सिनेमाचं मायावी विश्व, जेव्हा दादासाहेब तोरणे आणि दादासाहेब फ़ाळकेंनी भारतात आणलं तेव्हा, त्यांनाही कल्पना नसेल, की हा वटवृक्ष इतका सर्वव्यापी होईल. १९१३ साली राजा हरिश्चंद्र कोरोनेशन थेटरमध्ये प्रदर्शीत झाला आणि एका नव्या युगाचा उदय झाला. नाशिकच्या धुंडीराज गोविंद फ़ाळकेंनी पायाभरणी केलेल्या ह्या चित्रपटकलेच्या वास्तुचे आज राजेशाही, महालात किंवा खरतर मोठ्या नगरात रुपांतर झाले आहे. सर्वांना हवीहवीशी वाटणारी ही दुनिया, आणि त्या विश्वातील कलाकार आजही सर्वांच्या मनात विशेष स्थान संपादून आहेत. सुरुवातीपासुनच अनेक मराठी दिग्गजांनी ह्या कलेच्या विकासात मोलाचा हातभार लावला आहे.
कोल्हापुरच्या बाबूराव मेस्त्री, म्हणजेच बाबूराव पेंटर ह्यांनी १९२० साली पुण्याच्या आर्यन थिएटर मध्ये सैरंध्री हा चित्रपट प्रदर्शीत केला. ह्यातील किचक आणि भिमाच्या कुस्तीचा प्रसंग इतका प्रभावीपणे चित्रित केला होता की काही प्रेक्षक घाबरुन बेशुद्ध पडले. असं म्हणतात कि ह्या प्रसंगामुळे भारतात चित्रपट सेन्सोरची पद्धत सुरु झाली. हा मूकपटांचा जमाना होता. त्यानंतर १९३० च्या सुमारास बोलपटांचा उदय झाला. चित्रपटांना आवाज दिल्याने, त्या कलेचा आत्माच हरवून जाईल असा ठाम विचार असणाया बाबूराव पेंटरांनी नंतर चित्रपट निर्मीती केली नाही.
बाबूराव पेंटरांच्या हाताखाली तयार झालेल्या विश्न्णूपंत दामलेंनी, काही सोबत्यांच्या साथीने १९२९ साली प्रभात फ़ील्म कंपनी स्थापन केली. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत सखू ह्या चित्रपटांच चित्रण पहाताना, त्या काळातही उजेडाचा वापर, विषयाची माडणी, चौकटीत नेटके नेपथ्य आणी रेखीव आकृतीबंध आजही वाखाणण्याजोगे वाटतात. व्ही. शांतारामही बाबूराव पेंटरांच्या कडून ही कला शिकले. व पुढे राजकमल कला मंदिर स्थापून त्याद्वारे त्यानी उत्कृष्ट चित्रनिर्मिती केली.
त्या काळात, चित्रपट निर्मिती ही व्यवसायापेक्शा कालानिर्मिति ह्या उद्देश्याने केली गेल्याने, मास्टर विनायक, भालजी पेंढारकर अश्या दिग्ग्जांनी उत्तमोत्तम चित्रपट दिले. ह्या काळात सामाजिक विषय प्रामुख्याने हाताळले गेले. साने गुरुजींच्या, "शामची आई" च्या कथाबीजावर बनवलेला त्याच नावाचा चित्रपट आचार्य अत्रेंनी निर्मिले आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. व्ही शांताराम यांचा नवरंग, त्यातील गाण्यांचे अप्रतिम चित्रिकरण, मास्टर विनायक यांचा ब्रम्हचारी, त्यातील यमुना जळि खेळ... हे अतिशय त्या काळातील धाडसी चित्रीकरण केलेले व त्या मुळे गाजलेले गाणे हि मराठी चित्रपटाच्या इतिहासातील स्थानं म्हणता येतील.
१९६०साली अनंत मानेंनी ग्रामीण आणि लावणीप्रधान चित्रपटांच बीज रोवलं. पुढे, ह्याचा अतिरेकी वापर होऊन अनेक लावणी, दुष्ट सरपंच वगैरे पठडीतल्या छापिल चित्रपटांची सावली मराठी चित्रपट सृष्टिवर अजुनही दिसुन येते.
दता धर्माधीकारी, राज दत्त यांनी उत्कृष्ट सामाजीक चित्रपट दिले. भावनाप्रधान चित्रपटाच्या ह्या काळात १९७० साली दादा कोंडकेंनी ग्रामीण तमाशा / वग ह्या प्रकारामधून चित्रपट निर्मीतीत उडी घेतली. विच्छा माझी पुरी करा ह्या नाटक/ वगाच्या यशानंतर दादा कोंडके यांनी प्रथम निखळ करमणूकीचे विनोदी चित्रपट निर्माण केले.सोंगाड्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुन धरला. परंतु त्या नंतर चावट किंवा द्वयर्थी संवादाचे वाढते प्रमाण या मुळे जरी ह्या चित्रपटांना मराठीतर प्रेक्षकवर्ग मिळाला तरी एकंदरीत दर्जा घसरला. सहनशील सुनेवर अत्याचार, आणि दुष्ट सासु, भावनांना हात घालणारे, अश्रुप्रधान चित्रपट किंवा तमाशा, ग्रामिण राजकारण, अशा सिनेमांचे ह्या काळात पेव फ़ुटले होते.
१९८० च्या सुमारास, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेरडे हे विनोदी कलाकार पडद्यावर निखळ करमणूकीचा खजिना घेउन आले. महेश कोठारी निर्मीत अनेक चित्रपट वेगवेगळे विषय, नवीन तंत्र, जस, सिनेमास्कोप, डोल्बी साउंडमुळे खास ताजे वाटतात.पछाडलेला चित्रपटात स्पेशल इफ़ेक्टसचा सार्थ उपयोग महेश कोठारींने केला आहे. सचिन पिळगावकर यांनी नट आणि दिग्दर्शक म्हणून उत्तम चित्रपटाची परंपरा आजतागायत सुरु ठेवली आहे.
मधल्या काळात मध्यम दर्जाच्या एकाच पठडीतील, तेच, तेच नटसंच वापरुन बनवलेले सिनेमे आले आणि गेले. हिंदी चित्रपटांच्या मुळे प्रेक्षक न मिळणे, केवळ परदेशी, हिंदी वा दक्षीणेकडील चित्रपटांची सुमार मराठी छापिल प्रत काढणे, थेटर न मिळणे अशा बराच कारणांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मरगळ आली होती. आज श्वास सारखा चित्रपट राष्ट्रपति पदक आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवतोय. २०१० पासून हरिश्चंद्राची फ़ेक्टरी, नटरंग, वळू, झेंडा, विहीर, शाळा सारखे अनेक चित्रपट वेगळे विषय यशस्वीपणे हाताळताहेत आणि प्रक्षकही त्यांना उदंड प्रतिसाद देत आहेत. महेश मांजरेकर एका पेक्षा एक सरस चित्रपट मराठीला देत आहेत.
संगीत नाट्यसृष्टीचा वारसा असल्याने गाणी हे मराठी चित्रपटांचे महत्वाचे अंग आहे. सुरवातीच्या काळात शास्त्रीय, नाट्यसंगीत त्यानंतर भावगीत अंगाची अनेक उत्कृष्ट गाणी सिनेमाने दिली आहेत. आज हिंदी फ़िल्मी अनुकरणात हा वारसा हरावत चालला आहे. आठवणीत रहावी, वर्षानुवर्ष गुणगुणावी अशी गाणी मराठी सिनेमा गेली काही वर्ष देत नाही ही खंत माराठी मनात आज आहे. सुरवातीच्या काळात, तांत्रीक अंगानेही त्या काळातील दर्जाच्या मोजमापात मराठी सिनेमा सरस होता. मधल्या काळात अगदी आजपर्यंत, छायाचित्रण, प्रिंटचा दर्जा, संगीत - संवादाचा तांत्रीक दर्जा ह्या प्रातांत मराठीची पिछेहाटच अनुभवायला येत होती. देऊळ सारखा चांगला चित्रपटही सुमार तांत्रीक अंगाने, मनातिल समाधानाला बाधा आणतो. काही तुरळक चित्रपट सोडले तर आज हेच अनुभवाला येतं. आर्थिक कमतरता हे कदाचित ह्याच कारण असू शकेल.
महेश मांजरेकरांच्या काकस्पर्श ने ही उणिवही भरुन काढली आहे अभिनय, दिग्दर्शन ह्या बरोबरीने छायाचित्रण व ध्वनितंत्राचा उच्च दर्जा चित्रपटाला एक वेगळे परिमाण देऊ शकतो हे आपण येथे अनुभवू शकतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं चित्रपट निर्मीतीत रस घेउ लागल्याने मराठी चित्रपट आज कात टाकतो आहे. भविष्यात आपल्याला कलात्मक, मनोरंजनात्मक, तांत्रीक दृष्ट्या उच्च दर्जाचे मराठी चित्रपट पहायला मिळणार आहेत ह्याची ही नांदीच आहे.
छान आढावा ! पण खुप थोडक्यात
छान आढावा !
पण खुप थोडक्यात आटपलात लेख
छान
छान
विशालशी सहमत.. पण हा विषयच
विशालशी सहमत..
पण हा विषयच फार कठीण आहे हे ही कबूल..
अभिनंदन आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा..