"पाऊस - हिंदी सिनेमातला आणि आपल्या मनातला"
---------------------
निसर्गातली नवजीवन फुलवणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पाऊस. रखरखलेल्या धरेला शांतवणारा, तिच्या शुष्क भेगाळल्या ओठांवर थेंबांचा शिडकावा करत तिला सृजनाची शक्ती परत मिळवून देणारा, हसरी बाळे परत तिच्या मांडीवर खेळवणारा. हाच पाऊस मना मनाला तृप्त करतो, हाच पाऊस प्रेमीजनांच्या हृदयात एक वेगळीच ऊब निर्माण करतो, विरहाचा अग्नी चेतवतो. हाच पाऊस बच्चेकंपनीला कारंज्यांसारखे उत्साहाने बेभान व्हायला लावतो तर सरत्या पिढीला "अजून एक पावसाळा" असं म्हणत अनुभवांचा लेखा जोखा घ्यायला लावतो. हाच पाऊस आपल्या अन्नदात्याच्या डोळ्यांत सरींवर सरी उभ्या करतो, तर हाच पाऊस छप्पर फाडून आभाळ आत घुसल्याने जमवलेली काडी काडी उद्ध्वस्त झाल्याने डोळ्यांतील अश्रूही सुकून जातील अशी वेळ आणतो.
खर्या आयुष्यात प्रत्येकाच्या अनुभवाला हे सर्वच्यासर्व येईलच असं नाही. पण तरीही माणसाने आभासी जगात एक प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे जिच्यात आपण हे सगळे पाहिजे तेव्हा म्हटलं तर त्रयस्थपणे आणि म्हटलं तर समरस होऊन अनुभवू शकतो. ही प्रतिसृष्टी म्हणजे आपणा सगळ्यांच्या जीवनाचा कमीजास्त प्रमाणात अविभाज्य भाग झालेली चित्रपटसृष्टी.
हा पाऊस जेव्हा जेव्हा सिनेमात हजेरी लावतो तेव्हा नेहमीच एक विशिष्ट भूमिका साकारत असतो.
ऑस्कर पारितोषिकासाठी प्रवेशिका मिळवून सर्वोत्तम विदेशी सिनेमाचं नामांकन मिळवलेला आशुतोष गोवारीकरांचा "लगान" तर पावसाच्या येण्या न येण्यावर आपला कथेचा डोलारा सांभाळून होता. ब्रिटिशांनी दुष्काळाने हैराण झालेल्या खेडुतांवर दुप्पट शेतसारा लादणे ही पार्श्वभूमी होतीच पण त्यांच्याबरोबरच दुसरा खरा खलनायक हा पाऊस होता. आमिर खान आणि त्याच्या क्रिकेट टीमला भरपूर परीक्षा द्यायला लावून तो मित्र म्हणून येऊ पाहतो तेव्हा "घनन घनन घनन घनन घनन घनन गिरी गिरी आये बदरा" असं वाजत गाजत त्याचं स्वागत केलं जातं. कित्येक वर्षांपुर्वी त्याचं स्वागत आपण "मदर इंडिया" मध्ये "दुख भरे दिन बिते रे भैया अब सावन आयो रे... देख रे घटा घिरकर आयी रस भर भर लायी" म्हणत केलं होतं. तर "दो बिघा जमीन" मध्ये "धरती कहे पुकारके, बीज बिछाले प्यारके, मौसम बीता जाए" पाहून आपणही कळवळलो होतो आणि "हरियाला सावन ढोल बजाता आया" पाहून आपल्याही मनात सावनके झुले बांधले गेले होते. "दो आँखे बारह हाथ" मधले "उमड घुमड कर आयी रे घटा". यामधली भरत व्यास आणि वसंत देसाईंची कमाल आणि क्रांतीकारी जेलर, एक खेळणी विकणारी स्त्री, दोन छोटी मुलं आणि सहा कैदी यांनी उजाड जमिनीत केलेल्या मेहनतीवर खरोखरचं पाणी पडल्यावर आता चांगलं पीक येणार ह्या आनंदाने केलेला जल्लोष असं सगळंच भारी होतं.
याच पावसाने "घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम, ताक झुम झुम ताक झुम झुम" या गाण्यावर "दिल तो पागल है" या नृत्यसंगीतमय सिनेमात माधुरी दिक्षित, शाहरुख खान आणि बच्चे कंपनीला मस्त भिजवून काढलं होतं.
आणि आईग्गं! हा पाऊस कधी कधी अशी काही भयानक भूमिका निभावतो की अंगावर काटा उभा राहतो. त्याचे संवाद म्हणजे "टप टप टप", "थाड थाड थाड" किंवा "रिप रिप रिप" असेच काहिसे असतात पण कमीत कमी शब्दांत प्रेक्षकांमध्ये जास्तीत जास्त उत्कंठा, घबराट अगदी "चांगलीच फाटली" म्हणण्याजोगी मनस्थिती निर्माण करण्याचं कसब याच्यात आहे. आठवला का दिलिपकुमार, वैजयंतीमालाचा "मधुमती"? साधना, मनोजकुमारचा "वो कौन थी?". पडद्यावरची पात्रं दिसायच्या आतच या कसबी कलाकाराने आपल्याला घाबरवायचं, आपली धडधड वाढवायचं काम फत्ते केलं होतं. आपले हात, ओढण्या, पदर डोळ्यांवर घेऊन हळूच किलकिल्या नजरेने ते दृष्य पाहणे ही एक नंतर हसू आणणारी क्रिया आपल्याकडून नकळत होत जाते. चित्रपटांतील ज्या मारहाणीची, पाठलागाची दृष्ये या पावसाच्या उपस्थितीत चित्रित केली गेली त्या दृष्यांचा कित्येक पटीने वाढलेला परिणाम आपल्याला श्वास रोखायला, नखं कुरतडायला लावतो. १९९८ सालच्या 'सत्या' मधलं सुरुवातीचं भिकू म्हात्रेच्या सहकार्यांचा- विठ्ठल मांजरेकर आणि बापूचा थरारक पाठलाग आणि खूनाचं भर गजबजलेल्या रस्त्यात आणि मुसळधार पावसातलं दृष्य असंच थरकाप उडवून गेलं होतं.
आता वळूया चित्रपटांमधल्या ज्या प्रांतामध्ये या पावसाने धूम उडवून लावली आहे त्याच्याकडे..... रोमान्स, प्रणय. एका नाजुक भावनेला हा पाऊस नेहमीच हात घालत आलेला आहे ती म्हणजे प्रियकर प्रेयसीचं प्रेम. प्रत्यक्षात पावसाळी पार्श्वभूमीवर प्रेम व्यक्त करण्यातली खुमारी काही औरच, पण त्यापेक्षा कितीतरी कल्पक रितीने ते चित्रपटांमध्ये व्यक्त झालेलं आपण पाहतो. हा बूस्टींग फॅक्टर असतो, तो म्हणजे पावसातला सुरेल रोमान्स. विचार करा हो, तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती पावसात किंवा पाऊस दिसेल अशा खिडकीत पावसाची मजा अनुभवता आहात, भलताच रोमँटिक मूड आहे, हात हातात घेतलेले आहेत, खांद्यावर हलकेच डोके टेकवले गेले आहे आणि अचानक.... तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला स्वतःच गाणं म्हणायचा मूड आला.... डिझास्टर होईल की हो! भयानक आवाजामुळे तो रोमँटिक मूड बीड पळून जाईल आणि फिदीफिदी हसायचा मूड आवरायची तुम्हाला पराकाष्ठा करावी लागेल (खरंच सुरेल गाणार्या प्रेमीजनांनी माफ करा बरं का, तुमच्यासाठी नव्हे हा टोमणा! ). अशावेळी तुम्ही गप्प बसायचं शहाणपण बाळगा आणि चुपचाप आवडत्या पावसाळी गाण्यांची सिडी लावून वेळ निभावून न्या कसं!
तर, ऑल टाईम पावसाळी रोमँटिक गाणं कुठलं असं विचारलं तर "बरसात की रात" मधल्या मधाहूनही गोड अशा मधुबालेचं आणि रिकाम्या पोळ्यासारख्या (काही उपमा सुचतच नाहिये!) भारत भुषणचे "जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात" हे पहिल्या नंबरवर येईल. ओलेती तरीही शालीन दिसणारी मधुबाला पाहणं जितकं भारी होतं तितकं चिंब भिजलेला आणि जॅकेटवाला भारत भूषण पाहणं आपल्याला झेपणार नाही म्हणून दिग्दर्शकाने तसे न दाखवल्याबद्दल अनेक कालातीत धन्यवाद! (भारत भूषणच्या पंख्यांनो माफ करा... हे काय ! सगळे अजून मधुकडेच बघतायत वाट्टं!, जाऊद्या झालं.)
असंच एक संयत पावसाळी रोमँटिक गाणं म्हणजे राज कपूर आणि नर्गिस ह्या जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या जोडीचं 'श्री ४२० "' मधलं "प्यार हुवा इकरार हुवा है प्यारसे फिर क्यूं डरता है दिल". एकच छत्री, एकाच वेळी दोघांना सारखाच भिजवणारा पाऊस, इतकं जवळ असूनही कुठेही अधाशी प्रेमाचा मागमूसही नाही. ह्या गाण्यांना शारीर प्रेम दाखवायची गरजच भासली नाही इतकी ताकद त्या शब्दांमध्ये, मुद्राभिनयामध्ये आणि संगीतात होती. तसेच "बरसात" सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणार्या निम्मीचं "बरसात में.. ताक धिना धिन.." ही असंच गोड होतं.
अशीच शांत पावसाळी रोमान्स दाखवणारी गाणी म्हणजे 'हसते जख्म' मधील 'तुम जो मिल गये हो', संजीवकुमार तनुजाचं "मुझे जा ना कहो मेरी जाँ", अमिताभ आणि मौसमीचं "रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन" आणि तसं हल्लीचं '१९४२- अ लव्ह स्टोरी' मधलं "रिमझिम रिमझिम रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुतमें तुम हम हम तुम".
पावसाला खट्याळ रुप दिलं ते "चलती का नाम गाडी" मध्ये किशोर कुमार आणि मधुबालाच्या "एक लडकी भीगी भागी सी..." तसेच 'चालबाज' मधल्या श्रीदेवीच्या "किसी के हाथ ना आयेगी ये लडकी" ने. किशोरदा आणि मधुबालाची "उसका कोई पेच भी ढिला है" म्हणत निर्मळ चिडवाचिडवी आणि श्रीदेवीचा एकटीचाच भन्नाट बेभान आणि तरीही निरागस डान्स हे दोन्ही आपल्या चेहर्यावर मिश्कील स्टँप उमटवून गेले.
कित्येक वेळा ढगांचा गडगडाट आणि वीजांचा कडकडाट हे हिरो हिरॉईनला त्यांच्यामधल्या प्रेमाचा साक्षात्कार घडवून द्यायचे. ती घाबरलेली... त्याचे तिला सावरणारे रुंद खांदे.. बास.. बाकीचं प्रेमात पडल्याचं कळवायचं काम त्यांच्यातली केमिस्ट्री करुन टाकायची. "दिल तेरा दिवाना" मध्ये तिकडे ढगांचा कडकडाट, दचकून शम्मी कपूरच्या उत्सुक बाहुपाशात शिरणारी माला सिन्हा आणि नंतर तिची लाजून चोरटी झालेली नजर आणि त्याचे काहीतरी सुचवणारे कटाक्ष. दोघांची धपापणारी हृदयं आणि आपल्या वाट्याला आलेलं धमाल "दिल तेरा दिवाना है सनम... जानते हो तुम... कुछ ना कहेंगे हम... मुहब्बत की कसम मुहब्बत की कसम". कित्ती सोप्पं करून दिलं बघा त्या पावसाने!
नायक नायिकेमधलं आकर्षण दाखवायला पाऊस हा कॅटालिस्ट म्हणूनही वापरला गेला आणि 'आराधना' मधलं चिंब भिजलेल्या राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचे "रुप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना.. भूल कोई हमसे ना हो जाए" हे खूप काळ लक्षात राहिलेले गाणे घडले. बाहेर हवेतला पावसाळी गारवा आणि आतला नैसर्गिक मानवी भावनांचा धगधगलेला विस्तव दिग्दर्शकाने अचूक चित्रित केला होता. आम्ही हे सगळं न कळत्या वयात टिव्हीवर पाहिलं होतं आणि डोक्यावरुन गेल्यामुळे आम्ही त्या गाण्याचं विडंबन पाठ केलं होतं "रुप तुला नसताना, दातांची कवळी असताना, कोण हिरॉईन तुजला करील गं".
नंतर काळाच्या ओघात खास पावसाळी गाण्यांसाठी नायिका प्लेन शिफॉन वापरु लागल्या किंवा शुभ्र ड्रेस वापरु लागल्या. नायकाच्या अंगात थोडे ट्रान्स्परंट असे शर्ट आले. एकमेकांना अजूनच प्रेमात पाडण्यासाठी लटके, झटके आणि मटके आले. धबाधब उड्या डान्स आले. या प्रकारच्या नाचांचे आद्य नर्तक बहुतेक जितेंद्र आणि लीना चंदावरकर असावेत. दोघांनी "हमजोली" मधल्या "हाय रे हाय.. नींद नही आय" गाण्यावर पावसात बसून, झोपून, उड्या मारून धमाल नाच केला होता. तो नाचाचा अनोखा प्रकार प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतला होता. आजही भेंड्या खेळताना 'ह' अक्षर आलं की हे गाणं म्हटलं जातंच आणि जितेंद्र, लीना आठवतातच.
नंतरच्या काळात श्रीदेवी अँड कंपनीने हा कित्ता साड्या नेसून गिरवला. नायकाला मोहात पाडण्यासाठी हेलकाव्यांची कवायत आणि अशा नावापुरत्या साड्यांची गरज असते असे दिग्दर्शकांचे ठाम मत बनत चालले होते. असो... श्रीदेवी गोड दिसली 'चांदनी' मधल्या "लगी आज सावन की फिर वो झडी है" मध्ये, पण काही नायिका मात्र बघवायच्या नाहीत.
पावसाचा अजून एक रोल आपल्याला विसरून चालणार नाही तो म्हणजे पाण्यानेच विरहाचा अग्नी चेतवणारा लबाड. 'परख' मधे साधनावर चित्रित झालेल्या "ओ सजना बरखा बहार आयी" या गाण्याच्या "तुमको पुकारे मेरे मन का पपीहरा, मीठी मीठी अगनीमें जले मोरा जियरा" या ओळी खल्लासच आहेत.
अशा या पावसाचा सिनेमातला रोल पुढे पुढे जात राहिला आणि आपण तो आपापल्या नजरेने पाहात राहिलो, स्वीकारत राहिलो.. नाकारत राहिलो. अजून कितीतरी आहे ह्या सिनेमातल्या पावसाबद्दल सांगण्याजोगं, पण तुम्हीच आपापल्या स्वभाव प्रकृतीप्रमाणे तुम्ही अनुभवलेला, साक्षीदार ठरलेला सिनेमातला पाऊस आठवा. आठवताना नक्की गालातल्या गालात हसू येईल, कधी डोळे भरुन येतील, कधी धडकी भरेल तर कधी काळजात हलकीशी कळ उठेल. कुठल्याही भावना असल्या तरी त्या या चित्रपट सृष्टीने जागवल्या याबद्दल मनात आपोआप कृतज्ञतेची भावनाही अंकुरेल.
अरे! एवढा वेळ गेला आपण एवढ्या पावसाच्या गप्पा मारतोय पण पाऊस आहेच कुठे? चला तर... तंद्रीतून जागे होऊया आणि गरमागरम कांदाभजी आणि वाफाळलेला चहा घेऊन टिव्हीसमोर बसून खोटा खोटा का होईना, पाऊस अनुभवूया.
मस्तं अश्विनी . श्रीदेवीच्या
मस्तं अश्विनी :).
श्रीदेवीच्या उल्लेखा बद्दल विशेष शाबासकी :फिदी:.
श्रीदेवी आणि पाउस: लगी आज सावन कि फिर वो झडी है, पर्बत से काली घटा टकराई, ना जाने कहां से आई है (चालबाझ), काटे नही कटते, मेघा रे मेघा (लम्हे) .
इतर लिस्ट मधे डिंपल च रुदाली मधलं 'झुटे मुठे मितवा' , दिल ये बेचैन वे (ताल), नमक हलाल चं 'आज रपट जाये तो हमे ना उठ्ठैय्यो' पण.
अश्विनी, छान आढावा .. डीजेला
अश्विनी, छान आढावा ..
डीजेला तर भलतंच खुष करून टाकलंस तू ..:)
पण एक शंका, "लगी आज सवन की" मध्ये श्रीदेवी आहे का? हे गाणं मेनली विनोद खन्ना आणि त्याची एक्स्-प्रेयसी (जुही चावला?) वर आहे ना? तसंच "प्यार हुआ इकरार हुआ है" श्री ४२० मधलं, बरसात मधलं नाही ..
लताच्या आवाजातलं "रिमझिम गिरे सावन" गाणं आणि व्हिडीयोही माझं मोस्ट फेव्हरेट .. बॉम्बे तल्या "तू ही रे" चाही पावसाळी मूड आवडतो मला आणि एक वेगळाच फ्लेवर देतो ( फक्त हिंदीत डब केलेल अरविंदचे तामिळ(?) रडके हावभाव बघवत नाहीत ..)
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.
अत्यंत अभ्यासपूर्ण लेख. मनःपूर्वक अभिनंदन.
पहिल्या भागात आणखी एक चित्रपट पावसावर लगानप्रमाणेच अवलंबून. निदान क्लायमॅक्ससाठी तो होता गाईड. .
सशल हो , आहे त्यात श्री आणि
सशल
हो , आहे त्यात श्री आणि जुही दोघी आहेत
चान्दनी ला लेमन कि फिकट पिव्ळ्या साडीत भिजताना बघूनच विनोद खन्नाच्या जुन्यस आठवणी जाग्या होतात.
>> एकच छत्री, एकाच वेळी
>> एकच छत्री, एकाच वेळी दोघांना सारखाच भिजवणारा पाऊस, इतकं जवळ असूनही कुठेही अधाशी प्रेमाचा मागमूसही नाही. ह्या गाण्यांना शारीर प्रेम दाखवायची गरजच भासली नाही इतकी ताकद त्या शब्दांमध्ये, मुद्राभिनयामध्ये आणि संगीतात होती
ह्याबद्दल मात्र सहमत नाही ..
पराग चा लाडका फोटो कुठे शोधता येईल ज्यात नर्गीस ला राज कपूर चं प्रेम आणि जिव्हाळा बघून शिंक येतेय तो?

वेगवेगळ्या काळातल्या
वेगवेगळ्या काळातल्या चित्रपटांमधला पावसाच्या आठवणी आवडल्या.
पाऊस हा एक हिंदी सिनेमातले महत्वाचे पात्र आहे
लेख वाचताना एक गोष्ट मात्र नाही ह्याची रूखरूख लागली.
-- पावसाबद्दलचा लेख आणि चक्क 'थोडासा रूमानी हो जाये'मधला हा प्रसंग उल्लेखलाही नाही? !!!!
http://www.youtube.com/watch?v=AT5oHv500ug
(अवांतर -- 'यल्गार' नावाच्या सिनेमात संजय दत्तला शर्ट काढून पावसात भिजताना आणि नगमाला मात्र कॉरिडॉरमधे साडीत नाचताना पाहून आमचा एक मित्र म्हणाला होता, "च्यायला, हा फिरोज खान म्हातारा झाला आता. नक्की कुणाला पावसात भिजवायचं तेही कळत नाही त्याला.")
--------
'गाथा चित्रशती' अॅडमिन टीम -- लेखांसाठी यू ट्युबची लि़क द्यायची नाहीये पण प्रतिसादात अशी लिंक देलेली चालत असावी असे गृहित धरले आहे. जर ते नियमबाह्य असेल तर ती लिंक ह्या प्रतिसादातून काढावी किंवा मला कळवावे आणि मी ती लिंक काढून टाकीन.)
मस्तच!! रिमझिम गिरे सावन चा
मस्तच!! रिमझिम गिरे सावन चा उल्लेख केव्हा येतोय असं वाचताना वाट होतं.
मस्त लेख केश्वी. वे टू गो.
मस्त लेख केश्वी. वे टू गो.
छान झालाय लेख !
छान झालाय लेख !
सशल, हो गं "श्री ४२०"च. असं
सशल, हो गं "श्री ४२०"च. असं समज, १लीतली मुलगी १०वीला बसली आहे गं आणि तेही झोपेत पेपर देत होती
अरविंद स्वामीला काही बोलायचं नाही हॉ !
शिंक काय !
संदिप चित्रे, रिमझिम गिरे सावन चा उल्लेख आहे की ! हा विषय डोक्यात आल्यावर "थोडासा रुमानी हो जाय" आणि बारीशकर आठवलाच आठवला होता. पण इतकी अगणित पाऊस गाणी आणि दृष्य आपल्या सिनेसृष्टीने अंगाखांद्यावर बाळगलीत की लिहिता लिहिता निसटूनच गेलं. इथल्या प्रतिसादांमधून असे निसटलेले उल्लेख येतीलच आणि तेच अपेक्षित आहे मला. लेखातला शेवटून दुसरा परिच्छेद यासाठीच तर आहे
प्रद्युम्नसंतु, गाईडमधला देव आनंदच्या माथी मारला गेलेला पाऊस आणू शकणारा महात्माही आठवला होताच. लिहावं तितकं थोडं आहे सिनेमातल्या पावसाबद्दल. या स्पर्धेला शब्दमर्यादा नाही पण माझ्या लिहिण्याच्या क्षमतेला आहे त्याचं काय?
सर्वांचे आभार
एकदम सह्ही लेख लिहिलाय
एकदम सह्ही लेख लिहिलाय केश्वे! पाऊस या महत्त्वाच्या कलाकाराच्या विविध भुमिका छान दाखवल्यायस.
>>>> "बरसात की रात" मधल्या मधाहूनही गोड अशा मधुबालेचं आणि रिकाम्या पोळ्यासारख्या >>>> इतकी समर्पक उपमा आहे ही!
@अश्विनी के -- >> अमिताभ आणि
@अश्विनी के --
सॉरी फॉर दॅट !
>> अमिताभ आणि मौसमीचं "रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन"
माझा आधीचा प्रतिसाद बदलला आहे आणि त्यातून 'रिमझिम गिरे...' काढून टाकलंय.
पहिल्यांदा लेख वाचताना वर दिलेले वाक्य नजरेतून सुटलेलं दिसतंय त्यामुळे लगेच बोंब ठोकून दिली होती
अश्विनी, सर्वप्रथम तू लिहिती
अश्विनी, सर्वप्रथम तू लिहिती झालीस त्याबद्दल (माबो स्टाईलने) खुप्प खुप्प अभिनंदन
सुंदर आढावा घेतला आहेस. (जुनी नवी, प्रेक्षकांवर गारूड करणारी अशी अनेक गाणी आठवणं हे खरंच कठीण काम आहे.)
रिकाम्या पोळ्यासारखा >>> अ फ ला तू न उपमा आहे ही !!
(आणि, परागची ती 'शिंक' कमेंट पण भारी आहे एकदम
त्याप्रकारच्या दृष्यात नर्गिसचा कायम तसाच चेहरा असायचा. :हाहा:)
संदिप चित्रे, सॉरी काय हो !
संदिप चित्रे, सॉरी काय हो ! होतं की असं
त्याप्रकारच्या दृष्यात नर्गिसचा कायम तसाच चेहरा असायचा. हाहा) >>> लले, तिचे डोळे प्रेमाच्या भरात अर्धोन्मिलीत का कायसे व्हायचे आणि तोंडही किंचीत उघडलं जायचं आणि तुम्हाला ते शिंक ट्रिगर होताना आपले होतात तसे वाटले काय? पण पटलं, मी आत्ता शिंकेची अॅक्टिंग करुन पाहिली
छान जमलाय लेख.
छान जमलाय लेख.
मस्त ग अश्विनी कीप्प्टि अप
मस्त ग अश्विनी
कीप्प्टि अप 
छान झालाय लेख. मला पाऊस
छान झालाय लेख.
मला पाऊस आवडतो, पावसाळी गाणीही जाम आवडतात
रिकाम्या पोळ्यासारखा
रिकाम्या पोळ्यासारखा >>>
धबाधब उड्या डान्स आले. >>>
आजही भेंड्या खेळताना 'ह' अक्षर आलं की हे गाणं म्हटलं जातंच आणि जितेंद्र, लीना आठवतातच.>>> + १००
लेख लिहिताना पूर्णपणे समरस होऊन लिहिला गेल्याचं जाणवतंय. मस्त लिहिलाय
खूप आवडला लेख!! मीही रिमझिम
खूप आवडला लेख!!
मीही रिमझिम गिरे सावन कुठे दिसतंय पाहात होते. ते दिसले मग परत लेख वाचला.
सुंदर लिहिलय. मुख्य म्हणजे
सुंदर लिहिलय. मुख्य म्हणजे गाणी ओळखीची आहेत
लिस्ट मध्ये दस्तक मधलं..
लिस्ट मध्ये दस्तक मधलं.. "सावन बरसे..", हम तुम मधले " हम तुम.. " पण माझ्याकडुन..
व्वा...व्वा.... छान पाऊस
व्वा...व्वा.... छान पाऊस
अश्वे मस्तच लिहिलयस ग !
अश्वे मस्तच लिहिलयस ग ! पावसातल्या नविन जुन्या गाण्यांचा आढावा छान आणि नेटका घेतलायस!
अशक्य उपमा.
रिकाम्या पोळ्यासारखा >>>
माझी अजून दोन आवडती पावसाची गाणी, "झिरझिर झिरझिर बदरवा बरसे" आणि "गरजत बरसत सावन आयो रे". तुझा लेख वाचल्यावर ही पण गाणी आठवल्या शिवाय रहावल नाही.
जियो... सगळ्यात महत्वाची
जियो...
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू... तू लिहायला लागलीस परत ! ग्रेट....
लेख तर छानच झालाय. आता लेखणीला फारसा आराम देवू नकोस प्लीज
ललिता+१. मस्त प्रयत्न
ललिता+१.
मस्त प्रयत्न केश्विनी.
अश्विनी.... मी काहिसा चिंतेत
अश्विनी....
मी काहिसा चिंतेत पडलो होतो की, इतक्या हव्याहव्याश्या वाटणार्या 'पावसात' परख मधील साधना राहिली की काय....पण थॅन्क गॉड, लेखाच्या अखेरीस 'परख' नाव वाचले अन् चटदिशी लक्षात आले... नक्की इतके सुंदर गाणे व प्रसंग लेखिकेकडून विसरले गेलेले नाहे....विसरले जाऊही शकत नाही....इतके पाऊस आणि परख यांचे नाते गोड आहे.
पावसाच्या आठवणी सुरेखच....भिजलेल्या नायिका आणि त्याना उद्देश्यून लिहिली गेलेली तितकीच भिजलेली गाणी हा हिंदी चित्रपटसृष्टीचे एक अविभाज्य असे अंग आहे. अनेक उदाहरणासह तुम्ही ते इथे रंगविले आहे की वाचताना प्रत्येक प्रसंग नजरेसमोर येत राहिला.
'मेरा नाम जोकर' मधील पद्मिनीचे 'मोरे अंग लग जा साजना...' हे आणखीन एक पावसाळी गाणे या निमित्ताने आठवले..... जे 'श्री ४२०' मधील त्या ट्रेड मार्क गाण्यासारखेच चित्रीत केले गेले होते.
देव आनंद + वहिदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेले 'रिमझिम के तराने लेके आई बरसात....याद आयी फिरसे वो पहिली मुलाकात....' हे 'कालाबझार' मधील आणखीन् एक छान पाऊसगीत.
अश्विनी अतिशय सुंदर लेख
अश्विनी अतिशय सुंदर लेख लिहिलायस ग. गाण्यांची तर इतकी सुंदर बरसात केली आहेस की सगळया गाण्यांची सिडी करुन घ्यावी अस वाटत. तुझा अभ्यासही चांगला आहे ह्या पावसाच्या गाण्यांवरचा. खुपच छान.
छानच अश्विनी,मस्त विषय
छानच अश्विनी,मस्त विषय निवडलास. एखादा 'पावसासाठी पाऊस' शेतकर्यांचा 'उमड घुमडकर आयी रे घटा' 'हरियाला सावन ढोल बजाता आया 'असाही आठवला.. बेस्ट लक परिपूर्ण लेखनासाठी.
लेख सुरेखच, पावसाचा (दुर)
लेख सुरेखच,

पावसाचा (दुर) उपयोग खलनायकांनी सुध्दा करून घेतलाच की
छान लिहीलय
छान लिहीलय
Pages