विषय क्र. १. मैं बाबूराव गणपतराव आपटे ...
मैं बाबूराव गणपतराव आपटे ...
लेखाचा विषय जर अजून लक्षात आला नसेल तर कृपया आपला वेळ ह्या लेख वाचनात वाया घालवण्यापेक्षा जाऊन ‘हेराफेरी’ हा सिनेमा बघावा. हेराफेरी कोणता जुना का नवा असा बावळट प्रश्न विचारू नये. जुना की नवा असा प्रश्न ‘देवदास’ बद्दल विचारला तर मी समजू शकते. दोघेही प्रचंड ताकदीचे कलाकार – दिलीपकुमार आणि शाहरुख खान. कोणता बघावा? “कादंबरीस धरून” हा निकष लावून तुम्ही देवदास प्रश्न सोडवू शकता. पण जेव्हा मूळ साहित्यकृती आधारास नाही तेव्हा चित्रपट कोणत्या निकषावर बघावा? निखळ आनंद ह्या एवढ्याच उद्देशाला धरून काढलेले ‘हेराफेरी’ दोन असतील- विनोद खन्नाचा जुना आणि अक्षयकुमारचा नवा. पण ज्यावर स्पर्धेसाठी लेख लिहावा असा ‘हेराफेरी’ एकच – नवा अक्षयकुमारचा ‘हेराफेरी’! पण हल्ली घडयाळाशी सतत स्पर्धा करणाऱ्या आम्हाला अख्ख्या सिनेमाबद्दल न लिहायला वेळ न वाचायला. म्हणून इथे फक्त बाबूराव विषयी लिहिणार.
वितरीत झाल्यापासून पुढे ४ वर्षात मी हेराफेरी मोजून ७ वेळा पहिला ... मग पुढे मी मोजणे बंद केले. कारण ‘यू टयूब’ आली. आता मी हेराफेरीचे प्रसंग बघू लागले. तब्बू-असरानीला वगळून हा सिनेमा बघता येतो, शांतपणाने घरात कुणाला न उठवता आपल्या आपल्या वैयक्तिक संगणकावर (लॅपटॉप) वर – ह्या पेक्षा कुठलंही जास्त व्यक्तिस्वातंत्र्य मी त्या वयात मागितलं नव्हतं. बाबूराव साकारला परेश रावलने, इतका सहज इतका स्वाभाविक की मी आज पर्यंत त्याची मौखिक चाचणी (ऑडीशन) ज्या कोणी घेतली असेल त्या दिग्दर्शकाचे (कास्टिंग डायरेक्टरचे) हजार वेळा आभार मानते. परेश रावल यांनी ‘सरदार’ ‘तमन्ना’ ह्या सारख्या चित्रपटांमध्ये मध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलेच होते. ‘अंदाज अपना अपना’ मध्येही परेश रावलने विनोदी भूमिका केली होती पण बाबूरावची जातकुळीच काही वेगळी. हेराफेरी पूर्वी ‘बाबूराव’ जणू बिन चेहऱ्याचे सामान्यनाम होते. हे बाबूराव आपल्याला कधी गल्लीत कधी वाड्यात कुठे न कुठे भेटलेले असतात. त्यांचे आयुष्य इतके सपक पण कष्टाचे की आपण कल्पना ही करू शकत नाही ह्यात कधी कुठले नाट्य घडू शकते. ह्या बाबूरावला चेहरा दिला तो परेश रावल यांनी.
ह्या बाबूरावची देहबोली परेश रावल यांनी अचूक टिपली. हात कोपरात वाकलेले, कमरेचा कणा काहीसा झुकलेला पण मराठी बाणा कुठे ही न सुटलेला. अगदी सुरुवातीच्या ‘कुत्र्या, साल्या देखके नंबर डायल कर’ पासून ते शेवटच्या ‘मराठी माणसा जागा हो’ पर्यंत. बाबूरावच्या हिंदीला मराठी शब्दांचीच नाही तर मराठी अॅक्सेंटची (मराठी विश्वकोशात ह्याला मराठी प्रतिशब्द सापडेल काय?) चरचरीत फोडणी असते. सुरुवातीच्याच प्रसंगात जेव्हा बाबूराव शामला सांगतो –“तुम पेहला नक्की करो तुम्हारा समस्या क्या है – नाव, नौकरी की घर” तेव्हाच त्याच्यामधल्या मराठीपणाशी आपले नाते जुळते. गरिबीने गांजलेला बाबूराव बहुतेकवेळा दाढीही करत नाही. ह्या बाबूरावचे डोळे जाड भिंगाच्या चष्म्यामागे लपलेले. पण ‘खंबा’ म्हणाल्यावर ते जाड भिंग ही लकाकते इतका अप्रतिम परेश रावलचा अभिनय. तमाम बाबूरावां प्रमाणेच परेश रावल यांचा बाबूराव ही मळलेला गंजीफ्रॉक, कळकट धोतर, आतमध्ये जानवं आणि चट्टेपट्टे असलेली चड्डी घालतो. दोन तरुण नायकांसोबत विविध पोशाख घालून ‘देनेवाला जब भी देता’ म्हणून नाचणारा बाबूराव आकर्षक नसला तरी तिथे भाव खाऊन जातो.
अक्षयकुमार उर्फ राजूचा विनोद डांबिसपणातून आलेला, सुनील शेट्टीचा उर्फ शामचा विनोद काहीसा अगतिकतेतून आलेला तर बाबूरावचा विनोद त्याच्या भोळसरपणातून आलेला. चष्मिस माणस चोर नसतात ह्या बाबूरावच्या समजुतीला हसावे का कपाळाला हात लावावा हे समजत नाही. ‘विहीर खोल असली तर काय आत जाऊन थोडी अंघोळ करायचीये, बदलीने पाणी काढून इथेच वर अंघोळ कर’ हे सांगणारा बाबूरावचा विनोद महान! तब्बू येते तेव्हा 'ओळख पाळख नाही उचलू कशी' किंवा बाथरूमला कडी नाही आतून लावायला हे सांगितल्यावर 'तिथे काय खजिना आहे' असे इरसाल उत्तर देणारा बाबूरावचा विनोद कधी अश्लील होत नाही. नीरज वोरा यांना ह्या बाबूरावच्या संवादासाठी शाबाशकी कधी कोणी दिलीये का?? विहिरीला आतून बाहेरून वॉलपेपर लावणारा, खडकसिंगला समजावताना 'पैसा परसो है ना' म्हणणारा बाबूराव... कधीही कुठूनही कितीही 'टेन्शन' घेऊन आलात तरी बाबूरावचा विनोद कायम रिझवतो.
जसं मुन्ना-सर्कीटच्या जोडी मध्ये सर्कीट नसेल तर मुन्नाभाई ही फिका वाटेल, तसंच राजू, शाम आणि बाबूभैय्या ह्यांचे त्रिकूट एकमेकांशिवाय धमाल आणू शकत नाही. पुढे हेराफेरी भाग दोन उर्फ ‘फिर हेराफेरी’ आला. त्यातही बाबूराव होता पण भट्टी काही जमली नाही. आता म्हणे ‘हेराफेरी ४’ येणार आहे. (कारण भाग ३ हेराफेरीची हेराफेरी झाली असे ऐकीवात आहे.) त्यातही बाबूराव असणार आहे. पण अफवा आहे की परेश रावल ऐवजी नाना पाटेकर बाबूराव होणार आहे. नाना पाटेकरने ‘राजू बन गया...’ मध्ये विनोदी भूमिका केली आहे त्यावरून वाटते की हा ही बाबूराव प्रेक्षणीय होईल. पण कुठेतरी हेही वाटते की उगीच कशाला बदलताय!! तसे आम्ही सिनेरसिकांनी बरेच बदल पचवले आहेत.... बदलेला बाबूराव ही पचवू...
************************************
(ता.क. असा कळकट पण प्रेमळ आणि विनोदी बाबूराव तुम्ही कधी कुठे प्रत्यक्षात पहिला नसला तरी बिघडत नाही ‘दिल दर्या बाकी सब समंदर’ अशा परिस्थितीतून जो गेला आहे त्या प्रत्येकाच्या दिलात बाबूराव गणपतराव आपटे असतोच, नाही का?)
छान लेख मलाहि हासिनेमा आणि
छान लेख मलाहि हासिनेमा आणि परेश रावल आवडला होता टि.व्हिवर लागला कि मि पुन्हा पुन्हा पाहते. हा आम्ही सह कुट्म्ब म्हणजे आम्ही दोघ,आमचे कन्यारत्न, होणारा जावई, त्याचे आईवडिल,भाउ बहिण बेगुसरायला(बिहरमधील गाव) होटेलमधे डिव्हिडी आणुन पाहिला होता.आडनाव म्हणजे काय हे त्या नॉर्थच्या लोकाना पुणेरी हिंदित शिवाजि शहाजि भोसले, बाळगंगाधर टिळक अस मि समजाउन सांगत होते
बाबुरावनी हे काम जास्त सोप केल.मुलीच लग्न जमण्यातला बाबुराव एक महत्वाचा साक्षिदार. तुमच्या लेखामुळे आठवणीना उजाळा मिळाला.
नीरज वोरा यांना ह्या
नीरज वोरा यांना ह्या बाबूरावच्या संवादासाठी शाबाशकी कधी कोणी दिलीये का?? >> हेराफेरीच्या सिली विनोदाचे यश वोरा चे सुद्धा आहे.
एक एक वाक्य एव्हढे चपखल बसलय कि बस्स.
हा सिनेमा माझ्या निवडक दहात
हा सिनेमा माझ्या निवडक दहात आहे
लेख आवडला .. पण प्रस्तावना
लेख आवडला .. पण प्रस्तावना थोडी लांबल्यागत वाटली .. मुंबईकर, पुणेकर, मुंबई, पुणे, चित्रपट रसिकता ह्यावरचं विवेचन थोडं जास्त झालं असंही वाटलं लेखाच्या मूळ विषयापेक्षा ..
परेश रावळ चा अभिनय वन ऑफ द बेस्ट नक्कीच बाबुराव गणपतराव आपटे पण "बाबूरावचा विनोद पूर्णपणे त्याच्या भोळसरपणातून आलेला" ह्याबद्दल मात्र मी सहमत नाही .. म्हणजे तसं इन्टेन्शन असेल लेखकाचं, दिग्दर्शकाचं पण परेश रावळ च्या अभिनयात मात्र ते उतरलं नाही असं मला वाटतं ..
थन्क्स सशल, सम्पादन करेन...
थन्क्स सशल, सम्पादन करेन...
या बाबूरावने परेश रावलकडून
या बाबूरावने परेश रावलकडून बर्याच अपेक्षा वाढवल्या... आणि परेश रावलनेही त्याच्या पुढच्या चित्रपटांत या अपेक्षांना खरे उतरायला बरेच एक सो एक रोल केले.. पण तरी ही मी त्याचा एकही रोल या कॅरेक्टरच्या आसपास गेलेला बघू शकलो नाही.. अर्थात ही त्या बाबूरावचीच जादू..
चित्रपटांत एक कॅरेक्टर असे भन्नाट असेल तर आजूबाजुचेही त्याला आपल्या मर्यादा सांभाळत तोडीस तोड साथ देतात याचा अनुभव अक्षय आणि सुनिल शेट्टी यांचा अभिनय पाहताना आला..
अवांतर - सशलशी सहमत.. जमल्यास नक्की संपादन करा..
मराठी वाटेल असे पात्र सादर
मराठी वाटेल असे पात्र सादर करण्यात परेश रावल नक्कीच यशस्वी झाला आहे. पण मला असे वाटते की सरधोपट कुठलेही नाव + आडनाव मग ते मराठी असले म्हणजे झाले ते त्या पात्राला लावायचे आणि मग हो जाओ शुरु असा काही तरी प्रकार झाला असावा. वेष, भाषा ही त्या नावाला साजेशी असावी किंवा नाव त्या वेषभूषेला साजेसे असावे असा फारसा विचार झालेला नाही. मराठी संस्कृतीची परिचय असता किंवा तसे असणार्या कुणाचा सल्ला घेतला असता तर बाबूराव आपटे हे नाव ह्या पात्राकरता साफ विसंगत आहे असे दिग्दर्शकाच्या सहज लक्षात आले असते. पण तेवढी मेहनत बॉलिवूडवाले घेत नसावेत.
माझे तरी असेच मत आहे की हे नाव अगदी चुकीचे निवडले आहे.
अर्थात मराठी नाव असलेले पात्र मराठीमिश्रित हिंदी बोलते इतपत दाखवले हीही प्रगतीच आहे. पूर्वी तेही होत नव्हते. उदा. तेजाब मधे अनिल कपूर मराठी असतो (मुन्ना देशमुख) पण मराठीपण नावालाही नाही. सन्नी देवल अर्जुन वेलणकर नामक पात्र सादर करतो. मराठीपणा औषधालाही नाही.
वास्तव मधला संजय दत्त वगैरे वगैरे.
>> मराठी संस्कृतीची परिचय
>> मराठी संस्कृतीची परिचय असता किंवा तसे असणार्या कुणाचा सल्ला घेतला असता तर बाबूराव आपटे हे नाव ह्या पात्राकरता साफ विसंगत आहे असे दिग्दर्शकाच्या सहज लक्षात आले असते
ह्याबद्दल +१
पण मराठी नाव + आडनाव असलं तर मराठीपणा का असायलाच हवा? अर्थात मग मराठी वाटेल असं नाव तरी का हवं हा प्रश्न आहेच ..
>>मराठी संस्कृतीची परिचय असता
>>मराठी संस्कृतीची परिचय असता किंवा तसे असणार्या कुणाचा सल्ला घेतला असता तर बाबूराव आपटे हे नाव ह्या पात्राकरता साफ विसंगत आहे असे दिग्दर्शकाच्या सहज लक्षात आले असते. पण तेवढी मेहनत बॉलिवूडवाले घेत नसावेत. <<
आँ? मराठी संस्कृतीचा, बाबूराव आपटे हे नांव पात्राकरता विसंगत आहे; याचा संबंध काय? हे नांव त्या पात्राकरता अगदि चपखल बसलं आहे. असाच एक कळकट, खांडके बिल्डिंगमधला आपटे पाहिलेला आहे. कदाचीत त्याच्यावरुनच प्रियदर्शनला हे पात्र सुचलं असावं...
मस्त लेख.... आवडला ! या
मस्त लेख....
आवडला !
या चित्रपटाचा खरा हिरो माझ्यामते परेश रावलच होता. नाही म्हणायला ५-१० मिनीटाच्या छोट्याश्या भुमिकेत ओम पुरीचा सरदारही भाव खाऊन गेला
मस्त लिहिलंय 'आँखे'
मस्त लिहिलंय
'आँखे' सिनेम्यातला हसवता हसवता रडवणारा परेश रावळ तर दी बेस्ट! अतुलनीय!!
आणि हेराफेरीच नव्हे तर 'जुदाई' हाही सिनेमा केवळ परेश रावळसाठीच माझा ऑल टाईम फेवरेट सिनेमा आहे.
>>तब्बू-असरानीला वगळून हा
>>तब्बू-असरानीला वगळून हा सिनेमा बघता येतो,>>
छान लेख. तब्बूला वगळता येतं पण असरानीचे काही प्रसंग मस्त आहेत. श्याम त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पत्र खाऊन टाकतो तो प्रसंग किंवा बसस्टॉपवरचा 'मै मॅनेजर हूं, मॅनेजर' हा प्रसंग.
पुण्या-मुंबईबद्दलच्या
पुण्या-मुंबईबद्दलच्या वाक्यांनी उगीच भरकटवलं... बाकी लेख छान.
मस्त !!
मस्त !!
हेराफेरी माझाही ऑल टाईम
हेराफेरी माझाही ऑल टाईम फेवरिट, कधीही पहा कुठूनही पहा, निखळ आनंद!
लेख वाचतानाही त्यातले प्रसंग आठवून हसू आलेच!
परेश रावल महान आहे. इतके मस्त मराठीपण फक्त कमलहसनच्या 'लक्ष्मी गोडबोले' मधे दिसले.
बसस्टॉपवरचा 'मै मॅनेजर हूं, मॅनेजर' हा प्रसंग.>>> अनुमोदन! आणी त्यापुढचा संवादही 'पता है आजकल तुम लोगों को भी इज्ज्तसे बुलाना पडता है!!!'
संपादित लेख वाचल्यामुळे
संपादित लेख वाचल्यामुळे पुण्या-मुंबईचा उल्लेख कुठे दिसला नाही. पण इतर लेख छान जमलाय. मला पण आवडला परेश रावलचा अभिनय हेराफेरीमध्ये ......
अफलातुन आहे हा बाबुराव.
अफलातुन आहे हा बाबुराव. हेराफेरी मी फक्त परेश रावलसाठी कधीही बघु शकते.
लेख छान.
संपूर्ण जमलेली भट्टी असेच या
संपूर्ण जमलेली भट्टी असेच या चित्रपटाचे वर्णन करता येईल - आमच्या घरात सगळ्यांचा प्रचंड आवडता सिनेमा...
लेख सुंदरच जमलाय...
मला आवडला होता परेश पण ओम
मला आवडला होता परेश पण ओम पुरीही तितकाच आवडला होता.
नावात थोडा घोळ आहे. सहसा आपटे आडनावाची माणसे बाबुराव नसतात. आपटे आडनावाची माणसे, तो उद्योग करत नाहीत. पण हे काही त्याचे दोष नाहीत.
छान लेख. हेराफेरी माझाही ऑल
छान लेख.
हेराफेरी माझाही ऑल टाइम फेवरेट !
"उठाले उठाले" वर अजूनही कधीही हसतो आम्ही.
लेख छान आहे..... शुभेच्छा
लेख छान आहे..... शुभेच्छा
mast lihilay shubhechcha.
mast lihilay
shubhechcha.
लेख छान लिहिलाय. परेश रावलने
लेख छान लिहिलाय.
परेश रावलने सिनेमात खूप मजा आणली इतकं नक्की.
राहतो प्रश्न ’आपटे’ या आडनांवाचा; तर परेश रावलने सिनेमात उभा केलेला चाळीतला मध्यमवयीन मराठी माणूस खूपसा बरोबर वाटला, तरी तो ’आपटे’ वाटला नाही. अर्थात, हा दोष त्याचा नसून दिग्दर्शकाचा असावा असं वाटतं.
असो .... हा सिनेमा धमाल होता इतकं नक्की.
---------------------------------------------------------------------------------------------------------
दिनेशदा,
'बाबूराव' आणि 'आपटे' हे काँबिनेशन काहीसं अन्कॉमन असलं तरी
'बाबूराव ओक' आणि 'बाबूराव नरवणे' ही दोन माणसे
माझ्या परिचयाची होती(दोघेही दिवंगत). त्यातले ओक हे माझ्या नात्यातले.
हेराफेरीत कमावलं आणि फिर
हेराफेरीत कमावलं आणि फिर हेराफेरीत गमावलं
बाबुराव गणपतराव आपटे ... लय
बाबुराव गणपतराव आपटे ... लय लय भारी
केतन मेहताचा 'मिर्च मसाला'
केतन मेहताचा 'मिर्च मसाला' असो किंवा नवख्या निशिकांत कामतचा 'मुंबई मेरी जान'.
रामूसारख्याच्या सत्या मधली बारकीशी कमिशनरची भुमिका असो किंवा चोप्रांच्या बागबानमधल्या पटेल अंकलची. समोर नसिरसारखे महारथी असो किंवा सुनीलशेट्टी सारखे अगदीच दगड, परेश रावलसारखे कलाकार नेहमीच अनसंग हीरो राहतात, बाबुरावसारख्या भुमिका अपवाद आहेतच म्हणा.
मला परेश रावल, अनुपम खेर आणि ओम पुरी हे नेहमीच बाकी काही अतिशय हाईप्ड कलाकारांपेक्षा कैकपटीनं गुणी पण दुर्दैवी कलाकार वाटत आले आहेत. नसिरुद्दीन शाह त्यातल्या त्यात थोडे तरी सुदैवी म्हणायला हवे. वरच्या तिघांची जागा घेण्यासाठी आता बोमन ईराणी, ईरफान खान, मनोज वाजपेयी अशी फौजच आहे आणि ते भुमिका मिळण्याच्या बाबतीतही सुदैवी म्हणावे लागतील.
'विनोदी कलाकार' ह्या टॅगखाली हे कलाकार फारच केविलवाणे वाटतात. गल्लाभरू दिग्दर्शकांनी 'चरित्र' पठडीतल्या भुमिका ह्या लोकांच्या माथी मारून त्यांची जणू घुसमटच केली. बघूया भारद्वाज, कश्यपसारखे दिग्दर्शक ह्या लोकांच्या गुणवत्तेचा अजून किती योग्य वापर करून घेतात.
नशीब नसिरभाईंनी अशी काही तडजोड केली नाही. नानानेही त्या तिघांसारखीच वाट चोखाळायचा प्रयत्न केला पण त्याचं नक्की काही कळत नाही.
माफ करा,थोडं विषयांतर झालं खरं! कारण तुमचा लेख बाबुरावबद्दल आहे परेशरावल बद्दल नाही पण तरी लिहावसं वाटलं.
छान लिहिलयं... बाबुराव
छान लिहिलयं... बाबुराव गणपतराव आपटे आमचा सदा फेव्हरिट
छान लिहीले आहे. आवडले
छान लिहीले आहे. आवडले