Submitted by भारती.. on 8 August, 2012 - 08:07
उतरले अलंकार..
उतरले अलंकार . दीन वसन मलीन
कशी कुणाला सांगावी पूर्ववर्तनाची शान
येथे क्षण नित्य खरा फक्त आत्ताच्या श्वासाचा
कोणी कशास वाचावा ग्रंथ तुझ्या अस्तित्वाचा
आता व्हावेस तू स्वस्थ निरखावेस स्वतःला
काय हरवले कोठे .. विचारावेस प्रभूला
एक जाणणारा तोच तुझी आंतरवादळे
तुझ्या चुका तुझ्या त्रुटी- निष्ठा आणिक उमाळे
त्याने दिले तुला शब्द दिली कवितेची साथ
किती प्रेममय आप्त - सुहृदांसवे उसंत
ऋण त्याचे ना फिटले गुंतलीस मात्र येथे
फुले वेचली हातांनी आणि पावलांत काटे
आता स्तब्ध एकांतात सार्यांसाठीच प्रार्थना
सुख म्हणजेच ज्ञान कर त्याचीच याचना
येई वर्षत उदारा - तापले रे मरुस्थळ
भ्रम नजरेचा मिटो मालवो हे मृगजळ
भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा.. पुन्हा एक सुंदर
व्वा.. पुन्हा एक सुंदर ..गंधभारला आनंद मिळाला. पहीलं कडवं खासच आवडले. शेवटही खुप छान.
येई वर्षत उदारा तापले रे मरुस्थळ
भ्रम नजरेचा मिटो मालवो हे मृगजळ ... व्वा.
धन्यवाद भारतीजी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता व्हावेस तू स्वस्थ
आता व्हावेस तू स्वस्थ निरखावेस स्वतःला
काय हरवले कोठे .. विचारावेस प्रभूला
एक जाणणारा तोच तुझी आंतरवादळे
तुझ्या चुका तुझ्या त्रुटी- निष्ठा आणिक उमाळे >> वा भारती, फार छान लिहीलेत आपण!
स्वतःला असे संयमाने सांगणे कधी कधी अपार गरजेचे ठरते नाही? विमनस्कता, वैताग, दुखावलेले मन सार्यांचा परिपाक म्हणजे 'स्वसंवाद' आहे, इथे प्रभूला सामोरे ठेवले की त्याच्या आदरयुक्त भितीने का होईना, स्वतःचे परखड परिक्षण घडावे हा खयालच रोमांचकारी आहे!
खूपच मस्त ऑर्फिअस अन्
खूपच मस्त
ऑर्फिअस अन् बागेश्रीचे प्रतिसादही छान
धन्यवाद भारतीताई
खूप धन्स
खूप धन्स सुधाकर,बागेश्री,वैभव..
बागेश्री,अगदी अचूक पकडलात मूड.
वाह! सुरेख! येई वर्षत उदारा
वाह! सुरेख!
येई वर्षत उदारा तापले रे मरुस्थळ
भ्रम नजरेचा मिटो मालवो हे मृगजळ >> फार आवडले..
एक जाणणारा तोच तुझी
एक जाणणारा तोच तुझी आंतरवादळे
तुझ्या चुका तुझ्या त्रुटी- निष्ठा आणिक उमाळे >>>>>
व्वा खूपच सुंदर लिहिलय...!
मला खूप आवडली...!
धन्स अंजली ,आर्.एस्.टि...एका
धन्स अंजली ,आर्.एस्.टि...एका आर्त भावावस्थेतील उच्चार.
कधीकधी आपली रया गेल्याचे आपल्यालाच जाणवते अन ती जाणीव फार त्रासदायक असते.
हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते,माझ्यासारख्या आस्तिकांचे सोपे असते..
मनाचा संवाद कवितेत छान
मनाचा संवाद कवितेत छान अभिव्यक्त झालाय.
उत्तम आशय आणि अष्टाक्षरीचा गोडवा ... छानच.
---------------------------------------------------------------------
फक्त,
"एक जाणणारा तोच तुझी आंतरवादळे" या ओळीतील
’आंतरवादळे’ या शब्दाबाबत मी संभ्रमित आहे.
अंतरातील (मनातील) वादळे असा अर्थ अभिप्रेत असल्यास
’आं’तर हे कितपत ठीक अशी शंका आहे.
(शंका कदाचित रास्त नसेलही.)
भारती.... केवळ सुंदर. आता
भारती.... केवळ सुंदर.
आता व्हावेस तू स्वस्थ निरखावेस स्वतःला...
.. येई वर्षत उदारा तापले रे मरुस्थळ
भ्रम नजरेचा मिटो मालवो हे मृगजळ
नि:शब्दं.
आज आता ह्यानंतर काहीही वाचायचं नाही...
उल्हासजी,दाद, तुमच्या
उल्हासजी,दाद,
तुमच्या प्रतिक्रिया आज आता वाचल्या.
वाचून ही भावना शब्द्बद्ध केल्याचे सार्थक वाटले.. आपला छान न दिसणारा फोटो असावा तशा काही भावावस्था असतात, अपरिहार्यपणे सोसाव्या लागतात. ,पण आपल्याला समग्रता शिकवतात..
उल्हासजी, तोच अर्थ अभिप्रेत आहे.. त्याचं व्याकरण मी जाणत नाही, पण सहजपणे नेणिवेतून कुसुमाग्रजांच्या ओळी उमटल्या
समिधाच सख्या या यात कुठून ओलावा
कोठून फुलांपरी वा मकरंद असावा
जात्याच रुक्ष या एकच *त्यां आकांक्षा
तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा..
( *त्यांना अशा अर्थी,कवितेचं व्याकरण.. :)) )
मला वाटतं कविश्रेष्ठानी अंतरीचा (अंतर्यामीचा ) याच अर्थाने वापरलाय आंतर हा शब्द.