कोल्हापूरचा शाहू-मिल परिसर. चांगलाच राडा झाला असावा तिथं जवळपास. बहुधा शाहु-मिलच्या कामगारांच्यात असावा. पलीकडेच डोंबारवाडा आहे. शाहू-मिल व डोंबारवाड्याच्यामधून राजारामपुरीकडे, व पुढे शिवाजी विद्यापीठाकडे जाणारा रस्ता जातो. या रस्त्याच्या कडेकडेनं पुष्कळशा झोपड्या आहेत. भाडे देणे घेणे, किरकोळ कर्जांची देवघेव, व्याजांची वसुली, बायाबापड्यांकडे वाकडा डोळा करून पहाणे, या ना त्या अनेक कारणांनी तिथं नेहमीच राडे चालतात. कोल्हापूरचा प्रसिद्ध कोटीतीर्थ तलाव पलिकडेच आहे. खरे तर गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध पवित्र तलाव हा. विसर्जनाच्या दिवसांत त्याची शान काय वर्णावी. धूप, दीप, अगरबत्त्यांच्या सुगंधाचा दरवळ, विविध घरच्या निर्माल्यांचा मधुर वास, कापूर जळून पवित्र झालेलं वातावरण, भेंड, बत्ताशांची, चुरमुऱ्यांची उधळण, नारळ वाढविण्याच्या अखंड चाललेल्या प्रक्रिया, गणपतीच्या निरोपाच्या आरत्यांचे निराश सूर, उदासवाण्या मुखांनी लाडक्या गणपतीला निरोप देऊन परत निघालेल्या कुटुंबातील एखाद्या हळव्या मुलाच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू, पाणी आणि पावलांच्या मिलनातून झालेल्या चिखलावर गुलाल पडून तयार झालेले अजब सुगंधी रसायन. या सगळ्याच्या जोडीने मोरयाच्या गजरात पाण्यात क्षणोक्षणी अदृश्य होणाऱ्या गणपतीच्या मूर्ती. सारा कोटीतीर्थ जणू भक्तितीर्थ बनून जाई.
पण एरवी तलावाची दशा पहावत नाही. आटलेलं, गढूळ पाणी. म्हाताऱ्या सासवांच्या टाचांप्रमाणे भेगा पडलेले सुकेसुके काठ, गणपतीच्या दिवसांत श्रद्धेनं तीर्थ म्हणून प्याल्या जाणाऱ्या पाण्यात शाहू-मिलचे कळकट्ट कामगार, फोरमन, हेल्पर निर्विकारपणे आपले जलविसर्जन करताना पहावं लागतं तेव्हां संवेदनशील मनांत जखमा ठसठसतात.
पण आज कोटितीर्थाच्या नशिबात काही वेगळंच असावं. रात्रीचे दहा वाजले असावेत. चंद्रकिरण चमकत होते. आकाश निरभ्र म्हणावं असं, पण भुऱ्याभुऱ्या पांढऱ्या ढगांनी रवाळलेलं. रात्र वाऱ्याच्या अवखळ स्पर्शानं खवळलेली. कोटितीर्थाच्या उद्यमनगराकडील किनाऱ्यावर तीन-चार युवक सतरंजी अंथरून बीअर पीत पत्ते खेळत होते. युवक का म्हणावं तर त्या अंधारात बसून, आणि शिवाय बीअर पोटात असून त्यांना पत्ते दिसायला अडचण येत नव्हती. हवा तो राजा, राणी, एक्का, जोकर आला की त्यांचा मुखरस पाझरायचा व तोंडातून निवडक शिव्यांचे गुलाबजाम टपकायचे. शाहू-मिलकडच्या बाजूनं त्याचवेळी फोरमन चंदर शिफ्ट संपवून येत होता. मागे येणाऱ्या सवंगड्याकडे पाहून तो ओरडला, "आलोच बे जरा मोकळा होऊन." सवंगडी तिथेच थबकला आणि चंदर पुढे चालत आला.
तो पुढे तलावाच्या काठाशी येतो तेवढ्यातच त्या खेळाडू ग्रूपमधे कोणाची तरी रमी लागली असावी. अचानक तिकडून खुषीचा आरडाओरडा सुरू झाला. चंदरच्या मुखातून एक सणसणीत शिवी निघाली आणि तिनं क्षणभर ते थंड वातावरण फाडून काढलं. चंदर तसा भला माणूस. सामाजिक जबाबदारीची थोडीशी जाण होती त्याला. पण मधूनच खडूसपणाही उफाळून यायचा. त्याचं काम आटोपून तो परतायला निघाला तोच त्याची शिवी ऐकलेले ते चौकडीवीर संतापून आक्रमण करून आले.
"अरे ए काळ्या, कारे ए उंदरा, कुठं निघालास? जरा हिशेब चुकता करून जा रे ए ....!" मुखरस पाझरू लागला. आता चंदरलाही गप्प रहाणं शक्य नव्हतं. त्यानं मागे थांबलेल्या आपल्या मित्राला खूण केली आणि शाहू मिलच्या बाजूनं ही फौज आक्रमणावर निघाली. चाकू, सुऱ्या, कोयते, मिलमधल्या विव्हींग-मशीन्सचे रॊड्स अचानकच हवेत तळपू लागले. कुठून आले ते हे एक कोडेच. दोन्ही सेना दोन बाजूनी एकमेकाला वेगानं गाठू लागल्या.......मोठा राडा दृष्टीपथात होता. मारामारी, लाथाबुक्क्या, कदाचित भोसकाभोसकी. थोड्याच वेळात तिथं काहीतरी घडणार होतं हे नक्की. काय सांगावं कदाचित मुडदेही पडायचे. दोन्ही बाजू तावात आल्या होत्या. त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. चेहरे लालीलाल झालेले. पाण्याचा थेंब उडवला तर भुर्रकन वाफ होऊन जाईल असं वाटत होतं. जवळच्या निंबाच्या झाडावरचे दोन पक्षीही स्तब्ध झाले. आणि.....
अचानकच असं काही घडलं की एकमेकाजवळ आलेले दोन्हीकडचे प्रतिस्पर्धी जागच्याजागी थबकले. दोन्ही बाजूला प्रतिस्पर्धी गट, आणि त्यांच्या समोरच मध्यावर एक प्रेत पडलं होतं. भयंकर दिसणारं, रक्तानं भरलेलं प्रेत. देह जणू छिन्नविच्छिन्न झाला होता. ते सर्व सहा जण एकत्र होऊन प्रेताकडे पाहू लागले. मनातून हबकून गेले. त्यांच्या मनातलं शत्रुत्वही विरघळून गेलं जणू. "चला, निघूया." एक पत्तेवाला खेळाडू म्हणाला, आणि एक एक पाऊल मागे घेत ते चौघेही अंधारात कधी लुप्त होऊन गेले पत्ताही लागला नाही. चंदर मात्र निरखून प्रेताकडं पहात होता. तो रक्ताळलेला चिखल. त्या प्रेताच्या डोक्यावरची चिखलानं माखलेली जरीची टोपी. टोपीवर काचेचं मणीकाम होतं आणि चांदण्यात ते मणी चकाकत होते. चंदरचं लक्ष त्याच्या नाकाकडं गेलं. खूपच ठोसे खाल्ले असावेत या माणसानं. महाभयानक सुजलं होतं ते. नाकावरचे सुकलेले रक्ताचे ओघळ तोंडात पोचले होते. एक दात निखळलेला दिसत होता. सगळा चेहरा विद्रुप झाला होता. पण तरीही चंदरला त्याला कुठंतरी पाहिलं असल्याचं जाणवलं. काही मिनिटे विचार केल्यावर, हा आपल्यासारखाच शाहू-मिलमधला कोणी कामगार असावा या निष्कर्षाप्रत तो आला. तो पहातो आहे तितक्यात प्रेताच्या सुजलेल्या नाकात काही फुरफुर झालेली त्याला दिसली. चंदर ओरडला,"अरे हा तर जिवंत आहे. चल, चल, याला दवाखान्यात नेलं पाहिजे." चंदरनं भराभर त्याच्या अंगाखाली हात घातला. ओढून सर्र्कन मागे सरकवलं. उगाच फोरमन नव्हता झाला तो. त्याचा सवंगडीही तत्परतेनं त्याच्या मदतीला आला. ’ते प्रेत नाही, माणूस जिवंत आहे’ या विचारानंच त्यांच्यात बळ आलं. याला आता वाचवायचंच या उदात्त विचारानं चंदर भारून गेला. जोरानं त्याला खेचू लागला. अचानक त्याच्या अंगाखालनं काही प्राणी सुळ्ळकरून बाहेर आला. चंदर दचकला. अजाणता त्यानं उडी मारली. तो प्राणी पळून गेला, अंधारात दिसेनासा झाला. चंदरनं जीव खाऊन खेचलं आणि तो चिखलातून बाहेर आला. माणूस वाटलं तेवढा गलीतगात्र नव्हता. त्यानं चपळाईनं उठण्याची हालचाल केली, पण दोन्ही पाय चिखलात लडबडले आणि तो पुन्हा कोसळला. चंदरची हसून पुरेवाट झाली. तो माणूस आता थोड्या उजेडात आला. खांबावरचा दिवा मेहेरबान झाला. पहिल्यापेक्षा खूपच विचित्र दिसत होता उजेडात तो आता. बुटका, ढोबळा, ढेरपोट्या. त्याच्या अंगावर अर्धा फाटका शर्ट आणि पिवळट मळकी पॆंट होती. पायातल्या चपला गायब होत्या. कपाळावर उठलेलं ते ’हे मोठ्ठं टेंगुळ’ काहीतरीच दिसत होतं. त्यावरही रक्त पसरलं होतंच. पण चंदरच्या हसण्यानं तो संतापलेला. जळजळीत नजरेनं चंदरकडं पहात होता. चंदर चमकला. ’जखमी अवस्थेतही ही गुर्मी!’
चंदर सटपटून म्हणाला, "माफ कर भिडू. मी मदत करत होतो."
"मदत करायला टिंगल करावी लागते? कुचकं हसायला लागतं?"
"माफ कर दोस्ता."
"चल हात दे."
चंदरनं हात दिला. महाराज उठले. कपडे झटकले. रूप थोडसं बघण्यालायक तरी झालं. चंदर म्हणाला, "यार तू आहेस तरी कोण? पाहिल्यासारखं वाटतंय तुला. मिलमधेच काम करतोस ना?"
"होय. हेल्पर आहे मी. तू फोरमन आहेस ठाऊक आहे मला."
चंदर सुखावला. साला हेल्पर आहे. फोरमनच्या खालचाच. उद्याच शिन्दे मॆनेजरला सांगून माझ्या अंडर घेतो बदलून. असा लावतो कामाला.......! चंदरची चक्रं फिरू लागली.
"मी हेल्पर आहे त्यावर नको जाऊस फोरमन. शिंदेसायबाचा पावणा हाय मी. कालपरवाच नवीन जॊईन झालोय." फोरमन चंदर चमकलाच. सावरून म्हणाला, "हेल्पर, चल तुला दवाखान्यात घेऊन जातो. चल बाबा, रिक्षा मिळंल कोपऱ्यावर.
"गंपू. गंपू हेल्पर म्हणायचं मला."
"होय गंपू दादा, चल आता."
तिघंही झपाझप चालू लागले. काही क्षणापूर्वीच हा गंप्या मरणासन्न अवस्थेत पडला होता हे चंदरला पटेनाच. कोपऱ्यावर रिक्षा मिळाली. चंदरचा दोस्तच होता रिक्षावाला. रोजच्या बैठकीतला. चंदरनं त्याला डोळा घातला, आणि त्यानं रिक्षा सुरू केली. राडा करायची आता चंदरची पाळी होती. चंदरच्या इशाऱ्यानुसार रिक्षा थेट राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या आवारात घुसून थांबली. गंपू हेल्परला काहीच संशय नाही आला. पोलीस स्टेशनच्या नावाची पाटीही नव्हती पाहिली त्यानं.
"कुठं आलोत आपण फोरमन?" इतकच विचारलं त्यानं. पण चंदर एका बाजूला आणि रिक्षावाला दुसऱ्या बाजूला, असं दोघांनी पुरतं पॆक केलं त्याला. ढकलतच त्याला इन्स्पेक्टरच्या खोलीकडं नेण्यात आलं. उग्र चेहऱ्याचा इन्स्पेक्टर साळोखे समोरच बसलेला. त्याची हजेरीला जायची वेळ झालेली. तिथून पुढं थेट घरी जायचं. उद्याची रजा टाकलीय. आता यावेळी त्याला कसलीही भानगड नको होती. या त्रिकुटाला नेमकं आत्ताच आलेलं पाहून त्याचं मस्तक खवळलं. "काय आहे बे?" चंदरकडं पाहून त्यानं कडक आवाजात प्रश्न केला. चंदर त्याची नजर पाहूनच सटपटला. कशाला या फंदात पडलो असं झालं त्याला. तसं पाह्यलं तर इन्स्पेक्टर थोडासा परिचयाचा होता चंदरच्या. चंदरच्या घरीही येऊन चहापाणी घेऊन गेलेला एकदोनदा. पण असल्या ओळखी असले लोक सहजासहजी शेंगांची फोलपटं फेकावी तशी फेकत असतात. चंदरला ते आत्ता जाणवू लागलं.
इंस्पेक्टर जवळ आला, चंदरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला तसं त्याला थोडं धाडस आलं. गंपू हेल्परकडं खूण करत तो म्हणाला "कोटीतीर्थावर पडला होता. राडेबाज दिसतोय. घाला आत साहेब."
इन्स्पेक्टरनं लॊकर रूम हवालदाराकडून उघडून घेतली. चंदरला मनात उकळ्या फुटत होत्या. रिक्षावाल्याचं फुकटची मजा बघण्यात काहीच जात नव्हतं. नाहीतरी त्याची शिफ्ट संपलीच होती. घरी जाऊन झोपायचंच होतं त्याला. डिव्हिजनवर थोडं रेंगाळलं तर वट वाढणारच होती त्याची. गंपू हेल्परला काय चाललंय काही समजत नव्हतं. इंस्पेक्टरनं उजव्या हाताची बाही दुमडली आणि एक सणसणीत दिली ठेऊन कानाखाली. डोळ्यापुढं तारे चमकले. दुसऱ्याच क्षणी गचांडी धरली गेली आणि डोळे उघडतो तो लॊकपमध्येच पडलेला. मिनिटाभरात शेजारी रिक्षावालाही येऊन आदळला शेजारी. चंदरला हुंदके फुटायला लागले. इतकंच काय, सळ्यांच्या दरवाज्यातून बाहेरचं जे दृष्य त्याला दिसलं ते पाहून तो आणखीनच चकरावला. सिनेमात स्लो मोशन दाखवतात तसं त्याला दिसलं की इन्स्पेक्टर हळुहळू गंपू हेल्परच्या दिशेनं जातोय. चला आता निदान या हेल्परची आपल्यासारखीच गती होणार. हेही काही कमी नाही, असं चंदरला वाटलं. गंपू आत आला की चोरखिशात दडवलेल्या छोट्या टोच्यानं भोसकायचंच ठरवलं त्यानं. इन्स्पेक्टर गंपूजवळ पोचला आणि त्यानं हात उंचवलेलंही बघितलं चंदरनं. पण पुढच्याच क्षणाला इन्स्पेक्टरनं गंपू हेल्परला चक्क वाकून नमस्कार केलेला दिसला चंदरला. आज मिल सोडण्यापूर्वी आपण आपल्या लॊकरमधली रमची बाटली अक्खी रीती केली की काय, असं क्षणभर चंदरच्या मनात येऊन गेलं.
इन्स्पेक्टर हेल्परला म्हणत होता,"माफ करा दादा, आधी ओळखलं नाही मी तुम्हाला. कुणी दशा केली ही तुमची, सांगा दादा, दहा मिनिटांत उभं करतो सगळ्या माईच्या लालांना इथं. "
गंपू हेल्पर गडगडून हसला, "नाही रे फौजदार, मीच कोटीतीर्थावर फिरत होतो, तो उंदीर पायात आला आणि आपटलो. बर हे पहा, मला या पत्त्यावर जायचंय. वेळ होऊन उपयोग नाही. बाबानं दिलेलं काम आहे." खिशातून काढून हेल्परनं इन्स्पेक्टरकडं एक कागद दिला.
"मग काय दादा, आपलंच काम आहे. हा पत्ता काही दूरचा नाही. माझ्याच हद्दीतला आहे. बोलावून घेतो मंडळीला इथं लगेच."
"अरे नाही. बाबाचा खास माणूस आहे. आपल्याला गेलं पाहिजे तिकडं. त्याना इथं बोलावतोस? बाबा गोळ्या घालेल."
"नाही, नाही, दादा, आपण जाऊया तिकडं, चला बसा जीपमधी."
लोखंडी बार्समागून चंदर बघतच राहिला. रिक्षावाला जवळजवळ बेशुद्धच होता. बाहेर उभे असलेले कॊन्स्टेबल, हेड-कॊन्स्टेबल चकीत झाले होते. भल्याभल्यांना वाकवणारा आपला टेरर साहेब या फाटक्या हेल्परपुढं झुकलेला पाहून ते जाम झाले होते. हेल्पर जीपमधे बसले. त्याने इन्स्पेक्टरांना सांगितले, "घ्या त्या दोघांनाही बरोबर." इन्स्पेक्टरनी चंदर आणि रिक्षावाल्यालाही बोलावून घेतले. जीप धावू लागली. गंपू हेल्परचा वट बघून चंदर पुरता सटपटला होता. "याच्या वाटेला जाण्यात अर्थ नाही," तो रिक्षावाल्याच्या कानात कुजबुजला. रिक्षावाल्यानं ते आधीच ओळखलं होतं. तो मनात म्हणाला, ’हा चंदर भलताच स्लो दिसतोय.’
गाडी थांबली. ठिकाण आलं होतं. सारी फौज खाली उतरली. ते एक झोपडीवजा छोटसं घर होतं. सगळे आत गेले. मातीच्या भिंती. छताच्या जागी नारळाच्या झावळ्या. घरानंच रहाणाऱ्यांची गरीबी दाखविली. पण आणखीही काही होतं. भिंतींना दिलेला स्वच्छ आकाशी निळा रंग, भिंतिंवरची सुंदर निसर्गचित्रे. धूप, अगरबत्तीचा दरवळ. गंपू मनात म्हणाला, ’श्रीमंतांकडंही नसतं असं काही इथं दिसतंय.’
इन्स्पेक्टर सवयीप्रमाणं सरळ आतल्या खोलीत घुसला. जाण्यापूर्वी हातातली काठी दरवाज्यावर आपटून सूचना द्यायला विसरला नाही. आतलं दृष्य अनपेक्षित होतं. खोलीत मध्यावर निपचित पडलेली एक प्रौढ स्त्री. बाजूच्या टेबलावर काही औषधाच्या गोळ्या आणि बाटल्या. काही फळे. कोपऱ्यात देव्हारा. त्यात अनेक देव. एक मोठी संगमरवरी शंकराची मूर्ती. एक सरस्वतीची तसबीर. आणि एक लक्ष्मीची. त्या प्रौढ स्त्रीचा पती देवासमोर डोळे मिटून प्रार्थना नामसाधना करत बसलेला. डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहत्या. इन्स्पेक्टरानं ओळखलं, ’मृत्यू जवळपास आहे.’ त्याच्या खडूस मनात कणव दाटून आली. सवयीची नसल्यानं त्याला ती समजलीही नाही. आवाज ऐकून त्या गृहस्थानं डोळे उघडले. पोलीस पाहून तो चमकलाच. एक क्षणही न दवडता तो इन्स्पेक्टरच्या पायावर कोसळला, "सरकार, सरकार, माफ करा. बायको सिरीयस आहे. ऒपरेशनशिवाय उपाय नाही. काल हॊस्पिटलात डॊक्टरांनी पैशाविना नकार दिला. लाथ मारुन हाकलून काढलं. म्हणून माझा तोल गेला सरकार. शिवी आली तोंडातून. तेवढ्यासाठी अटक नका करू. सरकार, थोड्या वेळात प्राण सोडेल ती. बायकोला निरोप तरी देऊद्या." तो हमसाहमशी रडू लागला.
इन्स्पेक्टर म्हणाला, "तुला अटक करायला नाही आलो मी. या साहेबान्ला भेटायचं होतं तुम्हाला." गृहस्थानं हेल्परकडं पाहिलं. ओळखत नसल्याचं प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावर उमटलं.
"इन्स्पेक्टर साळोखे!" हेल्परच्या आवाजात एकदम कडकपणा आला. धार आली. साळोखे चपापले. "येस सर!" जणू काही ते वरिष्ठ साहेबालाच उत्तर द्यावे अशा अदबीनं म्हणाले.
हेल्परनं विचारलं, "गुन्हेगारांशी संबंध आहे की नाही तुझा?" जणू काही गंपू हेल्परच इन्स्पेक्टर होता, आणि इन्स्पेक्टर कोणी आरोपी, असा इन्स्पेक्टर बावचळून ’होय साहेब,’ म्हणाला.
"हप्ते घेतोस"?
"जी साहेब."
"निरपराध्यांना त्रास देतोस?"
"ज ज,,,,जी."
"शिक्षा भोगावी लागेल." हेल्पर रूक्ष आवाजात बोलला. साळोखेला त्या आवाजातला थंडपणा चाकूसारखा तीक्ष्ण वाटला.
"माफी साहेब."
"एक चान्स देतो."
"जी."
"पाच मिनिटात मला इथं पुरा पोलीस फोर्स पाहिजे. दोन जीप्स, ऎंम्ब्युलंस, आणि तो डॊक्टर पाहिजे माझ्यासमोर."
साळोख्यांनी मोबाईल फोन काढला. थरथरणाऱ्या बोटांनी नंबर्स दाबले. थेट एस.पी. साहेबांकडे. एस.पी.नी फोन उचलला. ते संभाषण साधारण असं झालं:
"साहेब."
"हं बोल. आवाज का रे असा तुझा? ठीक आहे नां सारं?"
"होय साहेब. एका गुंड्याला गाठलंय. नामचीन गुंडा आहे. सशस्त्र आहे. फोर्स लागेल सर."
"कुठं?"
"लाईफलाईट दवाखाना सर."
"पाठवतो. एक टेंपो लोड. विथ गन्स."
साळोख्यांनी हवालदाराना इशारा केला. तो ओळखून हवालदार लाईफलाईट दवाखान्याकडे रवाना झाले.
***
पाचच मिनिटांत ऎंम्ब्युलंस आली. पाठोपाठ डॊक्टर पेंडसेना घेऊन हवालदारही आला. पेंडसे भांबावले होते खरे, पण अंगात गुर्मी होतीच. "कशाला बोलावलत मला?" त्यांनी इन्स्पेक्टरना प्रश्न केला. तितक्यात त्यांची नजर पलंगावरील स्त्रीकडे गेली. "ओहो, यांच्यासाठी. तर मग माफ करा. यांच्या मिस्टरांकडे पैसे नाहीत. आणि माझ्याकडे यांच्यासाठी टाईम नाही."
"शट अप!" गंपू हेल्पर कडाडला. "शट अप," आणि एका क्षणात हवेत तो अणकुचीदार टोच्या चमकला. चंदर बावचळला. आपला टोच्या हेल्परजवळ गेला कधी हेच समजेना त्याला.
गंपूनं टोच्या सरळ पेंडसेंच्या पोटाला लावला. एक बारीकसं लाल टिंबही उठलं तिथं. पेंडसे त त प प करू लागले. आणि मग क्षणात निर्णयाप्रत आले, "चला घ्या त्यांना ऎंम्ब्युलंसमधे." ते म्हणाले.
सगळ्यांनी एकच गोंधळ केला. बाईंचा नवरा आनंदानं बेफाम झाला. सारे पोलीस लोक खुशीनं बेहाल झाले. बाईंना अलगद उचलून गाडीकडं नेण्यात आलं. गंपू चंदरला म्हणाला, "चल रे फोरमन, तू जा दवाखान्यात. मला इथंच खबर पोचव सगळी." चंदरनं मान डोलावली व म्हणाला, "होय आपण म्हणता तसेच होईल.
मी साधा फोरमन. हेल्परसाहेबांना नाही म्हणणारा मी कोण?" साळोखे खो खो हसू लागले. चंदर म्हणाला, "साहेब तुम्ही पण? या फाटक्याचे पाय धरलेत?"
साळोखे म्हणाले, "अरे मुर्खा. मी कोण आहे? माणूसच ना? अरे गेल्या वर्षी माझी बायको गरोदर होती. आम्ही बसने निघालो होतो. तिला वेणा सुरू झाल्या अचानकच. पोट दाबून धरलं. नाकातून रक्त सुरू झालं. काय करावं सुचेना. हे साहेब मदतीला आले."
"कोण गंपू? हा हेल्पर?"
"होय. पण हे तेव्हा शाहूमिलचे हेल्पर नव्हते. त्या बसचे कंडक्टर होते. त्यांनी बस ड्रायव्हरला विनंती केली. तो ऐकेना तसा त्याला सरळ उतरवून दिलं आणि एकशेवीसच्या स्पीडनं बस नेली सरळ प्रसूतीगृहात. दोन तासात सुपर सेफ डिलिव्हरी. तेव्हांपासून मानतो मी यांना. शब्द नाही खाली पडू देणार आयुष्यात."
***
दोन तासात बाईंचा नवरा आला तो पेढे घेऊनच. ऒपरेशन सक्सेस झालं होतं. गंपू हेल्परनं समोरच्या महादेवाच्या चित्राकडं जाऊन हात जोडले. गंपू जायला निघाला. इन्स्पेक्टर म्हणाला "मी सोडतो ना साहेब." गंपूनं हातानंच नकार दिला. चंदरकडं पाहून तो म्हणाला, " फोरमन, मी येतो आता. जपून रहा. कोटीतीर्थावर मी घसरलो तेव्हा हसलास. एकवार सोडतो तुला. पण या तुझ्या रिक्षावाल्याला नाही सोडणार. इन्स्पेक्टर, घाला आत या रिक्षावाल्याला. तीनशे अठ्ठ्याहत्तर लावा. नको, नाहीतर चारशेएक लावून ठेवा. दोघांनाही लागू पडेल.
"जी." साळोखे म्हणतात.
हेल्पर बाहेर पडतो. काही अंतर रमतगमत चालल्यावर सेलफोन काढून फोन लावतो. "पिताश्री, तुमचं काम केलं बरंका."
"केलंस? शाबास. ताई बऱ्या आहेत ना?"
"एकदम, "पिताश्री, मी जाऊ आता?"
"कुठं जातोस? त्या पुजाऱ्याला पन्नास हजार पोचवायचे आहेत, आणि हजारेंची तब्येत संभाळायची आहे. तो युवराज सिंग, आज त्याला थोडा त्रास होतौय, त्याला कोण बघणार?"
"बाबा, एका दिवसात एवढी कामं?"
"मग काय, उगाचच विघ्नहर्ता म्हणवून घेतोस?"
"बाबा, गंमत सांगू?"
"काय?"
"ही सारी कामं आधीच झालीयंत."
भगवान म्हणतात, " शाबास, हे पहा. मुंबईत दादरला एक..."
हेल्पर वाक्य पुरं करतात,..."तुमचा भक्त कोणी कोटणीस अडचणीत आहे."
"गणेशा...."
"जो हुकूम पिताजी... पण अडचण काय?"
"कोटणीस अतिशय सज्जन माणूस. गरीबांना मदत करणारा. माझा नि:सीम भक्त, पण बॆंकेनं अडचणीत आणलाय. व्याजावर व्याज चढवून जेरीला आणलंय."
"कुणाची बॆंक?"
"ते मी सांगायला पाहिजे?"
***
भल्या पहाटे मुंबईच्या मलबार हिलवर अंबानीसाहेब फिरायला निघालेले असतात. पहाटेचा धुंद वारा. ताज्या फुलांचे मुग्ध सुगंध. समोर सूर्याच्या आगमनाची गुलाबी चाहूल. अंबानींच्या मनात मात्र शेअरचे भाव नाचत असतात. अचानक त्यांना समोरच्या कट्ट्यावर कुणी मान खाली घालून बसलेलं दिसतं. ते थांबतात. विचारतात. "आर यू ऒलराईट?" ती व्यक्ती मान वर करते. अंबानी चमकतात. सुजलेलं नाक, चिखलानं माखलेली जरीची टोपी. टोपीवर काचेचं मणीकाम........"कुठंतरी पाहिलंय नक्कीच." अंबानी पुटपुटतात आणि हलकेच हस्तांदोलनासाठी हात पुढं करतात.
-----------------------
हेल्पर
Submitted by pradyumnasantu on 30 August, 2012 - 20:04
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम!
अप्रतीम!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
वा वा छान आहे की.सुरूवात
वा वा छान आहे की.सुरूवात इतकी लांबली की म्हटल वाचून्की नकु.. पण वाच्ली बर झाल
मस्तच.. आवडली
मस्तच.. आवडली
सगळी कामे आमच्या गणपतिनेच
सगळी कामे आमच्या गणपतिनेच केलि तर त्याचे भक्त काय फ़क्त मिरवणुकित नाचनार का??
गणपती बाप्पा मोरया....
गणपती बाप्पा मोरया....
प्रतिसादकांचे मनापासून आभार.
प्रतिसादकांचे मनापासून आभार.
सुरेख!!!!!!!!!!!! अंगावर
सुरेख!!!!!!!!!!!!
अंगावर काटेच आले.. शेवटच्या वाक्याने!
मस्त!
प्रद्युम्न काका, अप्रतीम आहे
प्रद्युम्न काका, अप्रतीम आहे कथा!
खरंच काटे आले अंगावर!
इंद्रधनु, भानुप्रिया: अनेक,
इंद्रधनु, भानुप्रिया:
अनेक, अनेक आभार.
मस्तच, आवडली कथा.
मस्तच, आवडली कथा.
मस्तच. आवडली खुप!
मस्तच. आवडली खुप!
मस्त!!
मस्त!!
विभाग्रजजी, अविकुमारजी,
विभाग्रजजी, अविकुमारजी, चनसजी
अभिप्रायांसाठी शतशः ऋणी आहे.