खखाव्रत - ग्रूप "याबायका"
ग्रूपमधे सहभागी मायबोलीकरणी:
मंजूडी
कविन
अश्विनी के
-----------
या बायका ना....
’ख’ म्हटलं की खरेदी आणि खादाडी बरोब्बर ओळखतात.
लगबगीने तारीखवेळ ठरवतात. ठिकाण तर ठरलेलंच असतं.
सुपरडुपर हिट्ट
बजेटमध्येही फिट्ट
क्रॉफर्ड मार्केट ते दाणा बाजार
आहेच सगळ्यांचं पेट्ट!
फोनवरून, ईमेलवरून संदेश सर्वदूर पसरतात. ठरलेला दिवस उजाडतो, वेळ समीप येते आणि मुंबईच्या सीएसटी स्टेशनवर उत्साहाची आणि चैतन्याची त्सुनामी येते.
मायबोलीवरच्या मैतरणी जमती स्टेशनी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी ||धृ.||
काय सांगू काय सांगू आमचं क्रॉफर्ड मार्केट मोलाचं
कसं सांगू कसं सांगू जणू कल्पवृक्षाच्या तोलाचं
क्रोमात क्रॉमात काजू बदाम मिळतील
मंगळदासात चांगली कापडंचोपडं मिळतील
जामा मशिदी शेजारी आहे कटलरी मार्केट
ब्युटी पार्लरचे सामान मिळे बाजूच्या गल्लीत
घरसजावटीसाठी मिळतील अभ्रे, चादरी, पडदे
फिशटँक - पाळीव पक्षी ह्यांनी गृहशोभा वाढे
क्रॉमामधली ही फेरी आनंदाचीचं पर्वणी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी||१||
वाटेवरतीच लागे मुंबा देवीचे मंदिर
भक्ती भाव माझा मला तिथे नेण्यास अधीर
त्याच रस्त्याने सरळ जाता लागे भुलेश्वर
कलाकुसरीच्या वस्तु मिळण्याचे ते माहेर
माधवबाग तांबाकाटा आहे इथले प्रसिद्ध
भांडी कुंडी विक्रीसाठी आहे नेहमीच बद्ध
येता जवळ उन्हाळा घ्यावा मसाला कराया
दाणा बाजार मस्जीदचा मग हवाच गाठाया
पैसे वाचती म्हणून गेल्या हरखून मैतरणी
स्टेशनावरती रंगली गं खरेदीची गाणी||२||
व्रत म्हटलं की कहाणी ही हवीच. भक्तीभावाने कहाणी ऐकून त्याचं पालन केल्यानेच व्रत सुफळ संपूर्ण होतं असं म्हणतात. म्हणून तर ही कहाणी तुमच्यासाठी.
ऐका खखा देवा तुमची कहाणी.
मुंबई नामक शहरामधे रहायचा एक गणपत वाणी.
वाण्याला होत्या चार सुना. ३ आवडत्या एक नावडती.
आवडत्यांना मिळे तूप लोणी नावडतीचं मीठही अळणी.
आवडत्यांना दरमहा दिल्ली दरबारची बिर्याणी,
नावडतीला मात्र झुणका भाकर अन पाणी.
पुढं भाद्र्पद मास आला,
गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली.
आवडत्यांसाठी नल्लीज मधून उत्तमोत्तम वस्त्रे आली, पेठे-लागूंकडची आभुषणे आली.
नावडतीची मात्र मोजकेच पैसे देऊन बोळवण करण्यात आली.
दुर्मुखलेली नावडती पैसे घेऊन व्हिटीस्टेशन वर आली.
तिथे तिला मोठ्या बॅगा पाठीवर अडकवलेल्या 'याबायका' त्यांच्या मैत्रिणींसमवेत दिसल्या.
त्यांची उत्साहाने चालू असलेली बडबड तिच्या कानांवर पडली.
त्यांच्यातले चैतन्य पाहून भारावून जात तिने त्यांना विचारलं "मुलींनो, कुठे जाता?"
"आमचं एक व्रत आहे. आज त्याची सांगता आहे, त्याचसाठी दक्षिण मुंबईत खरेदी खादाडीला जातोय. सुरूवात क्रॉफर्ड मार्केटने करू म्हणतोय." एक सखी उत्तरली.
"हे कसलं व्रत आहे? ह्याचं फळ काय आहे?" नावडतीने विचारले.
"हे आमचं खखाचं व्रत आहे. जरा कुठली समस्या अथवा चिंता आम्हांस सतावू लागली तर हे व्रत आम्ही लगेच आचरणात आणतो." तत्परतेने दुसरी सखी म्हणाली.
"ह्या व्रताने काय होईल?"
"बुर्गुंडा होईल, अनुत्साह सरेल आणि तनामनात चैतन्य संचारेल."
"म्हणजे..?"
"तुला बुर्गुंडा माहीत नाही? तू ते प्रसिद्ध भारुड ऐकलेलं नाहीस?" तिसरीने विचारलं.
"नाही.."
"अगं बुर्गुंडा म्हणजे ज्ञानप्राप्ती होईल, शिवाय सगळ्या चिंता, समस्या, क्लेश क्रॉमाच्या गर्दीत लोप पावतील."
"ते कसे काय?"
"अग कसे काय विचारतेस वेडे... तिकडे क्रॉमात मनासारखी खरेदी नी खादाडी होईल. आत्मिक समाधान लाभेल. सख्यांबरोबर एक दिवसाची सहल होईल. अंगात चैतन्य सळसळेल. नव्या उत्साहाने रोजच्या कामांना भिडायचे बळ मिळेल. शिवाय पैशांची बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुर्गुंडा... बुर्गुंडा होईल. एकाच ठिकाणी अनेक वस्तुंची खरेदी होऊ शकते, तीदेखिल थोडक्या पैशांत, ही ज्ञानप्राप्ती तुला होईल. खरेदीचा आनंद हा महागड्या मॉलमधे, पंचतारांकीत हाटेलातच असतोय असं नाही बये (आनंद म्हणजे केळकर अथवा मैत्री नव्हे बरं का! तर आनंद म्हणजे मोद, हर्ष, विंग्रजीत आपण हॅप्पीनेस म्हणतो तो आनंद!), तर सख्यांबरोबर घालवलेल्या चार क्षणांत देखील असतोय हे तुला कळेल. हे व्रत नेमाने करशील तर तुझ्या सासरच्यांनाही बुर्गुंडा होईल मग तू ही नावडतीची आवडती होशील."
"मग मलाही तुमच्या व्रतात घ्या." याबायकांच्या उत्साहाची लागण होऊन नावडती व्रतासाठी सिद्ध झाली.
"उतणार नाहीस? मातणार नाहीस? घेतला वसा टाकणार नाहीस?" याबायका एकत्रच उद्गारल्या.
"उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. पण सासरेबुवांची भिती वाटते. कोणी काही बोलणार तर नाही?"
"त्यासाठी तू खखास्तोत्राच् पठण कर. ते तुला स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना संग्रहात मिळेल."
"मी किती दूर राहते, व्रतानंतर घरी कशी जाऊ? कोणी काही बोलणार तर नाही?"
"बोलणार्यांकडे तु.क. टाक. मी एवढ्या लांबून पुण्याहून नाही का आले?" एक सख्खी मैत्रिण उद्गारली.
"परत जाताना गर्दी असेल. ट्रेनमधे चढू कशी? ’अलिबागहून आली का?’ असे कोणी काही बोलणार तर नाही?"
"अगं मी नाही का रोज गर्दीतूनच डोंबिवलीपर्यंत प्रवास करते? तुला चढवेन मी बरोबर."
"सकाळपासून मी काही खाल्लं नाहीये. भूक लागली तर काय करू? कोणी काही बोलणार तर नाही?"
"अगं मी बरोबर असताना भुकेची चिंताच नको. बादशहाचा फालूदा आणि सदानंदची पावभाजी बेस्ट असते. मी तर बै त्यासाठीच आले आहे."
"आणि मत्स्यप्रेमी असशील तर हॉटेल ग्रॅन्ट आहेच जवळच. तुला माहित्ये का तिथल्या खिमा पावची तारिफ खुद्द पुलं नी केलेय. खिमा पाव, बोंबिल फ़्राय नावं ऐकुनच तोंपासु झालं ना"
"माझी पर्स खूप लांब अन् मोठी आहे. कोणी चोरणार तर नाही?"
"अगं पर्स माझ्यासारखी कंडक्टर स्टाईलने घे, म्हणजे हात मोकळे राहतील अन् तूही खरेदी करायला मोकळी राहशील." दुसरी सख्खी मैत्रिण उद्गारली.
"दरवेळी एकाच ठिकाणी जाता?"
"नाही ग बये उन्हाळा आला की मसाल्यांच्या जिन्नसांसाठी आधी मस्जिद बंदरचा दाणा बाजार गाठतो. " एकीने माहिती पुरवली.
"इतरवेळी काय घ्यायचेय त्याच्या प्रमाणे कधी क्रॉफर्ड मार्केटात जातो, कधी लोहार चाळीत जातो, कधी झव्हेरी बाजारची सैर करतो तर कधी मेट्रोच्या बाजूचा फ़ॅशन स्ट्रीट पालथा घालतो." दुसरी पहिलीला सामील झाली.
मग याबायकांच्या मदतीने नावडतीने सगळ्या समस्यांवर मात करून क्रॉफर्ड मार्केटात जाऊन खरेदी केली. गणपतीसाठी सुकामेवा आणि फळं घेतली. मखरासाठी साठी इलेक्ट्रिकच्या माळा घेतल्या, सजावटीची फुले घेतली. मुला-बाळांसाठी कपडे, चॉकलेटांचे सामान आणि खेळणी घेतली. महंमद अली रोडवरून मुला-बाळांच्या शाळेच्या वस्तुंचीही खरेदी झाली. गणपतीत येणार्या पाहुण्यांसाठी सुरेखश्या कपबश्या आणि कागदी कप-प्लेट-द्रोण घेतले. सोबतीला आणि मार्गदर्शनाला याबायका होत्याच. आणि करमणुकीला त्यांच्या मायबोलीगप्पा होत्या. मंगळदास मार्केटातून सासरेबुवा आणि आवडत्यांसाठी कपडे खरेदी केली, अभ्रे-पलंगपोस आणि खिडक्यांसाठी पडदे घेतले. भूक लागली तेव्हा बादशहाचा फालूदा खाल्ला. मुंबादेवीचे दर्शन घेतले. तिथेच शेजारी भगत ताराचंद मधे अप्रतिम अशी थाळी जेवून नावडतीसकट याबायका तृप्त झाल्या. परतीच्या वेळी व्हिटीस्टेशनवर फ्रँकी खाऊन त्यांच्या खखाव्रताची सांगता झाली.
आनंदीत होऊन आणि पैसेही उरवून नावडती सुखरुप घरी पोचली.
अशा रितीने तिने पैशाची बचत करुन मनासारखी खरेदी केली. बादशहा मधे जाऊन मनपसंत खादाडीही केली. सख्यांच्या सोबतीने पुन्हा ती आनंदी झाली. सुनेचा आनंदी चेहरा पाहून गणपत वाण्याने विचारले तेव्हा त्यालाही ह्या खखा व्रताची महती कळली. त्यानेही क्रॉफर्ड मार्केटाची वारी केली, लोहारचाळीची सफर केली, हॉटेल ग्रॅन्ट मधली सामिष थाळीही जेवून भरून पावला. चकचकीत मॉल पेक्षा त्याला ही वारी आवडून गेली, वर पैशाची बचतही झाली. त्यामुळे नावडती सून आवडती झाली.
असे हे खखा व्रत नावडतीला फळले तसेच ते तुम्हां आम्हां फळो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
---------
मुंबापुरीतली फिरण्यासारखी ठिकाणं म्हटली की तीच ती नेहमीची स्थळदर्शन यादी समोर येते. अगदी गुगलदेवाला विचारलं तरी तीच ती नेहमीची गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, म्युझियम, तारांगण, राणीची बाग इ. इ. ठिकाणं डोळ्यांसमोर नाचत राहतात. अख्खी मुंबापुरी एकवेळ बाजूला राहुद्यात, पण सीएसटी नामक स्थानक् ते मस्जिद ब्ंदर ह्या मागोमागच्या दोन स्थानकांदरम्यानची ही एव्ह्ढी बघण्यासारखी, पायी फिरण्यासारखी "घाऊक बाजार" ठिकाणं आहेत ह्याची खुद्द मुंबापुरी आणि तिच्या आसपास रहाणार्यांनाही जुजबीच माहिती असते. म्हणून ज्या स्थळांना "मुंबई दर्शन" च्या आखीव पत्रकात तितकसं स्थान नाही पण ज्या स्थळांशिवाय् "ये है मुंबै मेरी जान" हे वाक्य पूर्ण होत नाही त्यातल्याच काही स्थळांची ओळख करून देण्याचा हा व्रत आणि कहाणी प्रपंच!
खरेदी करा किंवा करू नका पण एकदा या परीसरातल्या ह्या घाऊक बाजाराची सफर मात्र जरूर करा.
आणि "ये है मुंबै मेरी जान!" चा अनुभव तुम्हीही घ्या!
---------------
सुची:
क्रॉफर्ड मार्केट :-
कमानीतून आत गेल्यावर मिळणाऱ्या वस्तू - सुका मेवा, चॉकलेट्स, चॉकलेट मोल्ड्स, टॉयलेटरीज, लहान मुलांचे/मोठ्यांचे डायपर्स, कॉस्मेटिक्स, नॉव्हेल्टी आयटेम्स, पॅकेजिंग्/पॅकिंगचे सामान (गिफ्ट रॅपर्स, पिशव्या, एन्व्हलप्स, गोंडे, पार्सलचे सामान),कागदाच्या डिश, पेले, गिफ्ट आर्टिकल्स, पर्फ्यूम्स इत्यादी
आणखीही बरंच काही.. आणि तिथेच् बाजूला आहे फळ, भाजी बाजार. तसे बाराही महिने गजबजलेला पण आंब्यांच्या मोसमात जरा जास्तच गजबज आणि गडबड असणारा हा भाग.
क्रॉमा समोरच्या रस्त्यावर तुम्हाला मिळतील लेडिज टॉप्स, साडी फोल्डर्स, विविध क्षमतेच्या पिशव्या, बेडशिट्स, पिलो कव्हर्स, चादरी, टेबल कव्हर्स, सोफा कव्हर्स, टेबल मॅट्स, शोभेची फुले, पिना /रबरबॅण्ड्स, पर्सेस, गाऊन्स, पेटिकोट्स, हँगर्स, कपडे वाळत घालायच्या दोर्याट, चिमटे, स्टेनलेस स्टीलच्या छोट्या/मध्यम आकाराच्या वस्तू, प्लॅस्टीक सामान.
समोरच्या दुकानांत :- लखनवी कपडे, खादाडी, लहान मुलांचे तयार कपडे, विविध ब्रँडच्या कॉस्मेटिक्स वस्तू, पडदे / सोफ्याची कापडं, दिवाळीसाठी तोरणं, माळा, कंदिल, पणत्या आणखी बरंच काही.
मंगळदास मार्केट :-
कपडे.. कपडे आणि कपडे.... नावाजलेल्या ब्रँड्सचं शर्टिंग सूटिंग, साड्या, ताग्यातली कापडं, रेडिमेड कुर्ते पायजमे सलवारी, शाली... सगळं सगळं होलसेल भावात.
जामा मशिदी शेजारचे कटलरी मार्केट :- आतल्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये ब्युटिपार्लरसाठी लागणारर्या वस्तू/ सामान अगदी स्वस्तात मिळतात, आर्टिफिशियल ज्वेलरी, क्रोकरी मार्केट.
मंगलदास मार्केटच्या समोर जामा मशिदीच्या बाजूने जाणारा रस्ता जातो झवेरी बाजारला. आता तिथे काय् मिळते हे का सांगायला हवे?
मुंबादेवी : मुंबादेवी मंदीर प्राचीन आहे आणि ती मुंबईची मूळ देवी आहे असे मानले जाते.
त्याच रस्त्याने पुढे गेलं की भोईवाडा / भुलेश्वर :- कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याचे सामान, भरतकाम, विणकाम, नकली दागिने बनविण्याचे सामान प्रचंड स्वस्त मिळते. बाकी कपडे, बॅग्स, पर्सेस देखील इथे मिळतात.
भुलेश्वरमधील खाऊ गल्ली : खरेदी करून दमलं की इथे एखाद्या गाडीपाशी जाऊन गरमागरम काहीतरी खाऊन घ्यायचे.
डाव्याबाजूला वळले की जवळच आहे फुलगल्ली : इथे सकाळीच फुलांचा घाऊक बाजार भरतो.
उजव्या बाजूला भुलेश्वर परिसरातील अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत.
माधवबाग : येथे शिसवी व इतर प्रकारचे उत्तम देव्हारे मिळतात. स्टिलच्या भांड्यांची दुकानं आहेत.
तांबाकाटा : येथे तांब्या पितळेची, स्टिलची भांडी खूप स्वस्त मिळतात. दुर्मिळ घाटाच्या आणि प्रकारच्या वस्तू इथे मिळून जातात. मोठाल्या समया, तपेल्या, घंगाळी वगैरेही इथे अजून मिळतात. तीही अतिशय स्वस्त.
गुलाल वाडी : गुलालवाडीची पावभाजी खूप प्रसिद्ध आहे.
मशिद बंदर (दाणा बाजार) : मसाले, कडधान्य, गहू, तांदूळ व इतर वाणसामानाचा घाऊक बाजार. कित्येक किरकोळ विक्रेते इथूनच दुकानं भरतात. गिरगाव भागातली कित्येक घरं इथूनच वर्षाचे, महिन्याचे सामान भरतात.
दवा बाजार : औषधांचे घाऊक विक्रेते. औषधांचे किरकोळ विक्रेते इथूनच ऑर्डर देऊन माल भरतात.
प्रकाशचित्र सहाय्य:
आंतरजालीय प्रताधिकार मुक्त प्रकाशचित्रे
अप्रतिम!!!! भारी आवडलं तुमचं
अप्रतिम!!!! भारी आवडलं तुमचं खखाव्रत. लिस्ट भारी उपयोगी. मी पण करणार खखाव्रत.
ख करून करून दमल्या असाल. वाईच टेका. अन हा घ्या :
मस्त कहाणी... माझी चिमूटभर भर
मस्त कहाणी... माझी चिमूटभर भर -
स्टेशनरीमधली हवी ती वस्तू मिळवण्यासाठी, फोर्ट मधल्या अग्यारी लेनच्या आजूबाजूच्या गल्ल्या !
भाजीसाठी, ग्रँटरोडची भाजीगल्ली, दादरचा रानडे रोड, डिसिल्व्हा रोड (आणि खास पनवेलच्या भाज्यांसाठी गोल देवळाचा परीसर,) शिवाय पार्ला, मुलुंड आणि घाटकोपर.
मद्रासी भाज्यांसाठी, माटुंगा आणि चेंबूर
फटाक्यांसाठी, कुर्ला स्टेशन, पश्चिम. तिथे बारा महीने, घाऊक भावात फटाके मिळतात.
खादी उत्पादनासाठी- फोर्टमधलेच खादी ग्रामोद्योग.
पुस्तकांसाठी, मॅजेस्टीक आणि आयडियल
मुंबादेवी मूळची आहेच. मुंगा नावाच्या कोळणीने तिची स्थापना केली. तिच्या नावाचा अपभ्रंश होऊन मुंबा आणि पुढे मुंबादेवी झाले. तसेच शितलादेवी, प्रभादेवी, भोगादेवी, महालक्ष्मी या देव्या आणि बाबुलनाथ, वाळकेश्वर, ताडदेव, घोडपदेव, पिकेट रोडचा मारुती हे आदीदेव.
मामे
मामे
मामी
मामी
भारी व्रत आहे हे! पुढच्या
भारी व्रत आहे हे!
पुढच्या वेळेला तुमच्याबरोबर मी पण करणार बर्का हे व्रत.
ते मनिष मार्केट पण जवळपासच
ते मनिष मार्केट पण जवळपासच आहे ना कुठे... विलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी मिळणारं..
सहीच ! एकदा हे व्रत घ्यायलाच
सहीच ! एकदा हे व्रत घ्यायलाच हवं. वरचं वाचून घेतला वसा चालूच राहील असं दिसतय !
'याबायका' हे नावच भारी मी
'याबायका' हे नावच भारी
मी व्रतकरी आहे. आजन्म झालेली आहे, कधीच उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
मी व्रतकरी आहे. आजन्म झालेली
मी व्रतकरी आहे. आजन्म झालेली आहे, कधीच उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही
>> +१
भारी व्रत घेतलयसं कविन .
भारी व्रत घेतलयसं कविन . याबायका ना
मामींनी स्वतःचा फोटो का टाकलाय ?
धमाल लिहलय..ग्रूप च नाव,
धमाल लिहलय..ग्रूप च नाव, व्रताच नाव..:)
सही आहे. आता खखा व्रत
सही आहे. आता खखा व्रत फ्यामिलीसकट.
कवडे मस्तच , नाव पण धमाल आहे
कवडे मस्तच , नाव पण धमाल आहे
मस्तच आहे की हे व्रत! पुढच्या
मस्तच आहे की हे व्रत! पुढच्या खेपेला मी पण!
याबायका, खखा देवी
जबरी मस्तय! महिन्यातून एकदा
जबरी मस्तय! महिन्यातून एकदा तरी हे व्रत पाळायलाच हवं!
याबायका! मस्तच
याबायका! मस्तच
धमाल व्रत आहे!! आवडलंच!
धमाल व्रत आहे!! आवडलंच!
कवे.. मस्तच ग.. मलाही करायचय
कवे.. मस्तच ग.. मलाही करायचय हे व्रत पण तुमच्या कंपूबरोबरच..
हा हा हा हा ... याबायका
हा हा हा हा ... याबायका मस्तच! धमाल लिहिलय
या या! सगळ्यांनी या. बसच
या या! सगळ्यांनी या. बसच करुन जाऊ क्रॉफर्ड मार्केट पर्यंत. नंतर मात्र ११ नंबरची बसच हं. तीच एकटी गल्लीबोळातून सहजपणे जाते
'याबायका' हे नाव फारच
'याबायका' हे नाव फारच आवडलं....वसा घेतेय व्रताचा, खखादेवी आशिर्वाद असूदेत
नाव, लेख, व्रत मस्त जमले आहे.
नाव, लेख, व्रत मस्त जमले आहे.
हे व्रत मी पण घेते.. उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही
धन्यवाद समदी मंडळी या फॅमेली
धन्यवाद समदी मंडळी या फॅमेली सकट या. एक महा गटगच करुयात एक लिटमस टेस्ट पास करावी लागेल आधी या गटग साठी? मत देऊन आपापली उपस्थिती पक्की करावी लागेल
कवे, मत देणं प्रोग्रॅम कुठे
कवे, मत देणं प्रोग्रॅम कुठे आहे? मला दिसत नाहिये तो!
फॅमिलीसकट >>>> अगदी अगदी. बच्चा खुश, बच्चे का बाप भी खुश, बच्चे के नाना नानी, दादा दादी भी खुश...
अश्वे आत्ता नहिये मत देणं हे
अश्वे आत्ता नहिये मत देणं हे मतदाना पुर्वीचं ट्रेलर आहे
खखा व्रत देणा-या खखा देवींना
खखा व्रत देणा-या खखा देवींना साष्टांग नमस्कार
याबायका
भारी जमलय !
मस्त लिहिलंय कविता.
मस्त लिहिलंय कविता.
भारीये सुची
भारीये सुची
काय भारी लिहीलंय!! माझ्याकडून
काय भारी लिहीलंय!! माझ्याकडून पैला नंबर!!
मलापण व्रत करायचंय!!
भारीच्च! कोलाज पाहून
भारीच्च!
कोलाज पाहून खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर लहानग्यांचे डोळे विस्फारतात तसे माझे डोळे विस्फारले. अगदी खरंय, हीच मुंबई मेरी जान !
मी यातलं एकही ठिकाण अजून प्रत्यक्ष पाहिलेलं नाही...
Pages