माझे आवडते प्रश्न...

Submitted by हर्षल_चव्हाण on 31 July, 2012 - 06:03

डोंगराच्या टकलावरती,
हिरवे कुंतल कसे उगवती?
मेघांच्या डोळ्यांतून काळ्या,
अश्रू का हो ओघळती?

आकाशाच्या अंगावरती,
रोजच शर्ट निळा कसा?
धरतीला पण रोज नव्याने
मिळतो नवा झगा कसा?

सरसर धावत येते सर पण,
कुशीत आईच्या जाते का?
हिरवे पाते कुठून येते?
असते त्यांचे नाते का?

झाडांच्या बाहूंवरती,
पक्षी आनंदे झुलती,
पंखांचे बळ; खोलण्या
दार नभाचे पुरती?

प्रश्नांचे मज नकोच उत्तर,
प्रश्न मला हे आवडती,
डोंगर मेघ आकाश धरती,
झाडे पक्षी हिरवी पाती... Happy
==================================================
हर्षल (३१ जुलै २०१२ - दु. ३.३०)
==================================================

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुरवातीच्या कडव्यांतले वर्णन + प्रश्न
आणि त्याहीपेक्षा अधिक;
"प्रश्नांचे मज नकोच उत्तर,
प्रश्न मला हे आवडती"

हे आवडलं.