मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण ;)

Submitted by अवल on 8 August, 2012 - 00:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवून थोडे मोड आलेले मसूर एक वाटी
सुके खोबरे किसून पाव वाटी
कांदे ४
तेल ४ चमचे
तिखट १ चमचा
हळद १/४ चमचा
हिंग चिमूटभर
धणे १ चमचा
दालचिनीचे एक इंचाचे तीन तुकडे
लसून ५ पाकळ्या
आलं अगदी छोटा तुकडा
कोथिंबीर
चिंच २ बुटुक
मीठ चवीपुरते

क्रमवार पाककृती: 

मसूर आधल्या दिवशी ४ वाजता भिजत घालावेत. रात्री उपसून फडक्यात बांधून ठेवावेत. सकाळी निवडून घ्यावेत.
३ कांदे उभे चिरून घ्यावेत. १ कांदा बारीक चिरून घ्यावा.
तळके वाटण * : कढई तापवावी. त्यात उभा चिरलेला कांदा टाकावा. थोडा परतला की १ चमचा तेल टाकून परतावा. त्यात आलं, लसूण चिरून टाकावा. १ चमचा धणे टाका. १ दालचिनीचा तुकडा टाका. चांगला ब्राऊन रंग होई पर्यंत परता. मिक्सरमध्ये हे सर्व काढून घ्या.
आता कढईत सुक्या खोब-याचा किस घाला. मंद आचेवर चांगला लाल होऊ द्या. हेही मिक्सरम्ध्ये घ्या. कोथिंबीरीतला एक हिस्सा यात टाका. आता मिक्सरवर हे वाटण अगदी उगाळलेल्या चंदनसारखे गुळगुळीत वाटून घ्या.

1344398692613.jpgआमटी :
मोठ्या भांड्यात तीन चमचे तेल तापत ठेवा. त्यात दालचिनीचे २ तुकडे टाका. हिंग टाका. गॅस बारीक करून हळद, तिखट आणि १/२ हिस्सा कोथिंबीर घाला. लगेच कांदा घाला. कांदा थोडा परतला, त्याचा रंग बदलला की मसूर घाला. परता. तेल सुटू लागले की त्यात वरचे तळके वाटण टाका. परता. पाणी घालण्याची अजिबात घाई करू नका. ८-१० मिनिटे बारीक गॅसवर परतत रहा. मिश्रण तेल सोडू लागले, रंग ब्राऊन झाला की त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घाला. आता गॅस मोठा करा. एक उकळी आली की गॅस बारी करून झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा. भरपूर‍ परतले असल्याने ५ मिनिटात मसूर शिजतात.
आता झाकण काढून मसूर शिजला आहे ना हे तपासा. आता त्यात चवीपुरते मीठ टाका, २ बुटुक चिंच टाका. पुन्हा मंद गॅसवर ५ मिनिटे उकलत ठेवा. आता चिंचेची बुटुकं शोधून बाहेर काढा. मग आमटीत उरलेली किथिंबीर घाला. एक उकळी आली की गॅस बंद करा. तयार आहे मसूरची आमटी उर्फ व्हेज मटण.
1344398716212.jpg1344398737711.jpg

वाढणी/प्रमाण: 
तिघांना पुरेल.
अधिक टिपा: 

१. तळके वाटण ही सीकेप्यांची खासियत. प्रत्येक पदार्थानुसार यातले घटक काही प्रमाणात बदलतात. जेसे मटण असेल तर आलं, लसून जास्ती घेतले जाते शिवाय लवंग्-दालचिनी-मिरे अ‍ॅड होतात. मूगाचे बिरडे असेल तर आलं, गरम मसाला वगळले जातात, मसूराच्या आमटीला आलं-लसून दोन्ही कमी केले जातात, त्यात दालचिनी अ‍ॅड केली जाते, इ...
२. ही आमटी आंबोळ्यांबरोबर फर्मास लागते. तेव्हामात्र आमटीमध्ये पाणी जास्ती घालतात अन तिखटही वाढवतात.
३. वर सांगीतलेली आमटी तांदळाची भाकरी, फुलके, भात या बरोबर मस्त लागते. भात-आमटी, भाजलेला पापड अन लोणचे... वा !
४. श्रावणात आम्हा सीकेप्यांना मटणाचा फार विरह होतो. तो सोसायला ताकद म्हणून हे व्हेज मटण फार फार उपयोगी पडते Wink चव खरोखर मटणासारखी येते. फक्त परतायचा कंटाळा करता कामा नये Happy

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक सीकेपी पदार्थ
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, भारी Lol
सशल, कोथिंबीर फोडणीत टाकली की स्वादही वेगळा येतो अन वरती येणार्‍या तेलाच्या तवंगावर ती तरंगत राहते Happy
स्वाती, सशल मोळीबद्दल अनुमोदन, स्पेशली > ना कधी तीने स्वतः मोळी बंधून आमटीत टाकली ना आम्ही .. < साठी Lol
अगो, लोला अगदी खरं गो Happy पण काय करणार दूधाची तहान.....
इब्लिस, हो सुरणाची पण सुक्या मटनासारखी भाजी करतात. अन ती लागतेही जरा मटनासारखी. टाकेन इथे रेसिपी, केली की, फोटोसह ( तुम्हाला जळवायला Wink )
झंपी, मसूराला एक थोडा वेगळा वास असतो, तो घालवायला ही दालचिनी उपयोगाला येते Happy

अवल छानच रेसिपी.

माझी आई पण माहेरून सिकेपी असल्याने ही आमटी आमच्या घरी अगदी स्टेपल. मुल पण आवडिने खातात. आणि नॉन्-व्हेज न खाणारे पाहुणे पार्टीत असले की आवर्जून केली जाते. आईच्या रेसिपी नुसार गरम मसाल्यात धने, बडिशोप, दोन लवंगा, ३-४ मिरे, अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा, किंचित जायपत्री वा जायफळ, खसखस असा लवाजमा असतो. ही आमटी, आणि आंबोळ्या वा तांदळाची उकडीची भाकरी, आणि सोबत दही-कांदा हा एक जबरदस्त मेन्यू आहे.

कल्पू >ही आमटी, आणि आंबोळ्या वा तांदळाची उकडीची भाकरी, < अगदी अगदी. कसलं भारी लागतं ना ? काल रात्री केलेच आंबोळे त्याबरोबर. मग काय लेकाने आडवा हात मारला. पातेल्याचा तळ दिसला Happy

मसूर कसे दिसतात, ड्राय मसूरचा फोटो टाकाल का? मंजे दुकानात जाऊन आणता येइल. व्हेज मटन मला पण ऑक्सीमोरॉन वाटलेलं.पण एक उसळ म्हणून खायला मस्तच लागेल.

हे घ्या अश्विनीमामी.
अख्खे मसूर
अख्खे मसूर
मसूर डाळ
मसूर डाळ

मसूर डाळीत लाखी डाळीची भेसळ होते, अन त्याने लाथिरिझम नावाचा एक आजार होतो. हे एक कारण अन आपल्या महाराष्ट्रात ही तशीही फार स्टेपल नाहिये. नॉर्थ कडे जास्त चालते. स्वस्त कडधान्य आहे ते. तुम्हाला या मसूरीची ही ओळख असेल कदाचित :
दालमोठ :
दालमोठ

समुद्रापल्याड रेड लेंटिल्स म्हणतात बहुतेक. (red lentils)

@ अवल,
तुमच्या छान धाग्यावर येऊन इब्लिस लुडबुड करणारी माझी पाकृ लाईटली घेतल्याबद्दल धन्यवाद!
सुरणाची भाजी यायची वाट पहातोय.

आईच्या हातची मसूराची आमटी आवडायची. मी स्वतः कधी फारशी केलेली नाही.
ह्या मसाल्याने करून बघेन.
इब्लिस Lol
ढेकणाची उसळ....ईईईईई Angry Sad

(माझ्या थोरल्या भावाने लहानपणी कलिंगडाचा गर 'हे बघ मटण' म्हणुन समोर धरलेला तर कॉलेजात जायला लागेपर्यंत कलिंगडाला हात लावत नव्हते Lol
तसंच सांडग्याच्या भाजीला लांडग्याची भाजी म्हटल्यामुळे मला अजूनही सांडगे खायला इच्छा होत नाही.
अर्थात ह्या लहानपणच्या गोष्टी. आता कुणी काहीही म्हटलं तरी इतकं जीवाला लागत नाही)

आख्खा मसूर तो हाच का???? कोल्हापूर , सांगली कडे खूप प्रसिध्द आहे ... पण मला रेसिपि माहित नाहि

चांग्लीहे कृती Happy
मसूर डाळीचे वरण मुस्लीम लोक जास्त खातात म्हणे. घरात मला एकटीलाच म.डा. वरण आणि आख्खा मसूर मोड आणून उसळ आवडते. म्हणून कमीच होते आमच्याकडे Happy अश्याच पध्दतीने कोणतेही कड ढान्य चांगले लागेल. आख्खे तूर आणलेत ते करून पहाते या कृतीने. Happy

धन्यवाद इब्लिस. त्या मसूर डाळीची एक खिचडी पण रेश्पी आहे इथे. करको देखेंगा. बट ऑनेस्टली एव्ढी मेहनत करायची तर त्यात चार तुकडे मटन टाकले तर लवकर होइल Happy

आमच्याकडे मसूर डाळ खाल्ली तर मटण खाल्ल्याचे पाप लागते असे म्हणतात. का ते वरील रेसिपी वाचल्यावर समजले Proud

कोल्हापूरला एक "अख्खा मसूर" नावाचे हॉटेल आहे. तिथली ही फेमस डिश आहे म्हणे. Happy

मस्त! माझी आई वाटणात धण्याबरोबर थोडी बडिशोपही घेते आणि चिंचे ऐवजी कोकम! भाजणीच्या पिठाच्या वड्यांबरोबर मसुराची आमटी! यम्मी!

अरब जगतात खास करुन इजिप्त मधे भरपूर मसूर खातात, पण ते वरील फोटोत आहेत त्यापेक्षा थोडे वेगळे म्हणजे मोठे असतात. (भात्+पास्ता+मसूर + सॉस असा इजिप्त मधला आहार असतो.)

सध्या, मला इथे फक्त मसूर डाळच मिळतेय !

मलाही हा पदार्थ खूप आवडतो
तुम्ही दिलेल्या अन् मी खाल्लेल्यात जरासा फरक आहे
असो

धन्यवाद !!

अवल , आज केली ही आमटी. सॉल्लिड टेस्टी झालीय.मसूर न आवडणार्या नी पण मटकावली. ़खूप धन्यवाद

धन्यवाद सर्वांना.
सुचरिता, मी वेगळं काही भिजवत नाही, या आमटीबरोबर आपलं नेहमीचे इडलीचे पीठच वापरते आंबोळ्यांसाठी Happy तीन वाट्या उकडा तांदूळ, १ वाटी उडीदाची डाळ, ३ चमचे मेथ्या. कुरकुरीतपणा हवा असेल तर वाटताना त्यात एक मूठ पोहे.
ऑर्किड Happy

सुचरिता माझ्या सासूबाइ आंबोळ्यांसाठी तांदूळ, अक्खे उडीद, चणा डाळ, मेथ्या, धने असे गिरणीतून दळून आणतात.

गुगलून पाहिल्यावर मायबोलीवरील जुन्या हितगूजचे पान उघडले अन् आंबोळीची सोनचाफाची २००८ सालची रेसिपी मिळाली.
प्रत्येकी १ वाटी चणा डाळ्,उडीद डाळ,मूग डाळ व तूर डाळ,त्याच वाटीने १० वाट्या तान्दूळ,३/४ मेथीदाणा व धणे एकत्र दळणे.

Aajach keleli hi aamati...masta jhali hoti....

आज केलीय ही आमटी. कोथिंबीर तीन हिश्श्यांत घालण्यापासून तंतोतंत फॉलो केली. शिवाय लोलाने सांगितल्याप्रमाणे थोडी बडीशेप पूड आणि किंचित गूळही घातला. अत्यंत भाऽरी लागतेय !!
आता मसुराची उसळ साध्या पद्धतीने घशाखाली उतरणं अवघड आहे Happy

अवल छानच लिहिली आहे ही पा. कृ. ती पण फोटोसहित.

आधिक टीप न. ४ भारीच आवडली आणि पटलीही.

ही अशी मसूरची आमटी भाजणीच्या वड्यांबरोबरही सही लागते हं !अग्दी व्हेज मटण-वडे असं काँबिनेशन

आज केलीय ही आमटी. लोलाने सांगितल्याप्रमाणे थोडी बडीशेप आणि गूळही घातला. मस्तच लागतेय.. धन्यवाद अवल आणि लोला.

Pages