रसिकमित्रमैत्रिणींनो!
सुमारे ४४ वर्षांपूर्वी (१९६८), म्हणजे आम्ही १४ वर्षांचे, इयत्ता ८वी तुकडी अ (न्यू इंग्लिश स्कूल, टिळकरोड) मधे होतो, तेव्हा जिच्या, एका झटक्यात, पाहिल्या पाहिल्या, प्रेमात पडलो, तिला (म्हणजे आताच्या देवमामींना) ही माझी गझल अर्पण करत आहे. गेली ४२-४४ वर्षे आम्ही एकमेकांस भेटत आहोत, सोसत आहोत(थट्टेने म्हणतो बर का, नाही तर देवमामी आमच्यावर उचकतील, कडकलक्ष्मी आहेत हो त्या!....को.ब्रा. B.Sc. M.A. B.Ed. Clinical Psychologist & zoologist, आम्ही आपले बापुडे देशस्थ, दगडधोंड्यांचे प्राध्यापक!) पहा आमच्या त्यावेळच्या भावना, आपणास कशा वाटतात त्या...........
टीप: या गझलेतील पहिले ३ शेर मी साधारणपणे १९९४ मधे (१८वर्षांपूर्वी) लिहिलेले माझ्या डायरीतील नोंदी सांगतात. सकाळी सकाळी ते माझ्या वाचनात आले. पूर्ण दिवस त्याच धुंदीत महाविद्यालयात होतो, तेव्हा उरलेले ८ शेर एका चिठोरग्यावर लिहून हातावेगळे केले, व घरी आल्यावर गझल डायरीत नोंदवली व आता टाईप करून मायबोलीवर टाकत आहे!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................
गझल
तिच्याशी मोकळे अगदी मला बोलायचे आहे!
तिच्यामाझ्यातले नाते, तिला सांगायचे आहे!!
तिच्या स्वप्नील डोळ्यांनी गुलाबी घातली कोडी;
वही घेवून हृदयाची, तिला भेटायचे आहे!
मला दे पंख स्वप्नांचे, असू दे पाय मातीचे;
अरे! आकाश धरणीशी, मला सांधायचे आहे!
पुरी चाळीस बेचाळीस वर्षे भेटतो आम्ही;
तरीही वाटते आहे, तिला भेटायचे आहे!
बिलंदर मी जरी आहे, न काही चालते माझे!
सिकंदर बायको आहे, तिला जिंकायचे आहे!!
उभे तारुण्य झाले खर्च घरटे बांधण्यासाठी;
तरी वार्धक्य म्हणते......घर मला बांधायचे आहे!
नशा गझलेतली माझ्या कधी उतरत अशी नाही!
तरी गझलेस मी म्हणतो......मला झिंगायचे आहे!!
मला आकाशही वाटेवरी भेटून गेलेले.......
तरी मी चालतो आहे, मला चालायचे आहे!
किती मी पुस्तके वाचून झालो मोकळा, आता.....
अरे! माणूस अन् माणूस मज वाचायचे आहे!
कुठे माझ्यामधे आली, तुझी किंचित तरी छाया?
तुझ्या रंगामधे पुरते मला रंगायचे आहे!
तुझा दे कुंचला मजला! तुझे दे रंगही मजला!
मला ते चित्र फिरुनी एकदा काढायचे आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
छान
छान
आवडली
आवडली
मला दे पंख स्वप्नांचे, असू दे
मला दे पंख स्वप्नांचे, असू दे पाय मातीचे;
अरे! आकाश धरणीशी, मला सांधायचे आहे!
उभे तारुण्य झाले खर्च घरटे बांधण्यासाठी;
तरी वार्धक्य म्हणते......घर मला बांधायचे आहे!
मला आकाशही वाटेवरी भेटून गेलेले.......
तरी मी चालतो आहे, मला चालायचे आहे!
कुठे माझ्यामधे आली, तुझी किंचित तरी छाया?
तुझ्या रंगामधे पुरते मला रंगायचे आहे!
तुझा दे कुंचला मजला! तुझे दे रंगही मजला!
मला ते चित्र फिरुनी एकदा काढायचे आहे!!<<<
वा प्रोफेसर साहेब, मस्त आहेत हे शेर! वहिनींना आमचाही नमस्कार सांगा!
तुमची एक खोडी काढू का? कधी 'पर्यायी वहिनी' आणू का आम्ही कोणी?
हलके घ्यावेत.
तुमच्या यापुढील वैवाहिक आयुष्यासही मनापासून शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
बेफिकीरजी! धन्यवाद
बेफिकीरजी! धन्यवाद प्रतिसादाबद्दल!
तुमची एक खोडी काढू का? कधी 'पर्यायी वहिनी' आणू का आम्ही कोणी?<<<<<
‘पर्यायी’ शब्द जरी काढला, तर कडकलक्ष्मीचा अवतार प्रकट होतो घरात भूषणराव!
इथे आम्ही चटपटीत पर्यायी भाजी आणलेली पण चालत नाही! पर्यायी वहिनी?.....बबब! माझी तर नुसत्या खयालानेच बोबडी वळाली पहा!
असो!
पहिल्या दोन शेरांत काही चुकले आहे का?
............प्रा.सतीश देवपूरकर
प्रोफेसर साहेब, पहिल्या दोन
प्रोफेसर साहेब, पहिल्या दोन शेरात मला विशेष खणखणीतपणा जाणवला नाही. स्वप्नील डोळे, गुलाबी कोडी आणि हृदयाची वही यांची सांगड घालण्याचे प्रयास करावेसे वाटले नाहीत. मतला किंचित सपाट वाटला. आपण विचारलेत म्हणून स्पष्टपणे लिहिण्याचे साहस केले, क्षमस्व!
==============
बाकी तुम्ही गझलेवर इतके प्रेम करता हे पाहून पर्यायी प्रोफेसर अस्तित्वात येण्याची ही शक्यता तर नाही ना वाटत तुम्हाला (केवळ गंमत म्हणून घ्या)
‘पर्यायी’ शब्द जरी काढला, तर
‘पर्यायी’ शब्द जरी काढला, तर कडकलक्ष्मीचा अवतार प्रकट होतो घरात भूषणराव!>>>>>>>
आमची मामीन्शी दोस्ती जमणार तर (शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने ! ;))
असो चेष्टा बास आता मुद्द्याला हात घालतो
प्रस्तावनेने काळजालाच हात घातला
ग्रेट आहात सर तुम्ही अन तुम्हाला ४४ वर्षे सहन करतायत म्हणजे मामीतर तुमच्या पेक्षा ग्रेट असणार नक्कीच !!
हरएक शेर आत्म्यातून उतरल्यासारखा झालाय त्यामुळे कोणता वेगळा कोट करावा समजत नाहीच्चय
गझल फार फार आवडली
धन्यवाद !!
सा.न. स्वीकाराच
मामीनाही प्रणाम सान्गा
_______/\________
____________________________________
अवान्तर : clinical psychology हा अभ्यास-विषय निवडण्याचा निर्णय मात्र मामीनी , जीवनसाथी म्हणून तुम्हाला निवडल्यानंतरच घेतला असणार असे वाटते. पुढे दैवात काय काय वाढून ठेवले आहे हे त्यांनी बरोबर ओळखलेले दिसते त्यांच्या अचूक निर्णयक्षमतेस अन दूरदृष्टीस सलाम !!
पुन्हा गम्मत करतोय सर सिरीयस होवू नका !!
तुमची एक खोडी काढू का? कधी
तुमची एक खोडी काढू का? कधी 'पर्यायी वहिनी' आणू का आम्ही कोणी?.....
किती हा खोडकरपणा बेफी ? अं ?
पुरी चाळीस बेचाळीस वर्षे
पुरी चाळीस बेचाळीस वर्षे भेटतो आम्ही;
तरीही वाटते आहे, तिला भेटायचे आहे!
सुंदर शेर!!
वाह...!! सुंदर, नितांत सुंदर
वाह...!! सुंदर, नितांत सुंदर गझल...!!
बेफिजी आणि वैवकु ह्यांचे प्रतिसादही सहीच...!
खासच ! वैवाहिक जिवनास
खासच !
वैवाहिक जिवनास शुभेच्छा !
चांगली रोमँटिक गझल, विशेषतः
चांगली रोमँटिक गझल, विशेषतः ९४ चे शेर आवडले !
कोणे एके काळी हीच जमीन वापरून मीसुद्धा काही रोमॅंटिक शेर लिहिले होते, जे मलाच विशेष आवडले नाहीत म्हणून गझल केली नाही.
"तुझ्या गावात शब्दांनी मला बरसायचे आहे
तुला कळलेच नाही ते तुला कळवायचे आहे
तळाशी थांबल्या अर्थास माझा हात लागावा
तुझ्या डोळ्यांत इतके खोलवर उतरायचे आहे
भविष्याची अशी चिंता तुझ्या डोळ्यात दिसते की-
जणू याहूनही वाईट काही व्हायचे आहे..."
वगैरे.
सुंदर गझल
सुंदर गझल
(No subject)
ज्ञानोबा...... पूर्ण करा की
ज्ञानोबा...... पूर्ण करा की गझल.
चिखल्या म्हणे आता
चिखल्या म्हणे आता |
गझलेपेक्षा प्रतिसादच भारी ||
देवसर तारी, त्याला कोण मारी ||
श्रीहरी श्रीहरी श्रीहरी श्रीहरी || १ ||