सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.
नाटक संपले आणि कुठलातरी तद्दन विनोदी मराठी सिनेमा सुरू झाला. मनात तेव्हाच तिडीक उठली. मराठी सिनेमाबद्दल कधी बारकाईने विचार करीन असं वाटलं नव्हतं. मन मागे गेलं. सामना वगैरे सिनेमात रमून मग एक गाव बारा भानगडीपर्यंत गेलं. एक गाव बारा भानगडी हिट झाला. सिनेमा हिट होणे ही चांगली गोष्ट असली तरी मराठी सिनेमाच्या वाटचालीतलं ते एक दु:स्वप्नं ठरलं. हा माझा मार्ग एकला, जगाच्या पाठीवर, ऊनपाऊस असे एका पेक्षा एक सुंदर सिनेमे देणा-या या चित्रपटसृष्टीला तमाशाचं व्यसन लागलं. ज्याला टिपीकल तमाशापट म्हणावे अशा चाकोरीत मराठी सिनेमा अडकला. पडद्यावर घुंगरू वाजू लागले आणि स्वस्तात सिनेमा बनवून गल्ला जमवायची वृत्ती बोकाळली. पुढे पुढे तर तमाशाच्या थिएटरमधेच मराठी सिनेमा बनतो कि काय अशी शंका यावी असे सिनेमे बनले. मात्र याच तमाशा या विषयावर गणानं घुंगरू हरवले सारखे काही संवेदनशील सिनेमेही आले आणि याच तमाशावर पिंजरा सारखी अजरामर कलाकृतीही याच मराठी सिनेमाने दिलीय. पिंजरामध्ये आणि या तद्दन तमाशापटांमधे असलेला फरक अनेक निर्मात्यांना समजला नाही.
एकीकडे तमाशा तर दुसरीकडे थोरली जाऊ, हळद रूसली कुंकू हसलं. अष्टविनायक असे कौटुंबिक किंवा देवदेवस्कीप्रधान सिनेमे किंवा पाटील-सावकार यांच्या जाचात अडकलेली मदर इंडीया वरून बेतलेली कथा या दुष्टचक्रात अडकलेल्या सिनेमाला सचिन आणि महेश कोठारे यांनी बाहेर काढलं. मराठी पडद्याला ब-याच दिवसांनी फ्रेश चेहरे मिळाले, गाणी मिळाली आणि प्रेक्षक सुखावला. पण हे सुख खूप दिवस टिकलं नाही. तमाशा मधून बाहेर पडून इनोदी सिनेमाची लाट तयार झाली. अगदी सचिन देखील या लाटेवर वाहवत गेले आणि सत्ते पे सत्ता हा सिनेमा आपल्या प्रेक्षकांना माहीतच नाही या थाटात त्यांनी आम्ही सातपुते बनवला. बॉम्बे टू गोवा सारख्या सिनेमावर नवरा माझा नवसाचा बनवून सचिनने नेमकं काय साधलं हेच समजत नाही. आपल्या प्रेक्षकाबद्दल सचिनसारखे लोक काय विचार करतात हे असे सिनेमे पाहीले कि कळत नाही.
एकीकडे काही जण मात्र नेटाने वेगळेपण टिकवून होते. सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा द्वारे जब्बार पटेलांनी मराठी सिनेमा जिवंत ठेवला. सरकारनामा सारखा सिनेमाही येऊन गेला. स्मिता तळवलकरांनी दर्जेदार सिनेमे देऊ केले. सवत माझी लाडकी सारखा बासुदांच्या तोडीचा सिनेमाही त्यांनी आपल्याला दिला. पण हे मृत्यूशय्येला लागलेल्या मराठी सिनेसृष्टीसाठी सलाईन होतं. या व्हेंटिलेटरवरच्या मराठी सिनेमाला ख-या अर्थाने श्वास दिला तो श्वास या मराठी सिनेमानेच.. आणि मग मराठी सिनेमाने खरोखरच मोकळा श्वास घेतला. तेव्हापासून ताज्यातवान्या सिनेमांची स्पर्धा असावी असं वातावरण निर्माण झालं. विषय आणि सादरीकरणातलं वैविध्य सुखावणारं होतं. पण रसिकांचा म्हणावा इतका प्रतिसाद नव्हता.
अशातच मराठी पडद्यावर दोन बैल अवतरले. एकाचं नाव टिंग्या आणि दुस-याचं वळू. या दोन बैलांनी मराठीची गाडी योग्य वळणावर आणून ठेवली आणि पहिल्यांदाच प्रेक्षकांनीही मल्टिप्लेक्समधे मराठी सिनेमा पहायला सुरूवात केला. पैकी टिंग्या हा बैल जरा रडका होता मात्र त्याने मंगेश हाडवळे सारखा मनस्वी दिग्दर्शक दिला , रोहीत नागभिडे सारखा उमदा संगीतकार दिला. वळू मात्र मिस्कील निघाला. या बैलाने पोट धरधरून हसवलं. हसवता हसवता विचारही करायला लावला आणि मग हा बैल सुसाट सुटला. देऊळ साठी सुवर्णकमळ घेऊनच आला.....
पण यावर समाधान मानावे का ?
दक्षिणेकडे हॉलीवूडच्या तोडीचे सिनेमे बनतात. रोबो सारखा खर्चिक सिनेमा बनू शकतो. या सिनेमांना प्रादेशिकतेच्या मर्यादा नाहीत का ? मराठीत रोबो बनवावा असं इथं कुणी म्हणत नाही. पण त्याच वेळी भाषेचं कारण देऊन आपण निर्मितीमूल्यांच्या बाबतीत हात आखडता घेतल्यानं सिनेमा या माध्यमामधे कलाकृती पेश करण्याला आपसूकच मर्यादा येत नाहीत का ? निर्मितीचा विचार करतानाच काही विषय बजेट ही बाब हद्दपार करायला लावते. सृजनाला अशा मर्यादा असणे भूषणावह नक्कीच नाही. माझ्या स्वप्नातल्या मराठी सिनेमालाही कुठलाही विषय परवडत नाही म्हणून वर्ज्य नसेल.
याचा अर्थ खर्चिक सिनेमे म्हणजेच दर्जा असा मुळीच नाही. पण गोदो ने जो अनुभव दिला तो "प्रभातकाल" वगळता आजवर कुठल्या मराठी सिनेमाने दिला याची उजळणी केली तेव्हां माझ्याकडे उत्तर नव्हतं ! आमचा आवडता स्टीव्हन स्पिलबर्ग जुरासिक पार्क, इंडीयाना जोन्स सारखे खर्चिक सिनेमे बनवत असतानाच एकीकडे शिंडलर्स लिस्ट सारखा ऑफ बीट सिनेमा बनवतोच कि ..! साँग ऑफ द स्पॅरोज या इराणी सिनेमाचं बजेट काय असणार ? दो बिघा जमीन काही बिग बजेट सिनेमा नाही. पण हिंदीतले सर्वश्रेष्ठ साहीत्यिक प्रेमचंद यांच्या कथेवर सिनेमा बनवणारे निर्माते हिंदीला लाभले. एक होता विदूषक सारखा अपवाद वगळता असे प्रयत्न मराठीत झालेत का ? अलिकडे नटरंगने असा प्रयत्न करताच रसिकांनी त्याला डोक्यावर घेतलेलं आपण पाहीलंय.
दुस-या बाजूला जे लोक इंग्रजी सिनेमाचे प्रेक्षक आहेत, तेच हिंदी सिनेमाचेही प्रेक्षक आहेत आणि तेच मराठी सिनेमाचेही ! असं असताना त्याला गृहीत धरण्याची चूक मराठी सिनेमाने करता कामा नये. प्रेक्षकही हॉलिवूडपटाकडून ज्या अपेक्षा ठेवत असतात त्या बॉलिवूडपटाकडून ठेवत नाहीत आणि बॉलीवूडपटाकडून ज्या अपेक्षा असतात त्या मराठीकडून ठेवत नाहीत. प्रत्येक ठिकाणी संस्कृती वेगळी आहे, मर्यादा आहेत याची जाण आपल्या प्रेक्षकाला नक्कीच आहे. म्हणूनच मराठी सिनेमाला मराठी मातीचा वास आला पाहीजे या म्हणण्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगला पाहीजे. मराठी मातीचा वास याचा अर्थ चौकटीत कोंडून घ्या असा घेऊ नये असं वाटतं. टायटॅनिक हिट झाला तेव्हां रामदास या कोकणाजवळ बुडालेल्या जहाजावर मराठीत सिनेमा का निघू शकत नाही अशा अपेक्षा व्यक्त झाल्या होत्या. असाही त्याचा अर्थ असू नये असं वाटतं. टायटॅनिक हा एक अविष्कार होता आणि जेव्हां तो पहिल्यांदा सादर झाला तेव्हाच त्यातलं वेगळेपण अधोरेखित झालं. पुन्हा तसा सिनेमा वेगळ्या भाषेत बनवणं ही मराठी सिनेमाकडून अपेक्षा नाहीच. त्यात अस्सलपणा काय असणार ? अगदी तोडीस तोड खर्च केला तरीही !
याउलट चिनी सिनेमातली अॅक्शन आज हॉलिवूडने आत्मसात केलीय, इराणी सिनेमाने इराणी मातीतले सिनेमे बनवताना आपलं आंतरराष्ट्रीयत्व सिद्ध केलंय. आपल्या शेजारच्या गुजराती चित्रपटसृष्टीला मुंबईसारखं शहर लाभलेलं नाही. मात्र भवानी भिवई हा गुजराती सिनेमा पाहताना भाषेचा अडसर जाणवला नाही. अस्वस्थ केलं या सिनेमाने. चक्क दोन दोन शेवट असणारा हा सिनेमा कथेची अनेक उलटसुलट वळणं ज्या पद्धतीने पडद्यावर पेश करतो ते पाहून रोलर कोस्टरचा अनुभव आला. दक्षिणेत शंकरा भरणम, सागर संगमम सारखे कलेला वाहिलेले सिनेमे कलात्मकता आणि ड्रामा यांचा जबरदस्त मिलाफ आहेत. या सिनेमाला स्वतःची ओळख आहे. या शंकराभरणम वरून सूरसंगम हा सिनेमा हिंदीत आला होता.
म्हणूनच हॉलीवूड किंवा बॉलिवूड च्या सिनेमांनी प्रभावित होण्याचा ट्रेंड थांबून उलट ट्रेंड सुरू करणारा सिनेमा मराठीत बनायला हवा. साऊथच्या व्यावसायिक सिनेमांवरून बॉलिवूडमधे सिनेमे बनतात. मराठीत बॉलिवूड किंवा हॉलिवूडला भुरळ पडावी असे सिनेमे बनतील का ? सिंघम हा सिनेमा हिंदी भाषेतला मराठी सिनेमा होता असं म्हणता येईल का ? सिंघमचं मराठीपण संपूर्ण भारतभर प्रेक्षकाला आवडलं. एकाच वेळी मराठी निर्माते मराठी आणि हिंदीत सिनेमा बनवू शकतील का ? पूर्वी प्रभातने असे प्रयोग केलेले आहेत. मराठी सिनेमानेच बॉलिवूडला जन्म दिलाय हे विसरून कसं चालेल ? व्यावसायिक आणि ऑफ बीट अशा दोन्ही क्षेत्रात मराठी सिनेमा इतरांसाठी आदर्श असायला हवा असं प्रभातच्या इतिहासात डोकावल्यावर वाटल्याशिवाय राहवत नाही. तंत्र आदि काही चांगल्या गोष्टी दक्षिणेकडून किंवा इतर ठिकाणाहून नक्कीच घ्याव्यात. ते अनिवार्यच आहे. मात्र संपूर्ण सिनेमा उसणवारीवर काढलेला असू नये. मराठी सिनेमाकडून माझ्या अस्सलतेच्या अपेक्षा आहेत. सिनेमागृहातून बाहेर येतांना डोक्यात सिनेमा असला पाहीजे. गोदो सारखा अस्वस्थ अनुभव असो किंवा आनंद सारखा चटका असो..किंवा बासूदा, हृषिदांसारखे हलकेफुलके सिनेमे असोत जे काही असेल ते अस्सल आणि दर्जेदार हवंय.
कोण म्हणतं टक्का दिला सारखं हलवून टाकणारं नाटक असो, बामणवाडा सारखा कानाखाली जाळ काढणारा अनुभव असो ही रंगभूमी ज्या भाषेत आहे त्या भाषेतल्या सिनेमाला विषयांचा दुष्काळ जाणवावा ? हिंदीतल्या थ्री इडीयटस ची भ्रष्ट नक्कल करणारे सिनेमे आपल्या इथे बनावेत ? योनीच्या मनीच्या गुजगोष्टी सारखं बंडखोर नाटक रंगभूमीवर येत असताना मराठी सिनेमाने बिचकत बिचकतच बोबडे बोल कुठपर्यंत बोलावेत ? जे सांगायचंय ते थेट हे मराठीत घडायला हवं ही अपेक्षा फार नसावी. शापीत सारखे सिनेमे याच भाषेत बनलेत याची आठवण अशा वेळी होते.
कुठल्याही हिंदी सिनेमाच्या तोंडीस तोड असा वारणेचा वाघ हा सिनेमा अण्णाभाऊंच्या कादंबरीवर बनलाय. आजही हा सिनेमा खिळवून टाकतो. तंत्राने अगदीच मागास, बजेटच्या बाबतीत अगदीच दरिद्री असणारा हा सिनेमा कशाच्या जीवावर आपल्याला खिळवून ठेवतो असं वाटतं ? अण्णाभाऊ साठेंच्या कादंब-यांमधे सिनेमाचं मटेरियल आहेच आहे. पण गारंबीचा बापू सारखा कादंबरीवर आलेला सिनेमाही खिळवून ठेवतोच कि ! शेवटी हे माध्यम सृजनाचं आहे, अनुभूतीचं आहे हे विसरून कसं चालेल ?
माझ्या स्वप्नातल्या मराठी सिनेमाला कथेची वानवा नसेल. विनोदी सिनेमात दमांच्या कथेतली पात्रं असतील. नाना चेंगट, बाबू पैलवान, गणा मास्तर, शिवा जमदाडे ही मंडळी पडद्यावरही अवतरलेली असतील. व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर या कथांवर अजरामर सिनेमे बनलेले असतील. ताजमहालमधे सरपंच सारख्या शंकर पाटलांच्या अस्सल विनोदी कथेचं पडद्यावर सादरीकरण होत असेल. आणि कधी कधी भौगोलिक मर्यादा ओलांडून मराठीपणाच्या चौकटी मोडणारा नाझी भस्मासूराचा उदयास्त या कादंबरीवरचा युद्धपटही पहायला मिळेल. मुघल ए आझम सारखी अतिभव्य प्रेमकहाणी बाजीराव मस्तानीच्या कहाणीवर का पडद्यावर येऊ नये ? या अवास्तव अपेक्षा नसाव्यात.
फ्रेश आणि नवे चेहरे मराठी पडद्यावर दिसावेत हे हल्ली जाणवू लागलंय. तेच तेच चेहरे प्रत्येक सिनेमात आणि मालिकेत पाहून कंटाळा येतो. मालिका आणि सिनेमात काही फरक जाणवतच नाही. वेडावाकडा चेहरा केला कि विनोदी अभिनेता म्हणून मिरवणारे आणि त्याच त्या शैलीत २४ तास बोलणारे सुपरस्टार्स यापासून मराठी सिनेमाला मुक्ती मिळण्याची गरज आहे. कथेच्या अनुषंगाने नव्या चेह-यांची चाचपणी होतेय हे जाणवतच नाही. त्यात त्या मूठभर नावांपलिकडे शोध जातच नाही. मग अजिंठा सिनेमात पारोच्या भूमिकेसाठी काळी पावडर फासून सोनाली कुलकर्णी विनोदी पद्धतीने संवाद बोलत राहते तेव्हाच त्या सिनेमातला आत्मा निघून जातो.
खूप काही अपेक्षा नाहीत मराठी सिनेमाकडून. अगदी व्यवहार्य आणि कलेच्या दृष्टीने आवश्यक अशा अपेक्षा आहेत असं मला वाटतं. अलिकडचा मराठी सिनेमाचा प्रवास पाहिला तर गंभीर झालेले निर्मातेही त्यावर नक्कीच विचार करतील याबाबत शंका नाहीच. शेवटी मराठी सिनेमाचा झेंडा निर्माते दिग्दर्शक यांनीच स्वखर्चाने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे. व्यवहार आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा यांची सांगड त्यांनाच घालायची आहे. मात्र जेव्हा असे प्रयत्न होताना दिसतील तेव्हा मराठी माणसानेही या सिनेमाला लोकाश्रय देणं गरजेचं आहे, नव्हे ही त्याची जबाबदारीच आहे हे शेवटी आवर्जून सांगावंसं वाटतं.
- Kiran
३१ ऑगस्ट ही मर्यादा असल्याने
३१ ऑगस्ट ही मर्यादा असल्याने लेखात बदल संभवतात.
किरण, खरेच बरेच विचार समान
किरण, खरेच बरेच विचार समान आहेत, आपल्या दोघांचे. मराठी नाटकात जेवढे नवनवे विषय येतात,
तेवढे मराठी चित्रपटात येत नाहीत.
बघा आता तूम्हाला आम्ही हसवणार, अश्या आवेशात काढलेले चित्रपट, तेवढेही करु शकत नाहीत.
तमाशापटाची सुरवात मात्र, रामजोशी या चित्रपटाने झाली (जयराम शिलेदार आणि हंसा वाडकर )
पण ती पार्श्वभुमी घेऊनही, चांगले चित्रपट तयार झालेच. ज्या भागात मराठी प्रेक्षक होता, त्या भागात
त्याला चांगली मागणी पण होती. मग त्यांनाही तो विषय खटकायला लागला.
सख्या सजणा ( गणपत पाटील, उषा चव्हाण) चा विषय नटरंग सारखाच होता. लताचे संगीत होते, आणि तिच्याच अप्रतिम लावण्या होत्या ( सख्यासजणा नका तूम्ही जाऊ, सजण शिपाई परदेशी )
शेवटचा मालुसरा हा युद्धपट होता, पण नंतर तोही विषय आला नाही. लष्करात मराठा रेजिमेंट आहे त्यात शूर जवान आहेत, पण आपण त्यांना विसरलो.
Kiran: किती सुरेख आणि आखीव
Kiran:
किती सुरेख आणि आखीव लेख लिहिला आहेत आपण. भाषाशैली अप्रतिम. 'गोदों'ने सुरुवात केल्याने मराठी चित्रपटाची गलितगात्र अवस्था प्रकर्षाने दिसून येते.
माणूस, शेजारी, कुंकू यांचाही आढावा हवा होता असे प्रकर्षाने वाटले. हा लेख खूप काळ स्मरणात रहाणार आहे, व त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातून तुमच्या अपेक्षा नेमक्या समजताहेत, तुमची उद्विग्नता नेमकी जाणवते, व भाषेमध्ये मुळीसुद्धा नको असलेला विनोद नाही.
हार्दिक अभिनंदन.
@ दिनेशदा.. शेवटचा मालुसरा
@ दिनेशदा..
शेवटचा मालुसरा खरंचच चांगला युद्धपट होता. धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल. साफ विसरून गेलो आपण असे सिनेमे ! आभार
( रामजोशी माधे तमाशा असला तरी तो तद्दन तमाशापट नव्हता असं वाटतं. )
@ प्रद्युम्नजी
भीत भीतच लेख लिहीला होता. मात्र तुमच्या शब्दांनी हुरूप वाढला. या विषयावरचे तुमचे मत माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, अगदी प्रतिकूल असले तरीही त्यातून शिकायला मिळेल हा विश्वास आहे.
छान लिहिलंय... अगदी कळकळीनं
छान लिहिलंय... अगदी कळकळीनं
नाझी भस्मासुराचा उदयास्त आणि बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहाणीवर आधारित सिनेमांची कल्पना आवडली.
जागतिक महायुध्दांमधे कितीतरी छोट्या छोट्या कहाण्या होत्या, ज्यांवर हॉलिवूडमधे आजवर अनेक सिनेमे आलेले आहेत. असंच कहाण्यांचं भांडार भारतीय स्वातंत्र्य संग्रामात, महाराष्ट्र निर्मितीच्या संग्रामात, गोवा मुक्ती संग्रामात दडलेलं आहे. त्याला कल्पकतेची जोड देऊन सुंदर सिनेमे बनू शकतात.
(उदा - रंग दे बसंती. या सिनेमाच्या संदर्भात सर्वात मोठी दाद कथानकातील कल्पकतेला द्यावीशी वाटते.)
सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर
सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकर यांच्या ७-८ चित्रपटांपैकी काही अगदी 'उत्कृष्ट' या कॅटेगिरीतले.
यापैकी नितळ, वास्तूपुरुष, दहावी-फ, माझे हे फारच आवडते.
नचिकेत-जयू पटवर्धन यांचा 'लिमिटेड माणूसकी' महानच.
उमेश विनायक कुलकर्णी चा 'विहिरि'.
यांच्याबद्दल कुणीच कसं काही बोलत नाही? कि पाहिलेच नाहीत कुणी?
बाकी किरण,
भावना पोचल्या. लेखण आवडले!
ट्यागो आढावा घेणे हा उद्देश
ट्यागो
आढावा घेणे हा उद्देश इथे नाही. विषयाची गरज म्हणून मोजका आढावा घेतलाय. म्हणूनच पांढर सारखा सिनेमाही राहीलाच .. धन्यवाद
जागतिक महायुध्दांमधे कितीतरी
जागतिक महायुध्दांमधे कितीतरी छोट्या छोट्या कहाण्या होत्या, ज्यांवर हॉलिवूडमधे आजवर अनेक सिनेमे आलेले आहेत. असंच कहाण्यांचं भांडार भारतीय स्वातंत्र्य संग्रामात, महाराष्ट्र निर्मितीच्या संग्रामात, गोवा मुक्ती संग्रामात दडलेलं आहे. त्याला कल्पकतेची जोड देऊन सुंदर सिनेमे बनू शकतात. >>> लले, इथेही कल्पकतेच्या नावाखाली एखादा "उंच माझा झोका" प्रमाणे वाट लावणारा निघू शकतो.
छान लिहीलं आहे. आवडलं.
छान लिहीलं आहे. आवडलं.
सर्वांचे आभार . सार्वजनिक
सर्वांचे आभार .
सार्वजनिक केला.
भविष्यातील मराठी
भविष्यातील मराठी चित्रपटाबद्दल अपेक्षा सांगताना,
पूर्वीच्या आणि सध्याच्या चित्रपटांचा चांगला आढावा घेतला आहे.
वाचनीय लेख..... आवडला.
महत्वाच्या विषयावर छान
महत्वाच्या विषयावर छान लिहिलंत किरण.
बरोबर आहे ललिता-प्रीती ,अश्विनी के.चं
<<जागतिक महायुध्दांमधे कितीतरी छोट्या छोट्या कहाण्या होत्या, ज्यांवर हॉलिवूडमधे आजवर अनेक सिनेमे आलेले आहेत. असंच कहाण्यांचं भांडार भारतीय स्वातंत्र्य संग्रामात, महाराष्ट्र निर्मितीच्या संग्रामात, गोवा मुक्ती संग्रामात दडलेलं आहे. त्याला कल्पकतेची जोड देऊन सुंदर सिनेमे बनू शकतात. >>> लले, इथेही कल्पकतेच्या नावाखाली एखादा "उंच माझा झोका" प्रमाणे वाट लावणारा निघू शकतो.>>>
सत्तरच्या दशकातले सत्यकथेचे,अभिरुचीचे अन त्यानंतरचेही मौज चे अंक त्यातल्या कथाकादंबर्या ही एक वाचनपर्वणी होती..त्यातल्या अस्सल कथांचं चित्ररुपांतर किती सुंदर होईल..
'तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा !' पण असली शिवधनुष्ये उचलावीत कुणी? त्यांना लोकाश्रय मिळणे कठीण..
लेख छान आहे..... शुभेच्छा
लेख छान आहे..... शुभेच्छा
दुस-या बाजूला जे लोक इंग्रजी
दुस-या बाजूला जे लोक इंग्रजी सिनेमाचे प्रेक्षक आहेत, तेच हिंदी सिनेमाचेही प्रेक्षक आहेत आणि तेच मराठी सिनेमाचेही ! असं असताना त्याला गृहीत धरण्याची चूक मराठी सिनेमाने करता कामा नये. प्रेक्षकही हॉलिवूडपटाकडून ज्या अपेक्षा ठेवत असतात त्या बॉलिवूडपटाकडून ठेवत नाहीत आणि बॉलीवूडपटाकडून ज्या अपेक्षा असतात त्या मराठीकडून ठेवत नाहीत. प्रत्येक ठिकाणी संस्कृती वेगळी आहे, मर्यादा आहेत याची जाण आपल्या प्रेक्षकाला नक्कीच आहे. म्हणूनच मराठी सिनेमाला मराठी मातीचा वास आला पाहीजे या म्हणण्याचा नेमका अर्थ आपल्याला उमगला पाहीजे. >>>>>>>>>>>>>>>> उत्तम आणि अचूक विश्लेषण! लेख अर्थातच आवडला.स्पर्धेतली दावेदार एन्ट्री !
वा किरण, कळकळ
वा किरण,
कळकळ जाणवली...
दिनेशदा मस्त पोस्ट!!
नितांत सुंदर लेख
नितांत सुंदर लेख किरण..
दिनेशदा मस्त पोस्ट!!+ १००
गिरीराज, बागेशी, वर्षुतै,
गिरीराज, बागेशी, वर्षुतै, वर्षा व्हिनस, भारतीतै, उकाका आभार आपले सर्वांचे.
गिरीराज.. पहिल्यांदाच स्पर्धेसाठी लेख देतोय. आपलं लिखाण दिग्गजांपर्यंत पोहोचणार आहे या भावनेतून. क्रमांकाचं आकर्षण नाहीच इथे. मान्यवर परीक्षकांच्या प्रतिक्रिया हाच मोठा पुरस्कार असेल मा़झ्यासाठी. धन्यवाद.
खुप छान लिहिलयं. वेडावाकडा
खुप छान लिहिलयं.
वेडावाकडा चेहरा केला कि विनोदी अभिनेता म्हणून मिरवणारे आणि त्याच त्या शैलीत २४ तास बोलणारे सुपरस्टार्स यापासून मराठी सिनेमाला मुक्ती मिळण्याची गरज आहे. >>>>>>>>>>> +१
उत्कृष्ट लेख. अनेक पॅराज
उत्कृष्ट लेख. अनेक पॅराज आवडले, पटले आणि आपले विचार कोणीतरी जोरकसपणे मांडल्यासारखे वाटले.
============
पुढे पुढे तर तमाशाच्या थिएटरमधेच मराठी सिनेमा बनतो कि काय अशी शंका यावी असे सिनेमे बनले.<<<
आपल्या प्रेक्षकाबद्दल सचिनसारखे लोक काय विचार करतात हे असे सिनेमे पाहीले कि कळत नाही.<<<
दुस-या बाजूला जे लोक इंग्रजी सिनेमाचे प्रेक्षक आहेत, तेच हिंदी सिनेमाचेही प्रेक्षक आहेत आणि तेच मराठी सिनेमाचेही ! <<<
अश्या अनेक वाक्यांना +१००
============
लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन (यांनी विनोदी चित्रपटातील प्रत्येकी एक चित्रपट सोडला तर) निव्वळ टाईमपास केला. पब्लिक मूर्खच असते यावर त्यांचे चित्रपट बेतलेले असायचे.
लावणी म्हणजे एक अख्खे युग चाललेला प्रकार. नुसता वैताग!
किरण, मस्त लेख आहे.
दाक्षिणात्यांकडे चित्रपटाचे वेड मराठी माणसापेक्षा जास्त आहे हे मात्र एक महत्वाचे कारण आहे.
इतरांच्या कलेतील बलस्थाने आत्मसात करण्याबाबतचे सर्व विचार पटलेच.
===========
अभिनंदन
किरण.... काहीही पुढे
किरण....
काहीही पुढे लिहिण्याअगोदर मी हे लिहितो की, "मायबोली" टीममधील कुणा एकाला वा अनेकाना 'गाथा चित्रशती" ची कल्पना सुचली त्याला/तिला/त्याना मनःपूर्वक धन्यवाद. अशासाठी की त्या निमित्ताने असे एकसो एक माहितीपूर्ण [तसेच हळव्या आठवणींनी चिंब भिजलेले] लेख वाचायला मिळत आहेत की, खुद्द अॅडमिनच नव्हे तर सर्वसामान्य वाचनमात्र असलेले माझ्यासारखे सदस्यही अगदी हरखून गेले आहेत.
आता किरण तुमच्या या लेखाविषयी....
स्पर्धेचा निकाल जो लागायचा तो लागो, पण तुमचा हा लेख इतक्या पोटेन्शिअल इलेमेन्ट्सनी परिपूर्ण झाला आहे की तो माझ्या दृष्टीने पारितोषिकाच्याही पुढे गेला आहे. हिंदी आणि इंग्रजी चित्रपटाबद्दल भरभरून लिहावे अशीच समृद्ध परंपरा त्या दोन भाषांना लाभली आहे हे सर्व भाषिक प्रेक्षक नक्कीच मान्य करतील. पण आपल्या एखाद्या मराठी चित्रपटाबद्दल काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत बोलले जात होते/आहे, असे भाग्य किती चित्रपटांना लाभले असेल ? अगदी प्रभात काळापासूनचा लेखाजोखा जरी इथे मांडला तरी फक्त 'अयोध्येचा राजा' आणि विष्णुपंत पागनीसांच्या 'संत तुकाराम' नंतर एकही नाही....होय, जरी हे विधान काहीसे धाडसाचे वाटत असले तरीही मी जितका काळ केरळ आणि मद्रास प्रांतात फिरलो आहे, राहिलो आहे, तेथील समविचारी, समानव्यसनी मित्रांसमवेत [किंबहुना त्यांच्याही आईवडिलांसम ज्येष्ठांसमवेत] चर्चा केली आहे, त्या सर्वांच्या नजरेत एकही असा मराठी चित्रपट नाही की ज्याबद्दल त्याने कुतूहलाने, औत्सुक्याने विचारावे. 'अयोध्येचा राजा' ला एक ऐतिहासिक परंपरा आहे, म्हणून तो निदान तेथील ज्येष्ठांना माहीत तरी आहे; पण १९५० ते थेट २०१० पर्यंत मराठी ने जिथे बेळगांवच्या पलिकडे आपला गाडा नेला नाही, तिथे अन्य राज्यांच्या सीमारेषाबद्दल काय लिहावे ? [ज्या 'पिंजरा' चित्रपटाला किरण यानी 'अजरामर' चित्रपट असा दर्जा दिला आहे, तो तर चक्क एका जर्मन चित्रपटावर बेतलेला असल्याने त्याचे कथानक उधारीचे आहे. मग अशा चित्रपटाला केवळ मराठी रंगरंगोटी केली म्हणजे तो 'अजरामर' संज्ञेला पात्र होऊ शकत नाही. व्ही.शांताराम यांचा 'शेजारी' हाच एकमेव चित्रपट की ज्याची जातकुळी अस्सल मराठी बाजाची होय.]
या उलट राष्ट्रीय चित्रपट पातळीवर हमखास विजयी ठरणारे बंगाली, मल्याळी, कन्नड चित्रपटांबद्दल इथे मराठीत इतके लिखाण होत असते ते वाचून त्या प्रादेशिक म्हटल्या जाणार्या भाषेतील चित्रपटांचा आवाका किती वैविध्यपूर्ण आहे हेही उमगते. मग वेळोवेळी मुंबई, पुणे आणि अन्य काही शहरात या चित्रपटांचा महोत्सव जेव्हा लागतो, त्यावेळी तिथे होणारी गर्दी केवळ त्याच भाषेच्या रसिकांची नसते तर माझ्यासारखे मराठी प्रेक्षकही तितक्याच आपुलकीने त्या चित्रपटांना गर्दी करतात आणि मग 'चेम्मीन', 'स्वयंवरम', 'निर्मालयम', 'पिरावी' असे सशक्त कथानकांचे मल्याळी, तर 'घटश्राध्द', 'चोमना दुढी', 'तबरेन कथा' असे कन्नड चित्रपट असोत.....बंगाली जादूबद्दल तर काही लिहिण्याचीही आवश्यकता नाही, इतकी त्या भाषेतील चित्रपटांबद्दल इथल्या सदस्यांना माहिती आहे.
या तीन भाषांतील गुणवत्तेतील सर्वात मोठा घटक कुठला असेल तर त्या त्या चित्रपटांचे 'सशक्त कथानक'. सत्यजित रे असोत, शाजी करुण असोत, गिरीश कासारवल्ली असोत वा रामू करीअत असोत या दिग्दर्शकांनी तसेच त्याना आर्थिक मदत करणारे निर्माते तसेच राज्य सरकारचा विभाग असो, या सर्वांनी 'कथानका'ला प्रथम प्राधान्य दिल्याचे आढळून येते.
बरे कथानक कथानक म्हणजे तरी काय असते शेवटी ? तर पाहाणार्याला असेच वाटत राहिले पाहिजे की, 'अरेच्या ही तर माझीच कथा ना !"....मग तो साहजिकच पडद्यावरील प्रत्येक फ्रेममध्ये आपसुकच गुंतत जातो.
'पिरावी' या मल्याळी चित्रपटात बहिणीच्या साखरपुड्याला हजर राहणासाठी तिचा शहरात नोकरी करणारा भाऊ बॅग घेऊन आपल्या खेडेगावाकडे निघतो आणि अमुक एका रेल्वेचे रिझर्व्हेशन मिळाले आहे असा फोनही करतो. रेल्वे येण्याच्या सुमाराच त्याचे वडील त्याला आणायला रेल्वे स्टेशनवर जातात....पण त्या रेल्वेच्या कोणत्याच बोगीतून तो भाऊ प्लॅटफॉर्मवर उतरलेला दिसत नाही. बाप ती ट्रेन हुकली असेल म्हणून पुढच्या ट्रेनची वाट पाहात बसतो....मुलगा येतच नाहे.....संपले कथानक....त्याचे काय झाले, याचे उत्तर दिग्दर्शकाने नव्हे तर तुम्ही आम्ही प्रेक्षकांनी शोधायचे. अंगावर शहारे येतात त्या 'शोध मोहिमे' मुळे.
गिरीश कासारवल्लीची 'तबेरन कथे' ही तर सरकारी नोकरी इमानेइतबारे केल्यानंतर पेन्शनची वाट पाहाणार्या एका कर्मचार्याची {कमल हासनचे थोरले बंधू चारु हासन यानी या पेन्शनरची भूमिका अशी काही ताकदीने साकारली की त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक त्याना मिळाले]. पेन्शनसाठी त्या कार्यालयात या कर्मचार्याने घातलेल्या डोके फिरून जाईल अशा अथक फेर्या....हेच कथानक. यात काय नाट्य आहे ? असा प्रश्न मराठी प्रेक्षकाला पडेल, पण प्रत्यक्ष पडद्यावर जेव्हा आपण त्या कर्मचार्याची होत असलेली ससेहोलपट पाहतो त्यावेळी डोळ्यात नकळत पाणी येते. या चित्रपटाचा खलनायक कोण असेल तर ते टिपिकल सरकारी कार्यालय. त्या कार्यालयाचे एखाद्या मुडद्यासारखे वातावरण पाहिले की साहजिकच मनी विचार येतो की आपल्या नशिबी अशी 'पेन्शन' येणे नको.
किरण यानी आपल्या लेखात मराठी चित्रपटाच्या वाटचालीचा सुरेख असा आढावा घेताना अन्य भाषेच्या चित्रपटांच्या दर्जाबद्दल जो उल्लेख केला आहे, त्याच अनुषंगाने हा प्रतिसाद दिला आहे. इंग्रजी चित्रपट हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने त्याचा उल्लेखही मराठी चित्रपटांच्याबाबतीत नकोसा वाटेल.
बाकी इथले कलाकार....त्याबाबत किरण, दिनेशदा आणि अन्य प्रतिसादकांनी स्पर्धेच्या निमित्ताने बरेच विचार मांडलेले आहेत त्यांच्याशी माझेही विचार तंतोतंत जुळतात इतकेच म्हणतो.
"विनोदी अभिनेता म्हणून मिरवणारे सुपरस्टार्स यापासून मराठी सिनेमाला मुक्ती मिळण्याची गरज आहे." ~ हे वाक्य आणि त्यातील मत किरण यांच्या लेखाची पताका ठरेल असे आहे. [पुणे-कोल्हापूर हाय वे वर बांधकामाच्या जाहिरातीची भली मोठी पोस्टर्स लटकलेली आढळतात....त्या जाहिराती हे सुपरस्टार्स त्याच विनोदी चेहर्याने करताना पाहिले की अगदी किळस वाटते.... अरे, "घर" संकल्पनेला शोभेल असे काहीतरी मृदु आश्वासक भाव चेहर्यावर दाखविण्याचा यानी आग्रह का धरू नये ? घर घेणे म्हणजे काय चौपाटीवरील भेळ खरेदी करणेच होय, असे चेहरे केल्याचे दिसत्ये.]
अशोक पाटील
सुरेख लेख ! सगळे मुद्दे
सुरेख लेख ! सगळे मुद्दे पटताहेत....
अशोक सराफ़, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारखे प्रतिभावंत उपलब्ध असताना त्यांच्या ताकदीचा वापरच केला गेला नाही. त्याच त्याच बाष्कल विनोदी भुमिकात त्यांची क्षमता अक्षरश: सडवली गेली (अपवादाबद्दल क्षमस्व)
मी तर म्हणेन महेश कोठारे, सचीन यांनी मराठी चित्रसृष्टीचं नुकसानच केलं.
सुदैवाने आता बरेच चांगले चित्रपट येताहेत. वळु, टिंग्या, गाभ्रीचा पाऊस, निशाणी डावा अंगठा, देऊळ, विहीर....
चांगले दिवस येण्याची लक्षणे आहेत ही.
किरण डॉट डॉट, चांगला लेख.
किरण डॉट डॉट, चांगला लेख. चांगला मराठी सिनेमा याबद्दल प्रत्येकाचे ठोकताळे वेगवेगळे आहेत. पण निर्मात्याचे ठोकताळे ठरलेले आहेत. पैसे परत मिळायला हवेत. यात काहीच चूक नाही. गंमत म्हणून सिनेमात कोटी दोन कोटी कोणी टाकणार नाहीत. पण टाकलेले पैसे परत मिळण्याची हमी आहेच कुठे ? मराठी सिनेमा थेटरात लावण्यासाठी थेटरवाले तयार नाहीत... कारण त्यांचा संसार सिनेमातून मिळणार्या पैशांवर चालत नसून विकल्या जाणार्या पॉपकॉर्न व कोल्ड्रींक्सवर चालतो. तेच विकलं जात नसेल तर त्यानेही 'मराठी सिनेमा मी का लावू ?' असं म्हणणं गैर वाटत नाही. चांगला सिनेमा बनत नाही म्हणून आम्ही सिनेमे पहात नाही असं म्हणणारी माणसे सिनेमाला जातच नाहीत. त्यामुळे सिनेमाला बुकींग नाही. बुकींग नाही म्हणून निर्माता नवीन सिनेमा बनवू पहात नाही. त्यापेक्षा रटाळ सिरियलमधे पैसे परत येण्याची हमी तरी आहे. इथे उत्तम कादंबर्या, पटकथा आणि दिग्दर्शक निर्मात्याच्या शोधात आहे आणि निर्माता 'रिटर्न्स' देणार्याच्या शोधात. जिथे हा शोध संपतो. तिथे सिनेमा तयार होतो. पण त्या सिनेमाला फक्त 'सुवर्णकमळ' पलिकडे जर काही मिळालच नाही तर मग दुसरा सिनेमा तयार होत नाही.
मराठी सिनेमात येणारी लाट पण या पैशाच्या गणितामुळेच निर्माण होते. मराठीत जे विकलं जातं तेच बनवण्याचा निर्मात्यांचा कल होणं साहजिक आहे. शिवाय अभिनेतेही वेगळी वाट निवडण्याच्या फंदात न पडण्याचं कारणही तेच. नाहीतर 'विदुषक' करणारा लक्ष्या 'वेड्यावाकड्या' चेहर्याआड लपला नसता. असो. खंत आहे आणि खपलीआड जखमासुद्धा.
बेफिकीर मनापासून धन्यवाद.
बेफिकीर मनापासून धन्यवाद. विशल्या ..आभार
अशोकजी ... तुमचा प्रतिसादच एक सुंदर लेख झालाय.
कौतुक - प्रत्येक मुद्याशी सहमत आहे. म्हणूनच लोकाश्रय मिळायला हवा असं वाटतं.
कथानकाचा मुद्दा लिहीताना इतकी गद्री झालेली विचारांची कि अनेक मुद्दे सुटले लेख लिहीताना. आता लेख दुरूस्त करत नाही. पण कथानका वर सिनेमे काढून झाल्यावर इतर भाषिक सिनेमे प्रस्थापित झाले आणि गोष्ट सांगण्याच्या पलिकडचा सिनेमा घेऊन आले. शराबी या सिनेमाची गोष्ट एक माणूस असतो आणि तो दारू पितो इतकीच आहे. पण तीन तास आपण काय पाहतो तर... सिनेमा !!
मराठीमधे आधी सशक्त कथांवर सिनेमे तर येऊद्या. प्रेक्षकांचा विश्वास बसला कि सिनेमा या माध्यमाचा पुरेपूर वापरही नक्कीच उचलून धरला जाईल.
छान उत्तम लेख
छान उत्तम लेख
कौतुकच्या प्रतिसादानंतर असे
कौतुकच्या प्रतिसादानंतर असे वाटायला लागलेय कि आपण प्रत्येकाने, मी मराठी चित्रपटापासून का दुरावलो किंवा मी मराठी चित्रपट का बघत नाही, यावर आपले विचार लिहायला हवेत.
अशोकनी लिहिल्याप्रमाणे वेगळ्या घाटणीच्या कथा, इतर भाषेत येतच असतात. एका बंगाली चित्रपटात (ममता शंकर होती त्यात ) केवळ नोकरीवरून मुलीला घरी यायला झालेला उशीर एवढेच कथासूत्र होते, आणि त्याचे कारणही आपल्याला कळत नाही. ती कारण सांगताना, आई तिच्या तोंडावर हात ठेवते.
पिंजराचे कथानक ब्ल्यू एंजल आणखी एका कथानकावर बेतलेले होते, तरीपण त्याचे पुरेसे मराठीकरण झाले होते.
छान लिहिलंय किरण. शुभेच्छा.
छान लिहिलंय किरण. शुभेच्छा.
सुरेख लिहिलय.... कौतुक ची
सुरेख लिहिलय....
कौतुक ची कळकळ पोहोचली. खरच लोकाश्रय हवा आहे आपल्या सिनेमाला......
कौतुकच्या प्रतिसादानंतर असे
कौतुकच्या प्रतिसादानंतर असे वाटायला लागलेय कि आपण प्रत्येकाने, मी मराठी चित्रपटापासून का दुरावलो किंवा मी मराठी चित्रपट का बघत नाही, यावर आपले विचार लिहायला हवेत.>>>
दिनेशदा
खरं तर हल्ली मराठीमधे खूप काही घडतंय. पण लोकाश्रय मिळाला नाही तर ही लाट ओसरून जाईल. मला वाटतं कित्येक चांगले सिनेमे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. नटरंग या सिनेमाला चौथ्या आठवड्यात मी ब्लॅकने तिकीट घेतली. देऊळ ने गर्दी खेचली. झेंडा ने ही पब्लिक जमवलं. पण पांढर ला गर्दी झाली नाही. एक उनाड दिवस कधी आला आणि कधी गेला हे समजलं नाही.
याचं पहिलं कारण म्हणजे मराठी सिनेमा व्यावसायिकांनी मार्केटिंगचा विचारच केलेला नसणं हे असू शकेल. वर उल्लेख केलेले सिनेमे हे "हवा" तयार केल्याने चालले. सिनेमा नुसता चांगला असून कसा चालेल ? दुसरी गोष्ट म्हणजे एखादा मोठा सिनेमा रिलीज होत असताना हिंदीतही इतर बॅनर्स आपल्या सिनेमाचं रिलीज पुढे ढकलतात. त्या खाली स्लॉटमधे मग मराठी सिनेमा रिलीज होतो. बॅटमॅन सारखा बहुचर्चित सिनेमा असेल तर त्याचा फटका इतर सिनेमांना बसणारच. मी आठवड्याला जास्तीत जास्त एक ( हे पण खूप होतंय) सिनेमा पाहू शकतो. मग तो मराठी कि हिंदी कि इंग्रजी (डब झालेला :फिदी:) हा भाग अलाहिदा !
मग एकाच वेळी पाच सहा चांगले मराठी सिनेमे रिलीज होत असतील तर दोष कुणाला द्यायचा ?
----------------------------------------------------------------------------------------------------
वरील लेखात रात्रआरंभ या सिनेमाचा विसर पडल्याने माझा मीच निषेध करतो.
कळकळ पोचली.
कळकळ पोचली.
काही मुद्दे पटले. कौतुक, माफ
काही मुद्दे पटले.
कौतुक, माफ करणे पण दोन कोटी ही रक्कम मराठीतही रिकव्हरीसाठी आता अवघड नाही. फिल्म चांगली केली तर काहीच प्रश्न नाही. आता तर मराठीत डिस्ट्रीब्युटर्स पण परत आलेत.
थिएटर्स मिळत नाहीत पासून सगळी कारणे अर्धीच खरी आहेत हे माझे मत.
Pages