*माजमहिना*

Submitted by राजीव मासरूळकर on 1 September, 2012 - 13:19

भाद्रपद हा कुत्र्यांचा महिना ! या महिन्यात कुत्री माजतात म्हणूनच हा माजमहिना . यासंदर्भात सन २००७ मध्ये भाद्रपद महिन्यातच अवतरलेली ही कविता !

@@माजमहिना@@

सज्जनांनो,
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !
तेँव्हा दिसलंच काही
असलं तसलं नजरचुकीनं
तर डोळे घ्या मिटून
आणि आणू नका चुकूनही
मनात काही हिडीस फिडीस
नाहीच जमलं हे तर
जपमाळ घ्या हातात
आणि जाऊन बसा माजघरात
म्हणाल तर हा रिवाज
तसा फार जुना आहे
पण लक्षात ठेवा
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

ते आता येतील
झुंडीझुंडीने
वेशीवर एक तंगडी वर करून
ती धावेल
शेपूट खाली घालून
जीवाचा आकांत करून
सैरभैर . . .
पण धावण्यात तेही तेवढेच तरबेज !
भरचौकात
चहुबाजूंनी घेरून फिरतील तिच्या भोवतील गोल
आणि आळीपाळीने घेतील
तीचा यथेच्छ उपभोग !
घराच्या उघड्या खिडक्या करा बंद
काचा असतील तर पडदे घ्या ओढून
रस्त्यावर असाल तर पावलं घ्या वळवून
आपल्यासारख्या पुण्यवानांना
तिकडे जाणं मना आहे,
कारण हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

यदा यदा हि जीवनस्य
ग्लानिर्भवती भारत ।
अभ्युत्थानंमर्मस्य
तदात्श्वानम् सृजाम्यहम् ।।

ही कुत्री कुठं राहतात ?
तळ्यात मळ्यात उमलत्या कळ्यांत
मजल्यामजल्यांत पाल्यापाचोळ्यात
गुराढोरांत नवट्या पोरांत
देवळात घरात ज्ञानमंदिरात
इथं तिथं चराचरात !

सौंदर्यावर तंगडी वर
फुलं चुरगाळून करती मलूल
हाडं मुरगाळून पाडती मढे !

डोळे कान तोँड बंद
गांधीजी के बंदर बन
हात थोटे पंगू पाय
श्वास चालू मरो माय !

सुविचार सोडून शिष्टाचार मोडून
नखरेल नट्यांचा नवखा नंगानाच
बघणारांचाच हा जमाना आहे !
सज्जनांनो
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

कुत्र्यौर्ब्रम्हा कुत्र्यौर्विष्णूः
कुत्र्यौर्देवो श्वानेश्वरः
श्वानः साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री श्वानै नमः

कुत्री खातात भाकरी
कुत्री करतात चाकरी
कुत्री चरतात उकीरड्यावर
कुत्री तरतात उष्टावळीँवर!
कुत्री बसतात नेहमी टपून
आंबटशौकीन कातडी जपून !

प्रत्येकाच्याच मनात एक
कुत्रा असतो खोल खोल
लाळ गाळत वासनेचा
पिटत असतो ढोल ढोल
राजा असो रंक असो
पापोजीचा पितर असो
शिक्षकसुद्धा रक्षकसुद्धा
कान वर , शेपूट गोल !
दुधाळ मधाळ ओठांमध्ये
पिकलेल्या देठांमध्ये
भुंकणाऱ्‍या विव्हळणाऱ्‍या
केकाटणाऱ्‍या चेकाळणाऱ्‍या
पिसाळलेल्या कुत्र्यांचाच
खचाखच खजिना आहे ,
कारण सज्जनांनो ,
हा कुत्र्यांचा माजमहिना आहे !

मुकं करोति वाचालम् ।
पंगु लंघयते गिरिम् ।
यत्कृपा त्वमहम् वंदे ।
परमानंदम् श्वानेश्वरम् ।।

- राजीव मासरूळकर
मासरूळ , ता जि बुलडाणा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का त्यांच्या नादाला लागताय?? ती जे काही करतात, ती नैसर्गिक जीवनक्रिया असते ... तुमचे मानवी चार अर्थ आणि सहा रिपू यांच्या जाळ्यात त्याना कशाला अडकवताय??

मस्त
कविता आपला प्रवास एका वेगळ्या मूड वर सुरू करून दूरची रपेट मारत अनेक मस्त गोलाईभरी (लय ,शब्दनाद अलगालग विचरातील तत्वज्ञान , यातली ती गोलाई) वळणे घेत कविता तिला जे म्हणायचे त्या तात्पर्यापाशी आपल्याला बरोब्बर अणून सोडते

वावा
मुक्तछन्दात यमकाचा चपखलपणे वापर कसा करावा हे दाखवून दिलेत

'माज'घर हा शब्द सूचकतेने वापरलात ना?

इतक्या मस्त कवितेत अगदीच एक्दोन ओळी निवडणे अवघड पण मला हे विशेष आवडले

<<<कुत्री बसतात नेहमी टपून
आंबटशौकीन कातडी जपून !!

आपल्या चौफेर फिरणार्‍या प्रतिभेला म्या पामराचा सा. न.

____________/\___________

-वैवकु

अन् हो ............या रचनेसाठी धन्यवाद !!!!

पण ते त्यात अडकलेलेच नाहीत असं आपणास वाटतं का , शेळी जी ?

याच्या उत्तरासाठी उपासना धाग्यावरील बुवा, बाबा, माताजी यांना भेटावे.

शेळी जी ,
आपण दिलेल्या धाग्यावर न जाताही मला ते उत्तर कळालेच आहे !

थोडाफार अनुभव आहेच हो आम्हालाही !

असो . हार्दिक आभार !

वैवकु सर >>>>>>>>>>>>

राजीवजी बरेच दिवस झाले आपणास सान्गावे म्हणतोय की मला सर म्हणू नका म्हणून................
पण मग म्हटले , एकदा प्रत्यक्ष भेटावे आपणास ; म्हणजे वैवकु हा माणूस एखाद्याने आदर कारावा यासाठी किती नालायक आहे याचा आपणास प्रत्यक्ष अनुभवच येइल....!!

कारण..................अनुभवानेच माणूस शहाणा होतो!!!

वैवकु सर ,
आपण माजघर या शब्दाबद्दल विचारलंत .
आपली चौकस दृष्टीच यातून दिसून आली .
आणि खरं म्हणजे तो शब्द शोधायची गरज पडली नाही . तो आपसुकच समोर आला लिहीतांना ! त्यातला श्लेश खूपच आनंद देऊन गेला मलाही .

एकदा प्रत्यक्ष भेटावे आपणास >>>>

लायकीचं सोडून द्या हो , पण भेटूया कधीतरी .
मी औरंगाबादमधील सिल्लोडजवळ राहतो सध्या . आपल्या निवसस्थानाबद्दल सांगितले तर आपल्या भेटीची शक्याशक्यता ठरवता येईल .

मी विठ्ठ्लाच्या गावचा !!
कधीही या ..................
सध्या अधिक महिना चालू आहे .
या महिन्यात पन्ढरपुरची यात्रा केल्यास नेहमीपेक्षा अधिक पुण्य मिळते म्हणे.
(अर्थात ही मी ऐकलेली माहिती आहे )

छान कविताही आणि तुमचं वेगळ्या विषयाला हात घालणं ही.
अशा कविता (की ज्या मध्ये भयानक वास्तव आहे) वाचल्या की अनेकांची तोंडे वाकडी होतात. पण सत्य हे एक सत्यच असते हे मांडण्यासाठी आपल्यासारखे धाडसी कवीच हवेत.

सुधाकरशी सहमत.

''अशा कविता (की ज्या मध्ये भयानक वास्तव आहे) वाचल्या की अनेकांची तोंडे वाकडी होतात. ''

फार दाहक विषय हे कवितेचे क्षेत्र जेव्हा असते तेव्हा तिचे कवितापण संपू शकते..
तसे घडलेले नाहीय.
ले.शु.

कुत्र्यौर्ब्रम्हा कुत्र्यौर्विष्णूः
कुत्र्यौर्देवो श्वानेश्वरः
श्वानः साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री श्वानै नमः

Angry Angry

मासरूळकर, हिंदू दैवतांची शाब्द्क विटंबना केल्याबद्दल तुला जाहीर फटके मारायला हवेत. वर उत्साहवर्धक म्हणत आहेस प्रतिसादांना. रैने, तुला काय आवडल या कवितेतल? का मला जास्त कळत दाखवण्यासाठी असल्या काव्याला दाद द्यायला लागते? सर्वांचा धिक्कार.

ही मी निघाले

वैभ्या, सकाळी न लावताच आला आहेस का? माझा हलकट बुढापा हा लेख वाच आधी. मग तुला कळेल आम्हा शोषितांचे अंतरंग. मग असा बोल.

मोहिनी पवार म्याडम ,
आपल्या प्रतिक्रीयेतून हजारो फटके बसलेत माझ्या मनावर !
आपल्याला या कवितेतला उपरोध आणि कवितेचा आशय कळालेला दिसत नाहीय . मी तर आता या निष्कर्षाप्रत येऊन पोहोचलो आहे की तुमचा माझ्या कवितेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पुर्वग्रहदुषित आहे !
आजवर मायबोलीवर मी ज्या सात आठ कविता टाकल्या आहेत त्यातल्या प्रत्येकीवर आपण अशीच तिखट प्रतिक्रीया दिली आहे . याला काय म्हणावं ? तुम्हाला तुमच्या लेखनाचा फारच अभिमान असेल , असू द्या ! चांगल्या लेखक कवीँच्या लेखनाचा अभिमान आम्हीही न चुकता बाळगतोच !

आपले हार्दिक आभार
आणि आपल्या लिटिल जिम्मीला गोड गोड पापा !

आवडली, वाचताना का कोण जाणे हिंदी हास्य कवी संमेलनामधे वाचल्या जाणार्‍या कवितेसारखी वाटत होती.

मुकं करोति वाचालम् ।
पंगु लंघयते गिरिम् ।
यत्कृपा त्वमहम् वंदे ।
परमानंदम् श्वानेश्वरम् ।।

म्हणजे नेमके काय

कुत्र्यौर्ब्रम्हा कुत्र्यौर्विष्णूः
कुत्र्यौर्देवो श्वानेश्वरः
श्वानः साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री श्वानै नमः

याची खरच गरज होती का ?

बाकी सर्व छान.