बर्माहून पत्र............

Submitted by jayantckulkarni on 29 May, 2012 - 04:07

मित्रहो,

माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान व पुस्तक लिहिण्यावेळी हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे.

प्रियतमे,

पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. अतिपरिचय हे द्वेषाचे मुळ असते असे म्हणतात, त्यामुळे आम्हीही धोक्यांचा द्वेष करतो.
तू येथे का येऊ नयेस त्याची कारणे सांगतो. पटल तर बघ.

तुमच्या तिकडे बर्‍याच जणांना युध्द म्हणजे काय हे माहीत आहे असे वाटते. पण खरेच तसे आहे का ? आणि ते कसे शक्य आहे ? इतक्या दुरुन ते त्यांना कसे समजणार ? कदाचित माझे चुकत असेल पण मला पडलेला हा प्रश्न प्रामाणिक आहे. त्यांना येथे यायला लागावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. तसा गैरसमजही करुन घेऊ नकोस. ते येथे नसल्यामुळे मला त्यांचा हेवा वाटतोय, किंवा द्वेषबुध्दीने मी हे लिहितोय असेही नाही. खरे तर, जेव्हा स्वर्गातून बॉंबचा वर्षाव होतो, डोळ्यासमोर होणारे मृत्यू आणि विध्वंस निराशेचा खरा अर्थ समजवतात अशा वातावरणात त्यांना येथे यायला लागू नये अशी मी देवापाशी प्रार्थना करतोय. पण त्यांना युध्द म्हणजे काय हे माहीत नाही हे सत्य नाकारण्यात काय अर्थ आहे ? युध्दाचा खरा अर्थ तुम्हाला आमच्याप्रमाणे येथे राहिलात तरच कळू शकेल. तुम्हाला एका छोट्या पण पाण्याने भरलेल्या खंदकात अनेक दिवस अन्नावाचून काढावे लागतील. साप व मलेरियाची भिती कायम तुमच्या मनात असेल. शत्रूपेक्षाही तुम्ही याला जास्त घाबराल. कारण याने तुम्ही थोडे थोडे मरता आणि ते तुम्हाला कळत असते. अशा वेळी कळते की धोके किंवा माणसे ही आपली शत्रू नसून भिती हीच आपली खरी शत्रू आहे.

अशा खंदकात रात्री या जमिनीतल्या भोकात हातपाय हलवण्याचीही भिती वाटते. थोडाजरी आवाज झालातरी शत्रूच्या गोळीला आमंत्रण दिल्यासारखे आहे. एवढेच नाही अशा वेळी मित्रांच्या गोळीलाही आपण बळी पडू शकतो. आघाडीवर जेव्हा काळोख पसरतो तेव्हा कुठलीही हालचाल करायचे धाडस करायचे नसते. अंधार पडला की असाल तेथेच निपचीत पडून रहायचे आणि पुढच्या उजेडाची वाट बघायची एवढेच आपल्या हातात असते. कोणीही कुठल्याही कारणासाठी हालचाल करत नाही. खरंच सांगतोय, कुठल्याही कारणासाठी.

इथे आलीस तर तुला गार अन्न खायला लागेल. बीन्स, मांस, भाजी हेच रोजचे जेवण असेल. आम्ही त्याचा क्रम बदलून स्वत:चीच फसवणूक करुन घेत असतो. आम्हाला नुकतेच कळले आहे की आता अन्नात थोडा बदल केला जाणार आहे पण आमच्या पर्यंत तो पोहोचणार की नाही हे माहीत नाही. बहुतेक नाहीच.
असे म्हणतात की बदल हे तुमचे आयुष्य चवदार बनवते. ते खरे असेल तर आमच्या आयुष्यातील चव केव्हाच निघून गेली आहे. युध्दभुमीची चव घ्यायला तुम्हाला येथे यायला पाहिजे.

सकाळी डोंगरावर क्षितिजापलिकडे जाणारी विमाने बघायला लागतील. या विमानातले तरूण वैमानिक आपल्या कामगिरीवर, (का मृत्यूला भेटायला) जाताना ती विमाने मोजायला लागतील. एकदा ती मोजलीत की संध्याकाळी त्यातली किती परत आली हे ही तुम्ही मोजायला लागाल. बारा गेली, पाच आली असा हिशेब तुम्हीही करायला लागाल. संध्याकाळी क्षितिजाकडे नजर लाऊन तुम्ही हाच विचार करता, जे आले नाही ते कसे मेले असतील? का जपान्य़ांच्या हातात सापडले असतील ? त्यांना चांगली वागणूक मिळत असेल का? जमिनीवर ते कसे तग धरतील ? खरे काय घडले ते तुम्हाला कधीच कळत नाही. आणि जे जिवंत असतील तर त्यांना त्यांच्या मृत्यूचा अहवाल कसा वाटत असेल ?

तुम्ही सिनेमामधे बघता तसे युध्दभूमीवर सैनिक मरतात का ? मला नाही वाटत. ओठांवर हसू आणि डोळ्यात कर्तव्य बजावल्याची चमक असे कोणी मरत नाही. रणांगणावरचा मृत्यू हा नेहमीच अत्यंत क्लेषकारक आणि हताश असतो. तुम्हाला तेव्हा समजत असते की हाच तो क्षण. जखमी सैनिकांची परत येणारी रांग तुम्ही पाहिली पाहिजे. वेदनेने रडणारे, किंचाळणारे सैनिक हिरोसारखे दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावर मृत्यू माझे काही वाकडे करू शकत नाही असा भाव मुळीच नसतो. ते साधेसुधे अमेरिकन किंवा भारतीय सैनिक असतात. याहून भयंकर म्हणजे एखाद्या सैनिकाच्या डोळ्यातून प्राणज्योत निघून जाते तो क्षण बघायला लागणे. तगडे तरूण सैनिक भयाने थरथर कापताना व रात्री किंचाळून उठलेले बघताना आपलाच थरकाप उडतो. या कणखर माणसांना आपले आयुष्य या पुढे सर्वसाधारण माणसारखे जगता येणार नाही याची कल्पना असते का? त्यांचे आयुष्य खरे तर संपल्यातच जमा आहे. काही सैनिक तर येथे इतके दिवस आहेत की त्यांना घरी गेले काय आणि नाही गेले काय याचा कसलाच फरक पडत नाही. जेव्हा वचानांमागून वचने तोडली जातात तेव्हाच तुमची मनस्थिती अशी होऊ शकते.

युध्दावरची जगातली सगळी पुस्तके किंवा युध्दचित्रपट युध्दभूमीवर काय चालते यावर खराखूरा प्रकाश टाकू शकत नाही. ही पुस्तके तुम्हाला आतडी पिळवटून टाकणार्‍या भुकेचा अनुभव नाही देऊ शकत. किंवा अनेक दिवस न झोपल्यामुळे वेड लागायची पाळी येते त्याचाही अनुभव नाही देऊ शकत. ओल्याचिंब कपड्यात थंडीत काकडत रायफल कशी पकडायची याचा अनुभव नाही देऊ शकत. या पेक्षाही महत्वाचे म्हणजे भयंकर एकटेपणाचा अनुभव, ते कसा देऊ शकतील ? तुम्ही, आम्ही घरी परतल्यावरची गोड स्वप्ने रंगवत असता पण आम्हाला खरे काय ते माहीत आहे. तिकडे काहीही बदललेले नाही. लोकांना असे वाटते की त्यांना युध्दभूमीवर काय चालते याची पूर्ण कल्पना आहे. त्यांची माहीती ही त्यांच्या मनाचे खेळ आहेत. मला माहीती आहे की माझे शरीर हे या युध्दाने पोखरलेले आहे आणि भिती माझ्या ह्रदयात खोलवर घर करून बसली आहे. मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा युध्द माझ्यापासून दूर होते आणि मला त्या बद्दल पुस्तकात आणि चित्रपटातून माहीती मिळत होती. पण मला आता ते खरेखूरे कसे असते हे कळले आहे. हे शब्दात आणि कॅमेर्‍यात पकडता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो.

पण तुला काही चांगल्या गोष्टीही मला सांगितल्या पाहिजेत. संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळी सैनिक गाणी म्हणतात. आरत्यासुध्दा म्हणतात ज्या मला आजिबात आवडायच्या नाहीत. पण आता त्या ऐकतांना मला बरे वाटते हे खरे आहे. त्या ऐकताना मला घराची, देवळांची, फुलांची आठवण येते. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी असणारी शांतता मनाला एक प्रकारची हवीहवीशी वाटणारी हुरहुर लावून जाते आणि गत आयुष्यातील सर्व चांगल्या आठवणी मनात गर्दी करतात. त्या गाण्यांमुळे मी माणसात परततो.
तू येथे आलीस तर येथील सुर्यास्त तुला खूपच आवडेल. त्यावेळी ढगातून डोकावणार्‍या, न संपणार्‍या डोंगराच्या निळसर रांगाही तुला आवडतील. नजर पोहोचेल तेथपर्यंत हे डोंगर धुक्यात वेढलेले तुला दिसतील. येथील सरळसोट, आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्ष तुला भारावून टाकतील. जमिनीवर मऊ पानांचा गालिचा तुला चालण्याचे आमंत्रण देईल तर पहाटे दरीतून वर येणारे ढग तुला आपल्या कवेत घेतील. जेथे कोणीही पाऊल टाकलेले नाही अशा जागी पाय ठेवण्यातला अनामिक आनंद तुला येथेच उपभोगायला मिळेल.

मला आता थोडा वेळ आहे आणि स्वप्नच बघायची असतील तर ती चांगल्या गोष्टींचीच बघितलेली बरी.

मला जिवंत रहायचे असेल तर ती स्वप्न बघायलाच पाहिजेत.

तुझाच,
ऑस्कर

जयंत कुलकर्णी.

गुलमोहर: 

जयंतराव,

कथा चांगली आहे, पण युद्धाची पार्श्वभूमी फार गडद आहे. युद्ध भयंकर प्रकार असतो. त्यात तग धरून रहायचं असेल तर जीवनविषयक तत्त्वज्ञान पक्कं लागतं. मानसिक कणखरपणाच्याही पलीकडलं काहीतरी लागतं.

ते काहीतरी संध्याकाळच्या आरतीतून मिळतं.

मागे लोकसत्तेत एक बातमी वाचली होती. काश्मिरातील एका कारवाईत अतिरेक्यांनी कुठल्याश्या मशिदीत (वा दर्ग्यात) आश्रय घेतला होता. सैन्याने त्या वास्तूला गराडा घातला होता. वेढा बरेच दिवस चालू होता. दररोज वाटाघाटी चालू होत्या. अतिरेकी मुजोरपणे जेवणखाण्याची मागणी करीत होते. आणि षंढ केंद्र सरकार ती इमानेइतबारे पुरवीत होते. सैन्याच्या जवानांना बिर्याणीची ताटे घेऊन शत्रूच्या दाराशी जावे लागत असे. आपल्या जवानांच्या मनोधैर्याची खरी कसोटी लागत होती. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांचा पहारा होता. खंदक खोडून त्यात जवानांनी जागा पकडल्या होत्या. जरा दूरवरील जवानांपैकी एकाची मुलाखत लोकसत्तेत वाचल्याचं आठवतं.

तो जवान फावल्या वेळेत कर्णाच्या आयुष्यावरची मृत्युंजय ही कादंबरी वाचीत असे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मानसिक समतोल ढळू न देण्यासाठी अशा वाचनाचा उपयोग होतो.

लढा अथवा लढू नका, जवानांसाठी युद्ध हा भयंकर प्रकार आहेच! अधिक सांगणे नलगे!!

आ.न.,
-गा.पै.

<<<अतिरेकी मुजोरपणे जेवणखाण्याची मागणी करीत होते. आणि षंढ केंद्र सरकार ती इमानेइतबारे पुरवीत होते.

असं वाचुन आताच्या तरुणांनी सेनेकडे पाठ फिरवली तर त्यांनातरी दोष का द्या? कोणते आईबाप आपल्या लेकराला असल्या नालायक राज्यकर्त्यांच्या आदेशाखाली असलेल्या सेनेत भरती व्हायला उत्तेजन देतील?

केंद्रात नुसते चाटुगिरी करणारे भरलेत. Angry

असं वाचुन आताच्या तरुणांनी सेनेकडे पाठ फिरवली तर त्यांनातरी दोष का द्या? कोणते आईबाप आपल्या लेकराला असल्या नालायक राज्यकर्त्यांच्या आदेशाखाली असलेल्या सेनेत भरती व्हायला उत्तेजन देतील?

केंद्रात नुसते चाटुगिरी करणारे भरलेत. >> अगदि बरोब्बर !!!

मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा युध्द माझ्यापासून दूर होते आणि मला त्या बद्दल पुस्तकात आणि चित्रपटातून माहीती मिळत होती. पण मला आता ते खरेखूरे कसे असते हे कळले आहे. हे शब्दात आणि कॅमेर्‍यात पकडता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. >>>>> युद्धस्य कथा रम्या: - पण कोणाला हे या लेखावरुन चांगले कळते.

फारच हृदयस्पर्शी लिहिलंय....... लेखनशैली अप्रतिम ........

शिल्पा बडवेंना अनुमोदन.

>>>सैन्याच्या जवानांना बिर्याणीची ताटे घेऊन शत्रूच्या दाराशी जावे लागत असे. आपल्या जवानांच्या मनोधैर्याची खरी कसोटी लागत होती.
हा खरा सर्वोच्च मनोधैर्याचा दाखला. मनात नक्की "यापेक्षा गोळी जागून जीव गेला तर बरे" अशी भावना नक्की येत असणार त्या सैनिकांच्या.

अतिरेक्यांना एकच उत्तर - बंदुकीची गोळी!!! बास्स्स!!!

<<तुम्ही सिनेमामधे बघता तसे युध्दभूमीवर सैनिक मरतात का ? मला नाही वाटत. ओठांवर हसू आणि डोळ्यात कर्तव्य बजावल्याची चमक असे कोणी मरत नाही. रणांगणावरचा मृत्यू हा नेहमीच अत्यंत क्लेषकारक आणि हताश असतो. तुम्हाला तेव्हा समजत असते की हाच तो क्षण. जखमी सैनिकांची परत येणारी रांग तुम्ही पाहिली पाहिजे. वेदनेने रडणारे, किंचाळणारे सैनिक हिरोसारखे दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावर मृत्यू माझे काही वाकडे करू शकत नाही असा भाव मुळीच नसतो. ते साधेसुधे अमेरिकन किंवा भारतीय सैनिक असतात.>>

सहमत.

लिखाण अतिशय सुंदर.

<<तुम्ही सिनेमामधे बघता तसे युध्दभूमीवर सैनिक मरतात का ? मला नाही वाटत. ओठांवर हसू आणि डोळ्यात कर्तव्य बजावल्याची चमक असे कोणी मरत नाही. रणांगणावरचा मृत्यू हा नेहमीच अत्यंत क्लेषकारक आणि हताश असतो. तुम्हाला तेव्हा समजत असते की हाच तो क्षण<<>>
... भयंकर...
अत्यंत सुंदर शब्दांत पकडलं आहे हे. मूळ पत्रं नसल्याने सुरेख भाषांतर म्हणता येत नाहीये... पण दॄश्य वर्णन... अगदी अगदी.