सुभाषित आस्वाद [१] :[अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत् [ब] वक्ता श्रोताच दुर्लभ:
[अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' हे लिहिले/ऐकले जाणारे एक लोकप्रिय वचन. ते ज्यात आहे ते मूळ काव्य असे :-
ऋणं कृत्वा घृतं पिबेत् | यावत् जिवेत सुखम् जिवेत ||
भस्मीभूतस्य देहं च, पुनरागमनं कुतः ||
अर्थ- जोवर जिवंत आहात तोवर (अगदी) सुखाने जगा. (त्यासाठी वाटल्यास) कर्ज काढा
(पण) तूप प्या(च). (कारण अग्नीने ) राख केलेला देह परत मिळणार आहे काय?
चार्वाकाच्या तत्वज्ञानाची टिंगल करण्यासाठी कोणीतरी मूळ श्लोकात 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' हा भाग घुसडलेला असावा असे अनेकांचे म्हणणे आहे आणि ते खरे असण्याची बरीच शक्यता आहे. चार्वाक हा फक्त इहलोक मानणार्या आणि मृत्यु नंतरचे पारलौकिक अस्तित्व नाकारणार्या लोकायत परंपरेतील विचारवंत होता. तो 'कर्ज काढून सण करा' असे तत्वज्ञान मांडेल असे वाटत नाही. स्वर्ग्/नरक या मृत्युनंतरच्या काल्पनिक अस्तित्वासाठी आजच्या आयुष्यात "हे करा, ते करा" अशा बाबींच्या अतिरेकाने पिडलेल्यांनी अधिक सखोल विचार करून इहवादी तत्वज्ञान मांडले असणार. साहजिकच त्यांच्या श्लोकांचे वर दिल्याप्रमाणे विडंबन झाले असावे.
मूळ श्लोक खालीलप्रमाणे आहेत असे तज्ञांचे म्हणणे आहे.
(१)यावज्जीवं सुखं जीवेत् । नास्ति मृत्योरगोचरः ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
अर्थः.जोवर जीव आहे तोवर सुखाने जगा. मृत्यु निश्चित आहे. राख झालेला देह परत मिळणार आहे का?
म्हणजेच आहे हे जीवन सुखी करा. जे सिद्ध करता येत नाही अशा काल्पनिक पारलौकिक जीवन सुखी होण्यासाठी उगाच नसते कष्ट करू नका असे सोपे सांगणे आहे.
(२) यावज्जीवेत् सुखम् जीवेत्। नास्ति मृत्यू अगोचर:।।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम् कुतः।।
अर्थ- जोवर जगताय ते सुखाने जगा कारण मृत्यू येणार हे माहित आहे. एकदा भस्म झालेला देह काय परत मिळणार आहे?
स्वर्गात वा पुनर्जन्मात सूख मिळवू या आशेने आजचे जीवन त्या काल्पनिक जीवनासाठी व्यर्थ घालवू नका असा सोपा मंत्र आहे हा.
असे असले तरी व्यवहारात चैनबाजीचे समर्थक चार्वाकाला वेठीला धरतात आणि
'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' चा उल्लेल्ख करून चैनबाजीला प्रतिष्ठा मिळवून देतात. त्यामुळे चार्वाक हाच त्यांच्या जीवनशैलीचा आद्य उद्गाता असाच समज झालेला आहे हे मात्र खरे! ते धरून चालतात की चार्वाक म्हणजे जणु प्रच्छन्न चंगळवादाचे प्रतीकच!.
[ब] वक्ता श्रोताच दुर्लभ:
खर तर इतके वक्ते व इतके श्रोते असूनही वक्ता-श्रोता दुर्लभ ? पहा खालील सुभाषित काय म्हणते आहे ते !
सुलभा: पुरुषा राजन् सततं प्रियवादिन: ।
अप्रियस्यच पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ: ॥
- रामायण
अर्थ : हे राजा, सतत प्रिय बोलणारी माणसे या जगात (राजाला) सहज भेटतात. परंतु अप्रिय पण हिताचे बोलणारा वक्ता आणि ( संयमाने ऐकणारा ) श्रोता (अशी जोडी) मिळणे दुर्लभ आहे.
दुर्लभ खऱ्याच. पण तरीही अशा काही अतिप्रसिद्ध जोड्या आहेत.
महाभारतीय युद्धात भीष्म, द्रोणाचार्य आणि आप्तस्वकीय यांना पाहून युद्ध करायला तयार नसलेल्या अर्जुनाला ’अप्रिय पण हिताचे’ चार खडे बोल सुनावनारा श्रीकृष्ण आणि ते ऐकून घेणारा अर्जुन अशी ही कृष्णार्जुन जोडी सर्वांना माहित आहे. कृष्णाने सुनावलेले बोल म्हणजेच भगवद्गीता असे ढोबळमानाने म्हणता येईल.
चाणक्य-चंद्रगुप्त ही गुरुशिष्य जोडीही अशीच. चंद्रगुप्ताला वेळोवेळी अप्रिय पण हिताचे सल्ले वेळोवेळि देऊन चाणक्याने त्याला सम्राट पदापर्यंत पोचवले. इथेही ’अप्रिय पण हिताचे’ बोलणारा वक्ता आणि ( संयमाने ऐकणारा ) श्रोता आहे.
रामदास-शंभुराजे ही अशीच एक दुर्लभ जोडी. शिवरायांच्या निधनानंतर शंभुराजांनी त्यांच्याविरुद्ध कटात सामील असणाऱ्यांच्यापैकी अनेकांना देहान्ताचि शिक्षा दिली. त्यात शिवरायांचे अनेक निश्ठावान सहकारीही होते. अशा काळातच औरंगजेबाने स्वत: सैन्यासह दक्षिणेत उतरण्याचे ठरवले होते. रामदासस्वामींनी शंभूराजांना पाठवलेल्या पत्रात सांगितले :-
कांही उग्रस्थिति सोडावी। कांही सौम्यता धरावी॥ चिंता पराचि लागावी। अंतर्यामी॥
मागील अपराध क्षमा करावे। कारभारी हाती धरावे! सुखी करून सोडावे कामाकडे॥
पाणवठी तुंब निघेना। तरि मग पाणी चालेना ॥
तैसे जनाच्या मना । कळले पाहिजे॥
जनाचा प्रवाह चालिला। म्हणजे कार्यभाग आटोपला ॥
जन ठाइ ठाइ तुंबला। म्हणिजे ते खोटे ॥
श्रेष्ठीं जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले ॥
तरी मग जाणावे फावले । गलीमासी ॥
राजाला ’अप्रिय पण हिताचे’ सांगणारे रामदास आणि ते संयमाने ऐकणारे शंभूराजे ही ही एक दुर्लभ म्हणावी अशी जोडी.
रामशास्त्री प्रभुणे एकदा थोरल्या माधवराव पेशव्यांना भेटायला गेले. तेथे अनेक मातब्बर सरदार पेशव्यांशी सल्लामसलतीसाठी येऊन थांबले होते. पेशव्यांची पूजाअर्चा चालू होती. बऱ्याच वेळाने पेशवे आले. तेव्हा रामशास्त्रींनी पेशव्यांना सुनावले , " श्रीमंत! आपण क्षात्रधर्म स्वीकारला आहे. आपल्याशी महत्वाचे राजकारण करण्यासाठी दुरून दुरून सरदार् आलेले असतात. तुमच्या निर्णयावर अनेक कामे खोळांबुन राहिलेली असतात. तेव्हां पूजाअर्चा करण्यात एवढा वेळ दवडणे योग्य नाही." माधवरावांनीहि तो सल्ला मानला. अशी रामशास्त्री-थोरले माधवराव ही ’अप्रिय पण हिताचे सांगणारा’ आणि ’संयमाने ऐकणारा’ यांची दुर्लभ जोडी.
सुभाषित आस्वाद [२] ]:(अ)न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा: (ब)संदिप्ते भवने तु कूपखननं
छान शाळेत हे सुभाषित शिकलो
छान
शाळेत हे सुभाषित शिकलो होतो, ते आठवलं.
आवडलं.
आवडलं.
छान आहे
छान आहे
छान
छान
.
.
--- वीर ---- आणि --राम ही
--- वीर ---- आणि --राम ही जोडी लिहायची राहिली.
(कौरव-) वीर ( दुर्योधन ) आणि
(कौरव-) वीर ( दुर्योधन ) आणि (बल) राम
बलरामही स्पष्टवक्ता होता. दुर्योधन त्याचा शिष्य आणि राजा असला तरी बलराम त्याला स्पष्टपणे आणि परखडपणे बोलत असे.
सुंदर लेख व माहिती!
सुंदर लेख व माहिती!
शाळेत शिकवलेल्या सुभाषितांची
शाळेत शिकवलेल्या सुभाषितांची आठवण झाली ...उदाहरणे छान.....
@शेळीतै मी दिलेल्या जोड्या
@शेळीतै
मी दिलेल्या जोड्या ’अप्रिय पण हिताचे सांगणारा’ आणि ’संयमाने ऐकून तशी कृति करणार्यांच्या' आहेत आणी म्हणूनच त्या दुर्लभ आहेत.
तसे तर मंदोदरी , कुंभकर्ण यांनीही रावणाला सुनावलेले आहे.
आर्य चाणक्य अन चंद्रगुप्त
आर्य चाणक्य अन चंद्रगुप्त मौर्याचीही अशीच एक जोडी.
मूळ लेखातच वारंवार उल्लेख
मूळ लेखातच वारंवार उल्लेख होणार्या [अ] ऋणं कृत्वा घृतं पिबेत् या वचनावर आधारीत भागाची भर टाकलेली आहे. अशी भर टाकण्याची इच्छा माबोवरील 'संस्कृत भाषेची उजळणी' या निंबुडा यांच्या अत्यंत मौलिक धाग्यावर श्री चैतन्य दिक्षित, वरदा, भरत मयेकर आदींनी जे प्रतिसाद दिले आहेत त्याचीही मदत झाली आहे. अशी उपयुक्त माहिती तेथे उपलब्ध केल्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद!