मिसळपाव

Submitted by सौरभ उपाध्ये on 29 June, 2012 - 12:42

मिसळपाव

बरेचदा आपण वेगवेगळी माणसे पाहतो ज्यांचे विचार, आवडी-निवडी आणि बरंच काही जरी भिन्न असलं तरी आपण सगळेजण एका गोष्टीशी सारखेच जुळलेले आहोत ते म्हणजे खवय्येगिरी. रोज घरातील भाजीपोळी जरी प्रिय असली तरी बाहेर मिळणारे काही पदार्थ अगदी मन आनंदित करून जातात. त्यात पाणीपुरी, डोसा , वडापाव असे अनेक पदार्थ जरी असले तरी माझ्यामते ख्यातनाम असा एक पदार्थ अगदी सहजतेने कुठेही पाहायला माफ करा खायला मिळतो आणि तो म्हणजे मिसळपाव. उसळ, फरसाण मिसळून त्यात कांदा, कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळून बनवलेली मिसळ जणू तोंडाला पाणी आणते.
मध्यंतरी, ठाण्याच्या सुप्रसिद्ध अशा मामलेदार या मिसळची चव घेण्याकरिता मी मित्रांसोबत गेलो होतो. कोर्ट नाक्याजवळ असलेल्या या आकाराने लहानग्या पण नावाने मोठ्या अशा दुकानात आम्हाला जागाच मिळाली नाही कारण इतक्या मोठ्या गर्दीपुढे थांबणे म्हणजे वेळ लागणार होता आणि भूकही लागली होती. तेव्हा ," समोरील आमंत्रण हॉटेलही त्यांचंच आहे ! " असं कोणीतरी सांगितलं आणि स्वारी समोर निघाली. इकडची मिसळ इतकी आवडली आणि सोबतीला वडे, ताकही उत्तम असल्याने आमच्यातला प्रत्येकजण जणू राक्षसच झाला होता.जणू इतकी मजा एखादी मिसळ आणू शकेल या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता .त्यानंतर घरी जाताना कसे-बसे चालत होतो तेव्हा मित्राच्या घरून त्याच्या आजीला देवाज्ञा झाल्याचा फोन आला आणि आम्ही सगळेच शांत झालो. खरंच, ज्या मिसळीमुळे इतके आनंदी होतो ती मिसळ जणू मध्येच तिखट झाल्यासारखी वाटत होती.
खरंतर, मिसळपाव हि संकल्पना कोल्हापूर मध्ये उदयास आली पण कालांतराने सर्वत्र प्रसिद्ध झाली.पण या प्रसिद्धीमुळे मिसळपाव या पदार्थात बरेच अमुलाग्र बदल झाले . कारण कोल्हापुरी ठस्का असलेल्या मिसळपाव या पदार्थाचं ' मिसलपाव ' या शब्दात कधी रुपांतरण झालं हे जणू कोणालाच कळलं नसावं आणि भिन्न मसाले वापरून भिन्न अशा उसळीही जन्माला आल्या. काही दिवसांपूर्वी एका उडपी माणसाच्या दुकानात मी मिसळपाव मागवला होता तेव्हा पाव सोडले तर मिसळ हि अगदी सांबार सारखी लागत होती आणि विशेष बाब म्हणजे मी पहिल्यांदा मिसळपाव सोबत खोबऱ्याची चटणी खात होतो.खरोखर असं सगळं चित्र मी पहिल्यांदाच पाहत होतो.मध्यंतरी असाच एकदा नवीन अशा एक दुकानात गेलो तेव्हा तेथील मेनू कार्ड वाचूनच अगदी वेगळा वाटलं कारण चीझ मिसळपाव किंवा पनीर मिसळपाव अशाप्रकारच्या मिसळी तेथे मिळत होत्या म्हणजे काय तर आपल्या मूळ पदार्थाचं स्वरूप कसं बदललं जातं ते तेव्हा पाहायला मिळालं.
आजकाल खरंतर मिसळपाव हा पदार्थ महाविद्यालयातही प्रसिद्ध झाला आहे. कॅन्टीन मधील विविध टेबलांवर बरेचदा हा पदार्थ सहजतेने पाहायला मिळतो. त्यात मग सगळ्या मित्रांच्या गप्पा,कॉलेज मधल्या अगदी हुशार मुलांच्या वेगळ्याच चर्चा, "इट्स लो-फ्याट फूड" असं सांगत बिनधास्त असणाऱ्या मुली किंवा अगदीच ती आणि तो गप्पा मारत असताना दोघांना एकत्र आणणारा असा पदार्थ म्हणजेच ' मिसळपाव '. खरंच , एखादा पदार्थ इतकं काही करू शकतो या कधी कोणाला पत्ताच लगत नाही.
ठाणे प्रमाणे डोंबिवली पश्चिमेला एक 'मुनमुन' नावाचं केवळ मिसळपाव मिळणारं असं एक दुकान आहे. स्टेशन लगत असलेल्या या दुकानात तीन प्रकारच्या मिसळी मिळतात आता हे तीन प्रकार म्हणजे पनीर किंवा चीझचे प्रकार नसून लाईट,मिडीयम आणि तिखट असे प्रकार आहेत. अगदी आकाराने जरी लहानग्या पण चवीने आणि नावाने मोठ्या अश्या दुकानात खरी मिसळ काय असते याचा अर्थ समजतो.पण मला इकडची एक पध्दत खूप आवडते ती म्हणजे इथे पार्सल हि पद्धतच अस्तित्वात नाही म्हणजे विनाकारण प्लास्टिक सारखे प्रश्नही उदभवणार नाहीत.
खरोखर एखादा पदार्थ आपल्याला चवीबरोबर बरेच काही देत असतो याचा तुम्हालाही कधी विश्वास बसला नसेल पण एकदा फक्त खाण्यापलीकडे पाहिलं तर प्रत्येक पदार्थ हा देखील वेगळा असतो ही गोष्ट नक्की जाणवते. आणि हो ! जर ही मिसळ तुमच्या मनाला तिखट वाटली असेल तर अगदी मनापासून सांगा आणि काळजी घ्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: