वर्तुळ : भाग २

Submitted by विशाल कुलकर्णी on 11 September, 2012 - 00:32

काकु पुन्हा तेच भेसुर हसली...

हं... वेडा आहेस ! तू काय किंवा तुझे बाबा काय तिच्यासाठी फक्त एक माध्यम आहात. शहाणा असशील तर तुझे बाबा म्हणतात ते ऐक. हे घर, मी तर म्हणते घरच काय गावसुद्धा सोडून जा. तरच वाचशील.

वर्तुळ : भाग १
आता पुढे....

*******************************************************************************

नक्कीच काही तरी बिनसलय त्याचं. गेले तीन दिवस झाले रोज मी तळ्याकाठी वाट बघतेय त्याची, पण साहेबांचा पत्ताच नाही. शेवटी वैतागून ठरवलं की आज त्याच्या घरी जायचच, अगदी जायचं म्हणजे जायचं.'

अरेच्चा, पण अस्सं कस्सं झालं ? आजपर्यंत तो कुठे राहतो हे विचारलंच नाहीये मी आणि त्यानेही स्वतःहून सांगितलेलं नाहीये कधी. चमत्कारिक वाटतय मलाच पण हे खरय हो. पण मी ठरवलं होतं. शेवटी ऑफीस सुटल्यानंतर थेट त्याच्या ऑफीसमध्ये गेले तर तिथले लोक असे काही विचित्र नजरेने बघायला लागले माझ्याकडे. एकतर ऑफीसची वेळ संपल्याने फारसे कुणी शिल्लक नव्हतेच, जे होते ते असे विचित्रासारखे पाहत होते.

मी कसंबसं तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं... तर ती म्हणाली,"तो तीन दिवस ऑफीसलादेखील आलेला नाहीये."

तिच्याकडून त्याचा पत्ता घेतला आणि थेट त्याचं घर गाठलं. तो बोलला नाही कधी पण मला माहितीय त्याला मोगर्‍याचा दरवळणारा वास खुप आवडतो, म्हणुन आठवणीने मोगर्‍याचा गजरा विकत घेवून माळला. तशी मी रोजच माळते त्याच्यासाठी, आज तर तो अत्यावश्यक होता. पार गावाबाहेरच्या एका कोपर्‍यात राहतो तो. मेले रिक्षावालेसुद्धा शेवटपर्यंत यायला तयार नाहीत. अर्धा किलोमीटर अलिकडेच सोडलं, वर म्हणतो कसा, "याच्या पलिकडे त्या घराकडे येत नाही ताई आम्ही!"

"'त्या' घराकडे ? असं काय आहे त्याच्या घरात?"

तसा रस्ता थोडा ओसाडच आहे. रहदारी नाही, दोन्ही बाजुंनी माजलेली बाभळीची दाट काटेरी झाडं...

'हा वारा पण ना ! किती भीतीदायक वाटते त्याची सळसळ ! श्शी.. कुठल्या जंगलात राहतो हा बाबा ?'

छोटंसंच चार-पाच खोल्यांचं घर. घर कसल्लं जुन्या पद्धतीचा छोटासा बंगलाच होता तो. आता बर्‍यापैकी पांढुरक्या पडलेल्या, पण मुळच्या लाल विटांमध्ये बांधलेला, चारी बाजुंनी मस्त मोकळं अंगण आणि त्या भोवतीचे ते झाडीचं कुंपण ! ते कुंपण तेवढं नको होतं. मला नाही आवडत असल्या चौकटी. अरे येणार्‍या-जाणार्‍या एखाद्या थकल्या भागल्या जिवाला जर दोन मिनीटे एखाद्या झाडाखाली विसावावंसं वाटलं तर त्याला आत तरी येता यायला नको? लोक घराला कुंपणं आणि वर ते भलं मोठं लोखंडी फाटक का लावतात तेच कळत नाही. आमचं लग्न झालं की अगदी कुंपण नाही पण ते फाटक तरी नक्कीच काढायला लावेन त्याला. केवढा सुंदर परिसर आहे आतला.

'अहाहा... कसलं सुंदर घर आहे हे? इथे तर तस्सं काहीही भिण्यासारखं दिसत नाहीये, मधला तो अर्ध्या किमीचा एकाकी रस्ता सोडला तर. वाव्व, कदाचित जर त्याच्या घरच्यांकडून होकार आलाच तर काही दिवसांनी हे सुंदर घर माझंही असेल.'

मी हळुच त्या फाटकातुन आत डोकावून पाहीलं. केवढातरी सुंदर झोपाळा टांगलेला होता त्या अवाढव्य झाडाला. कुठलं बरं झाड असावं ते?

फाटकाला कुलुप नव्हतंच, मी हलकेच फाटक उघडलं आणि आत शिरले. माझ्याही नकळत त्या सुंदर झोपाळ्याकडे झेपावले. इतक्यात लक्षात आलं की आपण मागे फाटक बंद करायचा विसरलो. तशी मी पटकन मागे वळले...

"फाटक अगदी हळु-हळु पण आपोआपच बंद होत होतं. 'फट' ! बहुतेक त्याची कडी लागली आणि ते बंद झालं...."

मला घामच फुटला मी पटकन घराकडे वळले....

झुsssssssss करुन वार्‍याचा झोत आला. अंगणातल्या त्या झाडाच्या फांद्या-फांद्यातून वारा सळसळत गेला. काहीतरी विचित्र होतं...; पण काय? असो, पण त्या वार्‍याच्या झुळकीने मात्र माझ्या जिवात जिव आला. उगीचच घाबरले होते मी. दारासमोर येवुन उभी राहीले. दोन जराश्या उंच वाटणार्‍या पायर्‍या होत्या, त्यावर दाराची चौकट. आजुबाजुला, चौकटीवर कुठेही बेलचे बटन दिसत नव्हते. कडी वाजवावी का याचा विचारच करत होते, तोवर समोरचा दरवाजा अचानक उघडला गेला.

दारात 'तो'च उभा होता. चेहर्‍यावर अनपेक्षीत असं प्रसन्न हास्य !

"अरे व्वा ! तू इकडे कशी काय? ग्रेट, अलभ्य लाभ, ये ना..ये आता ये..ये अगं ये आत !"

मी पायर्‍यांच्या खाली होते म्हणुन, नाहीतर त्याने ओढायलाच सुरुवात केली असती मला. मला आश्चर्याचा प्रचंड धक्काच बसलेला. गेल्या सहा महिन्यात तो प्रथमच इतक्या प्रसन्नपणे, सलग इतकी वाक्ये बोलला असावा. माझ्यापुढे उभा असलेला 'तो' माझ्यासाठी अगदी नवाच होता. मी क्षणभर सुखावले, प्रचंड सुखावले. तो स्वतःहून माझा हात्...चक्क माझा हात धरायला बघत होता. गेले सहा महीने याची वाट बघतेय रे वेड्या मी !

मी आनंदाने आपले दोन्ही हात पुढे केले....

तेवढ्यात दाराच्या शेजारीच असलेली 'ती' खिडकी धाडकन उघडली.

"पळ, पळून जा इथुन. एकदा आत आलीस की तू सुद्धा अडकशील. पळ, त्या फाटकाच्या डाव्या बाजुला एक.........."

फटदिशी खिडकी बंद झाली. क्षणभर मला काही कळलेच नाही. 'तो' इथे समोर, माझ्या समोर उघडलेल्या दारात प्रसन्न मुद्रेने मला बोलावत होता आणि तोच खिडकीतून......

मी झटकन हात मागे घेतले. तशी त्याची मुद्रा बदलली.

"नाटकं करु नकोस. मलाच शोधत आली आहेस ना? ये लवकर आत. नाहीतरी आता इथुन परत जाणार नाहीसच तू...!"

नाही.... हा तो नाहीये. हा तो असुच शकत नाही. मी झटदिशी वळले आणि फाटकाच्या दिशेने पळत सुटले. आपोआप मनोमन माऊलींचा जप सुरु झाला होता.

फाटकावर हे भले मोठे कुलुप लोंबत होते. पण मघाशीतर काहीच नव्हतं, मग.....?

प्रचंड वारा सुटला होता. एखाद्या चक्रवातासारखा त्याचा आवाज कानाला दडे बसवत होता. मी प्रचंड घाबरलेले... इतक्यात त्याचे, खिडकीतल्या त्याचे ते अर्धवट वाक्य आठवले...

"फाटकाच्या डाव्या बाजुला एक..."

जरा शोधताच तिथे एक झाडीला पडलेले एक भगदाड दिसले. मी तसेच बिनदिक्कत त्यात , त्या भगदाडात आत शिरले. कुठलेतरी काटेरी झाड असावे, सगळ्या अंगावर ओरखडे उमटवत, सोलपटून काढत गेले त्याचे काटे... पण दुसर्‍याच क्षणी मी त्या कुंपणाच्या बाहेर होते. जणु काही कुणी मला बाहेरुन खेचुन घेतले असावे. बाहेर पाऊल ठेवले आणि....

सगळं शांत ! ते घर सुद्धा अगदी शांतपणे उभं होतं. फाटकावरचं कुलुप गायब झालेलं होतं. का कोण जाणे, पण ते 'घर' आतल्या आत धुमसत असल्याचा भास झाला मला. त्याच्याकडे पाहताना मघाशी न जाणवलेली एक गोष्ट आता लक्षात आली माझ्या. मघाशी एवढे प्रचंड वारे सूटले होते. पण त्या झाडाचे मात्र एक पानही हलले नव्हते.

तो नक्कीच कुठल्यातरी भयानक संकटात सापडला होता, जवळपास कुणी दिसत नव्हतं खरं पण मला पक्की जाणीव होत होती, कुणीतरी नजर ठेवून आहे आपल्यावर !

*******************************************************************

काकुच्या घरुन परतलो तेच डोक्यात विचारांचं प्रचंड मोहोळ घेवुनच. काय खरं ? काय खोटं? कशाचाच पत्ता लागत नव्हता. आई असं काही करत असेल? करु शकते? छे..छे.. विश्वासच बसत नाहीये, मग काकु का खोटे बोलतेय? पण काकु तरी का खोटे बोलेल आणि तिच्या पाठीवरचे ते जखमांचे व्रण? स्वतःहून तर तसे व्रण पाठीवर करुन घेणे शक्य नाही. श्या..डोक्याचं भजं झालय नुसतं. यावेळेस बाबांशी बोलून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच. येवु देत आता बाबांना, त्यांच्याशी या विषयावर बोलायलाच हवे. मी काही लहान राहीलेलो नाहीये आता. या मागे काय रहस्य आहे ते मला कळायलाच हवं....

घरी परतलो तर आईच्या खोलीचं कुलुप उघडलेलं होतं, दार बंदच. म्हणजे बाबा आलेले दिसताहेत. मी हळुच दाराजवळ जाऊन कान लावला...

"अजुन किती दिवस छळणार आहेस आम्हाला? गेली कित्येक वर्षे सहन करतोय मी. आता माझ्यात ताकद नाही राहीलेली. तू म्हणशील ते सगळं करत आलोय आजवर. अगदी रात्री-बेरात्री स्मशानात जावून नुकतेचे पुरलेले कोवळे गर्भ उकरुन आणण्यापर्यंत सर्व काही केलेय तुझ्यासाठी. तुझी ही साधना कधी पुर्ण होणार? माझ्या रक्ताचा थेंब न थेंब शोषलायस, अजुन काय हवेय तुला माझ्याकडून?"

अगदी खोल, थकलेला असला तरी बाबांचा आवाज साफ ओळखता येत होता.

"जोपर्यंत 'धनी' तृप्त होत नाहीत, तोपर्यंत ते प्रसन्न होणार नाहीत. ते प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत मला माझी साधना थांबवता येणार नाही. तोपर्यंत तुम्हाला माझ्यासाठी ही सगळी कामे करणे भागच आहे. कारण तुला माहितीये मी या घराबाहेर पडू शकत नाही."

हा आवाज नक्कीच आईचा असावा. खात्रीने नसतं सांगता आलं मला, कारण गेल्या कित्येक महिन्यात मी तिचा आवाजच ऐकला नव्हता. खरंतर गेल्या वर्षभरात म्हणलं तरी चालेल. पण तिच्यासारखाच आवाज होता हा.

"पण तुझे हस्तक आहेत ना बाहेरही. त्यांच्याकडुन का नाही करुन घेत ही कामे?"

"त्यांच्या शक्तीला मर्यादा आहेत अजुन. त्यांच्याकडुन असे काही काम करुन घेतले की इथे माझी शक्ती खर्च होते. एकदा का माझे सामर्थ्य सिद्ध झाले की मग मला तुझीही गरज लागणार नाही. पण तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. तुझ्यातलं सगळं चैतन्य संपत आलय, तुझा तसाही काही उपयोग राहीलेला नाहीये. तुझी मुक्तता करायला काहीच हरकत नाही. तसाही आता 'तो' हाताशी आलेला आहेच."

कुत्सित स्वरातले आईचे ते बोलणे ऐकताना माझा थरकाप उडाला होता. नक्की काय करत होती आई? आणि यातला 'तो' म्हणजे कोण? हा 'तो' म्हणजे 'मी' तर नव्हे?

"काय बोलतेयस तू? आपला मुलगा आहे तो. नऊ महिने पोटात वाढवलेयस त्याला तू. त्याला या घाणेरड्या कामासाठी वापरणार तू?"

"त्यासाठीच तर जन्म दिलाय त्याला. एक लक्षात ठेव, माझ्यासाठी या असल्या नात्यांना काहीही अर्थ नाही. तू काय किंवा तो काय केवळ एक माध्यम आहात माझ्यासाठी. तुझ्यातली क्षमता संपली, कमी झाली की घरच्या घरात सहज वापरता येइल असं शरीर मिळावं म्हणुन तर त्याला जन्म दिलाय मी."

आई खदखदा हासत बोलत होती. माझ्या मनाचा निर्णय पक्का होत होता. अशीही ती माझी 'आई' आहे हे तिलाच मान्य नाही. तिच्यासाठी माझे किंवा बाबांचे अस्तित्व म्हणजे केवळ एक 'माध्यम' एवढेच आहे, तर मी तरी कशाला तिच्याबद्दल ममत्व बाळगु? बाबांचं वय झालय पण मी अजुन तरुण आहे, सशक्त आहे. तिचं ते गलितगात्र शरीर संपवायला कितीसा वेळ लागणार आहे मला. हे चुक असेल कदाचित पण बाबांसाठी म्हणून मला हा निर्णय घेणे भाग आहे.

माझ्या मनात हा विचार पक्का झाला आणि मी खोलीच्या दारावर जोरात धक्का दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजा अगदी सहजच उघडला गेला. मी तिरीमिरीत आत शिरलो...

"ठिक आहे मला मान्य आहे. तुला माझं तरुण शरीर हवय ना? दिलं, पण त्यासाठी आधी तुला बाबांची मुक्तता करावी लागेल. मान्य?"

हे सगळं बोलताना माझं कॉटवर झोपलेल्या आईच्या चेहर्‍याकडे ल़क्ष गेलं आणि मी हादरलोच. ती शांत झोपलेली होती. एखाद्या मृतदेहासारखी...

"तिच्या दिसण्यावर जाऊ नकोस, ती गेले सहा महिने अशीच दिसत्येय, पण तरीही मला नाचवतेय हवी तशी. अजुन वेळ गेलेली नाहीये. पळ इथुन, एकदा तिच्या कचाट्यात सापडलास की अडकलास, मग सुटका नाही रे बाळा"

बाबा कळवळुन म्हणाले. मी तसाच पुढे झालो आणि आईची नाडी चेक करुन बघीतली. ती बंद पडलेली होती... छातीचे ठोके सुद्धा !

मी सांगितलं होतं तुला. जा , इथुन दूर निघुन जा. बाबांनी अक्षरशः हाताला धरुन ढकललेच मला दाराकडे. परिस्थितींची जाणिव आल्याने मी देखील दाराकडे पळालो आणि बावचळून तिथेच थांबलो. खोलीचा दरवाजाच गायब होता, सलग भिंत होती तिथे.

"बाबा...?"

"तू जेव्हा तुझं शरीर मला दिलंस तेव्हाच ते माझं झालं, आता तुझी सुटका नाही. हा..., तुझा बाप मात्र सुटला."

पुन्हा आईचा आवाज...

मी वळून आईकडे बघीतलं. ती होती तशीच शांत पडलेली, मढ्यासारखी आणि बाबा मात्र....

एखाद्या निखार्‍यावर रॉकेल ओतल्यावर त्याचा भडका उठावा तसं बाबांचं शरीर जळत होतं.

मी पुढे होवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तसे बाबा दोन्ही हातांनी 'नको-नको' च्या खूणा करु लागले. त्याचक्षणी माझ्या लक्षात आले की मृत्यु हीच फक्त इथुन मुक्तता होती. जिवंत सुटका आता शक्य नाही. माझी शुद्ध हरपायला लागली. कानावर आईचे, नक्की आईच होती ती की अजुन काही होते पण तिचे-त्याचे भेसुर हासणे कानावर येत होते. बाहेर कुठेतरी कुठलेतरे कुत्रे भेसुरपणे रडत होते आणि माझी शुद्ध हरपली.

शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या खोलीत होतो. डो़कं आता कुठे जरासं काम द्यायला लागलं होतं. बाबा, या गोष्टीपासून मला दुर का ठेवु पाहत होते, ते आत्ता कळालं होतं, पण फार उशीर झाला होता. काहीही करुन इथुन बाहेर पडले पाहीजे. मी माझ्या खोलीच्या दाराकडे झेपावलो. अर्थात अपेक्षा नव्हतीच इतक्या सहज सुटता येइल म्हणून... आणि तसंच झालं. दार बंद होतं. मी खुप प्रयत्न केला उघडायचा पण... तेवढ्यात खिडकीकडे लक्ष गेलं. खिडकीची चौकट जर उखडता आली तर कदाचित. मी खिडकी उघडली आणि समोर जे दिसलं ते पाहून अजुनच घाबरलो.

घराच्या मुख्य दारासमोर 'ती' उभी होती. माझाच मुर्खपणा नडला होता. मी २-३ दिवस भेटलो नाही म्हंटल्यावर ती घर शोधत येणार ही साधी गोष्ट मला कळायला हवी होती. तिला निदान काही दिवस गावाला जातोय वगैरे काहीतरी सांगायला हवं होतं. ते न करुन मी माझ्याबरोबर तिचाही जिव धोक्यात घातला होता.

अक्षरशः सेकंदाच्या हजाराव्या हिश्श्यात हे सगळे विचार भराभर मनात येवुन गेले. न राहवून मी ओरडलो...

"पळ, पळून जा इथुन. एकदा आत आलीस की तू सुद्धा अडकशील. पळ, त्या फाटकाच्या डाव्या बाजुला एक.........."

खिडकी धाडकन माझ्या तोंडावर बंद झाली. आपोआप आणि दुसर्‍याच क्षणी मस्तकात एक कळ आली. त्या एका क्षणात मरण यातना कशाला म्हणतात त्याचा अनुभव आला. त्यानंतर कानात ऐकु आले आईचे शब्द..

"जास्त शहाणपणा करशील तर याहीपेक्षा जास्त वेदना भोगावी लागेल. एक लक्षात ठेव, आता जोपर्यंत माझे समाधान होत नाही, तोपर्यंत तुला मृत्युही नाही...सुटकेचे तर विसरूनच जा."

मी हताश होवून भिंतीला टेकलो. सगळं संपलं होतं. आता मनात फक्त एकच इच्छा होती, मी आयुष्यात प्रथमच देवाला हात जोडले.

"परमेश्वरा, तिला सुरक्षीत ठेव रे!"

************************************************************

'त्या कुंपणातुन बाहेर पडले खरी, पण अजुनही आसपास कुणीतरी असल्याचा भास होत होता. मन ओरडून सांगत होते "या जागेत धोका आहे. शक्य तितक्या लवकर शक्य तितक्या दुर निघून जा इथुन" , पण पाय मनाचं ऐकायला तयार नव्हते. जणुकाही पायात मणामणाच्या बेड्या अडकवल्या असाव्यात तसे जड झाले होते पाय. मी जिवाच्या आकांताने पाय उचलून चालायचा प्रयत्न करत होते.'

तेवढ्या कुंपणापाशी कसलीतरी खसफस झाली. मी घाबरुन त्या आवाजाच्या दिशेने पाहीले. थोड्यावेळापुर्वी मी ज्या भगदाडातून बाहेर पडले त्याच भगदाडातून एक मांजरासारखा प्राणी बाहेर पडत होता.

मांजरासारखाच... फक्त आकाराने मांजरापेक्षा किमान पाच पट मोठा. त्याने आपले दात.. अहं सुळे विचकले आणि माझ्याकडे झेपावला. मी काहीही न सुचून मोठ्याने माऊलींच्या नावाचा जप सुरु केला आणि जिवाच्या आकांताने पाऊले उचलायला सुरुवात केली. मी चक्क पळू शकत होते आता. मुखातुन होणार्‍या जपाचा आवाज वाढला होता.

"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"

मी वाट फुटेल तिकडे, वेडी वाकडी पळत सुटले..., पण इतक्यात सुटका होणार नव्हती बहुदा...!

एका दगडाला पाय अडखळला आणि माझ्या साडीत पाय अडकुन मी तोंडावर आपटले. तसेच धडपडत दोन हात जमीनीवर उठायचा प्रयत्न केला आणि समोर लक्ष गेले तशी अंतर्बाह्य शहारले...

समोर ते मघाचंच जनावर उभं होतं, जिभल्या चाटत ! आता माझ्या लक्षात आलं मांजरासारखं दिसत असलं तरी ते मांजर नव्हतं... काही तरी वेगळाच प्रकार होता तो. त्याच्या भेसुर लाल भडक डोळ्यातला अंगार जाळुन काढता होता. वासलेल्या तोंडातून लाळ गळत होती आणि दोन सुळे अगदी जबड्याच्या बाहेरपर्यंत आलेले होते. कुठल्याही क्षणी ते माझ्यावर झेप घेणार याची खात्री पटली. तशी मी डोळे मिटले... शेवटचेच एकदा मनापासून माऊलींचे स्मरण केले..

"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !"

************************************************************

"दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरला धरणीधर मानीला खेद ॥"

अगदी तल्लीन होऊन मारुतीरायाची आरती चालली होती. एका हाताने घंटी वाजवत मारुतीरायाला पंचारतीने ओवाळताना अचानक त्यांचे हात थांबले, हाताबरोबर तोंडही...

"काय झाले आण्णा?"

"दादा, अहो कुणीतरी व्याकुळ होऊन माऊलींना अगदी आर्त साद घालतय. कुणीतरी संकटात आहे बहुदा. जवळपासच दिसतय, मला बघायला हवं. लेकराला क्षमा कर मारुतीराया, राहीलेली आरती परत आल्यावर करेन."

त्या व्यक्तीने खुंटाळ्यावर अडकवलेला पांढराशुभ्र सदरा लगबगीने अंगात अडकवला. त्याच गडबडीत पायात चप्पल न घालताच ती व्यक्ती जवळजवळ पळतच घराबाहेर...

"आण्णा,.. आण्णा.. सन्मित्रा, अरे थांब ना बाबा, मी पण आलोच !"

दादाही त्यांच्या, अर्थात आण्णा उर्फ़ ’सन्मित्र भार्गव’च्या मागे धावले.

***************************************************************

क्रमश:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

धन्स मंडळी ! आज-उद्या टाकतोच आहे पुढचा भाग >>> विशालभाऊ उद्या उद्या करीत आठ दिवस झालेत. पुढ्चे भाग टाका लवकर