होल व्हिट बन्स - कणकेचे पाव/ब्रेड/बन

Submitted by मामी on 11 March, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कोमट पाणी : १/४ कप
कोमट दूध : १ कप
तेल : १/३ कप
ब्राऊन साखर / साधी साखर / मध - १/४ कप (हे मी जी रेसिपी नेटवरून घेतली होती त्यातलं प्रमाण दिलं आहे. पहिल्यांदा बन्स बनवले त्यावेळी याच प्रमाणानं मी पाव कप मध वापरला. पण खरंतर या प्रमाणानं बन्स गोड लागतात. त्यामुळे दुसर्‍या वेळी करताना एक चमचा साखर वापरली. ते आपल्याला झेपतात.)
यीस्ट - २ टेबलस्पून (ब्लुबर्डचं ड्राय यीस्ट मिळतं. हे छोट्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात (granules) असतं.)
मीठ - १ टेबलस्पून
अंड - १
कणिक - साडेतीन कप

इथे लिहिलेल्या पदार्थांच्या प्रमाणात जो कपाचा उल्लेख आहे तो आपल्या चहाचा कप नाही. हे कपाचे प्रमाण म्हणजे जे मेझरिंग कप्स असतात त्यांचं आहे. नेहमी घरी केक वगैरे करणार्‍यांकडे असा प्लॅस्टिक अथवा काचेचा मग असतो, त्यावर अर्धा कप, एक कप अशा खुणा असतात. साधारणपणे असा एक कप म्हणजे आपला चहाचा दीड कप (मध्यम आकाराचा) होतो. हे मी माझ्या घरातल्या चहाच्या कपाच्या प्रमाणाने सांगितले आहे. थोडेफार प्रमाण बदलले तरी ब्रेडवर तसा फारसा परिणाम दिसणार नाही.
या प्रमाणात घेऊन खूपच बन्स बनतात. म्हणून साधारण ३ लोकांकरता हवे असतील तर अर्ध्याच प्रमाणात बनवावे.

क्रमवार पाककृती: 

कोमट पाणी, कोमट दूध, यीस्ट, तेल, साखर (किंवा मध) एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करा आणि झाकून १५ मिनिटे तसंच राहू द्या.

अंड फोडून हलकेच फेटून घ्या.

पंधरा मिनिटांनी त्या मिश्रणाच्या भांड्यात अंडं, मीठ आणि कणिक घाला आणि चांगलं एकत्र करा. पुन्हा १५ मिनिटांकरता झाकून ठेवा.

एकीकडे आवन ३७५ डिग्री फॅरनहाईट (म्हणजे साधारण १९० डिग्री सेल्सियस) ला गरम करून घ्या.

पंधरा मिनिटांनी भिजवलेली कणिक नीट मळून घ्या. आता त्या कणकेला जाळी सुटलेली जाणवेल. या कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून आवनमध्ये १० मिनिटांकरता (किंवा बाहेरून सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत) भाजा.

अधिक टिपा: 

नुसते गोळे करण्यापेक्षा बर्‍याच कलाकुसरीही करता येतात. पहिल्यांदा बन्स केले त्यावेळी आम्ही बरेच आकार केले होते. करण्याच्या आणि खाण्याच्या त्या उत्साहात फोटो काढायचे मात्र राहून गेले. पण काही आकार :

स्माईली बनवणे - चपटा गोळा करून त्यावर दोन छोटे गोल डोळ्याच्या जागी आणि एक सुरळी करून हसरं तोंड बनवता येईल.
वेणी - तीन सुरळ्या करून तिपेडी वेणी वळून दोन्ही बाजूची टोकं व्यवस्थित एकत्र करून ठेवा.
असेच चकली, लगोरी, ब्रेडस्टिक्स असे असंख्य प्रकार करता येतिल.

हा ब्रेड गरमागरम एकदम सही लागतो. पण उरलात तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. एखाद-दोन दिवस चालेल.

हवं असल्यास कणिक भिजवताना त्यात पार्सली, ओरेगानो, बेसिल असे हर्ब्ज घालत येतील. दालचिनी पावडरही घालून करता येईल.

माहितीचा स्रोत: 
मंजूडीचं प्रोत्साहन आणि नेटवरून मिळालेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मस्तय. अगदिच सोप्पं. मी मागे उगीच दुकानात दिसलं म्हणून ते यिस्टचं पाकिट आणून ठेवलंय. उद्या करणार. (आजच करावं वाटतंय, पण घरी पाहूणे आहेत आणि त्यांना बहूदा बन्स, सुप आणि सलाड हे जेवण झेपणार नाही)

मस्त आहे. अंडे न घालता नाही का करता येणार? मागे एकदा एक रेसेपी मिळाली होती, पण हे जे ड्राय यीस्ट असतं ते दाण्यांच्या स्वरुपात असतं मग ते चांगल एकजीव होतं का ? माझं नक्कीच काहीतरी चुकलं असणार.

पण हे जे ड्राय यीस्ट असतं ते दाण्यांच्या स्वरुपात असतं मग ते चांगल एकजीव होतं का? >>> हो, मोकिमी. कारण आपण ते कोमट दुधात्/पाण्यात घालून ठेवतो ना, मग ते लगेच विरघळून प्रक्रिया सुरू ही करतं. नंतर त्यात कणिक मिसळून पुन्हा ठेवतो. तेव्हा ते कणकेतही फुगण्याची प्रक्रीया सुरू होऊन जाळी सुटलेली दिसायला लागते.

मामी, माझ्याकडे तो पूर्वीचा वरून काच लावलेला गोल ओव्हन आहे. त्यात होतील का हे? मी ओव्हन फार वापरला नाहीये त्यामुळे जरा कचरते आहे करून बघायलाही.

येस्स ! आज सकाळी सकाळी माबोवर आले होते बन्सची रेसिपी बघायला. एकीकडे बन्स बेक करायला ठेवले आणि माबोवर भरपुर टीपी केला. नुकतेच बन्स तयार झाले आहेत. यावेळेस एकदम परकेक्ट. कडक नाहीत,मस्त जाळीदार. ब्रेफा रेडी. थँक्स मामी !

वा मने, ब्रेडचा परिमळ इथपर्यंत दरवळतोय बरं का! आता जिभल्या चाटत खाऊन टाक आणि वर बशीभर दूध पिऊन कोपर्‍यात पडून रहा कशी! Happy

थॅक्स मामी, मी अत्ताच यिस्टचे पाकीट पाहीले (फोडलेही नाहीये आजून) फ्रिज मधे तर ते २० ग्रॅ. चे आहे. हे पाकीट स्टॅडर्ड साईज आहे. (रॉयल अ‍ॅक्टीव्ह ड्राईड यिस्ट) पण त्यात जेमतेम एक चमचा यीस्ट असावे. टे स्पु च्या हिशोबात. म्हणजे तुमच्या सांगितलेल्या प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणात मी ब्रेड बनवताना मला एक टेबल स्पून म्हणजे ते आख्खे पाकिट वापरावे लागेल. हे मी बरोबर करते आहे ना?

२० ग्रॅम मध्ये बरच यीस्ट होतं ग. त्यातलं एक टेबलस्पून म्हणजे २ चहाचे चमचे घे. Happy
स्टँडर्ड साईज म्हणजे आपले मसाले असतात त्या टाईपचं आहे का? त्यात बरंच यीस्ट असतं दोन्-तीनदा ब्रेड करता येतील एवढं. आत्ता माझ्याकडे नाहीये नाहीतर बघून सांगितलं असतं.

मामी, तुझ्या रेसिपीत एक गोष्ट अ‍ॅड कर. पाव भट्टीला लावले की माबोवर टिपी करावा. याने पाव परफेक्ट होतात. कडक न होता मस्त जाळीदार होतात. Proud

या बाफवर अनेकदा येऊन गेले. दरवेळेला मी गिरगावात असताना वाडीतच असलेल्या बेकरीतून येणारा पाव / नानकटाईचा वास दरवळला Happy अजूनी गिरगावात मी (हे 'अजून यौवनात मी' या चालीत वाचणार? Uhoh Proud )

मामी, आता मी ते २ च च. वापरते..:)जास्त विचार नाही करत. नेक्ट टाईम ओव्हनातल्या ब्रेडचाही फोटो टाकशील का प्लीज?

मामी, अगं इतका पोटभरु आणि बिनात्रासाचा ब्रेफा झाला ना कि खरंच परत एक पडी टाकली.

अश्विनी, कळतात हो कळतात असली बोलणी. Happy पण सगळं घर झोपलं असताना, मी तरी दुसरं काय करणार? यावच लागलं माबोवर. Wink

मामी:
मी पण केले हे पाव , झकास जमले..मला बेकिंग ची खूप धास्ती वाट्ते..पण ही रेसिपी जमली अगदी.

मी अंड घातल नाही . अर्ध्या मापाचेच केले, मोठ्या लिंबाच्या आकाराचे १७-१८ पाव झाले. पुढच्या वेळी आता खारे पाव ( तिखट, ओवा, तीळ वगैर घालून )करून बघणार.

छान रेसिपी बद्द्ल धन्यवाद.

हे मावेत कसे करायचे? कोणत्या मोडवर? कनवेक्शन कि ग्रील की मावे की मावे+कन, की ग्री+मावे? किती पॉवर वर. कृपया कोणी सांगेल का? करुन बघावेसे वाटतायत.

मावे+कन वर करावे लागतील. मी साध्या गोल आवनमध्ये भाजले होते.

पॉवरचा काही फार फंडा नाहीये. मध्यमपेक्षा जरा जास्त ठेऊन वरून खरपूस दिसायला लागले की बंद कर.

मामी,

मी शाकाहारी आहे मला अंडी चालत नाही. तेंव्हा बिनरअंड्याचे बन्स कसे करता येतील?

ईस्टचे शरिरावर काही विपरित परिणाम होतात का? ईस्ट नक्की कशापासून तयार होतं? घरच्याघरी ईस्ट बनवता येत नाही का?

अजून एक प्रश्नः जर कणकेला जाळी सुटायला पाहिजे हेच जर हवे असेल तर सकाळी मळवलेली कणिक जर वरचं ठेवली झाकून तर संध्याकाळपर्यंत ती कणिक सैल होऊन छान जाळी पडेल कणकेला.

मामी, मी यीस्ट घातले पण पिठ फुगले नाही. जुने होते यिस्ट (फ्रिजमधे होते २ महिने). नवे आणायचे का दर वेळेस?

सुमेधा, अ‍ॅक्टिव्ह ड्राय यीस्टची पाकीटे मिळत असतील तर ती आणा म्हणजे बरेच महिने टिकतात Happy दाण्यांच्या / पावडर स्वरुपातले कोरडे यीस्ट मी बाहेरच ठेवते.

Pages