१९५० चं दशक म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टीतला सुवर्णकाळ. कृष्णधवल रंगामधे या दशकाने अनेक शिल्पं घडवली. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उन्माद होता. "काहीतरी करायचं आहे" याची जाणीव होती. फाळणीचं अपरंपार दु:ख होतं. आणि नव्याकडे घेऊन जाणारी आशा होती.
याच दशकामधे "स्टारडम" ही संकल्पना रुळत गेली. चित्रपट ही एक जादुई दुनिया आहे आणी त्यामधे काम करणारे लोक हे जादुगार आहेत असा भारतीय मानसिकतेवरती जो पगडा आजतागायत बसलाय त्याची सुरूवात पण याच दशकातली.
किशोर कुमारचा खट्याळ दंगा, राज कपूरची भोलीभाबडी सूरत, दिलीपकुमारचे दर्दभरे अफसाने, नर्गीसचं निखळ हसू, मधुबालाची कातिलाना नजर आणि देव आनंदचं देखणेपण. हे सगळं सगळं त्या चांदीच्या पडद्यावर खणखणत आलं. सिनेमाचं तंत्र आणि व्याकरण देखील दिवसेंदिवस बदलत होतं.
याच दरम्यान हिंदीसिनेमा सृष्टी एक भलीमोठी इंडस्ट्री म्हणून उगम पावत होती. हिंदी सिनेमाचा युएसपी बनला होता तो म्हणजे नृत्य आणि संगीत. जेव्हा हॉलीवूड सिनेमा हा जास्तीत जास्त वास्तव कसा करता येइल याचा विचार करत होतं. तेव्हा हिंदी सिनेमाने "ही फॅन्टसी आहे" हे मनोमन मान्य करून या फँटसीचे जाळे प्रेक्षकाभोवती विणायला सुरूवात केली. म्हणून आता इथे हॉलमधे बसून संवाद म्हणत असणारे युगुल अचानक स्वित्झर्लंडच्या डोंगरावर का नाचायला लागले असे प्रश्न भारतीयाना कधीच पडले नाहीत. हा सिनेमा आहे हे त्यानी मान्य केलं आणि या तीन तासांच्या या तमाशावर भरभरून प्रेम केलं. यातल्या गाण्यांवर प्रेम केलं. गीतकारांवर प्रेम केलं, संगीतकारांवर प्रेम केलं आणि गायक-गायिकांना तर देवादिकापेक्षा जास्त वरचा दर्जा देऊन टाकला.
भारतीय संगीत खासकरून लोकसंगीत मुळातच अतिसमृद्ध आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रसंगासाठी गाणी संगीत इथल्या जनमानसामधे रूजलेल्या आहेत. नेमके याचमुळे आपल्या सिनेमामधे देखील प्रत्येक प्रसंगाला साजेसं गाणं असावंच लागतं.
भारतीय प्रेक्षकांचं संगीतावर असणारं प्रेम लक्षात घेऊन प्रत्येक फिल्म "म्युझिकल" असायलाच हवी असा जणूकाही नियम झाला. भारतीय पटकथाकार जेव्हा कथा लिहितो तेव्हा त्याला गाण्याची सिच्युएशन बनवावी लागत नाही. ती कथेतून आपोआप येते.
ही गाणी पण फक्त पार्श्वभूमीवर वाजून चालत नाहीत. हीरो हिरवीणने गाण्याच्या ओळीबरोबर ओठ हालवलेच पाहिजेत. गाण्याला ठेका असेल तर डान्स केलाच पाहिजे. हिरो हिरवीण दोघापैकी कुणी डान्स करत नसेल तर पाठीमागे नाचणारे एक्स्ट्रा हवेतच. मात्र गाण्यांचे चित्रीकरण याच काळामधे अभिनव पद्धतीने देखील केले गेले.
या काळामधे घडणारी अजून एक वेगळी महत्त्वाचा बदल म्हणजे सिनेमा हे माध्यम "नाटक" माध्यमापासून फारकत घ्यायला लागले. कॅमेर्याच्या जादुई लेन्स वापरून अनेक गमेतीशीर धाडसी आणि उच्च दर्जाचे प्रयोग करण्यास सुरूवात झाली. दुर्दैवाने त्यानंतरच्या दशकामधे मात्र असे प्रयोग घडणे फार कमी होत गेले. आणि तेव्हा गाण्याचं चित्रीकरण एकाच पठडीने करण्याचा सपाटा लावला गेला. ९०च्या दशकानंतर मात्र पुन्हा असे वेगवेगळे प्रयोग बघायला मिळत आहेत.
गाण्याच्या चित्रीकरणाच्या प्रयोगामधे हिंदी सिनेमामधे पहिलं नाव येतं गोल्डीचं- विजय आनंद. विजय आनंद म्हटला की बर्याच जणाना गाईड आठवतो. कुणाला ज्वेल थीफ पण आठवेल. गाईडमधे गोल्डीने दोन गाणी लागोपाठ, एका शॉटमधे संपूर्ण गाणं असे अनेक प्रयोग केले. ज्वेल थीफमधे "होठो पे ऐसी बात" मधल्या कॅमेराची कमाल सांगून समजत नाही, ती प्रत्यक्ष बघायलाच हवी.
मला मात्र विजय आनंद आठवतो तो तेरे घर के सामनेसाठी. माझ्या दृष्टीने इतका फ्रेश आणि कालातीत सिनेमा क्वचित बनला असेल. कथावस्तू अगदीच साधी. एका गावातल्या दोन श्रीमंत शेठ लोकाची दुष्मनी. खरंतर इगो प्रॉब्लेम्स. एका जमिनीच्या लिलावामधे दोघाचे हे इगो उफाळून येतात. त्याच्या पार्श्वभूमीवर साकारते एक छानशी हळूवार प्रेमकथा. मोठेमोठे डोळे करत बघणारी नूतन आणि गालातल्या गालात हसणारा देव आनंद. नूतनने या सिनेमापेक्षा अस्सल अभिनय अनेक सिनेमामधे केला आहे. पण या सिनेमाइतकी सुंदर कधीच दिसली नाही. हे माझे वैयक्तिक मत आणि देव आनंदबद्दल काय बोलावं महाराजा. त्याच्या इतका देखणा नट (त्याकाळामधे) दुसरा कुणी नव्हताच. देवच्या समोर नूतन हे एक मुळात अतिशय सुंदर कॉम्बो आहे. देवसमोर कल्पना कार्तिक, आशा पारेख वगैरे तर मला दिसतच नाहीत. नुसता देव दिसत राहतो. देवच्या समोर मधुबाला असली की मला जिलेबीवरती रबडी घालून खाल्ल्याइतकं गोडगोड होतं. पण देव आणि नूतन म्हणजे जिलेबी ने फाफडा. मीठा और नमकीन.
हिंदी व्यावसायिक सिनेमामधे अशा फार कमी नायिका आहेत ज्याना नूतनसारखे तथाकथित "आर्ट सिनेमा" आणि "कमर्शिअल सिनेमा" दोन्हीमधे सारख्याच उमेदीने काम केलय. सीमा, सुजाता, बंदिनीसारख्या सिनेमामधे नूतन सगळा सिनेमा आपल्या खांद्यावर ताकदीने पेलते. आणि हीच नूतन तेरे घर के सामने, अनाडी सारख्या व्यावसायिक आणि नायकाला झुकते माप देणार्या सिनेमामधेदेखील नूतन सशक्तपणे उभी राहते. सौंदर्याच्या बाबतीत मधुबाला अथवा वहिदा रहमान यांना आदर्श मापदंड मानलं जातं. पण नूतन नुसती सुंदर नव्हती तर उत्फुल्ल होती, प्रसन्न होती आणि कृष्णधवल असो वा रंगीत प्रत्येक फ्रेमला उजळून टाकणारी होती.
तेरे घर के सामने मधे कुतुब मिनारच्या पायर्यांवरचं दिल का भंवर करे पुकार हे आजही क्लासिक गाणं आहे. कुतुब मिनारच्या त्या अरूंद पायर्या या काय रोमँटिक गाणं चित्रेत करायची जागा आहे का? पण गोल्डीने ते करून दाखवलय. त॑शी चित्रपटातली सर्वच गाणी संस्मरणीय आहेत. पण या चित्रपटातलं माझं अत्यंत आवडतं गाणं आहे टायटल साँग- तेरे घर के सामने. या गाण्याच्या चित्रीकरणाची सकंल्पना इतकी सही आहे, की त्या काळातल्या तांत्रिक साधनांची मर्यादा लक्षात घेऊन पण हा प्रयोग आजही पूर्ण वेगळा ठरतो. अशा या गाण्याची ही एक छोटीशी सफर.
या गाण्याचे शब्द हसरत जयपुरी यांचे आणि संगीत दिलय सचिन देव बर्मन यांचं. मात्र या गाण्याच्या जादूचं श्रेय जातं अर्थात दिग्दर्शक विजय आनंद आणि संकलक बाबू शेख. गाणं म्हटलय (अर्थात) रफी आणि लताने.
तो एक आर्कीटेक्ट. घरं बनवणं हे त्याचं काम. पण त्याच्या दृष्टीने घर म्हणजे चार भिंती आणि छप्पर नव्हे. घर म्हणजे त्याचं स्वतःची एक वेगळं जग. बाहेरच्या लोकापासून दूर. कुठल्याही संकटापासून वाचवणारं. पण एक घर बनवताना किती त्या अडचणी. आधी जिच्यासाठी घर बनवायचं तिला पटवायचं. ती पटते म्हणेम्हणेपर्यंत स्वत:च्या आईवडलांच्या आणि तिच्या आईवडलांची भांडणं सोडवायची. बरं ही भांडणं तर अगदी लहान मुलासारखी.
आईवडलांच्या आणि (होणार्या) सासूसासर्यांच्या बालिश भांडणाला वैतागलेला देव एका बारमधे दारू पित बसलाय. सोबत त्याचा एक मित्र कम असिस्टंट कम कॉमेडीवीर आहेच. देवला प्रेयसीची आठवण येतेय. हळूहळू नशा चढतेय. आणि त्याला डोळ्यासमोर त्याची प्रेयसी दिसतेय. ती पण चक्क दारूच्या ग्लासमधे. हा खास गोल्डी टच.
रफी हा आजदेखील पार्श्वगायकांमधे आजदेखील सर्वात महान गणला जातो. याचं कारण त्याचं मूळचं गाणं कसं होतं यापेक्षा सिनेमातल्या अभिनेत्याला अनुरूप असावं याबाबत तो दक्ष असायचा. रफीचा आवाज शम्मीसाठी वेगळा, दिलीपसाठी वेगळा आणि देवसाठी पण वेगळा. आवाजाचा हा फरक मला रफी आणि किशोर सोडल्यास अजून कुणातच दिसत नाही. सध्याचे गायक तर भावी स्टेज शो लक्षात घेऊन गाणी म्हणतात असे माझे स्पष्ट मत आहे अर्थात काही अपवाद आहेतच. असो. रफीच्या नशील्या आवाजामधे देव गातोय.
इक घर बनाऊंगा तेरे घर के सामने
दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने
आता नूतनला एक चित्र दाखवतोय. दोन समोरासमोर असलेल्या घरांचं. ती खुदकन हसते. त्याच्या बाजूला असणारा त्याचा मित्र चकित. अचानक या देवला काय झालं म्हणत तो बघायला येतो. नूतन त्याला बघून चिडते. त्याबरोबर देव तो ग्लास घेऊन दूर निघून जातो. दूरवरच्या स्टूलवर जाऊन बसतो. आणि एक गिरकी घेतो. नूतन त्याला म्हणते.
घर का बनाना कोइ आसान काम नही
दुनिया बसाना कोइ आसान काम नही
खरंच आहे की, आपण मराठीत नाही का म्हणत. लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून. इथे तर जिच्याशी लग्न करायचं तिच्यासाठीच घर पण बांधायचं. बरं नुसतं तिचं घर बांधायचं नाही, त्याचसोबत स्वत:साठी आणि तिच्यासाठी असं अजून एक घर बांधायचं. ते पण दोन्ही घराना अजिबात कळू न देता. शिवाय हे घर बांधताना आईवडलांचं भांडण पण सोडवायचं. त्यासाठी किती कष्ट लागतील याची काही पर्वा.
पण त्यानेपण आता निश्चय केलेलाच आहे. म्हणूनच तो म्हणतो.
दिलमे वफाए हो तो तूफान किनारा है
बिजली हमारे लिये प्यार का इशारा है
तनमन लुटाऊंगा तेरे घर के सामने.
हे म्हणताना तो हातातला ग्लास जवळ आणतो. नूतन खुलते आणि त्याच्या सुरामधे सूर मिसळते.
तितक्यात त्याच्या त्या आचरट मित्राला काय सुचतं कुनास ठाऊक, एक बर्फाचा तुकडा आणून देवच्या ग्लासमधे टाकतो. ग्लासमधे बुडबुडेच उठतात. त्या थंडीने नूतन कुडकुडते. देव आधी गमतीने बघतो आणि मग ग्लासमधला बर्फ काढून त्या मित्राचा तोंडात कोंबतो. हा अख्खा शॉट माझ्या अतिशय आवडीचा. गोल्डी पुन्हा एकदा जाणवतो.
ग्लास घेऊन परत देव तिकडून दुसरीकडे जातो. नूतन म्हणतेय
कहते है प्यार जिसे दर्या है आगका
या फिर नशा है कोइ जीवन के रागका
इतका वेळ तुझं जे प्रेम प्रेम चाललय ते किती भयानक आहे याची तुला जाणीव आहे का? मलाही खरंतर कल्पना नाही. पण लोक म्हणतात म्हणून मला माहिती, प्रेम म्हणजे आगीचा समुद्र आहे किंवा एखादी नशीली सुरावट आहे.
आता कॅमेरा देवकडे फेस करतो तेव्हा पाठीमागे दूर त्याचा मित्र अस्पष्ट दिसतो. देवने तोंडात कोंबलेला बर्फ काढढून बारटेंडरकडून ग्लास भरून घेत असताना दिसतो. पुन्हा एकदा गोल्डी टच.
देव नूतनला उत्तर देताना म्हणतो.
दिल मे जो प्यार हो तो आग भी फूल है
सच्ची लगन जो हो तो परबत भी धूल है
तारे सजाऊंगा तेरे घर के सामने.
हे म्हणताना देव सहज ग्लासवर टिचकी मारतो, जणू काही तिच्या नाकावरच टिचकी मारतोय. आणि त्याच वेळेला नूतन नाक उडवते. पुन्हा एकदा संकलनाची कमाल.
आता देव खिडकीतून बाहेर बघतोय. डोळ्यामधे स्वप्नंच स्वप्नं बघत. असाच सहज ग्लास नेऊन ओठाला लावणार तितक्यात त्याला ग्लासमधली नूतन दिसते. या शॉटमधले नूतनचे चेहर्यावरचे भाव निव्वळ अशक्य आहेत. लगेच देव कानाला हात लावून सॉरी म्हणतो. ग्लास पुन्हा उचलून टेबलवर ठेवतो.
एक अभिनेता म्हणून देव आनंदच्या अनेक मर्यादा होत्या. किंबहुना त्याच्याकडे अभिनय नव्हताच असे म्हणणारे पण पुष्कळ आहेत. पण देवकडे स्टारमटेरीयल होते. एक चार्म होता आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स होता. पिक्चर परफेक्ट राहाण्याची त्याची कायम धडपड असायची. त्याचं स्वतःवरती निस्सीम प्रेम होतं. एका "स्टारसाठी" ही सर्वात महत्त्वाची आवश्यकता. त्याच्या घरच्या देव्हार्यामधे त्याने कदाचित स्वत:चाच फोटो लावून ठेवला होता बहुतेक. पण तरी रोमँटिक गाण्यांच्या बाबतीत देवच्या हिरॉइन्स इतकं नशीबवान कुणी नसेल. चेहर्यावर रोमँटिक भाव आणायला नकोच, समोर भूलोकीचा गंधर्व उभा. सर्वात कठीण काम त्याच्यावर "रूठण्याचा" अभिनय करायची. तोदेखील फार फार तर गाण्याच्या एखाद्या कडव्यापर्यंतच. शम्मी आणि देव या दोघांवर जास्त काळ रूसून राहणं ही त्यांच्या अभिनेत्रीना अभिनयाची परिसीमा केल्यागत वाटत असेल. अर्थात मला अभिप्रेत असणारा देव जॉनी मेरा नाम, गाईडपर्यंतच. त्यानंतर ८०च्या दशकामधला देव आनंद हा देव आनंद नसून त्याचा तोतया असावा असाच मला संशय आहे असो. आपण गाण्याकडे वळू.
नूतन लगेच म्हणते,
काटोंभरे है लेकिन चाहत के रास्ते
तुमक्या करोगे देखे उल्फत के वास्ते
प्रेमाची वाटचाल अवघड आणि कठिण तर आहेच. पण मुळात हा प्रश्न आहे की तू तुझ्या प्रेमासाठी काय करशील?
यावर देवचं उत्तर अगदी मार्मिक आणि मिश्किल. अगदी एखादा "आर्किटेक्ट" देऊ शकेल अशी उपमा देऊन तो म्हणतो
उल्फत मे ताज छूटे ये भी तुम्हे याद होगा
उल्फत मे ताज बने ये भी तुम्हे याद होगा
इतका वेळ पाठीमागे चालू असलेली वाद्यं थांबतात आणि रफीचा आवाज घुमतो.
मै भी कुछ बनाऊंगा तेरे घर के सामने.
एवढं सर्व करायचं तर कुणासाठी? फक्त तुझ्याच साठी ना??
इथे नूतन अगदी टेचात "देखे?" म्हणते. आणि देव पुन्हा एकदा तेरे घर के सामने म्हणत असतानाच गाणं संपतं.
देव ग्लास टेबलावर तसाच ठेवून बारबाहेर पडतो. धावत येत असतानाच त्याला समोर त्याचे आणि नूतनचे आईवडिल दिसतात. त्याना सलाम करत देव क्लबबाहेर पडतो. सिनेमाच्या शेवटी हॅपी एंडींग होतो आणि ते दोघे समोरासमोर बांधलेल्या घरामधे सुखाने नांदतात.
हा सिनेमा पहिल्यांदा बघितला दहावीत असताना. तेव्हा देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर ही मंडळी पहिल्यांदाच भेटली. पण मनात घर करून गेला तो देव. "देखो रूठा न करो" किंवा "अभी न जाओ छोडकर" सारखी गाणी गुणगुणत.
हे गाणं संपलं तरी माझं मन अजूनही त्याच काळामधे रमलेलं राहतं. नंतर मास कम्युनिकेशनच्या कोर्सला गेल्यावर सिनेमा कसा बघावा याची अक्कल शिकवली. पण त्यासाठी कोर्स करायची गरज नव्हती.
मास कम्युनिकेशनच्या माझ्या कोर्सचा अनेक फायद्यापैकी एक फायदा हा झाला की हा सर्व काळ पुन्हा एकदा अनुभवता आला. त्या काळातल्या काही लोकांबरोबर "आमच्या काळी काय मज्जा, काय गमती" हे संभाषण करता आले. आम्हाला फिल्म अॅप्रिसीएशन नावाचा एक कोर्स होता त्यामधे विविध जागतिक आणि भारतीय सिनेमा आम्हाला पहावे लागायचे. आणि कायम उत्तम सिनेमाच पहायचा असे नाही, तद्दन फालतू आणि भिकार सिनेमापण पहावे लागायचे. फालतू काय ते समजल्याशिवाय उत्तम काय ते कसं समजणार? सिनेमा पाह्यल्यावर त्याचा रीव्ह्यु अथवा तत्सम असाईनमेंट पण लिहावी लागायची. (हे सर्वात वैतागवाणं!!) असल्याच एका असाईनमेंटसाठी आम्हाला "उत्कृष्ट रीत्या चित्रित झालेली काही गाणी" दाखवली होती. दहा की बारा गाणी होती. त्यामधे गोल्डीचं "होठो पे ऐसी बात" होतं. लेक्चर घेण्यासाठी टाईम्स ऑफ इंडियाचे चित्रपट समीक्षक आले होते. त्यांनी आणलेली डीव्हीडी बघून संपल्यावर त्यानी "यात कुठले गाणे हवे होते असं तुम्हाला वाटतं?" हा प्रश्न विचारला. आमच्या कोर्समधे कुणाचंच उत्तर बरोबर अथवा चूक नसतं. तरी त्यांना सर्वात जास्त आवडलेल्या उत्तराला ते कायम एक चॉकोलेट द्यायचे. मला तेव्हा पटकन आठवलं ते हेच गाणं. गाणं आठवलं म्हटलं की का आवडलं यावर असाईनमेंट लिहावी लागली होती. अर्थात मला चॉकोलेट मिळालं पण अजून एका मुलीचं उत्तरपण त्यांना तितकंच आवडल्याने ते तिच्याबरोबर शेअर करावं लागलं होतं.
५०च्या दशकाने भारतीय सिनेमाला एक भक्कम पाया दिला. आज उभी असणारी ही बिलियन डॉलर्सची इंडस्ट्री त्याच पायावर आहे. आणि हा पाया होता आजही आहे -- या सिनेमावर जीव तोडून प्रेम करणारा प्रेक्षक. भारतीय प्रेक्षक मनोरंजन म्हणून सिनेमा बघत नाही. हा सिनेमा त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आजही एकही भारतीय असा नसेल ज्याने दिवसाभरातून एकतरी सिनेमाची आठवण काढली नसेल किंवा एकतरी सिनेसंगीताची ओळ गुणगुणली नसेल. हिंदी सिनेमाची गाणी, त्यातले संवाद, त्यातले कलाकार हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक हिस्सा झाले आहेत. किंबहुना सिनेमाची आवड हेच भारतीयत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
कालमापनाच्या हिशोबाने शंभर वर्षं झाली असतील भारतीय सिनेमाला. पण आमचा सिनेमा अजूनही "अभी तो मै जवान हू" मोडमधेच आहे. आणि प्रेक्षकांसाठी तर अजून असे कित्येक प्रतिभेचे नमुने घेऊन येतच आहे.
मस्त लिहीलय ग
मस्त लिहीलय ग
मस्तं. माझंही अगदी आवडतं
मस्तं.
माझंही अगदी आवडतं गाणं. पण चित्रपट बोर होता. गाणी मात्र केवळ... केवळ..
म्हणताना देव सहज ग्लासवर टिचकी मारतो, जणू काही तिच्या नाकावरच टिचकी मारतोय. आणि त्याच वेळेला नूतन नाक उडवते. >> अगदी अगदी.
त्या मद्याच्या पेल्यातील नूतन इतकी प्रचंड सुरेख दिसते... कसले क्रियेटीव्ह होते ते
खूप सुंदर गाण्याची आणि
खूप सुंदर गाण्याची आणि तेवढ्याच सुंदर चित्रीकरणाची आठवण छान!
मस्तच लिहिलंयस गं. गाणं
मस्तच लिहिलंयस गं.
गाणं पुन्हा बघते आता. पिक्चर नीट आठवत नाहीये.
सहीच ....
सहीच ....
लेख छान आहे, थोडा लवकर
लेख छान आहे, थोडा लवकर संपवलास.
चित्रपटाच्या कथेत तितका दम नव्हता.. पण नूतन आणि देव आनंदला पाहण्यातच सिनेमा कधी संपला कळत नाही.
दिल का भंवर करे पुकार
दिल का भंवर करे पुकार >>+१..
मला पिक्चर माहीत नव्हतां. पण गाणं कदाचित रंगोली मध्ये एकलं होतं पण बोल आठवत नव्ह्ते फक्त कुतुब मिनारच्या त्या अरूंद पायर्या त्यावर देव आणि नुतन .. ह्यावरुन गाणं शोधलं होतं .. आजही मोबाईल मध्ये आहे.. घरी जाताना लहर आली की ऐकते.. धन्स....
छान लेख लिहिला आहे.. आईच्या
छान लेख लिहिला आहे..
आईच्या देवानंदप्रेमामुळे काही देवानंदपट बघणे झाले त्यातील हा एक हलकाफुलका चित्रपट, ज्यातून देवानंदला काढले तर बाकी शून्य..
कातिल यार ! कं लिवलय कं
कातिल यार !
कं लिवलय कं लिवलय... कुर्बान जावा !
मुळात जिलेबी आणि फाफडा दोघेही आवडायचे, पण खरं सांगू मला त्या जिलेबीपेक्षा फाफडाच जास्त आवडायचा
या स्पर्धेला टॉप १० वगैरे काही श्रेणी आहेत की नाही, माहीत नाही पण हा लेख माझ्या 'पहिल्या एकात' !
(अर्थात दक्षीच्या मताशी थोडाफार सहमत)
माझा आणि रविचा आवड्ता पिक्चर.
माझा आणि रविचा आवड्ता पिक्चर. हे गाणे तो कायम माझ्यासाठी म्हणत असे, तसेच दिल का भंवर पण. टॉप फेवरिट. छान लिहीले आहे. बक्षिस मिळेंगा.
मस्त...
मस्त...
छान लिहिलं आहेस नंदिनी, पण तू
छान लिहिलं आहेस नंदिनी, पण तू ह्याच क्षेत्रातली असल्यामुळे तुझ्याकडून अधिक बहारदार लेखाची अपेक्षा होती, ती पूर्ण नाही झाली हे असं स्पष्ट लिहिल्याबद्दल सॉरी!
(लेखात टायपो आहेत, त्या दुरुस्त करता आल्या तर पहा प्लिज.)
जेव्हा हॉलीवूड सिनेमा हा
जेव्हा हॉलीवूड सिनेमा हा जास्तीत जास्त वास्तव कसा करता येइल याचा विचार करत होतं. तेव्हा हिंदी सिनेमाने "ही फॅन्टसी आहे" हे मनोमन मान्य करून या फँटसीचे जाळे प्रेक्षकाभोवती विणायला सुरूवात केली. >>> करेक्ट अनॅलिसिस....
चांगला लेख...
आहाहा.. काय सिनेमा..काय तो
आहाहा.. काय सिनेमा..काय तो देखणा देवानंद.. किती गोड आणी चंचल नूतन..
नंतरच्या सिनेमांत 'रडकी' अशीच इमेज तयार झाली तिची.. सो सॅड!!
मला हा सिनेमा फार आवडला होता.
मला हा सिनेमा फार आवडला होता. त्यातही यातल्या एकापेक्षा एक सरस गाण्याची मोहीनी तर कायम आहे. या गाण्याच पिक्चरायझेशन सुरेख होतच. तसच ते 'तू कहाँ ये बता' मध्ये देवचं नुतनला शोधत फिरणं... आता हा सिनेमा पुन्हा पहावासा वाटतो. धन्यवाद नंदीनी !
लेख विस्कळीत वाटतोय मला.
लेख विस्कळीत वाटतोय मला. शेवटी तेरे घर के सामने बद्दलचं लिखाण व पहिले ४-५ पॅरे विसंगत वाटताहेत.
कमाल केलीस नंदिनी,मी हे आत्ता
कमाल केलीस नंदिनी,मी हे आत्ता वाचलं. किती वेगळंच अन सुंदर लिहिलं आहेस पण थोडं मनस्वीपणे, म्हणून विस्कळीत वाटतंय थोडं. खरं तर तुझ्याकाडे सांगण्यासारखं खूप आहे आणि धीर किंवा वेळ कमी. शुभेच्छा.
मस्त लेख!! मी गाणं फक्त ऐकलयं
मस्त लेख!! मी गाणं फक्त ऐकलयं आता इतक सुंदर वर्णन वाचुन कधी बघेन अस़ झालयं
माझा आवडता सिनेमा..आवडतं
माझा आवडता सिनेमा..आवडतं गाणं..
छान लिहलयस, नंदिनी!
सर्वाना प्रतिक्रियासाठी
सर्वाना प्रतिक्रियासाठी धन्यवाद. लेख बराचसा एडिट केलाय.
वाह ! सिनेमा मिसलाय
वाह !
सिनेमा मिसलाय दुर्दैवाने. पण लेख वाचताना गाणं डोळ्यासमोर जिवंत झालं. खूपच सुंदर !!
चांगलं लिहिलंय पण मला ते
चांगलं लिहिलंय पण मला ते "तू कहा,ये बता, इस नशिली रातमें, माने ना मेरा दिल दिवाना" हे गाणं आणि त्याचं पिक्चरायझेशन जास्त आवडतं.
मंजूडी, चिमण +१ "तेरे घर के
मंजूडी, चिमण +१
"तेरे घर के सामने" गाण्याबद्दल जे लिहीलं आहे ते अतिशय मस्त .. खुप आवडलं ..
पण गोल्डी आनंद आणि तेरे घर के सामने पर्यंत पोचायला बराच वेळ लागला .. किंबहुना शेवटून दुसरा आणि पहिलं बरचंसं टेक्स्ट अजून कमी केलं तर मूळ विषय ज्यावरचं लेखन अप्रतिम झालं आहे ते उठून दिसेल ..
आणि देवानंदसाठीच्या रफीच्या आवाजाची तारीफ झाली आहे पण "देखे" हे नूतन पेक्षा लताचं ना? जर लता चं असेल तर तिची तारीफ व्हायला हवी ..
मला नूतन "ओ निगाहें मस्ताना" मध्येही प्रचंड आवडली होती .. ते गाणं, देव-नूतन, किशोर- आशा (नुसत्या आलापातून), एस्. डी. चं संगीत .. सगळी भट्टी एकूण तुफान ..
"जुनी गाणी आवडत नाहीत" असं म्हणणार्या ए. आर् फॅन्स नी आर् डी बर्मन बरोबर त्यांच्या पिताश्रींची हीही गाणी कृपया ऐकावीत ..
सशल अनुमोदन, एस डींनी ज्या
सशल अनुमोदन, एस डींनी ज्या रचना आणि विविध वाद्यप्रकार वापरले आहेत त्याला तोड नाही. त्यामानाने रहमान रिपिटिटिव आहे.
छानच या सिनेमाला कथानक
छानच
या सिनेमाला कथानक म्हणावं असं फारसं नाही, पण जे काही आहे, त्याचं सादरीकरण फार सुंदर आहे. मुळात ही देव-नूतनची कहाणी नाहीच्चे, ही आहे त्या दोघांच्या भांडकुदळ वडिलांची.
पण, त्यातली गाणी...!!! काय बोलायचं त्यावर... सशलच्या शेवटच्या वाक्याला जोर्रदार्र अनुमोदन
इतका वेळ पाठीमागे चालू असलेली
इतका वेळ पाठीमागे चालू असलेली वाद्यं थांबतात आणि रफीचा आवाज घुमतो. मै भी कुछ बनाऊंगा तेरे घर के सामने. >> गाण्याचा क्लायमॅक्स आहे तो. अप्रतिम सुंदर!
होटोंपे ऐसी बात बद्दल तुझ्याकडून वाचायला नक्की आवडेल. झिंग आणणारी एसडीची चाल + लता असताना गाणं अप्रतिम आणि श्रवणीय बनणारच, तसे ते बनलेही आहे. वैजयंतीमाला, गोल्डी असताना त्याची प्रेक्षणीयता मात्र कमी पडलीये असंच वाटत आलय आजपर्यंत मला.
सिनेमाचा विषय आणि त्यावर तुझा लेख! चांगला असणारच, झालाय.
तेरे घर के सामने मधे कुतुब
तेरे घर के सामने मधे कुतुब मिनारच्या पायर्यांवरचं दिल का भंवर करे पुकार हे आजही क्लासिक गाणं आहे. कुतुब मिनारच्या त्या अरूंद पायर्या या काय रोमँटिक गाणं चित्रेत करायची जागा आहे का? पण गोल्डीने ते करून दाखवलय. <<<
वाईट्ट सहमत आहे
शम्मी आणि देव या दोघांवर जास्त काळ रूसून राहणं ही त्यांच्या अभिनेत्रीना अभिनयाची परिसीमा केल्यागत वाटत असेल. <<< खरे आहे
५०च्या दशकाने भारतीय सिनेमाला एक भक्कम पाया दिला. आज उभी असणारी ही बिलियन डॉलर्सची इंडस्ट्री त्याच पायावर आहे. आणि हा पाया होता आजही आहे -- या सिनेमावर जीव तोडून प्रेम करणारा प्रेक्षक. भारतीय प्रेक्षक मनोरंजन म्हणून सिनेमा बघत नाही. हा सिनेमा त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आजही एकही भारतीय असा नसेल ज्याने दिवसाभरातून एकतरी सिनेमाची आठवण काढली नसेल किंवा एकतरी सिनेसंगीताची ओळ गुणगुणली नसेल. हिंदी सिनेमाची गाणी, त्यातले संवाद, त्यातले कलाकार हे आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक हिस्सा झाले आहेत. किंबहुना सिनेमाची आवड हेच भारतीयत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.<<< पुन्हा वाईट सहमत
कालमापनाच्या हिशोबाने शंभर वर्षं झाली असतील भारतीय सिनेमाला. पण आमचा सिनेमा अजूनही "अभी तो मै जवान हू" मोडमधेच आहे. आणि प्रेक्षकांसाठी तर अजून असे कित्येक प्रतिभेचे नमुने घेऊन येतच आहे.<< उत्तम शेवट
लेख फार आवडला. माहितीही मिळाली. धन्यवाद व शुभेच्छा
-'बेफिकीर'!
अतिशय सुन्दर
अतिशय सुन्दर सिनेमा.....कितिही वेळा बघितला तरी पुन्हापुन्हा बघावासा वाटतो.....गाणी अवीट गोडीची...देव आणी नूतन जोडी तर मस्तच....
आहाहा.... सुंदर गाणं आणि
आहाहा.... सुंदर गाणं आणि त्यावर सुंदर लिखाण
हा सिनेमाच माझ्या विशेष जिव्हाळ्याचा कारण यात देवसाब 'आर्किटेक्ट' आहेत
आम्ही आर्किटेक्चर करत असताना मंगला टॉकिज मधे मॅटिनीला देवसाब, शम्मी यांचे जुने सिनेमे दाखवायचे.. तेव्हा हा सिनेमा लेक्चर्स ना बंक मारुन आम्ही ५ मैत्रिणींनी (फेमस फाईव्ह म्हणुन चिडवायचे आम्हाला...) लागोपाठ २ आठवड्यात २ वेळा बघितला
एक से एक गाणी, सुंदर नूतन आणि देखणे देवसाब....
चिमण + १.. पहिले काहि परिच्छेद थोडे झाटता आले तर पहा... सुंदर गाण्याला जास्त जस्टिस मिलु दे
स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!
सर्वाना धन्यवाद. थोडेफार
सर्वाना धन्यवाद.
थोडेफार एडिटिंग करून बघते आज. त्याआधी दुसरा एक लेख लिहिलाय तो प्रसिद्ध करते.
Pages