साधा सोपा 'फंडा' !

Submitted by रसप on 18 September, 2012 - 00:17

एकदाच मरणे मंजुर की रोजच थोडे थोडे ?
असले काही असले-तसले मला न पडते कोडे
हसून माझ्या दु:खावर मी दु:खाला हासवतो
माझ्याशी मित्रत्वाचे मग दु:खच नाते जोडे !

लादुन घ्यावे स्वत: स्वत:वर बळजबरीने काही
हेच नेमके कधीच माझे मलाच जमले नाही
कुणी कुणी तर जीवनभरही मनास मारुन जगतो
आपलेच ना झेपत असते पण दुसऱ्याचे वाही !

नकोस तूही उगाच कुठल्या भोगाला कुरवाळू..
झाले-गेले पुन्हा आठवुन नकोस अश्रू ढाळू
हा क्षण जग जो समोर आहे तुझ्याच हातावरती
क्षणैक आनंदासाठी तू नकोस वेड्या भाळू

माझा तर जगण्याचा आहे साधा सोपा 'फंडा' !
मिळेल तेव्हा जसा जमावा तसा करावा 'कंडा' !
उद्या न असतो, परवा नसतो, 'आज' खरा मानावा
भरून वाहू दे भोगांचा भरेल तेव्हा हंडा !

चूकच असेल माझे पण मी म्हणुनच सुखात जगतो
क्षणाक्षणाचे क्षणाक्षणाला ऋण मी फेडत असतो
रंगछटा ना मला समजती, रंग तेव्हढा कळतो
मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो..
........................... मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो.. !

....रसप....
१७ सप्टेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_18.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली.
या फॉर्ममधल्या कविता हल्ली फारश्या पहायला मिळत नाहीत.
कंडा शब्द ऐकलेला नसल्याने चपखल वाटला नाही.

कंडा शब्द ऐकलेला नसल्याने चपखल वाटला नाही.
<<<

कंडा हा शब्द सुंदर, भारी, खट अश्या अर्थाने वापरला जायचा /जातो. या रचनेत तो बहुधा 'कल्ला'या अर्थाने घेतला असावा

मी स्वतः असं कधी कधी म्हणतो की 'कंडा केला ह्या कवितेने..' तेव्हा मला असं म्हणायचं असतं की 'धमाल केली ह्या कवितेने...'

शब्दकोषांत हा शब्द आहे की नाही हे मला माहित नाही. बहुतेक तो बोलीभाषेतलाच शब्द आहे, त्यामुळे त्याच्या अर्थाबाबत जराशी सूट घेतली.

धन्यवाद बेफिकीरजी आणि साती ! Happy

अगदी बरोबर, मलाही कल्लाच अर्थ वाटतोय.
त्या अर्थाने मग कंडा शब्द पटला नाही.
आता आठवलं , कॉलेजियन्स प्रेक्षणीय वस्तूना कंडा माल म्हणतात. असे शब्द विसरायला होतायत म्हणजे मी नक्कीच म्हातारी झाल्येय. Wink

मस्त......

रंगछटा ना मला समजती, रंग तेव्हढा कळतो
मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो..
>> अह्हा, रणजित, मस्त लिहीलीस... Happy

कॉलेजियन्स प्रेक्षणीय वस्तूना कंडा माल म्हणतात>> साते, नवीन माहिती मिळाली Wink
काय कंडा म्हातारीय Lol