प्रिय मायबोली,
'मैत्री'दिन म्हणताच पहिले आठवली ती तूच ! आपली ओळख तशी अलीकडचीच. माझ्या मनाचा कुठलाही प्रदेश तुला आंदण मिळाला नसतांना आपसुक रुजलेलं आपल्या मैत्रीचं बीज...
तुझी पहिली भेट अजून आठवतेय - गवसणीतून काढलेली सतार असते नं, मैफिलीसाठी जुळवलेली - तशी मनाची अवस्था होती - झंकारण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आतूर... अन् एका रेखीव क्षणी तू दिसलीस ! एखाद्या कुशल कलावंताच्या सराईत बोटांसारखंच तुझं अस्तित्व मनाच्या तारा छेडून गेलं. त्या साध्या असण्यातून मैत्रीसाठी तू घातलेली साद - काय विलक्षण सम साधली गेली मग !
तू दरवेळी पटलीस असं नाही, दरवेळीच आवडलीस असंही नाही, पण कायम 'आपली' वाटलीस मात्र ! आवडतं गाणं ऐकताना एखाद्या लकेरीशी दरवेळी नव्यानं थबकावं, तशीच तू ! तुझ्यामुळे माझ्याही नकळत मी खूप मोकळी होत गेले...... प्रत्येक क्षणाला सन्मुख होण्यासाठी, प्रत्येक कणाचं स्वागत करण्यासाठी, प्रत्येक नाविन्यामधलं सृजन शोधण्यासाठी, प्रत्येक सौंदर्यामागची सहजता टिपण्यासाठी !
तुझ्यात होतं सुसंवादाच्या सुरेल सुरावटींतून साकारलेलं संगमरवरी शिल्प - 'मैत्री'चं ! सह-अनुभूतीच्या सोज्वळ आभाळातून बरसणारं चांदणं - 'साहचर्या'चं !! हळूहळू मैफल कशी रंगत गेली कळलंही नाही. एखादा कोमल धैवत, एखादा तीव्र निषाद, कधी मंद्र सप्तक तर कधी तार सप्तक... असं जुळवून तू उभी केलेली रागदारी. कधी अवखळ खट्याळ 'अडाणा', कधी दुखरा गहिरा 'मालकंस', तर कधी दरवळणारा 'पूरिया'... विविध प्रहरी / विविध टप्प्यांवर अनेक रुपांत भेटलेली तू...
कधी पहाटेची शुचिर्भूत आरती कधी समुद्राची फेसाळणारी भरती
कधी वैशाखातलं रणरणतं ऊन कधी सायंकाळच्या 'शुभंकरोति'ची धून
कधी थेंबबावरी वळवाची सर कधी ऊन्हातल्या गुलमोहराचा बहर
कधी अळवावरचा पाणमोती कधी सह्याद्रीच्या कातळकठीण भिंती
कधी निरांजनी तेवती सांजवात कधी फुलांनी डंवरलेला पारिजात
कधी द्वितीयेची स्तब्ध चंद्रकोर कधी थुईथुई नाचणारा मोर......
हे असेच कशाकशातून गुणगुणणारे तुझे अस्तित्व......... ज्ञानेश्वरांना अपेक्षित 'मैत्र जीवाचें' चा गर्भरेशमी शेला विणणारे......... त्यात आता माझ्याही मनाचा एक हळवा धागा गुंतलाय..... प्रत्यक्षात आपण रोज भेटू न भेटू, दरवेळीच मनमोकळ्या गप्पा होतील न होतील, पण तुझ्या आठवणींनी मनात जो अहेतुक असा रुणझुण तरंग उमटतो, जो मोगर्याचा सुवास दरवळतो तो चिरंतनच राहील ! आज तुझ्या जीवनगाण्यातील नवा षड्ज आळवतांना तुला खूप खूप शुभेच्छा - तुझ्या पुढील वाटचालीसाठी, तुझ्या प्रत्येक स्वप्नासाठी, ह्या 'मैत्र' चा वेलु गगनावरी जाण्यासाठी !!!
'इयत्ता चौथी'चे
'इयत्ता चौथी'चे 'काळ-काम-वेगाचे' गणित सोडवणे किती सोप्पे होते! आता रोजच्या जगण्यात मात्र तेच खूप अवघड वाटते... त्यात लेखनासाठी निवांत क्षण अन् मन तर दुर्मिळच झालेय.... पण तुम्हा सर्वांच्या कौतुकामुळे, शुभेच्छांमुळे खूप हुरुप आलाय!
'मायबोली' बद्दलच्या भावना व्यक्त करता आल्या, इथल्या जाणकारांपर्यंत त्या पोहोचल्या, त्यांना भावल्या...... भरून पावले! खूप खूप धन्यवाद!!
किती मनापासून लिहीलेस... फार
किती मनापासून लिहीलेस... फार छान!
आवडतं गाणं ऐकताना एखाद्या लकेरीशी दरवेळी नव्यानं थबकावं, तशीच तू !>> अह्हा! अगदी
अरे वा ओवी छानच लिहलेयस गं
अरे वा ओवी छानच लिहलेयस गं एकदम
ओवी, किती सुंदर लिहिलस ग?
ओवी, किती सुंदर लिहिलस ग? उपमा, अलंकार सर्वच मस्त. खूप आवडल. पु.लेशु.
शशांकजी, आपला प्रतिसाद पण सुरेखच.
खूप खरंय.आवडलं
खूप खरंय.आवडलं
Pages