चित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) - प्रकाशचित्र क्र. १ (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत.)

Submitted by संयोजक on 7 September, 2012 - 11:49

Zabbu_0024.jpg

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा हातभार लागो कुंभाराच्या चाकाला
एक सान फूल लागो वेड्या माझ्या हाताला
घटांतून मध कसा झिरपून ओथंबावा
छातीशी घेता फुलाला हर्ष ओलाचिंब व्हावा

कालचक्राच्या गतीने खेळ लोभस मांडला.

जन्म मातीच्या कणांनी देहरूपी घेतला.

बाल्य गेले जोश सुकता देह चंचल जाहला

द्वाड काळाला नव्याने चिखलगोळा लाभला

कालचक्र हे अविरत फिरते
घटाघटांतून जीवन फुलते
संक्रमणातून सहज उमलते
दोन पिढ्यांतील अलगद नाते

सहज वाटलं मला सुंदर घटाकडे पहात
कुंभाराच्या चाकावर मातीचा गोळा होत बसावं
मेलेली माझ्यातली मी कुंभाराच्या हाताने
परत सुंदर माणूस होवून घडावं

होता अलगद स्पर्श सुरकुतला
आकार घेतसे मातीचा गोळा
ये भेट, जीव लावूनी मृत्तिकेला
नको बाळगू व्यर्थ संकोच बाळा

गरगरत्या चाकावरती या
रुप लाभते घटाघटाला
भरभर जाते कोवळिक ती
सुरकुत पडते त्याच हाताला

फिरत्या चाकावर मातीचा गोळा-
घेतो आकार, भागवतो भूक
कुणाच्या पोटाची,
कुणाच्या मनाची

कुंभाराच्या चाकावर मिळतो आहे मातीला आकार

नव्या हाताना मिळतोय ''अनुभवी'' हातांचा आधार

जीवनचक्र आपले असेच आहे ते सतत फिरत राहणार

जो ''अनुभवांना '' सोबत घेईल , तोच जग जिंकणार

स्पर्शातील भावनांची खोली मातीलाही कळायची

सुबक आकार घेवूनी ती भट्टीमधूनी जळायची

कणाकणांच्या अस्तित्वांचे बंध जोडताना मायेतून

आठवते मज तुझीच बोटे शिल्प घडवण्या वळायची .

माती हवी तशी वळे, जीव ओताया घटात
बळ होतं मनगटी, तशी गतीही चाकात
घट घडविता घडविता थकले हे हात
देते मातीचा वारसा तुझ्या समर्थ हातात

वळवावी बोटं जरा, घ्यावं मातीला कुशीत.
गोंजारावं खूप वेळ, मग येतीया खुशीत.
नको घेऊ आढेवेढे; माती आई आहे बाळा.
हात मळल्यावाचून नाही आकार घटाला.

संघमित्रेच्या ओळी केवळ बेष्ट आहेत.

माझीही एण्ट्री - शार्दूलविक्रीडित.

बोटांना धरुनी तुम्हां शिकविली आयुष्यतत्त्वें व्रते
धडपडली फुटली तरीही घडली कित्येक मडकी इथें
मातीतूनच विश्व सर्व घडु दे, अलवार स्पर्शे तुझ्या
काळच देई तयासि आकार रे, तू फक्त द्यावी दिशा

माती असते नवनवोन्म्शेषशालीनी
मतीही असते सृजनशील तिच्यापरी
घडवीण्यास दोन्हीस लागते कष्टचक्र
जलाविना माती शुष्क कष्टाविना मती भ्रष्ट

जर्रा गंमत....

फिरतं चाक, त्यावर चिक्कण माती
घडत्येय कला माझ्या अनुभवी हाती
अरे, अरे.. नको करुस तु अशी मस्ती
थांबव बर ही तुझी जबरदस्ती ...... Proud

मातीलाही आस नव्याची
दोन पिढ्यांची चल मोट धरू
अनुभव माझा, साथ तूझी
चल मिळूनी नव-निर्माण करू

धर अलगत विश्वासानं, अर्ध्यावरती सोडू नको,
साधक सिध्द नकळत होशिल , नावामागं दडू नको.

ओल्या मातीला आकार देती अनुभवी हात
घडणे बिघडणे जसे सतत काल चक्रात
चालवाया वारसा, येई नव्या युगाचा हात
नवे बल येई थकल्या सुरकुतल्या हातात

आकार द्यायला शिकवत गेलास,
तु मला आकार देता देता.
तुलाही पुढे हेच करायचे आहे,
हेच सांगत होतास का रे जाता जाता

Pages