कुंभलगड हे स्थान राजस्थानमधील मेवाड प्रांतातील राजसामंड नामक जिल्ह्याच्या जंगल विभागात (forest region) येते. कुंभलगड ला पोचण्याचे २ स्वतंत्र मार्ग आहेत. एक फालना वरून रणकपूर मार्गे व दुसरा उदयपूरहून. फालना ते कुंभलगड हे अंतर साधारणपणे ९० किमी आहे. उदयपूरहूनही जवळपास तितकेच अंतर आहे. फालना ते कुंभलगड ह्या मार्गावर बरोब्बर मध्यावर (साधारण ५० ते ५५ किमी) रणकपूर चे जैन मंदीर लागते. ह्या मंदीराच्या नंतरचा कुंभलगडापर्यंतचा रस्ता घाटांचा व वळणा-वळणांचा आहे.
सिसोदिया वंशीय मेवाड चा राणा कुंभा ह्याने पंधराव्या शतकात बांधलेली ही गढी शूरवीर योद्धा महाराणा प्रताप ह्यांचे निवासस्थानही आहे. राणा कुंभा हे राणा प्रताप ह्यांच्या पणजोबांचे आजोबा (आमच्या गाईडच्या भाषेत - 'परदादा के दादा'). मधल्या राजांची नावे गाईडने सांगितली होती. आता लक्षात नाहीत.
कुंभलगड मुख्यतः ओळखला जातो ते त्याच्या ३६ किमी लांब अतिभव्य तटबंदीमुळे! काही ठिकाणी ही तटबंदी १५ फूट इतक्या रुंदीची आहे. संपूर्ण जगात चीनच्या लांबलचक तटबंदीनंतर ह्या तटबंदीचा दुसरा क्रमांक लागतो अशीही माहिती मिळाली.
किल्ला चढून वर जाईपर्यंत एकूण तीन भव्य दरवाजे लागतात. किल्याच्या ह्या महादरवाजांना तिथे 'पोल' असे म्हणतात. पहिला दरवाजा ओलांडून चारचाकी वाहने पुढे येऊ शकतात. 'राम पोल' च्या अलीकडे वाहनतळ आहे. तिथे गाडी सोडून पुढे पायी गड चढावा लागतो. अधे मधे छोटी प्रवेशद्वारे लागतात.
राम पोलच्या अलीकडचे प्रवेशद्वार:राम पोलः
वर चढताना सगळीकडे सपाट चढण असल्याने खूप दमछाक होत नाही. मागच्या आठवड्यात १५ सप्टेंबरला इथे भेट दिली तेव्हा ढगाळ वातावरण असल्याने हवा आल्हाददायक होती. त्यामुळेही असेल कदाचित, पण चढणे अजिबात त्रासदायक वाटले नाही.
आपल्याकडच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गड-किल्ल्यांशी इथल्या किल्ल्यांची तुलना करण्याचा मोह झालाच. संपूर्ण प्रवासभर जे काही डोंगर पाहिले ते उघडेबोडके होते. कुंभलगड हा जंगल विभाग असल्याने हिरवाई होती. पण सह्याद्री प्रमाणे दाट जंगले, दर्या, कडे-कपार्या, घनदाट हिरवाई मधे लपलेले डोंगरमाथे असे काही आढळले नाही. तेथील गाईड्स/ स्थानिक लोकांच्या दृष्टीने कुंभलगड चढणे कष्टप्रद आहे. आमच्या गाईडने "पाण्याची बाटली जवळ नक्की बाळगा. चढून खूप दम लागेल" असे सुरुवातीलाच सांगितले. म्हणून पुन्हा मागे जाऊन कार मधून पाणी घेऊन आलो. तर संपूर्ण गड तासाभरात चढून सर्वात वर पोचलो देखील होतो! २-२ तास कठीण वाटांनी ट्रेक करून डोंगराचे/ किल्ल्याचे शिखर गाठावे लागणार्या आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या मानाने हा किल्ला अगदीच "फूस्स्स" वाटला. कदाचित उंट हे स्वारी/शिकारी व युद्धासाठीचे मुख्य वाहन असल्याने अशा चढणीचा रस्ता उपयोगी असावा.
सपाट चढणीचा रस्ता:
संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदीच्या घेर्याच्या आत एकूण ३६० मंदीरे आहेत. त्यातली काही जैन तर काही हिंदू आहेत. पैकी बरीचशी (जवळपास निम्मी) मंदीरे पडझड झाल्याने व काही डागडुजीच्या कारणास्तव बंद आहेत. काहींमधे अजूनही पूजा-अर्चा चालते. किल्ल्याच्या पायथ्यानजीक स्थानिक गावकरी राहतात. अंदाजे लोकसंख्या कळू शकली नाही. किल्ला चढताना अरवली पर्वतरांगांचे नयनरम्य दर्शन घडत राहते. इथे घोंघावणारा वारा नव्हता. अधे मधे वार्याची झुळूक व अधे मधे सुखद ऊन तर चक्क मधेच पावसाचा पुसट व गात शिडकावा अशा वातावरणात गड चढताना मधेच आसपासच्या जंगलातला मोराचा केकारव स्पष्ट ऐकू येत होता.
राम पोल मधून आत शिरल्या शिरल्या उजवीकडे दिसणारे शिव मंदीरःशिवमंदीरासमोर उभे राहून दिसणारा किल्ल्याचा भाग (चढणीच्या सुरुवातीचे बांधकाम व किल्ल्यावरील महाल):
चढणीच्या सुरुवातीलाच आमच्या गाईडने गडाच्या बांधकामा बद्दल तेथे प्रचलित असलेली रंजक आख्यायिका सांगितली. ती अशी -
"सुरुवातीला राणा कुंभाने जवळच असलेल्या केलवाडा ह्या भागात स्वतःची गढी उभारण्यासाठी बांधकामाची सुरुवात करवली. परंतु दर दिवशी जितके काही बांधकाम होई ते सर्वच्या सर्व रात्रीत कोसळून पडे. असे सतत होऊ लागले तेव्हा राजाच्या पदरी असलेल्या एका सैनिकाने रात्री दबा धरून ह्यात कुणी मानवी घातपात किंवा दगाफटका तर नाही ना, ते पाहण्याचे ठरविले. त्याप्रमाणे केले असता त्याच्या असे लक्षात आले की बांधकाम आपोआपच कोसळून पडते व ह्यात मानवी कारवाईचा काहीही हात नाही. त्याने राणा कुंभाला हा दैवी प्रकोपाचा भाग असल्याचे सांगून एखाद्या साधू/ संतपुरुषाचा सल्ला ह्या बाबतीत घेण्याचे विनविले. त्यानुसार भैरव सिंग नामक साधूस पाचारण करण्यास आले. त्याने असा सल्ला दिला की दैवी प्रकोपावर उपाय म्हणून एक मानवी बळी द्यावा लागेल. असे सांगून त्या साधूने स्वतः बळी जाण्यास सिद्ध असल्याचे ही सांगितले. फक्त त्याची एक अट होती. ती म्हणजे 'मी मंत्रसाधना झाल्यानंतर चालायला सुरुवात करेन. मी जिथे पहिले थांबेन तिथे माझे शिर धडावेगळे करायचे व किल्ल्याची तटबंदी तिथून चालू करायची. तिथून माझे धड बिना शिराचे चालत जाईल. जिथे माझे धड कोसळेल, तिथून मुख्य किल्ला बांधणे चालू करायचे.'"
अशा प्रकारे किल्ल्याचे बांधकाम चालू करून मग पूर्णत्वास नेण्यात आले. जिथे मुंडके छाटण्यात आले तिथल्या महादरवाज्याला 'भैरव पोल' असे नाव आहे. तिथून थोडे पुढे भैरव सिंगच्या बलिदानाचे स्मरण म्हणून एक छोटुकले देऊळ बांधण्यात आले. भैरव पोल नंतर गढ चढताना उजवीकडे वाटेत हे छोटे देऊळ दिसते.
चढणीदरम्यात दिसणारा तटबंदीचा भाग व मंदीरे:भैरव पोलः
भैरव पोल वरून दिसणारी तटबंदी:
बिनापायर्यांची सपाट चढण
किल्ल्यात कुंभा पॅलेस, बादल पॅलेस, क्वीन्स आणि किंग्स पॅलेस (राजा-राणीचा महाल) ह्या वास्तु आहेत. सर्वात शिखरावरील महाल हा बादल पॅलेस ह्या नावाने ओळखला जातो. कारण पावसाळ्याच्या मोसमात ढगांनी हा पूर्ण महाल वेढला जातो. वर पोचण्याच्या मार्गावर उजव्या बाजुला मुदपाकखाना (रसोई) दृष्टीस पडतो. हा भाग सध्या डागडुजीकरीता बंद ठेवला असल्याकारणाने बाहेरून पहावे लागले. राजस्थान मधील मुख्य अन्न शाकाहार हे आहे. त्यामुळे राजाच्या मुदपाकखान्यात शाकाहारासाठी मुख्य विभाग असे. तसेच मांसाहार पकविण्यासाठी स्वतंत्र विभाग असे. गाईडने धान्ये साठविण्याचे गोदामही दुरूनच दाखविले.
किल्ल्याचे अंतर्गत बांधकामः
शत्रूने हल्ला केल्यास हत्तीच्या सहाय्याने दिंडी दरवाजा धडका देऊन पाडण्यात येत असे. तेव्हा धडक देणार्या हत्तींच्या गंडस्थळांना अणकुचीदार खिळे टोचून त्यांना शक्तीहीन केले जात असे. हत्तींचे डोके ज्या उंचीवर येईल साधारण त्या उंचीवर महादरवाजाला हे खिळे बाहेरून लावण्यात येत असत. (शिवाजीराजांच्या किल्ल्यांमधेही ही युक्ती वापरल्याचे आपल्या गडकिल्ल्यांमध्ये दिसते.)
अणकुचीदार खिळे ठोकलेला महादरवाजा:
वरील महाद्वाराच्या आत गेल्या गेल्या डावीकडे तोफखाना आहे. हत्तींनी धडका देऊन दिंडी दरवाजा सर करून किल्ल्यात प्रवेश केलाच तर शत्रुसैन्यावर लगेच तोफांचा मारा करण्यासाठी अशी योजना असे - इति गाईड महाराज!
तोफखाना व पाहुणे मंडळींचे हत्ती बांधण्याची जागा:राणा कुंभाचा महाल (कुंभा पॅलेस):
गडावर आलेल्या पाहुण्यांची घोडे बांधण्याची जागा:
पाणी साठविण्याची जागा:
महाराणा प्रताप ह्यांचे जन्मस्थळः
चढणीच्या शेवटी राजाचा व राणीचा महाल जवळ जवळ आहेत. पैकी राजाचा महाल सध्या बंद आहे. राणीच्या महालात सख्या व दासींच्या खोल्या, राण्यांचे शयनकक्ष इ. आहे. मध्यभागी मोकळा चौक आहे. इथून पुढे वरच्या बादल पॅलेस मधे जाण्यासाठी चिंचोळ्या पायर्या आहेत. सर्वात वर छतावर जाण्याचाही मार्ग आहे. इथून संपूर्ण किल्ल्याभवतालचा परीसर न्याहाळता येतो. पण पुरेसे सुरक्षित कठडे नसल्याने पटकन एक-दोन फोटो काढून लगेच खाली उतरलो.
राजा व राणी महालः (राजा महालाचा बंद दरवाजा):राणी महालाच्या आतील राणीच्या खोल्या:
राणी महालाच्या आतील चौक
बादल पॅलेसच्या कळसा(छता)वरून दिसणारा किल्ल्या भवतालचा परीसर व अस्पष्टशी तटबंदी:
तळटीपः
सर्व प्रचि स्वतः काढलेले आहेत.
माहिती - गाईड + विकीपीडीया ह्यांच्या सौजन्याने!
कुम्भालगढ आणि राणकपुर
- ह्या आशुतोष०७११ च्या धाग्यावरही कुंभलगडाची माहिती व प्रचि आहेत.
काय मस्त परिसर आहे हा ! सुंदर
काय मस्त परिसर आहे हा ! सुंदर फोटो !!
सुंदर फोटो. ते गाइडने
सुंदर फोटो.

ते गाइडने सांगितलेले इतकं सर्व कसं लक्षात राहत??
परिसर छान आहे.
निंबुडा... छान माहिती...
निंबुडा... छान माहिती... प्रचि सुंदर आहेत.
कुंभलगडचा लाईट शो अप्रतिम असतो.
कुंभलगडचा लाईट शो अप्रतिम
कुंभलगडचा लाईट शो अप्रतिम असतो.
>>
हो! मी पण ऐकलंय ते. पण आम्ही सकाळी ११ ते १ च्या मधे भेट दिली होती.
सुंदर प्रकाशचित्रे आणि तितकेच
सुंदर प्रकाशचित्रे आणि तितकेच सुंदर किल्ल्याचे वर्णन..!
------------
कुंभलगड मुख्यतः ओळखला जातो ते त्याच्या ३६ किमी लांब अतिभव्य तटबंदीमुळे! काही ठिकाणी ही तटबंदी १५ किमी इतक्या रुंदीची आहे.
<<
<<
तुम्हाला १५ मीटर रुंद आहे म्हणायचेय का?
व्वा... छान सफर घडवलीत. सुंदर
व्वा... छान सफर घडवलीत.
सुंदर प्रचि आणि तितकीच छान माहिती.
सपाट चढण कशी असते बुवा???
सपाट चढण कशी असते बुवा???
<< राणा कुंभा हे राणा प्रताप
<< राणा कुंभा हे राणा प्रताप ह्यांच्या पणजोबांचे आजोबा (आमच्या गाईडच्या भाषेत - 'परदादा के दादा'). मधल्या राजांची नावे गाईडने सांगितली होती. आता लक्षात नाहीत. >>
माझ्या माहिती प्रमाणे -
राणा कुंभा
रायमल
राणा सांगा
उदयसिंह
राणा प्रताप
अशी वंशवेल आहे. 'परदादा के दादा' की 'परदादा के पिता' ? कुणी प्रकाश टाकू शकेल?
छायाचित्रे मस्त.
प्रचि व तु केलेले वर्णन
प्रचि व तु केलेले वर्णन दोन्ही छान आहेत.... आवडले .....
मस्त... ईथे पुन्हा पुन्हा
मस्त...
ईथे पुन्हा पुन्हा जाईन मी.
मायबोली झब्बुमय झाल्याने इथेपण झब्बु देतोय...
सेन्याच्या पहिल्या झब्बूला
सेन्याच्या पहिल्या झब्बूला माझा पण झब्बू...
काही ठिकाणी ही तटबंदी १५ किमी
काही ठिकाणी ही तटबंदी १५ किमी इतक्या रुंदीची आहे. >>
तुम्हाला १५ मीटर रुंद आहे म्हणायचेय का? >>
१५ फूट लिहायचं होतं. धन्यवाद, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल.
चूक सुधारत आहे
सेन्या आणि इंद्रा,
दोघांचेही झब्बु मस्त!
त्या खिळे लावलेल्या महादरवाज्याच्या फोटो चा अँगल मस्त जमलाय!
बदाम महालाचे मागच्या जंगलातून
बदाम महालाचे मागच्या जंगलातून घेतलेले फोटो पण आहेत काही..
बदाम महालाचे >>> बदाम महाल
बदाम महालाचे >>>
बदाम महाल म्हणजे नक्की कुठला महाल?
कुंभा महाल, बादल महाल आणि राजा व राणीचे महाल इतकेच महाल कळले.
छायाचित्रे मस्त.......
छायाचित्रे मस्त.......
काय मस्त लेख आहे हा ! सुंदर
काय मस्त लेख आहे हा ! सुंदर फोटो !! म्स्तच
मस्त .... लाईट मधील प्रचि
मस्त ....
लाईट मधील प्रचि मस्त...
पहिल्यांदाच या किल्ल्याबद्दल
पहिल्यांदाच या किल्ल्याबद्दल वाचले - छान माहिती दिली आहे, फोटोही सुरेखच.......
केवढा प्रचंड विस्तार आहे या किल्ल्याचा व बांधकामही किती सुस्थितीत आहे अजूनही......
सुंदर माहिती व
सुंदर माहिती व प्रचि...
राजस्थानच्या सफरी मध्ये हा किल्ला पहायचा राहुन गेला होता...
ईतर झब्बू पण मस्त...
मस्त फोटो ... सेन्या शेवटच्या
मस्त फोटो ...
सेन्या शेवटच्या फोटोतला कुत्रा खासच ...:फिदी:
माझ्या फोटोत तुला कुत्रा कुठे
माझ्या फोटोत तुला कुत्रा कुठे दिसला...:अओ:
तो धाग्याच्या शेवटुन दुसर्या फोटोत आहे...
छान प्रचि आणि वर्णन निंबुडा.
छान प्रचि आणि वर्णन निंबुडा. झब्बू पण भारी.
मस्त चित्र वर्णन आणी झब्बू
मस्त चित्र वर्णन आणी झब्बू
अरे हो इन्द्राच्या फोटोत आहे
अरे हो इन्द्राच्या फोटोत आहे ...
वा छान
वा छान
आठवणी जाग्या झाल्या. जाने. १२
आठवणी जाग्या झाल्या. जाने. १२ ला बघुन आलोय. खुपच झबरदस्त आहे. मला रजस्थान खूपच आवडल. प्रची छान.
चानच वर्णन, प्रत्ययकारी प्रचि
चानच वर्णन, प्रत्ययकारी प्रचि निंबुडा, वाचायचे राहिले होते.चांगली फोटोग्राफरही आहेस. :))
मस्त मस्त !
मस्त मस्त !
मस्त फोटोज आणि झब्बुज !
मस्त फोटोज आणि झब्बुज !
सुरेखच माहिती आणि
सुरेखच माहिती आणि प्रकाशचित्रे! इंद्रा आणि रोहनने घातलेली भरही दाद देण्यासारखी आहे.
लेख, झब्बू आणि प्रचि सारेच आवडले.
निंबुडा,
http://nvgole.blogspot.in/2009/10/blog-post_8785.html#links
इथे तुला महाराणा कुंभा यांच्याविषयी माहिती मिळू शकेल.
Pages