जाता?"
"आमचं एक व्रत आहे. आज त्याची सांगता आहे, त्याचसाठी दक्षिण मुंबईत खरेदी खादाडीला जातोय. सुरूवात क्रॉफर्ड मार्केटने करू म्हणतोय." एक सखी उत्तरली.
"हे कसलं व्रत आहे? ह्याचं फळ काय आहे?" नावडतीने विचारले.
"हे आमचं खखाचं व्रत आहे. जरा कुठली समस्या अथवा चिंता आम्हांस सतावू लागली तर हे व्रत आम्ही लगेच आचरणात आणतो." तत्परतेने दुसरी सखी म्हणाली.
"ह्या व्रताने काय होईल?"
"बुर्गुंडा होईल, अनुत्साह सरेल आणि तनामनात चैतन्य संचारेल."
"म्हणजे..?"
"तुला बुर्गुंडा माहीत नाही? तू ते प्रसिद्ध भारुड ऐकलेलं नाहीस?" तिसरीने विचारलं.
"नाही.."
"अगं बुर्गुंडा म्हणजे ज्ञानप्राप्ती होईल, शिवाय सगळ्या चिंता, समस्या, क्लेश क्रॉमाच्या गर्दीत लोप पावतील."
"ते कसे काय?"
"अग कसे काय विचारतेस वेडे... तिकडे क्रॉमात मनासारखी खरेदी नी खादाडी होईल. आत्मिक समाधान लाभेल. सख्यांबरोबर एक दिवसाची सहल होईल. अंगात चैतन्य सळसळेल. नव्या उत्साहाने रोजच्या कामांना भिडायचे बळ मिळेल. शिवाय पैशांची बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुर्गुंडा... बुर्गुंडा होईल. एकाच ठिकाणी अनेक वस्तुंची खरेदी होऊ शकते, तीदेखिल थोडक्या पैशांत, ही ज्ञानप्राप्ती तुला होईल. खरेदीचा आनंद हा महागड्या मॉलमधे, पंचतारांकीत हाटेलातच असतोय असं नाही बये (आनंद म्हणजे केळकर अथवा मैत्री नव्हे बरं का! तर आनंद म्हणजे मोद, हर्ष, विंग्रजीत आपण हॅप्पीनेस म्हणतो तो आनंद!), तर सख्यांबरोबर घालवलेल्या चार क्षणांत देखील असतोय हे तुला कळेल. हे व्रत नेमाने करशील तर तुझ्या सासरच्यांनाही बुर्गुंडा होईल मग तू ही नावडतीची आवडती होशील."
"मग मलाही तुमच्या व्रतात घ्या." याबायकांच्या उत्साहाची लागण होऊन नावडती व्रतासाठी सिद्ध झाली.
"उतणार नाहीस? मातणार नाहीस? घेतला वसा टाकणार नाहीस?" याबायका एकत्रच उद्गारल्या.
"उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण सासरेबुवांची भिती वाटते. कोणी काही बोलणार तर नाही?"
"त्यासाठी तू खखास्तोत्राच् पठण कर. ते तुला स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना संग्रहात मिळेल."
"मी किती दूर राहते, व्रतानंतर घरी कशी जाऊ? कोणी काही बोलणार तर नाही?"
"बोलणार्यांकडे तु.क. टाक. मी एवढ्या लांबून पुण्याहून नाही का आले?" एक सख्खी मैत्रिण उद्गारली.
"परत जाताना गर्दी असेल. ट्रेनमधे चढू कशी? ’अलिबागहून आली का?’ असे कोणी काही बोलणार तर नाही?"
"अगं मी नाही का रोज गर्दीतूनच डोंबिवलीपर्यंत प्रवास करते? तुला चढवेन मी बरोबर."
"सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये. भूक लागली तर काय करू? कोणी काही बोलणार तर नाही?"
"अगं मी बरोबर असताना भुकेची चिंताच नको. बादशहाचा फालूदा आणि सदानंदची पावभाजी बेस्ट असते. मी तर बै त्यासाठीच आले आहे."
"आणि मत्स्यप्रेमी असशील तर हॉटेल ग्रॅन्ट आहेच जवळच. तुला माहित्ये का तिथल्या खिमा पावची तारिफ खुद्द पुलं नी केलेय. खिमा पाव, बोंबिल फ़्राय नावं ऐकुनच तोंपासु झालं ना"
"माझी पर्स खूप लांब अन् मोठी आहे. कोणी चोरणार तर नाही?"
"अगं पर्स माझ्यासारखी कंडक्टर स्टाईलने घे, म्हणजे हात मोकळे राहतील अन् तूही खरेदी करायला मोकळी राहशील." दुसरी सख्खी मैत्रिण उद्गारली.
"दरवेळी एकाच ठिकाणी जाता?"
"नाही ग बये उन्हाळा आला की मसाल्यांच्या जिन्नसांसाठी आधी मस्जिद बंदरचा दाणा बाजार गाठतो. " एकीने माहिती पुरवली.
"इतरवेळी काय घ्यायचेय त्याच्या प्रमाणे कधी क्रॉफर्ड मार्केटात जातो, कधी लोहार चाळीत जातो, कधी झव्हेरी बाजारची सैर करतो तर कधी मेट्रोच्या बाजूचा फ़ॅशन स्ट्रीट पालथा घालतो." दुसरी पहिलीला सामील झाली.
मग याबायकांच्या मदतीने नावडतीने सगळ्या समस्यांवर मात करून क्रॉफर्ड मार्केटात जाऊन खरेदी केली. गणपतीसाठी सुकामेवा आणि फळं घेतली. मखरासाठी साठी इलेक्ट्रिकच्या माळा घेतल्या, सजावटीची फुले घेतली. मुला-बाळांसाठी कपडे, चॉकलेटांचे सामान आणि खेळणी घेतली. महंमद अली रोडवरून मुला-बाळांच्या शाळेच्या वस्तुंचीही खरेदी झाली. गणपतीत येणार्या पाहुण्यांसाठी सुरेखश्या कपबश्या आणि कागदी कप-प्लेट-द्रोण घेतले. सोबतीला आणि मार्गदर्शनाला याबायका होत्याच. आणि करमणुकीला त्यांच्या मायबोलीगप्पा होत्या. मंगळदास मार्केटातून सासरेबुवा आणि आवडत्यांसाठी कपडे खरेदी केली, अभ्रे-पलंगपोस आणि खिडक्यांसाठी पडदे घेतले. भूक लागली तेव्हा बादशहाचा फालूदा खाल्ला. मुंबादेवीचे दर्शन घेतले. तिथेच शेजारी भगत ताराचंद मधे अप्रतिम अशी थाळी जेवून नावडतीसकट याबायका तृप्त झाल्या. परतीच्या वेळी व्हिटीस्टेशनवर फ्रँकी खाऊन त्यांच्या खखाव्रताची सांगता झाली.
आनंदीत होऊन आणि पैसेही उरवून नावडती सुखरुप घरी पोचली.
अशा रितीने तिने पैशाची बचत करुन मनासारखी खरेदी केली. बादशहा मधे जाऊन मनपसंत खादाडीही केली. सख्यांच्या सोबतीने पुन्हा ती आनंदी झाली. सुनेचा आनंदी चेहरा पाहून गणपत वाण्याने विचारले तेव्हा त्यालाही ह्या खखा व्रताची महती कळली. त्यानेही क्रॉफर्ड मार्केटाची वारी केली, लोहारचाळीची सफर केली, हॉटेल ग्रॅन्ट मधली सामिष थाळीही जेवून भरून पावला. चकचकीत मॉल पेक्षा त्याला ही वारी आवडून गेली, वर पैशाची बचतही झाली. त्यामुळे नावडती सून आवडती झाली.
असे हे खखा व्रत नावडतीला फळले तसेच ते तुम्हां आम्हां फळो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
---------
मुंबापुरीतली फिरण्यासारखी ठिकाणं म्हटली की तीच ती नेहमीची स्थळदर्शन यादी समोर येते. अगदी गुगलदेवाला विचारलं तरी तीच ती नेहमीची गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, म्युझियम, तारांगण, राणीची बाग इ. इ. ठिकाणं डोळ्यांसमोर नाचत राहतात. अख्खी मुंबापुरी एकवेळ बाजूला राहुद्यात, पण सीएसटी नामक स्थानक् ते मस्जिद ब्ंदर ह्या मागोमागच्या दोन स्थानकांदरम्यानची ही एव्ह्ढी बघण्यासारखी, पायी फिरण्यासारखी "घाऊक बाजार" ठिकाणं आहेत ह्याची खुद्द मुंबापुरी आणि तिच्या आसपास रहाणार्यांनाही जुजबीच माहिती असते. म्हणून ज्या स्थळांना "मुंबई दर्शन" च्या आखीव पत्रकात तितकसं स्थान नाही पण ज्या स्थळांशिवाय् "ये है मुंबै मेरी जान" हे वाक्य पूर्ण होत नाही त्यातल्याच काही स्थळांची ओळख करून देण्याचा हा व्रत आणि कहाणी प्रपंच!
खरेदी करा किंवा करू नका पण एकदा या परीसरातल्या ह्या घाऊक बाजाराची सफर मात्र जरूर करा.
आणि "ये है मुंबै मेरी जान!" चा अनुभव तुम्हीही घ्या!
---------------
सुची:
क्रॉफर्ड मार्केट :-
कमानीतून आत गेल्यावर मिळणाऱ्या वस्तू - सुका मेवा, चॉकलेट्स, चॉकलेट मोल्ड्स, टॉयलेटरीज, लहान मुलांचे/मोठ्यांचे डायपर्स, कॉस्मेटिक्स, नॉव्हेल्टी आयटेम्स, पॅकेजिंग्/पॅकिंगचे सामान (गिफ्ट रॅपर्स, पिशव्या, एन्व्हलप्स, गोंडे, पार्सलचे सामान),कागदाच्या डिश, पेले, गिफ्ट आर्टिकल्स, पर्फ्यूम्स इत्यादी
आणखीही बरंच काही.. आणि तिथेच् बाजूला आहे फळ, भाजी बाजार. तसे बाराही महिने गजबजलेला पण आंब्यांच्या मोसमात जरा जास्तच गजबज आणि गडबड असणारा हा भाग.
क्रॉमा समोरच्या रस्त्यावर तुम्हाला मिळतील लेडिज टॉप्स, साडी फोल्डर्स, विविध क्षमतेच्या पिशव्या, बेडशिट्स, पिलो कव्हर्स, चादरी, टेबल कव्हर्स, सोफा कव्हर्स, टेबल मॅट्स, शोभेची फुले, पिना /रबरबॅण्ड्स, पर्सेस, गाऊन्स, पेटिकोट्स, हँगर्स, कपडे वाळत घालायच्या दोर्याट, चिमटे, स्टेनलेस स्टीलच्या छोट्या/मध्यम आकाराच्या वस्तू, प्लॅस्टीक सामान.
समोरच्या दुकानांत :- लखनवी कपडे, खादाडी, लहान मुलांचे तयार कपडे, विविध ब्रँडच्या कॉस्मेटिक्स वस्तू, पडदे / सोफ्याची कापडं, दिवाळीसाठी तोरणं, माळा, कंदिल, पणत्या आणखी बरंच काही.
मंगळदास मार्केट :-
कपडे.. कपडे आणि कपडे.... नावाजलेल्या ब्रँड्सचं शर्टिंग सूटिंग, साड्या, ताग्यातली कापडं, रेडिमेड कुर्ते पायजमे सलवारी, शाली... सगळं सगळं होलसेल भावात.
जामा मशिदी शेजारचे कटलरी मार्केट :- आतल्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ब्युटिपार्लरसाठी लागणारर्या वस्तू/ सामान अगदी स्वस्तात मिळतात, आर्टिफिशियल ज्वेलरी, क्रोकरी मार्केट.
मंगलदास मार्केटच्या समोर जामा मशिदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो झवेरी बाजारला. आता तिथे काय् मिळते हे का सांगायला हवे?
मुंबादेवी : मुंबादेवी मंदीर प्राचीन आहे आणि ती मुंबईची मूळ देवी आहे असे मानले जाते.
त्याच रस्त्याने पुढे गेलं की भोईवाडा / भुलेश्वर :- कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे सामान, भरतकाम, विणकाम, नकली दागिने बनविण्याचे सामान प्रचंड स्वस्त मिळते. बाकी कपडे, बॅग्स, पर्सेस देखील इथे मिळतात.
भुलेश्वरमधील खाऊ गल्ली : खरेदी करून दमलं की इथे एखाद्या गाडीपाशी जाऊन गरमागरम काहीतरी खाऊन घ्यायचे.
डाव्याबाजूला वळले की जवळच आहे फुलगल्ली : इथे सकाळीच फुलांचा घाऊक बाजार भरतो.
उजव्या बाजूला भुलेश्वर परिसरातील अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत.
माधवबाग : येथे शिसवी व इतर प्रकारचे उत्तम देव्हारे मिळतात. स्टिलच्या भांड्यांची दुकानं आहेत.
तांबाकाटा : येथे तांब्या पितळेची, स्टिलची भांडी खूप स्वस्त मिळतात. दुर्मिळ घाटाच्या आणि प्रकारच्या वस्तू इथे मिळून जातात. मोठाल्या समया, तपेल्या, घंगाळी वगैरेही इथे अजून मिळतात. तीही अतिशय स्वस्त.
गुलाल वाडी : गुलालवाडीची पावभाजी खूप प्रसिद्ध आहे.
मशिद बंदर (दाणा बाजार) : मसाले, कडधान्य, गहू, तांदूळ व इतर वाणसामानाचा घाऊक बाजार. कित्येक किरकोळ विक्रेते इथूनच दुकानं भरतात. गिरगाव भागातली कित्येक घरं इथूनच वर्षाचे, महिन्याचे सामान भरतात.
दवा बाजार : औषधांचे घाऊक विक्रेते. औषधांचे किरकोळ विक्रेते इथूनच ऑर्डर देऊन माल भरतात.
प्रकाशचित्र सहाय्य:
आंतरजालीय प्रताधिकार मुक्त प्रकाशचित्रे
मामींनी स्वतःचा फोटो का
मामींनी स्वतःचा फोटो का टाकलाय ? >>>> हे ज्यांना कळलंय ते काही ठराविक भाग्यवंत हसताहेत.
नुसतं खाव्रत नही का घेता येत?
नुसतं खाव्रत नही का घेता येत?
मस्त व्रत आहे, आवडेश..... मला
मस्त व्रत आहे, आवडेश.....
मला पण हे व्रत करायच आहे....मी कधिच हे बघितल नाही....या भारतवारीत नक्की
खखा व्रत देणा-या खखा देवींना
खखा व्रत देणा-या खखा देवींना साष्टांग नमस्कार >>>>>>> +१
मी पण हे व्रत नेमाने करते. पण तुमची कहाणी छानच आहे.
आवडेश.
हिम्या, हो रे! मनीष मार्केटही
हिम्या, हो रे! मनीष मार्केटही तिथेच आहे. तिथेच मध्यंतरी मोठी आग लागली होती.
मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, मंगळदास मार्केट हे सगळेच एकमेकांच्या तंगड्यात तंगडं अडकवून तिथे गेली कित्येक वर्षे सुखेनैव नांदताहेत
म्हणून ज्या स्थळांना "मुंबई
म्हणून ज्या स्थळांना "मुंबई दर्शन" च्या आखीव पत्रकात तितकसं स्थान नाही पण ज्या स्थळांशिवाय् "ये है मुंबै मेरी जान" हे वाक्य पूर्ण होत नाही त्यातल्याच काही स्थळांची ओळख करून देण्याचा हा व्रत आणि कहाणी प्रपंच!
अगदी अगदी अगदी... पुर्ण लेख छान जमलाय...
- एक माझगावकर
मस्त
मस्त
मस्त !!
मस्त !!
लई भारी ! याबायका, खखाव्रत
लई भारी ! याबायका, खखाव्रत
मी सुद्धा व्रतकरी बर्का. बर्याच दिवसात ह्या आवडत्या वारीला जायला संधी मिळाली नाहीये. देशात आल्यावर नक्की.
मस्तच !!!!!!!!!
मस्तच !!!!!!!!!
अर्रे मस्त लिहिलंय! भारी आहे
अर्रे मस्त लिहिलंय! भारी आहे हे खखा व्रत!
व्वा! मस्तच!! धम्माल
व्वा! मस्तच!! धम्माल लिहिलेय!!!
मला पण नक्की करायचेय हे व्रत!! मुंबईत नक्की कुठे काय चांगले/ स्वस्त मिळते याची चाचपणी चालूच आहे ना अजून.....
खूप आवडलं .प्र.चि. अन मामींचा
खूप आवडलं .प्र.चि. अन मामींचा फालूदाही भारी. :)) विरुद्ध दिशेच्याही (सी.एस्.टी.च्या डावीकडच्या) जुन्या प्रस्थांची- हॅण्डलूम हाउसची आठवण झाली. खादी भंडार तरी आहे अजूनही तिथेच.आमची चक्क दिवाळीची खरेदी तिथे व्हायची .मग पुढे मैत्रिणींबरोबर भटकताना दिसायला लागले रस्त्यावरचे जुन्या पुस्तकांचे आणि अनंत अद्भुत वस्तूंचे मायाबाजार.त्या टोकाला जहांगिर आर्ट गॅलरी अन इकडे या टोकाला जे जे स्कूल अशी उत्तरदक्षिण चित्रपंढरी मात्र डोळ्यांनाच सुख देणारी, तिचे भाव आवाक्याबाहेरचे.स्टेशनसमोरचा स्थितप्रज्ञ इराणी मात्र सर्वांशी सम'भावा'ने वागणारा.परततानाचा चहा त्याच्याकडे.पायांचा शीण निवारण करणारा.
हायला कवे! कसलं डोकेबाज
हायला कवे! कसलं डोकेबाज लिहीलय!
आवडलच!
मलाही एकदा हे व्रत करायचच आहे! कधी योग येतोय हे बघायच!
मामी, ते फालुदा प्रचि एकदम भन्नाट! तुमच्या एका खखाव्रतातलच आहे की काय?
फारच मस्त.. पण व्रत करायला
फारच मस्त.. पण व्रत करायला फार मजा येइल
धन्स लोक्स अर्रे लोक्सांनो
धन्स लोक्स
अर्रे लोक्सांनो मी एकटीने नाही लिहिलय, गटबाजी आहे ही. अख्ख्या गटाने लिहीलय.
मामी, ते फालुदा प्रचि एकदम भन्नाट! तुमच्या एका खखाव्रतातलच आहे की काय?>>>>
मला कापडापासुन बनविलेले कपडे
मला कापडापासुन बनविलेले कपडे ठेवण्याचे फोल्डींगचे कपाट विकत घ्यायचे आहे. ते मुंबईत मिळेल असे समजले आहे. तरी नक्की वरीलपैकी कोणत्या ठिकाणी मिळेल?
हे विचारण्याची ही जागा योग्य आहे कि नाही माहीत नाही पण येथे खखाव्रत करणारे व करण्यास उत्सुक असणारे बरेच आहेत त्यामुळे नक्की माहीती मिळेल अशी आशा आहे.
शिप्रा, ते कापडी कपाट
शिप्रा, ते कापडी कपाट क्रॉफर्ड मार्केट समोरच्या A to Z या दुकानात विचारुन बघा
फारच मस्त लिहिलंय. काल
फारच मस्त लिहिलंय. काल 'याबायका' आणि खखाव्रत वाचूनच हसले होते पण नंतरचं वाचायला वेळ झाला नाही. सुरुवातीचं गाणं, कहाणी, नंतरची माहिती सगळंच छान
अश्विनी के त्वरीत
अश्विनी के
त्वरीत प्रतिसादाबद्द्ल खुप खुप धन्यवाद
सही रे सही! आजन्म घेतलेलं
सही रे सही! आजन्म घेतलेलं व्रत
मस्तं लिहिलंय!
मस्तं लिहिलंय!
मस्त लिहिलय, गॄपच नाव पण
मस्त लिहिलय, गॄपच नाव पण भारीये
सही लिहिलंय, जबरी आहे हे
सही लिहिलंय, जबरी आहे हे व्रत. करायलाच हवे पुढच्या देशवारीत.
.
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
"याबायका" माहिती आवडली...
"याबायका" :d
माहिती आवडली... कधी काळी केलेली पायपीट आठवली.
आवडेश !
आवडेश !
(No subject)
सहिच !
सहिच !
यक्क्षलंट लेख आहे. आमचा
यक्क्षलंट लेख आहे.
आमचा खान्देशी कंपू करून काम्पिटिशन देण्याचे प्रयत्न फसले हे कबूल करतो.
तुमच्या लेखाच्या टायटल अन ग्रूपनेम ने च जिंकले.
याबा यका लै खास
खखाव्रताला मत दिलेले आहे.
Pages