वरदान

Submitted by जयनीत on 21 June, 2012 - 07:16

ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले. कुणालाही वर द्यायचाच आहे ना तर इथेच वरदानाचे कार्य पार पाडून मोकळे व्हावे ह्या विचाराने त्यांनी वरातीसह कार्यालयात प्रवेश केला.
ठकीचे रूप बघून ते हादरलेच ह्या अभागी मुलीलाच रूप सौन्दर्यचा आशीर्वाद देऊन तिचे भले करावे ह्या विचाराने ते तिचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू लागले, पण ठकी आपल्याच सुख स्वप्नात रममाण होती. जेव्हा जेरीस येऊन ब्रह्मदेवांनी शुक शुक केले तेव्हा ठकीने त्यांच्या कडे फणका-याने बघितले, ' जेव्हा माझा बाप माझे लग्न ठरवण्यासाठी चपला झिजवत होता तेव्हा कुठे गेले होतात? आता जा मरा! असा विचार करून तिने नाक मुरडले. '
एका वराचे दान नुकतेच तिच्या पदरात पडले होते आता तिला कुठल्याही वराची गरज नव्हती.
मग त्यांचे लक्ष ठकीच्या नव-या कडे गेले, ह्या महाभागाने अशा कुरूप पोरीली स्वीकारले तेव्हा ह्यालाच वर देऊन ह्याचे जन्माचे भले करावे असा त्यांनी विचार केला पण ठकीचा नवरा मिळालेल्या हुंड्याचा हिशोब करण्यात गुंग होता, मिळालेला पैसा कसा वाढेल अन मग ठकीच्या जागी दुसरीची सोय लवकरात लवकर कशी करता येईल ह्याच विचारात होता.
ठकीचा नवरा वरदक्षिणे वरच संतुष्ट होता त्यालाही कुठल्या अजून वरदानाची गरज नव्हती.
जाऊ द्या पण हा लक्ष्मी नारायणाचा अतुलनीय जोडा ज्याने कुणी घडवला तो महाभागच आपल्या आशीर्वादाला खरा पात्र आहे असा विचार करून त्यालाच वर देण्याचे ब्रह्मदेवांनी ठरवले. चौकशी केल्यावर त्यांना ह्या सगळ्या चमत्काराचा कर्ता करविता बाळकराम असल्याचे कळले. त्यांनी बाळकरामाचा शोध घेतला , बाळकराम आता एकांतात गोविंदाग्रज ह्या टोपण नावाने कविता करीत बसलेले त्यांना आढळले, ब्रम्हदेवांनी त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असेल कुणी ' चिंतातूर जंतू ' म्हणून त्यांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले.
राम गणेश गडकरी उर्फ बाळकराम उर्फ गोविंदाग्रज ' दोन बोटांचे अंतर ' पार करून काव्यसाधनेच्या स्वर्गात विचरण करीत होते त्यांना आता कुठल्याही भौतिक वरदानाची गरज नव्हती.
ब्रम्हदेवांनी त्यांचाही नाद सोडला आणि ते कार्यालयात परतले.
कार्यालयातील सगळे वराती मनसोक्त भोजन करून ढेकरा देत हात पाय पसरून आरामात पसरले होते त्यातील कुणालाही वर द्यावा असे ब्रम्हदेवांना वाटेना, भोजन भाऊ कुठले! ब्रम्हदेव मनातल्या मनात म्हणाले, त्यांची प्रसन्नता हळूहळू कमी कमी होत होती.
निराश होऊन ते परतण्याच्या विचारात ते होते तितक्यात त्यांना पु. ल. देशपांड्यांचा नारायण नजरेस पडला.
नारायण सा-या कार्यालयात पायाला भिंगरी लावल्या सारखा फिरत होता, कुठलेही कार्य त्याच्या शिवाय पार पडत नव्हते, त्याचा उत्साह, त्याची धावपळ अन धडपड बघून ह्यालाच आशीर्वाद देऊन आता एकदाचे निघावे असा विचार ब्रम्हदेवांनी केला, पण लग्नाचे सर्व सोपस्कार पार पडे पर्यंत नारायण काही त्यांचा हाती लागला नाही , जेव्हा वरातीसह ठकी सासरी जाण्याचा कार्यक्रम पार पडून कार्यालयात शुकशुकाट झाला तेव्हा कुठे नारायणाला थोडी उसंत मिळाली, थोडे पडण्यासाठी तो बाकड्या वर बसताच ब्रम्हदेवांनी त्याला गाठले, नारायण जेव्हा त्यांना बघून उभे राहून त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांना अत्यानंद झाला त्यांना इतका आदर पृथ्वीतलावर आल्यापासून कुणीही दिला नव्हता.
" काही हवंय का आपल्याला?" नारायणाने त्यांना विचारले.
" नको मला काही नको! आम्ही फार प्रसन्न आहोत " ब्रम्हदेव म्हणाले .
" धन्यवाद! धन्यवाद!!जितकं जमलं तेव्हढ केलं हं, काही कमी जास्त झालं असेल तर समजून घ्या " नारायण म्हणाला.
" नाही तुला कळलं नाही, मी देव आहे " ब्रम्हदेव म्हणाले.
नारायण गोंधळात पडला, " देव ! देव आडनाव होय तुमचं? नक्की कुणाकडचे? मुलाकडचे की मुलीकडचे? माफ करा हं आजकाल नावं विसरायला होतं मला पुष्कळदा. पण दोन्ही कडची मंडळी गेलीत आता कुणालाही भेटायचं असेल तर आता इथे कुणीही भेटणार नाही " नारायण म्हणाला.
" तसं नाही रे ' ब्रम्हदेव म्हणाले.
" मग माझ्याकडे काही काम आहे का?" नारायणाने विचारले..
ब्रम्हदेवांच्या रागाचा पारा चढण्यास पुन्हा सुरवात झाली, "माझं तुझ्या कडे काहीही काम नाही, तुझ्याकडून मला काहीही नकोय, मी देव आहे! मी अतिशय प्रसन्न आहे तव्हा तुला काय हवं असेल ते मागून टाक, जे मागशील ते मिळेल, बोल काय हवं तुला?" ब्रम्ह्देव राग आवरून म्हणाले.
"आं!" नारायणाने जांभई दिली, " मला काहीही नकोय हो, मी फार थकलोय, बस झोपू द्या मला आता थोडा वेळ शांतपणे" नारायण म्हणाला.
"तथास्तु! !" ब्रम्हदेव चिडून म्हणाले आणि क्षणात अंतर्धान पावून आपल्या महालातील कोप भवनात जाऊन बसले.
बातमी कळताच "नारायण! नारायण !!" चा घोष करीत नारदमुनी थेट कोप भवनात प्रवेश करते झाले.
" नाव नका घेऊ त्या नारायणाचं! मूर्ख कुठला! इथे मी त्याला स्वत: आशीर्वाद द्यायला गेलो तर तो मूर्ख मागतो काय, झोप ! किती घोर तपश्चर्या करायचे ऋषी मुनी पण मी काही केल्या प्रसन्न होत नसे, काळ बदललाय हेच खरं, आता ह्याला बसल्या जागेवर वर द्यायला गेलो तर कीम्मत नाही, मागून काय मागितलं तर झोप! हद्द झाली " ब्रम्हदेव म्हणाले.
" पण देवा आपण वर बिर देण्याच्या भानगडीत पडलाच कशाला? अहो वर काय शाप काय ते देण्याचा कारभार करूच नये कधी. मनुष्याला स्वत:ला नेमके काय हवं तेच कळत नाही त्यामुळे अशा गोष्टी मुळे गडबडच होण्याची शक्यता जास्त असते" नारदमुनी म्हणाले.
" काहीतरीच काय बोलताय तुम्ही मुनिवर! " ब्रम्हदेवांचा पारा अजूनही चढलेलाच होता.
" रागवू नका देव! पण तुम्ही इथे स्वर्गात असता, मी सतत इथून तिथे फिरत असतो मला सृष्टीची खडानखडा माहिती आहे, राग माणु नका पण तुमच्या पेक्षा मला परिस्थितीची जास्त जाणीव आहे, आता हेच बघा अश्वथ्याम्याचे अमरत्वाचे दुख: माहीत असूनही मनुष्याची अमरत्वाची हौस अजुन पुरती फीटली का? माणसाच्या इच्छा असंख्य असतात म्हणुन त्याला स्वतःला नक्की काय हवंय अन नेमकं काय मागाव हेच कळत नाही, त्यामुळे आजवर कुठलाही मनुष्य कुठल्याही वराने संतुष्ट झालेला नाही, उलट त्याचं दुख: मात्र अजूनच वाढलं आहे " नारदमुनी म्हणाले.
" कसं शक्य आहे ते?" ब्रम्हदेवांनी चिडून नारद मुनीनां विचारले .
" अहो खरं तेच बोलतोय मी " नारदमुनी म्हणाले, " भगवान शंकरांची गोष्टं सांगतो ऐका, मागे एकदा असेच भगवान शंकर तुमच्या सारखेच अतिशय प्रसन्न होते, प्रसन्नतेच्या आवेगात एकाला त्रिभुवनाचे राज्य देऊन बसले, पुढे काय झाले असेल माहीत आहे? " मुनीवरांनी विचारले.
" नाही तुम्हीच सांगा काय ते " ब्रम्हदेव म्हणाले.
" कुणालाही वाटेल की त्याच्या सारखा सुखी तोच " नारदमुनी म्हणाले.
" हो मग काय!" ब्रम्हदेव म्हणाले.
" पण उलट तो अजून दुखी: झाला " नारदमुनी म्हणाले.
" कसं काय? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो त्रिभुवनाचे राज्य मिळाले तरही प्रारब्ध कुठे बदलतंय? राज्य मिळाले पण ते चालवण्याची क्षमता कुठे होती, जो माणूस एक संसार धड चालवू शकला नाही तो राज्य काय चालणार?" नारदमुनी म्हणाले.
" मग?" ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो तो राजा झाला तशी त्याची बायको राणी झाली ना? त्याच्या खाष्ट बायको पुढे त्याचे काहीच चालायचे नाही, मग काय त्याच्या बायकोने त्याच्या प्रमाणेच त्रिभुवनाचे राज्य आपल्या तालावर नाचवले, हा नावापुरता राजा राहिला " मुनिवर म्हणाले.
" अरे रे! मग? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" मग काय! राज्य मागण्या पेक्षा देवाला एखादी अप्सराच मागितली असती तर जास्त सुखी राहिलो असतो ह्या पश्चातापातच जन्मभर जळत राहिला बिचारा " नारदमुनी म्हणाले.
" अरे रे!" ब्रम्हदेव म्हणाले.
" पुढे ऐका, असेच विष्णू भगवान एकदा तुमच्यासारखेच वर देण्या साठी आसुसले होते, तेव्हा त्यांनी काय केले ठाऊक आहे?" नारदमुनींनी विचारले.
" सांगा तुम्हीच!" ब्रम्हदेव म्हणाले.
" भिकेसाठी वणवण फिरण्या-या भिका-याला कधी न संपणा-या धन संपत्तीचा वर देऊन बसले " नारदमुनींनी सांगितले.
" मग? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" मग काय! विष्णू भगवानांच्या शब्दाखातर कुबेराने आपलं खजिना रिकामा करून दिला, पण इतके मिळूनही तो भिकारीही ही कुठे सुखी झाला? " नारदमुनी म्हणाले.
" का बरं? "ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो खजिना तर संपता संपेना, पण आयुष्य मात्र संपून जाणार अन खजिन्याचा उपभोग तो पुरेपूर घेऊ शकणार नाही ह्याच दुखा:त त्याचा अंत झाला, खजिन्या सोबच देवाला अमर पट्टा का मागितला नाही ह्याच दुखा:त तो जन्मभर तडफडत राहिला " मुनिवर म्हणाले.
" हसावे की रडावे हेच कळत नाही " ब्रम्हदेव म्हणाले, आता त्यांची मनस्थिती परत ताळ्यावर येत होती.
खाली पृथ्वीतलावर नारायाणालाही जाग आली होती.
" झाली झोप? "जवळ बसलेल्या नारायणाच्या बायकोने त्याला विचारले.
" हो , अगदी मस्त झोप झाली" नारायण म्हणाला." अरे तो माणूस गेला की काय?" आळस झटकून नारायणाने विचारले.
" कोण हो, कुठला माणुस? " नारायणाची बायको म्हणाली.
" कोण तो नक्की माहीत नाही देव नाव सांगत होता, त्याला बघितल्यावर पहिले मला वाटलं की इथे पूजेला बोलावलेला ब्राम्हण असणार, पण त्यांना तर त्यांची दक्षिणा आधीच दिली होती " नारायण म्हणाला.
" काय म्हणत होता?" नारायणाला बायकोने विचारले.
" काही नाही गं! म्हणत होता मी प्रसन्न झालोय तुझ्यावर काय वाट्टेल तो वर माग, नारायाणाने बायकोला सांगितले.
" अहो देव प्रसन्न झाल्याचं स्वप्न पडलं असेल तुम्हाला " नारायणाची बायको म्हणाली.
" स्वप्नच असावं कदाचित तू म्हणते तसं " नारायण म्हणाला.
" ते जाऊ द्या पण तुम्ही काय मागितलं ते तर सांगा " बायको म्हणाली.
" काही नाही गं, म्हटलं शांतपणे थोडावेळ झोपू द्या मला " नारायण म्हणाला.
" नशीब माझं! असा नवरा मिळालाय की ज्याला देव प्रसन्न झाला तर काय मागतो झोप!" नारायणाची बायको हसून म्हणाली.
" जाऊ दे गं! आपण आहोत ना एक दूस-याला सांग अजून काय हवं? वर जाताना काय घेऊन जाणार आहोत तर कुणाला काही मागत बसायचं" नारायण म्हणाला.
" जाऊ दे निघूया घरी आता "असे म्हणून नारायणाने थैली उचलली अन बायको सोबत चालू लागला.
" बघा बघा! मुनीवर, आम्ही प्रत्यक्ष त्याला वर द्यायला गेलो तर म्हणतो काय मागायचं, काय म्हणावं तुम्हीच सांगा?" ब्रम्हदेवांनी कपाळावर हात मारला.
" अरे ह्याच्या विषयी बोलत होता तुम्ही?" नारदमुनी म्हणाले.
" तुम्ही ओळखता ह्याला?" ब्रम्हदेव आश्चर्यचकित झाले.
" हो तर! हा फार प्रसिद्ध आहे हा, पु. ल. देशपांड्यांचा नारायण! मोठ्या लेखकाचं प्रसिध्ध पात्र! ह्याला कोण ओळखत नाही? अन हा तुम्हाला काय मागणार?" नारदमुनी म्हणाले.
" काय मागणार? म्हणजे! जसं काही ह्याच्या जवळ सर्व काही आहे?" ब्रम्हदेवांनी नारद मुनीनां विचारले.
" सर्व काही तर नाही पण ह्याच्या जवळ एक गोष्टं मात्र नक्कीच आहे, जिच्या पुढे जगातील सर्व सुखे फिक्की पडतील " मुनिवर म्हणाले .
" कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय तुम्ही मुनीवर?" ब्रम्हदेवांनी विचारले.
" मी कशाबद्दल बोलतोय ते तुम्हाला चांगले ठाऊक आहे देव! फक्त ते तुमच्या ध्यानात येत नाही इतकच! आता सृष्टी निर्मात्याचेच त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माणसाला तरी कसा दोष द्यावा? " नारदमुनी म्हणाले , " आनंदा बद्दल बोलतोय मी, आनंदा बद्दल असंच होतं माणूस नेहमीच आनंदाला दुय्यम मानतो म्हणूनच दुखी: राहतो पण हा नारायण अगदी लहान सहान गोष्टीं मधेही आनंद शोधतो " नारदमुनी म्हणाले.
" आजवर इतिहासात अनेकानेक घनघोर तपश्चर्या झाल्यात अनेकानेक वर देण्यात आलेत, पण देव लोकांच्या इतिहासात आजवर कुणाही मनुष्याने आनंदाचे वरदान मागितल्याचा उल्लेख नाही " ब्रम्हदेव म्हणाले.
" खरं आहे देव ते " नारद मुनी म्हणाले, " तुम्हाला तर ठाऊक आहे आनंद काय मागून मिळत असतो का? तो तर पृथ्वीतलावर सर्वत्र पसरलाय, प्रत्येक मनुष्याच्या मनात दडलाय, ज्याला तो सापडत नाही तोच दुस-या गोष्टींचे वरदान मागत फिरतो अन तरीही दुखी:च राहतो, आणि ज्याला आनंदाचा ठेवा सापडलाय त्याला दूस-या कुठल्या वरदानाची गरज असणार? तुम्हीच सांगा " नारदमुनी म्हणाले.
" नारायण ! नारायण !! "
अहो आश्चर्यम! ह्या वेळेस हे उद्गार चक्क ब्रम्हदेवांच्या मुखावाटे बाहेर पडले.
(समाप्त)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निव्व्ळ अप्रतीम...........!!!!!!!!

अतिशय आवडली... निलिमा + १ - <<पात्रांचा केलेला वापर पण छान>>
मजा आया... हलकी-फुलकी... पण विचार तितकाच गहन आहे

Pages