अखेरचा पर्याय !

Submitted by कवठीचाफा on 26 June, 2012 - 09:45

प्रिय बहीण अनामिका,

या आधी तुला बरीच पत्र लिहिली पण एकाही पत्राचं तू उत्तर पाठवलं नाहीस, कदाचित तू ती वाचलीच नसशील तुझं वय नक्कीच पत्र वाचण्याइतकं नसणार तेव्हा, म्हणूनच इतक्या उशीरा तुला हे पत्र लिहीत आहे.
तुला कदाचित माहीतही नसेल की तुला एक मोठा दादा आहे. खरंतर मलाही माहीत नव्हतं की मला लहान भाऊ झालाय की बहीण, पण एकदा आत्याला माझ्या आईबद्दल बोलताना मुलगी बद्दल काहीसं बोललेलं ऐकलं, तेव्हा मला कळलं आणि मी माझ्यातर्फे तुला अनामिका हे नाव देऊन टाकलं. आईबाबांनी तुझं नाव काय ठेवलंय?
कमीतकमी हे तरी सांगितलंय का की तुला एक मोठा भाऊ आहे म्हणून ?
का कुणास ठाऊक पण त्यांना मी कधी आवडलोच नाही. तू येणार हे आईबाबांना कसं कळलं कुणास ठाऊक, पण त्यांनी ताबडतोब माझी रवानगी इकडे आत्याकडे केली. त्या दिवशी मी त्यांना पाहिलं ते शेवटचं अजूनही मला भेटायला सुद्धा कुणी आलं नाहीये. माझी सावलीसुद्धा तुझ्यावर पडू नये असं बाबांना बोलताना ऐकलं होतं. इतका का मी वाईट आहे ?
तसा मी इकडे आत्याकडे ठीकच आहे असं म्हणायचं. काका देवाघरी गेल्यावर आत्या एकटीच होती तिला आता माझा आधार आहे, असं ती तरी म्हणते, तसं ती मनापासून म्हणत असेल असं मला नाही वाटत, तरी मला फारसा त्रास नाही. मात्र मला आत्या क्षणभरही एकटं सोडायला तयार नसते. बाहेर मुलांच्यात खेळणं तर दूर पण साधं नीट बोलूही देत नाही. आता मी काय लहान आहे का ? चांगला आठवीत आहे मी आता. हं आता आमची शाळाच अशी आडगावात आहे म्हटल्यावर थोडा जगापेक्षा मागे असेनही मी, पण मी खूप पुस्तकं वाचतो बरं का ! तसंही रोज खिडकीतून बाहेरच्या मैदानावर खेळणार्‍या मुलांकडे आशाळभूतपणे कितीवेळ पाहणार ?
आईबाबा तुझ्याशी कसे वागतात गं ? चांगलेच वागत असू देत, पण बाबा काय सांगतील ते नीट ऐक हं, कारण एकदाच मी त्यांचं न ऐकता बाजूच्या माईंकडे गेलो होतो तर त्यांनी मला पट्ट्यानं मार दिला होता. मी मुलगा असून दोन दिवस कळवळत होतो, तू तर मुलगी आहेस तुला नाही सहन होणार.

आता आणखी जास्त लिहीत नाही, तसं लिहिण्यासारखं खूप आहे, पण तुझं उत्तर आलं तरच लिहीन कारण माझं पत्रही तुझ्यापर्यंत पोहचू न देण्याची काळजी आईबाबा घेत असतीलही कदाचित. तेव्हा जर पत्र मिळालं तर उत्तर मात्र नक्की पाठव मी वाट पाहत आहे.

तुझा
किरणदादा

.
विमलाताईंना रोजच्या पत्रव्यवहाराच्या गठ्ठ्यात आज पुन्हा ते पत्र मिळालं. या आधीही तशीच चार-पाच पत्र त्यांना मिळाली होती पण त्यांनी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. `असेल कुणाचंतरी नेहमीसारखंच ख्यालीखुशाली विचारणारं पत्र' त्यांनी विचार केला होता. न फोडताच त्यांनी ती पत्र पुन्हा पत्र पेटीत टाकून दिली होती. पत्र पाठवणार्‍या व्यक्तीला एकदा कळवायलाच हवं की ज्या ताम्हणकरांना पत्र पाठवली जात आहेत ते इथे रहात नाहीत असं म्हणून त्यांनी पत्ता नीट टिपून घेतला पण कामच्या गडबडीत ते राहूनच गेलं.
आजच्या पत्राकडे पाहताना त्यांना ते आठवत होतं.
मन काहीवेळ मागेपुढे करत होतं, अखेरीस दुसर्‍याचं खासगी पत्र फोडण्याची तयारी व्हायला काही मिनिटं गेलीच. शेवटी मनाशी निश्चय करत त्यांनी ते पत्र फोडलं.
लहानसंच पत्र पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे करून गेलं. कोण असेल हा मुलगा ? कुठे असेल याची बहीण ?
एरव्ही त्यांच्या स्वभावानं त्यांना शांत राहू दिलं नसतं पण अनेक कामं शिल्लक होती, नवीन घराची कागदपत्र पूर्णं करणं, विजेच्या मीटरची नोंद स्वतःच्या नावावर करणं, शहरात नवीन आल्यावर जे काही सोपस्कार पार पाडावे लागत होते त्यांच्या धावपळीत विमलाताईंचा दिवस कुठच्याकुठं निघून गेला.
त्या पत्राचा त्यांना विसर पडला.

.

प्रिय बहीण अनामिका,

खूप दिवस तुझ्या पत्राची वाट पाहिली पण तुझं उत्तर आलं नाही. मला वाटतं माझं पत्र खरंच तुझ्या हातात न पडू देण्याची काळजी बाबा घेत असतील. जर आता हे पत्र त्यांच्याच हातात असेल तर नक्की ते मला मार देण्यासाठी इथे येतील, पण मला माराची भिती आता नाही वाटत. कमीतकमी या कारणाने का होईना ते मला भेटतील तर खरे.
इथे आल्यापासून आजपर्यंत आई किंवा बाबा कुणीच माझ्या भेटीला आलं नाहीये. तुझ्या येण्यानं ते मला विसरले तर नसतील ना ?
तसं असलं तरी चालेल, पण तू मात्र विसरू नको की तुझा दादा इथे आहे. पुढे जेंव्हा तू मोठी होशील तेव्हा मला भेटण्यासाठी हट्ट कर, मलाही तुला पाहायचं आहेच.
काल आत्याच्या हातचा मार खाल्ला. चूक माझीच होती, तिने बजावून सांगितलेलं असतानाही मी तिची नजर चुकवून बाहेर मुलांच्यात खेळायला गेलो. खरंच, इथली मुलं वाईट आहेत. मला खेळायला घेण्याऐवजी माझी खिल्ली उडवत होते सगळे. माझ्याभोवती फेर धरून नाचत काहीसं ओरडतही होते. त्याच आरड्याओरड्यामुळे आत्या बाहेर आली आणि तिनं मारतच मला घरात नेलं. खरंतर मला अजूनही कळत नाही की त्या मुलांना आत्या का रागावली नाही ? कदाचित तिला भांडण नको असतील, कारण आजूबाजूला त्या मुलांचे पालक ( आपल्याला जे कुणी सांभाळतात त्यांना आपले पालक म्हणतात, तुला माहीत नसेल तर लक्षात ठेव) वावरत होते किंवा दुसर्‍यांच्या लहान मुलांना रागावायची तिची इच्छा नसेल, पण मार मात्र मलाच पडला.
मला अजूनही कळलेलं नाहीये जर इथली माणसं इतकी वाईट आहेत तर मला इथे का ठेवलेय बाबांनी ?
तुला शक्य झालं तर बाबांना विचार माझ्याबद्दल ते सांगतीलच असं नाही पण प्रयत्न कर..... पण नकोच एखाद्यावेळी माझ्यामुळे तुलाच मार पडायचा.
आता खूप उशीर झालाय अंधार पडायच्या आत मला हे पत्र टपाल पेटीत टाकायलाच हवं नाहीतर आत्याच्या हाताला लागलं तर ती चिडेल, तिला अंधार पडल्यावर मी बाहेर गेलेला अजिबात आवडत नाही.
या पत्राचं उत्तर तरी नक्की पाठव हं

तुझा
किरणदादा

.
पुन्हा एकदा आणखी एक पत्र विमलाताईंच्या हातात होतं. यावेळी मात्र त्यांना मागच्या पत्राची प्रकर्षानं आठवण झाली. नकळतच त्यांनी ते पत्र फोडलं.
परत एकदा त्यांच्या हळव्या मनाला चटका बसला. आई वडिलांपासून दूर वाढणारा हा किरण त्यांना जरा हुरहूर लावून गेला. का बरं याच्या आई वडिलांनी त्याला आपल्यापासून दूर केला असेल ? बापाचं काळीज दगडाचं असूही शकेल कदाचित पण आईसुद्धा लेकराविना कशी राहते ? आज आपली मुलं नोकरीनिमीत्तानं का होईना पण काहीकाळ दूर आहेत, तर त्यांची किती आठवण येत असते आपल्याला, आणि ही माता अशी लेकराची आठवणही न काढता कशी राहू शकते ?
पुन्हा एकदा मनात प्रश्नांची उधळण झाली. यावेळी मात्र विमलाताईंनी पत्राचा पाठपुरावाच केला.
संध्याकाळी त्यांचे डॉक्टर पती घरी आल्या आल्या त्यांनी ते पत्र त्यांना दाखवलं. पत्रामधल्या मुलाचा शोध घेण्याची त्यांना गळ घातली आणि त्यांनी तसं मान्य करेपर्यंत त्या शांत बसल्या नाहीत.
पत्त्यावर असलेल्या ताम्हणकर आडनावाचा आधार घेत शोध घेत असताना त्यांना ती थोडीफार माहिती मिळाली.
अर्जुन ताम्हणकर, एका सरकारी पदावर काम करणारी व्यक्ती. घरचं वातावरण एकदम सनातनी. चार मुलींच्या पाठीवर झालेला घरातला एकुलता एक मुलगा, अर्थातच थोडेफार लाडही झाले, पण जबाबदार्‍याही त्याच प्रमाणात वाढल्या. घरच्या जबाबदार्‍या पार पडेपर्यंत त्यांच्या लग्नाचं वय बर्‍यापैकी उलटलं.
सांसारिक जीवन उत्साहात नसेल पण व्यवस्थित पार पडत होतं. यथावकाश त्यांना अपत्यही झालं आणि इथेच काहीतरी चुकलं.
लेबररुम मधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि ताम्हणकर कुटुंबीय मोठ्या आशेने डॉक्टरांच्या बाहेर येण्याची वाट पाहत राहिले. वाट पाहण्याच्या परिसीमा संपत आल्यानंतर डॉक्टर बाहेर आले ते ही गंभीर चेहर्‍यानं. नजरेनंच खूण करून त्यांनी ताम्हणकरांना बाजूला नेलं आणि बराचवेळ त्यांच्याशी काही बोलत राहिले.
अर्जुनरावांनी परत येऊन आपल्या कुटुंबीयांना बातमी दिली, त्यांना मुलगी झाली होती आणि काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे पुढे पुन्हा माता बनण्यात त्यांच्या पत्नीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकत होता.
सनातनी विचारसरणीच्या ताम्हणकर कुटुंबीयांवर हा दुखा:चा पहाडच कोसळल्यासारखा होता. वंशाला दिवा तर हवा.....
मुलीचं बारसंही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करून घेण्यात आलं आणि `किरण' असं मुलगा मुलगी कुणालाही चालू शकणारं नाव देऊन टाकल्या गेलं.
लहानपणापासूनच किरणचा सांभाळ मुलाप्रमाणं केल्या गेला. बाहुली, भातुकली असले खेळ कधी तिच्या नजरेसही पडू दिले नव्हते. इतकं सगळं करूनही अर्जुनरावांचा तिच्यावर राग कायम होता.
कशीबशी चार- सहा वर्ष अर्जुनरावांनी किरणचा सांभाळ केला, पण कायम राग-राग करतच. अखेरीस हे सारं सहन न होऊन त्यांच्या पत्नीनं दुसर्‍या अपत्याचा त्यांचा विचार अमलांत आणायला मान्यता दिली, स्वतः:ची पर्वा न करता.
दुसर्‍या अपत्याची चाहूल लागली आणि अर्जुनरावांनी किरणला दूरवर आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी कायमचं पाठवून दिलं.
अर्जुनरावांची मोठी बहीणही आपल्या भावाच्याच विचारसरणीची, तिनंही किरणला कधी मुलींप्रमाणे जपलं नाही.
.
वेगवेगळ्या स्रोतांतून माहिती मिळणं अजूनही चालूच होतं, आजवर ज्या किरणला त्या मुलगा समजत होत्या ती प्रत्यक्षात एक मुलगी होती हे जरी त्यांना कळलं असलं तरीही विमलाताईंच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले होते.
किरणचा सांभाळ जरी मुलाप्रमाणं केला असला तरी तिला स्वतःला तिच्या स्त्रीत्वाची निसर्गतच असायला हवी असलेली जाणीव कशी नव्हती ?
ज्या बहिणीला किरण पत्र लिहीत होती ती नक्की कुठे होती ? आणि पत्र नेमकी याच पत्त्यावर कशी येत होती ?
.
अशातच आणखी एक पत्र येऊन पडलं.
.
प्रिय बहीण अनामिका,

काल राखीपौर्णिमा होती, तुझ्या राखीची मी खूप वाट पाहिली पण राखी आलीच नाही. आजूबाजूच्या मुलांच्या हातावर बांधलेल्या राख्या पाहिल्यावर खूप वाईट वाटलं. ज्यांच्या सख्ख्या बहिणी नाहीत ते सुद्धा चुलतं मावसं बहिणींनी बांधलेल्या राख्या मिरवत होते आणि माझी सख्खी बहीण असताना कालच्या दिवशी माझा हात मोकळाच होता.
तुलाही माझ्याबद्दल आपुलकी नाही का ? आईबाबांसारखं तू ही मला वाईट समजतेस का ?
मला तुला भेटायचंय तुझ्या हातून राखी बांधून घ्यायचीये. एक दिवस गुपचुप मी इथून आत्याचा डोळा चुकवून सटकणार आहे आणि मग तिकडे येईन. यायचं कसं ते मला माहीत नाहीये पण विचारता येईल कुणालाही. मग आपण भेटू, आईबाबांना मात्र यातलं काही सांगू नकोस हं .

तुझा
किरणदादा
.
विमलाताईंनी पत्र वाचलं आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. ही अशी स्वतःबद्दल अजाण असलेली मुलगी खरंच घरातून निघून इकडे यायला निघाली तर ?
तिला भले स्वतःबद्दल काहीही वाटो पण पहाणार्‍या जगापासून तिचं स्त्रीत्व लपून राहणार आहे का ? काय होईल तिचं या पाशवी जगात ?
ताबडतोब त्यांनी आपल्या पतीला त्यांच्या क्लिनिकवर निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि सगळा प्रकार व्यवस्थित त्यांच्या कानावर घातला.
सगळी हकीगत ऐकल्यावर त्यांच्यातला मानसोपचार तज्ज्ञ जागा झाला. त्यांनी विमलाताईंना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली.
" अगं, ही एक साधी पण अत्यंत गुंतागुंतीची केस आहे, काही माणसांचं मन अतिशय संवेदनशील असतं त्यांच्या मनावर एखादी गोष्ट ठसवल्या गेली की ते इतक्या सहज मान्य करून टाकतं की शरीराच्या क्षमताही त्यापुढे कमी पडतात. संमोहनाच्या कार्यक्रमात पाहिलंच असशील की संमोहनाखाली गेलेली व्यक्ती नाही का कारल्याला केळं समजून सहजासहजी खाते ? हा ही तसाच प्रकार परिणाम मात्र खूप खोलवर झालेला. " विमलाताई कान देऊन ऐकत होत्या.
" यावर इलाज असा काहीच नाही का ? " त्या विचारत्या झाल्या. आवाजात काळजी जाणवत होती.
" नाही कसा ? एकदा त्या मुलीच्या आईवडीलांना भेटायला हवं त्यांनी जर तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला तर हळूहळू तिच्या विचारात फरक पडायला लागेल, आणि वयापरत्वे येणारे हार्मोनीक बदल त्यांचं काम करतीलच. मात्र हे सारं लवकरात लवकर घडायला हवं अन्यथा वयात येताना होणार्‍या बदलांचा त्या मुलीच्या मनावर विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे." विमलाताईंची समजूत काढून त्यांचे पती पुन्हा क्लिनिकवर निघून गेले.

सगळ्या प्रकाराचा नीटसा उलगडा झाला नसला तरी विमलाताईंना वेळेचं महत्त्व जाणवलं होतं, त्यांनी ताबडतोब शक्य त्या प्रकारांनी ताम्हणकर कुटुंबाचा आत्ताचा पत्ता शोधण्यासाठी प्रयत्न चालू केले.
.
एखाद-दोन दिवसात विमलाताईंकडे अर्जुनराव ताम्हणकरांची उरलेली माहितीही जमा झाली आणि ती चांगलीच धक्कादायक होती.
काही काळ त्यांचं वास्तव्य आज विमलाताई रहात असलेल्या घरातही होतं पण काही काळच, त्यामुळेच त्यांचं अस्तित्व शेजार्‍यांच्या मनातून सहज पुसल्या गेलं होतं. कदाचित त्याच काळात किरणला त्यांनी आत्याकडे पाठवलं असावं. म्हणूनच तिची पत्र या पत्त्यावर येत असावीत.
ताम्हणकरांनी ही जागा सोडली, आणि दुसरीकडे गेले. तिथेच त्यांच्या दुसर्‍या अपत्याची जन्मवेळ आली. प्रसुतीकाळात गुंतागुंत झाल्यानं ऐन प्रसूतीवेळी सौ. ताम्हणकरांची प्राणज्योत मालवली आणि दुर्दैवाने वैद्यकीय सुविधा पुरेशा नसल्याने बाळालाही वाचवता आलं नव्हतं. अशीही एक चर्चा होती की जन्माला आलेलं दुसरं अपत्यही मुलगीच असल्यानं अर्जुनरावांनीच त्या अर्भकाचं काही बरवाईटं.......
याच संशयापोटी पत्नीच्या वियोगानं आधीच दुखी: असलेल्या अर्जुनरावांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी झाल्या प्रकाराचा दोष देत त्यांची पोलिसांत तक्रार केली. मग त्याच त्या चौकश्या, अपमान, समाजाच्या जाळणर्‍या नजरा हे सारं सहन न झाल्यानं म्हणा किंवा झाल्या प्रकाराबद्दल अपराधाची काही टोचणी असल्यामुळे म्हणा ,अर्जुनरावांनी आत्महत्या केली.

.
विमलाताई पुन्हा एकदा शहारल्या, आजकाल लोकं स्वतःला इतकी प्रगत म्हणतात आणि तरीही हे असं अमानुष कसं वागू शकतात ? बरं, इतकं सगळं होऊनही झाल्या प्रकाराचा त्या अभागी जिवाला पत्ताही लागू न देणार्‍या या लोकांना माणूस म्हणावं की सैतान ?
.
काहीही झालं तरी आता त्या कधीही न पाहिलेल्या अभागी पोरीला इथे येण्यापासून थांबवायलाच हवं होतं.
न जाणो ती मुलगी अचानक इथे आलीच तर तिच्या मनावर काय वेदनादायक प्रसंग कोसळेल, आणि त्याचे परिणाम काय होतील ?
किरणवर उपचार करण्याची जरी त्यांची तयारी असली तरी तो करण्याइथपत तरी वेळ मिळायलाच हवा होता, त्यातुनच जी मुलगी स्वत:च स्वतःच स्त्रीत्व मान्य करायला तयार नव्हती ती आपल्यासारख्या परक्या माणसांवर कसा विश्वास ठेवेल ?
काहीही असो किरण यातून बाहेर पडलीच पाहीजे, त्यांच्यातली आई म्हणत होती ते ही एका न पाहिलेल्या अभागी जिवाबद्दल. याच विचारात काहीवेळ भरकटत राहिल्यावर विमलाताईंनी मनाशी ठाम निश्चय केला काही झालं तरी किरणला सध्यातरी इथे येऊ द्यायचं नाही, परिस्थिती आवाक्यात येईपर्यंत तरी किरणनं काही आततायी निर्णय घ्यायला नको. तरीही शेवटी किरणने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्न उरतच होता तो कसा सुटणार होता ?

मनाशी काही ठाम निर्णय घेउन विमलाताईंनी टेबलावरचा रायटिंग पॅड पुढे ओढत लिहायला सुरुवात केली.
.

त्या नंतर कितीतरी वेळ त्या लिहितच होत्या हळूहळू त्यांच्या चेहर्‍यावर समाधान फुलत जाताना दिसतं होतं.
.
कुणा परक्याच्या नाही, पण किमान आपल्या बहिणीच्या पत्रावर तरी किरण नक्कीच विश्वास ठेवणार होती

गुलमोहर: 

नाही पटली कथा. अतर्क्य वाटली.
पण किरणच्या भावना पत्रातुन छान व्यक्त केल्या आहेत.

Chan lihilay.. pan shevat evdha khas nahi vatla, ajun pudhe kahitari lihita aale aste.

कथा खूप आवडली पण शेवट विस्ताराने लिहायला हवा होता असे वाटले. वाचकाच्या कल्पनाशक्तीवर न सोडता पुढे काय झाले ते लिहा. वाटले तर भाग २ लिहा,

उदय, चिमुरी, रिया ,श्रेयसी, कंसराज ,अभी, मानसी, भावना, आ.सा. , चिऊ , रावण, अनघा ,स्मितू ,सोनुसोना खुप धन्यवाद
गिर्‍या, शा.ग., शिल्पा, वैशाली : शेवट गुंडाळला हे मान्य त्याची वेगळी कारण आहेत मला
चिखल्या : हे नाही पटलं, अशी स्पष्ट प्रतिक्रीया आवडली Happy
मंदार :

खुप खुप छान.. उत्कन्ठावर्धक. शेवट अगदी समाधान देउन गेला.
चाफ्याच्या सगळ्या कथा एकदा वाचायला हव्यात.

कथा खूप आवडली पण शेवट विस्ताराने लिहायला हवा होता असे वाटले. वाचकाच्या कल्पनाशक्तीवर न सोडता पुढे काय झाले ते लिहा. वाटले तर भाग २ लिहा +१२३