विषय क्रं २ - ' नायक नही ,खलनायक हूँ मै!!' प्राण ते विद्युत जामवाल

Submitted by वर्षू. on 21 August, 2012 - 01:51

कित्येक दशकांचा इतिहास पाठीशी असलेला हिंदी सिनेमा काळानुसार आपले
स्वरूप सतत बदलत राहिलाय. या सिनेमांतून दशकागणिक बदलत्या जाणार्‍या
खलनायका चा आढावा घेण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न आहे.
इथे मी फक्त आणी फक्त (हाडाचे)'खलनायक' म्हणूनच प्रसिद्ध झालेल्या
कलाकारांबद्दल लिहित आहे.
तसे पाहिले तर नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून अनेक कलाकार,
नायिका,नायक झळकले आहेत. पण तूर्तास त्यांचा उल्लेख इथे टाळत आहे.
हिन्दी सिनेमात नायक नायिके च्या खालोखाल खलनायकाचे स्थान ध्रुवाप्रमाणे अढळ आहे.
१९५०-६० च्या दशकातले खलनायक हमखास पत्थरदिलाच्या जमीनदाराच्या भूमिकेत
, गरीब शेतकर्‍यांना कर्जफेडीसाठी पिढ्यान्पिढ्या त्यांना गुलामगिरीत
अडकवून ठेवणे, तर कधी त्यांच्या पोरीबाळींवर वाईट नजर ठेवून
असणे,त्यांच्या जमिनी खोटे कागदपत्र करून लुबाडणे इ.इ. दुष्कृत्ये करणारे
झालंच तर घरातीलच कोणी वाईट नातेवाईक - "जायदाद" वर नजर असलेले हे असत, मग ६०- ७० च्या दशकात स्मगलर्स, डाकू आले. त्यानंतर मात्र बहुतांश व्हिलन्स हे भ्रष्ट देशद्रोही नेते बनून आपल्या
स्वार्थाकरता देशाची गुपिते, आपल्या दुश्मन देशाला विकण्याची कारस्थाने
करताना दिसू लागले.
एक मात्र आहे कुठल्याही काळात ,कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिका
असल्या तरी खलनायकाने आपले मूलभूत गुण कधीही सोडले नाहीत. तो श्रीमंत
उद्योगपती, उच्चभ्रू खानदानी असो नाहीतर झोपडपट्टीत राहणारा गुंड,
माफिया असो तो नेहमीच अविचारी,क्रोधी, अनैतिक्,लोभी, असाच असावा लागतो.
पूर्वीच्या काळी बहुतांश सिनेमांच्या शेवटी खलनायका ची शेवट त्याच्या
मृत्यूनेच होत असे. जीवनाच्या अखेरच्या क्षणी त्याला आपल्या पापकर्मांची
जाणीव होऊन तो मरता मरता सर्वांची माफी मागून सदगतीला प्राप्त होई.
खलनायका चा असा शेवट घडवून आणण्यात निर्मात्याचा उद्देश, सिनेमागृहातून
बाहेर पडणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर ' सत्याचा असत्यावर
विजय' हा संस्कार बिंबवणे हाच असावा..
इथे १९४८ पासून हिंदी सिनेमाच्या कारगिर्दीत एक खलनायक म्हणूनच पदार्पण
करून पुढच्या पाच दशकापर्यन्त अविरत काम करणार्‍या महाखलनायकाचा ,'प्राण'
चा उल्लेख केल्याशिवाय पुढली जंत्री सुरुच करता येणार नाही.

pran01_0.jpg

खरंतर देशविभाजनापूर्वीच्या काळात लाहोर ला परिवारासोबत राहणार्‍या 'प्राण' चं छायाचित्रकार बनण्याचं साधंसुधं स्वप्न होतं. एकदा तो मित्रांबरोबर रस्त्याकडच्या पानपट्टी च्या दुकानात पान खात उभा होता. त्याच्या पान खाण्याच्या स्टाईल ने लेखक,' वली मुहम्मद वली' ना इतकं प्रभावित केलं कि त्यांनी सरळ त्याला पंजाबी सिनेमात काम करण्याची ऑफर दिली. अभावितपण आलेल्या या संधीचा प्राण ने भरपूर उपयोग करुन घेतला.देशाची फाळणी झाल्यावर प्राण ने उण्यापुर्‍या हिन्दी ,पंजाबी अश्या २२ सिनेमातून काम करून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी बरोबर घेऊन, बॉलीवूड ची मक्का ,'मुंबई' कडे प्रस्थान केले.इथे सुरुवातीला काम मिळवण्यास त्याला बरेच कष्ट पडले. कधी खायला पुरेसे नाही तर कधी लोकल च्या तिकिटापुरते पैसे नाहीत, असे पुष्कळ महिने हालात काढल्यावर त्याला बॉम्बे टॉकीज निर्मीत ,' जिद्दी' मिळाला . यात देव आनंद नायक होता. त्या ब्रेक नंतर मात्र प्राण ने कधीच मागे वळून पाहिले नाही .
१९५०-६० च्या काळात 'प्राण' पडद्यावर आला कि संपूर्ण सिनेमागृहात
शांतता हायची.. श्वास रोखून धरण्याची प्रात्यक्षिके व्ह्यायची..आपोआपच!!
पडद्यावरील प्राण च्या एक भुवई उंचावलेल्या,एका बारीक केलेल्या
डोळ्याच्या तीक्ष्णभेदी तिरक्या नजरेला नजर द्यायची ,प्रेक्षकांची टाप
होत नसे.त्याच्या सिगरेट ओढण्याच्या 'त्या' वेगवेगळ्या अदा,कधीच विसरल्या
जाणार नाहीत. प्राण चा खलनायकाच्या रुपात प्रेक्षकांवर इतका वचक बसला होता कि पुढची कित्येक वर्षं लोकांनी आपल्या मुलांचं नाव,'प्राण' ठेवल्याचं ऐकिवात नाही!!
'गब्बर' च्या आगमनापूर्वी लहान मुलांना झोपवण्याकरता त्यांच्या
माता बहुतेक 'प्राण' च्या नावाचा उपयोग करीत असाव्यात ,अशी माझी खात्री
आहे.
मधुमती,राम और शाम ,दिल दिया दर्द लिया अश्या अनेक चित्रपटांमधून
केलेल्या अप्रतिम विलनगिरीबद्दल प्राण ला ' विलन ऑफ द मिलेनियम' चा
अवॉर्ड देण्यात आला होता तो काही उगाचच नाही.
प्रत्येक भूमिकेनुसार चालणे,बोलणे,हावभाव ,लूक्स बदलण्याकडे प्राण स्वतः
काळजीपूर्वक लक्ष देत असे. अश्या अभ्यासपूर्ण वृत्तीमुळेच 'जिस देश मे
गंगा बहती है' चा राका,'नन्हा फरिश्ता' मधील खूँखार डाकू,शम्मी कपूर
च्या जवळ जवळ प्रत्येक सिनेमातला सुटाबुटातला ,खानदानी श्रीमंत,उर्मट
,रुबाबदार खलनायक, जंजीर मधला 'शेरखान' पठाण सारख्या दमदार भूमिका,इतकच नव्हे तर किशोर कुमारच्या 'हाफ टिकट' मधे प्राणने विनोदी खलनायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पोटभर हसायला लावले आहे. या आणी अजून अनेक भूमिका त्याच्या अभिनयातील विविध पैलूंमुळे अजरामर झाल्या आहेत.

थोडक्यात या काळात दिलीप कुमार्,राज कपूर, देव आनंद, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र , जॉय मुखर्जी असे एकानंतर एक हीरो येत गेले ,पण खलनायक 'प्राण'च राहिला.

सिक्स्टीज च्या दशकात प्राणविना चित्रपट आठवायचा माझा प्रयत्न सपशेल फसला की!!

प्राण च्या खालोखाल आपल्या खलनायकी चा ठसा उठवण्यात मदन पुरी , रहमान
कन्हैयालाल, के एन सिंह, शेख मुख्तार, याकूब, तिवारी, शाम कुमार, जीवन,
अजीत,सी एस दुबे बरेच यशस्वी झाले.

Madan Puri (1).JPG

अमरीश पुरी चा मोठा भाऊ 'मदन पुरी' ची ही त्याकाळी पुष्कळ चलती होती. त्याच्या ४०
वर्षांच्या कार्यकाळात , घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे
निभावल्या आहेत.

'आई मिलन की बेला' , 'मिस्टर एक्स' ,हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,
जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक
भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि
तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा
नाही ,मात्र 'गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा
मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा!!

Rehman_0.jpg

याउलट अफगाणिस्तान च्या कुणा पठाणी राजाचा वंशज असलेला 'रहमान' हा
खानदानी , परिष्कृत, सौजन्यशील ,सभ्य खलनायक वाटायचा. नकारात्मक भूमिकेत
आला तरी त्याच्या चेहर्‍यावरचे भाव सौम्यच असत.कृत्रिम नाटकीयतेचा
लवलेश ही नसलेला त्याचा अभिनय अगदी सहज आणी नॅचरल होता म्हणूनच आधिक
प्रभावी वाटायचा. त्याच्याबद्दल तिरस्कार वाटण्याऐवजी त्याच्याबद्दल
भीतीयुक्त जरब वाटायची.
'दुल्हन एक रात की ' मधे नायिकेचा विनयभंग करणारा 'रंजीत' ,' मेरे हमदम
मेरे दोस्त' मधे सतत नायक नायिके ला एकमेकांपासून वेगळे करण्याच्या
कारवाया करणारा 'अजित', वक्त मधला 'चिनाय सेठ'
साहब बीबी और गुलाम मधला ' बाटली, बाई मधे बुडून गेलेला रईस नवाब' अश्या
अनेक भूमिकांमधे रहमान शोभून दिसला.

kanhaiyalal_0.jpg

यापैकी कन्हैयालाल चे नाव मला कित्येक दिवस 'लाला'च आहे असं वाटत असे.
त्याच्या बहुतेक सिनेमांमधून त्याने लबाड,लोभी,गरीब कर्जदारांचा छळ
करणारा सावकार साकार केला आहे. मदर इंडिया मधे तर त्याने 'गरीब,मजबूर
,लाचार मातेला बेअब्रू करणारा ,'लाला' इतका प्रभावीपणे साकारलाय कि
त्याच्याबद्दल मनात घृणा, तिरस्कार असले भाव काठोकाठ भरून येतात.

manmohan.jpg

तसाच मनमोहन, अगदी 'हाडाचा' खलनायक!! तेंव्हा मनमोहन म्हंजे बलात्कार
,चक्क असाच सरळ सरळ अर्थ डोक्यात भरलेला होता.त्याची 'आराधना' मधली,
शर्मिला कडे पाहणारी अर्थलोलुप नजर , त्याचे ओठ तिरके मुडपून लाडिक बोलणे
पडदा भेदून आपल्यापर्यन्त पोचते तेंव्हा शर्मिला बरोबर आम्हा
मैत्रीणींचाही थरकाप उडालेला आठवतोय.
मनमोहन च्या बरोबरीने तस्साच थरकाप उडवणारा 'सी एस दुबे'

cs dube_0.png
या फोटोत सी एस दुबे बरोबर तरुण ,' विजू खोटे' ,'जीने की राह' या सिनेमातील एका दृष्यात दिसत आहेत.

सी एस दुबे जी का क्या कहना!!!
अरे देवा!!! हा माणूस आपल्याला रस्त्यावर साधं चालतानासुद्धा कधीच भेटू
नयेसा वाटणारा!!
वाटायचं याच्या कब्ज्यात मुली आल्या कि त्यांची रवानगी हा सरळ
'कोठ्यावर' करणार !! याव्यतिरिक्त हा माणूस काही करतच नाही याची खात्रीच
वाटायची.मौसम,रोटी कपडा और मकान, जिंदा दिल व्यतिरिक्त जवळ जवळ तीनशे
सिनेमांमधे जवळपास एकसारख्याच भूमिका दुबेंना मिळाल्या. त्याचा चेहरा ,'
मुलींचा दलाल' या कॅटेगिरीत एकदम रिअलेस्टिक दिसत असावा.

k n singh.jpg

यांच्या मानाने के एन सिंह बराच 'सोज्वळ' वाटे. जन्मताच 'विलन' चं रुपडं
घेऊन आलेल्या के एन ला, भूमिकांनुसार हेअर स्टाईल, मेकप वगैरे बदलण्याची
कधी गरजच भासली नाही ,नुसते कपडे बदलले की झालं, असं त्याला वाटत
असावं!!
'जीवन'चं ही तसंच!! त्याचं अनुनासिक बोलणं त्याची स्टाईल बनलं. मग भूमिका
कोणतीही असो.त्याच्या अभिनयात,ठळकपणे त्याने फारसं काही वेगळं केलेलं
दिसून आलेलं नसलं तरी त्याचे हावभाव आवडायचे ,क्वचित विनोदीही वाटायचा.
'अमर ,अकबर,अँथनी' आणी 'लावारिस' मधलं त्याचं काम चक्कं आवडलंही होतं.

ajit_0.jpg

खलनायकांमधे 'अजित'चं नाव बरंच वरच्या स्थानावर आहे. याने ही
भूमिकांनुसार गेटप,अभिनय,संवाद बोलण्याची लकब असं कधीच बदलेलंल ठळकपणे
लक्षात येत नाही. पण त्याचा चेहरा,भारदस्त व्यक्तीमत्व, वेडीवाकडी तोंडं
न करणं, चेहर्‍यावरचे भाव विशेष न बदलणं,या जमेच्या बाजू होत्या
नक्की!!!त्याच्या आवाज न चढवता बोलण्यानेही समोरच्यावर जरब बसे. अजीत
मुळे 'डॉन चे अड्डे' , तोंडात स्टायलिश पाईप धरून धूम्रपान करणे' इ.
प्रॉप्स प्रसिद्धी पावले. 'कालीचरण' मधली 'लायन' ची भूमिका त्याच्या
कारकिर्दीत प्रचंड महत्वाची ठरली आणी या भूमिकेचा ठसा त्याच्या
नंतरच्या भूमिकांमधून कायम राहिला.पुढे 'यादों की बारात' मधल्या 'शाकाल'
आणी जंजीर मधल्या ,'सेठ धरम दयाल उर्फ तेजा' च्या भूमिकेमधे तो चमकला. या
दोन सुपर हिट सिनेमांच्या भरघोस यशामुळे 'अजीत'' ला रातोरात सुपर
खलनायक म्हणून प्रसिद्धी मिळाली.

prem choda_0.jpg

' प्रेम चोपडा' या सर्वांपेक्षा जरासा वेगळा वाटला. भूमिकेनुसार तो
थोड्याफार संवादफेकी च्या लकबी, गेटप्स बदलायचा ,पण आवाजातील चढउतारांवर
त्याने जास्त लक्ष केंद्रित केले नाही. त्याचा भार त्याच्या वाटेला
आलेल्या डायलॉग्स मधे वारंवार येणार्‍या एखाद्या वाक्यावर असे. त्यापैकी
'बॉबी' मधला हा तकियाकलाम ,' प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा' फारच
गाजला.
खूप उत्तम प्रतीचा अभिनय नसला तरी त्याचा तो गुळगुळीत रादर तेलकट चेहरा
खलनायकाच्या चौकटीत फिट्टं बसायचा .
प्रेम चोपडा बद्दल एक आठवण इथे नमूद करावीशी वाटते. राजेश खन्ना चा नवीन
सिनेमा 'कटी पतंग' नुकताच पाहून झाला होता. काही दिवसांनी मी आणी माझा
भाऊ मुंबई च्या 'न्यू एक्सेल्सेअर' मधे 'डे ऑफ द जेकॉल'चा ६ ते ९ चा शो
पाहून बाहेर पडत होतो, तोच समोर पॅसेज मधे प्रेम चोपडा दिसला. तो पुढचा
शो पाहायला आलेल्यांच्या गर्दीत एका बेंचवजा खुर्चीवर शांतपणे इकडेतिकडे
पाहात बसला होता. पण त्याला पाहताच मी झटकन भावाच्या पाठीमागे लपले आणी
त्याला (मोठ्याने) कुजबुजत म्हणाले,' त.. त.. तो बघ प्रेम चोपडा समोर्,
एकतर रात्रीची वेळ....तू प्लीज त्याच्याकडे न पाहता सरळ चाल आणी मला नीट
पाठीशी घे, चल, चल, भराभरा बाहेर पड'.. इतक्या वर्षांनंतरही भाऊ या
गोष्टीवरून फिरकी घेण्याची एकही संधी चुकवत नाही.. आज मलाच माझी ही
रिअ‍ॅक्शन आठवून प्रचंड हसू येतं ,पण 'रात्रीच्या (अ)वेळी अचानकपणे प्रेम
चोपडा ला पाहून तंतरली होती खरं!!!

premnath_0.jpg

प्रेम चोपडाप्रमाणे, 'प्रेमनाथ' याचे खलनायकाच्या भूमिकेतले हावभाव पाहून
ही शिसारी उत्पन्न व्ह्यायची. त्यांना पडद्यावर पाहून प्रेक्षकांना असं
वाटणं ,हेच एका प्रकारे त्यांच्या अभिनयाला मिळालेलं प्रशस्तीपत्रच
म्हणावं लागेल!!
'जॉनी मेरा नाम' मधला कामातूर 'रायसाब' , तीसरी मंजिल मधला 'कुँवर' ,
बरसात मधला बेभरवशाचा प्रेमी' या आणी अश्या अनेक भूमिका प्रेमनाथ ने
सहजपणे निभावल्या आहेत, मात्र त्याला खलनायक म्हणून कधी ही अवॉर्ड मिळू
शकले नाही त्या ऐवजी 'रोटी ,कपडा और मकान,अमीर गरीब,बॉबी,शोर अश्या
चित्रपटांतून त्याच्या भूमिका अत्यंत गाजल्या आणी "उत्तम सहकलाकार" या
श्रेणीत त्याचे नाव मनोनीत करण्यात आले होते.

सत्तर-ऐंशी च्या दशकात निळू फुले, अमजदखान्,रुपेशकुमार, रंजीत्,अमरीश
पुरी, परेश रावल, कादरखान, शक्ती कपूर्,गुलशन ग्रोवर, सदाशिव
अमरापूरकर,अनुपम खेर, डॅनी डेन्झोंपा इ. चा प्रवेश झाला.

nilu fule_0.jpg

निळू फुले हे पेश्याने बाग फुलवत असले तरी , त्यांच्या हृदयात फक्त कला
आणी कलाच फुलत असे.
त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास ' कथा अकलेच्या कांद्याची' या
लोकनाट्यापासून सुरु झाला . मराठी व हिन्दी चित्रपट, लोकनाट्ये, मराठी
नाटकं इ. मिळून जवळ जवळ अडीचशे कलाकृतीं निळू फुलें यांच्या दमदार
अभिनयाने नटलेल्या आहेत. त्यांची हडकुळी शरीरयष्टी, एक खांदा झुकवून,
पोक काढून चालण्याची पद्धत , खरखरता आवाज ,देहबोलीत ठासून भरलेलं
अकृत्रिम रांगडेपण ,चेहर्‍यावर भाव साळसूद असले तरी निस्तेज डोळ्यांतून
ओसंडणारी लोभी वृती ,लबाडी , पडद्यावर सशक्त खलनायक उभा करायला पुरेशी
होती. 'सारांश' मधला सत्तालोलूप,भ्रष्ट नेता'गजानन चित्रे' ची भूमिका
नीळू फुलेंशिवाय कुणीही इतक्या प्रभावीपणे करूच शकले नसते ,तर 'सौ दिन
सास के' चित्रपटात सासूच्या संपत्तीवर डोळा ठेवणारा लब्बाड,कारस्थानी
जावई 'खूबचंद' उर्फ लल्ला जी , नीळूभाऊंनी काय सुंदर रीतीने साकारलाय!!!
खलनायका च्या भूमिकेत निळू फुले पडद्यावर अवतरले आणी प्रेक्षकांच्या
मनात एक अनामिक भीती,तिरस्कार हे भाव उत्पन्न झाले नाही त, असं कधीच
घडलं नसेल.

amrish.jpg

अमरीश पुरी यांनी स्टेज कलाकार म्हणून नांव कमवलं होतं .पुढे
त्यांनी हिन्दी सिनेमात प्रवेश केला आणी एक खलनायक म्हणून प्रसिद्ध
झाले. दणदणीत आवाज आणी जबरदस्त पर्सनॅलिटी मुळे मिस्टर इंडिया मधे ते
अमरीश पुरी न वाटता'मोगँबो' च वाटले. 'बादशाह सिनेमातील 'सूरजसिंह
थापर' , कोयला मधील 'राजा साब' आणी 'गदर' मधे नायिके चा पिता ,' मेयर
अशरफ अली' या भूमिकांनी त्या त्या वर्षी त्यांना 'सर्वश्रेष्ठ' खलनायकाचे
पारितोषिके मिळवून दिली होती.

Amjad-Khan.jpg

या दशकात 'अमजद खान' च्या एंट्री ने मात्र सिनेप्रेक्षकांना अक्षरश:
अचंबित करून सोडले. 'शोले' या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी ,
सहृदयतेचा लवलेशही नसणारा , कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने
पडद्यावर असा जिवंत केला कि तो पहिल्याच सिनेमानंतर खलनायकांच्या श्रेणीत
अत्यंत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला.
प्राण जसा शम्मी कपूर च्या प्रत्येक सिनेमात खलनायक म्हणून दिसला ,तस्साच
अमजद खान, अमिताभ चा 'प्राण' बनला. त्याने वीस वर्षांच्या कारकिर्दीत
जवळ जवळ १३० सिनेमांतून अप्रतिम अभिनय केला.अमजद खान चं नाव
सिनेमाप्रेमींच्या मनातून कधीच पुसले जाणार नाही.

gulshan-grover-300x234.jpg

भूमिकेनुसार चाल,संवादफेकीची लकब, गेटप्स बदलणे ही प्राणची खासियत.
'गुलशन ग्रोवर' ने प्राणच्या या खासियतेपासून प्रेरणा घेतली आणी तो ही
प्रयत्नपूर्वक आपल्या भूमिकांनुसार ,वेगवेगळ्या रुपात पडद्यावर आला.
रामलखन मधला,' केसरिया विलायती' हा बॅड मॅन,हेराफेरी मधला ,'कबीरा'
,गँगस्टर मधला,'खानभाई' ,कर्ज मधला,'सर जूडा', 'सर' मधला छप्पन टिकली इ.
भूमिका लोकप्रिय होण्याचे श्रेय त्याच्या अभिनयाबरोबर गेटप्सनाही दिले
जाते.
गुलशनच्या तोंडून पडलेले ,' गन्ना चूसके', पंजाब मे ऐसा होता है? पंजाब
मे ऐसा नही होता है", 'बॅड मॅन' ,
असे 'डायलाक्स' लोकं आपसात बोलतानाही वापरायचे.

Collage-1.jpg

८०- ९० च्या दशकात पारंपारिक खलनायकाने, विनोदी खलनायकाचे रूप घेऊन
पाहिले. या आचरट विनोदी खलनायकांमधे कादर खान आणी शक्ती कपूर आघाडीवर
होते. विनोदी खलनायकाला नावाजणारे प्रेक्षक कमीच असतील अशी आशा करु या!!!
गुलशन ग्रोवर प्रमाणेच शक्ती कपूर ला ही 'तकिया कलाम' भारी प्रिय
होते.'सोमडी मे कोंबडी' ,"आ>>ऊ लोलिता" असली काही निरर्थक वाक्यं ,शक्ती
ची सिग्नेचर वाक्यं ठरली होती.
शक्ती कपूर ने अनेक सिनेमांमधून कादर खान च्या बरोबरीने विनोदी
खलनायकाच्या भूमिका केल्या.त्याने साकारलेला'अंदाज अपना अपना' मधला
'क्राईम मास्टर गोगा' , 'चालबाज' मधला ,'बलमा' प्रेक्षकांना हसवून गेला
होता. चालबाज मधे त्याने म्हटलेले हे वाक्य ,' मै एक
छोटासा,नन्हासा,प्यारासा बच्चा हूँ' ,त्या काळातले दर्शक विसरणं शक्यच
नाही.
त्यामानाने कादर खान हा एक बहुमुखी प्रतिभासंपन्न कलाकार म्हणून नावारुपाला आला.
मूलतः संवाद लेखक म्हणून कादर ने पदार्पण केले . 'रोटी' ,अमर अकबर
अँथनी, लावारिस,शराबी,कुली,मुकद्दर का सिकन्दर ,मिस्टर
नटवरलाल,हम,अग्नीपथ,सत्ते पे सत्ता ,धरमवीर्,सल्तनत, कुली नंबर
वन,हिम्मतवाला, सरफरोश अश्या अनेक गाजलेल्या सिनेमांकरता संवाद लिहून
हिन्दी सिनेसृष्टीत भक्कमपणे पाय रोवले. केवळ इथेच न थांबता त्याने जवळ
जवळ तीनशे सिनेमांमधून सहकलाकार, खलनायक,सहखलनायक, चरित्र अभिनेता
,विनोदी कलाकार, पाहुणा कलाकार च्या रुपात शेकडो भूमिकांमधून आपल्या
अभिनयाचे नाणे सिद्ध केले.
दर्शकांनी कादर ला सर्वात जास्त विनोदी खलनायकाच्या रुपात पसंत केले.
विनोदी खलनायका च्या भूमिकेत वाखाणण्यासारखे अजून दोन कलाकार म्हणजे
परेश रावल आणी अनुपम खेर. या दोघांपैकी परेश रावल माझा जास्त आवडता..
'सर' मधल्या त्याच्या,' वेलजीभाई' च्या अविस्मरणीय भूमिकेने त्याला
सर्वश्रेष्ट खलनायकाचे पारितोषिक मिळवून दिले. त्याची किंचित गुजराथी टच
असलेली संवाद शैली,उत्तम अभिनय या गुणांमुळे परेश लोकप्रिय झाला.
हलक्याफुलक्या विनोदी खलनायकाच्या भूमिकेतून त्याने हळूच विनोदी भूमिकेत
प्रवेश केला आणी तिथेही बाजी मारली. 'आवारा पागल दीवाना, हेराफेरी,
भूलभुलैया, मालामाल वीकली ते अगदी अलीकडचे ,' ओ माय गॉड' , 'फरारी की
सवारी' इ. शंभरेक सिनेमे त्याच्या सशक्त ,सहज अभिनयप्रतिभे ची ग्वाहीच
देतात.
याउलट अनुपम खेर , मला खलनायकाच्या रुपात कधीच आवडला नाही.. त्यातून
'चालबाज' मधला 'त्रिभुवन', 'कर्मामधला,'डॉक्टर मायकल डँग' , 'रामलखन
मधील, माधुरी चे पिताश्री 'देवधर शास्त्री' आणी 'दिल का डॉक्टर' मधला
डॉक्टर , या भूमिका अनुपम खेर सारख्या श्रेष्ठ अभिनेत्याने का बरं
स्वीकारल्या असाव्यात याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. ' सारांश' मधे
केवळ २८ वर्षं वय असताना, तरूण पोरगा गमावलेल्या एका रिटायर्ड वृद्ध
पित्याची ची भूमिका , अत्यंत समर्थपणाने पेलणार्‍या अनुपम ने यापुढे
असल्या विनोदी खलनायकाच्या भूमिका अजीबात स्वीकारू नये असं तो कधी भेटला
प्रत्यक्ष तर खणखणीतपणे सांगणारे त्याला!!!!

Danny.jpg

या सुमारास सिक्कीम मधून आलेल्या हँडसम डॅनी ने ,सुदृढ देहयष्टी, आगळा चेहरा मोहरा,चांगला अभिनय इ. गुणांच्या जोरावर खलनायकांच्या यादीत पटकन आपली जागा सुरक्षित केली.
भारतीय सेनेत भर्ती व्ह्यायचे ,डॅनी चे मूळ स्वप्न बाजूला पडून त्याने पुण्याला ,'भारतीय टेलीविजन आणी फिल्म संस्थान' या संस्थेत प्रवेश घेतला. मेहनतीने हिंदी भाषा शिकला. आपल्या बारीक पण तीक्ष्ण डोळ्यांचा वापर करून, राकट,रापलेल्या चेहर्‍यावर ,खुनशी,निर्दयी, बेदरकार हावभाव आणणे डॅनीला सहज जमत असे.
अमिताभ च्या 'अग्नीपथ' चा 'कांचा चीना' , डॅनीच्या अभिनयाने तर सजला होताच याशिवाय त्याने वापरलेले एविएटर गॉगल्स आणी त्याच्या जेल लावलेले केसांमुळे फॅशनेबल ही दिसला होता.
याव्यतिरिक्त 'मेरे अपने' मधला'संजू'हा सडकछाप मवाली, 'धुंध' मधला अपंग पण निष्ठूर ,भीतीदायक पती,
'हम' मधला अमिताभ चा शत्रू 'बख्तावर' , क्रांतीवीर मधला,नायिकेच्या आईवडिलांचा निर्घृणपणे खून करणारा' चतुर सिंग चीता' , विजयपथ मधला खूनी 'दिलावर सिंह' ,घातक मधला निरंकुश्,अत्याचारी 'कात्या' ,बरसात मधला भ्रष्ट पोलीस कमिशनर्,'ए सी पी नेगी' , इ.त्याच्या भूमिका ,प्रेक्षकांना अतिशय आवडल्या होत्या .या भूमिकांच्या आधारावर त्या त्या वर्षी डॅनी चे नाव 'सर्वश्रेष्ठ खलनायक' या श्रेणीत मनोनीत करण्यात आले होते.

८० च्या दशकातील खलनायकांची यादी ,' गणेश कुमार नरोडे' (..म्हणजे आपला'
सदाशिव अमरापूरकर' हो!!!) च्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही.

sada.jpg

मराठी सिनेमातून झळकल्यावर , बॉलीवूड च्या मेन स्ट्रीम मधे प्रवेश करून
सदाशिव अमरापूरकर ने इथेही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने खलनायकांच्या
रांगेत वरचे स्थान पटकावले. ,१९८४ साली प्रदर्शित झालेल्या 'अर्धसत्य'
मधे तो रामा शेट्टीच्या भूमिकेत अतिशय प्रभावशाली दिसला , त्यावर्षी आणी
,१९९१ साली 'सडक' मधे 'महारानी' ची आगळी भूमिका वठवून तो सर्वश्रेष्ठ
खलनायका चे पारितोषक घेऊन गेला. त्याला 'कालचक्र' , 'इश्क' इ.
सिनेमांमधूनही खलनायकाच्या रुपात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय आँखें, कुली
नंबर वन, आँटी नंबर वन, छोटे सरकार इ. सिनेमांमधून त्याने विनोदी भूमिका
करण्याची हौस यशस्वीरित्या भागवून घेतली.
रंजीत हा खलनायक .. आसपास दोनशे सिनेमांतून काम करूनही अतिशय सामान्य
अभिनयामुळे रंजीत ने दर्शकांवर काही फारसा प्रभाव पाडला नाही. तो कायमच
फक्त एक बिघडलेला मुलगा वाटला.

.१९९०-२००० च्या दरम्यान नाना पाटेकर ,मिलिंद गुणाजी यासारख्या गुणी
कलाकारांचे वेगळ्याच पार्श्वभूमीवर आगमन झाले. यापैकी नाना, खलनायका
पेक्षा सहनायकाच्या भूमिकेत आधिक सफल झाला तर मिलिंद ला 'फरेब' आणी
'विरासत' या दोनच सिनेमांमधून आपल्या खलनायकीची चुणूक दाखवायला मिळाली .

खलनायकांबद्दल लिहिताना या गोष्टीकडे ही लक्ष गेलं कि सिनेसृष्टीत
खलनायक म्हणून प्रवेश केलेले विनोद खन्ना आणी शत्रुघ्न सिन्हा पुढे नायक
म्हणून जास्त लोकप्रिय झाले ,तर अजीत, डॅनी, किरणकुमार , प्रेमनाथ सारखे
नायक म्हणून अवतरले तरी पुढे खलनायक म्हणूनच प्रसिद्धी पावले.
संजय दत्त्,आमिर,शाहरुख ,सैफ अली सारखे नायक मात्र नकारात्मक भूमिकेत
विशेष लोकप्रियता मिळवू शकले नाहीत तर 'कुलभूषण खरबंदा' याच्या खात्यात '
शान' सिनेमातील 'शाकाल' ही एकमेव भूमिका जमा झाली. पुढे कुलभूषण चरित्र
अभिनेता म्हणूनच पुढे आला.

चालू दशकातील 'विद्युत जामवाल (फोर्स) आणी 'सोनू सूद ' हे दोन खलनायक
प्रॉमिसिंग वाटतात.
यांना पाहून खलनायक ही आकर्षक ,रुबाबदार दिसू शकतो याची खात्री पटली आणी
कोणत्याही ऑब्वियस अ‍ॅक्शन्स किंवा हावभाव न करता मनातील वाईट हेतू,विचार
प्रदर्शित करता येतात हे त्यांनी त्यांच्या सशक्त अभिनयातून दाखवून दिले
आहे.

Sonu-Sood_5.jpg

तामिळ,तेलुगु,पंजाबी चित्रपटांमधून यशस्वी कामे केलेल्या ,'सोनू सूद'
ला हिंदी सिनेमात आपली इमेज निर्माण करायला तेव्हढंस सोपं गेलं नाही.
'युवा', 'जोधा अकबर', 'एक विवाह ऐसा भी' ,सिंग इज किंग या सिनेमांमुळे
त्याला ओळख मिळाली.

vidyut_0.jpg

मात्र 'विद्युत जामवाल' हे आत्तापर्यन्त अगदीच अनोळखी असलेलं नाव २०११
मधे विपुल शहा निर्मित ' फोर्स' मधे विजेसारखं लखलखलं आणी सर्वश्रेष्ठ
डेब्यु मेल' चं अवॉर्ड घेऊन गेलं .
'फोर्स' सिनेमाचा नायक ,'जॉन अब्राहम' च्या विरोधात तितक्याच ताकदीने
समोर उभा राहू शकणार्‍या तरुण खलनायकाचा शोध चालू असता , आलेल्या ५००
उमेदवारांमधून 'विद्युत' ची निवड करण्यात आली होती.
त्याची कमावलेली शरीरयष्टी , त्याचे मार्शल आर्ट चे कसब, त्याचा
आकर्षक चेहरा इ.गुण परिक्षकांना प्रभावित करण्यास पुरेसे होते. याशिवाय
काही दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याचा आणी मॉडेलिंग करण्याचा अल्पसा
अनुभव ही त्याच्या जमेला होता.
याच सुमारास टॉलीवूड मधे दिग्दर्शक, निर्माता आणी अभिनेता अश्या विविध
रुपात गाजलेला' प्रकाश राज ' नेही बॉलीवूड मधे प्रवेश केला. त्याला
पाहून तो मोगांबो,गब्बर ,डॉक्टर डँग यांचं रिक्त स्थान भरू शकेल अशी
आशाही काही फिल्म जर्नलिस्ट्सना वाटत आहे. २००९ मधे सलमान च्या 'दबंग'
मधे 'गनी भाई' या अंडरवर्ल्ड च्या भाई च्या भूमिकेत प्रकाशराज
प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. २०११ मधे अजय देवगन च्या 'सिंघम' च्या
भरघोस यशाचा काही वाटा , 'सर्वश्रेष्ठ खलनायक' या अवॉर्ड च्या रुपाने
प्रकाशराजच्या पदरात ही पडला . त्यातील 'जयवंत शिर्के' ची भूमिका त्याने
अप्रतिमपणे साकारली. आपला चेहरा गंभीर, सौम्य ठेवून ,केवळ आपल्या
डोळ्यांतून खुनशीपणा सांडत म्हटलेले वाक्य,' आता माझी सटकेल'.. ऐकून
समोरच्याला त्याच्या क्रूरतेची, जालिमपणाची पूरेपूर खात्रीच पटावी. फक्त
क्रूर खलनायक म्हणूनच नव्हे तर ' बुढ्ढा होगा तेरा बाप' मधील त्याची
'कबीर भाई' ही विनोदी खलनायकाची भूमिका ही प्रेक्षकांचे मन जिंकून गेली.

हिंदी सिनेमातून दाखवली जाणारी खलनायिका मात्र अत्याचारी काकू/मामी ,
खाष्ट सासू, कारस्थानी नणंद, लबाड वहिनी , स्वार्थी वहिनी अश्या बांधील
भूमिकांतूनच अडकून राहिली. तिच्याकरता यापेक्षा आव्हानात्मक विषय अजून
तरी पाहण्यात आलेला नाही. नाही म्हणायला खलनायकाच्या प्रेमात पडून
,त्याच्या दुष्कृत्यात साथ देणारी, त्याच्या तालावर नाचणारी, कधी कधी
नायकाच्या प्रेमात पडून शेवटी त्याच्यासाठी जीव देऊन ,नायिकेचा मार्ग
खुला करून देणारी खलनायिका ही पाहायला मिळालीये म्हणा..
या यादीत ललिता पवार्,शशीकला,श्यामा, नादिरा,मनोरमा,हेलन्,बिंदू,फरियाल
यांच्याबरोबर अरुणा ईरानी, पद्मा खन्ना यांची नांवे ही सामिल करता येतील.

Lalita_Pawar_(1916—1998)_0.jpg

खलनायिकांमधे 'ललिता पवार' मला सर्वात जास्त प्रभावी वाटते. एका
सिनेमाकरता तिच्या सहकलाकाराने तिला थोबाडीत मारण्याचे दृष्य होते.
शूटिंग करताना त्याने भान न राखता तिच्या चेहर्‍यावर इतक्या जोराने चपराक
मारली कि तिचा डावा डोळा निकामी झाला. या दुर्दैवी अपघातामुळे तिला
नायिके ऐवजी खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या आणी ती या क्षेत्रात
प्रमाणाबाहेर यशस्वी झाली. 'नील कमल', 'सौ दिन सास के' इ. सिनेमांमधून
सासू च्या भूमिकेत 'ललिता पवार' ने कमाल केली आहे. त्या काळात नवीन लग्न
झालेल्या पोरी ,आपल्या सासू आणी नणंदेला ,अनुक्रमे ललिता पवार आणी शशीकला
ही 'विशेषणे' बिनदिक्कत लावत !!!
शशीकला पुष्कळश्या सिनेमातून नकारात्मक भूमिकांमधे दिसली, त्यापैकी मला
ती ,'नील कमल ' मधे वहिनी विरुद्ध आई चे,भावाचे कान भरणार्‍या
नणंदेच्या रुपात , स्वामी सिनेमात गिरीश कर्नाड च्या सावत्र आई च्या
भूमिकेत आवडली होती.
एक ललिता पवार सोडल्यास वर नमूद केलेल्या इतर नावांमधे सेंट परसेंट
खलनायिका अशी आढळून आली नाही.
हा आढावा घेताना खलनायिकेची या दशकात उणीव जाणवली. किंबहुना आताशा
नायिकाच कधीकधी खलनायिकाच्या भूमिका करतात म्हणून ही कदाचित ही पोकळी
निर्माण झाली असेल. यांना खलनायिका म्हणण्यापेक्षा नकारात्मक भूमिका सादर
करणार्‍या आभिनेत्री ही संज्ञा जास्त पटते.

या लेखाचा शेवट करताना हीच आशा करतेय कि नवीन पिढीतूनही पुन्हा एकदा
एक तरी 'प्राण' , एक अजून ,'ललिता पवार' खलनायक ,खलनायिकांच्या नामावलीत
सामिल व्हावी !!!
आणी हो!! या लेखातील सर्व प्रकाशचित्रे, अंतरजालावरून साभार!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खलनायकांची आठवण ठेवलीस तू वर्षूतै Lol

लेख मस्त झालाय. मला आहे असाच आवडला. प्राणबद्दल तर एकदम सही !!
आणि खलनायकांमधले बदल थोडक्यात पण नेमके टिपलेत.

सकाळीच सकाळी का या दुष्ट माणसांची नावे वाचायला लावलीस ग्ग.. Sad

प्राण - १०० टक्के सहमत.. आमच्या जमान्याचा व्हिलन नसला तरी या क्षेत्रातील तो बाप माणूस.. परत तसा होणे नाही.. अमिताभबरोबर मजबूर मधील त्याचा मायकल माझे फेवरेट कॅरेक्टर..

शक्ती कपूर आणि कादर खान हे आचरट विनोदी होते हे कबूल.. पण त्याचबरोबर ते एक प्रकारचा हलकटपणा ही कथानकाच्या गरजेनुसार दाखवायचे हे ही नाकारता येत नाही.. गुलशन ग्रोवरलाही जोडा यात..

आजकाल व्हिल्लन बदललेत हे खरे.. अमुक तमुक हा व्हिल्लनच हा शिक्का हल्ली मारता येत नाही..

धावता आढावा उत्तम आहे, शाहरुखच्या डर-अंजाम-बाजिगर चा उल्लेख हवा होता. तसेच 'शक' मधला उत्पल दत्त, 'संघर्ष' आणि 'दुष्मन' मधला आशुतोष राणा हे हिंदी सिनेमातले रेअर मनोरुग्ण व्हिलन! 'लाल पत्थर' मधली हेमामालिनी हे तर अत्यंत दुर्मिळ ग्रे शेड्स मधले पात्र.
पूर्वीच्या काळी बहुतांश सिनेमांच्या शेवटी खलनायका ची शेवट त्याच्या मृत्यूनेच होत असे.>>> असचं काही नाही, बर्‍याचदा त्याला पोलिसच पकडून न्यायचे, हिरोने कायदा हातात घेतला असं दाखवायचे नाहीत (तसेही विश्वजीत, जॉय मुखर्जी अन राजेंद्रकुमार काहीच हातात घ्यायच्या क्षमतेचे नव्हते!). व्हिलनने शेवटी 'हो सके तो मुझे माफ कर देना' असेही म्हटलेले जुने सिनेमे आहेत.

छान लिहिलय !
फक्त अभिषेक म्हणाला तस "दिल गार्ड्न गार्ड्न हो गया ला" थोडा जास्त स्कोप मिळायला हवा होता अस माझ मत . विनोदी खलनायकापासून ते १६ डिसेंबरच्या कोल्ड ब्लडेड पाकिस्तानी खलनायकापर्यंत सगळे रोल ताकदीने निभावलेयत त्याने . चित्रपट संपल्यावरही तो लक्षात राहतो हे महत्वाच .

वर्षू, धावता आढावा छान जमलाय.
पुर्वी नायक म्हणजे सदगुणाचा पुतळा आणि खलनायक म्हणजे दुर्गुणांचा अर्क असे समीकरण असायचे.
पण काही नायकानीच नकारात्मक भुमिका करुन, हा समज खोटा ठरवला.

किस्मत ( अशोक कुमार ), पाकेटमार (धर्मेंद्र ) अशी काही उदाहरणे.

काही अभिनेत्यांवर आणि अभिनेत्रींवर असा खलत्वाचा शिक्का बसल्याने, त्यांच्या या इमेजचा फायदा घेत काही छान चित्रपट आले.

इत्तेफाक मधे नंदावर कधी संशयच घेता येत नाही. गुमराह मधे शशिकला खरं तर खलनायिका नसते पण तिच्यामूळे वाममार्गाला लागलेली नायिका, माला सिन्हा, नायिका बनून जाते. आणि ज्वेल थीफ मधे, खलनायक
शेवटपर्यंत लक्षात येत नाही. तिसरी मंझिल मधे पण तसेच.

लाल पत्थर मधे, हेमामालिनीने खलनायिका रंगवली होती, तर पुकार मधे माधुरीने.

तू उल्लेख केलेला, जामवाल अजून बघितलाच नाही मी !

किरण, अभिषेक, केदार.. राहिलेत काही अजून यादीत..
आगाऊ.. माझ्या नोट्समधलंच बरच काही सुटून गेलं लिहिताना..
mind was going faster than the hand i guess..
एडिटिंग का सहारा अभी बाकी है दोस्त!! Happy

छान आढावा घेतलाय......

आपल्या भारतीय सिनेमात कायमच ढोबळ खलनायक / खलनायिका दाखवले आहेत...... पण त्यातील सूक्ष्म छटा फारच क्वचित दाखवल्या गेल्या.....

असे काही अभारतीय सिनेमे आहेत ज्यात कोणाला खलनायक म्हणायचे असा प्रश्नच पडतो प्रेक्षकांना...

कालच विद्युत बद्दल मी एका धाग्यावर लिहिलेले...........:).
प्राण साहेबांच्या बाबती असे म्हणतात की त्यांचा व्हीलन इतका प्रचंड लोकमानसा मधे रुजलेला की लोकांनी आपल्या मुलांचे नाव "प्राण" ठेवणे बंद केलेले.......ते अजुन ही आहेच Wink
.
छान लेख आहे

वर्षूदी.. राहिलेली नावे तर जोडशीलच.. पण अजून एक मुद्दा आठवला.. बघ पटतोय का.. मधल्या काळात या व्हिल्लन लोकांची नावेही खास असायची.. जसे की मोगँबो, शाकाल, अजितचा लायन.. वगैरे वगैरे..
मराठी मध्ये तर महेश कोठारेच्या फिल्म मध्ये टकलू हैवान, कवट्या महाकाल, तात्या विंचू आणि कुबड्या खवीस असली भारी भारी नावे असायची.. Proud

लेख थोडका झालाय एकदम.. घाई घाईत उरकल्यासारखा वाटला.
सविस्तर लिहिता आला असता अजून.
बाकी पुर्वीचे खलनायक आणि आत्ताचे खलनायक यांची कंपॅरिझन होऊ शकत नाही. कारण त्यांचा अभिनयावर भर होता, सध्या सगळा भर स्टाईल आणि बॉडी बिल्डिंगवर आहे. त्यामुळे अभिनय डळमळतो...

उदयन अनुमोदन.
आमच्या इथे कोल्हापूरला अशिक्षित बायका हिंदी सिनेमा पाहताना कोणत्याही अत्याचाराचं दृष्य आलं की खलनायकाला 'मुडदा बसवला याचा' वगैरे अशा शिव्या घालत. ती एक दाद आहे त्या लोकांच्या अभिनयाला.

थोडक्यात चांगला आढावा घेतलाय.

काही सिनेमात पूर्णतः नसला तरी अंशतः विनोदी खलनायक
प्रेमनाथने रंगविला होता.
(अर्थात, त्याने शक्तीकपूर, कादर खान सारखा आचरटपणा केला नव्हता. )

याच संदर्भाने परेश रावलचा उल्लेख आवश्यक वाटतो.

आमच्या इथे कोल्हापूरला अशिक्षित बायका हिंदी सिनेमा पाहताना कोणत्याही अत्याचाराचं दृष्य आलं की खलनायकाला 'मुडदा बसवला याचा' वगैरे अशा शिव्या घालत >> Lol अगदी अगदी दक्षिणा. मीपण पाहिलंय हे.
वर्षुतै, लेख छान. अजून वाढवा ना.

>>त्याला आपल्या पापकर्मांची जाणीव होऊन तो मरता मरता सर्वांची माफी मागून सदगतीला प्राप्त होतो>>>>
झकास तात्पर्य :))

धावता आढावा छान आहे.
निगेटिव्ह छटा असलेला रोल म्हणजे खलनायक/खलनायिका असे म्हणायचं असेल तर बरेच जण राहून गेले आहेत. काजोलने गुप्त मध्ये असा रोल उत्तम केला आहे!

वर्षू
छान लिहिलंस गं.
प्राणबद्दल अगदी सहमत!
थोडं अजून लिही ना.
हा विद्युत जामवाल पाहिला नाही अजून तरी.
आता जरा आणखी नीट वाचून नीट कमेंट उद्या करते(च)!

वर्षु, मस्त आढावा घेतला आहेस. जुन्या खलनायकापासुन ते सध्याच्या सोनुपर्यंतच्या खलनायकांचा. प्राणची फॅन मी पण गं. हल्ली खलनायक आणि हिरो यामधली रेषा बर्‍याच वेळा किती पुसट झालेली असते. तु म्हणालीस तसं प्रेक्षकांना सदगुणांचा विजय दाखवण्यासाठी पुर्वी खलनायकाला मरावं लागायचं. हल्ली हिरो आणि खलनायक यात किंचितसा फरक असल्यामुळे खलनायक फक्त पश्चाताप करुन सुटु शकतो. Happy आठवा आठवा इम्रान हश्मीचे सिनेमे. Wink शिवाय सत्या, कंपनी, अंधा कानुन, Wednesday, अगदी हल्लीचा 'तेझ'.

मला तर किती तरी वेळा हिरो आवडला तरी खलनायकाची पण दया येते. त्याच्याकडे थोडासा सॉफ्ट कॉर्नर असतो. कितीतरी खलनायकांना माझी सहानुभुती मिळाल्यामुळे माझ्या आईला माझ्याबद्दल काळजीच वाटायला लागली होती. उदा. ओरिजिनल रामायण बघताना, (सतत अश्रु डबडबलेले डोळे असणार्‍या) रामापेक्षा मला त्रिवेदींचा खलनायक रावणच आवडला होता. ' श्री (राम) मत कहो उसे' असे ते ओरडले कि कसं शहारे यायचे. शाळेच्या दोन रिक्षा समांतर जाताना एक रिक्षा ओरडायची 'जय श्रीराम' आणि दुसर्‍या रिक्षातली मुलं ओरडायची ' जय लंकेश ! ' मला आपलं लंकेशच्या रिक्षात असलं कि असं शक्तीमान वगैरे वाटायचं. आणि टीवीवरचं महाभारत बघताना - दुर्योधनाचे हर्ट टोनमधले डायलॉग्ज ऐकताना त्याच्याच बद्दल सहानुभुती वाटली होती. मेणचट पांडवांच्या तुलनेत मॅनली दिसणारा दुर्योधनच भाव मारुन गेला. खलनायक असला तरी मला त्याची बाजुच बरोबर वाटते. ( हा एक नविन बाफचा विषय झाला Wink )

वर्षु, जरा गुंडाळलंस गं. लिही की थोडं अजुन. खलनायिकेंविषयी तर फार लिहिलंच नाहीएस. माझा वरचा पॅरा वाचल्यावर माझ्यावरच काही तरी लिहावंसं वाटत नाही ना? Happy

वर्षु, नायक /नायिकांबद्दल सगळेच लिहीतात्.बहुतेक छान्-छान च लिहीले जाते.पण खलनायक आणि त्यांचे विविध दुर्गुण आठवुन लिहीणे किती कठिण ??हे सगळं तू मस्त लिहीलेस ..पण धावते लिखाण असल्यासारखे जाणवले.तरीपण खुप आवडले.
प्राण,रणजित,प्रेमनाथ,जीवन असे काही कायमचा ठसा उमटवणारे दुर्गुणी पण हवे-हवेसे वाटणारे अभिनेते त्यांच्या बहारदार अभिनयामुळे सिनेमाची रंगत वाढवतात आणि आजही तितक्याच उत्कटतेने आठवले जातात.अजरामर आहेत हे सर्व च खलनायक/खलनायिका.
रावण होता म्हणुनच रामाचे सामर्थ्य कळले ना !!!गुण-दुर्गुण,चांगले -वाईट,सुंदर-कुरुप ,नीती-अनीती याची ओळख या महानुभवांमुळेच झाली.

मनिमाऊ Lol

खलनायकाची खास आठवण ठेवावीशी वाटणं हे सगळ्यात मोठ्ठं वैशिष्ट्य आहे या लेखाचं...:)
पण मला त्या खलनायकांची खूप भिती वाट्टते गं..;)

ताऊ,
आढावा जबरी, आणि व्हिलन्सवर लिहीण्याच्या कल्पनेलाच सलाम, धमाल आयडिया आहे ही
प्राण सारखा ग्रेसफुल व्हिलन होणे नाही Happy
अजून डिटेलिंग ३१ ऑ च्या आत कर पट्टकन..

मने Lol
भारीच पोस्ट!
दुर्योधनाच्या वाक्याला तर घसघशीत अनुमोदन Wink

वर्षू धावता आढावा आवडला !
यात मला आवडलेले पण तुझ्या लेखात न आलेले काही जबरद्स्त ताकदीचे कलाकार राहुन गेलेत.
एक 'तक्षक' मधली राहुल बोसची भुमिका, तसेच 'शौर्य' मधली केके मेननची भुमिका ! अर्थात राहुलच्या वाट्याला परत खलनायकी भुमिका आल्या नाहीत, पण केकेने मात्र काही चित्रपटात केल्या खलभुमिका. आणखी एक असाच एकाच चित्रपटात ठसुन गेलेला खलनायक म्हणजे 'प्रसाद पुरंदरे' (जॅकी श्रॉफ आणि मनिषा कोइरालाचा चित्रपट होता, नाव आता आठवत नाही. नंतर 'अबतक ५६' मध्ये पण तोच खलनायक होता पण त्या पात्रात 'वो दम नही था! )

आणि 'प्रेम नाम है मेरा..प्रेम चोप्रा!' ला कसे काय विसरलीस? कुलभुषण खरबंदापण राहून गेलाय Happy
'वक्त'चा नायकापेक्षाही देखणा खलनायक 'रहमान'ला कोण विसरू शकेल?
छल, वैसा भी होता है सारख्या चित्रपटातुन अजुन एक समर्थ खलनायक इंडस्ट्रीला मिळाला होता,'प्रशांत नारायण' ! पण कुणी गॉडफादर नसल्याने तो तेवढा टिकु शकला नाही.

विकु विसरले नाही रे.. प्रेमाला कसं बरं विसरेन, Proud .. घाईघाईने पोस्ट केल्तं.. आता आरामात डीईईईटेल मधे लिहित आहे..
आगावा.. डिलिजंटली वर्किंग ऑन इट..

Pages