रक्षाबंधन

Submitted by -शाम on 30 July, 2011 - 13:48

सगळ्या मायबोलीकर भगीनींना राखी पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा!!
=================================================

अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण
माऊलीच्या ममतेचं रुप गोजिरं बहिण...

जरी वेगळा वेगळा
तिचा-तुझा जन्म झाला
एक जीव दोन जागी
जणू विधात्याने केला
सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण

सोन्या-चांदीची झळाळी
तिने बांधल्या धाग्याला
जन्मोजन्मीची पुन्याई
जणू येतसे फळाला
गाठ रेशमी सांगते ठेव ध्यानात वचन

काकणांची किणकिण
गोड पैंजणांची धून
घरा-दारात करीते
जणू सुखाचं शिंपण
इडा-पिडा दूर लावी तुझं करून औक्षण

नको गोडं-धोडं देऊ
नको जरतारी साडी
नाही मागतं दौलत
देरे माया देरे थोडी
झणी धावत येईल बघ साद तू देऊन

-------------------------------------------------शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!!!! Happy

सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण...|| अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण>>>>सुंदर.

सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण...|| अरे आला अरे आला राखी पुनवेचा सण

>>> मला सख्खी बहिण नाही पण माझी मोठी मावस बहिण मला लहानपणापासून राखी बांधत आलेली. ७ वर्षापूर्वी ती अपघातात वारली. तेंव्हा पासून..... Sad

सेना
आणि जिप्सी
खूप खूप आभार!

विभाग्रज....तुझे विशेष आभार.
मित्रा,
इथले वाचक खूपच चोखंदळ आहेत
उगाचंच दाद नाही देत.
तेंव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.

धन्यवाद! Happy

इथले वाचक खूपच चोखंदळ आहेत
उगाचंच दाद नाही देत.>>>>>> याची प्रचीती माझ्याइतकी अजुन कोणाला असेल Happy
असो....

शाम कविता खुप खुप आवडली..
सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण...|| >>> भाऊ नसनार्‍या बहिणीची हिच व्यथा आहे...

नको गोडं-धोडं देऊ
नको जरतारी साडी
नाही मागतं दौलत
देरे माया देरे थोडी
झणी धावत येईल बघ साद तू देऊन...|| >> केवळ "अ प्र ती म" !!!!!!!!!

अतिशय छान आहे कविता!

जरी वेगळा वेगळा
तिचा-तुझा जन्म झाला
एक जीव दोन जागी
जणू विधात्याने केला>>> हे सर्वात आवडले.

कडव्यांची वाक्यरचना खूप सुरेख आहे. पण प्रत्येक कडवे संपताना गाण्यासारखे ते "अरे आला..." विचित्र वाटते. ते (प्रत्येक वेळेस) नसते तरी चालले असते. तेवढे वगळता कविता सुंदर!

खुप आवडली..
नको गोडं-धोडं देऊ
नको जरतारी साडी
नाही मागतं दौलत
देरे माया देरे थोडी
झणी धावत येईल बघ साद तू देऊन >> +१

शाम, आताच "श्यामची आई" पुस्तक वाचत होते, त्यातील शामसारखेच एकदम भावुक लिहीले आहेस.... बाकी मला कवितेतले एवढे काही समजत नाही, पण तु केलेली कविता आवडली......

जरी वेगळा वेगळा
तिचा-तुझा जन्म झाला
एक जीव दोन जागी
जणू विधात्याने केला
<<<<<

हे आवडले, कारण खुप सारे भाउ-बहिण हे एकमेकांसारखेच दिसत असतात..... एकच चेहरेपट्टी असलेले स्त्रीरुप व पुरुषरुप बघुन गंमत वाटते...... उदा. शुभा खोटे आणि विजु खोटे

सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण
<<<<<<

ह्म्म हे देखील खरेच, मात्र उलटया अर्थाने, सख्खा भाउ नाही म्हणुन कधी कधी वाईट वाटते Sad ..... पण कधी कधीच हा....... फक्त रक्षाबंधनापुरते Proud ...... बाकी आम्ही बहिणी आहोत की एकमेकींचा खंबीर आधार..... a big protector Happy

सलं विचारावी त्याला ज्याला नाही रे बहिण...||>>>>>>>>>>>

विठ्ठला वाचावलंस रे बाबा.... मला एक नाही , दोन नाही, तीन तीन सख्ख्या बहिणी दिल्यास ......
वरून मायबोलीवर इतक्या सगळ्या दिल्यास त्या वेगळ्याच ......
धन्स अ लॉट मेरे यार .....!!

आणि शामजी आपले ही लाख लाख आभार

आताच "श्यामची आई" पुस्तक वाचत होते, त्यातील शामसारखेच एकदम भावुक लिहीले आहेस >>>

वर्षा, आजपर्यंतच्या माझ्या लेखनाला मिळालेली ही सगळ्यात मोठी दाद समजतो मी.
दिपाली , वैभव आपलेही आभार!!