कोणते वाहन घ्यावे? - मामी

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 14:01

सप्टेंबरचा महिना. पाऊस संपल्यात जमा आणि ऑक्टोबर हीट सुरू झाल्यात जमा असा हा काळ. दुपारचं जेवण जेऊन साजिरा त्याच्या केबिनमध्ये एसीच्या थंडगार झुळकांमध्ये गुबगुबीत झुलत्या खुर्चीवर बसून, टेबलावर पाय पसरून गाढ झोपला होता. दुपारी ऑफिसमध्ये कस्टमर सहसा यायचाच नाही. एखाद-दुसरा चुकार वाटसरू आलाच तर किशन होताच बाहेर. तो बघून घ्यायचा.

पण आजची दुपार काही वेगळीच होती. साजिरा झोपेच्या ऐन मध्यान्ही असतानाच, खाडकन दार उघडून किशन धावतच केबिनमध्ये घुसला. त्या आवाजानेच साजिरा जागा झाला. किशनचे डोळे बशीएवढे विस्फारले होते. "काय दरोडा पडलाय काय आपल्या ऑफिसवर???" असा विचार साजिर्‍याच्या मनात आला. त्याचवेळी त्यानं बाहेर पाहिलं आणि त्याचेही डोळे किशनसारखेच बशीएवढे दिसायला लागले, वाचा बसली आणि त्याला जागचं हलताही येईना. किशनही नुसतेच घशातून आवाज काढत हातवारे करत होता.

कारणही तसेच होते... त्यांच्या ऑफिसमध्ये चक्क गणपतीबाप्पा अवतरले होते. डुलत डुलत इकडे तिकडे चालत ते तिथे लावलेली पोस्टर्स बघत होते. साजिरा डोळे चोळून चोळून गणपतीबाप्पांकडे पहात असतानाच, बाप्पांचं लक्षही त्याच्याकडे गेलंच. सोंडेनंच 'हाय' करत बाप्पा केबिनमधे प्रवेशले.

साजिराही एव्हाना पहिल्या धक्क्यातून सावरला होता. प्रत्यक्ष लंबोदर आपल्याकडे आलेत याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर पसरलेला दिसत होता. गडबडीनं उठून त्यानं हात जोडले आणि नंतर बाप्पांपुढे एक लोटांगण घातले. "गणपती बाप्पा, आज इथे कुठे येणं केलंत?"

साजिर्‍याला आशिर्वाद देऊन बाप्पा टेबलाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. किशनने दिलेले थंड पाणी सोंडेनं फुर्रर्रर करून प्यायले आणि त्यांनी सरळ विषयालाच हात घातला.

"त्याचं काय आहे साजिराशेठ, कित्येक वर्षांपासून माझ्या मनात एक विचार घोळतोय... कोणाचा सल्ला घ्यावा हेच कळत नव्हतं. तुम्ही ही कन्सल्टन्सी सुरू केलीत आणि माझी मोठीच सोय करून ठेवलीत. आज तुमचा सल्ला घ्यायला आलोय मी."

"मी एक य:कश्चित मानव आपल्याला काय सल्ला देणार देवा? पण काही मदत करण्यासारखी असेल तर आनंदाने करेन. आपण विचारा..." साजिरा नम्रतेनं बोलला.

"आम्हाला आमचं वाहन बदलायचंय. बाकीच्यांची वाहनं कशी भारदस्त, देखणी आहेत. हेवा करावा अशी! पण आमचे मूषकराज मात्र अगदीच पिटुकले, आम्हाला न शोभणारे. त्यांच्यावर बसायचं म्हणजे आम्हाला कोण कसरत करावी लागते. वळणावर तोल सांभाळावा लागतो. सगळा वेळ आणि लक्ष स्वत:ला पडू न देण्यात जातो. हल्ली तर सगळीकडे ट्रॅफिक वाढलाय, सिग्नल्स लावलेत. त्यामुळे बराचसा वेळ प्रवासात जातो आणि वाहनावर बसून काही कामंही होत नाहीत."

साजिरा आवाक होऊन ऐकत होता. बाप्पालाही असे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स असतील याची त्याला अजिबात कल्पनाच नव्हती.

बाप्पा आपलं गार्‍हाणं पुढे सांगतच होते. "खरंतर एवढंच नाही. आजकाल आमचे मूषकराजही जास्त तोर्‍यात असतात. हल्लीच्या आयटीयुगात त्यांच्याशिवाय कोणाचा संगणक हालत नाही ना! त्यामुळे स्वतःची नेटवर्थ बरीच वाढली आहे याची त्यांना जाणीव आहे. शिवाय त्यांच्या जमातीतलं कोणी मिकी अन मिनी नावाचं अमेरीकन उंदीर-जोडपं जगप्रसिद्ध झाल्यापासून ते फारच आढ्यतेखोर झालेत. तिथे अमेरीकेत म्हणे बरेच उंदीर सिनेमातले हिरो म्हणून प्रसिद्ध झालेत - जेरी, स्टुअर्ट, रेमी, स्कॅबर्स अन असे बरेच कोणकोण. रात्रभर हे असले सिनेमे बघून बघून, त्या हिरोंच्या जागी स्वतःला कल्पून करीयर-बदलाच्या विचारांची दिवास्वप्न आमचेही मूषकराज बघायला लागले आहेत. आणि रात्रभराच्या जागरणामुळे त्यांचं अ‍ॅव्हरेजही कमी भरायला लागलंय."

आँ!!!! सिनेमाचा प्रभाव थेट गणाधिपतींपर्यंत, तोही अशा अनपेक्षितरीत्या पोहोचलेला पाहून साजिरा थक्क झाला. काहीतरी बोलायचं म्हणून तो "चालायचंच बाप्पा, काळ बदललाय..." टाईपचं काहीतरी बोलला. पण बाप्पा आपल्यातच मश्गुल होते.

"छ्या:! या सिनेमांनी खरंच उच्छाद मांडलाय. ती कोण सिंडरेला की काय म्हणून आहे ना? तिचा रथ चार चार मूषक ओढतात म्हणून मूषकराजांना चारपट पगारवाढ हवीये. स्वतःची पर्सनॅलिटी अधिक डॅशिंग करण्याकरता त्यांनी स्वतःचे नाव रीपिचीप ठेवलंय." बाप्पा दु:खी होऊन सांगत होते."... आणि काय सांगू, तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये मला. हल्ली तर भरपेट मोदकांचं जेवण जेऊन बाहेर निघालो तर त्यावेळी जास्तीच्या वजनाकरता जास्तीचा पगार मागतात माझ्याकडे. म्हणूनच आलोय तुमच्याकडे. तुम्ही गाडी कोणती घ्यावी यावर योग्य सल्ले देता ना? बरंच ऐकलंय तुमच्याबद्दल. मलाही सांगा कोणतं वाहन घेऊ?"

साजिर्‍यातला सल्लागार आता जागा झाला होता. बाप्पांना योग्य वाहन सुचवून त्यांच्या हालअपेष्टा कमी करायला हव्यात हे त्याच्या लक्षात आलं. बाप्पांना बजेट विचारावं का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न साजिर्‍याला पडला. पण असं डायरेक्ट विचारणं बरं दिसणार नाही असा विचार करून साजिरा म्हणाला, "बाप्पा, तुमच्या अपेक्षा आणि नेमक्या गरजा काय आहेत ते कळलं तर झीरो-इन करायला सोपं पडेल."

"अहो, काय अपेक्षा असणार. अगदी मोजक्याच अपेक्षा आहेत हो. खड्डेवाल्या रस्त्यांवरूनही सुळकन जाता यावं, कधी रिद्धी-सिद्धिंनाही फिरायची लहर आली तर तेवढी मोठी गाडी असायला हवी, अ‍ॅव्हरेज चांगलं हवं, इंजिन मजबूत हवं, गाडीत जीपीएस असेल तर उत्तम, ऑटोमॅटिक हवी, मेंटेनन्स फ्री हवी, दिसायला हटके हवी, फोर हॅन्ड ड्राईव्ह हवी..."

साजिरा दचकलाच. "देवा, फोर हॅन्ड ड्राईव्ह असं काही नसतं. गाडी फोर व्हिल ड्राईव्ह असते. हात दोनच वापरायचे असतात. उरलेल्या दोन हातांनी तुम्ही तुमची कामं उरकू शकता की."

"छे छे!" वक्रतुंडांनी हा मुद्दाच निकालात काढला. "असल्या ट्रॅफिकमध्ये कॉन्सन्ट्रेशन करून गाडी चालवावी लागणार ना! मग कामं कशी करता येतील? गाडी चालवणं म्हणजे काय खायचं काम आहे काय? आणि गाडी चालवताना मल्टी-टास्किंग करण्याविरूध्द सरकारनं कायदाच केलाय. लोकं गाडी चालवताना मोबाईल वापरतात आणि मग अपघात करून बसतात. आम्ही कायद्यानंच चालणार."

"मल्टि-टास्किंग का भी एक जमाना था... क्या जमाना था वो!" अचानक बाप्पा राष्ट्रभाषेतून बोलत भूतकाळात गेले. "व्यासमुनींनी आम्हाला त्यांचे लेखनिक होण्याकरता विचारणा केली त्यावेळी होकार देताना आम्ही त्यांना अट घातली होती की न थांबता सलग सांगणार असाल तरच लिहू. त्यावर त्यांनीही आम्हाला उलट अट घातली की श्लोकांचे अर्थ समजून घेतल्याशिवाय लिहायचं नाही म्हणून... लिखाण अधिक कूट प्रश्न सोडवणे असं ते मल्टी-टास्किंग वेगळंच होतं आणि त्यामुळे अगदी मजा आली महाभारत लिहिताना. पण गाडी चालवताना मल्टी-टास्किंग? शक्यच नाही."

"मग एखादा चालक ठेवला तर...???"

"नाव नका काढू चालकाचं. आमचे मूषकराजही वाहन+चालक रोल्ड-इन-वन आहेतच की. त्यांचे नखरे नकोत म्हणून तर वाहन बदलतोय. आता मीच चालवणार माझं वाहन." बाप्पांनी आपला दृढनिश्चय जाहीर केला.

जाऊ द्या. आता अपेक्षा कळल्यात तर सरळ गाड्या सुचवाव्यात असा सूज्ञ विचार साजिर्‍यानं केला.

"देवा, मारूतीच्या एकसे एक गाड्या आहेत. त्यातली एखादी बघणार का?"

"काय मारूतीकडे गाड्या आहेत? तो तर पवनपुत्र ना? तो स्वतः उडतो ना? त्याच्याकडे अनेकवचनात बसणार्‍या गाड्या आहेत?" बाप्पा आश्चर्यातिरेकानं उद्गारले.

"नाही नाही. मारूतीरायांकडे गाड्या नाहीत... म्हणजे कुणी सांगावं असतीलही, पण मला तरी माहित नाहीत. ही मारूती म्हणजे एक कंपनी आहे जी गाड्या बनवते..."

पण गणपतीबाप्पा ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतेच. "मारूतीची गाडी नकोच." ते ठामपणे म्हणाले. "अशानं आयडेंटिटी क्रायसिस निर्माण होईल. दुसर्‍या एखाद्या कंपनीच्या सुचवा."

"बरं." साजिरा म्हणाला. तो आता धक्का बसण्याच्या प्रक्रियेतून बर्‍यापैकी सावरला होता. आपलं व्यावसायिक कसब पणाला लावून बाप्पांना पटेल अशी गाडी त्यांना सुचवायचीच असा चंग त्यानं बांधला.

"बाप्पा, काही विदेशी गाड्या बघणार का? एकसे एक आहेत."

"नको. देवाधिदेव महादेवांचे वास्तव्य असलेला हिमालय, श्रीकृष्णाची पवित्र नगरी द्वारका, रामाच्या पादस्पर्शाने पावन झालेली दक्षिणभूमी आणि कालीमातेचं पूजन करणारी वंगभूमी या सीमारेषांबाहेर बनणारी गाडी मला बघायची नाहीये." गणपतीबाप्पा अभिमानानं म्हणाले.

बाप्पांच्या या एका वाक्यामुळे मर्सिडीज, बीएमडब्ल्यु, फेरारी, ऑडी, झालंच तर होंडा, टोयोटाबियोटा अशा सगळ्याच उत्तमोत्तम परदेशी गाड्या मोडीत निघाल्या. त्यामुळे साजिर्‍याचा मूड जरा पंक्चर झाला पण या नविन क्रायटेरियामुळे गाडी ठरवणे सोपे होईल याची त्याला कल्पना आली.

"अगदी योग्य विचार केलात देवा. बरं मग आपल्या महिंद्राच्या गाड्या बघायच्यात?"

"त्या इंद्राच्या गाड्याही नकोत मला. अगदी नावात असलेल्या इंद्राच्याही नकोत मला. त्यानं पाडलेल्या पावसात वेगानं जात असताना, मूषकराजावरून एकदा चांगलाच पडलो होतो मी. त्यावेळीच तो चंद्र्या हसला होता मला. तेव्हापासून राग येतो मला इंद्राचा."

साजिरा आता खरंच दमला होता. बाप्पा इतकी खुसपटं काढणारे निघतील याची त्याला काय कल्पना! पण आता एकतरी गाडी बाप्पाच्या गळी उतरवायचीच असं त्यानंही ठरवलेलं होतं. पण बाप्पाच्या सगळ्या सगळ्या अटी पुरवून उरणारी एकमेव कंपनी उरली होती.

"टाटा!"

"काय? मला गाडी न सुचवताच फुटवताय?" बाप्पा दुखावून साजिर्‍याकडे बघत बोलले.

आपली चुक साजिर्‍याच्या लक्षात आली. "नाही नाही. तुम्हाला नाही म्हटलं मी, हे तर कंपनीचं नाव आहे."

"हा मग ठीक आहे." बाप्पा टाटांचा कॅटलॉग चाळू लागले अन एका गाडीपाशी अडखळले. ती छोटीशी लालचुटुक रंगाची गाडी बाप्पांना फारच आवडली. बर्‍याचशा अटी अन तपशीलही जुळत होते. मुख्य म्हणजे गाडी अतिशय सुंदर दिसत होती. "ही गाडी चालेल मला. कोणती गाडी आहे ही?"

"ही ना? ही चेरी. म्हणजे लाल रंगाची नॅनो."

"वा वा. चेरी. मस्त नाव आहे. मग पिवळ्या रंगाच्या गाडीला केळी म्हणतात का?" केळी म्हणत असतील तर पिवळ्या रंगाची गाडी घेऊ असा विचार बाप्पांच्या मनात आला. त्यांना चेरीपेक्षा केळी प्रिय.

"नाही. तसं नाही म्हणत. फक्त लाल रंगाच्या नॅनोला प्रेमानं चेरी म्हणतात."

"असं आहे होय? बरं बरं. असू दे. आम्हाला चेरी आवडली. जरा फोन मिळेल का? मी घरी बोलून माझा निर्णय फायनल करतो." बाप्पा बोलले.

जवळ जवळ अर्धा तास फोनवर बोलून बाप्पा वळले ते साजिर्‍याची नजर चुकवतच. "काय झालं बाप्पा? घरी काही प्रॉब्लेम???"

"आता काय सांगू तुम्हाला? अहो, मी इथे तुमच्याशी बोलण्यात गुंतलेला पाहून मूषकराजांना एकूण परिस्थितीची कल्पना आली. आणि त्यांनी सरळ घरी धाव ठोकली. घरच्या मंडळींनाही मूषकराजांचा भारी पुळका! त्यामुळे माझा फोन जाताच त्यांनी वाहन बदलण्याचा निर्णयच बदला असा पवित्रा घेतला ना! त्यांच्यामते नॅनो आणि मूषकराज यांत काही फारसा फरक नाहीये. शिवाय सगळीकडे मीच एकटा जातो. त्यामुळे मूषकराजच पुरेसे आहेत. वर्षातून एखाद्-दोन वेळा फारतर जास्त टुरिंग असतं. पण अशावेळी ज्यांच्याकडे जायचे तेच वाहनाची सोय करतात - माझ्याबरोबर मूषकराजही असतात त्या वाहनातून. हं, आता काही काही ठिकाणी माझ्याबरोबर मंडळींच्या सासूबाई म्हणजे आमची गौरीमाता असते. पण तिची सोयही स्वतंत्र असते. त्यामुळे घरच्या मंडळींनी नविन वाहनाकरता लाल सिग्नल दाखवलाय." बाप्पा म्हणाले. "बदलच हवा असेल तर काही दिवसांकरता ११ नंबरच्या बसने जाण्याचा सल्ला दिलाय घरच्यांनी. ते माझ्या तब्येतीकरताही चांगलं आहे म्हणे. आता ही ११ नंबरची बस कुठे मिळेल ते गुग्गुळऋषींना विचारले पाहिजे."

तेवढ्यात बाहेर बाप्पांचं बोलणं ऐकत थबकलेले मूषकराज केबिनमध्ये प्रवेश करते झाले. त्यांनी धावत येऊन बाप्पांचे पाय धरले.

"बाप्पा मी चुकलोच. आता पुन्हा तुम्हाला त्रास नाही देणार. मला माफ करा. रिद्धी-सिद्धी मातांनी माझे डोळे उघडले. तुमच्यामुळे मला किती मान मिळतो, बालगोपाळ माझ्यावर किती प्रेम करतात हे मी विसरलोच. तुमच्या मोदकांत, नैवेद्यात माझाही हक्काचा वाटा असतोच की." मूषकराजांच्या डोळ्यात पाणी आलं होतं... "आणि हो, ११ नंबरच्या बसनं जाण्याची तुम्हाला गरज नाही. मी सतत तुमच्याबरोबर असेन, देवा!"

बाप्पाही विरघळलेच. थोडंसं स्वतःशी आणि थोडंसं साजिर्‍याला उद्देशून बोलले, "... शिवाय हे पेट्रोलचे वाढते भाव, वाढतं प्रदुषण, मेन्टेनन्सचा त्रास... यापेक्षा आम्हाला आपले मूषकराजच बरे. तेच वाहन, तेच चालक, तेच जीपीएस, तेच रस्त्यांवरचे खड्डे शिताफीनं टाळून धावणारे, तेच मेन्टेनस फ्री, तेच ऑटोमॅटिक, तेच हटके " ... आता बाप्पा थांबायला तयारच नव्हते.

"हो ना, आणि you can have any color as long as it is black!" साजिरा पुटपुटला आणि मनमोकळं हसला.

*******************************************************

कथेकरता स्वतःचे नाव वापरू दिल्याबद्दल साजिरा यांचे विशेष आभार. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol आयडेंटिटी क्रायसिस आणि फोर हँड ड्राईव्ह सर्वात भारी आहे..!

बाप्पा, निर्णय घेताना (आम्हा सामान्य माणसांप्रमाणेच) तुमचा फोकस क्लिअर नव्हता, हायपोथिसिसमध्ये बारक्या तांत्रिक चूका होत्या, होमवर्क थोडं कच्चं होतं, तरीही तुम्ही योग्य निर्णयापर्यंत शेवटी पोचलातच! Proud असं आम्हा सगळ्यांचं होऊ देत ही प्रार्थना. Happy

(तटी १- गाडीचा निर्णय घेताना घरच्यांचे फोन्स अ‍ॅटेंड करू नयेत. आपल्या नि त्यांच्या प्राधान्यक्रमात आणि मतांत फरक पडतो.. अख्खं परस्पेक्टिव्हच बदलून जातं!
तटी २- आम्ही दुपारी झोपा काढत नाही ओऽ!

Proud )

मस्तच idea नी मांडणी! नी त्या मुषकराजांना म्हणावं, संगणक युगात तुमचा भाव वधारला तरी, हल्लीच्या iPad नी ईतर smart devices च्या युगात तुमचं अस्तित्व धोक्यात आलय आता...मुकाट्याने गणपती बाप्पाची सेवा करा!

सगळ्यांना धन्यवाद.

नविन वाहनाचा विचार बदलल्याने बाप्पा आपल्या ट्रॅडिशनल वाहनावरच बसून आपल्या भेटीला येणार हे आता नक्की झालं.

साजिरा ... तटी १, २ Lol
रायगड ..... Biggrin मस्त मुद्दा आहे. सांगते मूषकराजांना! Happy

Pages