आज चिनूक्सकडून विचारपूस झाली खरी, पण बाकिच्यांचे उत्तम लेख वाचून स्पर्धेसाठी हा लेख द्यावासा वाटला नाही.
पण लिहिलाच आहे, म्हणून इथे पोस्ट करतोय !
००००००००००००००
स्पर्धेचे केवळ निमित्त झाले, बरेच दिवस मनात जे होते, ते लिहून काढायची संधी मात्र घेतोय.मराठी चित्रपट बघणे, हि माझी मानसिक गरज असते. भारतवारीत एका खास दुकानात जाऊन, गेल्या सहा महिन्यात, कुठल्या मराठी चित्रपटांच्या सिडीज आल्यात, त्याची चौकशी करुन, मी (बहुतांशी आंधळेपणाने ) खरेदी करत असतो. मग परदेशात आलो कि त्या पुरवून पुरवून बघतो.
मराठी चित्रपट बघण्याचा, केवळ हाच एक पर्याय मला उपलब्ध आहे. यू ट्यूबवर देखील काही चित्रपट आहेतच.
बाकी नव्या चित्रपटांची समीक्षा वाचून पुढच्या वेळी, कुठल्या सिडीज घ्यायच्या, त्याची यादी करत राहतो.
मधली काही वर्षे सोडली तर मी सातत्याने मराठी चित्रपट बघतोय. सर्वच बघता येतात, असे नाही. पण जे बघतो, त्याने मराठी चित्रपटाबद्दल, आशा आणि अपेक्षा निर्माण झाल्यात, एवढे मात्र नक्की.
अत्यंत आवडले असे म्हणण्याजोगे मराठी चित्रपट येत आहेतही, पण तरी काहीतरी उणीवा राहून जातात, त्यातल्या काही इथे नोंदवायचा प्रयत्न करतो.
१) कथानक
कथा, किंवा सशक्त कथा हि मराठी चित्रपटांचा कणा होती. पण कथेबाबत मात्र, काहिशी निराशा आता
दिसते. मराठीत उत्तम साहित्य, आजही निर्माण होत असते. पण ते पडद्यावर येत नाही, आणि तसा प्रयत्न झाला, तर मूळ कलाकृतीला पुरेसा न्याय दिला जात नाही. (ताजे उदाहरण - अजिंठा )
अशा साहित्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
खुपदा साहित्य तसेच्या तसे चित्रपटात आणणे शक्य असतेच असे नाही, पण याबाबतीत चित्रपटांनी नाही, तर
नाटकांनी, उत्तम कामगिरी केलीय. गमभन (शाळा) आणि रणांगण ( पानिपत ) हि ती दोन.
दोन्ही कादंबर्या वाचून यावर नाटक होऊ शकेल, असे सामान्य वाचकाला, वाटलेही नसते. पण रंगमंचाच्या
मर्यादा, लक्षात घेऊनही, हे दोन्ही प्रयोग नेटके झाले.
चित्रपटाला तशा (म्हणजे आर्थिक बाब सोडली तर ) मर्यादा कमी असतात.
असे साहित्यच नव्हे तर काही कथाही नीट या माध्यमासाठी फुलवता येतात. (उदा. गंध) गंध च्या बाबतीत,
गंधाचा थेट अनुभव हे माध्यम, देऊ शकत नसतानाही, केलेला प्रयोग चांगला जमला होता.
कथानक, थेट या मातीतले असावे निदान, मराठी मनाला भिडणारे असावे. हि किमान अपेक्षा.
बाकी भाषांतील साहित्य मराठी चित्रपटात आणले, तर ते थोडे कृत्रिम वाटेल. पण तोही प्रयोग करण्यासारखा
आहे. मराठीत आणताना, मात्र उत्तम रुपांतर जमायला हवे. ( उदा. हिंदी चित्रपट, रेनकोट )
अगदी सद्य स्थितीवरचे म्हणजेच मराठी माणसाचे ज्वलंत प्रश्न, आणले तरी स्वागतार्ह आहेत. (डोंबिवली फास्ट) पण त्यावर सोपी, उत्तरे मात्र नकोत.
अनेक यशस्वी ठरलेल्या मराठी चित्रपटांबाबत ( सांगत्ये ऐका, एक गाव बारा भानगडी, पाठलाग, पिंजरा, श्वास ) उत्तम कथा, हे एक महत्वाचे कारण होते.
२) पटकथा
उत्तम पटकथा, मराठीत अभावानेच दिसते. चेकमेट ची पटकथा उत्तम होती, पण तरी साधारणपणे सरळधोपटपणे, कथानक सांगणे, हाच प्रकार जास्त दिसतो.
मी अलिकडे बघितलेल्या, किनयारवांडा या आफ्रिकन चित्रपटाची पटकथा, खुपच अनोखी होती. हिंदीतही असे
प्रयोग होत असतात. मराठीतदेखील पुर्वी असे चांगले प्रयोग झाले आहेत. (उदा. मुक्काम पोस्ट ढेबेवाडी )
असे काही प्रयोग, जिथे पेक्षकाला विचार करणे, त्याचा चित्रपटातील रस कायम ठेवणे, गरजेचे आहे.
३) निर्मिती मूल्य
सध्या मराठी चित्रपटाशी संबंधित कुणाही व्यक्तीला विचारले, तर आर्थिक प्रश्न हा सर्वात जास्त भेडसावणारा
प्रश्न आहे, असे उत्तर मिळेल. पेक्षक नाही, म्हणून उत्पन्न नाही, उत्पन्न नाही म्हणून चांगली निर्मितीमूल्ये
नाहीत. म्हणून चांगली निर्मिती नाही, म्हणून प्रेक्षक नाहीत असे दुष्ट चक्र आहे.
पण तरीही निर्मिती मूल्ये मर्यादीत ठेवूनही, उत्तम निर्मिती अशक्य नाही. (उदा. गाभ्रीचा पाऊस )
चांगले भांडवल ऊभे करु शकतील असे लोक मराठीत आजही आहेत. पण त्यांनी स्वतःच निर्मिती करण्याची
हौस करण्यापेक्षा ( उदा. समांतर ) धडपडणार्या कलाकारांना आर्थिक सहाय्य करावे, अशी रास्त अपेक्षा आहे,
माझी.
४) दिग्दर्शन
दिग्दर्शक हा चित्रपटाचा सर्वेसर्वा असावा, अशी रास्त अपेक्षा. त्याने पुरेसा अभ्यास करुन कलाकृती सादर करावी
अशी अपेक्षा. अनेकदा एखाद्या क्षुल्लक बाबीकडे दुर्लक्ष करुन, सगळ्या चित्रपटाचा विचका केला जातो.
एकाच व्यक्तीला सर्व बाबी संभाळणे अशक्य आहे हे कबूल. पण त्या क्षेत्रातील तज्ञ माणसे, मराठीत उपलब्ध
असताना, त्यांची सेवा न घेणे, हा मात्र अविचार आहे.
उदा. बालगंधर्व ची निर्मितीमूल्ये उत्तम होती तरी कपडेपटाबाबत मात्र, केवळ हिंदीत यशस्वी झाली, म्हणून
नीता लुल्लाला ती जबाबदारी देणे, याने या सुंदर चित्रपटाचे नुकसानच केले. तिने ते काम अर्थातच मनापासून
केले नाही. बालगंधर्वांच्या साड्या हे त्याकाळात मराठी माणसाचे कौतूक होते, तसा प्रसंगही चित्रपटात आहे,
पण नीताने तो विचार केला नाही. इतकाच नाही, तर रंगाचाही विचार केला नाही. (द्रौपदी नाटकातील
प्रसंगाच्या वेळी, मागील पडदा आणि साडीचा रंग एकच होता.
गंध मधे पण, नीना कुळकर्णीच्या साडीचा पोपटी रंग, काळाशी सुसंगत नव्हता.
५) अभिनय
अभिनयाच्या बाबतीत मात्र मराठी चित्रपटसृष्टी कायम श्रीमंत राहिली आहे. फक्त गरज आहे ती भुमिकेशी
सुसंगत असे कलाकार निवडण्याची. ती देखील बहुतांशी पुर्ण होतेच, पण नेहमीच्या यशस्वी कलाकारांचा
मोह सुटताना दिसत नाही.
प्रत्येक चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी दिसावेत, हे कसे खपवून घ्यायचे. एकेकाळी
प्रत्येक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ असत, तसेच परत होतेय.
ज्यांनी अभिनयाचे धडे द्यावेत असे कलाकार आजही मराठीत आहेत, पण ज्यांनी ते घ्यावेत, अशी अपेक्षा आहे,
ते मात्र अजूनही, तितकेसे कष्ट घेताना दिसत नाहीत.
६) संवाद
मराठी भाषेच्या बोलीभाषा, हे या भाषेचे वैभव आहे. एकेकाळी बहुतांशी चित्रपटात कोल्हापुरी भाषा असे (कारण
निर्मिती पण तिथेच होत असे. ) पण बाकीच्या बोलीभाषा क्वचितच दिसतात. दर १० मैलावर बदलणार्या
भाषा सोडू, पण अगदी ठळक वैषिष्ठे जपणार्या बोलीभाषाही ( कोकणी, वैदर्भीय, अहिराणी, आग्री ) मराठी
चित्रपटात कमीच ऐकू येतात. खुपदा मुंबई पुण्याकडची ( हे पण मिथकच. मुंबई आणि पुण्याची भाषा वेगळी,
मुंबई, पुणे, मुंबई चित्रपटात ती ऐकू आलीच.) प्रमाण भाषाच वापरली जाते. कथानकातील पात्र ज्या ठिकाणी
राहतात, तिथली भाषा नको का वापरायला ? आणि आजही, अगदी आजची तरुण मुलेदेखील भाषेचे हे वैभव
जपतात. पण चित्रपटात मात्र हे भान राखले जात नाही. उदा. नटरंग मधे नायकाच्या वडीलांचे पात्र सोडले, तर
बाकिची पात्रे, योग्य ती भाषा बोलत नाहीत.
बोलीभाषेचे राहू द्या, संवाद नैसर्गिक सुद्धा वाटत नाहीत. या संवाद लेखकांवर मालिकांचा प्रभाव नक्कीच आहे.
तो कलाकारांच्या बोलण्यातही जाणवतो.
७) संगीत
संगीताच्या तर फारच अपेक्षा आहेत. सूंदर शब्द आणि त्याहून सुंदर चाल, हे मराठी चित्रपटाचे भूषण होते.
गदीमां, खेबुडकर, शेळके, च्या काळात गरजेनुसार केलेले गीतलेखनही, उत्तम काव्यदर्जा राखून होते.
ते कुठेतरी हरवल्यासारखे वाटतेय. आजच्या गाण्यातली शब्दकळा, जास्त साहित्यिक झाल्यासारखी
वाटते. ती विषयाला आणि पात्राच्या तोंडी गाणे असेल, त्या पात्राला शोभणारी असावी. हि अपेक्षा.
सुर्व्या आला तळपून गेला, मावळतीच्या खळी गालाला... सारखी.
संगीतकार प्रतिभावान आहेत हे नक्कीच. पण पहिल्या चित्रपटाचा उत्साह टिकवणे गरजेचे आहे. गाण्याच्या
एक साचा लोकप्रिय झाला, तर त्याच साच्याचा वापर करुन, अनेक गाणी निर्माण करणे, हे अर्थातच नाकबूल.
मी फक्त कोंबडी आणि चमेली बद्दलच नाही लिहित. साचेबद्ध लावणी किंवा एकंदरच ठराविक ढोलकीच्या तालातली गाणी, कंटाळा आणतात. मी आशा भोसलेनी गायलेल्या, काही अलिकडच्या लावण्या ऐकल्या, आणि
खुप निराश झालो. आशाच्याच आवाजातल्या अनोख्या लावण्या, आज इतक्या वर्षांनतरही जून्या वाटत नाहीत.
आशानेच नव्हे तर नव्या कलाकारांनी पण उत्तम गाणी गावीत, अशी अपेक्षा आहे. अत्यंत गुणी कलाकार
उर्मिला धनगर, फेरारी कि सवारी साठी, उत्तम लावणी गाते आणि मराठीत ती असू नये, याला काय अर्थ आहे ?
८) नृत्य
नृत्य हा मराठी चित्रपटाचा महत्वाचा हिस्सा होता असे मी म्ह्णणार नाही. मराठीत जास्त करुन लावणीनृत्यच
सादर झाले. माझ्या आठवणीत, हंसा वाडकर, जयश्री गडकर, संध्या, उमा, नर्गिस बानू, लिला गांधी यांनी
सादर केलेली अनेक नृत्ये आहेत.
या कलाकारांचा वारसा पुढे उषा चव्हाण आणि उषा नाईक या दोघींनीही चालवला. पण पुढे हि परंपरा
खुंटल्यासारखी झाली.
लावणी नृत्यांगना (सुरेखा पुणेकर, राजश्री नगरकर, माया खुटेगावकर अशा अनेक) उत्तम लावण्या इतरत्र सादर
करत असताना, नृत्यासाठीच नव्हे तर नृत्यदिग्दर्शनासाठी त्या मराठी चित्रपटात का आल्या नाहीत ?
निवडुंग मधे उत्तम नृत्ये सादर केल्यावरही, अर्चनाला नृत्यमय भुमिका का मिळाली नाही ?
आजकालची नृत्ये जोरकस असतात आणि कलाकार त्यासाठी फार मेहनत घेतात हे खरेय पण नृत्याभिनयात
मात्र कमी पडतात, हे देखील खरे आहे.
सांगत्ये ऐका मधली, काल राती बाई मजसि झोप नाही आली हि लावणी हंसाबाईंनी, केवळ मुद्राभिनयाने
सादर केलीय.
त्यामूळे जर मराठी चित्रपटात नृत्य असलेच तर ते परीपूर्ण असावे, अशी अपेक्षा.
अगदी परीपूर्ण असा चित्रपट निर्माण करणे अवघड आहे, त्यामूळे सर्व अपेक्षा नाही पूर्ण झाल्या, तरी मराठी
चित्रपट बघणे सोडणार नाही... कारण वर लिहिलेच आहे, ती माझी मानसिक गरज आहे.
दिनेशदा , (उदा. बाभ्रीचा पाऊस
दिनेशदा , (उदा. बाभ्रीचा पाऊस ) नाही.. गाभ्रीचा पाऊस ..
बाकी लेख मस्त..
चेकमेट ची पटकथा उत्तम होती
चेकमेट ची पटकथा उत्तम होती >>>>>>>> चेकमेट हा हिंदी चित्रपटावरुन बेतलेला बहुतेक कारण समान पटकथेवर कोयना मित्रा आणि फरदिन खान चा चित्रपत येउन गेलेला........
दीपाली, केला बदल. (गुगल क्रोम
दीपाली, केला बदल. (गुगल क्रोम वापरताना, काही अक्षरे आपसूक बदलतात !)
हो, उदयन !
दिनेशदा..............epic
दिनेशदा..............epic browser वापरा........त्रास होत नाही काही
लेख छानच जमलाय ,दिनेश
लेख छानच जमलाय ,दिनेश दा..
...मराठी चित्रपट बघणे सोडणार नाही...'.. + १
ह्या क्रोमचे आणि माबो चे काय
ह्या क्रोमचे आणि माबो चे काय वाकडे आहे ते कळत नाही. एक अक्षर एडिट करायला गेले की आख्खे पोस्ट बदलावे लागते...:राग:
मराठी चित्रपटांचा छान आढावा
मराठी चित्रपटांचा छान आढावा घेतलात
गेल्या सहा महिन्यात, कुठल्या मराठी चित्रपटांच्या सिडीज आल्यात, त्याची चौकशी करुन, मी (बहुतांशी आंधळेपणाने ) खरेदी करत असतो. मग परदेशात आलो कि त्या पुरवून पुरवून बघतो.
<<<<<<<<<<
आम्ही देखील हेच करतो..... मुंबईला आलो की मराठी चित्रपटाच्या जेवढया मिळतील तेवढया सिडीज विकत घ्यायच्या व पुरवून पुरवून बघायच्या. शनिवारची दुपार मराठी चित्रपटासाठी ( आणलेल्या सिडीज संपेपर्यंत )
दिन्या लेख चांगला लिहला
दिन्या लेख चांगला लिहला आहेस.
स्पर्धेत पाठव की.
दिनेशदा, मराठी
दिनेशदा, मराठी चित्रपटांबाबतच्या सामान्य प्रेक्षकाच्या मनातल्या अपेक्षा एकदम मुद्देसुद मांडल्यात. संपुर्ण ललित आवडेश.
दिनेश.... मराठी चित्रपटाच्या
दिनेश....
मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या काळापासून [बाबुराव पेन्टर, बेडेकर, फत्तेलाल, दामले, शांताराम युग] पौराणिक असो वा ऐतिहासिक [पोशाखी] असोत, निर्माते आणि दिग्दर्शक यानी मायबाप प्रेक्षकांचे 'मनोरंजन' एवढाच हेतू मनी न बाळगता त्यासोबत त्या माध्यमाद्वारे होईल तितके समाजप्रबोधनही करावे असा स्तुत्य विचार मनी ठेवून जी चित्रनिर्मिती केली ती आजही काळाच्या चक्रावर घासून जशीच्या तशी जिवंत आहे. कालौघात कितीही बदल झाले [विशेषतः तंत्र] तरीही 'अयोध्याचा राजा, संत तुकाराम, श्यामची आई, लाखाची गोष्ट, सांगत्ये ऐका, रामजोशी, मोलकरीण, सामना, सिंहासन' आदी चित्रपट इतिहासातील मैलाचे दगड का मानले जातात ? या प्रश्नाला साधे, सरळ आणि सोपे उत्तर आहे....'सशक्त कथानक'.
इये मराठीचिये नगरीमध्ये अगदी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे लेखक असूनही आपल्या निर्मात्यांना [आजकाल तर केवळ 'धंदेवाले' च निर्माते होत आहेत] कथानकाची वानवा जाणवत असल्याचे दिसत आहे, त्याला कारण म्हणजे निर्मातेदिग्दर्शक यानाच झटपटीत पिझ्झा बर्गर काईंड डिश करण्यात स्वारस्य आहे. अनंत माने फॉर्म्युला गाजला म्हटले की काढा एकापाठोपाठ एक तमाशापट....दादा कोंडके आले, झाले सर्वत्र सवंग विनोदाचे पीक....सराफ बेर्डे यानी तर प्रेक्षक किती उल्लू बनू शकतात याचेच धडे देण्यात धन्य मानले....महागुरु पिळगावकर आणि कॉपी कोठारे....यांच्याबद्दल तर काय लिहावे ? सार्यांनी मराठी साहित्य हे केवळ ग्रंथालयात देवाणघेवाण करण्याचे ठिकाण असेच मानले आणि त्यामुळे झाले आहे असे की लोकांनी आपापले मेंदू घरीच ठेवून दोनअडीच तास बेअकली मनोरंजन करून घेण्यासाठीच थिएटरकडे वळावे अशीच आखणी केली असल्याचे चित्र २००० सालापर्यंत तरी दिसत होते.
सुदैवाने गेल्या दशकात ज्यात 'कथानक' प्राण आहे अशी निर्मिती जशी होत आहे, तसेच दमदार दिग्दर्शकही पुढे येत आहेत, आणि सुदैवाने लोकाश्रयही हुरूप वाटण्यासारखा मिळत आहे हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल.
तरीही 'राष्ट्रीय' पातळीवरील पुरस्कारासाठी जेव्हा कलात्मकतेचा मुद्दा समोर येतो त्यावेळी आपल्या मराठी चित्रपटांचे दारिद्र्य पुन्हा एकदा उघड्यावर पडते. १९५२ साली 'श्यामची आई' ला राष्ट्रपती पदक....मग चक्क ५० वर्षे सामसूम...नंतर २००३ मध्ये 'श्वास'...आणि आठ वर्षानंतर 'देऊळ'....संपली आमची मिळकत. त्याचवेळी बंगाली चित्रपट तब्बल २१ वेळा राष्ट्रीय पारितोषिक मिळवितो, तर मल्याळीची संख्या आहे ११....शेजारची कन्नड भाषा मिळविते ६.
तुम्ही लेखात नोंदविलेले संगीत आणि नृत्यातील बारकावे अगदी अचूक आहेत. मराठी चित्रपटातील नृत्य म्हणजे ९९.९९% 'लावणी' आणि लावणीच फक्त. संध्या जरूर नर्तिका होती, पण अगदी अमर भूपाळी असो वा राम जोशी असो वा पिंजरा...तिचेही नृत्य म्हणजे पहिली सुरेखा पुणेकरच.... मग जयश्री गडकर काय, उषा चव्हाण काय आणि त्यापुढील पिढी....फक्त ढोलकी, हार्मोनियम आणि तिकोन्याच्या तालावर घुंगरू नाचवायचे, सोबतीला गणपत पाटील किंवा छोटूला घेऊन. 'निवडुंग' मध्ये खरेच अर्चनाने अप्रतिम शास्त्रीय नृत्य पेश केले होते...अगदी गाईड मधल्या वहिदा रेहमानच्या तोडीचे....पण बस्स तेवढाच ०,०१ टक्का अपवाद.
आजही अजय-अतुल जोडीचे संगीत गाजते ते अन्य कोणत्याही बाबीपेक्षा 'नृत्या'साठी रचलेल्या गाण्यावर....आणि पुन्हा नृत्य कुठले ? तर परत 'स्टेज' वरील.
आज मराठी चित्रपटाच्या निर्मितीला बहर आल्याचे जरूर दिसते पण ती पब्लिक मेन्टॅलिटी एनकॅश करण्यासाठीच.....अभिजात निर्मिती म्हणता येईल असे क्वचितच घडत असल्याचे चित्र आहे. हे जरी उदासवाणे असले तरी जे कुणी एकांडे शिलेदार आहेत त्यांच्यासाठी तरी मराठी चित्रपटगृहाकडे मराठी प्रेक्षकांची पाऊले वळली पाहिजेत.
[....स्पर्धेसाठी नसलेल्या....तुमच्या लेखामुळे मलाही मनातील विचारांना शब्दरूप देता आले, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.]
अशोक पाटील
अशोक, माझे मराठी वाचन आता
अशोक,
माझे मराठी वाचन आता अगदीच नावापुरते उरलेय, तरीपण कधीतरी अशी एखादी कथा वा कादंबरी हातात येते,
कि वाटते बस. यावर उत्तम चित्रपट होऊ शकेल. पण ते सगळे मनातच राहते.
निर्मला देशपांडे यांची, सलत सूर सनईचा, हि अशीच ग्वाल्हेर / इंदूरकडचे वातावरण टिपणारी कादंबरी. वाचताना
तो वाडा आणि ती माणसे डोळ्यासमोर ऊभी राहतात. पण मराठी चित्रपटांनी, महाराष्ट्राबाहेर स्थानिक झालेल्या
मराठी माणसांची कधी दखलच घेतली नाही. इंदूर, बडोदा या भागातली कथानके आठवतच नाही. बेळगावी पात्रे आली तर केवळ विनोदासाठी. सीमावाद कधीच चित्रपटात आला नाही. गोवा मुक्ती संग्राम पण आला नाही.
चरीत्रपट ( ध्यासपर्व / सिंधुताई सारखा एखाद दुसरा अपवाद ) फारसे नाहीत.
सांगत्ये ऐका या पुस्तकावर हिंदित भुमिका आला (ते पुस्तक आणि सांगत्ये ऐका या चित्रपटाचा संबंध नाही. )
पण मराठीत नाही.
अगदी अनोख्या अशा प्रेमकाहाण्या या मराठी चित्रपट्सृष्टीत घडल्या. (वनमाला, स्नेहप्रभा प्रधान, संध्या ) पण त्यांच्यावर चित्रपट काढावासा कुणाला वाटत नाही.
डॉ. आनंदी जोशी, यांच्या जीवनावर नाट्क आणि मालिका आली, चित्रपट नाही. अहिल्याबाई होळकर, यांचे जीवन कधी पडद्यावर आले नाही.
अमेरिकन पाककला कलाकार, ज्यूलिया चाईल्ड वर (मेरिल स्ट्रिप चा ) चित्रपट तोही आजच्या काळाशी सांगड
घालत आला. पण रुचिरावाल्या ओगले आज्जींवर नाही.
ज्या काळात नूतन, तनुजा हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत होत्या, त्या काळात त्यांना आकर्षून घेईल असा चित्रपट
मराठीत आला नाही. तसा तो काजोल, माधूरीसाठीही त्यांच्या उमेदीच्या काळात आला नाही.
या सर्वच कलाकार, मराठीत काम करण्यासाठी सहज तयार झाल्या असत्या.
महाराष्ट्राबाहेर स्थानिक
महाराष्ट्राबाहेर स्थानिक झालेल्या मराठी माणसांची कधी दखलच घेतली नाही. >>> + १००००
मराठी चित्रपट कुठल्याच नव्या दिशा चोखाळत नाही
दिनेशदा, बराचसा पटला...
दिनेशदा,
बराचसा पटला... स्पर्धेसाठी दिला नाहीत ते मात्र बरे केलेत..
पेशवा, मराठी नाटक सिनेमात,
पेशवा, मराठी नाटक सिनेमात, अचानक टपकणारा काका / मामा आफ्रिकेत असतो (म्हणजे कुठे ? ) आणि त्याच्या सोन्याच्या खाणीही असतात.
पण चित्रपटातल्या कुणाचेही नातेवाईक, बडोदा, अहमदाबाद, इंदुर, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद, चेन्ने... इथे नसतात. या सर्व ठिकाणी, पूर्वापार महाराष्ट्र मंडळे आहेत, त्यांना कसा आपलेपणा वाटायचा, मराठी चित्रपटांबद्दल ?
योग,
तसेही माझ्यासारख्या जून्या सभासदाने, स्पर्धेत भाग घ्यावा, हे मला पटत नाही.
चांगला आढावा दिनेशदा. मराठी
चांगला आढावा दिनेशदा.
मराठी चित्रपट बघणं सध्या तरी फार होत नाही.
वाह दीनेशदा अचुक अवलोकन
वाह दीनेशदा अचुक अवलोकन केलंयत मराठी चित्रपटाचे
गंध मला ही आवडला :), अजंठा बद्दल मी सुधा जरा जास्तच अपेक्षा ठेवून गेलो होतो
मराठी चित्रपटात आजच्या काळाशी
मराठी चित्रपटात आजच्या काळाशी सुसंगत चांगले हॅडसम हिरो अन स्मार्ट हिरोइन्स कधी येणार? तेच तेच लोक सिरियलमध्येही अन सिनेमातही. भरत जाधव अन मकरंद अनासपुरे कलाकार म्हणून चांगले असतीलही, पण हिरो?? एकही नाही.
@ नताशा हो ग हो ! मराठी
@ नताशा
हो ग हो ! मराठी चित्रपटात हॅंडसम वा स्मार्ट म्हणावेत अश्या नायक नायिकांची कमतरताच जाणवते बघ..... आतापर्यंत देखणा म्हणता येइल असा नायक फक्त रविंद्र महाजणीच वाटतो मराठीत..... काही हिरोईन्स सुंदर असल्या तरी हिंदीतील नायिकांसारख्या स्मार्ट वाटत नाहीत ( थोडीफार वर्षा उसगावकर स्मार्ट वाटायची )....... आणि कदाचित कोणी तसे असेलच तर मराठीत कशाला प्रयत्न करतील हिंदीत जातील उदा. माधुरी दि़क्षीत, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर
दिनेशदा, मस्त लेख ! १००%
दिनेशदा, मस्त लेख ! १००% पटला.!!
मला इंटरनॅशनल लेवल वरचा मराठी
मला इंटरनॅशनल लेवल वरचा मराठी चित्रपट बघायला आवडेल...जबरदस्त कथा....अॅक्शन ....तितकाच दमदार अभिनेते......."डार्क नाईट" सारखे पार्श्वसंगीत....गाणी नकोत.. थोडीमधुन वेळेप्रमाणासाठी १ कडव्याचे मधेच लावणी ...दृश्य चालु असताना मधे मधे दिसनारी... थरारक पाठलाग... नायकावर खलनायकाची कुरघोडी.. त्याचे प्रत्येक बाबतीत एक पाउल पुढे असणे....ऐन वेळी खलनायकाची छोटीसी चुक.. कुठेही अलका कुबल टाईप मेलोड्रामा नको.....नाही.. तद्दन फालतु विनोद नकोत... खुशखुशीत विनोदाची कथेनुसार पेरणी.. भव्य कॅनव्हास...
पुढे काय होईल याची सतत लागुन असलेली उत्सुक्ता......अप्रचलित धक्के........
.
.
.
असे सिनेमे निर्माण कधी होतील.........
छान लिहलय दिनेशदा... पुढिल
छान लिहलय दिनेशदा...
पुढिल काही वर्षात नक्कीच चांगले मराठी चित्रपट बनतील, फक्त त्या "मक्या" आणि "भरत" या दोघांना मराठी सिनेमातून हद्दपार केले पाहीजे.
योग>> -१
योग>> -१
या सर्वच कलाकार, मराठीत काम
या सर्वच कलाकार, मराठीत काम करण्यासाठी सहज तयार झाल्या असत्या.
>>
ओब्जेक्शन मिलॉर्ड,
या व अशा नट्या हिन्दीत त्या टॉपला असताना त्यानी मराठी चित्रपटाकडे ढुंकूनही पाहिले नाही. नूतन देखील हिंदीतले मार्केट सम्पल्यावर पारध बिरध मद्ये आली. माधुरी येते येते म्हणता म्हणता अजूनही आलेली नाही. कारण याना आपण 'रिजनल' ठरू अशी भीती वाटत होती त्या काळात. नन्दानेही तेच केले. त्यावेळी वातावरणही तसेच होते म्हनजे 'रिजनल' म्ध्ये आले की हिन्दी मधून विथड्रॉ झाले असे प्रेक्षकही समजायचे. दुसरे यानी का मानधन कमी केले असते काय मराठीसाठी? तेवढ्या तारखात तर आणखी एक हिन्दी करता येईल ही भूमिका नसेलच कशावरून. ?
अमोल पालेकर, नाना पाटेकर, स्मिता पाटील यांनी ही हिम्मत दाखवली. आथिक दृष्ट्याही त्यानी मराठीला सांभाळून घेतले असावे. त्यांच्या इमेजला कुठे धक्का बसला?
मला मराठीत चांगला रोल मिळाला तर मला तो करायला आवडेल असे नुसते स्वतःला ऐकू येईल एवढे पुटपुटायचे.. कलेच्या गोष्टी करायच्या अन पूर्ण व्यावसायिक वागायचे. मराठी निर्माते काय एवढे दुधखुळे नाहीत की त्या कमी मानधनावर काम करतील असे समजायला....
अजूनही काजोल, बिजोल , उर्मिला, काही येणार नाहीत मराठीत काम करायला . उगीच भ्रमात राहण्याचे कारण नाही....
नताशा . जे स्वतःला हँडसम
नताशा :).
जे स्वतःला हँडसम म्हणवतात ते संतोष जुवेकर कि अंकुश चौधरी पैकी कोणी तरी पब्लिक 'खुपते तिथे गुप्ते' टॉक शो मधे हेच म्हणाला होते कि आम्हाला प्रेक्षक रिस्पॉन्स देत नाहीत , फक्त कॉमेडी हिरोज ची चलती आहे अजुनही.. पण प्रॉब्लेम असाय मुळात त्यांना ते स्वतः हॅन्डसम वाटतात
समीर धर्माधिकारी सोडून कोणी हॅन्डसम नाहीच्चे मराठी सिनेमात
मिलिंद सोमण ठिके पण फार मोठा दिसतो गंध मधे.
डीज्जे, मिलिंद सोम्मण मामा
डीज्जे, मिलिंद सोम्मण मामा झाला कि गं आता. एक्झ्यक्ट माझ्या वयाचा आहे तो. पेज थ्री मध्ये पोलिस इनिस्पेक्टराचे काम कर्णारा नट मराठी आहे ना. तो आवडतो मला. विक्रम गोखले गजब दिसत तरूण पणी. चिनमय मांडले कर? उंच माझा झोकातला माधवराव? बाजिराव मस्तानीतला बाजिराव ? गोड दिसतात की.
पंजाबी दिखाऊ पणा आपल्या माथी फार मारला जातो. पण सूर्या वगिअरे तामिळ नटही देशी हँडसम आहेत.
अतुल कुलकर्णी? जाउद्या आजचा दिवस स्त्रीप्रतिमांना दिला उद्या उटून विचार करण्यात येइल.
सुबोध भावे पण बरा आहे की.
सुबोध भावे पण बरा आहे की. खूप जुने रमेश देव, चंद्रकांत पण देखणेच होते. फक्त रमेश देव हे मवाळ, तर चंद्रकांत रांगडे होते. माधवराव-विक्रम गायकवाडला नॉर्मल ड्रेसमध्ये पाहिलं नाहिये. बहुतेक देखणा पण किडकिडा दिसत असेल.
मि सो खरच म्हातारा दिसतो ,अता
मि सो खरच म्हातारा दिसतो ,अता !
अतुल कुलकर्णी , उपेण्द्र लिनये (तो इन्पेक्टर ) , संदिप कुलकर्णी महान अभिनेते आहेत आणि उत्कृष्ट अभिनेत्यायांची कमी नाहीच आहे/नव्हती मराठीत !
पण नताशा म्हणतेय तसा 'हार्ट थ्रोब 'पर्सनॅलिटी' खरच नाही आठवत कोणी !
बाकी मंड्ळी नाही माहित टी व्ही वरची.
पंजाबी किंवा खान मंडळी माथी मारली जातांत कि मागणी तसा पुरवठा आहे याचं उत्तर अवघड आहे !
पण खरच तमाम कपुर मंडळी ,विनोद खन्ना, अक्शय, राहुल , ह्रिथिक , सलमान ,सैफ, आमिर पब्लिक हॅन्डसम नाहीत का ?
@ अश्विनी के +++
@ अश्विनी के
+++ १००%
तरुणपणीचे विक्रम गोखले, रमेश देव, सुर्यकांत, रविंद्र महाजणी हे देखणे नट होते. त्यांचे चित्रपट बघायला छान वाटते.
मराठी हिरोईन्समध्ये माझी सर्वान आवडती आहे रंजना- ती सर्व भुमिकांमध्ये शोभुन दिसायची मग ती भुमिका विनोदी, गंभीर, खलस्त्रीची कोणतीही असो, मजा येते तीचे चित्रपट बघताना
ऐश्वर्या नारकर आणि तिचा नवरा
ऐश्वर्या नारकर आणि तिचा नवरा ही माझी पार सुंदर व हँडसम दिसायची कल्लपना आहे. मस्त जोडपे. ती पण तरूण असताना फार गोड दिसत असे. अस्सल मराठी. ते ग्रेस कविता ओपनिंग ला अस्लेल्या शिरेअलीत.
बर्याच मुद्द्यांबाबत
बर्याच मुद्द्यांबाबत असहमत!
१) >>कथा, किंवा सशक्त कथा हि मराठी चित्रपटांचा कणा होती. पण कथेबाबत मात्र, काहिशी निराशा आता दिसते.
उलट आजच्या इतकी कथानकातली विविधता क्वचितच आधी कधी असेल... नटरंग, जोगवा, चेकमेट, श्वास, बालगंधर्व, निशाणी डावा अंगठा, वन रुम किचन, देऊळ, वळू, मी शिवाजीराजे, मोरया ही काही प्रातिनिधिक उदाहरणे.
उलट दर्जेदार, वैविध्यपूर्ण कथा आणि सादरीकरणाच्या कसोटीवर आजचे चित्रपट निश्चितच उजवे आहेत
२)>>चांगली निर्मितीमूल्ये नाहीत. म्हणून चांगली निर्मिती नाही, म्हणून प्रेक्षक नाहीत असे दुष्ट चक्र आहे.
चुकीचा समज... उलट आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात बिग्-बजेट आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम चित्रपट गेल्या काही वर्षातलेच आहेत.... प्रातिनिधिक उदाहरणे म्हणजे बालगंधर्व, चेकमेट, गैर इत्यादी
३)>>प्रत्येक चित्रपटात सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी दिसावेत, हे कसे खपवून घ्यायचे. एकेकाळी प्रत्येक चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ असत, तसेच परत होतेय.
जोरदार असहमत.... उलट आजकाल स्टारडमपेक्षा रोल बघुन कलाकार निवडला जातो.... आज मराठीत कुणाचीही मोनोपल्ली नाहिये.... कारण विषयाचे वैविध्य.... कॉलेज तरुणापासून प्रोफेसरांच्या भुमिकेपर्यंत पुर्वी अशोक सराफ कश्यातही दिसायचा आणि लोकांना ते चालयचेही.... आजकाल इतके सक्षम पर्याय असताना उलट रिपीटेशन कमी झालेय
४)>>गदीमां, खेबुडकर, शेळके, च्या काळात गरजेनुसार केलेले गीतलेखनही, उत्तम काव्यदर्जा राखून होते. ते कुठेतरी हरवल्यासारखे वाटतेय.
हे हिंदी चित्रपटांबाबतीते पण झालेय.... शब्द्प्रधान गाण्यांची जागा ठेकावाल्या गाण्यांनी घेतल्यावर हे अपेक्षितच.... पण चित्र इतके निराशादायकही नाही आहे.... उलट मधल्या काळातल्या र ला र आणि ट ला ट जुळवुन केलेल्या नांदगावकरी गाण्यांपेक्षा आत्ताची गाणी अधिक अर्थपूर्ण आणि विषयाशी सुसंगत असतात!
संदीप खरे, गुरु ठाकुर यांचे शब्द अजुनही अभिरुचीची कास धरुन आहेत
५)>>लावणी नृत्यांगना (सुरेखा पुणेकर, राजश्री नगरकर, माया खुटेगावकर अशा अनेक) उत्तम लावण्या इतरत्र सादर करत असताना, नृत्यासाठीच नव्हे तर नृत्यदिग्दर्शनासाठी त्या मराठी चित्रपटात का आल्या नाहीत ?
कारण आजकाल तमाशाप्रधान चित्रपट वर्षा-सहामहिन्यांनी एखादा होतो.... मराठी चित्रपटातले नृत्य म्हणजे लावणी ही एकच ओळख आता राहीलेली नाही.... आणि फक्त झाडांभोवती फिरणार्या आणि कवायती करणार्या मधल्या काळातल्या नाच गाण्यापेक्षा आजचे नृत्य अधिक ग्लोबल आहे
अतिचिकित्सा ही कधी कधी एखाद्या गोष्टीच्या निर्भेळ आनंदाला मारक ठरते.... असे आपले माझे मत!
Pages