’कहीं दीप जले कहीं दिल’ या गीताचे सूर सतत कानावर पडत होते. अमीन सयानींच्या भरदार पण आर्जवी आवाजात आकर्षकपणे ’बीस साल बाद’ पहाण्याचं आवाहन रेडियोवर दर तासातासाला केलं जात होतं. रहस्य, खून. उत्कंठा यांनी माझ्या चौदा वर्षांच्या बालमनात धुमाकूळ घातला होता. कधी एकदा हा सिनेमा पहाण्याचा चान्स मिळतो असं झालं होतं. घरात तर अर्नाळकरांचे झुंजार, काळापहाड यांच्या पुस्तकांनाही बंदी होती. गणिताच्या पुस्तकात लपूनच झुंजार आपली शौर्याची कृत्ये मला दाखवू शकायचा. आई म्हणायची, "माझा बाबा किती अभ्यासू बनलाय." सारं काही ताडलेले मोठे भाऊ, "गणितं वाचतात?" एवढंच म्हणून गप्प रहायचे. रहस्यमय पुस्तकांची ही तऱ्हा तर ’बीस साल’सारखा खूनभरा सिनेमा मला कोण पाहू देतो.
पण देवाच्या कृपेनं अखेर तो योग आलाच. माझी भाची प्रतीक्षा चित्रे (सध्या सौ प्रतीक्षा पुणेकर), व भाचा अविनाश गोरेगावहून आले सुट्टीसाठी. आणि मोका साधून आईच्या मागं मी सिनेमासाठी टुमणं लावल्यावर तिनं सांगितलं, "जा बाबा, चांगला सिनेमा बघून या सगळेच." बस्स, आणखी काय हवं होतं? त्या रात्री मला थरारक स्वप्नं पडली. त्यात हेंट घालून हिंडणारा विश्वजीत होता; एकटीच जंगलात फिरणारी वहिदा, लांबलचक नखांचा पंजा माझ्या वर्गशिक्षकांचा गळा आवळतोय असंही एक छान स्वप्न पडलं. मी सकाळी जागा झालो तेच ’बीस साल बाद’ ओरडत. सकाळी नाश्त्याच्या वेळेपर्यंत थरार शिगेला पोचला होता. नाश्ता करता करता आईनं विचारलं, "कुठला सिनेमा बघणार आज?" मी क्षणार्धात उत्तरलो, "बीस साल---"
पण हाय! मी खूपच भोळा होतो. Lobbying ची मला काहीच कल्पना नव्हती, आणि हुशार प्रतिक्षा आणि अविनाश यांनी बहुधा रात्री विचारविनिमय करून नेमकं तेच केलं होतं. ते दोघेही एका सुरात ओरडले, "नाही आम्हाला नवरंग पहायचाय." प्रतिक्षा तर त्याहीपुढं जाऊन किंचाळली, "आजी, मला त्या खून-मारामारीच्या पिक्चरची भीती वाटते." तिला साथ देत अव्या किंचाळला, "मला रक्त बघवत नाही."
लॊबी जबरदस्त होती यात शंका नाही. आई लगेचच बळी पडली. तिनं मला खडसावलं, "काय रे, असला सिनेमा आहे तो?" मला जाणवलं की बीस साल आज तर विसराच, उद्या परवाही सोडा, पुढे केव्हातरी वीस वर्षांनंतर तो मॆटीनीलाच बघावा लागणार बहुधा. मी तत्काळ पाऊल उचलले. नाश्ता सोडून सरळ आईकडे गेलो. हुकमी लाडीगोडी लावत, तिच्या पोटावर तोंड घुसळत, काही बोलू पहात होतो, पण मुद्दाच नसल्यामुळे, "आ.....ई, उं...ऊं..." असे काही फुसके सूरच उमटू शकले. आईनं मला झुरळाप्रमाणं झटकून टाकलं, "पुरे झाला तुझा वात्रटपणा, प्रतिक्षा म्हणते तोच पिक्चर बघा. नाहीतर सरळ बागेत जा खेळायला."
भुताटकीच्या हवेलीतून थेट गल्लीच्या बाहेरच्या बागेत रवानगी! त्यापेक्षा ’नवरंग’ परवडला. मी कबूल झालो. आईनं पुन्हा एकदा विचारून घेतलं, "कुणी काढलाय हा नवरंग?
प्रतिक्षा-अविनाश (अति तत्परतेनं): "व्ही. शांताराम"
आई: "अरे वा, चांगला माणूस आहे. भलतंसलतं नाही दाखवायचा काही."
त्या रात्री राहूनराहून माझ्या मनात प्रश्न उमटत होता, "हे व्ही. शांताराम का जन्माला आले असावेत?"
अखेर आमची टोळी त्या दुपारी ’नवरंग’ पहायला रवाना झाली. मी ऐनवेळी काही वात्रटपणा करीन या कुशंकेनं आईनं माझ्या मोठ्या बंधूलाही बरोबर पाठविलं होतं. त्यामुळं इतर काही पर्याय शोधण्याचा प्रयत्न अशक्यच होता. आम्ही निघालो तेव्हा वाटेतच प्रभात टॊकीजला ’बीस साल बाद’ होता. मी आशाळभूतासारखा तिकडे वळून वळून पहात होतो. भावाकडून एक टपलीतही खाल्ली. बेफाम गर्दी होती तिथं. हाऊसफुलचा बोर्ड झळकत होता. काळाबाजार चालू होता. आणि नवरंग ओस पडलं होतं. संध्या एकटीच नाचत होती पोस्टरवर. डोअरकीपरनं औदार्यानं सांगितलं, "पूरा थेटर खाली है. पायजे तिथं बसा."
मी भाच्यांपासून दूर जाऊन एकटाच बसलो. मनस्थिती वाईट होती. मी प्रामाणिकपणे मनापासून हिरमुसलो होतो. सरळ झोपून जावं असा माझा बेत होता. कशाबशा जाहिरातीच्या स्लाईड्स बघितल्या. डोक्युमेंटरीत एक क्रिकेट सामना दाखवला म्हणून ती पाहिली. सिनेमा सुरू झाला तसा मी झोपायला सज्ज झालो. आणि ते घडले.
जे घडले ते आगळे होते, वेगळे होते. इतर कुणाला अपील झाले असो वा नसो, मला मात्र अपील झाले. माझी झोप गेली. ’नवरंग’ पूर्णपणे पाहिलाच पाहिजे अशी इच्छा, अभिलाषा मनात निर्माण झाली. इतकेच नव्हे तर त्या दृष्यानं माझा चित्रपट पहाण्याचा दृष्टीकोन पुरता बदलून टाकला. थेट आजपर्यंत.
असं होतं तरी काय ते? तर जेव्हा नवरंग सुरू झाला व मी पापण्या मिटू लागलो, तेव्हाच पडद्यावर एक लोकरीची टोपी घातलेला माणूस अवतीर्ण झाला. नेहमीच्या नटांपेक्षा कितीतरी अधिक देखणा आणि भारदस्त. तो काही सांगू लागला आणि झोपायचं विसरून मी ऐकूही लागलो, "तुम्हाला माहिती आहेच की मी माझ्या चित्रांतून, आणि चित्रपटांतून लोकांना आनंद देण्याचं काम करतो. पण दुर्दैवानं असा काही काळ आला की हे कार्य आता कायमचं बंद पडणार असं वाटू लागलं. माझा यापूर्वीचा चित्रपट ’दो ऒंखे बारह हाथ’च्या शेवटच्या प्रसंगात बैलाशी झटापट करताना माझ्या डोळ्यांना दुखापत झाली, व दृष्टी कायमची जातेय की काय असे वाटू लागले. तुम्हाला वाटेल की हा काय आपले दु:ख उगाळतोय आमच्यासमोर! पण तसे नाही, मी माझे दु:ख उगाळू इच्छित नाही, तर हे दु:ख सहन करत असताना मला जो सुखाचाही अनुभव आला तो तुम्हाला देण्यासाठी मी इथे उभारलोय. सुदैवाने माझी दृष्टी आता व्यवस्थित आहे. काही काळ अंधारात काढल्यानंतर दृष्टी परत आली तेव्हा जीवनाचे जे रंग मला दिसले तेच नवरंग तुम्हाला सादर करतो." इतकं म्हणून तो माणूस लुप्त झाला. पडद्यावर सात मटक्यांतुन सप्तरंग ओघळले व नवरंग अक्षरं उमटली. माझ्या बालमनावर हा सुसंवाद विलक्षण परिणाम करून गेला. स्वत:च्या दु:खातून सुख शोधायचं आणि त्यात इतरांना सहभागी करून घ्यायचं ही काही विलक्षणच गोष्ट होती. अर्थात ती माझ्या मनाला इतकी भावली यालाही एक कारण होतं. काही थोड्याच दिवसांपूर्वी माझे वर्गशिक्षक श्री. सीताराम अनंत प्रभू यांच्या आई गेल्या होत्या. त्या घटनेनंतर प्रभूगुरूजी जेव्हा प्रथम वर्गात आले तेव्हा अक्षरश: ढसढसा रडले. इतके की सर्व वर्गाला हुंदके फुटले. आम्ही सारेच रडू लागलो. पण गुरूजी स्वत:ला आवरून म्हणाले, "मुलांनो, अश्रू आवरा. मला तुम्हाला दु:ख नव्हतं द्यायचं. तुम्ही रडल्यानं माझी आई तिकडं दु:खीच होईल. तिला सुखवायचं असेल ना, तर तुम्ही हसून दाखवा. थोडंसं का होईना, हसा बरं!" आणि आम्ही हसू लागलो. डोळ्यांतले अश्रू पुसून हसू लागलो. आणि आमच्याबरोबर डोळ्यातले आंसू टिपत हसू लागले सीताराम अनंत प्रभू गुरूजी.
प्रभात सिनेगृहाच्या खुर्चीवर बसून शांतारामांचे भाषण ऐकता ऐकता माझ्यापुढे हळुवारपणे साकार होत होते प्रभू गुरूजी. आणि तिथंच मला गवसली होती चित्रपट सुंदर रीतीनं पहाण्याची एक सोन्याची किल्ली. दुसऱ्याच दिवशी मी प्रभू गुरूजींच्या घरी धाव घेतली. त्यांनी मला व्ही. शांतारामांचा मुद्दा पूर्णपणे विश्लेषित करून तर सांगितलाच, पण पुढे ते म्हणाले, "सतीश, तू हे तुझे सुंदर प्रश्न घेऊन जो माझ्याकडे आलास, त्यातून मला तुझ्या आई-वडलांच्या संस्कृतीचं छान दर्शन घडलं. चित्रपट असेच पहात जा. त्यातलं आणि जीवनातलंही चांगलं ते टिपत जा."
व्ही. शांताराम व प्रभू गुरूजी यांनी माझी सिनेमा पहाण्याची दृष्टीच बदलून टाकली. मी तुकड्या तुकड्याने सिनेमा पाहू लागलो. त्यातले सुंदर ते वेचू लागलो, वाईट ते सोडू लागलो. या नव्या दृष्टीकोनाने मला वाईट सिनेमेही आवडू लागले. इतरांनी झिडकारलेल्या चित्रपटांतील एखादे उत्तम बीज शोधून माझं मन सुरेख फुलांची पालवीदार रोपं तयार करू लागलं आणि त्यावर विविधरंगी, विविधगंधी फुलाची बहार फुलू लागली. चित्रपटांतील माणसाच्या चांगुलपणाची दृष्यं, संवाद मी मनात साठवू लागलो. त्यांतला चांगुलपणा मला उल्हासित करू लागला.
माझ्या मनाच्या बागेत काय काय फुललं असेल? जंगलीतल्या माणूसघाण्या शम्मीकपूरच्या सुरवंटाचं झालेलं कोमल फुलपंखी पुष्प, सत्यकाममधला धर्मेंद्र, उपकार मधला मलंगचाचा, जंजीरचा शेरखान हे सारे तर होतेच. शिवाय जिगरी दोस्त या चित्रपटातील चिखलात फुललेलं एक कमळही त्या साठ्यात आहे. या चित्रपटात के. एन. सिंग खलनायक होता. त्याचं आपल्या मुलावर-जगदीपवर- अतिशय प्रेम. स्वत: जगदीप मात्र हीरो जितेन्द्रच्या बाजूचा. तो आपल्या बापाला म्हणजे चित्रपटाच्या खलनायकाला व त्याच्या टोळीतील लोकांनाच नायकासाठी कामाला लावतो. खलनायकही निमुटपणे मुलाच्या प्रेमाखातर गप्प रहातो. वाईट माणसातला हा चांगुलपणा अत्यंत हृद्य वाटतो. असेच काहीसे चित्रण अजय देवगण व अमरीश पुरी यांच्या फूल और कांटेमध्येही होते.
बॊबीमधला "प्रेम नाम है मेरा" हा संवाद खूपच लोकप्रिय झाला. डिंपल आणि ॠषी, गाणी, दिग्दर्शन या सगळ्याच आघाड्या आवडण्याजोग्या होत्या. मी मात्र व्ही. शांताराम व प्रभूगुरुजींच्या शिकवणीनुसार चांगुलपणाचा स्रोत शोधत होतो. ’उसका छूटा घरबार संसार जो करके प्यार यार किसिके दिलमे बसा, ए फसा!’ म्हणत या प्रेमिकांना पळून जाण्याचा संदेश देणाऱ्या अरुणा इराणीच्या रुपानं तर तो सापडलाच पण शिवाय शेवटच्या प्रसंगात आपापल्या मुलांना विमनस्कपणे शोधता शोधता बॉबीचे वडील बॉबी सोडून राजुला व राजूचे वडील बॉबीला हाका मारायला अजाणता सुरुवात करतात तेव्हा अधिकच प्रकर्षानं मिळाला.
असाच चांगुलपणा दिसला तो ’साहेब’ चित्रपटात अनिल कपूरच्या भूमिकेत. उडाणटप्पू गणला गेलेला साहेब बहिणीच्या लग्नासाठी किडनी दान करून पैसे मिळवतो, तेही कुणाला न सांगता, त्यातून. प्रेक्षक भारावून गेले होते.
शराबीतला वर्षानुवर्षे मूकपणे दीपक पराशरच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणारा अमिताभ, व तितक्याच आर्ततेनं त्या उपकारांना प्रतिसाद देऊन ऋण फेडू पहाणारा दीपक पराशर. हे रोल तर क्लायमॆक्सच.
पण शांतारामांची देणगी न संपणारी आहे. ’लगान’मध्ये भावाला न जुमानता आमीरच्या टीमला क्रिकेटचे धडे देणारी एलिझाबेथही माझ्या हृदयात कुपीबंद आहे. आणि लहान, पांगळ्या मुलींना गेट ओलांडायला खुबीनं मदत करणारी, तसेच आपले स्वप्न पुरे करण्यासाठी घेतलेली गाडी विकून आमीरला एक लाखाचे पुडके देणारी गझनीतली असीन. व्वा. सुंदरच. मी तर पुरा सिनेमा विसरलो पण असीनला नाही विसरणार. जेव्हा तेव्हा मी त्या आठवणीची कुपी उघडतो आणि त्या व्यक्तित्वाचे विविध सुगंध उसळी मारून माझ्या घरात शिरतात.
कितीक वर्षे लोटली. त्यादिवशी मी बीस साल बादच पाहिला असता तर! हवेलीतल्या सात खुनांबरोबर आणखी एक खून झाला असता. माझ्या चित्रदृष्टीचा. माझ्या मनात उमललेली ती नाजुक कुसुमे फुलण्याआधीच कोमेजली असती. पण मी सुदैवी होतो. विश्वजीतऐवजी व्ही. शांतारामांना भेटलो. रक्ताच्या रंगाऐवजी नवरंग पाहिले.
आज चित्रपटांना नावे ठेवणारे खूप लोक भेटतात. मी मात्र त्यांचे काहीच ऐकून घेत नाही. मला चित्रपट कसा पहायचा ते समजते. त्यातील सोनेरी फुले कशी वेचायची तेही कळते. कुठलाही सिनेमा असो. चल वेच फुले, वेच भराभर सारी, ही, हीच वेळ सोनेरी, असे म्हणत मी सुरूही करतो व माझ्या नजरेसमोर टायटल्स येतात,"राजकमल कलामंदिर पेश करते है, नवरंग."
हा आठवणींचा संच, ठेवा अतिशय
हा आठवणींचा संच, ठेवा अतिशय महत्वाचा वाटतो. आयुष्यात सिनेमा कसा आला आणि त्या सिनेमातील काय आयुष्यावर ठसा उमटवून गेले यांचा हा आढावा स्पर्धेच्या विषय क्रमांक एकशी अत्यंत सुसंगत व परफेक्ट वाटला.
शुभेच्छा
सुरेख लेख .... प्रत्येक
सुरेख लेख ....
प्रत्येक गोष्टीतून चांगलं काही शोधण्याचा हा तुमचा प्रयत्न खरोखर खुप छान आहे काका !
पहिले दोन्ही अभिप्राय
पहिले दोन्ही अभिप्राय बेफिकीरजी व विशालजींचे. देवाकडे मी मागितला एक डोळा, आणि मिळाले दोन. अतिशय शुभ वाटले.
मनःपूर्वक आभार.
लेख छान आहे !
लेख छान आहे !
आवडला लेख!
आवडला लेख!
वा प्रद्युम्न - तुमचा हा
वा प्रद्युम्न - तुमचा हा वेगळाच पण पॉझिटिव्ह अॅप्रोच असणारा दृष्टिकोन खूपच भावला. लेखनशैली सुंदरच.
या स्पर्धेच्या निमित्ताने सिनेसृष्टिने भारतीय प्रेक्षकांना काय काय दिले हे वाचून खूप मजा येतीये, आनंद वाटतोय. सिनेसृष्टिने अशा किती पिढ्या घडवल्यात याला गणनाच नाही.
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
हे व्ही. शांताराम का जन्माला
हे व्ही. शांताराम का जन्माला आले असावेत? >>

सुंदर काढलीय यादों की बारात.
अप्रतिम लिहिले आहे
अप्रतिम लिहिले आहे
हे व्ही. शांताराम का जन्माला
हे व्ही. शांताराम का जन्माला आले असावेत? >>
बाकी, चांगल्याचा शोध घेण्याची वृत्ती आवडली आपली! छान लिहलंत.
आवडलं !
आवडलं !
छान लिहिलंय... काहीसा निराळा
छान लिहिलंय... काहीसा निराळा दृष्टीकोन
)
(मी 'नवरंग' पाहिलाय, पण हे सुरूवातीचं व्ही.शांताराम यांचं निवेदन काही आठवत नाहीय
छान लिहले आहे.... शोधकवृत्ती
छान लिहले आहे.... शोधकवृत्ती आवडली... शुभेच्छा!
सुरेख.
सुरेख.
छान लिहिलं आहे. शुभेच्छा !
छान लिहिलं आहे. शुभेच्छा !
व्ही.शांताराम यांच्या निधनाला
व्ही.शांताराम यांच्या निधनाला २२ वर्षे होत आली आणि 'नवरंग' निर्मितीला तर ५० पेक्षा अधिक......इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही या दोन्ही घटकांना केन्द्रीभूत धरून कुणी इतके सुंदर लिखाण करीत असेल तर 'राजकमल' ची मोहिनी अजूनही ओसरलेली नाही असेच म्हणावे लागेल.
फार आनंद झाला मला की आजच्या धबडग्याच्या जमान्यात 'नवरंग' चे रंग उधळून त्या काळाकडे खेचून नेणारे याही पिढीत आहेच.
'नवरंग' चित्रपटाच्या टायटल्स पूर्णपणे ब्लॅक अॅण्ड व्हाईटमध्ये दाखवून ज्यावेळी निर्माता दिग्दर्शकाच्या नावाची पाळी येते त्यावेळी दरवाजाच्या चौकटीत खुद्द व्ही.शांताराम येतात आणि वर लिहिल्याप्रमाणे निवेदन करून झाल्यावर कॅमेरा त्या सात विविध रंगाच्या घागरीतून वाहणारे रंग टिपतो.....तिथून खर्या अर्थाने नवरंग कथानक खुलत जाते.
खूप आनंद झाला हा लेख वाचून त्या काळाची पुन्हा एकदा सफर करताना.
अशोक पाटील
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=N08V7tR6cxM
आवडला लेख.
आवडला लेख.
मुक्तेश्वरजी, शशांकजी, के.
मुक्तेश्वरजी, शशांकजी, के. अंजली, अनघा, साजिरा, अनिल तापकीर, शिल्पा.के, ललिता-प्रीति, शाम, प्रकाश कर्णिक, रुणुझुणू, शेळी, माधव आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.
अशोकजी: प्रोत्साहन मिळाले.
अशोकजी: प्रोत्साहन मिळाले. ऋणी आहे.
ट्यागोजी मोठ्या मनाने
ट्यागोजी मोठ्या मनाने प्रतिसाद दिलात. ऋणी आहे.
सुंदर! अतिशय आवडला लेख!
सुंदर! अतिशय आवडला लेख!
फारएंडः मनःपूर्वक आभार.
फारएंडः मनःपूर्वक आभार.
झुंजार्,काळापहाड हजारोनी
झुंजार्,काळापहाड हजारोनी पुस्तके वाचली ,तेव्हा आजी म्हणायची "मेलो कादमकुली(कादंबरी) वाचता,अभ्यास करुक नको मेल्याक".
सुंदर लिहिलय आपण,भरपूर शुभेच्छा!
विभाग्रजजी: आपल्या
विभाग्रजजी: आपल्या प्रतिसादाशिवाय मजा नाही. तुम्हाला ठाऊक आहेच.
मस्त लिहलंय.... मजा आली वाचुन
मस्त लिहलंय.... मजा आली वाचुन
खूप छान लिहिलंय आवडलं
खूप छान लिहिलंय
आवडलं 
छान लिहिलंय
छान लिहिलंय
कादमकुली >>> छान आहे हा शब्द
कादमकुली >>> छान आहे हा शब्द
प्रद्युम्नजी, ’नवरंग’ च्या
प्रद्युम्नजी,
’नवरंग’ च्या निमित्ताने चांगला आढावा घेतलात.
हा सिनेमा मी फार पूर्वी पहिला होता. आता त्यातलं फारसं काही लक्षात नाही.
फक्त दादरच्या ’प्लाझा’ सिनेमागृहात तो अनेक आठवडे सुरू होता इतकं आठवतंय.
Pages